राम राम मिपाकरहो,
कृपया यूट्यूबवरील हा दुवा पाहा. यात एक सुंदर गाणं आहे, त्या गाण्याबदल मी दोन शब्द लिहिणार आहे! काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर थोरल्या माधवरावांवरची 'स्वामी' ही मालिका दाखवली होती, त्यातल्या एका भागात हे नितांतसुंदर गाणं होतं. गेले अनेक दिवस मी या गाण्याच्या शोधात होतो. आज जालावर मुशाफिरी करताना अचानक यूट्यूबवर स्वामी मालिकेचा हा भाग आणि हे गाणं कानी पडलं व विलक्षण सांगितिक तृप्ती अनुभवली. तिच इथे आपल्यापुढे मांडायचा एक छोटेखानी प्रयत्न करत आहे. या गाण्याचे शब्द व संगीत सुधीर मोघे यांचे आहे व सुचित्रा बर्वेने हे गाणं खूप सुंदर गायलं आहे. या गाण्याचं चित्रिकरणही फार सुरेख आहे. माधवरावांच्या भूमिकेत रविंद्र मंकणी व रमाबाईंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहेत.
थोरले माधवराव पेशवे. अवघ्या अठ्ठावीस वर्षाचं आयुष्य! एक अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. थोरल्या आबासाहेबांचं राज्य केव़ळ एका विश्वस्ताच्या भावनेनं सांभाळणारा, मोठं करणारा! परंतु ही झाली माधवरावांची राजकीय बाजू. तिच्याबद्दल अधिक काही बोलण्यास मी कुणी इतिहासतज्ञ नव्हे! मी बोलणार आहे ते माधवराव व रमाबाई यांच्याबद्दल! एका पतीपत्नीबद्दल! असं कितीसं आयुष्य लाभलं हो माधवरावांना? त्यात पुन्हा राज्याची जबाबदारी! मृत्युने ऐन तारुण्यात घाला घातला माधवरावांवर. अहो खुद्द मराठी दौलतीलाच जिथे माधवराव हवेहवेसे असताना पुरले नाहीत तिथे ते रमाबाईच्या वाट्याला तरी कितीसे आले असतील?
कधी नव्हे ते निवांतपणाचे दोन क्षण माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मिळाले आहेत, ही या गाण्याच्या चित्रिकरणाची पार्श्वभूमी आहे. या गाण्याच्या रुपाने एका प्रियकरप्रेयसीतलं, एका पतीपत्नीतलं मनोगत अतिशय सुंदरपणे आपल्यासमोर येतं!
माझे मन तुझे झाले,
तुझे मन झाले!
माझे प्राण तुझे प्राण
उरले ना वेगळाले!
मला लागे तुझी आस,
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहिकडे
माझे तुझे होती भास!
माझ्यातून तू वाहसि,
तुझ्यातही मी पाहसि
तुझ्यामाझ्यातले सारे
गूज माझ्यातुझ्यापाशी!
तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन, तुझे मन!
क्या केहेने! केवढी विलक्षण इंन्टेन्सिटी आहे या गाण्यामध्ये! खरंच मंडळी, हे गाणं खूप आत आत जातं. अक्षरश: भिडतं!
हे गाणं म्हणजे एक मूक संवाद आहे. एका पतीपत्नीतलं गूज आहे हे!
एक ओढ! एक विश्वास! एक प्रेम!
असं प्रेम की जे बोलून व्यक्त करता येत नाही! "हाय.. आय लव्ह यू..!" अशी फिल्मी आरोळी ठोकली म्हणजेच प्रेम व्यक्त होतं असं नव्हे! उलट प्रेम तर बर्याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!
खरं तर हे गाणं नव्हेच! पुरियाधनाश्री रागातली ही एक विराणीच आहे. हो, विराणीच ती! एक भगवी वस्त्र नेसलेली स्त्री हातात एकतारी घेऊन ही विराणी गाते आहे असं दाखवलं आहे.
राग पुरियाधनाश्री!
मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा.
मंडळी, पुरियाधनाश्रीतलं हे गाणं म्हणजे केवळ एका प्रियकराचं आणि प्रेयसीचं बागेतलं गाणं नव्हे! माधवरावांच्या ऐन तारुण्यात जाण्याने रमामाधवाचं सहजीवन, त्यांच्यातला प्रेमसंवाद अपुराच राहिला. अतृप्तीच राहिली. मंडळी, अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं!
