प्रिय राहुल देशपांडे,
(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,
मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही. स्वत:च्या बुद्धीने गातोस, कसदार गातोस, जमून गातोस.
तीनेक वर्षांपूर्वी प्रथमच तुझी संपूर्ण मैफल मी ऐकली होती आणि दाद देण्याकरता हा लेखही लिहिला होता.. असो.
अभिषेकीबुवा आणि वसंतराव यांनी अमर केलेलं, मराठी संगीत रंगभूमीला नवसंजिवन देणारं, नवचैतन्य देणारं 'कट्यार..' तू करायला घेतलंस तेव्हा तर मला तुझा अभिमान वाटला होता, आजही वाटतो.. 'कट्यारच्या..' एखाददोन तालमींनाही मी हजर होतो..
पण.......
दोनच दिसांपूर्वी मी सहज म्हणून मी झी मराठी सुरू केला आणि मला दु:खद धक्का बसला. मराठी झी सारेगमप मध्ये तू चक्क परिक्षक?? इतकी कशी काय तुझी अधोगती? आणि ती ही अशी अचानक?
मान्य करतो, तिथे जी मुलं गायला येतात ती आपापल्या परिने गुणी असतात. संगीतात काही एक प्रयत्न करणारी असतात, धडपडणारी असतात. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती असेलच नक्की) की तो केवळ एक संगीताचा बाजार आहे? तिथे परिक्षकांच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे प्रेक्षकांच्या/श्रोत्यांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने झी आणि आयडिया सेलच्या आर्थिक राजकारणाचं असतं..
सन्माननीय परिक्षक या नात्याने आणि न्यायाने तू तुझ्या सांगितिक ज्ञानानुसार, अनुभवानुसार एखाद्या स्पर्धकाची गुणवत्ता तपासणार.. परिक्षक या नात्याने जर तुला तो योग्य वाटला, तुझ्या पसंतीस उतरला तर तू त्याला 'क्ष' गुण देणार.. पण कुणीही चार आंडुपांडू श्रोते/प्रेक्षक दुस-याच एखाद्या स्पर्धकाला एसएमएस पाठवून '४क्ष' गुण देणार..!
मला सांग, यात काय राहिली तुझी किंमत? झी मराठी आणि आयडियाला त्या स्पर्धकांशी किंवा तुझ्या गुणग्राहकतेशी काहीही देणंघेणं नसून त्यांचा मतलब आहे तो त्या चार आंडुपांडूंनी पाठवलेल्या एसएमएसशी...!
राहुल देशपांडे म्हणजे नुसतं एक शोभेचं बाहुलं..?
अरे काय रे हे? केवळ एसएमएसच्या अर्थकारणाकरता जी स्पर्धा चालते किंवा जिचे निकाल मॅनिप्युलेट होऊ शकतात अश्या स्पर्धेचा तू एक परिक्षक?
कुणी म्हणेल - एसएमएस पाठवतो तो जनता जनार्दन..!
मान्य.. अगदी मान्य..! साक्षात नारायणराव बालगंधर्व त्यांचा उल्लेख 'मायबाप' असा करायचे..! पण जनता जनर्दनाचं काम दाद देण्याचं, कौतुक करण्याचं. गांभिर्याने जर एखादी सांगितिक स्पर्धा सुरू असेल तर स्पर्धकांना मार्क देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत, जाणकार परिक्षकांचा..! केवळ एक बटण दाबून एसएमएस पाठवून जनता जनार्दनाला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं तुला खरोखरच वाटतं का? (तसं वाटत असेल तर या माझ्या पत्राचं काही प्रयोजनच नाही.. मी हे पत्र बिनशर्त मागे घेतो आणि तुझी क्षमा मागतो)
अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?
तू कसा काय असा झी मराठी आणि आयडियाच्या बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?
अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चं गाणं कर की.. खूप चांगला गातोस, अजूनही चांगला गाशील. वसंतराव, भीमण्णा, कुमार यांची नावं घेतली की संगीत म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.. कर की जरा चिंतनमनन. अजूनही कर की जरा मिळालेल्या तालमीचा वैचारिक आणि रियाजी रवंथ..!
दोन सूर धडपणे गाता आले नाही तर लगेच कालपरवाच्या पोरांची नसती कौतुकं, फजिल लाडावलेलं निवेदन, स्पर्धकांचे आणि त्यांच्या मायबापसांचे रुसवेफुगवे, सारी जाहिरातबाजी, शोबाजी असलेल्या आणि मुख्य म्हणजे एसएमएसच्या अर्थकारणाने बरबटलेल्या झीमराठी आणि आयडियाच्या वाममार्गाला कसा काय लागलास बाबा तू?!
तू एक उत्तम गवई आहेस, याचं कारण तू एक उत्तम शिष्य आहेस, गाणं टिपणारा आहेस..वसंतराव, कुमारजी, आणि अवलिया मुकुल शिवपुत्रांची परंपरा तुला लाभली आहे. मला सांग - वसंतराव, कुमारांनी केलं असतं का रे असं धेडगुजरी परिक्षकाचं काम? ज्यांना चिंतन-मनन करायला दिवसातले २४ तासही कमी पडत अश्या कुमारांचा वारसा ना तुझा?
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!
असो..
जे काही वाटलं ते मोकळेपणी लिहिलं.. वरील सर्व मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत तरीही ती तुला कळवाविशी वाटली.. एक सामान्य श्रोता म्हणून मी नेहमीच तुझा चाहता राहीन. तुझ्या 'मुख तेरो कारो..'च्या यमनकल्याणचा, 'दीप की ज्योत जले..' च्या धनबसंतीचा नेहमीच भुकेला राहीन.!
तुझा,
तात्या.
प्रतिक्रिया
1 Sep 2010 - 12:36 pm | भडकमकर मास्तर
जाउद्यात , माफ करून टाका...
कलेवर अवलंबून व्यवसाय म्हटला की तडजोड आलीच हे आपलं आमचं वैयक्तिक मत...
