ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
19 Dec 2010 - 7:08 am

नगरीनिरंजन यांनी मुखपुस्तकातल्या उरोजकर्क स्थितीसंदेशांवर एक खुमासदार लेख लिहिला होता. वरवर पहाता हा लेख हलकाफुलका, वात्रट वाटतो खरा, पण त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. ती लिंगभूमिकांविषयी, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी काळ्या विनोदातली टिप्पणीच आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. उरोजांप्रमाणेच ठसठशीत समोर दिसणाऱ्या या विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हूक काढल्याशिवाय तो विषय हातात सामावून येऊच शकत नाही असं आम्हाला वाटलं. म्हणून एक स्वतंत्र लेखच लिहायचं आम्ही ठरवलं.

साठ का कुठच्याशा दशकात अमेरिकेत स्त्री-मुक्तीचं वारं वाहात होतं. तेव्हा स्त्रियांनी ते वारं आपल्या हृदयाच्या अधिक जवळ खेळत राहावं यासाठी जाहीरपणे ब्रा-ज्वलन केलं होतं. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की ब्रा जाळल्यामुळे त्यांच्या चळवळीतनं ताठा निघून गेला. एक जोम, धारदारपणा, तडफ, आवेश, गेला. किंवा सत्यकथांमधल्या कथांना यायचं तसं टोक निघून गेलं. स्त्री मुक्तीला विशविशीत, भोंगळ स्वरूप येऊ लागलं. हे नक्की कशामुळे झालं हे शोधून काढण्यासाठी विचारमंथन झालं. आणि एक विचार असा आला की ज्वलन करणं हे नकारात्मक आहे. हिटलरने पुस्तकं जाळली, म्हणून पुस्तकं संपली का? मनुस्मृतीच्या तर कित्येक जळाऊ एडिशन खपल्या. पण त्याने काही फरक पडला का? नकारात्मक निषेधाकडे लोक तात्पुरतं (अगदी टक लावून का होईना) बघत असले तरी त्यानंतर फारसे बघत नाहीत. हे न बघणं ब्रा जाळल्यानंतर तर अनेकींना प्रकर्षाने जाणवलं. तरुणींचं ठीक असतं, त्यांचा नकार आला तरी लोक बघत राहातातच. ब्रा ज्वलनाने तर त्यांच्यापैकी काही जणींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मदतच झाली. पण खरोखर प्रगल्भ विचार करणाऱ्या जुन्या जाणत्या स्त्रियांना या नकार-प्रकारामुळे लोकांचं लक्ष त्यांच्या प्रश्नांपासून दूर व्हायला लागलं असं वाटलं तर त्यात नवल नाही. तेव्हा आपली चळवळ सहृदयता व आत्मसन्मान यांच्या जोमदार पण सुखदायक आवरणांत सामावून होकारात्मक व सकारात्मक कृतींच्या पट्ट्यांनी कशी तोलून धरावी याबाबत त्यांनी विचार सुरू केला. अशा रीतीने बंधनांचा पुनर्विचार होऊ लागला.

त्या काळी अमेरिकेत एखादा विचार पसरला की भारतात फोफवायला लागायला दशकभर लागत असे. आजकालसारखी तीन महिन्यात ते पसरवून स्वतःला विचारवंत म्हणवून घेण्याची सोय नव्हती. विचारांचा जेटलॅग तेव्हा मोठा होता. त्यामुळे तिथे बंधनांच्या त्यागाचा पुनर्विचार होत असतानाच, भारतात स्त्रीमुक्तीचा, बंधनं मोडून काढण्याचा टप्पा चालू होता. मंगळसूत्र हे नवऱ्याच्या अधिकाराचं चिन्ह समजलं जावं का असा विचार होत होता - सत्तर का कुठल्याशा दशकात. मंगळसूत्राला मोहक नाव दिलं असलं, तरी ते मालकी हक्काचं प्रतीकच आहे. आपल्या मालकीच्या जनावराला बांधून ठेवण्याची दावणीच जणू. मंगळसूत्रामुळे स्त्रियांकडे बघणाऱ्या परपुरषांना देखील 'एकदम रापच्यिक माल आहे म्हणून पुढे गेलो, तर साला गळ्यात लायसन दिसलं' असं म्हणून मागे व्हायची सोय असे. मग त्या 'अलंकारा'मुळे स्त्रियांचा फायदा काय? काही नाही. तेव्हा ब्रा जाळण्याचा खंबीरपणा नसलेल्या भारतीय स्त्रीने मंगळसूत्राच्या बंधनाचा विचार सुरू केला. पण तिथेही प्रश्न निर्माण झाले. नुसत्या मंगळसूत्राचा धिक्कार करून काय होतंय? नवरा तर गळ्यात पडलेला असतोच. तो काही टाकण्याची सोपी सोय नव्हती. तेव्हा चळवळ काहीही म्हणो, आपण ते इतकी वर्षं घातलं तसं मुकाट्याने घालायचं असं सर्व स्त्रियांनी ठरवलं बहुतेक. वेळ पडेल तेव्हा त्याला सौभाग्यलेणं देखील म्हणायचं. "कसलं आलंय डोंबलाचं सौभाग्य" वगैरे विचार मनातच ठेवायचे किंवा आपल्यासारख्याच इतर चारचौघींमध्ये बोलून दाखवायचे यावर त्यांनी समाधान मानलं.

