तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृती आकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तण उगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!!
अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली. एक देखणी, सालंकृत ललना तिथे प्रेक्षकांना तिने बनवलेल्या क्रोशाच्या पिशव्या, पर्सेस, रुमाल वगैरे मोठ्या अभिमानाने व उत्साहाने दाखवत होती. झाले! ठिणगी पडली!! मला फार पूर्वी मी बनवलेल्या क्रोशाच्या वस्तूंची आठवण झाली. घाईघाईने मी कपाटे हुडकायला सुरुवात केली.
बऱ्याच खटपटी-लटपटींनंतर लक्षात आले की आपण त्यांतील बऱ्याच वस्तू कोणाकोणाच्या हातांत कोंबल्या आहेत..... व त्यांच्या प्रतिक्रियेसाठी क्षणभरही प्रतीक्षा न करता तिथून काढता पाय घेतला आहे!!! पण अशा बेइमान स्मृतींनी नाउमेद होणे आमच्या रक्तात नाही बरे! म्हणूनच, कपाटातील कपड्यांच्या अक्षम्य उलथापालथीनंतर जेव्हा मम हाती एवढे दिवस तोंड लपवून बसलेली क्रोशाची सुई लागली तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला! 'हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे' अशा गाण्याच्या लकेरी घेत मी एका कोपऱ्यातील प्लॅस्टिकच्या पिशवीतील दुर्लक्षित लोकरीच्या गुंड्यांकडे माझा मोर्चा वळवला. येथे मी विनम्रपणे नमूद करू इच्छिते की माझ्या एका मावसबहिणीचा लोकरी कपडे विणण्याचा व्यवसाय असल्यामुळे तिच्या कृपेने आमच्या घरी कधीच लोकरीचा तुटवडा भासत नाही. तिच्या कपडे विणून उरलेल्या लोकरीला खासा न्याय देण्याचे धार्ष्ट्य मी वेळोवेळी माझ्या 'अनवट कलाकृती'च्या माध्यमातून समस्त जगताला दाखवून देत असते.
असो. तर आता लोकरही सापडली होती, आणि क्रोशाची सुईदेखील! माझ्यासारख्या अट्टल कलावंताला दुसरे काय लागते! तत्काळ माझ्या कोमल, कुशल हस्तांनी टाके विणायला सुरुवात केली. औदार्याचा जन्मजात वस्तुपाठ मिळाल्याने आपण विणताना टाके मोजावेत, आकार ठरवावा असे माझ्यासारख्या मनस्वी कलावंताला शोभून दिसत नाही. मग कितीही टाके गळाले, उसवले, आक्रसले किंवा ढिले पडले तरी बेहत्तर.... आम्ही आमच्या कलेशी कोणतीही तडजोड करीत नाही! लोकरीचा एक गुंडा संपला तर दुसऱ्या रंगाचा गुंडा घ्यायचा.... अगदी विणीच्या एका ओळीच्या मधोमध देखील! पारंपारिक, संकुचित दृष्टीच्या पल्याड जाऊन धाडस दाखवणाऱ्यालाच खरी कला उमगते असे म्हणतात. कदाचित म्हणूनच मी क्रोशाच्या बारीकशा सुईच्या माध्यमातून माझी बेदरकार, धाडसी वृत्ती जगाला दाखवून देत असावे!
तर, अशा वर्णनातून वाचकांना जो अर्थबोध व्हायचा तो एव्हाना झाला असेलच... हिरव्यागार, पोपटी रंगाचे दोन मोठे लोकरी गुंडे माझ्यासमोर आ वासून पडले होते.... त्यांच्या डोळ्यांत भरणाऱ्या (की खुपणाऱ्या? ) रंगरूपाकडे दुर्लक्ष करीत मी दात-ओठ खाऊन त्यांच्या मूक आव्हानाला प्रतिसाद देत होते. टाक्यांमागून टाके, ओळींमागून ओळी, विणलेल्या खांबांमधून लपंडाव खेळताना मी जणू देह-काळाचे भानच विसरले होते. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तशी मला फक्त पोपटी लोकर दिसत होती. झरझर धावणाऱ्या हातांमधून एक गोजिरा आकृतिबंध जन्म घेत होता. येणारे-जाणारे माझी ही (अ)घोर तपश्चर्या पाहून (बहुधा) कौतुकाने तोंडातून 'च च' असले काहीसे उद्गार काढून मला प्रोत्साहन (की सांत्वना? ) देत होते. वडिलांना वाटले की मी त्यांच्यासाठी खास थंडीच्या मुहूर्तांवर मफलर विणत आहे! तसे त्यांनी बोलूनही दाखवले. परंतु अहोरात्र माझ्या लोकरी कलाकृतीच्या आराधनेत (शब्दशः) गुंतलेल्या मला त्यांचे शब्द जाणवले तरच नवल!
