तू तर नागीण!

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
27 Aug 2010 - 11:10 am

"तू तर एक जातिवंत नागीण निघालीस. मला तुझा सर्पस्वभाव नव्याने कळला..
काल तुझी माझी भेट झाली, कदाचित शेवटचीच. या आधीही आपण भेटलोच की. पण कालची भेट बहुदा अखेरचीच ठरणार होती तर..
तत्पूर्वी व्हायचं असं की, तू माझ्या अंगणात यायचीस. मनमोहकशा सळसळत्या मदमस्त चालीत. कधी अवचित, तर कधी ठरवून. त्या तुझ्या नव्या नव्हाळीच्या सावळ्या रुपावर, मनोवेधक गोड शब्दांनी लपलपणाऱ्‍या जिव्हेच्या करामतीवर मी पटकन भाळलो. तुझी आकर्षक बांधणी, मुळचीच तंग धाटणी अन् अंगाची आकर्षक वेढणी मला वेडावून जायची. वाटायचं चला आपणही आता कात टाकावी, तुझ्या निकट जावं, सळसळावं, खेळावं. मीही मग तसा वागू लागलो की तुझ्या डोळ्यांतून अनामिक प्रीत ओसंडायची, जिभेवर प्रेमाचे गोड अमृत यायचे.
तू नागीण असली तरी तुझ्या त्या गहिऱ्‍या नेत्रांत विखार नसायचा की व्यवहार. तू एक मस्तमौला बनून माझ्या शाब्दिक पुंगीपुढे मनसोक्त डोलायचीस. मला वाटायचं आता काम झालंच समजा. बेशक तुला अंजारावं, गोंजारावं, तुझ्याशी सर्पक्रिडा करावी, त्रिवेणीच्या आसनात पहुडावं- रात्रभर, निपचित अन् तृप्तेतेची निद्रा घेत. अशी कितीतरी हवीहवीशी स्वप्ने मी माझ्या पेटाऱ्‍यात वळवळत कूस बदलतांना पाहिली होती...
काल तू भेटलीस तेव्हा तुझा रागरंग वेगळाच जाणवला. तरीही मी तुला हात लावण्यास उद्युक्त झालो ते केवळ तुझ्या प्रेमळ वार्तालापाच्या आधारेच. परंतु हाय रे कर्म माझे, तू फणकन् फणा उगारलास. मी मागे सरकलो.
अशाप्रकारे तू चारपाच जणांना अधू केल्याचं तेव्हा मला सांगून टाकलं. 'पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नका' असं अप्रत्यक्षपणे सुनावलं. मी हात मागे घेतला. माझी शाब्दिक पुंगी गुंडाळली. तेव्हा तू फणा काढून माझ्याकडे अविश्वासू नजरेने पाहत होतीस. तुझ्या डोळ्यांत प्रेमाचा लवलेश नव्हता, होता फक्त अंगार! त्यात तुझी तरी काय चूक म्हणा. तुला अनेकांनी छळलेलं, गैरफायदा घेऊन पिळलेलं. हे तूच एका भेटीत मोकळ्या मनाने सांगितलं नव्हतंस? एकाने तर म्हणे आपल्या रुपाचं, समृद्धतेचं गारुड तुझ्यावर टाकून तुला काही काळ आपल्या पेटाऱ्‍यात खेळवलेलं. तेच अशाश्वत जिणं तुला नको वाटलं असावं म्हणूनच तू पलटवार केलास. मला वाटलं तू माझ्याशी मनसोक्त जुळशील, मला तुझ्या प्रेमरंगात घोळशील. पण झालं भलतंच. तू जातिवंत नागीण निघालीस. नशीब माझं तू मला कडाडून डंख केला नाहीस. नाहीतर मी कोणाला तोंड दाखवू शकलो असतो?
मला माझी जागा दाखवून तू निघालीस.. तुझ्या नेहमीच्या मोहक सळाळत्या चालीत. तेव्हा तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणं इतकंच काय ते मी करु शकत होतो. मागे वळून तू त्या शुभेच्छांचा स्विकार केलास.. नेहमीच्या तुझ्या लोभस स्मितरेषेने. आणि तू झुडपाआड दिसेनाशी झालीस.. कायमची दुरावलीस.. लांबवर गेलीस.. आता तू पुन्हा माझ्या अंगणात दिसणार नाहीस, फिरकणार नाहीस म्हणून दुःख होतंय. परंतु जातांना एकच सांगून जायचं होतंस की तुझं खरं रूप कोणतं प्रीतीचं गाणं गात डोलणं की फणा काढून फुत्कारणं?"

तर मित्रांनो एकंदर ही अशी सर्पकथा आहे. बहुतेक वेळा घडते. नागिणी आपल्या पुंगीवर डोलल्याचा अभिनय करतात, आपलंच खातात, पितात अन् जेव्हा पेटाऱ्‍यात घेण्यासाठी आपण मोठ्या विश्वासाने त्यांना हात लावू जातो, तेव्हा कडाडून फुत्कारत आपला मूळ स्वभाव दाखवतात. तेव्हा कोणत्या नागिणीसाठी पुंगी वाजवायची,कोणत्या नाही की आपल्याच पेटाऱ्‍यात आपल्या नागिणीशी खेळत रहायचं हे आधीच ठरवावं. आजकालच्या प्रेमळ भासणाऱ्‍या सर्पिणीसुद्धा भल्याभल्या गारुड्यांना नादी लावून त्यांची लुंगी फेडून कधी पुंगी कापून नेतील याचा नेम राहिलेला नाही बघा...

जीवनमानमौजमजासल्लाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

काही गारूडी ही कमी नाहीत. नागिणींना डोलायला लावून पटकन हात पुढे करून पेटार्‍यात घालतात. त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतात.

कुसुमाग्रजांची नागावरची कविता अंधुकशी आठवली. या कथेत गारुड आहे, मोहीनी, सौन्दर्य आहे. सुरेखच आहे हे मुक्तक.