'मुलगी झाली हो' पाहून प्रभावित झालेल्या त्या स्त्रियांनी ही अशी तडजोड केली खरी, पण तो मुद्दा विसरल्या नाहीत. एखादा अहवाल आल्यावर आत्ता तो टेबल करायचा नाही अशी सत्य झाकणारी तडजोड पण तो अहवाल कुठेतरी खदखदत होताच. आपल्या मुलींना त्यांनी शिक्षणाच्या गाडीत बसवलं आणि त्या मुली धाडधाड करत आयटीच्या स्टेशनावर पोचल्यासुद्धा. या नव्या मनुच्या नव्या कन्यकांना हे स्टेशन खूपच आवडलं. आयटी पुरषांबरोबर काम करताना त्यांच्या हे लक्षात आलं की घरकाम करा, रांधा-वाढा-उष्टी-काढा, पोरांचे उठसूट कपडे बदला यापेक्षा हे काम खूपच सोपं आहे. असली वैतागवाणी घरकामं दुसऱ्या कोणावर तरी ढकलून देऊन स्वतः घरी दमून आल्याचं नाटक करण्यातली गंमत त्यांच्या लक्षात आली. आणि मग त्यांनी पारंपारिक पुरषी भूमिका स्वीकारली. बरीच बंधनं अर्थातच आपोआप गळून गेली. नवरोबाची सत्ता चालेनाशी झाली. सत्ता कुठच्या जोरावर चालवणार? कुंकू मधली तेजस्वी बायको नवऱ्याने खोलीत डांबून ठेवल्यावर ज्या स्वरात 'खोलीत दिवा आहे. दिव्यात तेल आहे. मी ठरवलं तर हा आख्खा वाडा जाळून टाकू शकते' म्हणते त्या स्वरात 'माझं स्वतंत्र बॅंक अकाउंट आहे. तुझा पगार घरखर्चात उडलेला आहे.' वगैरे म्हणायला लागली. आयटीतल्याच लोकांनी भरमसाठ वाढवून ठेवलेले भाव परवडायचे तर दोघांनी मिळवायला नको का? त्यामुळे कधी नव्हे तो नवरा देखील चहा वगैरे करायला शिकला. बहुतेकांना सैपाक अजूनही धड येत नाही ती गोष्ट वेगळी. असो. सांगायचा मुद्दा काय, तर हे स्टेशन फारच छान होतं.

पण इथे पोचल्यानंतर दोन प्रश्न निर्माण झाले. पुरुषी भूमिका स्वीकारून आपलं स्त्रीत्वच हरवतंय की काय अशी भावना मूळ धरू लागली. शिवाय स्वतंत्र आहोत तर मग या बंधनांचं नक्की करायचं तरी काय? धरली तर चावतात, सोडली तर पळतात. आयटीच्या स्टेशनावर हिंडताना त्यांच्या आया-आज्यांनी मनात दडपून ठेवलेला अहवाल वाचण्यात आला. तसंच ब्रा ज्वलनानंतरचा अमेरिकन अनुभवही समजला होता. आणि या बंधनांबाबत काहीतरी केलंच पाहिजे हे प्रकर्षाने जाणवायला लागलं. एव्हाना जाळपोळ करण्यातला फोलपणा अमेरिकेच्या उदाहरणावरून पटला होता. मग स्त्रीत्व जपायचं, बंधनं टाकून द्यायची हे दोन्ही कसं साधावं? कारण हा तोल साधणं म्हणजे केक खाणं व तो ठेवूनही देणं यासारखी कठीण गोष्ट आहे. याबाबत अनेक इमेला इकडून तिकडे गेल्या. कोणाला ते नक्की माहीत नाही, पण एक जबरदस्त उत्तर सापडलं. दोन्ही प्रश्न एकाच फटक्यात निकालात काढणारं.

विचार असा झाला की आपण स्वतःवर घातलेली बंधनं ही लाजिरवाणी गोष्ट नसून ती मिरवायची बाब आहे. त्यांच्या आयाआज्यांनी मंगळसूत्राकडे मालकीहक्क दाखवणारी, घरात बांधून ठेवणारी दावणी या दृष्टीने बघितलं होतं. दावणी कुठच्या रंगाची आहे याचा विचार मालक कशाला करेल? म्हणजे कुठच्याच ड्रेसवर, साडीवर म्याच न होणारं मंगळसूत्र सौभाग्यलेणं म्हणून घालायला लावणं यातच खरा तर मालकीहक्काचा अर्क आहे, तोरा आहे. मग बंड करायचं तर त्याविरुद्ध का करू नये? चांगलं डिझायनर मंगळसूत्र घालावं. ब्रा जाळण्याऐवजी चांगली रंगीबेरंगी कराव्या, लेसी लावाव्यात. हे पुरुष नाही का त्या ग्लास सीलिंगच्या वर जाऊन उच्च अधिकाऱ्यांची हांजी हांजी करत? स्वतःच्या कुटुंबापासून स्वतःला वंचित करून कामाशी बांधून घेत? स्वतःवर घातलेली ही बंधनं प्रतीकरूपातून गळ्याला गळफास बांधून मिरवत? मग आपण का मागे राहावं? आपणही खुलेआम आपली बंधनं मिरवावीत. मग आपणही जाऊच ना त्या काचेच्या आढ्यापलिकडे. खालून बघणाऱ्यांना आपणही जळवूच की मग.

