मैसूर - उटी - भाग २

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in कलादालन
23 Aug 2010 - 2:41 pm

मैसूर भ्रमंती नंतर आम्ही गाडी करुन उटीला जायला निघालो. मैसूर - उटी हा अवघा ३ - ३.५ तासाचा रस्ता. पण संपुर्ण रस्ताभर मंजील से बेहतर लगने लगे ये रास्ते असेच वाटत राहते. वास्तविक आम्ही गेलो होतो जुलै मध्ये. त्यावेळेस पुण्यात पाउस सुरु झाला होता. पण मैसूर ते उटी या रस्त्यात आम्हाला पावसाचे टिपुस सुद्धा नाही दिसले. पण एकंदर वातावरण खुपच सुंदर होते. निम्म्याहुन आधिक रस्ता बांदिपुर आणि मदुमलाई अभयारण्यातुन जातो. कर्नाटक बाजुचे अभयारण्य बांदिपुर म्हणुन ओळखले जाते तर मदुमलाई तामिळ्नाडुच्या बाजुचे. एरवी हे एकच अभयारण्य. सकाळच्या वेळी रस्ता पुर्ण धुक्याच्या दुलईत वेढला गेलेला होता. ऊटीचे थंडी काय असेल त्याचा प्रत्यय एकदा अभयारण्यात शिरल्यावर यायला लागला. थंड वार्‍याचे झोत अंगावर यायला लागले तसे अधुनमधुन आम्ही काचा बंद करुन गाडीतील वातानुकुलन यंत्रणा चालु करायला सुरुवात केली. AC चे वारे थोडे कमी थंड होते. नंतर मात्र आम्ही हा नतद्रष्टपणा पुर्ण बंद केला. आणि निसर्गाचा आनंद पुर्ण अनुभवला. मैसूर ऊटी साठी AC गाडी उगाच केली असे मात्र नंतर संपुर्ण प्रवासभर राहुन राहुन वाटत होते.

बांदिपुर - मदुमलई ची ही छोटीशी झलकः

अभयारण्यातील रस्त्याने जाताना प्राणी चिक्कार दिसतात. तसे मैसूर च्या प्राणिसंग्रहालयात बरेच प्राणी बघितले होते. पण प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांना पारतंत्र्याची एक विषण्ण झालर असते. निसर्गाच्या सान्निध्यातल्या या प्राण्यांना पाहिल्यावर जास्त प्रसन्न वाटते. कदाचित हे मनाचे खेळ पण असतील. पण तसे वाटते खरे. कदाचित त्यामुळेच प्राणिसंग्रहालयातील हत्ती रोडावल्यासारखे वाटतात. मात्र अभयारण्यातील हत्ती, अगदी हत्तीपालन केंद्रातील सुद्धा जास्त तजेलदार वाटले. या अभयारण्यात गाडीतुन खाली उतरायला आणि छायाचित्रण करायला मनाई आहे. आणि पकडल्यावर जबर दंड देखील होतो. आम्हाला हे माहिती नसल्यामुळे आणि आम्हाला महिती नाही हे वनरक्षकांना महिती नसल्यामुळे आम्ही थोडे फोटो काढुन घेतलेच

अभयारण्याच्या या दर्शनाने उटीपेक्षा इथेच कुठेतरी रहावे असे वाटायला लागले होते. तरीही नेटाने ऊटीला गेलोच. आणि मदुमलाईत रहायला नाही मिळाले याचे वाईट वाटले तरी उटीला गेल्याचा पश्चाताप मात्र नाही झाला इतके उटीदेखील सुंदर आहे. उटीला स्थानिक भाषेत उटकमंड असेही नाव आहे. पण कुठेही गेलो तरी पर्यटकांना उटी असेच म्हणताना ऐकले. समुद्रसपाटीपासुन उटी अवघे ७५०० फूट उंचीवर आहे. म्हणजे महाबळेश्वर पेक्षा केवळ ३०००- ४००० फूट उंच. उंचीतील हा फरक अर्थातच हवेत जाणवतो. पुण्यात ज्या वेळेस घामाच्या धारा लागत होत्या आणि महाबळेश्वरात पण थंडी वगैरे वाजत नव्हती तिथे त्याचवेळेस ऊटीला मात्र गुलाबी थंडी पडली होती. (आमच्यासारख्या सडाफटींग माणसांना गुलाबी थंडी कसली म्हणा. नुसतेच इतर जोडप्यांकडे बघुन गुलाबी गुलाबी म्हणायचे :) )

