आज अचानक गाठ पडे....

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
22 Nov 2010 - 10:59 pm

काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती.

शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो. द्र्र शनिवारी रविवारी गावाला यायचो, आई, बाबा व मोठी बहीण यांच्या सोबत दोन दिवस मजेत जायचे आणि परत नोकरीच्या गावी आल्यावर त्या सगळ्या गोष्टी फोल वाटायच्या. सहा महिन्यांतच आईनं मोहिनीचं, म्हणजे माझी मोठी बहीण, तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं. मनांत विचार आला, बहुधा माझ्या नोकरी साठिच थांबले होते. पण जास्त काही विचार करेपर्यंत आणि बाबांबरोबर बोलायच्या आधी मोहिनी ताईचं लग्न झालं देखील. ती सासरी गेली आणि थेट दुस-या दिवशीपासुन आईचं ’ आत्ता मला होत नाही रे काम’ सुरु झालं. म्हणलं लग्नात तर छान होतं सगळं आणि एक दिवसांतच हे काय झालं.

मार्गशीर्ष संपला आणि नोकरीच्या गावावरुन परत गावी आलो की, मुलींच्या पत्रिका व फोटो दाखवणं सुरु झालं. बाबा या बाबतीत सगळं आईच्या मार्फत बोलणं करायचे. मनाचा ओढा, जीवन ध्येय, मानवी जीवनाची क्षणभंगुरता वगॆरे गोष्टी आईलाच समजणं अवघड होतं त्यामुळं ते तिनं बाबांना सांगायचा काही संबंधच नव्हता, आणि दोन तीन वर्षे मी त्या परमात्यामाचा अभ्यास करत राहिलो आणि माझं लग्न फक्त आई बाबांच्या बोलणी, उपदेश यांचा भाग होवुन राहिलं. पण आइ अचानक गेली, त्या दुखा:त आणि बाबांच्या आणि मोहिनिच्या भावनात्मक बोलण्यापुढे माझं काही उपाय चालले नाहीत.पुढ्च्याच महिन्यांत माझं लग्न ठरलं आणि दोन महिन्यांत झालं सुद्धा.

मिनाक्षी दिसायला खुप सुंदर नव्हती पण ती आणि निसर्ग माझं मन संसारात रमवायला पुरेसं होते. लग्नानंतर महिनाभरात माझी बदली थोडी लांब झाली आणि ख-या अर्थानं मी आणि मिना संसारी झालो.

पण आज, हे काय समजण्याच्या पलीकडचं काहीतरी होतं आहे,

आज बहुधा सप्तमी असावी, बाहेर चंद्र फार मोठा नव्हता, एक दोन अवकाळी पाउस झालेले, हवेतला उष्मा कमी झालेला नाही, त्यामुळं खिडक्या उघड्या टाकुनच झोपलेलो, ज्या विषयसुखाची निर्भत्सना करायचो, ज्याला ह्या मर्त्य शरीराचे लाड म्हणुन कमी लेखायचो तेच लाड करुन आणि करुन घेउन या शरीराला निवांतपणा आलेला होता, खिडकीतुन मधुनच येणारी वा-याची चुकार झुळक मला दिलासा देत होती तर मिनाची अर्धवट समाधानी झोप चाळवत होती. तिच्या थोड्याश्या हालचालींनी काही वेळापुर्विच्या आणि त्याआधीच्या आठवणी जाग्या होत होत्या. झोप पण लागत नव्हती, जाग पण नव्हती. डोळा मिटतोय असं वाटलं की झुळुक यायची आणि मिनाच्या हाताची माझ्या खांद्यावरची पकड उगाचच घट्ट व्हायची.

आणि त्यातच, ओशोंनी वर्णन केलेली समधीवस्था अनुभवतोय की काय काहीच समजेना.

आज अचानक गाठ पडे ..
भलत्या वेळी भलत्या मेळी ..

अशीच एक वा-याची लहर आली, हळुच डोळे उघडले आणि कुस बदलुन मिनाला थोडं जवळ ओढावं असा विचार केला पण पुढं प्रत्यक्ष तोच उभा दिसला समोर, हो तोच तो ज्याच्या कितिक रुपांची, त्याच्या स्तुतींची पारायणं केली होती. तोच परमेश्वर, जगनियंता, गुढ वलयात आणि मंद प्रकाशात तोच होता होय नक्की.

नयन वळविता सहज कुठेतरी....
एकाएकी तुच पुढे....

