आज लक्ष्मीपुजन, धनसंपत्ती देणार्या लक्ष्मीमातेच्या पुजनाचा दिवस. सागरमंथनातुन जी १४ रत्ने निघाली त्यात लक्ष्मीचा समावेश होतो. हि लक्ष्मी आपल्या जेष्ठ भगीनी जिला 'जेष्टा किंवा अलक्ष्मी असे नाव देण्यात आले आहे, तीच्यासह वा तीच्या नंतर उत्त्पन्न झाली. अलक्ष्मीही काळयातोंडाची, तांबड्या डोळ्याची, रुक्ष व पिंगट केसांची आणि सुरुकतलेल्या देहाची. तर लक्ष्मीही सुंदर, लावण्यवती. लक्ष्मीने विष्णुला वरले. परंतु जेष्ठेच्या आधी कनिष्ठेचा विवाह कसा होईल? म्हणुन आधी तीचा विवाह उद्दालक ऋषीशी करण्यात आला. परंतु ह्या ऋषीनी तीचा त्याग केला. ह्या अलक्ष्मी चा निवास हा कचरा, कोळसा, कलह हा होय. म्हणुन लक्ष्मीपुजना आधी ह्या अलक्ष्मीला दुर केले जाते, संपुर्ण घराची साफसफाई, रंगरंगोटी करुन घर सजवले जाते. नविन केरसुणी आणुन तिची पुजा करुन तीच्या मार्फत अलक्ष्मीला दुर करुन मगच लक्ष्मीपुजन केले जाते.
चला आपण त्या लक्ष्मीला आवाहन करु.
सर्वप्रथम सोनकांतीच्या आणी चंद्राप्रमाणे मुखा असलेल्या (चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो, दोघांचाही उगम समुद्रमंथनातुन झाला.) सुवर्णालंकारभुषीत लक्ष्मीला आवाहन केले जाते. सुवर्ण, धन, संपत्ती देणारी, अश्वरथारुढ, गज चित्कारांनी जीचे अस्तीत्व भासमान होते त्या लक्ष्मीची करुणा भाकली जाते.
अवर्णनीय अशी तेजस्वी कांती, स्मित हास्य आणि कमळाप्रमाणे कोमलकांतीच्या आणि कमळातच निवासकरणार्या त्या लक्ष्मीचे कृपादान मागितले जाते.
अशी ती लक्ष्मी चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहे, देव तीची सेवा करतात अश्या कमलधारण करणार्या 'ईं' बीजरुप असेलेल्या लक्ष्मीला आपण शरण जाऊ, ती आपले दारिद्र दुर करो.
सुर्यासम तेजस्वी कांती असलेल्या लक्ष्मीमुळेच बेलाला वनाचे राज्यपद मिळाले आहे आणि आपल्या तपाचे फळ म्हणुन आपले दारिद्र आन्तर्बाह्य दुर करो.
लक्ष्मी, कुबेर आहणि मणिभद्र हे मजकडे त्यांच्या किर्तीसह येवो आणि या श्रेष्ट राष्ट्रात जन्मल्यामुळे तो कुबेर मला धनसंपत्ती देवो..
भुक तहान अश्या मलांनी भरलेल्या जेष्ठा अलक्ष्मी ह्या तुझ्या भगिनीला मी नष्ट करतो, अभाव आणि दारिद्रय माझ्या घरातुन घालवुन टाक अशी आपण लक्ष्मीची प्रार्थना करतो.
सुगंधी, कधीही अवमानीत न होणारी आणि सर्वभुतांवर अधिराज्य गाजवणारी लक्ष्मी हि भुमीमाताच आहे. तीला माझे वंदन आसो.
हे लक्ष्मी, आमच्या मनातील सर्व संकल्प सिद्धीस जाओ आम्ही सत्यवचनी होवो, पुष्ट पशु, विपुल अन्न आणि किर्ती आम्हांस (तुझ्या कृपेने) मिळो.
हे कर्दमा, तुझ्या मुळे लक्ष्मी वाढली, तु माझ्या ठीकाणी (शेतात, शिवारांत) उत्त्पन्न हो. त्यामुळे कमलमालाधारी ती लक्ष्मीही माझ्या कुळात वास करो.
