" अहाहा ! वॉव ! " नुकतेच फिरायला बाहेर पडलेले दास अस्वल नि वॉस कोल्हा आनंद आणि आश्चर्याने थक्क होऊन एकत्रच उद्गारले ! त्यांना क्षितिजावर एक अप्रतिम सुंदर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसले होते.
त्या सुंदर इंद्रधनुष्याकडे दास नि वॉस अगदी एकटक बघत राहिले. तेवढ्यात दास म्हणाला, " माहितंय तुला, त्या इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी एक गुप्त खजिना असतो म्हणे ! "
" कोणता खजिना ? " वॉसने विचारले.
" मला नीट माहीत नाही. पण तो खूपच मूल्यवान असतो. ज्यामुळे आपण खूप खूप श्रीमंत होतो " दास म्हणाला.
तो खजिना शोधण्यासाठी ते दोघे इंद्रधनुष्याच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मनात फक्त त्या खजिन्याबद्दलचेच विचार येत होते. कसा दिसत असेल तो खजिना ? लहान असेल की मोठा ? कोणत्या रंगाचा असेल ?
तेवढ्यात त्यांना ओक वृक्षाखाली एक खारूताई दिसली. " अहा ! हा माझा खजिना ! माझा एकटीचा !! " असे म्हणत ती नाचत होती. दास आणि वॉस तिच्याजवळ जाताच ती ओरडली. " जा इथून ! तुम्ही माझा खजिना चोरू शकणार नाही ! पळा ! "
" पण हा खजिना नाही." वॉस म्हणाला " ही तर फक्त ओक ची फळं आहेत. "
" पण माझ्यासाठी हा खजिनाच आहे. " खार म्हणाली. " हे माझं हिवाळ्यातलं अन्न आहे. जेव्हा सगळीकडे बर्फ पडेल आणि झाडावर काहीच खाण्यासारखे रहाणार नाही तेव्हा मी ही वाळलेली फळं खाईन. यापेक्षा वेगळा कोणता खजिना असेल ? "
" आता आपण खराखुरा खजिना शोधायला जाऊया " दास म्हणाला. दोघे मित्र घाईघाईने पुढे निघाले.
लवकरच तिथून पुढे असलेल्या एका नदीजवळ ते आले. तेवढ्यात पाण्याजवळ वाढलेल्या गवतातून एक आई बदक बाहेर आले. आई मोठमोठ्याने हाका मारत होती. " सोनुल्यांनो... कुठे आहात तुम्ही ? माझा खजिना कुठे लपून बसलाय बरं ? "
दास आणि वॉस उत्सुकतेने पुढे गेले. त्यांनी आई बदकाला विचारले," तू खराखुरा खजिना शोधते आहेस ? "
" हो रे बाबांनो, माझी दोन पिल्लं कुठे लपुन बसलियेत त्यांना शोधतेय मी ! " आई बदक म्हणाले.
" ही बघा आली ती दोघे. " तिकडून दोन पिवळ्याधम्मक रंगाची दोन पिल्लं तुरुतुरू चालत आई बदकाजवळ आली. आईने त्यांना अलगद आपल्या पंखांखाली घेतले.
" असं मला न सांगता इकडेतिकडे जायचं नाही हं, मला मग तुमची खूप काळजी वाटते ! " आई पिलांना प्रेमळ रागाने म्हणाली.
" हा तुझा खजिना आहे ? " हे सर्व बघत असलेल्या दास ने विचारले. " निश्चितच हा माझा खजिना आहे " ! " या जगात मला सर्वात जास्त आवडणारी माझी पिल्लंच तर आहेत. दुसर्या कोणत्याही गोष्टीपेक्षा ती मला प्रिय आहेत. मग ती माझा खजिनाच नाहीत का ? " आई बदक
म्हणाले आणि आपल्या पिलांसोबत नदीकडे निघून गेले.
दास आणि वॉस तसेच पुढे निघाले. इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी असलेला खजिना मिळवण्याची त्यांना आता खूप घाई झाली होती. समोर एक उंच टेकडी लागली. कसेबसे रांगत, धडपडत ते टेकडीच्या माथ्यावर गेले तर तिथे त्यांना एक म्हातारा ससा दिसला.
" हॅलो मुलांनो, इथे कसेकाय आलात तुम्ही ? " सशाने विचारले. " आम्ही इथे एका खजिन्याच्या शोधात आलोय. " दोघेही एका आवाजात म्हणाले.
