॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

मेघवेडा's picture
मेघवेडा in जनातलं, मनातलं
20 Jul 2010 - 3:40 am

मागील भागात म्हटल्याप्रमाणे या भागात आपण 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार पाहू.

अन्योक्ति मराठीतही वापरली जाते. संस्कृत काव्यशास्त्रविनोदात असलेली अन्योक्तिची उदाहरणे एक निराळाच आनंद देऊन जातात. मूळ तत्व तेच. 'अन्य' वस्तू/गोष्टीच्या उक्तीने आपल्याला केलेला उपदेश किंवा 'लेकी बोले सुने लागे' असं वर्णन. प्रत्यक्ष मनुष्याचा उल्लेखही न करता, मनुष्यस्वभावाचे समर्पक विवचन करणार्‍या सुभाषितांचा रसास्वाद लुटणे किती आनंददायी आहे. काही सुभाषितांत तर केवळ चार चरणात आयुष्याचे तत्वज्ञान सामावलेले असते. खरंच हा सुभाषितांचा साठा म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. चला तर अशा काही 'अन्योक्ति' पाहूया.

अपसर मधुकर दूरं परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे।
इह न हि मधुलवलाभो भवति परं धूलिधूसरं वदनम्॥

येथे भुंगा आणि केतकीच्या फुलाच्या उदाहरणातून मनुष्यस्वभावाचं चित्रण केलेलं आहे. आधी सुभाषिताची समजण्यास सोपी अशी सुटसुटीत मांडणी करून भाषांतर करून घेऊ. 'मधुकर, दूरं अपसर, परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे' - हे भुंग्या, पुष्कळ सुगंध असणार्‍या केतकीच्या फुलापासून दूर जा. (केतकीच्या फुलात पुष्कळ सुगंध असला तरी त्यापासून दूर जा) का? तर 'इह न हि मधुलवलाभः' - खरोखर इथे मध मिळायचा नाही, 'भवति परं धूलिधूसरं वदनम्' - पण (तुझे) तोंड मात्र धुळीने माखून जाईल.
अर्थात केतकी इतकी सुगंधी की एखाद्याला भुरळ पडावी, पण मधाचा मागमूसही नाही तिच्यात. उलट जी पांढरट भुकटी* केवड्यावर असते त्याला कवि धुळीची उपमा देतो. आणि भुंग्याला उपदेश करतो की, 'हे भुंग्या तू या केतकीच्या सुगंधाला भुलू नकोस. इथे तुझा कार्यभाग तर साधला जाणार नाहीच, उलट तुझं तोंडच धुलिमय होईल!' या ठिकाणी केतकीच्या रूपकातून गुणी पण गर्विष्ठ, कद्रू स्वभावाच्या मनुष्याचे चित्रण केले आहे. ज्याप्रमाणे केतकीकडे सुगंध मुबलक आहे त्याचप्रमाणे एखाद्याकडे एखादा गुण जरी मुबलक असला, तरी त्याच्याकडे औदार्य असल्याशिवाय त्या गुणांना शोभा येत नाही. अमक्याकडे मुबलक धन आहे पण त्या धनाचा त्याला गर्व झाला आहे, अशा माणसाकडे मदत मागण्यास आलेल्या गरजूंना त्याच्याकडून काही मिळणार नाहीच उलट त्यांचा अपमान होऊ शकतो. तर अशा मनुष्याच्या श्रीमंतीची महती का बरं वर्णावी? तसेच एखादा मनुष्य विद्वान आहे पण त्याने त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने काही शिकण्यासाठी आलेल्याला आपले ज्ञान दिलेच नाही तर अशा ज्ञानाचा तरी काय उपयोग? तर नुसते गुण असून भागत नाही तर गरजूंना त्या गुणांचा फायदा होत नसेल तर त्या गुणांना शोभा येत नाही. तेव्हा सामान्य मनुष्याला भुंग्याची उपमा देऊन कवि म्हणतो, "अरे भाबड्या, अशा गुणी पण गर्विष्ठ, कद्रू मनुष्यांपासून दूर राहा रे बाबा. तू ज्या इच्छेने त्याच्याकडे चालला आहेस ती पुरी व्हायची नाहीच, पण तूच पोळून निघशील."
खरंच 'औदार्याशिवाय गुणांना शोभा नाही' हे किती समर्पकपणे भुंगा आणि केवड्याच्या उदाहरणातून सांगितले आहे.

*त्या पांढरट भुकटीला काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.

अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम्।
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा॥

या सुभाषितात फुलांचं अतिशय सुरेख उदाहरण देवून संतांच्या 'सर्वे मानवा: समा:' या भावाचं चित्रण केलं आहे. पुन्हा, आधी सुलभ भाषांतर करून घेऊ. 'अञ्जलिस्थानि पुष्पाणि' - ओंजळीत असलेली फुले, 'वासयन्ति करद्वयम्' - दोन्ही हातांना सुगंधित करतात. 'अहो सुमनसां प्रीति:' - फुलांचं प्रेम, 'वामदक्षिणयो: समा' - डाव्या आणि उजव्या, दोन्ही हातांवर सारखंच असतं. किती सुरेख उदाहरण आहे. ओंजळीत फुलं धरली तर त्यांचा गंध दोन्ही हातांना लाभतो. फुले काही 'डावा-उजवा' असा भेद करत नाहीत, ती दोन्ही हातांना सारखीच सुगंधित करतात. येथे 'सुमनसां' या शब्दावर श्लेष आहे. सुमन म्हणजे अर्थात फूल तर 'सुमनसां' म्हणजे षष्ठी बहुवचन - फुलांचे/च्या/ची. तर दुसरा अर्थ आहे 'सु-मनसां' म्हणजेच चांगल्या मनाच्या माणसांचे/च्या/ची, अर्थात संतसज्जनांचे. अशाप्रकारे संतांना फुलांची उपमा देऊन त्यांच्या मनात असलेल्या 'सर्वजण सारखेच' या भावाचे येथे चित्रण केले आहे. येथे 'वाम' हे दुर्जनांचे तर 'दक्षिण' हे सुजनांचे रूपक आहे. संतजन डावा-उजवा असा भेदभाव करत नाहीत तर त्यांचे सज्जनांवर आणि दुर्जनांवरदेखील सारखेच प्रेम असते.

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

चातकाला केलेला हा उपदेश माणसांनाही तंतोतंत लागू होतो. आधी भाषांतर करू. 'रे रे मित्र चातक, क्षणं सावधानमनसा श्रूयतां' - अरे मित्रा चातका, क्षणभर सावधपणे ऐक. 'अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने' - आकाशात ढग बरेच आहेत. 'सर्वेऽपि नैतादृशा' - पण सगळेच काही सारखे नाहीत. 'केचिद् वृष्टिभि: आर्द्रयन्ति धरणीं' - त्यातील काहीच ढग पावसाने जमीन भिजवतात, 'गर्जन्ति केचिद् वृथा' - तर काही उगीच गर्जना करतात. 'यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो' - ज्याला ज्याला पाहतोस त्याच्या पुढ्यात, 'मा ब्रूहि दीनं वचः' - दीनस्वरात याचना करू नकोस. इथं कवी चातकाला उपदेश करत आहे की प्रत्येक ढगासमोर पाण्यासाठी याचना करू नकोस सगळेच काही खरेच बरसणारे नाहीत. येथे मनुष्याला चातकाचे रूपक योजून कवि उपदेश करत आहे, की 'अरे मित्रा, या समाजात तुला मदत करणारी माणसं कोण आणि उगीच वल्गना करणारी माणसं कोण ते नीट ओळख. उगाच ज्याच्या त्याच्या समोर दीनवाणा होऊन हात पसरू नकोस.'

विधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:।
सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन॥

कावळा आणि कोकिळपक्ष्याच्या उदाहरणातून मनुष्याला उपदेश. कावळ्या, सुरेल आवाजाच्या कोकिळपक्ष्याबरोबर तू आंब्याच्या झाडावर सहवास केलेला आहेस, (तरी) तू (वाईट आवाजातच) ओरड (रेक), (यात) तुझा अपराध काय? 'विधि: एव विशेष गर्हणीयः' - याला नियतीच पूर्णपणे कारणीभूत आहे. हे कावळ्याला उद्देशून केलेलं थोडंसं उपहासात्मक वचन असलं तरी मनुष्याला केलेला हा उपदेश आहे की जर एखादा गुण किंवा कला मुळातच तुमच्या अंगी नसेल तर ज्याच्याकडे ती कला आहे त्याच्या केवळ सहवासाने काही ती कला साध्य होत नाही.