आणि एकदम शहारलं सगळं अंग, मनाचा आणि मेंदुचा संबंध संपुन त्या दोन्हीच्या जागा आत्म्यानं घेतली होती. डोळे उघडले आणि त्याच क्षणी त्याच्या माझ्या मधले सगळे पडदे नाहीसे झाले काही क्षणांकरिता. मी त्याच्यात मिसळुन जातो आहे असं वाटलं. हे काय दिसतंय आपल्याला, हे खरं आहे का ते जे काही क्षणापुर्वी आपण अनुभवत होतो ते खरे होतं. माझी झोप आता उडाली होती. सगळ्या संवेदना जणु एकच जाणिव करुन देत होत्या. तेच हे आणि हेच ते. द्वॆत अद्वॆताचा फरक आणि एकात्मापणाची भावना बंधमुक्त होवुन सगळं त्या गुढ विलयामध्ये विलुप्त होत होतं.
दचकुनि जागत जीव निजेतुन...
क्षणभर अंतरपट उघडे...

त्याच वेळी मिनाचा हात पुन्हा खांद्यावर विसावला, पुन्हा विचार एका अद्वॆताकडुन दुस-या अद्वॆताकडे जाउ लागले. काही क्षणांआधिचं आम्हा दोघांचं अद्वॆत खरं की आता येणारा त्या अनादि नादाचं आणि माझं अद्वॆत खरं. पुस्तकातुन श्री. परमहंसांना असा अनुभव आला होता हे वाचलं होतं, पण मला ही तो यावा. एका क्षणांत मी माझी तुलना श्री.परमहंसांबरोबर करीत होतो तर दुस-या क्षणी माझ्या मिनाच्या हातातील बांगड्या माझ्या खांद्यावर रुतल्याची जाणिव होत होती.

गुढ खुण तव कळुन न कळुन .....
भांबावुन मागे पुढे .....

वाटलं हेच ते ब्रम्ह ज्याला भेटण्याची आपल्याला अतीव इच्छा होती, उत्कटता होती, त्याचा शोध घ्यायचा होता. हिच ती निसर्ग शक्ती जि आपल्याला खुणावत होती, आवाहन करीत होती. बहुधा माझ्या आणि मिनाच्या अद्वॆतच या परम अद्वॆतात परावर्तित होत होतं. अहं चा अहं ब्रम्हास्मि होत होता. प्रक्रुति आणि पुरुष यांच्या सर्वव्यापी रुपात आम्ही पोहोचलो होतो असं वाटत होतं. पण मला त्या गुढ विलय़ांत एकरुप व्हायचं होतं, त्या शक्तीला सर्व काही द्यायचं होतं, आणि हीच वेळ होती ती, दुसरी कोणतीही नाही.

गारुड झाल्यासारखा मी उठलो आणि पलंगावरुन उतरुन त्या प्रकाशाकडे जाणार तेवढ्यात मिनाचा आवाज आला, अहो खिडकी बंद करा ना जरा, गारवा सुट्लाय, पाउस पडतोय कुठेतरी, आणि तो चंद्र सुद्धा ....., वाटलं तिला सांगावं सगळं आणि निघावं, त्या दिव्या ज्योतीत मिसळुन जावं. पण तिचं ते ’ चंद्र सुद्धा म्हणुन छान हसुन संकोचुन त्या कुशीवर वळणं आणि वळताना चमकलेला मंगळसुत्रातला काळा मणि.

निसटुन जाई संधीचा क्षण .....

सदा असा संकोच नडे....

आज अचानक गाठ पडे ..

भलत्या वेळी भलत्या मेळी...

हर्षद.

कलासंगीतकथाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

22 Nov 2010 - 11:16 pm | चिंतामणी

बोलती बंद झाली.

मी ऋचा's picture

23 Nov 2010 - 10:43 am | मी ऋचा

आवडलं हो!

५० फक्त's picture

23 Nov 2010 - 12:22 pm | ५० फक्त

श्री. चिंतामणी व रुचा प्रतिसादावद्दल अतिशय धन्यवाद.

हर्षद

आदिजोशी's picture

23 Nov 2010 - 5:53 pm | आदिजोशी

झक्कास

५० फक्त's picture

23 Nov 2010 - 11:35 pm | ५० फक्त

अतिशय धन्यवाद श्री. आदिजोशी.

हर्षद

माजगावकर's picture

24 Nov 2010 - 12:20 am | माजगावकर

खल्लास! प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात राजे! :)

५० फक्त's picture

24 Nov 2010 - 9:41 am | ५० फक्त

श्री. माजगांवकर,,

प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद.

हर्षद.