टु बी ऑर नॉट टु बी
१९३९ सालातला पोलंड, नाझी आक्रमण, वॉर्सॉमधले चळवळ करणारे देशप्रेमी नागरिक, गेस्टापो अधिकारी, नाझी गुप्तहेर, वॉर्सॉमधून इंग्लंडला पळून जायच्या प्रयत्नात असलेले ज्यू नागरिक या सार्या गोष्टी घेऊन एक धमाल विनोदी सिनेमा बनवता येईल का? तर या प्रश्नाचं उत्तर "हो" असं आहे.
तर ही गोष्ट आहे वॉर्सामधल्या सुप्रसिद्ध "ब्रॉन्स्की थिएटर्स" या नाटक कंपनीची. ही कंपनी चालवतात फ़्रेडरिक ब्रॉन्स्की आणि आना ब्रॉन्स्की.( मेल ब्रूक्स आणि ऍन बॅन्क्रॉफ़्ट) हा फ़्रेडरिक स्वत:ला उत्तम नट समजतो ( वर्ल्ड फ़ेमस इन पोलंड). सिनेमाच्या सुरुवातीला जर्मन आक्रमण होणार अशी शक्यता असताना वॉर्सामध्ये हा हिटलरची यथेच्छ टिंगल करणारं " नॉटी नाझीज" नावाचं नाटक करत असतो.मग जर्मन आक्रमण होते आणि नाटक कंपनी बंद पडते. गेस्टापो अधिकारी ब्रॉन्स्कींचा बंगला व्यापतात आणि त्यांना हुसकावून लावून तिथे गेस्टापो हेडक्वार्टर करतात. चित्रपटात एक प्रोफ़ेसर सेलिट्स्की नावाचा नाझी गुप्तहेर आहे, ज्याच्याकडे पोलिश भूमिगत चळवळीतल्या कार्यकर्त्यांची मोठी लिस्ट असते जी तो गेस्टापोंना देणार असतो. ही लिस्ट काहीही झालं तरी नाझींच्या हाती लागू न देणं महत्त्वाचं असतं. इथून सुरू होते धमाल... ती लिस्ट परत मिळवण्यासाठी मग ब्रॉन्स्की थिएटर्सचे हे कसलेले (!) नट एकामागोमाग एक विविध भूमिका वठवतात. या सार्या गोष्टीला मध्ये आनाच्या एका पोलीश हवाईदलातल्या सोबिन्स्की नावाच्या तरूण अधिकार्याशी प्रेमप्रकरणाची गंमतशीर फ़ोडणी आहे. प्रचंड गोंधळ त्यातच ब्रॉन्स्की थिएटर्सचे नाटक पाहण्यासाठी हिटलर येणार अशी खबर येते. पुढे ही सारी टीम थिएटरमध्ये लपलेल्या ज्यू मंडळींसह इंग्लंडला पळून जाण्यात कशी यशस्वी होते ते पाहण्यासारखे आहे.
हा सिनेमा खास पहायचा मेल ब्रूक्स साठी... तुम्ही त्याचे फ़ॅन नसाल तर पाहून नक्की व्हाल. एक आत्ममग्न स्वत:ला महान समजणारा नट त्याने कसला उच्च रंगवलाय. स्टेजवर त्याचा ओवरऎक्टिंग करत "टु बी ऑर नॉट टु बी" म्हणणारा हॅम्लेट पाहून जाम हसू येते.एर्हार्ड्ट,सेलिट्स्की, हिटलर अशी विविध सोंगं घेणे, ऐन सोंग चालू असताना बायकोच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळल्यानंतर चिडचिड आणि सोंग फ़सल्यावर त्रेधातिरपीट उडणे, कधी त्यातून अक्कल चालवून मार्ग काढणे हे सारं त्यानं झकास दाखवलंय.
हा सिनेमा नाटकासारखा आहे, आउटडोअर दृश्ये नसल्यातच जमा.ही एक अप्रतिम ब्लॅक कॉमेडी आहे. आपण वरवर हसत असतो पण एकूण हे सारं हसण्यासारखं नाही, हेही जाणवत राहतं. काही क्षण तर गंभीर करतातच...ब्रॉन्स्कीचं एक वाक्य आठवतं,---" पोलंड म्हणजे युरोपच्या पायपुसण्यासारखा आहे, कोणीही यावं आणि लाथाडून जावं..."; आनाचा समलिंगी ड्रेसर जो गुलाबी त्रिकोणी रुमाल खिशात अडकवून बाहेर पडतो आणि नंतर त्याला अटक होते , किंवा शेवटी स्टेजवरचे ज्यू जोडपे समोरचे प्रचंड नाझी लष्करी अधिकारी पाहून घाबरून काही क्षण स्तब्ध उभे राहते हे लक्षात राहणारे काही प्रसंग.
