परवा ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. कदाचित इतरांना जाणवणार नाही. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए. त्या प्रार्थनेचा मी केलेला स्वैर भावानुवाद येथे देत आहे :
देवा तुला माहीत आहे
माझं वय वाढत आहे...
वायफळ बडबड करण्यातून
प्रत्येक विषयावर माझे मत नोंदविण्याच्या
घोर निष्फळ अट्टहासातून
वाचव रे आता मला बाबा!
प्रत्येकाचे आयुष्य सुधारण्यापासून
इतर लोकांच्या भानगडी निस्तरण्याच्या मोहातून
मला वाचव रे बाबा!
लांबलचक तपशीलवार गोष्टींचे
पाल्हाळ लावण्याच्या सवयीतून
माझं रक्षण कर रे बाबा!
फाफटपसारा न मांडता
थेट मुद्द्याचंच बोलायचं
बळ दे रे मला बाबा!
माझ्या तोंडून
माझ्या अनंत शरीर वेदना आणि दु:खांचं
अव्याहत रडगाणं सुरू झालं की...
माझे ओठ शिवून टाकायची व्यवस्था कर रे बाबा!
वर्षं उलटत आहेत तसतशी त्या वेदनांची व्याप्ती
आणि माझी त्यांच्याबद्दल बोलण्याची हौस....
दोन्हीही वाढतच चाललं आहे!
आणि माझं त्यांच्याविषयीचं प्रेमदेखील....
मलाही शिकव धडा
की कधी कधी...
माझंही चुकू शकतं!
मला विचारी बनव रे देवा, चोंबडा बनवू नकोस.
परोपकारी बनव, हुकूमशहा बनवू नकोस.
माझ्याकडील शहाणपणाची आणि अनुभवांची महाकाय पोतडी
वापरता न येणे म्हणजे कित्ती कित्ती वाईट!
पण काय करू रे देवा....
शेवटापर्यंत हवेत ना मलाही
कोणी तरी हक्काचे सखे साथी!
-- अरुंधती
मूळ प्रार्थना वाचायची असल्यास येथे वाचा.
प्रतिक्रिया
21 Nov 2010 - 10:19 pm | प्रियाली
मस्त कविता आहे. उतरवून घेत आहे. जालावर अतिशय उपयोगी दिसते. एकेका कडव्याबरोबर एकेक व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
24 Nov 2010 - 7:49 am | नंदन
कविता आणि अनुवाद, दोन्ही आवडले. येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
>>> जालावर अतिशय उपयोगी दिसते. एकेका कडव्याबरोबर एकेक व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
--- और ये लगा सिक्सर :)
22 Nov 2010 - 6:27 pm | अरुंधती
धन्स प्रियाली! :)
22 Nov 2010 - 7:02 pm | प्रकाश घाटपांडे
छान मार्गदर्शक तत्वापरी प्रार्थना / कविता!
22 Nov 2010 - 9:42 pm | गणेशा
छान आहे अनुवाद ..
आवडला
मुळ प्रार्थना साईट ब्लॉक मुळे नाही वाचता आली ...
22 Nov 2010 - 10:04 pm | प्राजु
स्वैर अनुवाद छान केला आहेस अरूंधती. आवडली कविता.
22 Nov 2010 - 10:15 pm | सुनील
सगळ्यांनीच हे पाळायचे ठरवले तर सगळी मसं बंद पडतील!
23 Nov 2010 - 5:41 pm | अरुंधती
प्रकाशजी, गणेशा, प्राजु, सुनील.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! :-)
23 Nov 2010 - 6:25 pm | वाहीदा
अरुंधती,
एक शंका,
मला विचारी बनव रे देवा, चोंबडा बनवू नकोस.
परोपकारी बनव, हुकूमशहा बनवू नकोस.
परोपकारी च्या विरोधार्थी शब्द हुकूमशहा अन विचारी च्या विरोधार्थी शब्द चोंबडा आहे का ?? :-?
परोपकारी X हुकूमशहा
विचारी X चोंबडा
मला वाटते,
परोपकारी X स्वार्थी
विचारी X अविचारी असे असावे
(correct me, if I am wrong..)
~ वाहीदा
25 Nov 2010 - 7:55 pm | अरुंधती
वाहीदा, धन्स गं! :-) अगं तू मूळ कविता वाचलीस का? ती वाच ना, म्हणजे कळेल की मी ते शब्द का वापरलेत ते! :-)
25 Nov 2010 - 8:25 pm | वाहीदा
मी फक्त तू केलेलाच अनुवाद वाचला .
आता समजले तू हे शब्द का वापरलेस ते .
