मी ज्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होतो तो सवाई गंधर्व महोत्सव काल सायंकाळी, रमणबाग शाळेच्या प्रांगणांत रसिकांच्या प्रचंड उपस्थितीने सुरु झाला. हे सवाई गंधर्वांचं १२५वं जन्मवर्ष. साहजिकच, ह्यामुळे कार्यक्रमाला फार रंगत येणार ह्याची खात्री होती. मी स्वतः अभिजात शास्त्रीय संगीताचा जाणकार नाही, मात्र मला आलेला अनुभव शब्दबद्ध केल्यावाचून मला रहावतही नाही, त्यामुळे चुकलो माकलो तर सांभाळून घ्या.
प्रथेप्रमाणे, महोत्सवाची सुरुवात सनईने होते. त्याचप्रमाणे ह्या वर्षीही सनई वादक भास्कर नाथ ह्यांनी महोत्सवाची सुरुवात केली. इयत्ता १० वीत शिकणाऱ्या ह्या सामर्थ्यवान कलाकाराने आपल्या प्रतिभेने भल्या-भल्यांना मोहित करून सोडले. आपला वय त्याने कुठे जाणवू दिलं नाहीच, मात्र, आपल्या सुस्वभावी आणि शालीन वर्तनाने त्याने श्रोत्यांची मने नक्कीच जिंकली. त्याची पंडित भिमसेनांसमोर कला सादर करण्याची इच्छा अश्या खास प्रसंगी फलद्रूप झाली, ह्यामुळे तो स्वतः अत्यंत आनंदी होताच, आणि त्याने केलेल्या अदाकारीने श्रोतुवर्ग देखील. त्याच्या कलेने सर्वांसाठी संगीताचा लाल गालीचा अंथरला आणि ५८वा सवाई गंधर्व मोठ्या दिमाखात सुरु झाला.
सनईच्या मंजुळ स्वरानंतर सुधाकर चव्हाण ह्यांनी आपल्या गायनाने श्रोत्यांची मनं जिंकली. जाणकारांसाठी माहिती अशी की त्यांनी विलंबित ख्याल राग मधुवंती ने सुरु केला. सुधाकर चव्हाण स्वतः गायनाचे वर्ग घेतात, आणि वारकरी संप्रदायातील लोकांना ते मोफत शिक्षण देतात ही अजून एक लोकोत्तर गोष्ट. त्यांनी या सोहळ्याची गायनक्षेत्रातली मुहूर्तमेढ रोवली
आणि त्यानंतर कुमार गंधर्वांचे शिष्य भुवनेश कोमकली ह्यांनी सर्वांचाच प्रिय असा पूरिया धनश्री राग आळवायला सुरुवात केली. श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मग संत कबीर ह्यांचं एक सुंदर पद गाऊन समारोप केला. मी स्वतः कुमार गंधर्वांना फार ऐकलेलं नाही, मात्र लोकांच्या मते त्यांच्या गायनशैलीत कुमार गंधर्वांचा प्रभाव जागोजागी प्रतीत होत होता. ते सध्या कुमार गंधर्वांच्या संगीताचा अत्याधुनिक डिजिटल तंत्राने संपादन करत आहेत हे आणखी एक विशेष.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र, श्रीनिवास जोशी ह्यांनी लिहिलेल्या आणि गायलेल्या त्यांच्या संगीतिकेचा प्रकाशन शिवकुमार शर्मा ह्यांच्या हस्ते झालं. पंडित भीमसेन जोशी यांच्या कारकीर्दीचं स्वरचित्र रेखाटण्याचा प्रयत्न अभूतपूर्व आणि यशस्वीही आहे ही पावती साक्षात शिवकुमार शर्मा ह्यांच्या कडून मिळाल्यावर, श्रीनिवास जोशी ह्यांचे डोळे पाणावायचेच काय ते राहिले होते. बहुदा ह्या त्यांच्या प्रयोगाबद्दल श्रीनिवास जोशी गेल्या सवाईला बोलले होते, पण मला नीटसा ते आठवत नाही.