'धरलं तर चावणाऱ्या सोडलं तर पळणाऱ्या' कुत्र्याला इतके गोंडस कपडे घालून सजवायचं, की ते बिचारं लाजेने आपणहून घराबाहेरच पडणार नाही. मग बिननखांचं, बिनदातांचं हे कुत्रं शोभेचं म्हणून वाटेल तिथे न्यावं. बंधनं मढवून टाकून त्यांची धार नष्ट करण्याची ही विचारसरणी किंवा प्रक्रिया आहे. त्यांचं प्रच्छन्नपणे प्रदर्शन करणं हा आपली शक्ती दाखवण्याचा, या प्रक्रियेतला पुढचा टप्पा. आणि त्यातूनच उरोजकर्काच्या गोंडस नावाखाली चेहेरेपुस्तकावर अवतरतात रंगीबेरंगी स्थितीसंदेश. स्त्रीमुक्ती चळवळीचं आगळ्याच दिशेने पडलेलं एक अनोखं पाऊल.

(याच घटनांकडे पुरुषमुक्ती चळवळीच्या दृष्टीकोनातून पहाणारा लेख लिहिण्याचाही मानस आहे. पण मिपावर युयुत्सु व टारझन समर्थपणे हा लढा लढवत आहेत, त्यामुळे त्याची कितपत गरज आहे असाही प्रश्न पडतो.)

संस्कृतीविनोदमौजमजाविचार

प्रतिक्रिया

याच घटनांकडे पुरुषमुक्ती चळवळीच्या दृष्टीकोनातून पहाणारा लेख लिहिण्याचाही मानस आहे.
नक्की लिहा...

पण मिपावर युयुत्सु व टारझन समर्थपणे हा लढा लढवत आहेत, त्यामुळे त्याची कितपत गरज आहे असाही प्रश्न पडतो.

टारझन, युयुत्सु तसेच अन्य मिपालेखक सगळ्याच आघाड्यांवर लढा लढवत आहेत , त्यामुळे तुम्ही लेखणी हातात घ्ययची गरज आहे का ? असा निरागस प्रश्न पडतो :)

अवांतर : ह्या लेखाचं मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

- टारेश ब्रा'सरंगवी

राजेश घासकडवी's picture

20 Dec 2010 - 1:28 am | राजेश घासकडवी

त्यामुळे तुम्ही लेखणी हातात घ्ययची गरज आहे का ? असा निरागस प्रश्न पडतो

वा. तुमच्यासारखा हजरजबाबी प्रवक्ता मिळाल्यावर पुरुषमुक्ती चळवळीला कसली चिंता? :)

अवांतर : ह्या लेखाचं मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

अर्रर्रर्र... चुकलंच माझं. मी कितीतरी ठिकाणी ण च्या ऐवजी न वापरला असल्यामुळे भाषा कळायला कठीण झाली असेल बहुतेक. :) तसंच इंग्लिश ट्रान्सलेशन्स... सॉरी ट्राण्सलेशण्स ऐवजी मराठी वर्ड्स युज केल्यामुळेही प्रॉब्लेम झाला असेल, यु णो... :) कुठचे शब्द कळले नाहीत ते सांगितलंत तर मी सोपं करूण लिहीण.

- गमभण

अर्रर्रर्र... चुकलंच माझं.

किती वेळा चुकणार ? धोब्याचं गाढंव पण एकदा सांगुन शहाणं होतं :)

ते सांगितलंत तर मी सोपं करूण लिहीण.

ण लिहील्यास आपला आभारी राहिन :)

- चुकेश बैलगाढवी

नगरीनिरंजन's picture

19 Dec 2010 - 7:40 am | नगरीनिरंजन

_/\_. अतिशय निर्दोष असे विवेचन. स्त्रीमुक्तीच्या या, समाजमनाची चोळी तंग करणार्‍या आणि पारंपारिक संस्कृतीचा पदर पाडून बिन्धास्तपणे पुढे आलेल्या, विषयाचे सर्वांगाने मर्दन करून समाचार घेतला गेला आहे.
"उरोजांप्रमाणेच ठसठशीत समोर दिसणाऱ्या या विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हूक काढल्याशिवाय तो विषय हातात सामावून येऊच शकत नाही असं आम्हाला वाटल"
आणि
"विचारांचा जेटलॅग तेव्हा मोठा होता"
अशी गिर्रेबाज वाक्ये लिहून लेखकाने लेखाला असे काही सौष्ठव, अशी काही पुष्टी दिली आहे की वाचकांचे हात शिवशिवतील आणि कौतुकपर प्रतिसादांचा वर्षाव या लेखावर होईल यात शंका नाही.
आपल्या वर्तनाचे असे अचूक विश्लेषण वाचून काही वाचकांना अनावृत्त झाल्या सारखे वाटेल खरे,पण त्यांनी या अनावृत्तपणाचा फायदा घेऊन आत्मपरिक्षण करण्याची संधी सोडू नये असे आम्हाला वाटते.
आम्ही लिहीलेल्या लेखावरून तो लिहीताना झालेली आणि आम्हासही न उमगलेली विचारप्रक्रिया लेखकाने अचूक शब्दबद्ध केली आहे याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन.

:(

खूप लिहावसं वाटतय पण ...... नाही लिहीणार!!!!

आत्मशून्य's picture

19 Dec 2010 - 9:45 pm | आत्मशून्य

.

रन्गराव's picture

19 Dec 2010 - 8:23 am | रन्गराव

आयला, जरा हसून दम काढायला वेळ द्या की राव, ते टार्झन आता आणि तुमी. :)

गवि's picture

19 Dec 2010 - 8:37 am | गवि

गहन आहे विषय..

आपल्या लेखातून दिशा घेऊन नगरीनिरंजन यांचा लेख वाचला.

स्वतःच्या बावळटपणाबद्दल आणि घोर अज्ञानाबद्दल लाज लज्जा शरम वाटली. यापूर्वी मैत्रिणींच्या फेस्बुकात असे "रेड" "ऑरेंज" वाचलेले खाडकन आठवले..आणि अज्ञानापोटी त्याला काहीबाही उत्तरे दिली असतील या कुशंकेने मन धस्स होऊन लपले.