मंडळी, वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चांगलं गाणं हे बर्याचदा वेदनेपोटीच जन्माला येतं! आणि त्यातूनच पुरियाधनाश्रीतली ही विराणीही जन्म घेते व जीवाला चटका लावून जाते!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
21 May 2008 - 9:13 pm | ऍडीजोशी (not verified)
तात्या आपले आभार कसे मानू हे कळत नाहिये. मी सुद्ध हे गाणं कधी पासून शोधत होतो. पुन्हा एकदा धन्यवाद.
अक्षरश: भिडतं
उलट प्रेम तर बर्याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!
१०००००% सहमत
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
21 May 2008 - 9:15 pm | वाटाड्या...
वाह, तात्या...
आज बर्याच दिवसांनी संगिताच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. पुरियाधनश्री मध्ये इतकी आर्तता दुसर्या कुठल्या रागात क्वचीतच आढळते. फारच छान राग. शब्द भिडतात ह्या गाण्याचे...
असेच संगीत विषयक रागदारी लेख येऊ द्यात हीच विनंती.
आपला,
मुकुल
21 May 2008 - 9:17 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम. तुझे वेदनेवरचे भाष्य पण खरे आहे. जगातील बहुतेक सर्व महान साहित्यकृति ह्या वेदनेतूनच जन्माला आल्या आहेत किंवा परिणत झाल्या आहेत. रामायण हे क्रौंच युगुलाच्या वेदनेने प्रेरित झाले तर महाभारतामध्ये सुद्धा जगातील काही महानतम वेदनादायक घटना आहेत. अभिजात प्राचीन ग्रीक साहित्य तर 'ट्रॅजेडी' साठीच प्रसिद्ध आहे.
दुव्या साठी धन्यवाद.
(मृणाल कुलकर्णीचा फॅन) बिपिन.
अवांतरः 'दुव्या साठी' की 'दुव्यासाठी' :D
21 May 2008 - 9:41 pm | मानस
फारच सुरेख, इतक्या हळुवारपणे या गाण्याचं विश्लेषण केलं आहे ..........
गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद.
21 May 2008 - 9:48 pm | ईश्वरी
फारच छान लिहीलंत तात्या. गाण्याचं विश्लेषण समर्पक शब्दात केले आहे.
या निमित्ताने 'स्वामी ' मालिकेची आठवण जागी झाली. त्याकाळची माझी आवडती मालिका होती
गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद.
-- हेच म्हणते मी
ईश्वरी
21 May 2008 - 9:55 pm | यशोधरा
तात्या, छानच लिहिलय. आवडलं.
21 May 2008 - 10:12 pm | वरदा
तात्या मस्तच लिहिलय्... हे गाणं मलाही खूप आवडतं....छान वाटलं एकदम...
21 May 2008 - 10:22 pm | प्रभाकर पेठकर
गाण्यातील व्याकरण समजले नाही तरी गोडवा जाणवतो. स्वामी ही एक उत्कट मालीका होती. रविंद्र मांकणींचा कसदार अभिनय, मृणाल कुळकर्णींची लावण्यवती रमा, राघोबादादांमधील 'राघोबत्व' ह्या सर्व जमेच्या बाजूंनी 'स्वामी' अजरामर झाले.
धन्यवाद तात्या.
21 May 2008 - 10:26 pm | मन
मनापासुन आवडला.
आपलाच,
मनोबा
22 May 2008 - 12:30 am | भाग्यश्री
स्वामी आवडती कादंबरी,मालिका त्यामुळे लेख खूपच आवडला... :)
22 May 2008 - 12:34 am | विसोबा खेचर
यावरून थोरले आबासाहेब व सईबाईसाहेबांचा विचार मनात येतो!
सईबाई ही थोरल्या आबासाहेबांची अत्यंत लाडकी! परंतु थोरले आबासाहेब सतत मोहिमेवर! त्यातच सईबाईंचे निधनही फार लवकरच झाले. त्यामुळे त्याही थोरल्या आबासाहेबांना फारश्या लाभल्या नाहीत!
थोरल्या आबासाहेबांची राजकीय कारकीर्द तर तुम्हाआम्हाला तोंडपाठ आहे. परंतु सईबाईच्या निधनामुळे तो पहाड मनातल्या मनात किती ढासळला असेल, आतल्या आत किती दु:खी झाला असेल हे तुम्हाआम्हाला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही!
