तुम्हाला प्लुक माहीतंय ? प्लुक हा एक पेंग्विन आहे. तो उत्तर ध्रुवावर रहातो. प्लुक आपल्या घरी बर्फात खूप आनंदी आहे. पण त्याला एकच अडचण आहे. त्याला पाण्याची जाम भिती वाटते. प्लुक कधीच पाण्यात उतरत नाही. बाकीचे सगळे पेंग्वीन समुद्रात छप्पाक्क छप्पाक्क करून उड्या मारतात आणि ताजे ताजे मासे खातात. प्लुकला पोहता येत नसल्याने त्याला कधीच पोटभर मासे खायला मिळत नाहीत.
तो पाण्याला घाबरतो या एका गोष्टीवरून त्याचे सगळे पेंग्वीन मित्र त्याला चिडवत रहातात. त्यांच्या चिडवण्यामुळे अजिबात न रागावता प्लुक म्हणतो , " तुम्हीच जा त्या खोल खोल पाण्यात ! मला यायचंच नाही. मला आपले वर बर्फावर मिळणारे माशांचे तुकडेच पुरेत ! "
पण खरं सांगायचं तर असं नव्हतं. प्लुकला ते माशांचे तुकडे पुरायचे नाहीत. त्याला सारखी भूक लागायची आणि पोट काही भरायचं नाही. मग तो दूरवर फिरायला जायचा. भुकेला. एकटा. दु:खी !
एक दिवस काय झालं , प्लुक असाच भटकत होता. तेवढ्यात त्याला ताज्या माशांचा वास आला. थोडे शोधले तर त्याला एक गंमत दिसली. एका ठिकाणी बर्फावर एक टोपलीएवढे छिद्र पाडलेले होते. प्लुक त्यात डोकावला. खाली पाणी होतं. आणि एक मासे पकडण्याचा गळ त्यात टाकून ठेवलेला दिसत होता. ते काय आहे हे काही छोट्या प्लुकला समजले नाही. त्याने तो गळ हाताने हळुच हलवला. भलताच जड होता तो ! मग त्याने अजून थोडी शक्ती लावून ओढला. आणि काय चमत्कार ! त्या गळाला चांगले ५-६ लठ्ठ लठ्ठ मासे अडकलेले होते. प्लुकने तर आनंदाने उडीच मारली. पोटात एवढी भूक लागली होती की ते मासे खाण्याशिवाय इतर कोणताच विचार तो करू शकत नव्हता. पोटभर मासे खाऊन झाले. मस्त ढेकर आला. मग प्लुक रोजच तिथे येऊ लागला. रोज त्याला पोटभर मासे खायला मिळू लागले.
पण एके दिवशी...
प्लुक मासे खाण्यात मग्न होता. तेवढ्यात त्याला कुणाचातरी आवाज आला. बघितले तर काय, एक एस्किमो मुलगी आपल्या हातातली काठी उगारून रागारागाने त्याच्या दिशेने येत होती. ती मोठमोठ्याने ओरडत होती, " चोर ! चोर ! बरा सापडलास आज ! रोज माझे मासे चोरुन खातोस ! तरीच आजकाल मला मासे मिळत नाहीत ! लबाड ! थांब आता तुला चांगलीच अद्दल घडवते..... ! "
प्लुकला आपलं काय चुकलं तेच कळेना. त्या मुलीचा रागावलेला चेहरा आणि हातातली काठी बघून तो जाम घाबरला. खरं तर त्याला सगळं नीट सांगायचं होतं. पण ती मुलगी खूपच जास्त रागावलेली दिसत होती. तिने काही त्याचे ऐकुन घेतले नसते. प्लुकने तिथून धुम ठोकली. तरीपण ती मुलगी त्याच्या मागे पळत होती. तोंडाचा पट्टा चालूच होता. " आता पुन्हा माझे मासे चोरशील तर याद राख ! माझ्याशी गाठ आहे. टोका म्हणतात मला. उत्तर ध्रुवावरची सर्वात शूर एस्किमो मुलगी आहे मी ! "
शेवटी टोका परत फिरली. प्लुक एका आडोशाला उभा राहून तिच्याकडे बघत होता. त्याला वाटले, ' बिचारी टोका ! तिला वाटले की चोर आहे. पण मला तिचे मासे चोरायचे नव्हते. मला काय माहीत ते तिचे मासे आहेत म्हणून ! '
टोका कुठे जाते हे बघायचे त्याने ठरवले. टोकाने आपला गळ, मासे गोळा केले आणि ती बर्फावरचा निसरडा रस्ता चढायला लागली. तिच्या पाठीवर कसलीशी जड सॅक दिसत होती. त्या ओझ्याने तिचे पाय सारखे निसटत होते. पण ती जिद्दीने अवघड चढण चढत होती. तितक्यात तिच्या पाठीवरच्या सॅकचा एक बंद तुटला नि ती सॅक खाली पडली. पडली नि वेगात उतारावरून घसरायला लागली.