आता आपण पाहू 'प्रहेलिका' हा काव्यप्रकार, अर्थात पहेली किंवा कोडी. कधीकधी साधी कोडी असतात, ज्यात प्रस्तुत स्वभाव अथवा गुणधर्मावरून ती गोष्ट कोणती हे ओळखायचे असते किंवा कधी कधी प्रहेलिकेतच उत्तर दडलेले असते. काही काही प्रहेलिका फसव्या असतात. वरकरणी दिसणार्‍या अर्थातून काहीच निष्पन्न होत नाही मात्र एक गूढ अर्थ त्यात दडलेला असतो जो उत्तराकडे निर्देश करतो. एक अत्यंत उत्कृष्ट प्रहेलिका पुढीलप्रमाणे :

य एवादि: स एवान्तः मध्ये भवतिमध्यमा।
य एतन्नाभिजानाति तृणमात्रं न वेत्ति सः॥

सर्वप्रथम नेहमीप्रमाणे सुलभ भाषांतर करू. 'य एव आदि: स एव अन्तः' - जो प्रारंभ आहे तोच अंतदेखील आहे, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये मध्यम आहे. 'य एतद् न अभिजानाति' - जो हेदेखील जाणत नाही, 'तृणमात्रं न वेत्ति सः' - त्याला काडीचीही जाण नाही. या भाषांतराप्रमाणे या कोड्याचं उत्तर एखादा 'देव' असं देईल. वरकरणी तसंच वाटतं देखील. पण हे अत्यंत फसवं भाषांतर आहे. वास्तविक या कोड्याचं उत्तर कोड्यातच दडलेलं आहे. पहिल्या ओळीचं नीट विचार करून भाषांतर केल्यास उत्तर पटकन कळून येईल. 'य एव आदि: - सुरूवात 'य' ने होते, 'स एव अन्तः' - आणि शेवट 'स' ने होतो, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये 'भवति'ची मध्यमा - अर्थात 'व' आहे. आता कळलं उत्तर? 'यवस' अर्थात गवत! पुढल्या ओळीत उत्तर दिलेलं आहे हे लक्षात आलं असेलच!

हे होतं प्रहेलिकेचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण! आता कोडी म्हटल्यावर कोडी घालणार्‍यानेच उत्तर दिलं तर कसं चालेल. थोडा तुम्हीही आस्वाद घ्या प्रहेलिकांचा. तेव्हा प्रस्तुत आहे एक प्रहेलिका..

अपदो दूरगामी च साक्षरो न च पण्डितः।
अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः॥

प्रहेलिका अशी आहे - 'अपदो दूरगामी च' - पाय नाहीत पण दूरपर्यंत जाणारा आहे, 'साक्षरो न च पण्डितः' - साक्षर आहे पण पंडित नाही, 'अमुखः स्फुटवक्ता च' - तोंड नाही पण स्फुटवक्ता आहे, 'यो जानाति स पण्डितः' - जो हे जाणतो तो विद्वान!

याचं उत्तर देता येईल? माझ्या मते फारच प्रसिद्ध प्रहेलिका असल्याने फार जड जाऊ नये.
तरीसुद्धा एक सल्ला : इथे 'साक्षर' हा शब्द येथे 'अक्षरासह' असा अभिप्रेत असू शकतो. :)

उत्तर : पत्र/खलिता/व्यनि. बरोबर उत्तर देणार्‍या श्री. नंदन यांस 'पण्डित' किताब जाहीर! ;)

पुढील प्रहेलिका :

वृक्षस्याग्रे फलं दॄष्टं, फलाग्रे वृक्षमेव च।
अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः॥

भाषांतर जमल्यास येथे द्यावे. अन्यथा मी देईनच!

उत्तर : अननस. पुन्हा सर्वप्रथम श्री. नंदन यांनीच उत्तर दिलेले आहे!

पुढील प्रहेलिका..

वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः तृणं च शय्या न च राजयोगी।
सुवर्णकायो न च हेमधातु: पुंसश्च नाम्ना न च राजपुत्रः॥

पुन्हा .. भाषांतर जमल्यास येथे द्यावे. अन्यथा मी देईनच!

उत्तर आहे आंबा, सर्वप्रथम ओळखलंय श्री. प्रमोद_पुणे यांनी.

पुढील प्रहेलिका :

नरनारी समुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता।
अमुखी कुरूते शब्दं जातमात्रा विनश्यति॥

पुन्हा .. भाषांतर जमल्यास येथे द्यावे. अन्यथा मी देईनच!