1 Sep 2010 - 12:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?
विनोद बघा. कुणीही बटन दाबून सरकार निवडू शकतो. तिथे आपण त्याला विचारत नाही की बाबा तुला राजकारणातले काय कळते? ज्याला मत देतो आहेस त्याची मते / धोरणे पटली म्हणून देतो आहेस का? आपण त्याचा तो हक्क मान्य करतो. पण त्याच माणसाने आवडता गायक निवडला तर ते आपल्याला पटत नाही. मौज वाटली. (टीप :- मला पण SMS व्यवस्था फार आवडत नाही)
असो, अवांतर झाल्यावर मुद्द्याकडे वळू. माझ्यामते इथे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत १) पैसा २) प्रसिद्धी
१) राहुल देशपांडे बाकीचे जे काही करतात (म्हणजे मैफिली वगैरे) त्यातून त्यांना किती पैसा मिळत असेल याचा काही अंदाज नाही. पण झी मराठी वर परीक्षकाचे काम करून चांगले मानधन नक्की मिळत असणार. जिथे पैशासाठी अशोक सराफ हिंदीत टुकार आणि भिकार रोल स्वीकारतात तिथे बाकीच्यांचे काय? शेवटी पैसा सगळ्यांनाच हवा असतो.
२) प्रसिद्धी (इथे exposure हा अर्थ अपेक्षित आहे). आत्ता या क्षणी किती मराठी लोकांना राहुल देशपांडे हे नाव माहित असेल? मला ते वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत या पलीकडे खास माहिती नाही आणि वसंतरावांबद्दल माझी माहिती "कट्यार" पासून सुरु होऊन तिथेच संपते. सारेगम चा प्रेक्षकवर्ग लक्षात घेता राहुल साठी ही संधी आहे आपले नाव घराघरात नेण्याची. व्यक्तिश: मला अवधूत गुप्ते हे सारेगम च्या पहिल्या पर्वानंतर आवडू लागले. आधी त्यांचे काम माहित होते, पण संगीतातील त्याची जाण त्याच्या टिप्पण्यान्मुळे कळली. (त्याची जाण यावर वाद नको, माझे मत हे layman चे मत समजा)
बाकी राहुल ह्यांनी वसंतरावांचाच वारसा चालवावा असे कुणाचे मत असेल तर "तुझे आहे तुजपाशी" वाचावे. असेही, अशा कार्यक्रमात परीक्षकाचे काम करणे वाईट असेल तर हा गुन्हा खालील लोकांनी केला आहे. १) सुरेश वाडकर २) हृदयनाथ मंगेशकर ३) आशा भोसले.......
बाकी चर्चा होईलच आता सुरु....
1 Sep 2010 - 1:16 pm | विसोबा खेचर
सहमत आहे..! परंतु माझ्या आठवणीप्रमाणे आशाताई पाहुण्या परिक्षक म्हणून आल्या होत्या.
असो..
तात्या.
1 Sep 2010 - 1:28 pm | ज्ञ
परंतु माझ्या आठवणीप्रमाणे आशाताई पाहुण्या परिक्षक म्हणून आल्या होत्या. >>> नाही मध्ये एक स्पर्धेसाठी आशाताई पूर्ण वेळ परिक्षक म्हणून आल्या होत्या.. अर्थात SMS चालू झाले तेव्हा बहुतेक त्या नव्हत्या परिक्षक म्हणून...
2 Sep 2010 - 12:29 am | पारुबाई
विनोद बघा. कुणीही बटन दाबून सरकार निवडू शकतो. तिथे आपण त्याला विचारत नाही की बाबा तुला राजकारणातले काय कळते? ज्याला मत देतो आहेस त्याची मते / धोरणे पटली म्हणून देतो आहेस का? आपण त्याचा तो हक्क मान्य करतो. पण त्याच माणसाने आवडता गायक निवडला तर ते आपल्याला पटत नाही. मौज वाटली. (टीप :- मला पण SMS व्यवस्था फार आवडत नाही)
हि तुलना च मुळात बरोबर नाही आहे.
लोकशाहीच्या मार्गाने जाताना जनतेचा कौल घेणे वेगळे आणि गाण्यातले न समजत दिलेला कौल वेगळा
1 Sep 2010 - 1:59 pm | इन्द्र्राज पवार
श्री.तात्या यांच्या या विषयातील निर्मल भावनेचा आणि लेखनातील मतांचा आदर राखून असे म्हणतो की, श्री.राहुल देशपांडे यांच्या नजरेत हे "अपील" अरण्यरुदन ठरेल. अशासाठी की, जी (विजेता निवड प्रक्रीया) गोष्ट गल्लीबोळातील येरूला माहिती आहे, कशाप्रकारचे राजकारण खेळले जाते, कोणते (कलाबाह्य) निकष लावले जातात, अंतीम शिक्कामोर्तबावेळी कुठे कसले कितपत दडपण येते याची उघडउघड चर्चाचर्वितणे झाली असताना/होत असताना, या पडद्यामागील खेळ्या श्री.राहुल देशपांडे, श्री.स्वप्नील बांदोडकर, तसेच यापूर्वीचे श्री.सलील कुलकर्णी, श्री.अवधूत गुप्ते इ. यांना अज्ञात असतील हे समजणे फार बालीशपणाचे होईल. तरीही ही नामवंत मंडळी ह्या "असाईनमेन्ट" स्वीकारतात ते त्यांचे खास (व्हेस्टेड म्हणत नाही...) इंटरेस्ट असतात म्हणूनच. सर्वात मोठे म्हणजे "अपॉईंटमेन्टचे मास अपील". एकदोन एपिसोडमधुन जिथेजिथे मराठी माणूस आहे तिथतिथे परिक्षकाच्या खुर्चीवर बसलेले "नाव" जातेच जाते. हे इन्स्टंट एक्स्पोझर कुठल्याही 'कलाकारा' ला फार मोहित करते. शिवाय प्रभावी वाटू शकणारा पैसा (करारावर स्वाक्षरी करताना ही बाब कुणीही दुय्यम मानीत नाही...मानूही नये.)