आता फेस्बुकात वर्षभर न जाणे उत्तम.
(आपण स्वतःसाठी तिथे "None" असे स्टेटस टाकावयाचे असते काय??)

कंसातले शब्द पांढरे का होत नाहीत? कसे करावेत?

राजेश घासकडवी's picture

19 Dec 2010 - 9:42 am | राजेश घासकडवी

कंसातले शब्द पांढरे का होत नाहीत? कसे करावेत?

त्यांच्यापुढे 'पांढरे' असा स्टेटस ठेवा. ते पांढरे प्रत्यक्षात दिसले नाहीत, तरी आहेत असं लोकांना कळेल. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2010 - 10:00 am | llपुण्याचे पेशवेll

आपण स्वतःसाठी तिथे "None" असे स्टेटस टाकावयाचे असते काय??

नको नको. त्या पेक्षा रेड, ऑरेंज वगैरे स्टेटसेस ना "Known" अशी कमेंट द्यावी. ;)

क्या बात, क्या बात, क्या बात..

शिल्पा ब's picture

19 Dec 2010 - 11:39 am | शिल्पा ब

बॉरं..

भारतातील स्त्रीमुक्ती हि हुंड्यासाठी सुनेला जाळण्याच्या विरोधात आहे. अजूनही भारतात स्त्रीभ्रूण हत्या होत नाहीत का ??

समाजातील सुशिक्षित व सुस्थितील वर्गही मुलींचा जन्म नाकारतो का आहे ?? मग आपल्याला विकासाची संकल्पना बदलायला नको का ? आपल्या भारतासाठी अमेरिका आदर्श होत नाही.

स्त्री मुक्ती म्हणजे निव्वळ पुरुषांच्या विरोधात जाणे होत नाही.

स्त्री मुक्ती चळवळीचे प्रतिनिधित्व खरे तर आदिवासी स्त्रियांकडे असायला हवे. त्यांना पुढे घेऊन स्त्री मुक्ती चळवळ राबविली तरच भारतिय स्त्रियांचे प्रश्न योग्य अर्थाने मार्गी लागतील. त्यांना पुढे करायचे म्हणजे ही चळवळ पूर्णतः खेड्यात गेली पाहिजे.

आदिवासी स्त्री पूर्वी व आताही बर्‍याच प्रमाणात मुक्त आहे. पूर्वीच्या काळी सवर्ण बाईला तिचा पती वारल्यावर पतीसोबत `सती' जावे लागत असे. किंवा मुंडण करावे लागे, तिला दुसरा विवाह करण्यास बंदी होती. तिला घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. याउलट आदिवासी स्त्रीला तसे बंधन नव्हते. या अर्थाने आदिवासी स्त्री सवर्ण स्त्रीपेक्षा मुक्त होती. म्हणूनच डॉ. आंबेडकरांच्या सत्याग्रहात, आंदोलनात, जाहीर सभेत काही दलित अन आदिवासी स्त्रीया भाग घेताना आढळ्त असे

स्त्री-मुक्ती चळवळीतील काही स्त्रीयांनी काही गोष्टींचा नको तेवढा अतिरेक केला हे मान्य आहे. उदा. फक्त कुंकू, बांगड्या, साड्या, मंगळसूत्र किंवा अन्य पारंपरिक वेशभूषा, केशभूषा झिडकारणे आणि पुरशी वेशभूषा करुन शर्ट पँट घालून बॉयकट करून पुरुषी वागणे म्हणजे स्त्री-मुक्ती असा काहीसा मुर्ख सूर निघाला. पण हे वरवरचे म्हणता येईल. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळ खरेतर बदनाम झाली. त्यामुळे समाजात या चळवळीचे गैरसमजही निर्माण झाले. पण किरण बेदींसारख्या महिलेनी आपल्या कर्तूत्वाने अन आपल्या व्यक्तिमत्वाने, स्त्री अधिकारपदावर असेल तर काय करु शकते हे ही दाखवून दिले. बेदिंनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी योग्यपणे स्विकारली . त्यांची मुलगी सायना ही आज एक निष्णात डोक्यूमेंटरी प्रोडूसर आहे.
किरण बेदिंसारख्या स्त्रीयांनी फक्त स्त्रियांसंबंधीच्या प्रश्नात लक्ष घातले असे नाही तर समाजापुढे येणार्‍या प्रत्येक प्रश्नावर विचार केला.

बालमाता, सतीप्रथा, जाचाला कंटाळून आत्महत्या, बालविवाह, हुंडाबळी, कुटुंबाचा भार कमी करण्यासाठी आत्महत्या करणाऱ्या अविवाहित मुली, आजही लहान मुलांसह आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया, अशा घटनांपासून आपण काही शिकलो नाही ?? आजही हा विषय एक विनोद आहे ??

या सर्वाच्या मुळाशी समाजातील स्त्री-पुरूष विषमता आणि केवळ पैशाचा विचार करून निर्णय घेणारी आपली आजारी कुटुंबव्यवस्था कारणीभूत आहे. स्त्रियांसाठी अनेक कायदे झाले, होत आहेत. पण आपली भ्रष्ट मानसिकताच त्यातून पळवाटा काढते हे एक दुर्दैव !!

खरे तर या वर बरेच काही लिहायला हात शिवशिवत आहे पण कर्वे ,फुले अन आंबेडकर यांच्या कार्याला
अमेरिकन मानसिकतेशी जोडणे याहून मोठा अपमान नाही

'भारतिय स्री' असे काहीच अस्तित्व नाही ?? क्या हमारा कोई वजूद नहीं ??

