नाच गं घुमा!!!

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
10 Jun 2010 - 1:21 pm

आता नक्की आठवत नाही.. पण नागपंचमीच्या आधीची कुठली तरी एक तिथी असायची.. सगळ्यांना पंचमीच्या उंच च उंच झोक्याचे वेध लागलेले असायचे.. पण त्याआधीच या तिथीपासून रात्रीचे खेळ चालू व्हायचे!! संध्याकाळपासूनच गल्लीतल्या बायका एकमेकींना आठवण द्यायला लागायच्या.. "आज रात्री जेवण झाल्यावर चौकात जमायचे हं!!!" मी तर पुष्कळ लहान होते .. त्यामुळे इकडे तिकडे निरोप पोचवण्याचं काम मध्ये मध्ये लुडबुड करणार्‍या आमच्या वानरसेनेकडे आपसूकच यायचं. रात्री ९:३०-१०:०० चा सुमार झाला की एक-एक करून बायका जमू लागत.. गल्लीत हुंब्यांचे घर अगदी चौकात.. घराला ओटाही होता.. त्यामुळे ते सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण.. हुंबे आजी तशा खडूस, पण यादिवसांत त्या कशा कोण जाणे प्रेमळ व्हायच्या.. मग जाधवांच्या दोन सुना, चव्हाणांच्या घरातल्या सात-आठ लेकीसुना, पाटीलकाकू, झालंच तर शेजारच्या गल्लीतल्या बायका, आम्ही शाळकरी ८-१० मुली, असे सगळे जमले की जो उतमात सुरू होई तो अगदी १२ वाजले तरी संपत नसे... लोळणफुगडी... बसफुगडी... कोंबडा... पिंगा.... झिम्मा...आणि बरंच काही!!! परवा शनिवारी मराठी बाणा पाहात होते.. मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला नि ते मंरतलेले दिवस आठवत गेले..

एकदा असेच नाचून नाचून थकलो होतो.. पण कुणालाच थांबावंसं वाटत नव्ह्तं. हुंबेआजी एकदम ओट्यावरून खाली उतरल्या. सगळ्याच दिलवाले मधे अमरिशपुरी नाचकामात आल्यावर थांबतात तशा थांबल्या. आजी येताना सुप घेऊन आल्या होत्या. आता या सुपाने चोप देणार की काय? असं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच चेहर्‍यावर!!! त्या आल्या तशा रिंगणात मध्यभागी उभ्या राहिल्या नि म्हणाल्या, "म्हणा गं पोरींनो, नाच गं घुमा”. आणि काय त्या नाचल्या, यंव रे यंव!!! एका हाताने सुप धरायचं.. निमिषार्धात तो हात सोडायचा.. सूप अधांतरी राहू द्यायचं नि ते खाली यायच्या आधी दुसर्‍या हाताने पकडायचं.. आणि हे करत करत स्वतःभोवती गोल गोल फिरायचं!!! दुसर्‍या दिवशी येताना घरोघरची सुपं बाहेर आली होती हे काय आता वेगळं सांगायला हवं???

लोळणफुगडी, बसफुगडी, साधी फुगडी नि कोंबड्याच्या स्पर्धा तर अगदी रोजच!!! आम्ही खेळणार म्हणून रस्ता अगदी चांगला झाडून, पाणी मारून तयार असायचाच. आधी जोड्या ठरत. मग एकमेकींसमोर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशी लांबलचक मांडी घालून बसायचं... दोन्ही हातानी दोन्ही अंगठे पकडायचे... डाव्या बाजूने कलंडायचं, तसंच सरळ होत पूर्ण पाठ जमिनीला लावायची... नि मग धरलेले अंगठे न सोडता, कुठल्याही आधाराशिवाय उजव्या बाजूने पूर्वस्थितीत यायचं. हे खेळताना "काठवट खणा.. सातारखाना" असले काहीतरी गाणं सुरू असायचं. हे असे हात सुटेपर्यंत चालायचं.. शेवटपर्यंत जी कुणी तग धरेल ती अर्थातच जिंकायची.. (कार्यक्रम संपवून घरी आल्या आल्या मी बेडवर हे करायचा प्रयत्न केला.. कलंडले खरी, पण उठायलाच येईना. :( मग लगेच दुसर्‍या दिवशी उठल्या उठल्या हॉलमधलं सगळं फर्निचर एका बाजूला सारलं, थोडी लोळायला ऐसपैस जागा केली.. नि पुन्हा प्रयत्न केला.. हुश्श!!! जमलं हो!!! खूपच जड नि जाड झाले नाहीए काही अशी मनाची समजूतपण लगेच घालून घेतली!!!!)

