पत्रके

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
3 Nov 2007 - 6:19 pm

"अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता.

दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना". मला हसू आले. त्या मुलाचे वाक्य मार्मिक होते. मी तो कागद घेण्याकरीता वाट बघत होतो. पत्रक हिंदीत होते. "क्या पटाखे फोडना जरूरी है?" ह्या संबंधी.

मला त्या मुलाच्या वाक्यावरून पत्रके (किंवा जास्त करून जाहिराती) आणि ते वाटणारे आठवले.
रस्त्यावरून जाताना, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, आज काल तर कार्यालयाच्या बाहेर ,बँक ,ए टी एम मशीन च्या बाहेर भरपूर लोक काही ना काही कागद आपल्या हातात देतात. (हमखास ठिकाण: दादर मार्केट मधील रेल्वेचा ब्रिज). अरे हो, वर्तमान पत्रे तर विसरलोच. आपण काही वेळा मूड असेल तर ते वाचतो, थोडेफार चांगले वाटल्यास घडी घालून खिशात ठेवतो, किंवा फाडून फेकून देतो. पण पुढे खरोखरच त्याचा उपयोग होतो का? होत नाही असे नाही परंतु माझ्या मते खूप कमी प्रमाणात.

त्यांचे ही किती प्रकार...
वजन वाढवा/कमी करा, १०% सूट, एखाद्या तांत्रिक बाबाचे उपाय, एखाद्या राजकीय पक्षाचे असतील तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या किर्तीबद्दल. आजकाल तर प्रत्येक बँक काही ना काही छापत असतेच. दररोज संध्याकाळी घरी आल्यावर एक पत्रक दरवाजावर असतेच. हे इंटरनेट घ्या , ह्याचे क्लास त्याचे क्लास.
मला त्याबद्दल राग येत नाही की वाईट वाटत नाही. त्यांना स्वत:च्या कामाबद्दल/उत्पादन/सेवेबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची असते. त्याचे काम ही पत्रके छापूनही केली जातात.

आधी मी ती पत्रके घ्यायचो आणि वाचून बघायचो. हळू हळू मग कंटाळा यायला लागला. वाटायचे नाहीतरी एखादी गोष्ट मी त्यावरून ठरवतच नाही. जरी एखाद्या ठिकाणी काही मेळावा चालू असेल, सूट मिळत असेल तरी ते अशा ठिकाणी, अशा वेळी असते की जायला मिळतच नाही. आज काल तर कोणी काही देत असेल तर मी वरूनच बघतो काय आहे ते आणि मग सांगतो नको. चांगले दिसल्यास घेतो. पण पुन्हा तेच. त्याचा फायदा घेतलेला मला तरी नाही आठवत :(
आठवला, इंटरनेट घेण्याकरीता त्याच पत्रकातील फोन नंबर फिरविला होता.

फक्त एका प्रकारच्या पत्रकांचा राग येतो. एखाद्या देवाच्या नावाने लिहून, ह्याच्या १००/२०० प्रती काढून इतरांना वाटा त्याने तुमची भरभराट होईल अन्यथा काहीतरी वाईट होईल. लहानपणी मी ह्याला घाबरायचो. नंतर मी आणि माझी बहीण तर असली पत्रके नाकारायचोच. का उगाच विषाची परीक्षा घ्या. नंतर मग असली पत्रके कधी चुकून मिळाली तर सरळ फाडून केराच्या टोपलीत टाकायला लागलो. आता त्याबद्दल काही नाही वाटत.

काही वेळा वाटते ते देणाऱ्याच्या मनात काय विचार चालू असतील? त्यांना काय फक्त ती पत्रके संपवायची असतात? त्यांना त्याने किती फायदा होतो? तो फायदा मग त्या मुलाला काय मोबदला मिळाला तो असो किंवा ते पत्रक छापणाऱ्याला त्याचा किती फायदा झाला ते. त्यांचा पत्रके छापण्याचा खर्च निघतो का? जर ते त्याच्याच समोर फेकून दिले तर त्याला काय वाटत असेल?

मागील आठवड्यात एक गंमत झाली. जेवणानंतर बाहेरील दुकानात जाताना माझ्या एका मित्राच्या हातात एका मुलीने एक पत्रक दिले. कोणत्या तरी मोबाईल फोन कंपनीचे होते. त्यातील त्यांच्या स्कीम वाचल्या. एक गोष्ट कळली नव्हती. मी त्याला म्हणालो की देणाऱ्याला विचारून घे. परत येता येता मित्राने ते पत्रक त्या मुलीच्या हातात ठेवले. आम्ही पुढे गेल्यावर त्या मुलीचे वाक्य ऐकायला मिळाले "वापस?"

जीवनमानराहणीप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

क्रेमर's picture

23 Jul 2010 - 3:34 am | क्रेमर

ह्याच्या १००/२०० प्रती काढून इतरांना वाटा त्याने तुमची भरभराट होईल अन्यथा काहीतरी वाईट होईल.

या धाग्याला प्रतिसाद द्या अन्यथा काहीतरी वाईट होईल असे शेवटी लिहायला पाहीजे होते.

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

देवदत्त's picture

28 Jul 2010 - 10:34 am | देवदत्त

ही ही ही
तसे लिहिले असते तर हा धागा ओसंडून वाहिला असता, म्हणून नाही लिहिले ;)

हर्षद आनंदी's picture

23 Jul 2010 - 2:31 am | हर्षद आनंदी

पोळी किंवा चपातीच्या भांड्यात अशी पत्रके ठेवता येतात, त्याने चपाती मऊ रहायला मदत होते
पापड, चकली, पुरी, करंज्या किंबहुना तेलकट पदार्थ यांच्या खाली ठेवल्यास तेल शोषुन घेतले जाते
.... इति मातोश्री!!

बाकी, ईमान \ रॉकेट करुन उडवायला एकदम योग्य.. :P

किंबहुना आडोश्याला गेल्यावर पाणी नसताना ईमर्जन्सी वापर ... =)) =)) =))

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

Pain's picture

23 Jul 2010 - 4:19 am | Pain

अशीच एक जाहिरात पूर्वी पाहिली होती.

एक जण पत्रके वाटत असतो आणि लोक ती न वाचता चुरगाळून फेकून देत असतात. आता काय करावे या विचारात असताना त्याला एक कल्पना सुचते ( किंवा कोणीतरी सुचवते) --> पत्रक न देता तो स्वतः च त्याचा बोळा करून देतो आणि कुतुहलापोटी तो माणुस बोळा उलगडून ते वाचतो :)

देवदत्त's picture

28 Jul 2010 - 10:33 am | देवदत्त

पाहिले तर नाही पण ऐकले होते असे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2010 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्ता, पत्रकांचा सुळसुळाट झाला आहे ही गोष्ट खरी. कॉलेजच्या गेटवर अशी पत्रक वाटणारी मंडळी आठ-पंधरा दिवसात दिसतच असतात. कोण-कोणते संगणक अभ्यासक्रम, नौकरीची हमी, फिसमधील सवलत. असे काय नी किती. वेगवेगळ्या कंपन्यांचे सीम कार्ड, स्कीम. पण, एक गोष्ट खरी की अशा पत्रकांचे आयुष्य काही मिनिटांचेच.

-दिलीप बिरुटे