मग मिरा सारखी स्त्री जी परंपरागत पतिभक्तीच्या , गुलामगिरीत न अडकता श्रेष्ठ दैवत्व निवडणारी आहे तिला आपण नाकारतो आहे का ??

लेख मिश्किल पणे लिहिला असेल तर छान आहे पण तो स्त्री-मुक्ती चळवळीच्या विरोधात असेल तर तिव्र निषेध !!

नन्दादीप's picture

19 Dec 2010 - 3:03 pm | नन्दादीप

>>किरण बेदिंसारख्या स्त्रीयांनी फक्त स्त्रियांसंबंधीच्या प्रश्नात लक्ष घातले असे नाही तर समाजापुढे येणार्‍या प्रत्येक प्रश्नावर विचार केला.

मला वाटते, राखी साव॑त ही पण एक "स्त्री-मुक्ती चळवळ समर्थक" अथवा "नेती" म्हणायची का???
कदाचित तीला या जाळ-पोळ प्रकाराबद्दल माहित नाही बहुतेक. नाहीतर भारतात सुद्धा "आधुनिक स्त्री-मुक्ती चळवळ " सुरू झाली असती.....

राखी सावंतचे वागणे अन बोलणे हे कधी कधी नक्कीच तर्हेवाईक अन हास्यास्पद आहे . तिच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करण्याचे मला अधिकार नाहीत.

ती कदाचित "स्त्री-मुक्ती चळवळ समर्थक" असू शकते पण "नेती" म्हणण्याची लायकी अजून तिला लाभली नाही.

She yet has to command a respect not demand it. Rakhi has still a long way to go in comparison to others. But over a period of time I think she has grown up and became little matured.

स्त्री मुक्ति नेत्या बर्‍याच आहेत अगदी रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे व जनाक्का शिंदे यांच्या पासून
रजिया सुल्तान अन किरण बेदींपर्यंत . नेती / नेता हा लढवैया असतो भांडकूदळ नव्हे.

स्त्रीचे भाग्य / दुर्भाग्य पती असणे वा नसणे याही पेक्षा ती आपल्याजवळ असलेल्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करून आपले आयुष्य कसे अर्थपूर्ण करते यावर अवलंबून आहे.

राजेश घासकडवी's picture

19 Dec 2010 - 10:31 pm | राजेश घासकडवी

लेख मिश्किल पणे लिहिला असेल तर छान आहे पण तो स्त्री-मुक्ती चळवळीच्या विरोधात असेल तर तिव्र निषेध !!

स्त्री-मुक्ती विरोधात? अहो, तुम्ही हे फारच सीरियसली घेतलंय. तरी मिष्किलपणे लिहिलं असल्याचा बेनेफिट ऑफ डाउट दिलात ते चांगलं आहे, कारण तो तसाच लिहिलेला आहे, व तसाच घ्यावा ही विनंती.

तुम्ही ज्या स्त्रियांना मुक्त करण्याविषयी लिहिलं आहे, त्या स्त्रियांविषयी हा लेख नाहीच हे उघड आहे. फेसबुकवर आपल्या ब्राचा रंग जाहीर करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतात. हा रंग जाहीर करण्याने 'बालमाता, सतीप्रथा, जाचाला कंटाळून आत्महत्या, बालविवाह, हुंडाबळी, कुटुंबाचा भार कमी करण्यासाठी आत्महत्या करणाऱ्या अविवाहित मुली, आजही लहान मुलांसह आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया' यांचे प्रश्न किंवा मुळात उरोजकर्काचा प्रश्न कसा सुटणार आहे? त्यांच्या या उपायाची चेष्टा आहे. 'ही त्यांच्या पद्धतीने स्त्रीमुक्ती चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न असावा' असं गमतीने म्हटलेलं आहे.

'मंडी' सिनेमात एका नारी मुक्ती कार्यकर्तीची चेष्टा आहे. याचा अर्थ त्या सिनेमाचा संदेश 'नारीमुक्ती थांबवा, वेश्याव्यवसाय वाढवा' असा समजला तर त्या चित्रपटावर अन्याय होईल.

या असल्या चावट अन अश्लिल बायका अन त्याला अनुसरुन पुरुष एकत्र आल्यावर काय बोलणार ?? दुरुन मज्जा बघायची फक्त !!

स्त्रीमुक्तिच्या नावाखाली स्वत:चा फायदा करुन घेण्यार्‍या स्वार्थी (कमजब्त-कमीनी औरतें, sometime I wonder are they woman or witch ?? ) स्त्रीया ही आहेत हे ढळढळीत सत्य मान्य पण तुम्ही स्त्रीमुक्ती चळवळ याचा उल्लेख केलात म्हणून न राहवून हे सर्व लिहावे लागले.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Dec 2010 - 2:41 pm | अविनाशकुलकर्णी

ब्रा ज्वलन ....या आपल्या शब्दास सलाम...

मला स्त्रीमुक्ती हा विषय एक जोक वाट्तो. मुक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय? पुरूषांपासून स्त्रीया आणि स्त्रीयांपासून पुरूष मुक्त होउनही जाणार कुठं? आकाशात?
स्त्रीमुक्ती सुरु झाली आणि पुरूषही कैदेत गेले. त्यामुळं आमच्या औरंगाबादसारख्या शहरातही " स्त्रीपिडीत पुरूषांसाठीची हेल्पलाईन" निघालीय. कुणाला अधिक तपशील हवे असतील तर व्यनितून देईन.