Make me thoughtful but not nosy;
helpful but not bossy.
With my vast store of wisdom and experience it does seem a pity not to use it all.
छान आहे तू केलेला अनुवाद !
24 Nov 2010 - 6:45 am | ए.चंद्रशेखर
फारच छान! मूळ कविता व तुम्ही केलेला त्याचा अनुवाद दोन्ही अतिशय आवडले.
24 Nov 2010 - 12:37 pm | जागु
अरुंधती खुप आवडला अनुवाद.
24 Nov 2010 - 3:22 pm | योगप्रभू
अरुंधती,
तुमचे कौतुक.
अंतर्मुख होऊन विचार करता जाणवते, की अरे! ही तर तरुणपणातच करायची प्रार्थना आहे. नव्या मैत्रीची आस, वादविवादाची खुमखुमी, शहाणपण मिळण्याची आकांक्षा हे सगळे तरुण वयातच हवे असते. वृद्धावस्थेला पोचेपर्यंत अनुभवाने शहाणपण आलेले असते. व्याधींची साथ असते आणि एकच मित्र उरलेला असतो... मृत्यू.. त्यातूनच मग इतर काही ऐहिक मागण्यापेक्षा आत्म्याला मोक्षाची तळमळ लागते. त्याच्यालेखी पुढे दिलेली आळवणी हीच 'माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे' होऊन बसते.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर
बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता, दिसे पैलतीर
जन्म मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडीवार
चराचरा पार न्या हो, जाहला उशीर
पांडुरंग पांडुरंग, मन करा थोर
25 Nov 2010 - 7:59 pm | अरुंधती
चंद्रशेखर, जागू, योगप्रभू... प्रतिसादाबद्दल धन्स! :-)
योगप्रभू, तुमचं म्हणणं खरं आहे..... मनाचे श्लोक खरे तर तरुणपणात आचरणात आणायचे असतात. पण सामान्यतः लोक निवृत्तीनंतर त्यांच्याकडे वळताना दिसतात. आपल्याकडे जे ह्या प्रार्थनेत सांगितलं आहे तेच वेगळ्या भाषेत व शब्दांमध्ये संतकवींनी सांगितलं आहे. शैली फक्त निराळी आहे इतकेच! :-)
25 Nov 2010 - 8:01 pm | अविनाशकुलकर्णी
कविते पेक्षा "धन्स" आवडले..
26 Nov 2010 - 7:21 am | बहुगुणी
सतराव्या शतकातील एका नन ने या ओळी लिहिल्या असाव्यात असा उल्लेख इथे आणि इथे आढळला. त्याच दुव्यांवर या लिखाणातील त्यापुढील आणखी काही ओळीही सापडल्या, त्यांचं स्वैर रुपांतर अरुंधती यांचाच साचा वापरून करायचा प्रयत्न खाली केला आहे:
इतरांच्या दुखण्याच्या गोष्टी मी आनंदाने उपभोगाव्या असा वर तर मी मागणार नाही
पण त्यांची दुखणी ऐकायचं सामर्थ्य तेवढं मात्र नक्की दे रे देवा
मला आधिक स्मरणशक्ती दे असाही वर मी मागणार नाही
पण जेंव्हा माझी स्मरणशक्ती दुसर्यांच्या स्मरणांना सामोरी जाईल
तेंव्हा मात्र मला नम्रता दे, आणि थोडासा कमी फाजील आत्मविश्वास दे
मला श्रेष्ठ धडा शिकव की माझंही कधी कधी चुकतं
माझ्यात थोडी गोडी शिल्लक ठेव
संत नाही व्हायचं मला, कारण त्यांच्यातील काहींबरोबर जगणं कठीण असतं हे मी जाणते
पण कडवट वृद्धा ही तर दानवांची सर्वोत्तम निर्मिती (हेही मी जाणते)
अनपेक्षित ठिकाणी असलेले सदगुण दिसावेत
आणि अनपेक्षित लोकांकडे असलेले आगळे सामर्थ्य ओळखावे
एवढी कुवत मला दे
आणि हे मला दिसलंय हे त्यांना मी सांगावं
असा मनाचा मोठेपणा मला दे
26 Nov 2010 - 10:18 pm | अरुंधती
बहुगुणी, तुम्ही तर त्या प्रार्थनेचा स्रोत शोधून काढलात की! हा अनुवादही छान जमलाय. धन्यवाद! :-)
26 Nov 2010 - 10:30 pm | गंगाधर मुटे
छान. :)
27 Nov 2010 - 8:52 am | मदनबाण
मस्त... :)