असेच विणकाम-तपश्चर्येत तीन दिवस गेले. बाकीचे जग आपापल्या दिनक्रमांत गुंग होते.... पण माझ्या तारवटलेल्या डोळ्यांना एकच लोकरी स्वप्न दिसत होते. बघता बघता अर्धा हात लांबीचा, सुबक विणीचा एक देखणा चौकोन तयार झाला होता. वडील अधून-मधून त्याच्याकडे अनिमिष दृष्टीने पाहत 'वा! छान! ' असले काहीसे उद्गार काढत. पण मला त्यांमागील मर्म उमगत नव्हते. त्या चौकोनातून मस्त पर्स साकारेल अशा दिवास्वप्नांत मी गढले होते.
लोकरीचे गुंडे संपत आले तसे माझे विणकामही संपुष्टात आले. विणलेला चौकोन तीन बाजूंनी शिवून घेतला. त्याच्या कडांना दोन सुंदर गोफ विणून अडकावले... पण माझी पर्स अचानक झोळीप्रमाणे मध्यावर खचू लागली... आ वासलेले तिचे तोंड मिटता मिटेना! गोफांचे ठिकाण बदलून पाहिले, परंतु एकदा रुसलेली पर्स माझ्या मनातला आकार घेईना.... मी अशीच खटपटत असताना पिताश्रींची नजर माझ्या हातातील केविलवाण्या दिसणाऱ्या आकारावर पडली. "हे काय?!! तू मफलर नाही बनवलास? " त्यांचा प्रश्न आत्ता कोठे माझ्या ध्यानात येत होता. मीही मग ओशाळे हसत "अहो, लोकरच संपली! " अशी सारवासारव केली. अखेर माझ्या सर्व प्रयत्नांना त्या आडमुठ्या पर्सने दाद न दिल्याने मीही तिला रागारागाने तिचे गोफांचे अलंकार काढून विणकामाच्या पिशवीत पुन्हा ढकलून दिले.
रात्री त्या फसलेल्या पर्सच्या विचारांनी डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय योजिले होते आणि काय घडले! केवढी ही घोर फसवणूक!! मनाची समजूत घालूनही मन जुमानत नव्हते. ती पोपटी लोकर माझ्या मिटल्या पांपण्यांआडून मला वाकुल्या दाखवीत होती. क्रूर! निष्ठुर!! तिला आता चांगलाच धडा शिकवावा हा विचार मनास चाटून गेला आणि मी अंथरुणावरच ताडकन उठून बसले. वडिलांना जोरात हाक मारली. ते बिचारे झोपायच्या तयारीतच होते. ते 'काय गं? ' असे विचारत आले मात्र, आणि मी जादूगाराच्या पोतडीतून काढावी तशी ती अडेलतट्टू पोपटी बिनबंदाची पर्स पिशवीतून काढून त्यांच्यासमोर धरली. त्यांनी माझ्याकडे बुचकळलेल्या नजरेने पाहिले. तो शिवलेला चौकोन मी त्यांच्या हातांत कोंबला व मोठ्या ऐटीत उद्गारले, "बघा बरं, डोक्याला बसते आहे का ही टोपी... " त्यांनीही लगेच ती नक्षीदार, जाळीदार 'टोपी' डोक्यावर चढवली. अगदी फिट्ट बसली. कानही झाकले जात होते. वा! जणू त्यांच्या डोक्याच्या मापानेच ही टोपी विणल्यासारखे वाटत होते. माझा त्या पर्सवरचा सूड पूर्ण झाला होता!!! "बाबा, राहू देत तुम्हालाच ही टोपी.... मी तुम्हाला मफलर विणेपर्यंत नक्की कामी येईल... हां,बाहेर घालता नाही येणार तिच्या पोपटी रंगामुळे, पण घरी घालायला काही हरकत नाही."