अजून एक पुरियाधनाश्री! दुसरं काय?!
आपला,
(थोरल्या आबासाहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या.
23 Mar 2010 - 12:19 am | प्रशु
तात्या टचकन डोळ्यात पाणी ऊभं केलत. ह्या असामान्य लोकांच्या खाजगी आयुष्यात ह्या अश्या घटना नेहमी आढळतात...
22 May 2008 - 12:57 am | प्रियाली
हे शीर्षक गीत आणि स्वामी मालिका डोक्यात फिट्ट आहेत परंतु वरील गाणे विस्मृतीत गेले होते.
तात्या लेख आवडला आणि स्वामी मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या.
22 May 2008 - 10:32 am | ऍडीजोशी (not verified)
जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो हे गाणं कुठे मिळू शकेल का? किमान लिरीक्स???
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
25 Nov 2010 - 7:28 am | अर्धवटराव
जो जनतेचे रक्षण करितो... पोषण करितो... पालन करितो...
तोच पीता... साक्षात मानावा... जन्म दे तो.. निमित्त केवळ.
अर्धवटराव
22 May 2008 - 1:02 am | चित्रा
गाणे, आणि आठवणी.
धन्यवाद, तात्या.
22 May 2008 - 1:32 am | विकास
शिर्षक गीत (जो जनतेचे..) आणि अंतीम गीत (माझे मन...) दोन्ही डोक्यात बसलेली गाणी.
पुरीयाधनश्रीच्या माहीतीबद्दल धन्यवाद!
>>>ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं!
छान विश्लेषण. १००% पटले.
________
या गाण्या संदर्भात अजून एक आठवत असलेला भागः स्वामी मालीका चालू असताना अथवा त्याच सुमारास राजस्थान मधील रूपकंवरच्या सतीचा किस्सा घडला होता. आणि त्यावर स्वाभावीक आरडाओरडा चालू होता. त्यात स्वामी नाटकाचा शेवट हा रमाबाईंच्या सती जाण्याने असल्यामुळे काही संघटना ते दाखवायला अथवा त्याचा उल्लेख करायला विरोध करत होत्या. तो भाग न सांगणे म्हणजे कादंबरी आणि इतिहासावर अन्याय असे इतरांचे म्हणणे. त्यातून कल्पकता दाखवून या गाण्याचा उपयोग केला गेला होता. स्वामी कादंबरीत माधवरावांच्या निधनाच्या वेळचे जे हेलावून टाकनारे वर्णन आहे, ते चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. अर्थातच हा प्रसंग फिल्मी नसला तरी भावनात्मक नक्कीच झाला आणि म्हणूनच दिग्दर्शकाच्या (आणि माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या) दृष्टीने यशस्वीपण ठरला.
त्यामुळे दोन आत्मे एकमेकात विलीन होत असताना ते, ते एकमेकांना संबोधून आणि जोगीण तेच गाणे ईश्वराला संबोधून म्हणत संसारापासून लांब जात आहे असा "सटल" अर्थ त्यातून ध्वनीत केला गेला आणि रमाबाई सती गेली, कशी गेली, त्याला प्रोत्साहन दिले का नाही इत्यादी प्रश्न दूर राहीले!
22 May 2008 - 6:11 am | विसोबा खेचर
चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती.
विकासराव, आपली आठवण अगदी बरोबर आहे. ती जोगिण हे गाणं गात आहे आणि या गाण्याच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी आकाशात उडत गेलेले दाखवत या मालिकेचा अतिशय सुंदर व टचिंग शेवट साधला होता...
तात्या.
25 Nov 2010 - 7:49 am | ए.चंद्रशेखर
श्री. विकास यांनी सांगितलेली आठवण अगदी बरोबर आहे. स्वामी मालिकेचे जे चित्रीकरण प्रथम झाले होते त्यात रमाबाई सती जाते असा प्रसंग शेवटच्या भागात होता. त्याच सुमारास राजस्थानमधे रूपकुंवर ही महिला सती गेली व त्यावरून प्रचंड वादळ उठले. सतीच्या प्रथेचे कोणत्याही प्रकाराने गौरवीकरण माध्यमातून केले जाऊ नये असा योग्य निर्णय त्यावेळी सरकारने घेतला. मूळ कथेतील गंभीरता तर टिकली पाहिजे पण सती जाणे या परंपरेचा साधा उल्लेखही होता कामा नये या कात्रीत सापडलेले मालिकेचे लेखक व दिग्दर्शक यांनी हे गाणे वापरून या मालिकेची हृदयाला भिड्णारी समाप्ती केली होती.
