फ्लाईंग शिकणं हा माझ्या एरव्हीच्या लाईफपेक्षा भलताच जास्त झापडिंग काळ होता..
त्यात मी जाम मजा केली..जाम लोचे केले आणि जाम झगडा केला..भीतीशी, निराशेशी,अभ्यासाशी, आकाशाशी, हवेशी आणि व्हॉट नॉट..!!
हवेत उडताना एका एरियाताली सर्व विमानं एकाच फ्रिक्वेन्सीवर बोलत असतात..तरट फाटल्यागत आवाजात घोगरं घोगरं बोलून पायलट कोणावर स्टाईल मारतात कोण जाणे..
पण त्यामुळे होतं काय की सर्वांचं बोलणं सगळेच ऐकत असतात..आणि एकजण बोलायला लागला की त्याने माईक सोडेपर्यंत बाकी सगळ्यांची बोलती बंद..
म्हणून अत्यंत मुद्द्याचं तथा थोडक्यातच बोलायचं असतं..
मोठ्या विमानात पायलट आणि को-पायलट एकमेकांशी टी.पी. करतात..
अधून मधून नुसता 'टी' आणि नंतर (टॉयलेट उपलब्ध असल्यामुळे) नुसतं 'pee' ही करून येतात..
प्रवाशांसाठीचे डबेही हादडतात..
पण एकयंत्रयुक्त, वातानुकुलनविरहित, बुरबुरपंखाचलित, स्वच्छतागृहविरहित विमान हाकत दूर दूर चाललेल्या क्रॉस कंट्री करणार्या मजसारख्या एकांड्या शिकाऊ जिवानं कोणाशी बोलायचं? काय ब्रं क्रावं?
(सोलो क्रॉस कंट्रीमधे मी तर बाबा शर्ट काढूनही बसायचो..आहे कोण बघायला..त्या कुक्कुट-खड्ड्यात..एकला उडो रे..)
म्हणून एक ठराविक फ्रिक्वेन्सी आहे..१२३.४ मेगाहर्टझ..त्यावर तुम्ही काय वाट्टेल ते बकू शकता.. खरं तर पायलट टू पायलट संवादासाठी ही फ्रीक्वेन्सी ठेवली आहे. पण ती प्रत्यक्षात पर्सनल कारणांसाठीच वापरतात. ती कोणी मॉनिटर करत नाही. हल्ली ही १२३.४५ झाल्याचं समजलं.
टिकटिक असा माईकचा आवाज केला की आपल्या मित्राला बरोब्बर कळतं की "ये.. भेट साल्या १२३४ वर.."
मग हाणा गप्पा..
या फ्रीक्वेन्सीला नुसतं ट्यून करून बसलं तरी वेळ झुईं करून मस्त उडतो..
यावर ऐकून मला झालेले अनावश्यक साक्षात्कार असे:
काही शिकाऊ लोक एकटे क्रॉस कंट्री करायला घाबरतात.."आपण ढगांत चुकू" अशी त्यांची टर्कीफाईड अवस्था होते..आणि ती भीती वास्तवही असते. फोटो काढण्यात रमलेला माझा रूममेट ढगात चुकून शेवटी त्याला शोधायला गुरुजींना दुसरं विमान घेऊन टेक ऑफ करायला लागला होता. शेवटी दहा चुकीच्या गावखेड्यांवर हिंडून विमानाच्या टाकीत काही थेंब उरलेले असताना कसाबसा परत आला. बर्फाळ ढगांमधून येऊनही घामाने चिंब झाला होता. त्या हबक्याने कोणाशी दिवसभर एक अक्षर बोलला नाही.
मज स्वतःवरही यासम वेळ आली होती पण ते तसले किस्से परत कधीतरी.
तर..सांगत काय होतो.. काही शिकाऊ लोक एकटे क्रॉस कंट्री करायला घाबरतात..
फक्त एखाद्या ठिकाणच्या "वर" जाऊन परत यायचं असेल (बिन लँडिंगची क्रॉस कंट्री)..तर....हे पेद्रू चक्क एअरपोर्ट जवळच्याच एखाद्या नदी, सरोवर वगैरे मोठ्ठ्या खुणेला पकडून त्याच्यावर एकाच जागी घिरट्या घालत बसतात..
