शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ
आग कारभारनी झाली का झुनका भाकर?
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||धृ||
निसती मिरची कुट ग जरा
तीचा खर्डा कर ग चवीला बरा
भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला
मंग पानी प्यावं म्हंतो पोटाला
बेगीनं आवर आन चुलीत पेटव जाळ
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||१||
त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा
लाव भाकरीला एक हात लोण्याचा
घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं
उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं
लवकर टाक त्यात उलीसा गुळ
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||२||
उगा नको जास्त सैपाक करू
नको हातावर हात तू धरू
मला जायाचं हाय लई लांब
काय नाट लावती म्हनं "जरा थांब"
वाट आडवून थांबवू नको मला बळंबळं
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||३||
नांगर घेवून जातो मी ग मळा
मंग दुपारच्याला तू बी ये की जरा
खुरपणी करून तण काढू भरभरा
पाखरं उडवूया करून दगडी मारा
कवाधरनं थांबावं आम्ही झाली की ग सकाळ
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०९/२०१०
प्रतिक्रिया
15 Sep 2010 - 5:08 am | शुचि
हा हा मस्त!!
15 Sep 2010 - 7:35 am | मदनबाण
दफोराव च्यामारी तुम्ही येग येगळ्या इषयावर लय मस्त मस्त कविता करुन राह्यलात बघा...
15 Sep 2010 - 10:46 am | विसोबा खेचर
केवळ अपतिम कविता..!
16 Sep 2010 - 1:13 am | NEWYORKER
जिवंत चित्रच उभे केले आहे.
शेतकय़ाचे जीवन आणि इतर श्रमजीवी लोकांच्या जीवनात फरक फार नाही!