त्यानंतर पहिल्या दिवसाचं प्रमुख आकर्षण पैकी एक म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरासिया ह्यांचं मंचावर आगमन झालं. त्यांचा वय आज ७२. काल मी पहिला तेंव्हा त्यांचे हात किंचित कापत होते. त्यांनी दरवाजावरचा धातूशोधक, त्रास होत असल्याने बंद करावयास लावला. त्यानंतर त्यांनी अत्यंत सुंदर अश्या लतिका रागाने सुरुवात केली. त्यानंतर देस(त्रिताल), आणि शेवटी फर्माईषीने पहाडी नंतर त्यांनी समारोप केला. ह्या वयात अनेक जण आपल्या नातवांबरोबर मजा मस्करी करण्यात किंवा सकाळी हास्य कट्टा आणि वर्तमानपत्र ह्यात खूष असतात. संगीतावर अशी परम भक्ती आणि संगीतासाठीची साधना असणारी माणसेच विरळ. ७२ व्या वर्षीही त्यांची बोटे बासरीवर हळुवार फिरत होती, श्वास-उछ्वास लोकांपर्यंत एकदाही पोहोचला नाही. पोहोचले ते मधुर स्वर. ऐकणाऱ्याला अलगद अस्मानात घेऊन जाणारी मोहक लय. मला स्वतःला नेहमीच गायनापेक्षा वाद्यसंगीत जास्त भावलेलं आहे. वैखरीची गरज गायकाला असते, वाद्ये सरळ ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेतात. त्या मनमोहक स्वराविष्कारानंतर आगमन झालं ते बेगम परवीन सुलताना ह्यांचं.
खरे सांगायचे तर हरिप्रसाद ह्यांच्या नंतर मला किंचित थकवा आणि भूक जाणवू लागली होती. एवढा वेळ भारतीय बैठकीत बसून पायांना आणि पाठीलाही रग लागलेली होती, सवय नाही दुसरं काय. मात्र परवीन सुलताना ह्यांनी जेंव्हा सुरांना हात घातला, तत्क्षणी तहान-भूक सगळंच लोप पावलं. खर्ज, मध्यम, तार सप्तकांत त्यांचा अनिर्बंध वावर सुरु झाला. कधी भारदस्त, कधी खेळकर, कधी हळुवार, कधी कठोर, आपल्या स्वरफेकीने समस्त उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध करून सोडलं. अजून माझ्या कानांत ती आवाजाची धार जाणवत आहे, जणू साक्षात गंधर्वाच गात होते. अंगावर काटा आणणारे तार साप्तकाचे सूर आणि नकळत वातावरण गंभीर करून जाणारे खर्जातले स्वर. आवाजाची फिरत तर विचारूच नये. ह्या क्षणी वरचा पंचम, तर पुढल्याच क्षणी खालचा गंधार, त्या स्वतःच मधे मधे वेळ पाहत होत्या, नाही म्हणजे श्रोत्यांमधल्या कोणाला कसलीही शुद्ध नव्हतीच म्हणा. रात्री ११ नंतर ध्वनिक्षेपकांना बंदीच्या नियमामुळे ह्या स्वरसौंदर्याला दुर्दैवी मोडता घालावा लागला, मात्र तरीही त्यांनी 'रसिका...' ही श्रोत्यांची इच्छा पूर्ण केलीच, आणि दिवसाचा शेवट, 'जगत जननी भवानी' ह्या मोहक पदाने केला.
आणखी काय पाहिजे, पहिल्या दिवशी चार दिवसांच्या पर्वणीची एवढी सुंदर चुणूक मिळाली. आणखी काय पाहिजे ? आज पंडित विश्वमोहन भट, आणि यु . श्रीनिवास, समारोप तर साक्षात स्वरमार्तंड जसराज, सांगा बरे, अजून काय पाहिजे ?
प्रतिक्रिया
10 Dec 2010 - 2:19 pm | स्पा
क्या बात हे, केवळ अप्रतिम...........
सवाई ला जाऊन बसल्यागत वाटलं......
काल टीवी वर झलक पहिली.....
तुमच्या नजेरेने आम्हाला सवाईची सफर घडवा.....
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
10 Dec 2010 - 2:28 pm | चिंतामणी
सहमत.
संपुर्ण सोहळ्याचा वृतांत येउ द्या.