पुष्करीणीत रहाणारी, पुष्ट, पिंगट वर्णाची सुवर्णमयी, कमलमालाधारी अश्या चंद्रा लक्ष्मीला मी आवाहन करतो.
सुवर्णकांती, दयाळु, कनकमालाधारी सुवर्णमयी अश्या सुर्यां लक्ष्मीला मी आवाहन करतो.
त्या आवाहनाने आणि (लक्ष्मीच्या) आगमनाने मला सर्व संपत्ती मिळो.
अशी हि लक्ष्मीमाता सर्व मिपाकरांवर प्रसन्न होवो.
प्रतिक्रिया
4 Nov 2010 - 11:42 pm | विकास
लक्ष्मीचे छायाचित्र एकदम सुंदर आहे!
दिवाळीच्या शुभेच्छा!
5 Nov 2010 - 9:06 am | ए.चंद्रशेखर
मूर्तीच्या उजव्या हाताला असलेला सुवर्णदंड आहे की गदा आहे की सिंहासनाचा भाग आहे ते कळत नाही. सिंहासनाचा भाग नसावा कारण मूर्तीच्या डाव्या बाजूला काहीच नाही. लक्ष्मीच्या मूर्तीच्या हातात सुवर्ण दंड किंवा गदा कधी बघितलेली नाही. कोणी वाचक यावर प्रकाश टाकू शकतील का?
लेख उत्तम आहे. शुद्ध लिहिलेल्या मराठीत असता तर वाचायला जास्त आवडला असता.
5 Nov 2010 - 4:36 pm | प्रशु
खुद्द महालक्ष्मीच्याआरतीत तुमच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.
वर्णन खालिल प्रमाणे.
मातृलिंग गदा खेटत रविकिरणी,
झळके हाटकवाटी पियुषरसपाणि,
माणिकरसना सुरंग वसनाम्रुगनयनी,
शशीधर वदना राजस मदनाची जननी ||
हि प्रसिद्ध आरती कोल्हापुरच्या महालक्ष्मीचीच आहे आणी वर दिलेल्या पहिल्या ओळीत 'गदे' चा स्पष्ट उल्लेख आहे.
4 Nov 2010 - 11:50 pm | रेवती
अलक्ष्मीची माहिती नव्हती.
छायाचित्र छान आहे.
लेख आवडला.
5 Nov 2010 - 2:25 pm | रामदास
नश्यताम त्वाम ॠणे अशी काहीशी ओळ आहे.
4 Nov 2010 - 11:55 pm | शुचि
लेख समयोचित आणि प्रसन्न करणारा आहे. खूप खूप छान वाटलं वाचून.
या संस्कृत ओळी
||अथ महालक्ष्मीध्यानम||
धृत्वा श्रीमातुर्लिंगम तदुपरिच गदां खेटकं पानपात्रम|
नागं लिड्गंच योनिम शिरसि धृतवति राजते हेमवर्णा||
आद्या शक्ती स्त्रिरूपा त्रिगुण परिवृता ब्रम्हणो हेतुभूता|
विश्वाद्या सृष्टीकर्ती मन वसतु हृदि सर्वदा सुप्रसन्ना||
__________________________
आणि या मराठी -
चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय जय महालक्ष्मी||
5 Nov 2010 - 12:20 am | अर्धवटराव
वर्णन केल्या प्रमाणे ति लक्ष्मीमाता खरच किती सुंदर दिसते आहे.
सर्व मिपा करांना दिवाळीच्या शुभेच्छा !!
माता लक्ष्मी सर्वांचे कल्याण करो.
(आनंदी) अर्धवटराव
5 Nov 2010 - 2:33 pm | अवलिया
माता लक्ष्मी सर्वांचे कल्याण करो.
(सुरवात माझ्यापासुन करो ;) )
5 Nov 2010 - 7:45 am | मदनबाण
छान... :)
अवांतर :--- देवीचा फोटो मस्त आहे, हा फोटो पीएसडब्ल्यु यांच्या कँलेंडरवरील आहे काय ?