पुढील भागात आपण पाहू संख्यांवरची सुभाषितं - 'संख्यादशनिबोधतः' (होय तेच, दहावीला पाठ्यपुस्तकात होतं तेच!) :)

भाषासुभाषितेआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

20 Jul 2010 - 3:54 am | धनंजय

१. पाय नसून दूर जातो (रस्ता माहीत नसला तर फिर फिर दूर फिरवतो),
२. हा स-अक्षर असतो ("आई तुझा आशीर्वाद") पण हा पंडित नसतो,
३. याला तोंड नसते, (पण सायलेन्सर नेहमीच फुटका असल्यामुळे) "फटर्र्-स्फुट्-स्फुट्" असा मोठ्याने आवाज करतो.

(आणि काही भागात "हा रिक्षा" ऐवजी "ही रिक्षा" अशी नाजुकाही असते म्हणे.)

- - -
गमतीदार आणि मनोरंजक लेख.

नंदन's picture

20 Jul 2010 - 5:21 am | नंदन

मस्तच. कोड्याचे उत्तर 'पत्र/खलिता/व्यनि' असू शकेलसे वाटते ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विंजिनेर's picture

20 Jul 2010 - 6:11 am | विंजिनेर

किंवा भविष्यवाल्याचा पोपट!

अस्मी's picture

20 Jul 2010 - 10:09 am | अस्मी

अप्रतिम... :)

कोड्याचे उत्तर पत्र असाव असंच वाटतय...

- अस्मिता

यशोधरा's picture

20 Jul 2010 - 7:35 pm | यशोधरा

मलाही, पण खात्री नाही!

मुक्तसुनीत's picture

20 Jul 2010 - 6:01 am | मुक्तसुनीत

लेख आवडला. कोड्याचे उत्तर ऐकायला उत्सुक आहे.

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 6:01 pm | आमोद शिंदे

लेख आवडला. कोड्याचे उत्तर ऐकायला उत्सुक आहे.

शिल्पा ब's picture

20 Jul 2010 - 7:10 am | शिल्पा ब

छान लेख...कोड्याचं उत्तर ऐकायला उत्सुक.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

चतुरंग's picture

20 Jul 2010 - 7:20 am | चतुरंग

घट असावे असे वाटते आहे.

(पालथाघडा)चतुरंग

प्रभो's picture

20 Jul 2010 - 7:26 pm | प्रभो

मस्त रे!!

पुष्करिणी's picture

20 Jul 2010 - 10:38 pm | पुष्करिणी

पत्रच वाटतय, (तोंड आहे पण बोलत नाही म्हणजे बंद पाकिटातलं पत्र असावं )
पुष्करिणी

मी ऋचा's picture

22 Jul 2010 - 1:04 pm | मी ऋचा

तोंड आहे पण बोलत नाही असे नाही... तोंड नाही तरी बोलतो असं कोडं आहे... :B

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

मेघवेडा's picture

22 Jul 2010 - 1:36 pm | मेघवेडा

बर्‍याच जणांनी ओळखलेलं दिसतंय!

'पत्र/खलिता/व्यनि' =)) हो. 'पत्र' हेच याचे उत्तर आहे. बाकी धनंजय यांनी कल्पकरित्या दिलेलं उत्तरसुद्धा छान! पण रिक्षाला 'पाय' नाहीत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ते उत्तर बाद!

सर्व प्रतिसादकांचे आभार. नवीन प्रहेलिका धाग्यात दिली आहे. :)

मस्त कलंदर's picture

22 Jul 2010 - 1:44 pm | मस्त कलंदर

मी सांगू का या कोड्याचे उत्तर???? :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा's picture

22 Jul 2010 - 1:49 pm | मेघवेडा

नको.. भाषांतर दे त्यापेक्षा. :) 'जाणकारां'कडून भाषांतराचीच अपेक्षा आहे! ;)

Nile's picture

22 Jul 2010 - 1:51 pm | Nile

मला गपचुप व्यनीने कळव मग मी देतो मके. अन कुणाला सांगु नको.

-Nile

महेश हतोळकर's picture

22 Jul 2010 - 1:51 pm | महेश हतोळकर

वृक्षस्याग्रे फलं दॄष्टं, फलाग्रे वृक्षमेव च।
अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः॥

झाडाच्य टोकाला फळ दिसतं आणि फळाच्या टोकाला झाड,
"अ" ने सुरुवात होते (अकारादि), "स" ने शेवट (सकारान्त), जो जाणतो तो पंडित.