वरील एका प्रतिसादार श्री.विश्वनाथ मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे "राहुल देशपांडे" हे नाव मूठभर लोक सोडले तर कुणाला माहिती नव्हते. आम्हाला तर ज्यावेळी एका स्पर्धकाने परवा "या भवनातील गीत..." गायल्यावर मुग्धाने (की अथर्व?) त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही बाब उघड केली की, मूळ गाणे श्री.वसंतराव देशपांडे यांचे असून त्यांचेच नातू आज समोर परिक्षक म्हणून बसले आहेत, त्यावेळी नाते समजून आले. हाही अशा तरूण कलाकारांच्या दृष्टीने एक फायदा होतोच होतो.
राहता राहिला प्रश्न "एसएमएस" च्या महतीचा. आता यावर बोलायचे म्हणजे शेवटी झी च्या दृष्टीने धंद्याचे हे एक गणित आहे जे ते आणि मोबाईल कंपन्या चढत्या भाजणीने मांडत असतात. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करताना त्यातून हे जायंट्स नफा कसा कमवायचा हे पाहणारच आणि त्याबद्दल त्यांना कुणी दोष देऊ नये.
श्रीमती लता मंगेशकर आणि श्री.अमिताभ बच्चन या दोन नावांना भारतात (किंवा जगातच) किती वजन आणि आदर आहे हे सर्वांना माहिती आहेच. हे दोन दिग्गज आवर्जुन अशा स्पर्धात्मक कार्यक्रमाला "विजेता" घोषित करण्यासाठी हजर राहून एकूण प्रक्रीयेबद्दल कौतुकोद्गार काढतात. तेव्हा जर या मान्यवरांना निवडपद्धतीबद्दल हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर परिक्षक म्हणून काम करीत असलेल्या श्री.राहुल देशपांडे (वा तत्सम) यांच्यासारख्या उभारत्या कलाकाराला आमंत्रण स्वीकृतीबद्दल दोष देऊ नये असे वाटते.
इन्द्रा
1 Sep 2010 - 2:04 pm | विसोबा खेचर
काही मुद्द्यांशी सहमत नसलो तरी प्रतिसाद आवडला..
धन्यवाद..
तात्या.
1 Sep 2010 - 2:10 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्याशी तत्वतः सहमत. राहुल हा अगदी आपला वाटतो. त्याचे गाणे आवडते. तो जमिनीवर आहे हे अगदी जाणवून येते. त्याने काय करावे आणि काय नाही करावे हे त्याचे त्यानेच ठरवायचे. कारण त्याची कारणं त्यालाच ठाऊक असणार. पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले.
अर्थात, त्याच्यासारख्या दिग्गजाला या कार्यक्रमात फ्री हँड मिळणार असेल तर उत्तमच. पण वाहिन्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टांच्या रेट्यामुळे ते कितपत साध्य होईल ही शंकाच आहे.
1 Sep 2010 - 2:15 pm | विसोबा खेचर
म्हणूनच हा पत्रप्रपंच..
नक्कीच उत्तम..
तात्या.
1 Sep 2010 - 2:41 pm | स्वाती दिनेश
राहुल हा अगदी आपला वाटतो. त्याचे गाणे आवडते. तो जमिनीवर आहे हे अगदी जाणवून येते. त्याने काय करावे आणि काय नाही करावे हे त्याचे त्यानेच ठरवायचे. कारण त्याची कारणं त्यालाच ठाऊक असणार. पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले.
बिपिनसारखेच म्हणते.
1 Sep 2010 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रसिद्धी आणि पैसा वाईटच असं काही मला वाटत नाही. आनंदासाठी पैशाची गरज असतेच आणि कलावंताला प्रसिद्धीचीही गरज असते. या ना त्या कारणाने चांगल्या कलावंताची महाराष्ट्राला ओळख होते आहे याचा मला आनंद आहे. मी हा कार्यक्रम पहात नाही, पण पहात असते तरीही मला राहूल देशपांडेंना या कार्यक्रमातही पहायला मिळाल्याचा आनंदच झाला असता.
1 Sep 2010 - 2:56 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रसिद्धी आणि पैसा महत्वाचा आहेच. आणि त्याच्यावर राहुल सारख्या कलाकाराचा प्रथम हक्क आहे. आणि प्रत्येक वेळी कलाकाराने स्वतःच्याच मस्तीत जगावे, दुनियेला फाट्यावर मारत रहावे, स्वतःच्याच शर्तीवर जगाशी सलोखा करावा असे मुळीच नाही. पण तरीही, जिथे स्वतःच्या मताला / शब्दाला किंमत आहे तिथेच जावे / रहावे असे मात्र वाटते. राहुल एक कलाकार आहे म्हणून नाही तर आपलाच वाटतो म्हणून. बाकी, वर म्हणले तसे, त्याची कारणं त्यालाच माहित. त्यामुळे अंतिम मत बनवणं हे गैरलागूच आहे.
1 Sep 2010 - 3:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुळात दोन्ही बाजूंची बोलणी "झी आणि राहुल दोघांसाठी प्रसिद्धी, राहूलसाठी योग्य मानधन आणि झीसाठी निर्णय" अशीच झाली असतील तर त्यात काय गैर आहे? त्याहून आणखी उत्तम गोष्ट म्हणजे स्पर्धकांना राहूल देशपांडेंचं मार्गदर्शन मिळेल आणि रसिकांना त्यांचं दर्शन, गाणं.
"सारेगमप" फक्त कलेसाठीचंच व्यासपीठ नाही आणि कलाकारही देव नसून आपल्यासारखीच माणसंच असल्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी यांची त्यांनाही गरज आहे या दोन गोष्टी मान्य केल्या की असल्या गोष्टींचा त्रास मलातरी होत नाही.
विचार करा राहूल देशपांडेंसारख्या गुणी कलाकाराच्या जागी अन्नू मलिक नाहीतर विवेक मुश्रन (त्याचा एक नॉनफिल्मी अल्बम आहे) दिसले असते तर काय झालं असतं? आहे ते उत्तम आहे.
1 Sep 2010 - 3:29 pm | विसोबा खेचर
..!
माहितीबद्दल धन्यवाद..!
तात्या.
1 Sep 2010 - 2:31 pm | अनाम
जुने मालक, हे पत्र तुम्ही खरच राहुलला पाठवलयत की नुसतच इथे मनोगत म्हणुन लिहिलयत?
