१ विषय, २ लेख, ३ संकेतस्थळे आणि ४-५ दिवस - एक प्रयोग

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
19 Jun 2010 - 5:54 pm

शाळेत असतांना मला अचानक कधीतरी लेखन करायची उबळ यायची. त्या वेळेला एकादा कोरा कागद हाताला लागला आणि कोणतेही विघ्न आले नाही तर तो पेन्सिलीने अथवा शाईने काळानिळा होत असे. ही लेखनाची ऊर्मी थोड्या वेळानंतर ओसरायची. पण आपल्याकडे इतरांचे किती लक्ष आहे हे पाहणे हा स्वभावातला स्थायी भाव होता. त्याचाच एक भाग म्हणून आपले लिखाण किती लोकांनी वाचले याबद्दल उत्सुकता वाटायची. पण भिडस्तपणा हाही मनातला दुसरा एक स्थायी भाव असल्यामुळे मी आपणहून त्याबद्दल कोणाला विचारत नसे.

दुसरे बालपण सुरू झाल्यानंतर पहिल्या बाल्यावस्थेतल्या कांही गुणांनीही डोके वर काढणे सुरू केले. पण दरम्यानच्या काळात परिस्थिती खूपच बदलली आहे. आंतर्जालाच्या मुक्तांगणात आता कोणीही केंव्हाही जावे, तिथे काय काय आहे ते पहावे, त्यातले आपल्याला जे आवडेल ते वाचावे आणि लिहावेसे वाटले तर लिहून जालावर टाकावे. आपल्याला नेमके काय पाहिजे आहे ते शोधून काढण्यासाठी अनेक शोधयंत्रे उपलब्ध असल्यामुळे ते कामही सुलभ झाले आहे. कांहीतरी लिहावे असे मनात आले तर ते लगेच टंकता येते. त्याची सुबोध प्रत काढणे, ती जपून ठेवणे, कोणाला देऊन ती वाचायची त्याला विनंती करणे वगैरे कामे करण्याची गरज उरली नाही. त्यामुळे माझे लेखन आणि त्यांचे वाचन या दोन्हींमध्ये पहिल्या बालपणाच्या तुलनेत आता अनेकपटीने वाढ झाली आहे.

प्रयोगशीलता आणि सर्वेक्षणाची आवड हेसुध्दा माझ्यातले स्थायी भाव असल्यामुळे ते मला स्वस्थपणे बसू देत नाहीत. निरनिराळे विषय मला सतत खुणावत असतात. आपल्या वाचकवर्गाचेच सर्वेक्षण करावे असे वाटल्यामुळे मागल्या आठवड्यात मी एक प्रयोग करून पाहिला. एका जुन्याच विषयावर एक नवा लेख लिहिला आणि त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग करून ते माझ्या ब्लॉगवर टाकले. तसेच त्यावर आधारलेले दोन वेगवेगळे लेख दोन वेगवेगळ्या संकेतस्थळांवर चढवले. एकच लेख अनेक ठिकाणी देणे कितपत योग्य आहे यावर मागे एकदा बरीच चर्चा झाली होती आणि दोन्ही बाजूंनी त्यात उपस्थित केलेले मुद्दे मला थोडे थोडे पटले होते. त्यामुळे विरोधकांचा मान राखून मी एकच लेख दोन संकेतस्थळांकडे पाठवला नाही. पण मला त्यात कांही फारसे अयोग्य वाटत नसल्यामुळे ते दोन्ही लेख किंचित वेगळ्या स्वरूपाने माझ्या ब्लॉगवर टाकले. अखंडपणे धोधो वहात असणार्‍या नवनवीन लेखनाच्या प्रवाहांमुळे आंतर्जालावरील लेखनाचे आयुष्य फार मर्यादित असते. पहिल्या ४-५ दिवसात त्याचे जे कांही वाचन व्हायचे असते ते होऊन जाते. यामुळे या सर्वेक्षणासाठी तेवढा कालावधी पुरेसा होता.

कथा, संवाद, निबंध असल्या चौकटी आंखून त्यात बसेल तसे लिहिणे मला आवडत नाही. त्यामुळे मी माझ्या लेखनाला 'लिखाण' असे सर्वसमावेशक नांव देतो. माझा मूळ लेखसुध्दा अशाच प्रकारचा होता. पण मनोगत या संकेतस्थळाने आधी लेखनप्रकार ठरवला पाहिजे अशी सक्ती केली आणि तिथून फुटून निघालेल्या मनोगतींनी चालवलेल्या उपक्रम आणि मिसळपाव या संस्थळांनी ही परंपरा मात्र पुढे चालूच ठेवली. त्यातल्या उपक्रमावर ललितलेखन लिहिलेले चालत नाही. त्यामुळे 'नशीब की योगायोग' हा पहिला भाग विश्लेषणात्मक पध्दतीने लिहिला आणि मनातल्याच दोन व्यक्ती एकमेकींशी बोलत आहेत अशी कल्पना करून तो संवादाच्या रूपाने सादर केला. मिसळपावाला कसलेच वावडे नसल्यामुळे योगायोगावर आधारलेली एक काल्पनिक घटना लिहून त्यातून योगायोगांच्या निरनिराळ्या छटा दाखवण्याचा प्रयत्न केला.