तोंडानं आपली पोझिशन दूर दूर जात असल्याचं रिपोर्ट करतात..आणि तास दोन तासांनी बरोब्बर वेळ मोजून घिरट्या थांबवतात आणि येतात परत..हे सर्व कळायचं ते १२३.४ वरच्या संवादांतून.
शिवाय..
....
मोठ्या विमानांचे पायलट एकमेकांच्या बायकापोरांची (आणि एकमेकांच्या हवाई सुंदरींचीही...!!) चौकशी करतात १२३.४ वर..
....
"तू किद्दर हैं बे ? दिखता नई बे तू.. मेरेकू लागता तू आज मेरेकू ठोसनेवाला हैं पिच्छू से.." अशी बावचळलेल्या शिकाऊ पायलटांची भयंकर वाक्यंही असतात १२३.४ वर..
....
मी किशोर कुमारची गाणी, गझला वगैरे गाऊन इतर पायलट लोकांना विरंगुळवायचो ही १२३.४ वर..
....
एक सोन्याच्या खाणीचं ठिकाण होतं, आणि त्याच्यावर ओव्हर-फ्लाय क्रॉस कंट्रीसाठी एका स्टुडंट पायलटची फ्लाईंग टेस्ट घ्यायची होती..एका नवीनच जॉईन झालेल्या फ्लाईट ट्रेनरला ही टेस्टिंगची ड्युटी लागली होती..
त्याच्या हुशार विद्यार्थ्यानं त्याला घुमवत घुमवत एका खड्डे खड्डे असलेल्या भूप्रदेशावर आणलं..खाली धूसर धूसर खोल खड्डे दाखवून सांगितलं की हीच ती सोन्याची खाण..
आणि झाला की पास टेस्ट..
आईचा घो..नंतर तो ट्रेनर शाणा होईपर्यंत हा हुशार विद्यार्थी "लैसन" घेउन पसार झाला असणार..आणि आपल्यापैकी कोणीतरी त्याच्या मागे बसून ज्यूस पीत प्रवासही करत असणार..बोईंग मधून..
....
कोणत्याही एअरलाईनच्या फ्लाईटमध्ये पायलट आणि को-पायलटची नावं सांगतात..
मी ती नावं ऐकेपर्यंत बेचैन असतो..छाती धडधडत असते..
एकेकाळी बरीच (बुरबुर) उड्डाणं करून अल्पकाळ का होईना पण पायलट असलेला आणि प्रायव्हेट का होईना पण पायलट लायसेन्स असलेला आपला नवरा नुसता पॅसेंजर म्हणून इतका का घाबरतो हे माझ्या बायकोस कळत नाही..
जाव दे ..सुखी आहे ती..र्हाव दे!!!
टीप: या त्याच त्या "ढगात चुकलेल्या" सेस्ना १५२ विमानाचा फोटो दाखवायचा होता. पण पर्सनल फोटो डकवणे पटत नाही म्हणून "आजतक"वर जसे रेव्हपार्टीतल्या पोरापोरींची चेहरे "धूसर" करतात तसा स्वतःला केलाय. शिवाय पोट लपवणे हा उद्देश आहेच..!! असो.
प्रतिक्रिया
13 Jan 2011 - 12:33 pm | पाषाणभेद
हा हा हा मजा आला वाचून
13 Jan 2011 - 12:51 pm | नगरीनिरंजन
मस्त! गगनविहारींचं (म्हन्जे पायलटांचं) एक वेगळंच जग दिसतं तुमच्या लेखांमधून. येऊ द्या अजून.
13 Jan 2011 - 2:31 pm | मेघवेडा
>> गगनविहारींचं (म्हन्जे पायलटांचं) एक वेगळंच जग दिसतं तुमच्या लेखांमधून.
असेच म्हणतो. अजून लिहा!
13 Jan 2011 - 7:33 pm | संजय अभ्यंकर
अजून येऊ द्यात, गगनविहारीभाऊ.
The Great Flying Stories आणी Airport सारखी पुस्तके वाचून, पायलटच्या व्यवसायाबद्दल बरेच कुतुहल आहे.
13 Jan 2011 - 12:54 pm | रणजित चितळे
छान आहे.
मी ह्याच फिल्डमध्ये आहे - फ्लाईट टेस्ट ईंजिनियर त्या मुळे वाचून बरे वाटले.