वडील नव्या लोकरी टोपीला मस्तकावर चढवून पुन्हा झोपायला निघून गेले आणि पर्सच्या आक्रसलेल्या त्या नव्या रूपात क्रोशाच्या पुढील कलाकृतीची मधुर स्वप्ने पाहत मीही निद्रादेवीस शरणाधीन झाले!
-- अरुंधती
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
15 Aug 2010 - 9:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच ... अरुंधतीताईचा लेख मस्त, कुरकुरीत आहे यात काय नवल!
पुढच्या वेळेला मफलर घे विणायला, नक्की स्वेटर नाहीतर पर्स जमेल! ;-)
बर्याच दिवसांनी लेख टाकलास! पण लेखाचं शीर्षक वाचून 'आक्रसलेल्या आक्रोशाच्या अक्कलकथा' वगैरे "दवणीय" शब्द उगाच डोक्यात आले आणि मी क्षणभर घाबरले!
15 Aug 2010 - 9:52 pm | निखिल देशपांडे
लेख वाचुन आई काही तरी एक उलटे दोन सुलटे करायची ते आठवल..
छान लेख
15 Aug 2010 - 11:17 pm | पुष्करिणी
मजा आली वाचून, बाबांनी खरच वापरली का टोपी?
15 Aug 2010 - 11:23 pm | असुर
अरुंधतीतै,
मस्तंच लिहिलंय!!!
हे वाचून आम्हास आमचे बाळपणीचे अबोध दिवस आठवले जेव्हा आम्ही चित्रकलेचे अनभिषिक्त सम्राट होतो. आमच्यासमोर एम. एफ. हुसेन, मुळीक वगैरे सगळे छाटछुट होते. कारण आम्ही काय बनवायचो हे आम्हा स्वत:स देखील ठाऊक नसायचे. देवी सरस्वती आमच्या ब्रशच्या फटकार्यावर इतकी प्रसन्न होती, की एकाच कलाकृतीमध्ये जनांस अनेकांचा भास होत असे.आम्ही 'वाघ' काढावा तर लोकांस तेथे सशापासून ते सिंह, गाढव, कोल्हा, कुत्रा, हरीण सर्व-सर्व दिसत असे. धन्य ते दिन ,आणि धन्य तो कलाकार. ;-)
हल्ली आम्ही चित्रे काढणे बंद केले आहे.
--राजा असुर वर्मा
16 Aug 2010 - 12:13 am | शिल्पा ब
मजा आली वाचुन.
16 Aug 2010 - 4:35 am | शुचि
अरुंधती मस्त गं. माझी धाव शिवणकामाच्या तासाच्या पलीकडे गेली नाही. मुली काय काय बनवायच्या रुखवतात मांडण्याकरता. आमचं रुखवत वैराण होतं . हा हा.
तुझी लेखनशैली मस्तच!
16 Aug 2010 - 5:58 am | सहज
छान लिहले आहे.
16 Aug 2010 - 4:57 pm | अर्धवट
सहजरावांची बाडिस
16 Aug 2010 - 7:28 am | सुनील
मस्त लेख!
बाकी क्रोशे (crochet) ह्याला मराठीत विणकाम म्हणतात. आता विणकामातील "वि" र्ह्स्व की दीर्घ हा प्रश्न विचारू नका! कारण सहसा, दीर्घाची चाहूल लागल्यावर र्ह्स्वाची आठवण होते, असे म्हणतात!