हल्ली बाजारु संगीताचा जमाना आहे. नुसत कौतुकान पोट भरत नाही. त्यामुळे कदाचीत राहुलनी वाहात्या गंगेत दोन थेंब स्वतःवर उडवुन घेतले तर मला त्यात गैर वाटत नाही.
याचा अर्थ सारेगमप च्या बाजारु व्रुत्तीला समर्थन करतोय असा कृपया घेउ नये.
हिंदी सारेगमप (मेंटर्स् च्या कमेंट्स म्युट करुन) ऐकणारा - एक अनाम.
1 Sep 2010 - 2:51 pm | श्रावण मोडक
भावना पोचल्या. त्यांच्याशी सहमत आहे; पण तत्वतःच. कारण व्यवहार हा व्यवहारच. आणि झीवरचा हा कार्यक्रम काही संगीताचे पूजन, मनन करतो वगैरे नाही.
1 Sep 2010 - 3:36 pm | आपला अभिजित
सारेगमप सुरू झाल्यापासून (अभिजित कोसंबी जिंकला ते) एकदाही मी त्याचा पूर्ण एपिसोड पाहिलेला नाही. मुळात "कव्हर व्हर्जन'- एकाचं गाणं दुसऱ्यानं गाणं हा प्रकारच मला मान्य नाही. अर्थात, हल्ली मराठी संगीत लोकप्रिय होण्यासाठी पूर्वीसारखं रेडिओचं प्रभावी माध्यम नसल्यानं आणि संगीताचाही बाजार झाल्यानं चांगली गाणी असूनही ती लोकप्रिय होत नाहीत. त्यामुळे नव्या गायकांना जुन्याच गाण्यांची दळणं दळत बसावी लागतात, हे त्यांचं आणि आपलंही दुर्दैव.
असो. तरीही, जेव्हा कधी अधूनमधून सारेगमप पाहिले, तेव्हा त्यातला बाजारूपणा, भंपकपणा, मधुमेही अतिगोडपणा आणि बेगडीपणा अगदी अंगावर आला. एखादं गाणं एखाद्या गायकानं किती बकवास गायलं, असं आपल्याला आवर्जून वाटतं, तेव्हा नेमके ते परीक्षक "व्वा, छान झालं गाणं. मध्येच सूर इकडे तिकडे झाला होता, पण तू नंतर रुळावर आलास. शब्दांच्या उच्चारांकडे जास्त लक्ष दे. गाण्यातला भाव ओळखून गायलं पाहिजे. तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत,' असलं काहीतरी छापील, तोंडदेखलं त्या गायकाला सांगतात, तेव्हा तर हसावं की रडावं कळत नाही. आणि प्रशंसेत दोन-चार मिठाचे खडे टाकल्यानंतर शेवटी "ओव्हरऑल छान झालं गाणं' असं परीक्षकांनी म्हटलं नाही, तर त्यांना त्या एपिसोडचं मानधन मिळत नसावं बहुधा. हे "ओव्हरऑल छान झालं,' प्रकरण काय आहे, ते मला कधीच कळलं नाही.
एखाद्या गायकाला आधी एखाद्या गाण्याबद्दल काही बोल लावले, तर पुढच्या वेळी त्याला सावरून घ्यायचं, कुणी फार दुखावणार नाही आणि कुणी फार हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही, याची काळजी घ्यायची आणि शेवटच्या फेरीत तर सट्टेबाजीसारखं ज्या घोड्यावर जास्त आशा असतील, त्याला नेमकं हरवायचं, हे तंत्र किती दिवस खपवणार?
अर्थात, जगभरात असलेली "सारेगमप'ची लोकप्रियता पाहिली, की लोकांनाही जुनी गाणी ऐकून उसासे टाकण्याशिवाय काही काम आहे की नाही, हाच प्रश्न पडतो. तीच गाणी, त्याच पद्धतीचं सादरीकरण, त्याच प्रशंसा, त्याच टाळ्या आणि तोच "एसएमएस'चा तमाशा!
अजरामर भारतीय संगीताचा विजय असो!
(असो. तात्या, लेख "ओव्हरऑल' छान झालाय! पुन्हा फॉर्मात आलात वाटतं!)
1 Sep 2010 - 3:42 pm | विसोबा खेचर
आणि या सार्या घोडेबाजारात आमच्या राहुलला पाहाणं मला रुचलं नाही, इतकंच मला या पत्रवजा लेखातून सांगायचं आहे..
धन्यवाद अभिजितराव,
तात्या.
1 Sep 2010 - 3:44 pm | बिपिन कार्यकर्ते
यंव रे गब्रु!!!
आम्हाला जर लिहिता आले असते
असेच आम्ही लिहिले असते...
:)
1 Sep 2010 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार
आणि आम्हाला जर गाता आले असते
असेच आम्हाला परिक्षक म्हणुन बोलावले असते...
बाकी पुढच्या पर्वात 'जज' म्हणुन तात्या आणि देवबाप्पांना बोलवावे असा एक ठराव मिपातर्फे पाठवण्यात यावा.
2 Sep 2010 - 12:45 am | चिंतामणी
"परा' या प्रस्तावाला माझे अनूमोदन आहे.
1 Sep 2010 - 4:18 pm | विसोबा खेचर
३-४ वर्षांपूर्वी राहुलवर जो लेख लिहिला होता त्यातील वरील वाक्य वाचून आता पुन्हा एकवार गंमत वाटत आहे.. :)
तात्या.
1 Sep 2010 - 4:30 pm | विकास
प्रिय तात्या (आणि इतर मान्यवर सदस्य)
वयात फरक नसल्याने आशिर्वाद देऊ शकत नाही आणि चमत्कार दाखवत नसल्याने नमस्कारही करू शकत नाही. ;)
आपल्यात कितीही वाद झाले असोत, भांडणे झाली असुंदेत पण तुमच्यातल्या जिद्दीचा मी चाहता आहे. कधी कधी तुमचे लेखन हे सर्वांसाठी नसलेले वाटले तरी गोळाबेरीज केल्यास बहुतांशी वेळेस आवडते. त्यात स्वतःचे काही असे / ओरिजिनॅलीटी असते.