पण स्त्रीमुक्तीवरचा यु. जी. कृष्णमूर्तींचा एक किस्सा आठवतो तेवढा सांगतो, स्त्री मुक्तीवादी स्त्रीयांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावा -

स्त्रीमुक्ती चळवळीची एक विदुषी मला भेटायला आली (मी अत्यंत उद्धट, निर्दयी माणूस आहे हे आधीच सांगतो). स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल तुमचं काय मत आहे? तिने मला विचारले. मी म्हणालो मी पूर्णत: स्त्रीयांच्या बाजूने आहे - लढा तुमच्या हक्कासाठी !
पण हेही लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या लैंगिक गरजांसाठी पुरूषांवर अवलंबून आहात, तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही. दुसर्‍या बाजूनेही हे असंच आहे. व्हायब्रेटर वापरून तुम्ही तुमच्या लैंगिक गरजा पूर्ण करू शकता, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला पुरूष हवा असेल तर तुम्ही, मुक्त नसाल. पुरूषही मुक्त नसेल.

- उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती

सन्जोप राव's picture

19 Dec 2010 - 4:31 pm | सन्जोप राव

अगदी पुष्ट, वैचारिक उभारी गाठलेला लेख. त्याला सत्यकथेतील कथांप्रमाणे टोक (किंवा टोके) आले आहे.
यावरुन आठवले ते असे:
Karnataka BJP government is like a single hook bra. Some wonder what's holding it, while others are waiting it to fall down and grab the opportunity with both hands!

गोंधळात टाकते.

आत्मशून्य's picture

19 Dec 2010 - 10:52 pm | आत्मशून्य

मजा आली तूमच लेखन वाचून, असो स्त्रीयांनी कॅटवूमन बनल्याशीवाय त्यांच्या मूक्ततेला धार आणी प्रशंसा मीळणे अंमळ कठीन वाटू राहीलेय.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2010 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार

मजा आली तूमच लेखन वाचून, असो स्त्रीयांनी कॅटवूमन बनल्याशीवाय त्यांच्या मूक्ततेला धार आणी प्रशंसा मीळणे अंमळ कठीन वाटू राहीलेय.

श्री. आत्मशून्य गेले काही दिवस आपण बळच अक्कलशून्य प्रतिसाद देउन माझ्या खोड्या काढत आहात :) उद्या जर मी फटका मारला तर मात्र मग रडू नका, आणि तुम्ही शाब्दीक खेळ करताय म्हणजे मी देखील तसाच करीन अशा भ्रमात देखील राहु नका :)

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2010 - 2:40 am | इंटरनेटस्नेही

मला स्त्रीमुक्ती हा विषय एक जोक वाट्तो. मुक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय? पुरूषांपासून स्त्रीया आणि स्त्रीयांपासून पुरूष मुक्त होउनही जाणार कुठं? आकाशात?

कुलकर्णी साहेबांच्या मताशी सहमत. स्त्रीयांना पुरुषांपासुन आणि पुरुषांना स्रीयांपासुन म्हणे मुक्ती द्यायची! ही ही ही! या लोकांना हे पण कळत नाही की स्री असो वा पुरुष, दोन्ही एकमेकांशिवाय अपुर्ण, अर्थहिन आहेत!

लेखन अतिशय छान. मिश्कील शैलीत कुठेही तोल न ढळु देता लिहिण्यात घासकडवी साहेबांचा हातखंडाच आहे.
आवडले. योग्य शब्दांत मांडले आहे.

जाता जाता.. एकदा (टवाळ) मित्रांसोबत बँन्ड्राला पदपथावर उभा होतो.. कार्टर रोड वर,

तेव्हा माझा एक मित्र म्हणाला,

यार ॠषी, तुझे 'ब्रा' का फुलफॉर्म पता है?

मी: अर्थातच नाही.

मित्र: Bandra Residents Association!

मी: ***** साले!

खुलासा: माझे (काही) मित्र जरी टवाळ असले तरी मी तसा नाही!

युयुत्सु's picture

20 Dec 2010 - 8:54 am | युयुत्सु

खुसखुशीत..

ब्राज्वलन ऐवजी कंचुकीदहन जास्त योग्य वाटते....

नितिन थत्ते's picture

20 Dec 2010 - 3:15 pm | नितिन थत्ते

कंचुकी हा शब्द बरोबर नाही असे वाटते. पूर्वीच्या काळी स्त्रिया चोळी न घालता कंचुकी घालत असत ही वस्तुस्थिती लक्षात घेता तर मुळीच नाही.

+१

शिवाय "ब्राज्वलन"मधे एक "प्रज्वलन"सारखा शब्दाघात आहे. आणि फ्युजनही.. :) तस्मात ब्राज्वलन अधिक तेजस्वी शब्द..

कवितानागेश's picture

20 Dec 2010 - 12:26 pm | कवितानागेश

हल्ली असे 'स्त्री-पुरु़ष' वगरै विषय निघाले की मला 'नटरंग'च आठवत रहातो.
आणि या कथेची टॅगलाईन म्हणावी असे गुणाच्या तोंडचे उद्गार आठवतात, 'प्रत्येक पुरुषात येक बाई असतिय, अन प्रत्येक बाईत एक पुरुष असतुय'!

