एक सवाई अविष्कार | अंक ३

पारा's picture
पारा in जनातलं, मनातलं
13 Dec 2010 - 3:18 pm

दोन मंतरलेल्या दिवसांनंतर सवाईचा तिसरा दिवस पुनःश्च आनंदाच्या लाटा घेऊन आला. शनिवारचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा, आणि आनंद गंधर्व म्हणजे आनंद भाटे. तसेच अजूनही काही अनपेक्षित आनंदाने तिसऱ्या दिवसाला शोभा आली.

दिवसाची सुरुवात ठीक ४ वाजता, आनंद देशमुखांच्या निवेदनाने झाली, आणि त्या नंतर लगेचच सनईवादक शरद खळदकर आसनस्थ झाले. त्यांचे आकाशवाणीवर सनईवादनाचे कार्यक्रम होत असल्याने तसे ते लोकांत सुपरिचित आहेत. त्यांनी 'ब्रिंदावनी सारंग' ने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली आणि संगीतमय सायंकाळ सुरु झाली.

त्यांच्या नंतर खरे पाहता, आनंद भाटे आपली कला सादर करणार होते, मात्र त्यांना नितीन देसाईकृत बालगंधर्व ह्या कलाकृतीसाठी पुण्याबाहेर जावे लागले होते, आणि त्यांना यावयास उशीर झाला. तेंव्हा संयोजकांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यापेक्षा जेष्ठ असूनही चंद्रकांत लिमये गायनास तयार झाले. तत्पूर्वी ठरवल्याप्रमाणे ते आपली गायकी मारव्यात सदर करणार होते, मात्र मिळालेल्या अग्रक्रमामुळे, त्यांनी मारवा ऐवजी भीमपलास निवडला. नंतर त्यांनी चंद्रमोहिनी रागात स्वरचित बंदिशही सादर केली. त्यांनी गायलेलं 'सांवरे आ जैय्यो, जमुना किनारे मेरा गांव' अजून माझ्या मनात रुंजी घालत आहे. ठुमरीतील नितांतसुंदर नाजूकता त्यांनी अगदी सहजपणे सादर केली. त्यांच्या त्या गाण्यातील नजाकतीने श्रोते बेहद्द खूष झाले.

सध्याच्या पिढीतील एक अत्यंत उमदा गायक असं ज्याचं वर्णन करता येईल, भीमसेन जोशींचे अत्यंत आवडते शिष्य असे आनंद भाटे, ज्यांना आनंद गंधर्व ही उपाधी वयाच्या १०-१२ व्या वर्षीच मिळाली ते आपल्या गायनाने सर्वांना मुग्ध करण्यास तयार झाले. राग मारू बिहाग ने त्यांनी सुरुवात केली, 'रसिया जाओ ना' ह्या विलंबित एक तालाने आपल्या प्रतिभेची प्रचीती लोकांना करून दिली. त्यानंतर 'तडपत रैना दिन', आणि 'मोरे जादू भरे नैना रसिले' सादर केलं. त्यांनी शेवट, 'सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा', ह्या भजनाने केला, वेळ कमी असूनही केवळ लोकाग्रहास्तव त्यांना शेवटच्या दोन ओळी पुनःश्च गाव्या लागल्या हे सांगणे न लगे. तीनही सप्तकातील बेबंद फिरत, बेधुंद करणारे स्वरचापल्य, अत्यंत स्पष्ट, शुद्ध शब्दोच्चार. त्यांनी संपूर्ण सभामंडपाला, एकंदर पूर्ण समारोहाला, एका उच्च सांगीतिक पातळीवर नेऊन ठेवलं. सुयोग कुंडलकर आणि भरत कामत ह्यांनीही सुंदर साथ करून कार्यक्रमाला एकच बहार आणली. हे सर्व असतानाच, आपल्या संगणक तंत्रज्ञानाच्या व्यवसायात त्यांनी स्वतःला कमी पडू दिलेले नाही. दहावीत व बारावीत बोर्डात आणि पदव्युत्तर शिक्षण पाहता त्यांची शैक्षणिक कामगिरीही अत्यंत लाजावाब आहे ह्यात शंकाच नाही. अश्या व्यक्तींकडून मिळत असलेल्या सुरांबरोबरच त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. त्यांच्या आजवरच्या आयुष्याने भारावून नाही गेलो तरच नवल. अश्या ह्या भावनोद्दीपित श्रोतुवृन्दाला पुन्हा एकवार खिळवून ठेवण्याची परीक्षा कठीण होतीच, मात्र संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा ह्यांना ते बिलकुल कठीण गेले नाही.