स्पष्टीकरण - सदर प्रतिसाद जर कुणाला अश्लील वाटला तर क्षमस्व. परंतु, हा प्रतिसाद आम्ही (मराठी) शुद्धलेखनाला फाट्यावर मारतो (पण (इंग्लीश) स्पेलीन्ग्समध्ये चूका टाळ्ण्याचा प्रयत्न मात्र करतो), असा भंपकपणा करणार्यांसाठी आहे!
16 Aug 2010 - 7:31 am | बहुगुणी
विणकामाच्या आणि क्रोशे च्या सुयांमध्ये फरक असतो असं वाचल्याचं आठवतं.
क्रोशे च्या सुईला hook असतो (crochet या फ्रेंच शब्दाचा अर्थच मला वाटतं hook असा आहे; चूकभुल दे. घे.)
Knitting: Construction of a fabric made of interlocking loops of yarn by means of needles.
Crochet: A process of creating fabric from yarn or thread using a crochet hook.
अरूंधती: लेख आवडला.
16 Aug 2010 - 7:34 am | सुनील
धन्यवाद! खरेच "बहुगुणी" आहात!
आता क्रोशेला मराठीत काय म्हणतात, हा प्रश्न उरलाच की!
16 Aug 2010 - 7:37 am | रेवती
मजेशीर कहाणी!
माझाही पेशन्स मोठाले नमूने पूर्ण होइपर्यंत टिकत नाही.
जे काय असेल ते थोडक्यात आटोपते घेतले नाही तर वर्षानुवर्षे लोळत पडते.
पोपटी रंग कसा दिसत असेल हा विचार सारखा मनात येत होता.;)
16 Aug 2010 - 7:54 am | स्पंदना
आमचा शिवण क्लास आठवला, निदान तुझी टोपी तरी झाली , मी करायला घातल तर बोटाच कव्हर तयार होइल!
एकदा त्या पांढर्या नाड्या वापरुन गाठी मारुन करायचा पडदा करायला घेतला, अजुन माहेरी नाड्यांचा तुटवडा नाही, म्हणजे बघ, तु काहीतरी केलस तरी.
बाकी पाक कृती प्रमाणे ही सुद्धा कृती असल्यान फोटो चालला असता! आम्ही तरी कधी पोपटी टोपी पहायची?
16 Aug 2010 - 4:53 pm | चित्रा
खुसखुशीत लेख आवडला.
16 Aug 2010 - 5:05 pm | चतुरंग
मस्त खुसखुशीत लेख.
शेवटी महत्प्रयासाने वडिलांना 'टोपी' घातलीत तर! ;)
(टोपीकर)चतुरंग
16 Aug 2010 - 5:21 pm | अरुंधती
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!
ती अजब कलाकृती मी फोटोरूपात येथे दाखवायचे धार्ष्ट्य करत आहे! माझी ती टोपी/ पर्स पाहिल्यावर जगातील थोरामोठ्या कलावंतांची आणि त्यांच्या कलाकृतींची आठवण आल्यावाचून रहाणार नाही!! ;-)
फोटोत फक्त तिचा जर्द पोपटी रंग असा हिरवट (!!) का दिसतो आहे ते मात्र कळले नाही!
16 Aug 2010 - 6:08 pm | चतुरंग
>>>>फोटोत फक्त तिचा जर्द पोपटी रंग असा हिरवट (!!) का दिसतो आहे ते मात्र कळले नाही!
फोटोतही तुमचा 'पोपट' करायचाच असे त्या टोपीने ठरवले असावे बहुदा! ;)
16 Aug 2010 - 6:28 pm | स्वाती२
मस्त!
16 Aug 2010 - 6:29 pm | अनिल हटेला
मजेदार आणी खुस्खुशीत !!
आवडला लेख !! :)
16 Aug 2010 - 7:16 pm | सुनील
पर्स-कम्-टोपी-कम्-मफलर छान आहे. बाकी त्या रंगाचं बघा बॉ. नाहीतर फोटोशॉप वापरा!
16 Aug 2010 - 8:51 pm | रामदास
अय्या !!! मी तर बाई मोजा विणायला सुरुवात केली होती
16 Aug 2010 - 8:54 pm | चतुरंग
(मोजा*)चतुरंग
*ही मोजा बंगाली आहे