13 Jan 2011 - 12:57 pm | गवि
तुमचे लष्करी उड्डाण प्रशिक्षण आणि सॉर्टीज हे वेगळेच कस लावणारे आहे.
त्यापुढे सिव्हिल फ्लाईंग म्हणजे तुफानापुढे टेबलफॅन.. :)
13 Jan 2011 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
छानच लिहिले आहे.
मिपा वरचा तुमचा पहिला धागा अजूनही आठवतो. तुम्ही तो धागा नुसत्या मनोरंजनासाठी काढला नसून खरोखरच नव्या विषयातली थोडी माहिती मिपाकरांना देण्यायोग्य होता.
असेच लिहित रहा.
13 Jan 2011 - 2:12 pm | समीरसूर
छान आणि माहितीपूर्ण लेख!
विमान या अवाढव्य पदार्थाचा असा अनुभव स्वप्नातदेखील आला नाही. :-)
अजूनही बरेच बेसिक प्रश्न सतावतात. विमान उडते कसे? बरोबर रस्ता कसा ठरवतात? सुकाणू असते का? गिअर असतात का? समोर काय दिसत असते?....बरेच आहेत. अजून बाल्यावस्थेतले बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत... :-)
13 Jan 2011 - 2:34 pm | टारझन
मस्त रे गव्या ... मी टु सिटर प्लेन चालवलं होतं पण त्यात मला कंट्रोल मिळालेले ते वर गेल्यावर :) तो घरघरणारा रेडिओ वरचा आवाज मला कधीच समजला नाही. कधी कधी माझा पायलट माझ्याशी बोलायचा तेंव्हा पण मला कोणीतरी रेडिओ वर बडबड करतोय असेच वाटले होते :) तेंव्हा आपला लेख आवडलेला आहे.
- टारझन
13 Jan 2011 - 2:47 pm | गवि
मस्त रे गव्या ????
-(गविरेडा)
बादवे.. मस्तच.. कुठे केले फ्लाईंग ? अजून करतोस का? चल जाऊया जॉयराईडला.
13 Jan 2011 - 2:55 pm | टारझन
आम्ही कोर्स नाही केला बॉ. . असंच अॅमेचर फ्लाईंग केलं होतं कंपाला मधे .. आमचा क्लायंट फ्लाईंग क्लब चा मेंबर होता त्याची कृपा. :) आता अफ्रिकाही सुटली आणि चैन ही ...
बाकी जॉयराईड ला णेनार असशील तर लै भारी ... किती डॅमेज आहे ? डिटेल्वार कळविणे.
अवांतर : ६फुट+ आणि डबल रुंदी असणारे लोकं कंफर्टेब्ली बसु शकतात का ह्या विमानात ? :) मला लास्ट टाईम अंमळ झिप / रार होऊन बसावे लागले होते. :)
13 Jan 2011 - 3:22 pm | गवि
आम्हीही पाच अकरा आहोत. पण फार ओढाताण झाली नाही कधी.. :)
तंगड्या लांब असतील तर होऊ शकतो इश्यू..
असो आता आवरतो.. नपेक्षा पराभौ येतील धाग्याची खव केली म्हणून पुरस्कार द्यायला.. ;)
14 Jan 2011 - 6:26 am | नरेशकुमार
टारु मित्रा, यावेळेस आपल्याला मागे टाकण्यात आलेले आहे.
गवि, लेख वाचुन आता इथुन पुढे प्रत्येक उड्डानपुर्वि आपल्याला कॉल करुनच उडावे असे वाटत आहे.
अवांतर : डीस्कोरी आनि NGC वर तुम्हि ते Air Crash Investigations व Seconds from Disaster. बघता का ?
14 Jan 2011 - 9:42 am | टारझन
आपल्याला पास देण्यात आलेला आहे. प्लिज गो अहेड :) खुष ?
14 Jan 2011 - 10:05 am | गवि
वरील दोन्ही प्रतिसाद नॉट समझीन्ग्ड..
बादवे: या सर्व आमच्या पूर्वाश्रमीच्या गोष्टी आहेत. एव्हिएशन दहा वर्षांपूर्वीच पूर्ण सोडले. सध्या आम्ही यापैकी काहीही नाही आहोत. संपूर्ण वेगळ्या क्षेत्रात नोकरी करतो.