शिवकुमार शर्मा ह्यांना पंडित विजय घाटे साथ करत होते, आणि त्यांनी सुरुवात राग झिंझोटी ने केली. येताच त्यांनी शांतपणे ऐकून घेण्याची, म्हणजे फार टाळ्या न वाजवण्याची इच्छा श्रोत्यांकडे व्यक्त केली. ते म्हणाले कि सवाई हे कलाकारांसाठी आणि ऐकणार्यांसाठी एक तीर्थस्थान बनले आहे. तेंव्हा आपण इथेच काही योग्य गोष्टींची सुरुवात केली पाहिजे. पूर्वीच्या काळी 'वाह' आणि 'क्या बात है' हे उद्गार ऐकू येत असत आज मात्र, उठसुठ टाळ्यांचा सुकाळ झालेला आहे. तेंव्हा कृपया शांत राहून संगीताचा आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती त्यांनी केली, आणि श्रोत्यांनीही त्यांच्या या इच्छेला पूर्ण मान दिला. मी केवळ विजय घाटे यांच्या साठीच टाळ्या ऐकल्या, आणि संतूरचे फक्त मंजुळ सूर. संतूर हे वाद्य मला नेहमीच आवडलेले आहे, त्यातून पंडित शर्मा जेंव्हा ते छेडतात तेंव्हा मनावरून कोणी अलगद मोरपीस फिरवले आहे असं आभास झाला नाही तरच नवल, माझ्या मैत्रिणीने वर्णन्र केल्याप्रमाणे, हे वाद्य अतिशय नादमधुर आणि तरल संगीताचा स्त्रोत आहे. क्वचित कठोर, आणि बहुदा हळुवार सुरांच्या संगतीत पंडित शिवकुमार शर्मा आपल्याला घेऊन जातात, फक्त डोळे मिटायचा अवकाश की एका रम्य संगीत समाधीची अनुभूती बसल्या बसल्या मिळते. पाठीला लागलेली रग, दुखणारे पाय, आजू बाजूला होणारा आवाज, इतकेच काय तर हळूहळू स्वतःचे अस्तित्व सुरांच्या अथांग सागरात मिळून, सामावून जाते. वेळेच्या अभावाने जेंव्हा ही तंद्री भंग पावते तेंव्हा नक्कीच सर्व श्रोते त्यांच्याकडे पुन्हा एकवार एखादी लय छेडायचा हट्ट धरतात. त्या दिवशीही असा हट्ट त्यांना मोडवला नाही, आणि त्यांनी रसिकप्रिय पहाडी ची छोटी धून शेवटची काही मिनिटे लोकांना ऐकवली. अश्या वाद्यसंगीताच्या जलसांमध्ये विजय घाटे नेहमीच बहार आणत आलेले आहेत, तबल्यावर थिरकणारी त्यांची बोटे ऐकणार्याला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाहीत. साथीला म्हणून बसता बसता हळू हळू जुगलबंदीच कधी साकार होते कळतही आणि आणि त्याची हरकतही नसते. ह्या दोघांनी तयार केलेली हि सुरांची आरास मोडू नये असे वाटत होतेच, परंतु दुर्दैवाने घड्याळाचे काटे आडवे आले.

अजून एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, शिवकुमार शर्मा ह्यांचे वादन ऐकण्यास एक फार मोठी असामी मंडपात हजार झाली होती, पद्मभूषण, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. त्यांचे आगमन होताच, संपूर्ण रसिकवर्ग उठून उभा राहिला, स्वतः शिवकुमार शर्मा त्यांना भेटूनही आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे असेल कदाचित पण, भीमसेनांनी श्रोत्यांची संवाद साधला नाही ह्याची एक रुखरुख आहे, मात्र त्यांच्या निव्वळ उपस्थितीने सर्वांना आनंदाचं भरत आलं हे सांगावयास नकोच. तसेच ह्या सोहळ्याला शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे ह्यांनीही १ तास हजेरी लावली होती.

त्या नंतर मालीनिताई राजूरकर कलामंचावर आल्या, सर्वप्रथम त्यांनी आनंद गंधर्वांच्या किराणा घराण्याच्या विषयावरील एका संगीतिकेचा प्रकाशन केलं. त्यानंतर आपल्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा आनंद लोकांना कौशिक रंजनी ह्या रागाने दिला. मी स्वतः अजूनही आनंद गंधर्वांच्या लक्ष्मी बारम्मा मध्ये आणि शिवकुमार शर्मांच्या पहाडी मध्ये हरवून गेलो असल्याने मालिनीताईंच्या संगीताचा संपूर्ण आस्वाद घेऊ शकलो नाही ही एक खंत. त्यांचं गाण संपता संपता, तेंव्हाच एका बहारदार रविवारचे वेध लागले होते.

..........जग आणि सुख-दुःख विसरायला, लोकांना दारूची गरज का लागते कळत नाही बुआं........

हे ठिकाणआस्वादअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

13 Dec 2010 - 3:51 pm | यशोधरा

वा वा! सुरेख. महोत्सव रंगत गेला तर...

स्पा's picture

13 Dec 2010 - 4:11 pm | स्पा

+१

पारा's picture

14 Dec 2010 - 4:53 pm | पारा

नमस्कार,
मी आधी प्रकाशित केलेल्या लिखाणात चूक असल्यास मी कोणाकडे संपर्क साधणे अपेक्षित आहे ?

माझ्या वरील लेखात, चुकून भीमसेन जोशींचा उल्लेख पद्मभूषण केला आहे त्या ऐवजी तिथे, भारतरत्न हवे आहे. कोण हा बदल करू शकेल ?

तसेच कोणीही प्रतिक्रियेत ह्या चुकीची जाणीव करून दिली नाही हे ही आश्चर्यकारक आहे !

यशोधरा's picture

14 Dec 2010 - 4:56 pm | यशोधरा

संपादक मंडळ ह्या आयडीकडे संपर्क साधावा.