" ओह्ह ", ससा उद्गारला. " तो तर माझ्याकडे खूप खूप आहे " ससा म्हणाला.
" खरंच ? कुठे आहे मग तो खजिना ? " दास आणि वॉस ने विचारले.
" इथे आहे " सशाने आपल्या डोक्याकडे बोट दाखवले. " माझ्या आठवणी माझा खजिना आहेत. त्या मला खूप खूप आनंद देतात " हसून ससा म्हणाला.
" आठवणी म्हणजे काय ? " दास ने विचारले.
" आठवणी म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी कधीतरी केल्या, जी ठिकाणे तुम्ही पाहिली, जे मित्र तुम्हाला खूप आवडायचे, ज्या गमतीजमती तुम्ही केल्या ते सर्व..... " " आज तुम्ही जे साहस करताय नं त्याची पण नंतर एक आठवण राहील. तेव्हा मजा करा पोरांनो.. "
हो.. असे म्हणत दोघे पुढे निघाले नि अचानक घसरून टेकडीच्या माथ्यावरून थेट पायथ्याशी पोहोचले !
एव्हाना आभाळ ढगांनी भरून आलं होतं. सगळीकडे अंधारलं होतं. इंद्रधनुष्य तर अदृश्यच झालं होतं. पावसाला सुरूवात झाली. टप्पोरे थेंब पडू लागले. हळूहळू पाऊस खूप जास्त पडू लागला. आता दोघांनीही आसरा शोधला.
" आता आपण आपला खजिना कधीच शोधू शकणार नाही ! " दास दु:खाने म्हणाला. पाऊस थांबण्याची वाट बघत ते दोघे झाडाखाली शांत बसून राहिले. आज दिवसभरात घडलेल्या गोष्टी दोघांनाही आठवू लागल्या. खार आठवली. जी पोटभर खायला मिळणार म्हणून खूप आनंदात होती. आई बदक आठवले. जे आपल्या पिलांवरच्या प्रेमाने खूप समाधानी होते. म्हातारा ससा आठवला. जो केवळ आठवणींमुळे खूप आनंदी राहू शकत होता. प्रत्येकाजवळ फक्त त्यांचा स्वतःचा असा खजिना होता. ते सोनंनाणं नसेलही कदाचित, पण जे काही होतं त्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. त्या गोष्टी त्यांच्यासाठी जगात सर्वात अधिक मूल्यवान होत्या. त्या त्यांना आनंद देत होत्या.
" तूच तर आहेस माझा खजिना ! " टुण्ण्कन् उडी मारत दास वॉसला म्हणाला.
" आणि तू माझा खजिना ! " वॉस गिरकी घेत आनंदाने ओरडला. आणि ते नाचू लागले. हसू लागले. अगदी दमेपर्यंत !
शेवटी पाऊस थांबला नि स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला. दोघे मित्र आपापल्या घराकडे निघाले. त्यांच्या मागे दूरवर क्षितिजावर एक नवे इंद्रधनुष्य उगवले होते. पण या दोघांनाही ते बघण्याची गरजच भासली नाही.
प्रतिक्रिया
22 Dec 2010 - 7:02 pm | अवलिया
मितानच्या कथा मिपाचा खजिना आहेत.
22 Dec 2010 - 7:17 pm | गणपा
मस्तच गं मितान.
22 Dec 2010 - 9:00 pm | पैसा
सगळ्या वादांच्या गदारोळात अशा साध्या निरागस कथा शोधूनच मिळतात. जरा जास्त वेळा लिहीत जा ग!
22 Dec 2010 - 10:30 pm | अनामिक
+३
पैसाशी सहमत!
23 Dec 2010 - 2:55 am | शिल्पा ब
+१
22 Dec 2010 - 7:10 pm | यशोधरा
मस्त!
22 Dec 2010 - 7:15 pm | पुष्करिणी
छान गोष्ट, आवडली
22 Dec 2010 - 7:38 pm | स्वैर परी
हे वाक्य फार फार आवडलं!