11 Dec 2010 - 4:21 am | इंटरनेटस्नेही
स्पावड्याला अनुमोदन.
-
ॠषिकेशकुमार इंट्या,
मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्लक्षित पँथर.
10 Dec 2010 - 2:23 pm | यशोधरा
वा! वा! सुरेख लिहिलंय! सगळे दिवस हजेरी लावणार का महोत्सवाला?
डीटेलवार वृत्तांत येऊदेत अगदी.
>>रात्री ११ नंतर ध्वनिक्षेपकांना बंदीच्या नियमामुळे ह्या स्वरसौंदर्याला दुर्दैवी मोडता घालावा लागला >> :(
10 Dec 2010 - 2:26 pm | छोटा डॉन
मालक, फोटो टाका की राव !
त्यामुळे लेखाला अजुन चारचाँद लागतील :)
जरा हात मोकळा सोडुन लिहा फटाफट, वाट पहातो आहे. एकदम डिटेलमध्ये येऊद्यात सगळे. :)
- छोटा डॉन
10 Dec 2010 - 2:35 pm | मिसळभोक्ता
मी हरीजींचा हा राग प्रत्यक्ष ऐकला आहे साधारणतः २० वर्षांपूर्वी. थोडासा पूरियासारखा वाटतो, पण गंमत आहे खूप.
परवीनजींना तीन चारदा ऐकले आहे, पण ९२ च्या सवाईसारखी (बहुतेक, ९२च ना ?) दयानी भवानी कधीच नंतर झाली नाही, हे माझे मत.
10 Dec 2010 - 2:39 pm | गणेशा
अतिषय छान वृत्तांत दिला आहे..
लिहा अजुन ...
10 Dec 2010 - 7:54 pm | वाटाड्या...
छिद्रान्वेषी शेठ...
छान लेख...समायोचित...वाटच पहात होतो कोणी लेख टाकेल याबाबत..
सकाळवर समालोचन (ऑफलाईन) वाचलं...तुम्हाला सवाई गंधर्वला जाता येतं आणि त्याचं रसग्रहण करता येतं याबद्दल हेवा वाटतो...आता जरा कलाकारांनी जे राग आणि ज्या चिजा गायल्या त्यांच एखाद्या कसलेल्या संगीत कलाकाराप्रमाणे रसग्रहण येउ दे...
पुढील दिवसांच्या संगीत दिवाळीबद्दल वाचायला मिळेल अशी आशा करतो...
- सांगितिक वाटाड्या...
10 Dec 2010 - 8:37 pm | यकु
तुमच्या लेखामुळे आता या सवाईच्या क्लिप्स अपलोड होण्याची वाट पाहावी लागणार..!
इथल्या बहिरगावकर कुटूंबियांच्या पुण्याईने पंडीत हरिप्रसाद आणि पंडीत शिवकुमार शर्मा यांना अगदी तास-दोन तास ऐकण्याचा योग आला होता.
पंडीत शिवकुमार शर्मांनी तर अगदी त्यांच्या केसांपेक्षाही सूक्ष्म सरगम/राग वाजवले होते.. दोन तास नुसत्या स्वर्गीय संगीताची बरसात!
शेवटी तेच म्हणाले - "चलो अब रूकते है.. श्रोताओं को घर भी जाना है.."
गर्दीतून कुणीतरी ओरडले - "घर भूल गये हम...आप बजाईये.."
मग त्यांनी संगीतबध्द केलेल्या चित्रपटातील गाणे वाजवून श्रोत्यांना ते ओळखायला लावले आणि अजून एक दोन गाणी वाजवली...
पं. हरिप्रसाद आणि झाकीर हुसैन यांची यूट्यूबवरून डाऊनलोड केलेली दीड तासांची जुगलबंदी माझ्याकडे आहे... कुणाला हवी असेल तर सांगा..
10 Dec 2010 - 11:59 pm | प्राजु
अरे वाह! आणखी येऊदे..
संपूर्ण सवाई चा येऊदे वृत्तांत. :)
11 Dec 2010 - 4:02 am | निनाद मुक्काम प...
@अजून काय पाहिजे ?
लिहित लिहित रहा मित्रा