5 Nov 2010 - 8:10 am | प्रशु
हे चित्र आंतरजाला वरुन मिळाले.
5 Nov 2010 - 8:22 am | अविनाशकुलकर्णी
खुप रसाळ लिहिले आहे..छान
5 Nov 2010 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रशु चांगला लेख. भारतीय संस्कृतीने लक्ष्मीला त्याज्य मानलं नाही. लक्ष्मीला आई समजून पूजनीय मानलं आहे. वैदिक ऋषींचे 'श्रीसुक्तम' हे स्तोत्र तर आजच्या दीपोत्सवाच्या दिवशी वाचले जाते.
'' ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णूपत्नी च धीमही........ '' चा श्लोक त्यातलाच आहे. महालक्ष्मीला मी जाणतो (ज्या) विष्णूपत्नीचे ध्यान करतो त्या लक्ष्मीने आमच्या मन-बुद्धीला प्रेरणा द्यावी. असा काहीसा अर्थ असलेल्या वैदिक ऋषींनी लक्ष्मीला जे आवाहन केले आहे त्याप्रमाणेच तुम्ही उत्तम ''आवाहन' केले आहे. थँक्स.....!
-दिलीप बिरुटे
5 Nov 2010 - 8:28 am | प्रशु
अहो मी श्री सुक्ताचाच स्वे॑र मराठी अनुवाद केला आहे.
5 Nov 2010 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>मी श्री सुक्ताचाच स्वे॑र मराठी अनुवाद केला आहे.
माहितीबद्दल धन्यु :)
-दिलीप बिरुटे
5 Nov 2010 - 12:03 pm | विसोबा खेचर
शुभेच्छा..
5 Nov 2010 - 3:45 pm | गांधीवादी
अलक्ष्मीला मिळालेली वागणूक बघून वाईट वाटले. तिचा दोष काय होता हे समजले असते तर बरे झाले असते.
>>ह्या अलक्ष्मी चा निवास हा कचरा, कोळसा, कलह हा होय.
हे कोणी ठरविले ? का ती कुरूप आहे म्हणून दिले कोपर्यात फेकून, असे तर नव्हे ?
आम्हाला सर्व स्त्रिया सारख्या, केवळ चंचल लक्ष्मीच्या मागे धावणे येत नाही, त्यामुळे आज आम्ही लक्ष्मी ची पूजा करताना मनोमन अलक्ष्मीची देखील पूजा करणार. शेवटी 'सागरमंथनातुन जी रत्ने निघाली त्यात तिचाही समावेश होतो' असे असेल तर ते रत्न नक्कीच इतके टाकाऊ नसेल. हे आमचे वैयक्तिक मत.
5 Nov 2010 - 10:32 pm | प्रशु
मुळात चांगला आणि वाईट अशी हि दोन प्रतिकात्मक रुपे असावीत. आणि साधारण पणे जनमानसांचा ओढा हा चांगल्या कडे आसतो. भेसुर दिसणारी व्यक्तीपेक्षा सुंदर दिसणारर्या व्यकींकडे जास्त मन आकर्षले जाते. कदाचीत ह्या मुळे त्या व्यक्ती वर अन्याय देखील होत असेल.
पण तुमचा अलक्ष्मी ला पुजण्याचा अट्टाहास नाही कळला. समुद्रमंथनातुन निघालेली अलक्ष्मी हि एकमेव वाईट गोष्ट नाही त्यातुन हलाहल देखील बाहेर पडले, तुम्ही त्याची हि पुजा करणार का? आळ्स, केर कचरा, अवदशा पुजुन काय लाभ होणार?
6 Nov 2010 - 6:34 am | गांधीवादी
मुळात चांगला आणि वाईट अशी हि दोन प्रतिकात्मक रुपे असावीत. आणि साधारण पणे जनमानसांचा ओढा हा चांगल्या कडे आसतो. भेसुर दिसणारी व्यक्तीपेक्षा सुंदर दिसणारर्या व्यकींकडे जास्त मन आकर्षले जाते. कदाचीत ह्या मुळे त्या व्यक्ती वर अन्याय देखील होत असेल.