मला माहीत आहे, अनेक दिग्गजांना भेटण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे आणि सुरेल मैफिलींचे अनुभव देखील तुमच्याकडून ऐकले आहेत. कधी मोठ्या कलाकारांमुळे सुरेल झालेल्या तर कधी (खरेच) तुमच्यामुळेच सुरेल झालेल्या मित्रांच्या मैफिली.
तर अशा या जिद्दी, रंगेल, ज्याच्या वृत्तीत कलाकार दडला आहे, असल्या माणसाने आपला वेळ "झी टीव्ही" बघण्यात घालवलेला पाहून मला वाईट वाटले. इतकी वेळ तात्यांवर का यावी? असा मी विचार करू लागलो. तसे म्हणाल तर टिव्ही पहाणे, त्यातही झी टिव्ही पहाणे वगैरे वाईट असते असे काही मला म्हणायचे नाही. पण त्यात गुंतणे हे गुणी मंडळींसाठी नाही. ते काम फक्त म्हणजे फक्त जे दर्शकच असतात अशांसाठी आहे असे वाटते. (विशेष करून त्यातील भिषण मालीका).
असो, जे वाटले ते मनापासून लिहीले. तरी देखील जीवनात असलेल्या ए टू वाय उपभोग्य गोष्टी सोडून तुम्हाला "झी" च योग्य वाटत असेल तर, "पसंद अपनी अपनी" म्हणत मी आपल्या भावनांचा आदरच करीन (कदर करीन का ते माहीत नाही).
आपला कृपाअभिलाषी
विकास
:-)
1 Sep 2010 - 7:05 pm | विसोबा खेचर
चमत्कारही पाहायला मिळेल. अगदी व्याजासकट! :)
कधीतरी वाद झाल्याचं आठवतंय, पण भांडणं झाल्याचं आठवत नाही..:)
सहज घरी होतो म्हणून पाहणे झाले. तसाही आईने जरावेळाने येऊन झी लावलाच असता!
असो..
(डोईवर चमत्कारांची उधारी असलेला) तात्या.
1 Sep 2010 - 7:10 pm | यशोधरा
पत्र आवडले. राहुल देशपांडे ह्या कार्यक्रमामध्ये वेळ वाया घालवतोय हे पाहून वाईट वाटले होतेच.
व्यवहाराचं म्हटलं तर स्वतः मैफिली करुन तो अधिक कमावू शकेल, इतकी त्याची गायकी नक्कीच परिपक्व आहे.
1 Sep 2010 - 8:14 pm | इंटरनेटस्नेही
मला जे म्हणायचयं ते आपल्या इंद्राज पवारांच्या ताकदवान की बोर्ड मधुन आलेलं आहेच... मी त्यांच्याशी १००.००% सहमत.
पण पैसा माणसाला आणि एका ऑर्गनायझेशन ला इतकं बदलु शकतो हे पाहुन जीव तुटतो. :(
1 Sep 2010 - 8:28 pm | भारी समर्थ
राहूलने मुकुलजींकडे ही धडे घेतलेत हे माहित नव्हतं...माहितीबद्दल धन्यवाद...
बाकी, काही लोक प्रतिक्रिया देताना समोरच्याने असं का लिहील असावं हे शोधण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. नाहीतर वसंतरावांच्या (जैविक) वारसाने व मुकुलजींच्या शिष्याने संगीताच्या बाजारात अशी उडी घ्यावी यातलं वैषम्य समजलेल्यांनी असल्या पुचाट बाता नसत्या मारल्या.
1 Sep 2010 - 10:22 pm | विसोबा खेचर
हा हा हा.. चालायचंच..! :)
धन्यवाद समर्थराव, आपल्याला माझ्या पत्रातलं मर्म कळलं...! बाकी कीबोर्ड बडवणारे अनेक आहेत. विषयाची समज असो वा नसो..!
तात्या.
1 Sep 2010 - 9:07 pm | शाहरुख
राहूलने रुपये ७५०* ची वगैरे तिकीटं ठेऊन शास्त्रिय संगीताची मैफिल जमवल्यास तिथे तिकीट काढून जायचे माझ्यात धाडस नसल्याने त्याने सदर कार्यक्रमात जाऊ नये हे मी कोण त्याला सांगणारा !
अर्थात तात्यांचे तसे नसावे..पत्र आवडले.
( शास्त्रिय संगीताच्या मैफिलींना रु. ७५० ची वगैरे तिकीटं असतात ही माझी मिपावरील वाचलेली माहिती आहे... ;-) चुभूद्याघ्या. )
2 Sep 2010 - 5:12 am | Pain
बर्याच प्रसिद्ध कलावंताचे नियमित उत्पन्न नसल्याने झालेले हाल वाचनात आले आहेत. मला या गायकाबद्दल काही माहिती नाही पण जर ही बाब विचारात घेउन हा निर्णय घेतला असेल तर त्यात काही चूक नाही.
1 Sep 2010 - 10:39 pm | चतुरंग
आणि राहूलने नेमके कशासाठी हे पद स्वीकारले आहे हे माहीत नाही तेव्हा कोणतीही कॉमेंट करायच्या आधी मी वाट बघेन.
कदाचित असेही असेल की प्रामुख्याने प्रदर्शनी, बाजारु झालेल्या ह्या गाण्याच्या स्पर्धेच्या जगात फक्त ओरडणार्यांची माती खपते असे असल्याने ज्यांच्याकडे सोने आहे त्यांना लोकांसमोर वेगळ्या मार्गाने येणे गरजेचे असू शकेल.
तुम्ही खरेखुरे गुणवान आहात पण लोकांचं तुमच्याकडे लक्षच गेलं नाही तर पुढे काय हा प्रश्न सोपा नक्कीच नाही. तुम्ही स्वतःला पुढे आणणं गरजेचं आहे आणि ते माध्यमांचा वापर करुन केलं तरी हरकत नाही असेच मी म्हणेन.
मी स्वतः राहूलचा कार्यक्रम इथे अमेरिकेत ऐकलाय. तो आजारी होता तरीही औषधे घेऊन गायला. लोकांच्या फर्माईशी त्याने पूर्ण केल्या आजारपणाचा बाऊ केला नाही. एकूण त्याची गाण्यावरची निष्ठा बघता तो फक्त पैसा एवढाच दृष्टिकोन ठेवून परीक्षकाचे काम स्वीकारेल असे वाटत नाही.