आता केवळ छंद म्हणून विमान अपघातांचा अभ्यास ठेवतो अधून मधून (काय छंद आहे..!!)
13 Jan 2011 - 3:30 pm | पुष्करिणी
लेख छानच झालाय, आवडला!
विमानाबरोबरचा फोटो धुसर करून पोट लपवायचा प्रयत्न टारझननं वाया घालवला (ह.घे.) :)
13 Jan 2011 - 2:51 pm | बिपिन कार्यकर्ते
एक नंबर!!!
13 Jan 2011 - 3:57 pm | सहज
आकाशातल्या अजुन गमती जमती येउ द्या!
13 Jan 2011 - 5:14 pm | विजुभाऊ
बारामतीला एक फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल होते
एका बहाद्दराने तेथले एक सेसना विमान नीरा नदीवरच्या पुलाखालून न्यायचा प्रयत्न केला. पुलाच्या दुसर्या बाजूला एम एस ई बी च्या तारा होत्या. त्याला धडकून विमान नदीत खाली पडले.
त्या बहाद्दराने त्या अगोदर तसा एक सक्सेस फुल्ल प्रयत्न केला होता.
13 Jan 2011 - 5:44 pm | गवि
होय.. कार्व्हर एव्हिएशन.
तो मुलगा ऐनवेळी विना परवानगी एका मुलीला सोबत बसवून घेऊन गेला होता. ते दोघे नदीत पडेपर्यंत कोणाला आत मुलगी आहे हेच माहीत नव्हतं. कंट्रोल टॉवरलाही त्याने एकच व्यक्ती (स्वतः एकटा) ऑन बोर्ड आहे असं सांगितलं होतं.
प्रत्यक्षात त्याला ३५०० फूट उंचीवर रहायला सांगितले होते पण हा जमिनीपासून पन्नास फुटांवर येऊन लो फ्लाईंग करत होता. ब्रिजच्या अलिकडेच होत्या त्या हाय टेन्शन तारा. त्या उन्हामुळे दिसल्या नाहीत आणि कळेपर्यंत मागची चाके तारेत अडकली.
त्यावेळी वीज पुरवठा बंद होता. काही फार लागले नाही त्या पोरगा पोरगीला. विमान गेले बाराच्या भावात.
13 Jan 2011 - 7:18 pm | संजय अभ्यंकर
अजूनही आहे.
मध्ये भारत फोर्ज ( बारामती प्लांट) ला गेलो होतो.
दिवसभर विमाने दिसतात व घरघर चालू असते.
13 Jan 2011 - 5:19 pm | योगी९००
ग.वि.,
सुरेख लेख..अजून अश्याच पायलट लोकांच्या गमती येऊ द्यात...अशा गंमतीमुळेच लोकांचे जीव जातात...(आठवा aeroflot ५९३ च्या पायलटने गंमत म्हणून आपल्या १५ वर्षाच्या मुलाला विमान चालवायला दिले आणि मग...धडाम धुम...!!!)
माझेही विमान चालवायचे आणि युद्धाचे दिवस आठवले. बर्याच शत्रूंना फायटर विमानातून पाणी पाजले आहे. १०-१५ वेळा माझ्याही विमानाचे तुकडे तुकडे झाले होते. पण फायटर विमानांमुळे डोळ्यास त्रास होऊ लागला म्हणून कमर्शिअल विमाने चालवू लागलो.
कमर्शिअल विमान चालवायला तितकी काही मजा येत नाही. खुप वेळा प्रयत्न केला पण नंतर नंतर कंटाळा येतो. फक्त टेक ऑफ आणि लँडीग तेवढेच चॅलेंजिंग वाटते...पण विमानतळ किंवा विमान कंपनी मॅनेज करायला मात्र खुप आवडते. हल्लीच एक प्रख्यात विमान कंपनी मॅनेज करत आहे आणि बर्यापैकी नफा मिळवत आहे. मध्यंतरी काही काळ air trafic controlling चे ही काम केले. सध्या संगणकाच्या जमान्यात सगळे काही शक्य आहे.
13 Jan 2011 - 7:28 pm | संजय अभ्यंकर
वाचा एअरफ्रेम लेखक मायकल क्रिश्टन.
