एक सवाई अविष्कार | अंक ४ - शेवट

Primary tabs

पारा's picture
पारा in जनातलं, मनातलं
17 Dec 2010 - 12:11 am

एक सवाई अविष्कार | अंक १
एक सवाई अविष्कार | अंक २
एक सवाई अविष्कार | अंक ३

मला माझा शेवटचा भाग लिहायला अंमळ उशीरच झाला म्हणायचा. असो इतर गडबडीत राहून गेले त्याबद्दल माफी असावी. शनिवारचा दिवस सुंदरतेने पूर्ण झाल्यावर, आधीच रविवारचे वेध लागले होते. रविवार म्हणजे स्वरसाम्राज्याच्या सवाई मंदिराचा कळसच.सकाळ आणि संध्याकाळ अश्या दोन भागात हा दिवस साकार होतो. या वेळीही सकाळच्या सत्राची सुरुवात ठीक ८ वाजता झाली.

पुण्यातीलच समीर दुबळे ह्यांनी बिलासखानी तोडीने एकमेव सकाळच्या सत्राची सुरुवात केली. विलंबित ख्यालाची सुरुवात त्यांनी 'धन धन पायो' ह्या पदाने केली. द्रुत पदाची सुरुवात 'मानो मेरी बात बनवारी' ने केली. तसेच त्यांनी 'जगदंबिका अंबिका', 'हे नरहरी नारायणा', आणि शेवटी 'एक सुर चराचर छायो' ह्या बंदिशीने केला. तसे पाहता, बिलासखानी तोडी, बिभास सदर केले. भारत कामात ह्यांनीही त्यांना उचित साथ दिली. तसे असूनही पहिल्या कलाकाराला तितकीसी छान दाद मिळत नाही हेच खरं. कदाचित सकाळच्या थंडीमुळे असेल. परंतु लोकांचे हात टाळ्या वाजवायलाही हलत नाहीत हे खरे त्या कलाकाराचे दुर्दैव अन्यथा त्यांची सुरावटीवरील पकड काही कमी नव्हती.

त्या नंतर गायन आणि सतार ह्यांची एक विलक्षण जुगलबंदी होणार होती. जेंव्हा मी वाचलं तेंव्हा मी पण ऐकण्यास उत्सुक होतो. देबप्रियो अधिकारी (गायन) आणि समन्वय सरकार (सतार) हे स्थानापन्न झाल्यावर एक फार छान अनुभव येईल ह्याची खात्री झाली.या दोघांना रामदास पळसुले ह्यांनी फारच सुरेख तबला साथ केली.राग देस आणि राग बहार सर्व श्रोत्यांना तृप्त करून गेले. त्यांच्या प्रयोगातील सहजता खरच वाखाणण्या जोगी होती.

त्या नंतर सकाळच्या सत्राचा शेवट पंडित राजन आणि पंडित साजन मिश्रा ह्यांनी केला. त्यांनी राग तोडी सदर केला. त्यांच्या अनुभवी सादरीकरणाने श्रोत्यांची मन तृप्त झाली. तशी ती दोघांची जुगलबंदीच होते, दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देत होते आणि एकमेकांच्या गाण्याचे कौतुकही करत होते. त्यांच्या एकूणच खेळकर आणि तितक्याच प्रभावशाली गायनाने श्रोतेही खूप आनंदित झाले. गेल्या वर्षी त्यांनी आपली कला रात्री सदर केली होती तेंव्हा मला ऐकणे जमले नव्हते, मात्र ती कसर मी या वेळी भरून काढली :) त्यांच्या नंतर सकाळच्या अत्राचा समारोप झाला, आणि सवाई च्या मंडपातून आम्ही अर्ध्या पाउण तासात परत येण्यासाठीच निघालो.

संध्याकाळी जमल्या नंतर एक फार छान बातमी सूत्रधार आनंद देशमुखांनी दिली. रविवार साठी १२ वाजेपर्यंतची मुदत मिळाली होती. एके काळी पूर्ण रात्र चालणारा हा महोत्सव, मात्र आज फक्त १२ पर्यंत मिळालेल्या परवानगी नंतरही सर्वजण बेहद्द खूष होते. त्याची गरज तशी होतीच. शेवटच्या सत्रात ५ जण होते आणि त्यांना पूर्ण न्याय देता देता सहज १२ वाजणार होते.

संध्याकाळची सुरुवात मीना फातर्पेकर यांनी राग मधुवंती ने केली. त्या नंतर ईतावा घराण्याच्या आठव्या पिढीचे सतार वादक शकीर खान यांनी आपली कला सदर केली. ह्यांना सुद्धा रामदास पळसुले यांनी साथ केली. त्यांनी वादन यमन रागात सदर केले. सतारीची एक वेगळीच गोडी जाणवते हे खरं. नाही म्हणजे मी इंग्लिश गाणी ज्याला रॉक म्हणतात तीही आवडीने ऐकतो. त्यात गिटार चा बराच वापर होतो, मात्र सतारीची गोडी या सर्व वाद्यांना हरवून जाते. मनीच्या तारा झंकारल्या असे जर कुठे वाचनात आलं तर प्रथम आठवते ती सतार आणि त्या भावनांना संपूर्ण न्याय देणारे वादन शकीर खान ह्यांनी केले.