त्याच्याकडून मुलांना योग्य ते अनुभवाचे बोल, मार्गदर्शन इ. मिळालं तर ते जास्त मोलाचं आहे. इतकेच.
पाहूया काय काय होतंय.
(वसंतखांचा आणि राहूलचा पंखा)चतुरंग
2 Sep 2010 - 12:16 am | ऋषिकेश
अनावृत पत्र तुमच्या भावना नीट, खास "तात्या शैलीत", मांडते म्हणून आवडले.. बर्याच संगीतप्रेमींच्या म्हणण्यापेक्षा संगीतातले थोडेबहुत कळणार्यां बर्याचजणांची ही प्रातिनिधीक प्रतिक्रीया असावी.
असो. मी कट्यार काळजात बघितले व एकेकाळी कसेबसे ४-५ तासांत संपणारे ३ अंकी नाटक २ अंकात, अडीच तासात "उरकले" आहे हे बघुनच राहुलचे 'आधुनिक' व्यापारी अंग समजले होते. त्यामुळे त्याला सारेगमप मधे बघुन जराही आश्चर्य वाटले नाही. (तुम्हाला यात आश्चर्य वाटले याचे मात्र आश्चर्य वाटतेय :) )
[अर्थात त्याने व्यापार करू नये असे अजिबात म्हणणे नाही.. लोकांनी त्याच्याकडून आजोबांसारखी अव्यापारी व केवळ कलासक्त अपेक्षा ठेऊ नये इतकेच म्हणणे आहे]
2 Sep 2010 - 12:17 am | विकास
अर्थात त्याने व्यापार करू नये असे अजिबात म्हणणे नाही.. लोकांनी त्याच्याकडून आजोबांसारखी अव्यापारी व केवळ कलासक्त अपेक्षा ठेऊ नये इतकेच म्हणणे आहे
+१ !
2 Sep 2010 - 10:58 am | इन्द्र्राज पवार
+ सहमत
खुद्द "आजोबा" बाबत 'रसिक' म्हणविणार्या लोकांनी अशा अपेक्षा ठेवू नयेत असे कै.सुनीता देशपांडे यांचेही नेमके हेच मत होते.
लोकांना ऊस तर हवा असतोच, पण त्यासाठी काहीतरी मोल देण्याची तयारी मात्र असत नाही. धावत्या ट्रकमागे लोंबकळून मोफतचा ऊस ओरबाडणार्यांच्यात आणि कुमारांचे वा वसंतरावांचे गाणे ऐकण्यासाठी "कॉम्प्लिमेंटरी पास" ची वाट पाहणार्यात तत्वतः काहीच फरक नाही.
इन्द्रा
2 Sep 2010 - 10:57 pm | भारी समर्थ
असेल बुवा असं काहीतरी..
पण कुटुंबाची घडी व्यवस्थित बसावी म्हणून २३-२४ वर्षे नोकरी कराविशी वाटली एखाद्याला तर बिघडलं कुठे? संगीतातल्या धुरंधरांचे (दिनानाथ, सुरेशबाबू, असद अली खॉं इ.) हाल बघून आपलं नाणं वाजवून बघायची जर कोणाला वाटलीच धास्ती तर त्यात कसला अव्यवहारीपणा?
सरसकट सर्व गोष्टींना एकाच फूटपट्टीने मोजायचं म्हटलं तर पुलंचं तर सोडाच पण बाबा आमटे आणि अनिल अवचटांच्या (व अशा अनेक) मंडळींच्या मागे लाखांच्या राशी लावणार्या सुनीताबाईही अव्यवहारीच म्हणाव्या लागतील. शिवाय पुलंचं सगळं संभाळत बसल्यामुळे त्यांची प्रतिभाशक्ती तशी अंमळ अप्रकाशितच राहिली की. तो अंबानींचा मुकेश पहा कसे करोडोंचे इमले उभारतोय ते...
बाकी आमच्या बाबतीत सांगायचं तर आम्ही आताशा आमची भाकर कमवायला लागलोय. पण तरीही स्वतःला आवडेल त्यात पैसे खर्च करायला नाही राव बघत मागे पुढे.
वयाने, अनुभवाने आणि बुद्ध्यांकाने जरा कमीच असल्यामूळे सर्व प्रतिक्रियांशी सहमत.
(उगाच कारण नसताना कैच्याकै प्रतिक्रिया प्रकाशित करायला उद्युक्त करणार्या तमाम द्रोणाचार्यांना या एकलव्याचा सलाम!)
भारी समर्थ
2 Sep 2010 - 12:32 am | बेसनलाडू
(व्यापारी)बेसनलाडू
2 Sep 2010 - 12:37 am | माझीही शॅम्पेन
एकदम जबरा !
तात्यांचे सर्व विचार पटले , सर्वनीच बाजारात बसायचे ठरवले तर मंदिरात देवही राहणार नाही..
ह्या जमान्यात रफी आणि किशोर असते तर त्यानिही तेच केल असत का ?
2 Sep 2010 - 2:11 am | बेसनलाडू
ह्या जमान्यात रफी आणि किशोर असते तर त्यानिही तेच केल असत का ?
कदाचित नाही. पण ते होते त्या जमान्यात अशा स्पर्धा आणि बाजारही नव्हतेच :) किंबहुना त्या काळात गाणे गाण्यासाठी मिळणार्या मानधनाची किंमतही आजच्याइतकी नसे.
आजच्या काळात सोनू निगमसारखा अत्यंत गुणी गायक या बाजारात बसलाच आहे ना? मग? :)
(व्यापारी)बेसनलाडू
2 Sep 2010 - 5:34 pm | अनाम
बेसनलाडुंशी काहीसा असहमत.
लताआजी, आशाताई (एक -दोन कार्यक्रमात १-२ एपिसोड्स साठी का होईना), हृदयनाथ हे सुद्धा परिक्षक म्हणुन होतेच ना.
