डच बालकथेचा स्वैर अनुवाद ७ : एल्माची भरारी

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
18 Jan 2011 - 8:11 pm

सकाळी जाग आली तेव्हा एल्माने आपले पंख पसरले. मस्तंच दिसत होते पंख ! मोठे नि मजबूत ! असे पंख पसरूनच एल्मा आपल्या घरट्याच्या कोपर्‍याकोपर्‍यात फिरली. मग ती घरट्याच्या काठावर येऊन उभी राहिली. आपल्या पंखांकडे बघत मनाशीच म्हणाली, " आता मला उडायचंय ! "

उंच आकाशात घिरट्या घेणार्‍या एल्माच्या आईला एल्मा दिसली. किती काठावर उभी होती ती ! आई पट्कन खाली उतरली.
" एल्मा, लवकर आत घरट्यात जा बघू ! " असे म्हणून तिने एल्माला घरट्यात पाठवले.
" पण मला उडायला शिकायचंय आई ! माझे पंख बघ किती मोठे नि बळकट झालेत.. " घरट्यातून हळूच डोकावत एल्मा आईला म्हणाली.
आईने तिच्या चोचीत एक दाणा घातला.
" घरट्यातच रहा ", आई म्हणाली
"अजून तुला उडता येत नाही पिलु ... तू अजून खूप दाणे खाल्ले पाहिजेस. मग तू एक ताकदवान पक्षी होशील नि तुला उडता येईल. " असे म्हणून आई अजून दाणे शोधायला उडून गेली.

एल्माने आपले पंख फडफडवले. ती पुन्हा एकदा घरट्याच्या काठाशी उभी राहिली. तिने पंखांची उघडझाप केली. मग जोरजोरात पंखांची फडफड करू लागली. एवढ्या जोरात की ती जवळजवळ हवेत उडायलाच लागेल असे वाटत होते.
" आज मी नक्की उडू शकेन " एल्माने विचार केला.
" आणि मग मला दाणे शोधायचेत. ते खाऊन मी बलवान पक्षी बनेन ! "

इतक्यात आई आलीच !
" एल्मा ! काठावरून आत घरट्यात जा. " आई ओरडली.
" पण आई, बघ तरी मला माझ्या पंखांनी काय करता येतंय ते ! " एल्माही ओरडली. " मला उडायचंय. आणि दाणे शोधून आणायचेत. "

आईने अजून एक दाणा एल्माच्या चोचीत भरवला.
" घरट्यात बस. दाणे खा. " आईने बजावले.
" अजून तू उडण्याएवढी मोठी नाहीस. मी दाणे शोधून आणते. त्याची काळजी तू नको करू. दाणे खा. मग बघ . एक दिवस तू खूप छान उडू शकशील. " असे सांगून आई भुर्र्कन उडून गेली.

एल्माला काही स्वस्थ बसवेना. ती पुन्हा जोरजोरात फडफड करू लागली. तिने उड्याही मारायला सुरुवात केली. उंच... अजून उंच...अजून.. अजून उंच.. ! प्रत्येक उडीसोबत तिला घरट्याच्या पलीकडचं जग दिसू लागलं.
" बघा बघा ! मला उडता येतंय ! " आनंदाने एल्मा अजून उंच उड्या मारू लागली.
काय काय दिसलं तिला ? ते एक घर ! मोठी मोठी झाडं..त्यामागे अजून घरं .. मग एक टेकडी.. त्या टेकडीमागे काय बरं ?? अंहं ! ते काही केल्या दिसेना. एल्माने अजून उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ !

तेवढ्यात पुन्हा आई आली. तिने एल्माला उड्या मारताना पाहिलं होतं. ती एल्माला चांगलीच रागावली.
"तुला सांगितलं ना अजून तू लहान आहेस म्हणून ! चल पळ आता घरट्यात. हे दाणे खा. आणि कुठेही उड्या मारू नकोस. " आई म्हणाली.
" पण मला उडायचंय आई ! मला दाणे शोधायचेत. आणि त्या टेकडीमागे काय आहे ते पण पहायचंय " एल्मा हट्ट करत म्हणाली.
" ए मुली, वेडी की काय तू ! तुला माहितंय त्या टेकडीच्या मागे कोन आहे ? एक मोठ्ठी काळी मांजर आहे तिथे ! " आईने एल्माला चांगलीच भिती घातली.
" तू घरट्यातून हलायचं नाहीस ! कळलं का ? " " हे दाणे खा आणि शांत बसून रहा. नाहीतर तू कधीच मोठी पक्षीण होणार नाहीस " असे म्हणून आई दाणे शोधायला गेली.

पण आज काहीही झाले तरी उडायचंच असं एल्माने ठरवलंच होतं. तिने पंख फडफडवले. अजून जोरात. खूप जोरात... आणि एका क्षणी घरट्याच्या काठावरून खाली उडी मारली.
फड्फड्फड... फड्फड्फड... तिने जोरजोरात पंख हलविले. एल्मा वेगात खाली पडू लागली.
फड्फड्फड्फड..फड्फड्फड.. आता पडणार जमिनीवर ! किती जवळ दिसतेय जमीन !!! फड्फड्फड.. अजून वेगात.. सगळी शक्ती लावून...फड्फड्फड्फड्फड...झूऊऊउप्प !
एल्मा उडाली !!! युप्पी..... एल्माला उडता आलं !

