च्यायला आज मिपा बर जो येतो तो केकच्या पा.कृ. टाकतोय! गणपाशेटने रचिला पाया स्वाती झालिसे कळस .. अर्र चुकलं.. गणपाशेटने रचिला बेस आणि स्वाती झालीसे क्रीम अशी अवस्था झाली आहे. हे सगळं कमी म्हणून कोणीतरी एगलेस केक आणि (गव्हाचं) पिठलेस केकची मागणी करतंय!!! आणि ते आव्हान मिपावरची शेफमंडळी अहमहमिकेने उचलतात काय! ..
शेवटी आम्ही पण ठरवलं की ह्या सगळ्या केकाटण्यात आपला पण सहभाग असलाच पाहिजे! अर्थात ज्या माणसाला चहाचं आधण ठेवता येत नाही अशा म्या पामराने मिपावरच्या दिग्गज बल्लवांच्यां (आणि बल्लविणींच्या) लायनीत उभं राहायचं म्हणजे फक्त अशक्य!
पण तरीही या केकांच्या गलबल्यात आपलीही एक वाटी साखर पडावी म्हणून हे धारिष्ट दाखवतो आहे!
तर.. तुम्ही आत्तापर्यंत एगलेस केक च्या असंख्य रेशिप्या वाचल्या आणी ट्राय केल्या असतील.. म्हणून मग आता सादर आहे केकलेस्स एग!
साधनः
१. एक बरी अशी नाकी डोळी नीटस वयात आलेली कोंबडी
२. एक त्यातल्यात्यात हँडसम कोंबडा (कोंबडा कोंबडी एकमेकांना पसंत पडतील हे बघून घ्या).. इतर केकच्या रेशिप्यांमधे "फेटणे" ही अतिशय महत्वाची कृती आहे त्याचप्रमाणे इथे कोंबड्याचा चांगला मोठा "फेटा" महत्वाचा आहे.
कृती:
१. कोंबडा ब कोंबडीला एकांत मिळावा म्हणून त्यांना हनिमूनला सिमल्याला पाठवा.. हे शक्य नसेल तर निदान त्यांना घराच्या बाहेर एक आडोसा करून द्या.
२. आडोश्यामध्ये मऊ उबदार असं आंथरून टाकायला विसरू नका. मुसत्या गार लादीवर कोंबडीने अंड दिल्यास अंड फुटण्याचा संभव आहे!
३. कों आणि कों ना सांद्र संगीत आणी मंत सुगंध आवडत असेल तर त्याची सोय करा.
४. दररोज सकाळी त्या दोघांची आस्थेने विचारपूस करा. तसेच कुठे कोंबडीची प्रोग्रेस कुठपर्यंत आहे ह्याचा अंदाज घ्या.. पण हे करताना कोंबडीला अनकंफर्टेबल वाटणार नाही याची काळजी घ्या.
५. काही दिवसांतच कोंबडी ताजी पांढरी शुभ्र अंडी एखद्या कोपर्यात उबवत बसलेली दिसेल..
६. वरचीच कृती वापरून तुम्ही बदकांची अंडी सुद्धा बनवू शकता. (फक्त कोंबड कोंबडीच्या जागी बदक आणि बदकीण आणा.. त्यातलं बदक कोण आनी बदकीण कोण याची शहानिशा करून घ्या)..
तर आता मिपा संकेता प्रमाणे प्रत्येक पाकृमधे फोटो देणे आवश्यक असल्यामुळे हा डायरेक तयार पदार्थाचा फोटू हाजीर है!.
सो, नक्की ट्राय करणार ना ? :-)
ढिस्क्लेमरः जर खूप प्रयत्न करूनही अंडी मिळत नसतील तर लेखक जबाबदार नाही.. (आम्ही फक्त ऑफिसमधल्या खुर्च्या उबवतो.)
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 2:56 am | रेवती
काय गऽऽ बाई!
कोण कसले धागे टाकेल सांगता येत नाही आजकाल.
28 Jan 2011 - 11:04 am | टारझन
पण ही पाकृ "अपसाईड डाऊन " आहे की "डाऊनसाईड अप " नाही म्हणजे त्याप्रमाने अॅरेंजमेंट करायला ;)
-(इनसाईड आउट) टारझन
28 Jan 2011 - 3:14 am | अनामिक
ह ह पुवा!
अनामिक
28 Jan 2011 - 3:38 am | स्वाती२
हा!हा!हा!
अंड्यासाठी एक कोंबडी बास. कोंबड्याची काही गरज नाही. त्याची मस्त सागुती करा.
28 Jan 2011 - 4:34 am | Nile
हीच पाकृ आमच्याकडे मात्र थोडी वेगळी करतात हं, म्हणजे आमच्या मामाच्या सासुबाईंनी पहिल्यांदा केली होती म्हणे मग आम्हाला कळली.