भले ते मानधनासाठी नसतील गेले. पण या कार्यक्रमांना हजेरी लावुन आणि मग तिकडे प्रयोजकांवर स्तुतीसुमन उधळुन त्यांनी ही अप्रत्यक्ष पणे आपला पाठिंबा जाहीर केलाच होता.
त्यामुळे आज जर मुकेश्/रफी/किशोर असते तर ते या असल्या कर्यक्रमांना आले नसते हे याची १००% खात्री देता येत नाही.
2 Sep 2010 - 8:54 pm | बेसनलाडू
'कदाचित' असे म्हणून शक्याशक्यता दर्शवली आहे.
(सावध)बेसनलाडू
2 Sep 2010 - 1:08 am | वाटाड्या...
तात्याराव...
कसं चाल्लं आहे? जाऊ द्या..असं होतं कधी कधी..जो पर्यंत शास्त्रीय संगीताची चेष्टा होत नाही तोवर कलाकाराने व्यक्तीगत आयुष्यात काय कराव याला थोडंसं सैल सोडलेलंच बरं !!!
- वाटाड्या...
2 Sep 2010 - 8:06 am | निरन्जन वहालेकर
पंडीत दिनानाथ मंगेशकरांची शास्त्रीय संगीतातील समर्थता,समृद्धता अद्वितीय असूनही संसाराची झालेली परवड लातादिदि ने फार जवळून अनुभवली. त्यामुळेच फक्त शास्त्रीय संगीत हेच ध्येय ठेवले नाही अर्थात दिदीची शास्त्रीय संगीतातली योग्यता सर्वोच्च आहे हे त्यांना " कलकी लडकी " संबोधणाऱ्या दिग्गजानाही मान्य करावेच लागले.पण दीदी शास्त्रीय संगीत खूप गायली नाही याचे कारण हेच असावे
सांगायचा मुद्दा फक्त शास्त्रीय संगीत गाऊन संसार चालवणे आजही कठीण आहे कारण सगळेच पंडीत भीमसेन जोशी किंवा पंडीत जसराज होऊ शकत नाहीत शिवाय नशिबाची साथ असावी लागतेच व प्रस्थापित होईतो कदाचित आयुष्य फारशी आर्थिक तरतूद न होताच निघून जाऊ शकते.ह्याचे भान ठेऊन काही वेळा तत्वांना मुरड घालणेच शहाणपणाचे ठरते..त्यामुळे श्री राहुल देशपांडें यांचे काही चुकले असे वाटत नाही.
3 Sep 2010 - 6:05 am | सोम्यागोम्या
>>अर्थात दिदीची शास्त्रीय संगीतातली योग्यता सर्वोच्च आहे हे त्यांना " कलकी लडकी " संबोधणाऱ्या दिग्गजानाही मान्य करावेच लागले
असं कशाच्या आधारावर म्हणता तुम्ही? त्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहेच. पण लता दिदिंचं शास्त्रीय मी तरी अजून ऐकलं नाही मग त्या शास्त्रीय कमी गाऊनही शास्त्रीयच्या सरवोच्च कशा झाल्या?
त्या अर्थातच भारत रत्न आहेत व फार मोठ्या व्यक्ति आहेत. तुमच्या विधानाचा अर्थबोध मला नीटसा झाला नसावा.
2 Sep 2010 - 10:35 am | विसोबा खेचर
आपापले विचार कळवणा-या सर्व प्रतिसादींचे आभार..
तात्या.
2 Sep 2010 - 10:38 am | मदनबाण
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!
१००% सहमत...
2 Sep 2010 - 10:58 am | वेताळ
शेवटी परिक्षक म्हणुन पैसा मिळणार असेल तर त्यानी पंच व्हावे असे मला वाटते. निव्वळ कला जवळ बाळगुन जगणे खुप कठिण आहे. कला जिवंत राहणे साठी तो व्यक्ती /कलाकार सुस्थितीत असणे आजकाल महत्वाचे आहे. नाहीतर मागे एका धाग्यात उल्लेख असलेला महान कलाकार दारु पिऊन रस्त्यावर बेवारसी पडला होता,त्याला मध्यप्रदेश सरकारने आधार दिला. ह्या कारणानी माणसाची कलेकडे व कलाकाराकडेबघण्याची दृष्टीचांगली रहात नाही.परिक्ष़क म्हणुन त्यानी प्रामाणिक काम करावे हीच आमची इच्छा आहे.
2 Sep 2010 - 11:04 am | विसोबा खेचर
राहुलच्या परिक्षक असण्याबद्दल किंवा पैसा मिळवण्याबद्दल सदरच्या पत्रात कुठेही आक्षेप व्यक्त केलेला नाही..
परिक्षक या नात्याने त्याला पूर्णाधिकार हवेत इतकेच म्हणणे. आक्षेप आहे तो त्याने असे धेडगुजरी परिक्षक पद स्विकाराले या गोष्टीला..
तात्या.
2 Sep 2010 - 4:51 pm | जयंत कुलकर्णी
तात्या,
आपल्या एक लक्षात आले आहे का ? हल्ली प्रवाहाच्या विरूध्द पोहणार्या माणसाला मूर्ख समजतात. माणसाने कसे, आपल्याला पटले नाही तरी स्वतःच्या मनाविरूध्द पैसे मिळतात म्हणून पडेल ते काम केले पाहिजे. तोच खरा शहाणा !
कलाकार हा मनस्वी असतो असा आमचा आपला गैरसमज होता. आम्ही असल्या कलाकारांकडे( तुम्हाला जे अपेक्षीत आहेत तसल्या) तात्या , आदराने बघत होतो. आमच्यापूढे अशी अनेक उदाहरणे होतीच. आता बहूदा तुमच्या आमच्या सारख्यांना लोक वेडेच समजतील.
असो.
:-)
2 Sep 2010 - 8:25 pm | डॉ.प्रसाद दाढे
तात्या तुमची कळकळ प्रामाणिक आहे पण हे अरण्यरुदन आहे.. तुम्हीच मागे सांगितलेला भीमसेन
जोशींचा किस्सा आठवला. जेंव्हा हे स्पर्धावाले परीक्षक व्हा म्हणून त्यांच्या मागे लागले तेव्हा 'अजून
मीच गाणं शिकतो आहे, मी कुठून परीक्षक बनू? असं म्हणून खजील केलं होतं..