बसफुगडी हे लठ्ठ लोकांचं काम नोहे. ती खेळायची म्हणजे आधी चवड्यावर बसायचं...नि एकदा उजवा पाय पुढे आणि डावा पाठीमागे, आणि दुसर्‍यांदा डावा पुढे नि उजवा मागे, असे वर्तुळात फिरवत राहायचे.. हात आपसूक जसे पाय हलतील तसे हलतात.. हे प्रकरण मात्र लोळणफुगडीपेक्षा अवघड!!! जास्त वेळ तग नाही धरता येत.. नेहमीची फुगडी घालताना फू बाई फू म्हणतात तसे ही फुगडी घालताना "चुईफुई" अशा सगळ्याजणी म्हणायच्या.. आम्ही मुली मुळातच वात्रट.. आम्हाला हे चुईफुई गाणं नाही आवडायचं.. आम्ही मुद्दाम मोठ्यांदा "कुईफुई.. कुईफुई" म्हणत बसायचो.. (ही फुगडी पण लगेच घालून पाहिली.. पण कुठचे काय? दोनच मिनिटात पाय दुखायला लागले.. नि हात लढाई येत नसलेल्या शिपायासारखे अंमळ जास्तच आवेशात हलत होते.. छ्या: प्रॅक्टीस नाय राहिली!!!)

फुगडीच्या स्पर्धा म्हणजे अगदी कहर!!! गाणी म्हणून, कसंही र ला र, ट ला ट लावून एकमेकींची पिंग्यातून प्रेमळ उणीदुणी काढून नि कमरेचे काटे ढिले करून झाले की फुगड्यांना सुरूवात व्हायची.. सगळ्यात आधी घामेजल्या ओल्या हातांना खडू/भस्म्/माती काहीतरी लावलं जायचं, नाहीतर मग ऐनवेळी हात सुटले तर तोल जाऊन पडण्याचीच शक्यता जास्त... नि वेगात असताना हात सुटले, तर कुठे जाऊन पडेल याचा नेम नाही. फुगड्यांची गाणी आता आठवत नाहीत.. पण आधीच्या हळूहळू गिरक्या लवकरच वेग घ्यायच्या.. मग नुसत्या गिरक्यांचा पण कंटाळा यायचा.. एका जोडीतली कुणीतरी अर्धवट खाली बसून जमिनीला एक पाय नि दुसरा अधांतरी ठेवून जातं घालायला लागली, की त्या संसर्गाची लागण लगेच व्हायची. . अशावेळी मग कुणाचं जातं जास्त वेळ टिकतं याची शर्यत लागायची. जातं घालता घालता फुगडी तशीच संपवणं यात काहीच नाही.. पण जात्यातून पुन्हा फुगडीसाठी उभं राहाणं हे खरं कौशल्याचे काम!!! अजूनही कधी फुगडी घालायचं म्हटलं की मी दोन्ही आणि एका पायावर सारख्याच उत्साहाने तयार असते!!!

खेळून खेळून काकू लोक दमले तरी आमचा उत्साह उतू जात असायचा.. बसलेल्या आयांच्या मागे "चला, उठा"चं टुमणं लावलं की "जा गं, कोंबडा कोंबडा खेळा" म्हणून त्या सुटवणूक करून घ्यायच्या!!! मग काय, आम्ही कानांत वारं शिरलेल्या वासरांसारखे धूम!! एक सुरवातीची नि दुसरी भोज्जाची रेष आखायची.. सुरूवातीच्या रेषेवर पायांवर पायठेऊन बसायचं.. दोन्ही पंजे गुडघ्यावर एकांवर एक.. नि शर्यत सुरू... मध्येच कुणी अडखळायचं.. ढोपरं फुटायची, खरचटायचं तरीही बिल्कुल रडारड न करता पुन्हा कोंबड्याची पोज घेऊन शर्यत सुरूच र्हायची.. अगदीच चिल्लीपिली असतील ती सगळं झाल्यावर भ्वॉ म्हणून भोकाड पसरायची!!!