सुरुवातीला ना शेजारच्यांची एखादी चांगली कोंबडी हेरावी. सहसा ज्या कोंबडीच्या मागे सारखे तीनचार कोंबडे असतात ती छान असते या पाकृला.
तुमच्या कडच्या बाजारात कुठल्या प्रकारच्या अळ्या मिळतात ते पाहुन घ्या, तुम्ही अगदीच ह्यॅ ठिकाणी राहत असला तर मग बीया वगैरेंने सुद्धा काम भागेल.
तुमच्या अंगणात ह्या अळ्या, बिया वगैरे पसरा. अळ्या पसरल्यावर पाली वगैरे येतीलच. जर नाही आल्या तर त्याही बाजारातुन घेउन या. अळ्या सरडे छान लागतात (कोंबड्यांना).
हे सगळं नीट जमुन आलं (फेटायला हवंच असं काही नाही) तर कोंबड्या आपोआप येतीलच. तुमच्याकडंच हवामान ठीक नसेल तर मात्र हे जमुन येणार नाही अशा वेळी एखादा कोंबडा उसना एक दिवसा करता घेउन हा. हा कोंबड तुमच्या अंगणात बांधुन ठेवा (नाहीतर जाईन उडुन कोंबड्यांमागे). हा कोंबडा बरोबर कोंबड्यांना पटवेल (खाण्याबद्दल, कोंबडे तसं करतात). मग कोंबड्या आपोआप येतील तुमच्या दारी. एकदा कोंबड्या आल्या की कोंबड्याला परत देउन टाका.
अळ्या वगैरे मुबलक प्रमाणात राहतील याची काळजी घेत रहा, एक दोन दिवसात कोंबड्यांना सवय झाली की कोंबड्या येतच राहतील.
तोपर्यंत बाजारुन काही घरटी आणि प्लास्टीकची अंडी आणुन ठेवा. कोंबड्यांना आधीच अंडी दिसली की तिथेच अंडी घालायचे त्यांची सवय आहे.
हे सर्व जमलं की मग फोटु घ्याच. पाकृ कशी जमते ते कळवा हं!
28 Jan 2011 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमि दोघेहि अच्रत बव्ल्त अहात.
28 Jan 2011 - 6:14 am | शुचि
कोडे - एक अंडे १० फूट पडूनही फुटले नाही ते कसे?
उत्तर - ११ फूटावरून टाकले होते म्हणून पहीले १० फूट फुटले नाही : )
28 Jan 2011 - 5:57 am | सहज
हा हा हा :-)
28 Jan 2011 - 6:03 am | अर्धवटराव
डायरेक्ट तयार रेसिपीचा फोटो टंकवलात... पा.कृ. चे फोटो सुद्धा टाकले असते तर पब्लीकला त्यांच्या पा.कृ. योग्य चालल्याय कि नाहि याचा अंदाज घेता आला असता.
(अ/उ प्रमाणपत्रधारक) अर्धवटराव
28 Jan 2011 - 7:58 am | स्पंदना
अग आई ग! काय मान दाखवतय कोम्बड? ते ही रविवार तोंडावर असताना?
केकलेस सोडा अन एग्ग पण सोडा राव, काय? काय ...?
28 Jan 2011 - 9:54 am | गवि
रविवार..
कोंबडं..
सोडा..
बर्फ..
28 Jan 2011 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll
फेटणे हे चांगले झाले असेल तर पदार्थ अधिक छान होतात. म्हणजे पदार्थाचे अर्धे अधिक यश या फेटण्यावरच अवलंबून असते म्हणा ना. त्यामुळे कोंबड्याला चांगले फेटायला शिकवा.
28 Jan 2011 - 2:51 pm | कच्ची कैरी
हसुन हसुन पूरेवाट लागली .
28 Jan 2011 - 3:27 pm | अवलिया
हा हा हा
28 Jan 2011 - 5:17 pm | कुक
कोबडी आणि कोम्बड्याचे बरीच होस पुरवता तुम्ही
28 Jan 2011 - 7:03 pm | मस्तानी
भारी आहे तुमचा प्रासंगिक विनोद !
28 Jan 2011 - 7:47 pm | मनीषा
पाकॄ. भारी आहे ..
पण ती करण्यासाठी - तेथे पाहिजे जातीचे , ( आमच्यासारख्या ) येरागबाळ्याचे काम नव्हें .
इतके सारे सामान्-सुमान जमवायचे .. आणि इतका वेळ द्यायचा ... कठिण आहे .
त्या पेक्षा शॉप अॅन्ड सेव्ह मधून रेडीमेडच आणणे बरे ..