मेघवेडा's picture

22 Jul 2010 - 2:41 pm | मेघवेडा

टोपणनाव - अगदी बरोबर! अननसच ते! या वेळचे 'पंडित' किताबाचे मानकरी - उत्तर देण्याच्या क्रमानुसार - नंदन, यशोधरा, महेश हतोळकर आणि टॉपणनाव. मस्त कलन्दर यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येत आहे! ;)

पुढील प्रहेलिका धाग्यावर!

प्रमोद्_पुणे's picture

22 Jul 2010 - 2:41 pm | प्रमोद्_पुणे

चीझ, चेरी, ...... ;)

प्रमोद्_पुणे's picture

22 Jul 2010 - 2:49 pm | प्रमोद्_पुणे

झाडाच्या टोकावर बसतो पण गरूड (पक्षीराज) नाही ; गवताच्या शय्येवर झोपतो पण राजयोगी नाही; सोन्यासारखी काया असून सोने नाही आणि पुल्लिंगी (??) असला तरी राजपुत्र नाही.. असा हा फळांचा राजा आंबा..

शुचि's picture

22 Jul 2010 - 5:49 pm | शुचि

संपूर्ण लेखमालाच छान. हा लेखही आवडला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पाषाणभेद's picture

22 Jul 2010 - 5:53 pm | पाषाणभेद

वा वा मेघ, लेखन खुपच भारी आहे हो! लेखमाला पण सुंदर झालीय. मेहनत घेतली की असल्या सुंदर लेणी तयार होतात.
आम्हास अजून आनंद द्या.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

मेघवेडा's picture

22 Jul 2010 - 5:55 pm | मेघवेडा

यावेळेस प्रमोद_पुणे, मधुमती, टोपणनाव यांनी उत्तर ओळखलेलं आहे.

पुढील प्रहेलिका धाग्यावर!

क्रेमर's picture

23 Jul 2010 - 3:36 am | क्रेमर

मस्त धागा!!!

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

.....

मेघवेडा's picture

23 Jul 2010 - 12:36 am | मेघवेडा

सध्याची प्रहेलिका चुटकीसरशी न सुटल्याने भाषांतर देत आहे :

नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता - नर आणि नारी यांपासून जन्म झाला असला तरी ती देह नसणारी स्त्री आहे.

अमुखी कुरुते शब्दं - तोंड नसूनही आवाज करते

जातमात्रा विनश्यति - आणि जन्मल्यावर लगेच नष्ट होते.

कोण बरे ती?

Nile's picture

23 Jul 2010 - 12:45 am | Nile

ती (काडेपेटीच्या काडीची)आग.

जन्मः ती काडी अन तो (पेटीचा)रॅपर

आवा़जः जळल्याचा फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

जन्मली की लगेच(बरेचदा सिगेरेट शिलवगायच्या आतच) नष्ट होते! :|

-Nile

मेघवेडा's picture

23 Jul 2010 - 1:00 am | मेघवेडा

स्तुत्य प्रयत्न! पण 'देहविवर्जिता' यातून 'तिला देह नाही' अर्थात 'ती दिसत नाही' असं सूचित केलेले आहे!

श्री निळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे!

चतुरंग's picture

23 Jul 2010 - 1:07 am | चतुरंग

किंवा वाणी.

चतुरंग

मेघवेडा's picture

23 Jul 2010 - 1:47 am | मेघवेडा

असू शकते. विश्लेषण केल्यास बरं होईल.

मला माहिती असलेले उत्तर हे नाही पण. अहो वर प्रतिसादांत क्लू आहेच एक! ;)

शिल्पा ब's picture

23 Jul 2010 - 2:00 am | शिल्पा ब

वीज हे उत्तर असावे.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रमोद्_पुणे's picture

23 Jul 2010 - 11:01 am | प्रमोद्_पुणे

म्या दिला हाय की जवाब..

मेघवेडा's picture

23 Jul 2010 - 4:00 am | मेघवेडा

उत्तर : टिचकी! अंगठा आणि मध्यमा या नरनारीनी समुत्पन्न अशी ती देहविवर्जित स्त्री, तोंड नसतानाही आवाज करणारी आणि जन्मताच नष्ट होणारी.

आता, या प्रहेलिकांचा खेळ इथंच थांबवतो. सर्व वाचक आणि प्रतिसादकांस मनापासून धन्यवाद! :)

पुन्हा भेटू पुढल्या भागात.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jul 2010 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार

मेवे एक्दम शॉल्लेड उपक्रम हो !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सर येउ द्या अजुन पुढचे भाग आणि असेच सुंदर लेखन !!