22 Dec 2010 - 7:49 pm | आत्मशून्य
बाकी हॅ बदक कोल्हा ससा अस्वल कधी बोल्त्यात व्हय ? ह्म्म... भाकडकथा लेकाची.. मुलांना कीती चूकीची माहीती मिळते यावरून, कीती गैर्समज पसरतील या वरून, पोराना अजीबात ही गोष्ट सांगू नका आणी गोष्टीचे तात्पर्य सांगायचा तर प्रश्नच येत नाही कारण लेको आम्ही तीकडे लक्ष देतोच कूठे. छे छे छे भलत्याच अंधश्रध्दा वाढवणारी कथा आहे ही, संपादकांनी बॅनायचा इचार करावा
22 Dec 2010 - 8:06 pm | शुचि
हा हा
22 Dec 2010 - 8:02 pm | असुर
सहीच! अतिशय साधी आणि छान गोष्ट! :-)
--असुर
22 Dec 2010 - 8:06 pm | शुचि
बदकाचा खजीना खूप आवडला :)
22 Dec 2010 - 9:09 pm | गणेशा
नितळ कथा .. खुप आवडली..
आई बदक हा उल्लेख आणि तीचा खजिना खुप आवडला
22 Dec 2010 - 10:32 pm | मेघवेडा
वाव! मस्तच गं मितानमावशी!
22 Dec 2010 - 10:35 pm | अर्धवटराव
तुमच्या लेखांचा खजीना असाच बरसत राहो मिपा वर...
अर्धवटराव
22 Dec 2010 - 11:53 pm | मृत्युन्जय
छे छे . मिपाचा दर्जा पारच घसरला आहे. अश्या कथा मुलांना सांगतात तुमच्या हॉलंडात? उद्या मुले बोलणारे अस्वल, कोल्हे, खारी, ससे दाखवा म्हणले तर?
प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो..
कसल्या या कथा?
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन बोलणारे प्राणी असतात म्हणुन सांगितले तर? किंवा दास वॉसला न सापडलेल्या गुप्त खजिन्यासाठी अघोरी मार्ग सांगितले तर? लहानपणी म्हणुनच मला इंद्रधनुष्याची खुप भिती वाटायची. मी माझ्या मुलांना ही कथा अजिबात सांगणार नाही.
तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरत आहात हे तर वाईट आहेच पण चक्क इंद्रधनुष्याबद्दल् अशा कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) बोलणारे प्राणी पक्षी शोधायला कमी करणार नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे.
हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे.
नमस्कार संपादक,
या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता?
23 Dec 2010 - 1:51 am | आत्मशून्य
म्हणजे समजा दास वॉसला क्लेम करतो की "तूच तर आहेस माझा खजिना" तर वॉस त्यावर " आणि तू माझा खजिना ! " असे गिरकी घेत आनंदाने ओरडला तर वॉसला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरवणार की त्याच्या गिरकी घेण्याच्या क्रूतीला दासने वॉसला कस येड्यात काढले म्हून टाळ्या पीटणार.
वर उल्लेखलेल्या भाकडकथेतही पैसा भेटतो, सोनं मीळतं, खजीन्यमूळे सर्व कामना पूर्ण होतात करून घ्या असं कुठच लीहलेले दिसत नाहीये.. तसेच मूळ लेखकाचं नाव घेउन देण्यात आलेली नाही ? या कथा सांगून/वाचून काय मिळवायचे असते?
कि दास आणी वॉसच्या क्रूतींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय.
व्हॅम्पायर जनावरे अशा खजीन्याचे रक्षण वैगेरे करत असलेल्या कथा हॉलंडात नाहीत काय ?
इद्रधनूश्या खालचा खजीना = भाजप आणि सेनेची युती.
दास वॉसचा खजीना = भारतातील कम्युनिष्ट पार्टीचे चीन प्रेम.
दास आणी वॉस हे राखी सावतांसारखे आहेत काय?
23 Dec 2010 - 1:47 am | सुनील
कथा आवडली.
23 Dec 2010 - 4:14 am | धनंजय
छान कथा.
23 Dec 2010 - 4:42 am | गुंडोपंत
कथा आवडलीच.
ही कथा माला अशी पुढे जात राहो!
23 Dec 2010 - 7:09 am | सहज
मितानतैंची ही लेखमाला मस्त आहे.
23 Dec 2010 - 9:43 am | ढब्बू पैसा
तुझ्या कथा/लेख म्हणजे मिपा चे असेट्स आहेत. बाकीचं घमासान चालू असताना तुझी निरागस कथा वाचणं म्हणजे खरंच सुखद अनुभव असतो. खूप खूप लिही. आम्ही वाचतोय :)
5 Jan 2011 - 7:54 pm | आनंदयात्री
सुरेख कथा आहे. हरवुन जायला झाले. आता सगळ्या जुन्या वाचून काढतो.