('बॉय'कटवाली) माउ

वाहीदा's picture

20 Dec 2010 - 12:32 pm | वाहीदा

हा हा हा !
मस्त डायलाग ग ! ;-)

पर्नल नेने मराठे's picture

20 Dec 2010 - 1:21 pm | पर्नल नेने मराठे

झकासच माउ ;)

('बॉय'कटवाली) चुचु

===========

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2010 - 3:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जी, लेख बर्‍यापैकी चांगला लिहीला आहे, अधिक टोकेरी लिखाणासाठी करूणा गोखले आणि मंगला गोडबोले यांच्या लेखनाचा अधिक अभ्यास करणे. पण तुमच्या विचारांमधे गोंधळ आहे हे काही ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. उदाहरणार्थः

त्यामुळे कधी नव्हे तो नवरा देखील चहा वगैरे करायला शिकला. बहुतेकांना सैपाक अजूनही धड येत नाही ती गोष्ट वेगळी. असो. सांगायचा मुद्दा काय, तर हे स्टेशन फारच छान होतं

तुमच्या लिखाणाचा तौलनिक अभ्यास करता, "नवरा चहा करायला शिकला" हे वाक्य स्पष्ट आणि असर्टीव्ह आहे. पण "बहुतेकांना सैपाक अजूनही धड येत नाही" हे वाक्य काय सुचवते? बरं त्यापुढे स्त्रियांना हे स्टेशन आवडल्याचं तुम्ही नमूद करत आहात त्याला आधार काय? काही सांख्यिकी विदा जमा केला आहेत काय?
बहुतेकांना अजूनही सैपाक जमत नाही हे वाक्य थोडं गोंधळात टाकणारंही आहे. बहुतेक पुरूषांना म्हणायचं आहे का बहुतेक स्त्रियांना? कोणत्याही परिस्थितीत हे वाक्य वस्तुस्थिती दाखवत नाही असा माझा तर्क आहे.

विजुभाऊ's picture

20 Dec 2010 - 11:17 pm | विजुभाऊ

ब्राज्वलन करा काय किंवा कळकाला बांधून लंगोटाची गुढी उभारा. वैचारीक प्रगल्भता ( म्हणजे काहींच्या मते स्त्री जे करते ते सहन करणे ) आल्याशिवाय हे प्रश्न सुटणे कठीण आहे.
मंगळसूत्रामुळे स्त्रीला सामाजीक सुरक्षितता मिळाली हे तुम्हीच लिहिता अणि त्याखालीच मग त्या 'अलंकारा'मुळे स्त्रियांचा फायदा काय? हे देखीललिहीता.
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेच नीत स्पष्ट होत नाही. वैचारीक भूमीका स्पष्ट नसेल तर विचारांचा भाजप व्हायला वेळ नाही लागत.

राजेश घासकडवी's picture

20 Dec 2010 - 11:21 pm | राजेश घासकडवी

'बहुतेक नवऱ्यांना सैपाक अजूनही धड येत नाही' असं म्हणायचं होतं.

स्त्रियांना हे स्टेशन आवडलं याचा अर्थ इथे सगळंच परफेक्ट आहे असं नाही. पुरुषांना सैपाक पूर्वीही येत नव्हताच. पण आता केवळ रांधा-वाढा-उष्टी-काढा पलिकडचं आयुष्य जगायला मिळतं, हवं तेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाता येतं, म्हणून हे स्टेशन अधिक चांगलं.

काही सांख्यिकी विदा जमा केला आहेत काय?

सांख्यिकी विदा? ते काय असतं? तुम्ही आधुनिकोत्तरवादाचा अभ्यास न करता केवळ अवचट वगैरे आवडणाऱ्यांपैकी दिसता. सत्य हे सापेक्ष असतं, तेव्हा सांख्यिकीत सत्य पकडण्याचा जुनाट प्रयत्न सोडून द्या. सो ट्वेंटिएथ सेंचुरी!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2010 - 3:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसादाचं गल्ली चुकलं काय वो? (असो. चालायचंच).

बहुतेक नवऱ्यांना सैपाक अजूनही धड येत नाही' असं म्हणायचं होतं.

ओक्के.

स्त्रियांना हे स्टेशन आवडलं याचा अर्थ इथे सगळंच परफेक्ट आहे असं नाही. पुरुषांना सैपाक पूर्वीही येत नव्हताच. पण आता केवळ रांधा-वाढा-उष्टी-काढा पलिकडचं आयुष्य जगायला मिळतं, हवं तेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाता येतं, म्हणून हे स्टेशन अधिक चांगलं.

हा अर्थ मान्य करण्यासारखा आहे. पण आता भविष्यातली घटना म्हणून पुरूषही हळुहळू, नाईलाजास्तव का होईना, सैपाक करायला शिकणार असा आहे का? तसं असल्यास भविष्यापुढचं भविष्य म्हणून महिलांसाठीही (आई-आजीकडून फक्त पारंपारिक गोष्टी न शिकता आधुनिक) सैपाक शिकणं गरजेचं होईल काय? यावर तुमचं काय चिंतन?

सांख्यिकी विदा? ते काय असतं? तुम्ही आधुनिकोत्तरवादाचा अभ्यास न करता केवळ अवचट वगैरे आवडणाऱ्यांपैकी दिसता. सत्य हे सापेक्ष असतं, तेव्हा सांख्यिकीत सत्य पकडण्याचा जुनाट प्रयत्न सोडून द्या. सो ट्वेंटिएथ सेंचुरी!