" अरे अरे ! थांब ! थांबवा ती सॅक ! मदत ! धावा ! धावा ! " टोका प्रचंड घाबरून ओरडायला लागली.
हे सगळे प्लुक बघत होता. तेवढ्यात त्याला त्या सॅकमधुन एक छोटेसे डोके आणि इवले इवले हात बाहेर येताना दिसले. छोटंसं गोंडस बाळ होतं त्या सॅकमध्ये !
झूऊऊप्प ! मागचा पुढचा विचार न करता प्लुकने ती सॅक वाचवण्यासाठी बर्फावर झेप घेतली. सॅकच्या मागोमाग तो ही तितक्याच वेगाने सरसर करत बर्फावरून घसरू लागला. आणि अचानक ! डुबुक ! छप्पाक्क !!! आधी सॅक नि मागोमाग प्लुक समुद्रात पडले !
अगदी दोन तीन क्षणात प्लुक पोहायला लागला ! " वॉव ! मला पोहता येतंय की ! " प्लुक मनाशी म्हणाला. आणि मग त्याने सॅकच्या दिशेने सूर मारला. सॅक पकडली. नि मग
एक..दोन..एक..दोन..एक..दोन.. करीत सॅक घेऊन पोहत पाण्यावर आला.
बाकीचे पेंग्वीन हे सगळे बघून मदतीला धावले. त्यांनी सहा,पाच्,चार्,तीन,दोन असे एकावर एक उभे राहून मस्त मनोरा तयार केला. प्लुक सॅक घेऊन तो मनोरा चढला नि जमिनीवर आला.
तिथे टोका दु:खाने जोरजोरात रडत होती. तितक्यात तिला छप छप असा विचित्र आवाज आला. मागे वळुन बघितल्यावर तिला प्लुक येताना दिसला. त्याच्या हातात बाळाची सॅक होती ! टोकाला एवढा आनंद झाला की तिने उड्या मारायला सुरुवात केली. टाळ्या वाजवायला सुरुवात केली. प्लुकच्या हातातून बाळाला घेऊन ती आनंदात हसू लागली. " माझा टोपिती ... माझं बाळ.. माझं शोनुलं , माझा लाडका तान्हा भाऊ ! " " ये आता माझ्या कोटाच्या आत ! लवकरच तुला उबदार वाटेल. " असे म्हणून टोकाने टोपितीला आपल्या उबदार कोटात गुंडाळले.
तिने प्लुकला मिठी मारली. " थँक यु प्लुक ! तुझ्यामुळे माझा भाऊ मला परत मिळाला. "
प्लुक आणि त्याच्या मित्रांना टोका म्हणाली, " चला आता लवकर लवकर ! माझ्या इग्लूत लवकर पोहोचलं पाहिजे. नाहीतर माझा टोपिती आजारी पडेल. येणार ना सगळे माझ्यासोबत ? "
सगळे पेंग्वीन आनंदाने उड्या मारत टोकाच्या घरी गेले. टोकाने मस्त शेकोटी पेटवली. त्यावर ताजे ताजे मासे खमंग भाजून सगळ्यांना खायला दिले.
आणि प्लुक ? आज या जगात तो सर्वात आनंदी पेंग्वीन होता.