उपक्रम या संस्थळावर सदस्यांची उपस्थिती नेहमीच कमी दिसते. त्यानुसार वाचनसंख्यासुध्दा मर्यादित असते. सुरुवातीच्या काळात मी शंभर हा ब्रेकईव्हन पॉइंट ठेवला होता. तेवढी वाचने झाली तर आपले श्रम वाया गेले नाहीत असे समजून पुढला लेख टाकायला हरकत नाही असे मी ठरवत असे. दोनशे झाली तर मनाला समाधान वाटत असे आणि हा आंकडा तीनशेच्या पुढे गेला की त्याचा आनंद होत असे. याहून पुढचा पल्ला मारण्याचे प्रसंग फारसे आले नाहीत. या वेळी मात्र तीनचार दिवसांमध्येच तीनशे वाचने झाली आणि त्यांचा आंकडा पुढे वाढतच गेला. 'छान', 'सुंदर', 'हेच', 'तेच' वगैरे प्रोत्साहन देणारे दोन चार प्रतिसाद सगळ्याच लेखांना मिळत असतात. आता त्यांची संवय झाली असल्यामुळे ते पाहून मी लगेच हरखून जात नाही. निदान दोन तीन ओळींचे दोन तीन प्रतिसाद आले तर त्यांची दखल घेऊन मी त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. या वेळी मात्र या लेखाचे नशीब असेल, किंवा योगायोग असेल किंवा माझा हा लेख कदाचित खराच चांगला झाला असेल ते मला सांगता येणार नाही, पण माझे स्वतःचे धरून तब्बल तीस प्रतिसाद आले. मला यापूर्वी कधी हा अनुभव आला नव्हता.

नशीब, योगायोग आणि त्याच्याशी निगडित असलेले भविष्यकथन या विषयावर मिसळपावावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली आहे आणि त्याचे पर्यावसान गुद्दागुद्दीपर्यंत जाऊन पोचले आहे. आतांपर्यंत मी मात्र मैदानाच्या कडेला असलेल्या झाडावर बसून मजा पहात होतो. अनुभवी आणि हायक्लास मंडळी पॉपकॉर्नची पोती सोबत नेतात आणि त्यातला एकादा दाणा नेम धरून हळूच फेकतात. मी आपला खार्‍या शेंगदाण्यांची पुडी घेऊन जात असे आणि ते एकट्यानेच चघळत बसे. या वेळी मला रिंगसाईड व्ह्यू पहायला मिळेल असे वाटले होते. पण कोणतेही मल्ल तिकडे फिरकलेच नाहीत. "ससा. कासव, पोपट वगैरे शब्दांची स्त्रीलिंगी रूपे कोणीतरी मला सांगावीत" असे जाहीर आवाहन स्व.पु.ल.देशपांडे यांनी आपल्या एका लेखात केल्याचे मी चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी वाचले होते. त्या काळात त्याला प्रतिसाद देण्याची कोणती सोय होती हे मला ठाऊक नाही. पण हा प्रश्न अजून अनुत्तरित राहिला असेल तर त्यात 'मल्ल' या शब्दाची भर घालावी अशी माझी नम्र सूचना आहे. 'मल्लीण' म्हंटलेले त्यांना रुचेल कां आणि 'मल्लिका' म्हंटलेले साराभाई किंवा शेरावत मॅडम्सना चालेल कां कुणास ठाऊक. शिवाय मल्लिका हा शब्द मल्ल या शब्दाच्या तुलनेत जरा कमजोर वाटतो, यालासुध्दा आक्षेप यायचा. ते जाऊ दे. मला एवढेच सांगायचे आहे की या वेळी या स्थळी या विषयावर मुळीच झोंबाझोंबी झाली नाही. 'विनोद', 'मौजमजा', 'विरंगुळा' यासारखे लेबल मी मुद्दाम लावलेले नव्हते. तरीसुध्दा वाचनसंख्या चारशेच्या वर गेली ही समाधानाची बाब आहे. मिसळपावचा वाचकवर्ग तुलनेने नेहमीच मोठा असतो असे असले तरी ही तसे वाटून घ्यायला हरकत नसावी. मात्र या लेखाला मोजून तीन प्रतिसाद आले. पहिल्या वाचकाने फक्त तो वाचला एवढेच लिहिले, दुसर्‍याला तो आवडलेला दिसला आणि तिसर्‍याच्या प्रतिसादाचा संदर्भच मला लागला नाही. कदाचित या लेखाची भट्टी नीट जमली नसावी.