तुम्ही सापेक्षतेवर गरजेपेक्षा जास्तच विश्वास ठेवणारे अति वेगाने प्रगतीपथावर जाणारे आणि स्वतःला सुजाण म्हणवून घेणारे वाचक दिसता. पण तुम्ही एक गोष्ट विसरत आहात की शेवटी 'खळ्ळ-खट्टं'वर विश्वास ठेवणारेही इथेच आहेत आणि त्यांच्या गतीशी जुळवून घ्यावंच लागणार. नाहीतर सापेक्षतेचा विचार करता दोन्ही गट एकमेकांपासून फार लांब जातील आणि 'आपणच पुढारलेले' असं म्हणवू लागतील आणि पुन्हा ट्वीन पॅराडॉक्स निर्माण होईल. स्त्री-पुरूष मुक्तीवादाबरोबरच तुमच्या या तथाकथित आधुनिकोत्तरवादामुळे खळ्ळ-खट्टवादही निर्माण होईल.

राजेश घासकडवी's picture

21 Dec 2010 - 12:35 pm | राजेश घासकडवी

पुरूषही हळुहळू, नाईलाजास्तव का होईना, सैपाक करायला शिकणार असा आहे का? तसं असल्यास भविष्यापुढचं भविष्य म्हणून महिलांसाठीही (आई-आजीकडून फक्त पारंपारिक गोष्टी न शिकता आधुनिक) सैपाक शिकणं गरजेचं होईल काय?

एकंदरीतच या लेखात मी बंधनांचा विचार करतो आहे. सकाळ संध्याकाळ आमटी भाजी भात पोळी खाणं, कंटाळवाणं रूटीन पाळणं हेही एक बंधनच आहे. ती बंधनंही काहीशी गळून पडतील - स्त्री व पुरुष दोघांसाठी - असं मला वाटतं. कोणी सांगावं काही वर्षांनी फेसबुकवर 'टेबलावर' 'सोफ्यावर' 'कॉंप्युटरसमोर' असे स्थितीसंदेश येतील - 'आज कुठे जेवलात?' या प्रश्नाचं उत्तर म्हणून. हे अशी दात गळलेली बंधनं मिरवणंच असेल.

आणि पुन्हा ट्वीन पॅराडॉक्स निर्माण होईल.

असे पॅराडॉक्स न नाकारता मोठ्या मनाने समाजजीवनप्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठीच तर आधुनिकोत्तरवादाचा जन्म झाला आहे. खळ्ळ खट्टंही बरोबरच, वैचारिक प्रगतीही बरोबर. तुम्ही कुठच्या रेफरन्स फ्रेममधून बघता ते महत्त्वाचं.

गवि's picture

21 Dec 2010 - 12:42 pm | गवि

या दोन्तीन प्रतिक्रिया-उत्तरे..नॉट समझींग्ड..

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2010 - 2:26 pm | नगरीनिरंजन

तुम्हाला अजून पु.ल. देशपांडे आवडतात असे दिसतेय. ;-)

मला विचारताय असं धरुन उत्तरतो..कारण कधीकधी अजूनही माझे कुठली कॉमेंट कोणासाठी त्याचे तंत्र फसते.

पु.लं. तर आजोबांसारखे. त्यांच्या गोष्टी ऐकत तर मोठा झालो.

पण इथे आलेले वाक्य दुसरीकडचे आहे.

मिलिंद बोकिलांच्या शाळा मधे शाळेतल्या समारंभातल्या भाषणात कोणीतरी न समजणारे भाषण करायला लागल्यावर चावरे नामक मुलगा "नॉट समझीन्ग्ड" म्हणतो आणि सगळे धो धो हसतात.

तस्मात इथे मिलिंद बोकिल आवडले आहेत.. :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 3:09 pm | परिकथेतील राजकुमार

पु.लं. तर आजोबांसारखे. त्यांच्या गोष्टी ऐकत तर मोठा झालो.

हे वाक्य लिहुन गवी उगाचच आपले वय कमी दाखवत आहेत असा आमचा आरोप आहे ;)

अवांतराबद्दल क्षमस्व हो घासुगुर्जी.

बाकी चालु द्या...

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2010 - 4:11 pm | नगरीनिरंजन

त्या वाक्याबद्दल नव्हतं म्हणायचं मला, पण सांगितलं ते बरं झालं.
बाकी वरचे नॉट समझिंग्ड प्रतिसाद डब्ल्यु डब्ल्यु ई च्या कुस्तीसारखे आहेत एवढे लक्षात ठेवले म्हणजे पुरे.

विजुभाऊ's picture

20 Dec 2010 - 11:26 pm | विजुभाऊ

तुम्ही आधुनिकोत्तरवादाचा अभ्यास न करता केवळ अवचट वगैरे आवडणाऱ्यांपैकी दिसता.
हॅ हॅ हॅ......
अवचट हे चटकन अवगत होतात

नरेशकुमार's picture

22 Dec 2010 - 9:33 am | नरेशकुमार

विचार असा झाला की आपण स्वतःवर घातलेली बंधनं ही लाजिरवाणी गोष्ट नसून ती मिरवायची बाब आहे
व्वा )))))))))))))))))))))))))))))))))))))))))
मान गये,

'धरलं तर चावणाऱ्या सोडलं तर पळणाऱ्या' कुत्र्याला इतके गोंडस कपडे घालून सजवायचं, की ते बिचारं लाजेने आपणहून घराबाहेरच पडणार नाही. मग बिननखांचं, बिनदातांचं हे कुत्रं शोभेचं म्हणून वाटेल तिथे न्यावं. बंधनं मढवून टाकून त्यांची धार नष्ट करण्याची ही विचारसरणी किंवा प्रक्रिया आहे.
घरि हा लेख वाचला नाय पाईजे.

सुप्परमॅन's picture

22 Dec 2010 - 4:06 pm | सुप्परमॅन

लेखात काय म्हनायच हाय काय ते काय बी कळला नाय.