प्रतिक्रिया
21 Jan 2011 - 4:54 am | निनाद
वा मितान!
प्लुक आणि टोका!
अजून एक सुंदर कथा अनुवादित केल्याबद्दल धन्यवाद!
निसर्ग आणि मानव यांची प्रतिकूल परिस्थितीतही सांगड घातलेली कथा आवडली.
(आवांतरः प्राण्यांचे चे मानवीकरण किंवा मानवी भावनांमध्ये सामील करून घेणे हे सूत्र अनेकदा कथांमध्ये आढळते, म्हणूनच त्या लोककथा असतात का?)
21 Jan 2011 - 7:42 am | नरेशकुमार
'श्यामची आई' कथेतिल 'तो' एक प्रसंग आठवुन गेला.
निरागस कथा.
21 Jan 2011 - 8:34 am | निवेदिता-ताई
सुंदरच.....
21 Jan 2011 - 10:57 am | आत्मशून्य
आपले लीखाण खरचं ही गोष्ट डोळ्या समोर ऊभी करतं. आणी या गोष्टी वाचताना मन काही क्षणापूरते का होइना अत्यंत नीरागस बनून बालभावामधे जाते, मनःपूर्वक धन्यवाद.
21 Jan 2011 - 11:25 am | पिंगू
कथा भावली...
- (प्लुकचा भाऊ) पिंगू
21 Jan 2011 - 11:31 am | नन्दादीप
सुंदर, निरागस कथा....मस्त, दिल खूश झाला....बालपणीचे दिवस आठवले...
असल्याच कसल्या कसल्या (शेवट गोड असणार्या) गोष्टी ऐकत, वाचत बालपण गेल....
21 Jan 2011 - 12:17 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त !
:)
21 Jan 2011 - 12:19 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त!
21 Jan 2011 - 12:40 pm | स्मिता.
मला तर मितानच्या बालकथा पाहिल्या की आनंद होतो. काहीतरी छान, निरागस वाचायला मिळतं आणि थोड्या वेळासाठी का होईना पण मी माझे सगळे ताण विसरून जाते.
अवांतर : पेंग्विनची गोष्ट वाचून 'हॅप्पी फिट' आठवला.
21 Jan 2011 - 1:23 pm | प्यारे१
चान चान गोष्टी....
मला मिता मावशीच्या गोष्टी खूप्खूप आवल्तात.
21 Jan 2011 - 1:36 pm | परिकथेतील राजकुमार
आहान मस्त कथा :)
ह्या कथा वाचताना लहानपण परत येते अगदी.
अवांतर :- हि कथा वाचताना राहुन राहुन टॉम अँड जेरी मधील पोहता न येणार्या बदकाच्या पिल्लाची आठवण झाली. शेवटी जिवावर उदार होउन तेच पोहत जाते आणि बुडणार्या टॉमला वाचवते.
21 Jan 2011 - 6:10 pm | गणेशा
नेहमीप्रमाणेच खुप छान बालकथा.
असेच लिहित रहा .. वाचत आहे.
अवांतर :
( प्रवास वर्णन पण येवुद्या ना ताई .. खुप दिवस झाले वाट पाहतो आहे त्याची )
21 Jan 2011 - 7:23 pm | असुर
मस्त! नेहेमीप्रमाणेच सरळसोप्पी गोष्ट आणि मितानच्या शैलीत ती अजून छान वाटतेय!!
विशेष म्हणजे मितानमावशी गोष्टी सांगतेसुद्धा खूप छान! या सगळ्या गोष्टी ती एक दिवस तिच्या खास शैलीत वाचून दाखवेल या आशेत...
--असुर
21 Jan 2011 - 7:58 pm | मानस्
मस्तच आहे कथा..माझ्या मुलाला नक्कीच वाचून दाखवेन त्याला खूप आवडेल.
21 Jan 2011 - 9:58 pm | धनंजय
मजेदार गोष्ट.
पेन्ग्विन ऐवजी पांढर्या अस्वलाच्या पिलाची गोष्ट लिहिता आली असती, असे वाटते.