हे खरंतर सांगण्याची गरज भासू नये पण राहवत नाही म्हणून सांगतो.या सिनेमाची ओळख करून देताना एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की अशा गंभीर विषयाची फ़ार्सिकल पद्धतीने हाताळणी केलेली पाहताना काहींना थोडं विचित्र वाटायची शक्यता आहे. एकदा फ़ार्सिकल कॉमेडी हा जॉनर लक्षात घेतला की तसं वाटायचे कारण नाही असे मला वाटते. शिवाय "गेस्टापो अधिकारी इतके मठ्ठ होते का" किंवा " अमुकने तमुकला ओळखले कसे नाही" वगैरे प्रश्न अर्थातच दूर ठेवायचे आणि धमाल पहायची इतकेच म्हणतो ....
हा सिनेमा मी दहा बारा वर्षांपूर्वी पहिल्यांदा स्टार मूवीजवर पाहिला, तेव्हा याचं नाव माहित नव्हतं. एकदोन वर्षांपूर्वी झी स्टुडिओवर सिनेमा पुन्हा दाखवला गेला तेव्हा अनेकदा पाहिला. "मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी" नावाचं परेश मोकाशी लिखित दिग्दर्शित नाटक कोणी पाहिलं असेल तर "टु बी ऑर नॉट टु बी "हा सिनेमा आठवल्याशिवाय राहणार नाही. (त्या नाटकातही १९४२ सालातली कोकणातली नाटक कंपनी, भूमिगत चळवळ करणारे कार्यकर्ते, ब्रिटिश अधिकारी, सुप्रसिद्ध दाढीचा सीन, हिटलरचे आगमन अशी धमाल होती)... आणि गेल्या वर्षी आलेला " मान गये मुगल - ए - आजम" नावाचा अत्यंत वाईट आणि फ़सलेला सिनेमा आला होता तोही "टु बी ऑर नॉट टु बी " चा रीमेक होता. त्यात त्यांनी "अंडरवर्ल्डचा भाई" वगैरे गोष्टी वापरल्या त्या अजिबात जमल्या नाहीत.. प्रयत्न करूनही मी तो सिनेमा पूर्ण पाहू शकलो नाही.
आता जालावर सिनेमा शोधणार्या लोकांसाठी माहिती... मी म्हणतोय तो मेल ब्रूक्सचा सिनेमा आला १९८३ मध्ये. हा सिनेमाही होता १९४२ मध्ये आलेल्या त्याच नावाच्या सिनेमाचा रीमेक. १९४२ च्या सिनेमामुळे प्रथमच नाझी अत्याचाराची, पोलंडमधल्या ज्यू आणि समलिंगी लोकांच्या डिस्क्रिमीनेशनची ओळख हॉलीवूडला झाली. ( तोही असाच्या असा आहे, किंवा योग्य वाक्य असे की नवा सिनेमा जुन्यासारखाच आहे. मी जुनाही पाहिला पण मला फ़ारशी मजा आली नाही.. मी शिफ़ारस करेन ती १९८३ च्या मेल ब्रूक्सवाल्या टु बी ऑर नॉट टु बी ची). १९८३ च्या सिनेमामध्ये पोलंडमधल्या गेस्टापो चीफ़ची ( कॉन्सन्ट्रेशन कॅम्प एर्हार्ड्ट) भूमिका करणार्या चार्ल्स डर्निन्गला ऑस्कर नॉमिनेशन होतं.
हा सिनेमा तूनळीवर पूर्ण उपलब्ध आहे...http://www.youtube.com/watch?v=0s_vXZO2uUo&feature=related
( आणि डाउनलोड केलातच तर माझ्यासारख्या इंग्रजी उच्चार उशीरा कळणार्यांसाठी सांगतो, की सार्या संवादांची मजा घ्यायची असेल तर इंग्रजी सबटायटलसह उतरवून घ्या. एकएक वाक्य धमाल आहे)
नुकताच "कातिन" पाहिला असाल तर हा सिनेमा त्यावर परफ़ेक्ट ऍन्टीडोट आहे असे म्हणेन...
स्पॉईलर ऍलर्ट....
( जे लोक लगेच सिनेमा पाहणार आहेत त्यांनी रसभंगाचे दु:ख टाळण्यासाठी हे वाचू नये)...