शाळकरी वयातल्या या गोष्टींची मजाच और होती!!! पंधरा दिवस हां हां म्हणता कसे निघून जायचे तेच कळायचे नाही.. दिवसभर शेतात, घरात काम करून थकलेल्या, नोकरी वरून आलेल्या बायकांना, दिवसभराचं हुंदाडणं जणू कमीच पडलेल्या आम्हा सर्वांसाठी ती पर्वणीच असायची.. कधी घराबाहेर न पडणार्‍या पाटील काकू नवर्‍याशिवाय बाहेर पडत ते याच दिवसांत. मूल नाही म्हणून खंतावलेल्या, कधी कुणाशी न बोलणार्‍या चव्हाण काकू याच दिवसांत हसताखेळताना दिसत.. नि नेहमी करवादणार्‍या हुंबेआजी नाचून थकलेल्या लेकीसुना आणि पोरीबाळींना मोठ्या प्रेमाने लिंबूसरबताचे ग्लासेस भरभरून देत असत.

आताशा नागपंचमीच्या वेळेस गांवी असणं खूप वर्षांत जमलं नाही. हुंबेआजी गेल्या... त्यांची सून पायाला काहीतरी झाल्याने गेली दहा वर्षे अंथरूणाला खिळून आहे... बरीच कुटुंबे काही कामाकारणाने गांव बदलून निघून गेली.. आणि हे आमचे छान रंगीबेरंगी दिवस चॅनेलच्या सुळसुळाटात हरवले!!!!

संस्कृतीसमाजजीवनमानअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

वेदश्री's picture

10 Jun 2010 - 2:00 pm | वेदश्री

क्या बात है! झक्कास लिहिलंयस!!
बसफुगडी माझी सर्वात फेवरीट. आऊकडून परत शहरात आल्यावरदेखील बसफुगडीची धुंदी उतरलेली नसायची.. मग अष्ट्याच्या मागे लागायचे माझ्यासोबत फुगडी खेळ म्हणून. :) झक्क आठवणींना उजाळा दिलास.. खरंच मस्त आहेस तू कलंदर!

पंगा's picture

10 Jun 2010 - 8:00 pm | पंगा

मग अष्ट्याच्या मागे लागायचे माझ्यासोबत फुगडी खेळ म्हणून.

अष्ट्या कोण?

(माहीत असल्यास) विसरलो. क्षमस्व.

- पंडित गागाभट्ट.

वेदश्री's picture

10 Jun 2010 - 10:44 pm | वेदश्री

अष्ट्या माझा बालपणचा दोस्त.

पंगा's picture

10 Jun 2010 - 10:58 pm | पंगा

माहीत नव्हते.

माहितीबद्दल धन्यवाद.

- पंडित गागाभट्ट.

मिसळभोक्ता's picture

11 Jun 2010 - 4:19 am | मिसळभोक्ता

अष्ट्या = *** अष्टीकर का ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पंगा's picture

11 Jun 2010 - 4:36 am | पंगा

कल्पना नाही. अष्ट्याबद्दलची माहिती मलाही नवीनच आहे. त्यामुळे वेदश्रीतैच काय ते नक्की सांगू शकतील. (***सकट.)

(तुम्हाला काही कल्पना आहे का? त्याचे पुढे नेमके काय झाले?)

- पंडित गागाभट्ट.