ह्या सारेगमपवर पूर्वीही मिपावर चर्चा झालेली आहेच..
http://www.misalpav.com/node/1396
पूर्वीही सुगमसंगीत स्पर्धा व्हायच्या पण त्यात पब्लिक पोलवगैरे प्रकार नव्हता (सुदैवाने). मेट्रो मर्फी
ऑल इन्डिया स्पर्धेला अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन आणि वसंत देसाईंसारखे
महान संगीतकार परिक्षक होते आणि अर्थातच त्यांचा निर्णय अंतीम होता. उगाच आपल्या गल्लीबोळात
पब्लिक पोलची भिक्षा मागणारे बॅनर लावून गठ्ठा मते गोळा करून मदनमोहन वा सी. रामचंद्रचं मत खोटं
ठरविण्याचं कुणाचं धैर्यच झालं नसणार..असो, कालाय तस्मै नमः
2 Sep 2010 - 8:44 pm | विसोबा खेचर
हो, हे मात्र खरं आहे..
आता मात्र सारेच महगुरू व्हायला निघाले आहेत/झाले आहेत..!
आमच्या अण्णांना मात्र अजूनही कुंदगोळला जाऊन सवाईंकडे तोडीची तालीम घ्यायची इच्छा आहे..आमचे अण्णा अजूनही विद्यार्थीच आहेत..!
..........आणि म्हणूनच अण्णा खूप खूप मोठे अहेत..!
(भीमसेनभक्त) तात्या.
3 Sep 2010 - 12:35 am | इन्द्र्राज पवार
"मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धेला अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन आणि वसंत देसाईंसारखे महान संगीतकार परिक्षक होते आणि अर्थातच त्यांचा निर्णय अंतीम होता."
~~ नेमका हाच किस्सा त्या स्पर्धेत अंतीम विजयी ठरलेले गायक 'महेन्द्र कपूर' यानी गेल्या महिन्यात विविध भारतीच्या खास मुलाखतीत सांगितला. अंतीम फेरीत एकूण ८ स्पर्धक होते, पण वरील पाच महान संगीतकारांच्यात विजयी गायक/गायिकाबाबत एकमत होईना. वेळ होऊ लागला तसे मर्फी संयोजकांनी स्पर्धकांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले व रात्री परत हे ५ दिग्गज चर्चेला बसले. शेवटी आपण सर्वच बाजूला राहू या आणि एच.एम.व्ही. चे प्रसिध्द सॉन्ग्ज रेकॉर्डिस्ट श्री.कौशिक यांना पाचारण करावे आणि या ८ स्पर्धकांची त्यांची गाठभेट न घालता पडद्यामागे त्यांना ठेवून श्री.कौशिक यांना फक्त आवाजच ऐकवायचा आणि त्या आवाजाच्या अनुषंगाने त्यांनी गुण द्यायचे. दुसर्या दिवशी या आठही स्पर्धकांना स्टेजच्या मागे नेण्यात आले व त्यांना विशिष्ट असे तीन आकडी क्रमांक देण्यात आले. माईकसमोर त्याने यायचे, आपला क्रमांक सांगायचा, गाणे सुरू करायचे जे स्टेजच्या दुसर्या बंद खोलीत बसलेल्या श्री.कौशिक यानाच फक्त ऐकू जाईल व त्यानुसार ते फक्त "क्रमांका"ला गुण देतील. (स्पर्धकानाही श्री.कौशिक दिसत नव्हते.)
या अनोख्या रितीने आठ उमेदवारांनी परत संयोजक आणि ५ संगीतकारांच्यासमोर एकेक गाणे सादर केले, जी गाणी श्री.कौशिक यानी 'प्रत्यक्ष पाहिली नाहीत', मात्र त्या क्रमांकाच्या आधारे त्यांनी आपला असा गुणतक्ता तयार केला, आणि नंतर त्यांच्या दृष्टीने विजयी झालेल्या 'क्रमांका'चे कार्ड श्री.नौशाद यांच्याकडे दिले. विजेते होते श्री.महेन्द्र कपूर; ज्यांना दुसर्याच दिवशी श्री.नौशाद यानी "सोनी महिवाल' चित्रपटातील गाण्यासाठी करारबद्ध केले.
इन्द्रा
3 Sep 2010 - 6:25 am | मुक्तसुनीत
सारेगम सारख्या प्रकारांमुळे त्रास होत असेल तर ते पाहू नये. मी पाहात नाही. मुलांच्या सारेगमपच्या पहिल्या सीजनची सीडी पाहतो/ऐकतो. मजा येते.
राहुल देशपांडेचे गाणे ऐकावे, तो किती कुठे कसे पैसे कमावतो आहे वगैरे वगैरे भानगड कामाची नाही. तेच सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटचे. तेच रहमानच्या, शंकर महादेवनच्या संगीताचे , आमीर खानच्या सिनेमाचे.
मला असे वाटते, हल्ली कलाकाराची कला, क्रीडापटूची क्रीडा पहायची सोडून , त्यांना "सेलेब्रिटी" म्हणून त्यांच्या कारकीर्दीव्यतिरिक्तच्या कामगिरीकडेच बारीकसारीक लक्ष दिले जाते. आपापल्या क्षेत्रांमधे हे सर्व थोर असले तरी पैसा, प्रसिद्धी या सार्यांच्या संदर्भात ती माणसेच आहेत. आपापल्या कला/क्रीडेच्या संदर्भात त्यांनी खूप विचार केला असेलसुद्धा , परंतु कुठली गोष्ट जास्त श्रेयास्पद आहे , कुठली सर्वात जास्त नीतीमान आहे इत्यादि इत्यादि बाबतीतले सर्वोत्तम विवेकी मत त्यांच्याकडे असायलाच हवे ही अपेक्षा कितपत रास्त आहे ?
सारेगमप मधे परीक्षक म्हणून काम करण्यापेक्षा कितीतरी वाईट दर्जाची कामे लोक करतात. राहुल देशपांडेवरचा हा हल्ला अनाठायी आहे.