22 May 2008 - 5:58 am | शितल
तात्या,
गाणे ऐकुन खुप छान वाटले.
स्वामी का॑दबरी वाचली पण सिरीअल पाहिली नाही एकाचित बाल्य अवस्थेत असु त्यावेळी.
22 May 2008 - 8:10 am | डॉ.प्रसाद दाढे
'स्वामी' काद॑बरी म्हणजे एक साहित्यलेण॑च आहे.. सुदैवाने त्यावर आधारित मालिकाही चा॑गली झाली होती. गजानन जागीरदारा॑सारखे अनुभवी दिग्दर्शक आणि श्रीका॑त मोघे॑सारखे कल्पक निर्माते लाभल्यामुळे मालिका जमली. सगळी पात्रे काद॑बरी वाचता॑ना जशी इमॅजिन केली होती तशीच होती. माधवराव- रवि॑द्र म॑कणी, रमाबाई- मृणाल देव, गोपिकाबाई- दया डो॑गरे, राघोबा- श्रीका॑त मोघे, सखारामबापू- सुधीर दळवी, त्र्य॑बकमामा पेठे- रवि पटवर्धन, ग॑गोबातात्या- बाळ कर्वे, श्रीपती- उदय टिकेकर, विसाजीप॑त लेले- अन॑त जोग, मल्हाररा॑व होळकर- सूर्यका॑त, रामशास्त्री- अभ्य॑कर (नाव विसरलो) अशी सॉलिड स्टारकास्ट होती.
स्वामीचे चित्रिकरण पुण्यातल्या विश्रामबागवाड्यात झाले होते.
मस्त लिहिले आहेत तात्या.. पुरिया धनश्रीतल्या 'पायलिया झनकार..' ची रम्य आठवण झाली. हाच राग ए.आर. रहमानने 'हाये रामा ये क्या हुआ' (र॑गीला) या गाण्यात मस्त वापरला आहे.
22 May 2008 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या,
गाण्याचं विश्लेषण मस्त केले आहे, लेखन आवडले.
पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग!
क्या बात है !!! पुरियाधनाश्रीची ओळख आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
22 May 2008 - 10:43 am | आनंदयात्री
सुंदर लेख तात्या, स्वामी मालिका आठवत नाही निटशी :( , लहान असुत तेव्हा बहुदा. पण कादंबरी अत्युत्कृष्ट. त्या अनुंषंगाने दिलेले गाण्याचे विवेचन आवडले.
22 May 2008 - 11:13 am | मनिष
व्हीडीओ मोठा आहे, सवडीने बघतो, पुरियाधनाश्रीची सुरावट कशी असते?
22 May 2008 - 2:23 pm | भडकमकर मास्तर
हाय रामा ये क्या हुआ रंगीला
रुत आ गयी रे १९४७ - अर्थ
लबोंसे चूम लो, आंखोंसे थाम लो मुझको आस्था
कितने दिनोंके बाद है आयी ,सजना रात मिलनकी..." आये मिलन की रात
रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...)
अहाहा आत्ता सगळी गाणी जमेल तशी वाजवून पाहत आहे...
मजाय हं यात....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
22 May 2008 - 4:29 pm | डॉ.प्रसाद दाढे
रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...)
गझल.. स॑गीत मदनमोहन नामक एक शापित यक्ष.. मनाला विव्हल करणारे अप्रतिम गाणे रफीसाहेबा॑च्या स्वर्गीय सु॑दर आवाजात सुनील दत्तने पडद्यावर साकार केले आहे. त्याच चित्रपटातले 'नगमा और शेर कि' हेही गाणे असेच सैरभैर करणारे आहे..
(मदन मोहनचा वेडा) प्रसाद
22 May 2008 - 11:41 am | मनस्वी
तात्या
स्वामी मालिकेच्या वेळेस लहान असल्याने गाण्यातला मर्म कळलाच नाही.
दुवा दिल्याबद्दल शतशः आभार.
तुमचे विश्लेषण सुरेख!
गाणे खरोखरीच भिडते!
22 May 2008 - 11:49 am | प्राजु
तात्या,
खरंच प्रेम हे मुकंच असतं. समजून घेणार्याला ते कळलं तर प्रेम करणारा नशिबवान असतो...
अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
एकदम पटलं.
वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही!
हे अगदी खरंय.
अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे गाण्याचं. मालिका थोडिफारच आठवते. पण कादंबरीची पारायणं केली आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 May 2008 - 11:57 am | ऋचा
सुंदर लेख
22 May 2008 - 1:37 pm | स्वाती राजेश
सुंदर गाणे....
छान आठवणी स्वामी मालिकेच्या च्या....
अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
मस्त ओळी.....
22 May 2008 - 1:53 pm | कलंत्री
तात्यांनी अगदी भारावुन लिहिल्यामूळे सर्वच लिखाण मनाला भिडते.
माधवारावांचा गुणग्राहकत्व मनालाही प्रत्यक्ष इतिहास वाचताना मनाला भिडते. सखारामबापू हे साडेतिन शहाण्या पैकी एक. दुर्दैवाने त्यांचे आणि माधवरावांचे पटले नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नागपूरचे भोसले माधवरावांच्या विरुद्ध आणि त्यांनी लढ्यासाठी पुण्याकडे प्रयाण केले अशी पार्श्वभूमी, माधवरावांना हा लढा नको होता त्याचबरोबर हा टाळता येणार नाही हेही समजले होते.
अश्या पार्श्वभूमीवर भोसल्यांचा वकिल सखारामबापू बोकिल यांना भेटण्याची अनुमती मागतो. माधवराव परवानगी देतात. बापू आणि वकिल २ तास एकत्र बसतात आणि संवादा शिवाय बैठक संपते. माधवराव हेराला विचारतात काय वार्ता झाली काय? तो म्हणतो काहीच बोलणे झाले नाही, फक्त एकदा बुद्धिबळाचा खेळ चालु असतांना बापू बोलले की राजा दोन घरे मागे घ्या.
८/१० दिवसांनतर कळते की भोसल्यांचे सैन्य माघारी गेले आहे.
माधवराव बापुंना चांदीचा बुध्दिबळाचा संच भेट म्हणून पाठवतात.
मराठ्यांच्या राजकारणातील हा परमोच्च बिंदु असावा.
इतिहास तज्ज्ञ आणि विष्लेषक ( १/२ शहाणा) कलंत्री
22 May 2008 - 2:34 pm | भडकमकर मास्तर
स्वामी मालिका फारच छान होती... ते शेवटचे गाणे आत्ता आठवत नव्हते... लिन्क पाहिली....
खूप छान...
मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा. ...जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
वाह तात्या...काय एकेका रागात साली ताकद असते...
उत्तम लेख... मजा आली....
........ अवांतर : आम्हाला मारवा रागाने सुद्धा सालं असंच भकास, अतृप्त, सैरभैर आणि बेचैन वाटतं.... ( पुरिया मारवा थाटातलाच का? )
तुम्ही अजून वेगवेगळ्या रागांबद्दल असंच लिहा..
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
23 May 2008 - 12:38 am | चतुरंग
मस्त. हे गाणं मी विसरुन गेलो होतो पण तुमच्या लेखाने पुन्हा ते ऐकण्याचा आनंद दिलात.
अप्रतिम काव्य, तेवढीच उत्तम चाल आणि सुरेल आवाज! क्या बात है! 'पूरियाधनश्री' ने हेलावून जायला होतं.
धन्यवाद तात्या.
(स्वगत - 'बसंतच्या' लग्नाचा समारंभ पुढे कधी सुरु होणार? :W :? )
चतुरंग
23 May 2008 - 12:45 am | ऋषिकेश
वा तात्या वा!.. लेख फार आवडला. मालिका नीट आठवत नाहि पण कादंबरी मात्र सुंदर आहे.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
23 May 2008 - 11:27 pm | llपुण्याचे पेशवेll
यू ट्यूब वर संपूर्ण मालिका उपलब्ध आहे.
पुण्याचे पेशवे
23 May 2008 - 8:44 am | विसोबा खेचर
प्रतिसाद देणार्या सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार...
आपला,
(कृतज्ञ) तात्या.
23 May 2008 - 12:48 pm | मदनबाण
तात्या दुव्याबद्दल आभार.....
लेख मला फार आवडला.
गाण अजुन गुणगुणतो आहे......
खरचं मनाला चटका लागावा असचं हे गाण आहे.
मदनबाण.....