आम्ही पहिल्यांदाच दोडाबेट्टाला गेलो. आधीच उटी उंचावर त्यात दोडाबेट्टा उटीतले उंच शिखर, किंबहुना दक्षिण भारतातले सर्वात उंच शिखर. समुद्रसपाटीपसुन तब्बल ८६४० फूट उंचीवर. इथे आजुबाजुला हरीणे, जंगली अस्वले, ससे, चित्ता, नीलगाय इत्यादी प्राणी आहेत. आम्हाला एकही दिसला नाही. :)

दोडाबेट्टाचा अर्थ काय ते माहिती नाही. पण धुक्याची दुलई हेच नाव त्याला सार्थ ठरेल. दोडाबेट्ट्याला १२ महिने धुके असते. प्रमाण ऋतुप्रमाणे कमीआधिक असते एव्हढेच. दोडाबेट्टा वरुन काढलेली काही छायाचित्रे:

दोडाबेट्टावरुन आम्ही बॉटेनिकल गार्डन गाठले. तब्बल २२ एकरांच्या परिसरात वसलेले हे उद्यान केवळ वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीसुद्धा एक पर्वणी आहे. तिथल्या काही फुलांची ही छायाचित्रे:

उद्यानातील काही लॅण्डस्केप दृष्ये आणि दुर्मीळ वृक्षसंपदा:

उटीच्या रोज गार्डनच्यावर आधी पण एक धागा टाकला होता. तरीसुद्धा त्यातील काही खुप निवडक छायचित्रे इथे परत डकवण्याचा मोह आवरत नाही आहे. रोज गार्डन मध्ये २८०० पेक्षा जास्त जातींचे गुलाब आहेत आणि हे भारतातील अश्या प्रकारचे सर्वात मोठे उद्यान आहे:

वाटले होते त्यापेक्षा हा भाग जरा जास्तच मोठा झाला. त्यामुळे इच्छा असुनही उरलेले फोटो या भागात टाकत नाही आहे. आमच्या प्रवासाच अंतिम टप्पा होते कुन्नूर. शब्दातीत असे ज्या निसर्गाचे वर्णन करता येइल त्याची छायाचित्रे पुढच्या भागात टाकेन आता.

प्रवासभूगोलमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

वरतून ४ था फोटो खुप छान आहे बाकि फोटोज पण छान आहेत वर्णन पण मस्त !!!

मदनबाण's picture

23 Aug 2010 - 6:16 pm | मदनबाण

सर्वच फोटो मस्त...
मला ते डोळे मिटुन बसलेलं हरिण फार आवडलं... :)

रेवती's picture

23 Aug 2010 - 7:16 pm | रेवती

सगळेच फोटू छान आहेत पण पाडसाचा आणि दोड्डाबेट्टाच्या बोर्ड पासून खाली तिसरा, उनसावलीचा जास्त आवडले.

विलासराव's picture

23 Aug 2010 - 7:39 pm | विलासराव

सर्वच फोटो आवडले.खास करुन फुलांचे.आतापर्यंत उटीला न गेल्याबद्द्ल वाईट वाटले.
प्रवासवर्णनही मस्तच.

प्रभो's picture

23 Aug 2010 - 8:17 pm | प्रभो

झ का स!!

पुष्करिणी's picture

24 Aug 2010 - 12:11 am | पुष्करिणी

सगळे फोटो सुरेखच आलेत

तमिलनाडू टुरिझमच्या पाटीच्या फोटोपासूनचा दुसरा आणि तिसरा फोटो एकदम सुरेख! :)