माझ्या ब्लॉगवरील दोन्ही भागांची मिळून सातशेहून अधिक वाचने झाली. त्यातल्या कांही लोकांनी कदाचित पूर्वीचे भाग वाचण्यासाठी टिचकी मारली असेल. एकंदरीत पाहता ज्या वेगाने तिथल्या वाचनसंख्येचा आंकडा वाढत आला आहे त्यापेक्षा हा वेग थोडा जास्तच आहे. प्रतिसादांची संख्यासुध्दा तशीच आहे. हे निश्चितपणे उत्साहवर्धक आहे.

या छोट्याशा सर्वेक्षणाचा असा अनुभव आला. एवढ्यावरून लगेच कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई मी करणार नाही. पण थोडा अंदाज तर आला.

हे ठिकाणमौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

II विकास II's picture

19 Jun 2010 - 10:14 pm | II विकास II

संकेतस्थळांची माहीती आवडली. उपक्रम हे एक दर्जेदार संकेतस्थळ आहे. मी जास्तीत जास्त वेळ उपक्रमावर घालवण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे पुरावे देउन चर्चा करण्याची पध्दत आवडते. उपक्रम हे आंतरजालिय सदाशिवपेठ आहे, असे वाटते. ;) :)
प्रत्येक वाचणारा प्रतिसाद लिहील असे नाही, वेळेची बंधने, दिवसभरात बरेच काही वाचायला असल्यामुळे प्रतिसाद लिहीणे जमत नाही.

मी उपक्रमावर प्रतिसाद लिहीत नाही. तुमची ती उपक्रमावरील उपग्रहाची लेखमाला उत्तम होती.

अजुन एक उपक्रमावर कंपुबाजी दिसत नाही.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

आनंद घारे's picture

19 Jun 2010 - 10:17 pm | आनंद घारे

द्यायची राहून गेली होती.
माझ्या पूर्वीच्या लेखांची जाहिरात करावी या उद्देशाने हा लेख लिहिलेला नाही. स्वतःच्या जबाबदारीवर कोणी तसा गैरसमज करून घेतला तर त्याला माझी हरकत नाही.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jun 2010 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे

आपण लिहिलेल लोकांनी वाचाव यासाठी केलेले आवाहन म्हणजे जाहिरात म्हणायचे का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

राजेश घासकडवी's picture

20 Jun 2010 - 6:23 pm | राजेश घासकडवी

संस्थळांवर दिसणारी वाचनांची संख्या ही फसवी असते. बहुतेक वेळा अधिक प्रतिक्रिया दिसतात तेव्हा वाचनसंख्या अधिक दिसते. याचं कारण म्हणजे काही वाचक नवीन प्रतिक्रिया आल्यावर पुन्हा लेख उघडतात. मी वाचनसंख्या व प्रतिसाद यांच्या संबंधावरून वाचकसंख्येचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला होता.

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Jun 2010 - 7:55 pm | अक्षय पुर्णपात्रे

प्रयोग रोचक वाटला. लेखकाच्या प्रतिमेचाही परिणाम वाचनांच्या व प्रतिसादांच्या संख्येवर होत असावा. सदस्य बरेच धागे (लो कॉस्ट) उघडतात व लेखाची लांबी, पहिली एक-दोन वाक्य वाचून पुढे वाचायचे की नाही हे ठरवतात. तेव्हा वाचनांची संख्या राजेशने म्हटल्याप्रमाणे 'फसवी' आहे.

मी दोनही लेख वाचले पण प्रतिसाद लिहिले नाहीत.

आनंद घारे's picture

20 Jun 2010 - 10:27 pm | आनंद घारे

कोणत्या पानावर किती वेळा टिचकी मारली गेली एवढेच वाचनसंख्येवरून समजते. त्या वाचकाने तो लेख किती वाचला हे समजणे शक्य नाही. त्याला एखादे पान उघडावे असे वाटणे हे ही निदान थोडे तरी महत्वाचे आहे. लेखाचे शीर्षकआणि लेखकाचे नाव पाहूनच तो ते ठरवतो आणि हे त्याच्या पूर्वीच्या अनुभवावरून ठरते.
जर त्या लेखावर चर्चा झाली तर ती वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी ते पान पुन्हा पुन्हा उघडले जाते. अर्थातच प्रत्येक वेळी तो लेख पुन्हा पुन्हा वाचला जात नाही. अमूक इतक्या वेळा टिचकी मारली गेली म्हणजे तितक्या वाचकांनी तो लेख संपूर्णपणे वाचला असा अर्थ त्यातून निघत नाही हे मला ठाऊक आहे. त्या संख्येला आज तरी कसलेच मोल नसल्यामुळे ती वाढवण्याचा प्रयत्नही मी करत नाही.
मी लेखात लिहिल्याप्रमाणे हा एक प्रयोग होता.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/