23 May 2008 - 5:32 pm | सखी
अप्रतिम लेख झाला आहे. खरच ह्या गाण्याचे शब्द, सुर, गायिकेचा भावपूर्ण आवाज, दिग्दर्शन आणि कलाकारांचा साधा अभिनय सगळच सुरेख! मी ही हे गाणे खूप दिवस शोधत होते, निदान नुसते ऐकायला तरी मिळेल म्हणुन, पण त्याबरोबर व्हिडीओ दुवा आणि तुमचा अप्रतिम लेखही मिळाला म्हणजे दुग्धशर्करा योग! धन्यवाद!
23 May 2008 - 6:20 pm | स्वाती दिनेश
तात्या,लेख सुंदर झाला आहे,सुरुवातीचे गाणे..जो जनतेचे रक्षण करतो.. आणि माझे मन.. दोन्ही गाणी आणि स्वामी मालिकेची आठवण करून दिलीस.
स्वाती
20 Mar 2010 - 12:45 am | शुचि
>>उलट प्रेम तर बर्याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!>>
खूप दिवसांनी मनमोकळं रडले..... कचेरीत असूनही स्वतःला लपवून रडले.
इतकं सुंदर, इतकं सुंदर कोणी लिहू शकतं सहजीवनाबद्दल? किती हळूवार .... किती किती सुरेख.
विश्वास .... सहजीवनाचा पाया!!!
तात्या मला फार अवडला हा लेख .... माझी पहीली -वहीली वाचन-खूण भलतीच गोजीरवाणी निघाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
20 Mar 2010 - 1:02 am | अरुंधती
अतिशय सुरेख गाणे, मनाला भिडणारे शब्द आणि पूरियाधनश्री!
शिवाय ज्यांच्यावर हे गाणं बेतलंय ती रमामाधवासारखी मनाला हुरहूर लावणारी जोडी!
त्या सुरांत जी डोळ्यांत टचकन पाणी आणण्याची ताकद आहे त्यांचे वर्णन काय करावे? केवळ अप्रतिम!
धन्यवाद तात्या, इतक्या सुंदर गाण्याची अशी हळूवार आठवण करून दिल्याबद्दल!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
20 Mar 2010 - 1:53 am | sur_nair
अतिशय सुरेख राग आणि तितकंच सुंदर गाणं. मला 'मालवून टाक दीप' ऐकताना सुद्धा नेहमी असंच एखादं महालातलं राजेशाही तरुण जोडपं डोळ्यासमोर येतं. का कोण जाणे पण या रागांच्या स्वरांनाच ( कोमल रिषभ, तीव्र मध्यम, शुद्ध निषाद ) असं काही खानदानी वजन आहे असं वाटतं.
20 Mar 2010 - 2:48 am | अर्धवटराव
तात्या,
तुमचे असे लेख वाचुन माझे सांगीतीक ज्ञान नक्की वाढणार !
आता मी श्रीमंत होणार :)
(प्रसन्न) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
21 Mar 2010 - 2:45 pm | शशिकांत ओक
तात्या, अगदी भारावून टाकणारे लिखाण.
संगीत व इतिहास आपले हातखंडा विषय मग काय बहारच बहार.
आणखी येऊ द्या हो. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
21 Mar 2010 - 4:42 pm | डावखुरा
निशब्द!!
"राजे!"
21 Mar 2010 - 9:40 pm | नितिन थत्ते
तात्या विंग कमांडरांना आणखी येऊद्या म्हणणार आणि विंग कमांडर तात्यांना.
त्यातलं तात्यांना येऊद्या म्हणणं मान्यच.
नितिन थत्ते
21 Mar 2010 - 11:08 pm | पिंगू
राग काय कळत न्हाय बुवा!!!!!! हे गाणे मात्र सुरेख आणि मनाला भिडणारे ह्यात तिळमात्रही शंका नाही......
22 Mar 2010 - 8:48 am | सायबा
लेख खूप आवडला व मी भूतकाळात गेलो!
संगीताबद्दल असेच लिहीत जा!
सायबा
22 Mar 2010 - 11:01 am | समंजस
मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि तशीच चाल, गायन @)
शब्दांना पुर्ण गुण द्यावेत की गायनाला ? काही कळत नाही :?
पहिल्यांदा मालिका बघीतली तेव्हा हे गाणं एवढं काही कळलं नाही(कदाचीत वयामुळे :) )
पण आता हे गाणं परत ऐकून, जी काही अवस्था झालीय ती शब्दात नाही सांगता येणार :<
धन्यवाद तात्या!