इतका सुंदर अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.
23 Dec 2010 - 10:10 am | विजुभाऊ
मितान तुमच्या या बालकथा खूप सुंदर असतात. त्यातला साधेपणा निरागसपणा खूप भावतो.
23 Dec 2010 - 10:23 am | sneharani
मस्त कथा ग तायडे!
23 Dec 2010 - 10:54 am | नन्दादीप
खूप छान....एकदम निरागस कथा...
ताई, बोलणारे बोलू देत, पण तुम्ही मात्र भरपूर कथा टाका...लवकर लवकर..
23 Dec 2010 - 11:11 am | प्रमोद्_पुणे
कथा आवडली..
23 Dec 2010 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार
सहीच :)
भिकार धाग्यांच्या भाऊगर्दीत असे लेखन खुप सुखावुन जाते. धन्यवाद.
23 Dec 2010 - 2:40 pm | मितान
अनेकानेक गंभीर, महत्त्वाच्या तात्त्विक, धार्मिक वगैरे धाग्यांच्या गर्दीतून माझी ही साधी सरळ बालकथा वाचण्यासाठी तुम्ही सर्वांनी मुद्दाम वेळ काढला आणि वाचून कौतुक केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार :)
23 Dec 2010 - 4:00 pm | प्राजक्ता पवार
कथा आवडली .
23 Dec 2010 - 4:12 pm | विंजिनेर
मस्तच गं माया.
एक आगावू सल्ला: तू गोष्टी फस्क्लास सांगतेसच पण त्या डच->(विंग्रजी->)मराठी अशा असल्यातरी शब्दशः भाषांतर केल्यासारखं जाणवतं. त्यात पुढची पायरी म्हणून तू "स्वैर" अनुवाद केलास तर डच भाषेचा लहेजा आम्हा म्हराटी लोगान्ला मराठीत उपभोगता येईल. कशी वाटली आय्ड्याची कल्पना? :)
टॉलस्टॉय,अँडरसनच्या बालकथांची अनेक समर्थ भाषांतरे मराठीत उपलब्ध आहेत. ती कदाचित उपयोगी पडावीत :)
23 Dec 2010 - 5:36 pm | मितान
विंजिनेर,
हा स्वैर अनुवादच आहे. पण तू म्हणतोस तशी ही कथा भाषांतरीत वाटतेय खरी. मला कथा खूप आवडली होती. पण अनुवादासाठी बरीच अवघड गेली. कदाचित काही शब्दांवर थोडी जास्त मेहनत घेतली असती तर जास्त चांगली उतरली असती.
अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते. मी या डच कथा अनुवादित करताना वातावरण, पात्रांची नावं या गोष्टी मुद्दाम जशास तशा ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण मुलांना हा अनुवाद आहे, परक्या भाषेतली गोष्ट आहे हे समजले पाहिजे. गोष्ट डच च आहे फक्त आपण ती मराठीत वाचतोय असा अनुभव येणे जास्त आनंददायक असते. :)
23 Dec 2010 - 5:48 pm | विजुभाऊ
माया पुलंनी अनुवादीत केलेले " काय वाट्टेल ते होईल " एकदा कधीतरी वाच. अक्षरशः मास्टरपीस आहे भाषांतर रुपांतर कसे असावे याचा
24 Dec 2010 - 6:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त आहे गं ही पण कथा.
24 Dec 2010 - 7:56 am | गांधीवादी
छान निरागस कथा, आवडली.
24 Dec 2010 - 7:25 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!!! मस्तच आहे कथा. एक उत्तम लेखमाला येते आहे या निमित्ताने.
24 Dec 2010 - 7:59 pm | धमाल मुलगा
कस्लं भयंकर छान लिहितेस तू.
थ्यांकू...अजुन काही दिवसांनी/महिन्यांनी तुझ्या ह्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करुन घेणार आहे. :)
25 Dec 2010 - 2:18 pm | स्मिता.
खूपच छान-छान गोष्टी सांगतेस गं मितान. फार अवघड आणि अवजड तात्पर्य नसलेल्या निरागस गोष्टी :)
मला पिल्लू झालं की त्याला/तीला मी याच गोष्टी सांगत जाईन...
5 Jan 2011 - 7:33 pm | वाहीदा
मितान, तुझ्या कथेची एक छानशी लेखमाला जरुर काढ.
आगळ्या वेगळ्या कधी न ऐकलेल्या कथा !