या सिनेमामध्ये लक्षात राहणारे अप्रतिम वनलायनर्स आहेत. आनाने आपल्या नवर्याबद्दल "वर्ल्ड फ़ेमस इन पोलंड" असे म्हणणे,
ब्रॉन्स्कीच्या सहकलाकारचे " यू स्टिन्क विथ द स्क्रिप्ट आल्सो" आणि ब्रॊन्स्कीचं " आय हर्ड दॅट" हे वाक्य . ब्रॉन्स्की अनेक वेषांतरे करतो आणि वेषांतर करूनसुद्धा समोरच्याला ब्रॊन्स्की हा सुप्रसिद्ध(!) पोलिश नट कसा वाटतो हे विचारत राहतो आणि त्यावर गेस्टापो चीफ़ एर्हर्ड्ट ब्रॊन्स्कीला म्हणतो, " ही डिड टु हॅम्लेट व्हॉट वी डिड टु पोलंड" हे वाक्य तर अगदी हाईट आहे. ब्रॉन्स्की शेवटी हिटलरच्या वेशात इंग्लंडमधल्या एका बारमध्ये जाऊन " इज धिस इन्ग्लंड?" असे विचारतो आणि बारमधले हतबुद्ध लोक .
यातलं माझं सर्वात आवडतं दृश्य म्हणजे मेलेल्या गुप्तहेराचा वेश घेऊन ब्रॉन्स्की गेस्टापो चीफ़ला भेटायला जातो, ( तिथे माझी हिटलरशी ओळख असल्याचे सांगतो. हे नऊ मिनिटाचं दृश्य जरूर बघा.
http://www.youtube.com/watch?v=Dxf-jz9zWA4
शिवाय नॉटी नाझीज या नाटकातलं "पीस" या शब्दावर कोटी करत गायलेलं ( peace आणि piece) हे गाणं पहा.)
http://www.youtube.com/watch?v=Lv3pm0veWQI
आणि एक्स्ट्रा दाढीचा सीन तर मस्तच आहे..
हाही सिनेमा चुकवू नका.
प्रतिक्रिया
17 Sep 2010 - 11:30 am | विजुभाऊ
धन्यवाद मास्तर. हा पिक्चर बघायचाच.
तो परेश रावळ आणि मल्लीका शेरावतचा पकाऊ पिक्चर थोडासा पाहिला होता.
त्यात परेश रावळ हा कसलेला नट आहे हे केवळ दोनचार संवादातूनच कळत होते.
17 Sep 2010 - 11:59 am | सहज
अप्रतीम सिनेमा आहे. १९८९ मधेच भारतातच व्हि एच एस टेप (व्हिडिओ कॅसेट) वर पाहीला होता. इतकी मस्त ओळख करुन दिलीत पुन्हा पहायला हवा.
चार्ली चॅप्लीनच्या द ग्रेट डिक्टेटर प्रमाणे ही देखील धमाल ब्लॅक कॉमेडी आहे.
अवांतर १९८४ मधे आलेला टॉप सिक्रेट देखील सेकंड वर्ल्ड वॉर वर निघालेल्या अनेक स्पाय मुव्हीजचे धमाल विडंबन आहे.
(मेल ब्रुक्सचा फॅन) सहज
17 Sep 2010 - 11:55 am | llपुण्याचे पेशवेll
मास्तंर एकदम मस्तं परिक्षण. असे एका आठवड्यात इतके शिनेमे सांगू नका आम्हाला. माहीत असून बघता आले नाहीत याचे दु:ख खूप जास्त असतं.
17 Sep 2010 - 12:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
थ्री चिअर्स फॉर मास्तर! नक्की पहाते हा पिच्चर!
(अवांतरः आना ब्रॉन्स्की जर पोलीश असेल तर तिचं आडनाव ब्रॉन्स्का पाहिजे. पण चित्रपटाच्या सुरूवातीलाच तिचंही नाव आना ब्रॉन्स्की लिहीलेलं दिसतंय. आणि एक स्पूफ .. ते त्या 'पीस' गाण्यात 'अ लिटल पीस ऑफ पाकिस्तान' म्हणतात.)
17 Sep 2010 - 2:19 pm | भडकमकर मास्तर
तिचे आना ब्रॉन्स्का हवे हे बरोबर.,. १९३९ साली पाकिस्तान कुठे होता, हेही बरोबर...
अजून काही गंमती ...सिनेमातले सुरवातीचे पोलिशही काही विशेष पोलिश नव्हे , असे एका पोलिश माणसाने कळवले आहे.. :)
आणि सोबिन्स्की हवाई छत्रीने जिथे उतरतो ( त्याला विमानाने लवकरात लवकर सेलिट्स्कीच्या आधी वॉर्साला पोचायचे आहे)तो भाग डोंगराळ दाखवला आहे. वॉर्साजवळ कुठेही इतका डोंगराळ भाग नाही वगैरे.....