14 Jan 2011 - 5:14 pm | योगी९००
वरच्या माझ्या प्रतिसादामुळे काही लोकांचा गैरसमज झाला आहे की मी खरोखर आर्मीत होतो आणि विमान चालवायचो.
तसे नाही हो...मी गंमत केली.. मी संगणकावर विमानाचे खेळ खेळायचो..त्याचेच वर्णन केले आहे.
सध्या संगणकाच्या जमान्यात सगळे काही शक्य आहे....
13 Jan 2011 - 6:44 pm | तिमा
इथे सगळेच 'गगनविहारी' दिसताहेत. बाकीच्या विहारींनीही आपापले अनुभव लिहावेत.
13 Jan 2011 - 6:58 pm | रेवती
गगनविहारींचे हे लेख माझा विमानप्रवास बंद करणार आहेत.
तुम्ही इतकं गप्पा मारल्यासारखं लिहिता आणि तेही या भीतीदायक विषयावर.....
13 Jan 2011 - 8:30 pm | चिगो
काय हो हे गविकाका ? आताशी कुठं उडाया लागलोय, तेव्हढ्यात तुम्ही टरकवता कशाला?
बाकी मस्त लेख.. छानच.
13 Jan 2011 - 7:24 pm | मदनबाण
सुंदर लेखन... :)
13 Jan 2011 - 9:05 pm | स्वाती२
लेख आवडला!
13 Jan 2011 - 11:07 pm | विकास
लेख आणि अनुभव आवडला. अजुनही येउंदेत - लेख, अनुभव आणि छायाचित्रे....
13 Jan 2011 - 11:29 pm | ५० फक्त
गगनविहारी,
या वेगळ्या विषयावर लिहिल्या बद्दल अतिशय धन्यवाद. आम्हाला विमान उडतं एवढीच माहिती पण त्यामागची ही धडधड आणि अनेक क्रिया, प्रतिक्रिया वगॅरे आज पहिल्यांदाच समजतंय आणि तुमच्या लिखाणाच्या शॅली मुळं सोपं ही वाटतंय.
हर्षद.
14 Jan 2011 - 5:37 am | शुचि
मजा आली वाचून.
14 Jan 2011 - 6:03 am | Nile
गवि, उत्सुकता म्हणुन विचारतो आहे, तुम्ही पीपील कुठुन मिळवलेत वगैरे? विमानाचे जवळजवळ संपुर्ण नालिज आहे, पण प्रत्यक्ष उडवण्याचा अनुभव नाही, अर्थात तो लवकरच घेण्याचा मानस आहेच.
बाकी अश्या वॉकी टॉकींची धमाल वेगळीच असते राव, इथे युनिव्हर्सीटीत सेफ राईड नामक टॅक्सी असे, स्टुडंट लोकांना फ्री, स्टुडंट लोकांनीच चालवलेली. संपुर्ण कारभार अश्याच रेडिओ वर चालतो, शेजारी बसुन ऐकायलासुद्धा धमाल येते. लहानपणी सिनेमात पाहुन मित्रांशी फोनवर बोलताना आउट-ओव्हर अँड आउट करायचो त्याची आठवण आली.
14 Jan 2011 - 11:28 am | मृत्युन्जय
मस्त हो गवि. छान लिहिले आहे, मुळात तुमचे अनुभवच थरारक आहेत.
मी विमानात बसल्यावर मला कधी भिती वगैरे वाटत नाही. डॉक्टरकडे गेल्यावर याने शिकताना कुठले अवयव ऑप्शनला टाकले होते त्याचा विचार करतो का आपण? तसेच. बिन्धास्त बैठनेका. आपल्याबरोबर देवाल अजुन ४०-५० जणांची काळजी असतेच की. ;)
14 Jan 2011 - 12:23 pm | निनाद
गगनविहारींचे अनुभव जबरी आहेतच. पण
याच्या थॉट पुढे आपण खल्लास आहोत!
:)
14 Jan 2011 - 12:52 pm | विनायक बेलापुरे
गगनविहारी झक्क अनुभव . लिखाण पण मस्त !
पण फोटू का सेन्सॉर केलाय ?
14 Jan 2011 - 12:54 pm | टारझन
कारण ते (पक्षी: सेण्सॉर्ड भाग) अंमल अश्लिल आहेत :)
5 Feb 2022 - 4:10 pm | विजुभाऊ
पुन्हा वाचताना पण मजा आली