खुशीत एक शीळ घालून एल्माने हवेत एक मस्त गिरकी घेतली ! मग अजून उंच भरारी घेतली.. इकडून तिकडे..तिकडून इकडे.. एल्मा उडू लागली. झाडांवरून, घरांवरून..थेट त्या टेकडीपर्यंत एल्मा उडत उडत गेली. तिने खाली बघितलं. खाली एक कुरण होतं. ती तिथे उतरली. सगळीकडे हिरवेगार गवत पसरले होते. अधुनमधून झाडं होती. मोठ्या कुतुहलाने एल्मा टुण् टुण् करीत उड्या मारत इकडेतिकडे बघू लागली.
" हे काय आहे ? अळी ? अम्म्म्म ! किती कडक आहे ही ! " " हा दाणा दिसतोय..बघू बघू ! खरंच ! दाणा आहे हा. इथे पण एक आहे . तिथे एक दिसतोय.. हा दाणा नाही.. ही अळी मस्तंय ! लागते पण छान ! " असे करत करत एल्मा बर्‍याच दूरवर गेली.

अचानक तिला झुडुपातून डोकावणारे एक मोठे धूड दिसले. काय आहे ते ?? काळी मांजर ??? हो. मांजरच आहे ती. बापरे ! आता काय करू ? उडून गेलं पाहिजे आता.
पण भितीने एल्माचे पंख जणू शरीराला चिकटून बसले होते. खूप भिती वाटत होती तिला.
" मला उडालं पाहिजे. मला उडता येतं.." एल्मा मनाशीच म्हणू लागली.
मांजर हळुहळू जवळ येऊ लागली. जिभल्या चाटू लागली. एल्मा अजून घाबरली. " मला उडालं पाहिजे ! मला उडता येतं " असे पुटपुटत तिने हळूच पंख हलवुन पाहिले. पंख हलले. फड्फड..फड्फड..अजून जोरात..फडफड्फड.. वेगात..

मांजर समोर उभे राहून स्थिर नजरेने एल्माकडे बघत होती..
फड्फड्फड्फड...मांजराने झेप घेण्यासाठी दबा धरला..
एक..फड्फड्फड....दोन...फडफड्फड्फड....सगळी शक्ती पणाला लावून एल्मा उडाली.. झूऊऊऊप्प ! तिने उंच भरारी मारली. मांजर खालून बघत बसली.
एल्मा उडाली ती थेट आपल्या घरट्यात येऊन बसली.
तिचे पंख थरथर कापत होते. काळिज धडधडत होतं. इतक्यात आई आली.

" हुश्श ! बरं झालं तू घरात सुखरूप आहेस ते ! " आई म्हणाली. " हा घे दाणा..." आई दाणा भरवत होती. आणि एल्मा काहीही न बोलता खात होती.

बालकथाभाषांतर

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 Jan 2011 - 8:19 pm | प्राजु

छान आहे कथा!! लिहिण्याची पद्धतही आवडली.

भलतीच व्रात्य कार्टी दिसते ही एल्मा :(

स्पा's picture

18 Jan 2011 - 9:00 pm | स्पा

मस्त हाये गोष्ट

आत्मशून्य's picture

18 Jan 2011 - 8:45 pm | आत्मशून्य

असेच एकदा स्कूटरची पेट्रोल्ची अंधारी टाकी कीती खोल आहे हे कळावे म्हणून काडी पेटवून ऊजेड केला होता, पण लगेचच तो थोडा(?) जास्तच वाढला होता.

शुचि's picture

18 Jan 2011 - 9:56 pm | शुचि

काSSSSSय??????? : (

आत्मशून्य's picture

18 Jan 2011 - 10:08 pm | आत्मशून्य

मि पट्दीशी घाबरून लांब पळालो व आग लागली म्हणून कांगावा केला, पण चोराच्या ऊलट्या बोंबा अर्थातच लगेच ऊघडकीला आल्या (त्यामानाने एल्मा नशीब्वान म्हणायची ). स्कूटरने पेट नाही घेतला बहूतेक टाकीतला ऑक्सीजन संपला असावा कीवां इतर काही कारण असावे . पण मस्त भडका उडाला होता ...........

ramjya's picture

18 Jan 2011 - 8:57 pm | ramjya

लहाण पणी एक कविता वाचली होती...."मोठे होते झाड वाकडे, तिथे खेळ्ती दोन माकडे"....माकदाचे पिल्लु ओन्ड्क्या मध्ये शेपुट आड्कुन घेतो त्याबद्द्ल आहे

पैसा's picture

18 Jan 2011 - 11:24 pm | पैसा

मला वाटलं काळं मांजर खरंच माझ्या अंगावर उडी मारतंय की काय, आणि मी पटकन पंख पसरले!

पुष्करिणी's picture

19 Jan 2011 - 2:43 pm | पुष्करिणी

एकदम गोड गोष्ट

मदनबाण's picture

19 Jan 2011 - 7:11 pm | मदनबाण

मस्त लिहले आहे... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2011 - 7:37 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच!

खुपच छान लिहिले आहे ..

खालील पॅरा सगळ्यात जास्त उत्कंठा वाढवणारा वाटला

पण आज काहीही झाले तरी उडायचंच असं एल्माने ठरवलंच होतं. तिने पंख फडफडवले. अजून जोरात. खूप जोरात... आणि एका क्षणी घरट्याच्या काठावरून खाली उडी मारली.
फड्फड्फड... फड्फड्फड... तिने जोरजोरात पंख हलविले. एल्मा वेगात खाली पडू लागली.
फड्फड्फड्फड..फड्फड्फड.. आता पडणार जमिनीवर ! किती जवळ दिसतेय जमीन !!! फड्फड्फड.. अजून वेगात.. सगळी शक्ती लावून...फड्फड्फड्फड्फड...झूऊऊउप्प !
एल्मा उडाली !!! युप्पी..... एल्माला उडता आलं !