आयएमडीबी झिन्दाबाद...
17 Sep 2010 - 3:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
मी लिहीलेले दोन आंजा इंटलिजन्स नाही हो मास्तर!
17 Sep 2010 - 12:49 pm | मी_ओंकार
जबराट पिक्चर आहे हा. तुफान धमाल. पण मास्तरांनी म्हटल्याप्रमाणे काही दृश्यं काटा आणतात. विशेषतः पळून जाणार्या नागरिकांच्या चेहर्यावरचे भाव.
स्पॉयलर अलर्ट :
Excuse me , pardon me एकदम बेस्ट.
- ओंकार.
17 Sep 2010 - 1:08 pm | गणपा
वाह एक संपत नाही तो दुसरी डिश हजर. मस्त मेजवानी चालली आहे.
धन्स मास्तर आणि सहजराव.
17 Sep 2010 - 5:09 pm | स्वाती२
छान ओळख! नक्की पहाणार.
17 Sep 2010 - 7:34 pm | गणेशा
धन्यवाद
17 Sep 2010 - 8:55 pm | धनंजय
बघायलाच पाहिजे
17 Sep 2010 - 9:13 pm | चतुरंग
सध्या परदेशी चित्रपट महोत्सव चालू दिसतोय! ;)
बघायलाच पाहिजे हा सुद्धा! (चॅप्लिनचा द ग्रेट डिक्टेटर बघूनसुद्धा कैक वर्षं झालीत.)
(कॉमेडीप्रेमी)चतुरंग
18 Sep 2010 - 1:28 am | फारएन्ड
धन्यवाद या माहितीबद्दल. पाहायला पाहिजे हा चित्रपट. सुंदर लिहीले आहे.
18 Sep 2010 - 2:37 am | कवटी
मास्तर,
कधी येऊ पिक्चर बघायला?
बडवायझर पितापिता पिक्चर बघत/ मधेच पॉज करत मास्तरांची रनिंग कॉमेंट्री ऐकावी म्हणतो....
साला लेख येवढा फर्मास लिहिलाय तर कॉमेंट्री काय जबर्या असेल?
18 Sep 2010 - 5:13 pm | चिंतातुर जंतू
मेल ब्रूक्स मला आवडतो पण त्याचा हा चित्रपट पाहिलेला नाही. मूळचा अर्न्स्ट ल्यूबिशचा चित्रपट पाहिलेला आहे आणि तो पुष्कळच आवडलेला होता. ल्यूबिश स्वतः दुसर्या महायुध्दाआधी युरोपातून पळून आलेला होता. त्यामुळे त्याचा हिटलरवरचा राग चित्रपटातल्या हलकटपणामागे ठायीठायी दिसत होता. जाताजाता: त्याच दिग्दर्शकाचा निनोच्का पाहा अशी शिफारस करेन. त्यातली ग्रेटा गार्बोची रशिअन हेराची विनोदी भूमिका गाजली. 'गार्बो हसते!' अशी चित्रपटाची जाहिरात केली जायची कारण गार्बोचं हसणं ही तेव्हा एक नवलाईची गोष्ट होती.
18 Sep 2010 - 5:35 pm | भडकमकर मास्तर
जाताजाता: त्याच दिग्दर्शकाचा निनोच्का पाहा अशी शिफारस करेन.
निनोच्काबद्दल वाचले... शिफ़ारस आवडली...
अर्न्स्ट ल्यूबिशसाठी पाहणार हा सिनेमा....
18 Sep 2010 - 6:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शिफारस नोंदवून घेतली आहे.
याही चित्रपटात तो राग आणि हलकटपणाही दिसतो असं वाटलं. पण आता मूळ पिक्चर बघण्याचीही उत्सुकता आहे.
'टू बी ऑर नॉट टू बी' मधे अॅन बँक्रॉफ्टचं नाव कंसात टाकण्याची कल्पना फारच आवडली.
18 Sep 2010 - 5:43 pm | चतुरंग
ऑर्डर केला नेटफ्लिक्सवरुन कालच - येईलच दोनेक दिवसात - पाहून कळवतो! :)
18 Sep 2010 - 6:12 pm | सहज
टु बी ऑर नॉट टु बी पाहीला.
आवडला, एन्जॉय केला खरा पण खरच पुन्हा त्या वास्तवाची जाणीव चटका लावून जाते.
12 Aug 2013 - 2:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काल पुन्हा एकदा हा चित्रपट बघितल्यामुळे या धाग्याची आठवण झाली. त्यात रागयुक्त हलकट्पणाचे आणखी थोडे पदर उलगडले.
आता हा सिनेमा नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंगवर आहे. सबटायटल्ससकट.