त्यांच्या नंतर किराणा घराण्याचे गायक उपेंद्र भट कलामंचावर आले. त्यांनी पुरिया कल्याण ने सुरुवात करून शेवट नितांतसुंदर अश्या लोकप्रिय 'इंद्रायणी काठी' ह्या भजनाने केला. त्यांच्या शेवटच्या कडव्यातील विठ्ठल विठ्ठल ची लय अजूनही माझ्या कानात घुमत आहे. त्या नंतर पद्मा तळवलकरांच गायन सुरु झालं, आणि मी जरा जेवायला बाहेर पडलो. परतलो तेंव्हा अर्धा नाचाचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. मी शेवट प्रभा अत्रे यांना ऐकण्या साठी थांबलो होतो, मात्र माझ्या झोपेने दगा दिला. तिने माझ्यावर तिचा अंमल एवढा प्रभावी केला कि मला आता प्रभा अत्रे काय गायल्या हे सुद्धा फार आठवत नाही. त्याचा दुःख मला आहेच, कृपया जास्त बोलून मेलेल्याला मारू नये ही विनंती.

जेंव्हा शेवटी साक्षात सवाई गंधर्वांनी गायलेली भैरवी लावली होती, तेंव्हा सर्वजण अगदी शांत चित्ताने,उभे होते. रात्रीचे १२.१५ झाले होते आणि सवाई गंधर्वांचा आवाज रात्रीच्या अंधारात अधिकच हृदयाला स्पर्शून जात होता.

तेंव्हा मनात बरेच विचार येत होते. हे माझं सवाईला उपस्थित राहण्याचं तिसरं वर्ष. प्रत्येक वर्षी, शास्त्रातलं काही कळत नसलं तरी सवाईने बराच काही दिला. फक्त संगीत नव्हे तर एक रम्य अनुभव. हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांमधील बरेच संगीत प्रकार मी ऐकले आहेत, संगीतातील तशी जाण नसली तरी कानसेन असल्याचा अभिमान आहे. या सर्वात, सवाईचं संगीत मनाला जेवढा स्पर्श करून गेलं, जातं, आणि जात राहील तेवढं अजून कोणीही केलेले नाही हे बाकी खरं :)

सर्वांसाठी एक सूचना : पुढील वर्षी सवाई गंधर्व ८,९,१०,११ डिसेंबर ला होत आहे

आस्वादअनुभवशिफारसहे ठिकाण

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

18 Dec 2010 - 11:46 am | डावखुरा

सोही परम पद पावेगा...
गुरुजी जहाँ बैठू वहाँ छाया जी....

स्वैर परी's picture

18 Dec 2010 - 11:57 am | स्वैर परी

समीर दुबळे यांचे 'मानो मेरी बात' आणि 'एक सुर चराचर छायो' ही दोन्ही गाणी सुंदर जमून आली होती. राजन आणि साजन मिश्रा यांची जोडी म्हणजे क्या बात! देबप्रियो अधिकारी (गायन) आणि समन्वय सरकार (सतार) या दोघांनीही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकले. पद्मा तळवल्कर यांचं सादरीकरण मस्त्च! परंतु यासर्वात आनंदाचा क्षण म्हणजे पं. भीमसेन जोशी यांचा सुमारे ३० वर्षापुर्वीचा विडीओ. सवाईला जाण्याचे सार्थक तेव्हा झाले असे मी म्हणेन.

पारा's picture

19 Dec 2010 - 12:24 am | पारा

मी नाही पाहिला व्हिदिओ

यशोधरा's picture

18 Dec 2010 - 3:25 pm | यशोधरा

छान लिहिलेत. सवाईला जायला मिळाले नाही पण, दुधाची तहान ताकावर ह्यान्यायाने हे लिखाण वाचून बरे वाटले.
धन्यवाद.

>त्या नंतर पद्मा तळवलकरांच गायन सुरु झालं, आणि मी जरा जेवायला बाहेर पडलो. परतलो तेंव्हा अर्धा नाचाचा कार्यक्रम पूर्ण झाला होता

नृत्याचा कार्यक्रम कोणाचा होता?

स्वैर परी's picture

18 Dec 2010 - 7:52 pm | स्वैर परी

दीपक आणि ममता महाराज!

यशोधरा's picture

23 Dec 2010 - 5:26 pm | यशोधरा

धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

23 Dec 2010 - 5:33 pm | स्वाती दिनेश

सवाईचा सगळा वृत्तांत वाचला, छान!
स्वाती