**(कोणास ठाऊक, बालकथेतले बोलणारे प्राणी खरेखुरे बोलत नसतात हे त्या वयातही थोडेसे कळते, आणि मोठेपणी जीवशास्त्राबद्दल गैरसमज वगैरे मुळीच होत नाही. पण बालकथेमधील वातावरणनिर्मितीमधले आनुषंगिक तपशील मात्र तथ्य म्हणून लक्षात राहातात. म्हणजे एस्किमो लोक बर्फात छिद्र पाडून मच्छिमारी करतात हे तथ्य आहेच. ते बालकथेतून मोठेपणापर्यंत लक्षात राहिले, तर हसतखेळत माहिती मिळते, ते चांगलेच. मात्र उत्तरध्रुवीय प्रदेशात पेन्ग्विन सापडतात ही चुकीची माहिती मुलांच्या मनात अडकली, तर ते बरे नाही.)**
21 Jan 2011 - 10:57 pm | मितान
सर्वांचे आभार :)
स्मिता, हॅप्पी फीट मधला मंबल आठवतो खरंच !
परा, मला आठवला तो टॉम अँड जेरीतला प्रसंग :)
धनंजय, मुळात मुलांनी काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी, बोध घेण्यासाठी गोष्टी ऐकाव्या असे मला वाटत नाही.
>>>कोणास ठाऊक, बालकथेतले बोलणारे प्राणी खरेखुरे बोलत नसतात हे त्या वयातही थोडेसे कळते, आणि मोठेपणी जीवशास्त्राबद्दल गैरसमज वगैरे मुळीच होत नाही. पण बालकथेमधील वातावरणनिर्मितीमधले आनुषंगिक तपशील मात्र तथ्य म्हणून लक्षात राहातात. म्हणजे एस्किमो लोक बर्फात छिद्र पाडून मच्छिमारी करतात हे तथ्य आहेच. ते बालकथेतून मोठेपणापर्यंत लक्षात राहिले, तर हसतखेळत माहिती मिळते, ते चांगलेच. मात्र उत्तरध्रुवीय प्रदेशात पेन्ग्विन सापडतात ही चुकीची माहिती मुलांच्या मनात अडकली, तर ते बरे नाही.)**
तुमचे म्हणणे काही अंशी पटत नाही. तुमच्या निकषावर गोष्ट सांगायची तर परीकथाही बाद कराव्या लागतिल. मोठेपणी प्राणी बोलत नाहीत हे कळते तसे उत्तर ध्रुवावर पेंग्वीन नसतात हे ही कळेलच की :) आत्ता या वयात गोष्टीतला आनंद घेता येणे महत्त्वाचे. आणि ते मुलांना शिकवावे लागते. प्रत्येक गोष्ट खरेखुरी किंवा शास्त्रीय सांगायची वेळ नसते ही. किंबहुना त्यांच्या कल्पना शक्तीला नको तिथे अनावश्यक माहितीचा मारा करून आपण खीळ घालतो.
मी तर कथेचा अनुवाद केला. मी लेखिका नाही असे सांगता आले असते. पण या निमित्ताने बालसाहित्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन इथे मांडण्याची संधी घेतली.
धन्यवाद :)
21 Jan 2011 - 11:58 pm | धनंजय
माझ्या निकषावर परिकथा बाद नाहीत :-(
(प्राणी बोलतात ते बाद नाही असे स्पष्टीकरण दिल्यानंतरही माझ्या निकषाबद्दल असा गैरसमज कसा व्हावा?)
माझे म्हणणे नीट सांगू शकलो नाही याबद्दल खेद वाटतो.
21 Jan 2011 - 11:46 pm | पैसा
हे खरं तर वेगळं सांगायला नको! या निरागस कथा वाचताना लहानपणी वाचलेल्या हॅन्स अँडरसनच्या परीकथा आठवतात, आणि घशात नकळत एक आवंढा येतो. की हे सगळं अद्भुत जग खरं वाटण्याचे दिवस का संपले म्हणून!
22 Jan 2011 - 6:29 am | मदनबाण
गोड गोष्ट... :)