असाच काहीतरी अलक्ष्मी बद्दल झाले असेल असे वाटले. पुराणातील काही जास्त माहित नाही, पण हलाहल हा एक 'वस्तू' होती आणि अलक्ष्मी एक 'व्यक्ती'. अलक्ष्मी कुरूप म्हणून आळ्स, केर कचरा, अवदशा असे देवांनी ठरविले. सौदर्य म्हणजे पावित्र्य आणि कुरूपता म्हणजे दळीद्री, हे गणित तेव्हापासून तर पडले नसेल कशावरून ? लक्ष्मी ने सुद्धा (हलाहल पचविणाऱ्या) शंकराला सोडून देखण्या विष्णूलाच पसंत केले हे बघून सौंदर्य आणि कुरूपता यांचा मनावर किती जबरी पगडा असतो हे बघून दुख: वाटले.
बाकी आळ्स, केर कचरा, अवदशा यांना पूजण्याची इच्छा आणि अट्टाहास तर अजिबात नाही.
5 Nov 2010 - 4:13 pm | सूड
पण अर्धंच वाटतंय, पुढे 'पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि' असंही काहीसं आहे ना !! त्याचा अनुवाद दिसत नाहीये. (का मला काहीतरी वेगळं आठवतंय )
बाकी देवीचा फोटो झकास.
5 Nov 2010 - 4:41 pm | प्रशु
तो भाग फलश्रुतीचा आहे, मुळ श्री सुक्त १५ कडव्यांचेच आहे. म्हणुन मी ते नाही लिहिले. पण तो भाग ही सुंदर आहे.
5 Nov 2010 - 6:53 pm | मेघवेडा
लिहा की! आवडेल वाचायला.
छान आहे अनुवाद. चित्रही सुंदरच. :)
5 Nov 2010 - 11:19 pm | प्रशु
कमलाप्रमाणे मुखनेत्रादी अवयव असणारी आणि कमळात जन्मलेली तु माझ्या सानिध्यात राहुन मला सो॑ख्य दे..
अश्व, गायी आणि धन देणारी तु स्वतःच एक मोठे धन आहेस. ते धन मला देऊन माझ्या सर्व ईच्छा पुर्ण कर..
हे पद्मीनी तु ह्या विश्वाची प्रिय आहेस, तुझे चरणसानिध्य मला लाभो..
पुत्र, पो॑त्र, धन, धान्य, गज, अश्व, गोधन, रथ हे देणार्या लोकमाता तु मला दिर्घायु कर..
अग्नी, वायु, सुर्य, वसु, ईन्द्र, गुरु, वरुण हे सर्व धनच आहेत व त्यांचा मला लाभ होओ...
गरुड इंद्राने सोमरस प्यावा आणि देवांसाठी धन असलेला तो सोमरस मला देवांकडुन प्राप्त व्हावा..
श्रीसुक्त पठण करणार्याच्या ठायी क्रोध, मत्सर, लोभ, दुष्टता उत्पन्न होत नाहित, म्हणुन त्याचे पठण करावे..
हे कोमले, कमले, शुभ्रवस्त्रधारिणी , गळयात सुगंधी पुष्पांच्या माला धारण करणारी हे भाग्यशालीनी सुंदरी तु हरीप्रिया आहेस. त्रिभुवनाला वे॑भवशाली करणार्या माते मला प्रसन्न हो...
विष्णुपत्नी, क्षमा, माधवाची प्रिया अश्या त्या लक्ष्मीला मी नमन करतो..
महालक्ष्मीला आम्ही जाणतो, विष्णुपत्नीचे आम्ही ध्यान करतो, ती लक्ष्मी आम्हांस प्रेरणादायी होओ.
6 Nov 2010 - 12:35 am | शुचि
भले शाब्बास! मस्त :)
मेवे यांचे आभार त्यांच्या निमित्ताने हा भाग वाचायला मिळाला. प्रशु यांचे आभार तर आहेतच.
7 Nov 2010 - 2:39 pm | स्पंदना
आज बसुन अगदी मन लावुन वाचला.
विचारणा केल्या बरोबर पुढचा भाग ही दिल्या बद्दल धन्स, प्रशु. अतिशय समयोचित अन सुरेख लेख.