वेदश्री's picture

11 Jun 2010 - 10:06 am | वेदश्री

बाबोय, माझ्या दोस्ताच्या नावावर इतके स्पेक्युलेशन! आडनावाचा अपभ्रंश कधीच केला नाही मी आजवर.. अष्ट्या म्हणजे आशिष. शेजारच्यांच्या घरी माहेरपणाला येणार्‍या ताईमावशीचा मोठा मुलगा. तो ,मी आणि शमी (शाल्मली) भरपूर खेळ खेळायचो लहानपणी. मला माझ्या मामाने कधी बोलावले नाही आमच्या गरीबीमुळे आणि गरीब अष्ट्याला त्याचा मामा बोलवायचा सुट्टीत पण कामं करवून घेण्यासाठी! रिक्षावाल्याचा मुलगा ना तो! अर्थात आमच्या डोक्यात ह्या असल्या गोष्टी कधीच आल्या नाहीत.. लहानपणचा उत्साहच असा असतो की काम करायला सांगितले तरी त्यातदेखील एक अप्रूप असायचे. .

एकमेकांना खेळायला बोलवायला आम्ही ऊन आरशाच्या तुकड्याने परावर्तित करून न ओरडता बोलवायचो कारण त्याचे मामा-मामी त्याला खेळायला सहजी जाऊ द्यायचे नाहीत. अष्ट्याला कायम काम असायचे तर त्यात मदत करून ते लवकर संपवून आम्ही खेळायचो. दुपारी उन्हाची वेळ असेल तर पत्ते, भूतांच्या गोष्टी सांगणे, अष्ट्याने त्याच्या बाबांच्या रिक्षाच्या गंमती सांगणे वगैरे आणि संध्याकाळी ऊन उतरल्यावर रूमालपाणी, लगोरच्या, लपाछपी वगैरे. अष्ट्याचा सर्वात आवडता खेळ म्हणजे रिक्षा-रिक्षा खेळणे. त्याचे म्हणणे असायचे की तो मला मी जिथे सांगेन तिथे घेऊन जाईल त्याच्या रिक्षातून आणि मग मी त्याला मीटरने होतील तितके पैसे द्यायचे!
"कुठे जायचेय तुला? पुणे, मुंबई, लंडन की जपान?"
"आऊकडे जायचेय. लवक्कर घेऊन चल!"
"इतक्या कमी अंतरावर नाही जात माझी रिक्षा."
"अष्ट्या, नेतोस की नाही आता???!!!"
करवादत न्यायचा मग.. अर्थात हा खेळ शमीला आवडायचा नाही त्यामुळे जास्त खेळला जायचा नाही.

वर्षातून एखाद महिन्यासाठी यायचा तो कसाबसा.. पण धम्माल मजा यायची खेळायला तेव्हा.

विंजिनेर's picture

11 Jun 2010 - 5:24 pm | विंजिनेर

डोण्ट ड्वेल टू मच ऑन धिस. आषिश (अँड यु) इज जस्ट अ कोलॅटरल् डॅमेज - व्हेन बोअर्ड(ड पूर्ण) उच्चभ्रूज गेट क्रिएटिव्ह मि थिंक्स...

मिसळभोक्ता's picture

12 Jun 2010 - 2:29 am | मिसळभोक्ता

पंगाला उच्चभ्रू संबोधल्याबद्दल, विंजिनेराचा निषेध.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पंगा's picture

12 Jun 2010 - 2:32 am | पंगा

पंगाला उच्चभ्रू संबोधल्याबद्दल, विंजिनेराचा निषेध.

मनापासून आभार.

- पंडित गागाभट्ट.

मिसळभोक्ता's picture

12 Jun 2010 - 2:27 am | मिसळभोक्ता

अष्ट्या हा ताईमावशीचा मुलगा, हे समजले. पण शमी कोणाची मुलगी ? अष्ट्याच्या मामाची ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पंगा's picture

12 Jun 2010 - 2:35 am | पंगा

"इतक्या कमी अंतरावर नाही जात माझी रिक्षा."

माझ्या हिशेबाने, "मिनिमम फेअर"वाल्या अधिकतर ट्रिपा करण्यात अष्ट्याचा अधिक फायदा आहे. त्यामुळे अष्ट्याचे लॉजिक कळले नाही.

कृपया अष्ट्याला विचारून सांगता काय?

- पंडित गागाभट्ट.

मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 12:44 pm | मिसळभोक्ता

माझ्या हिशेबाने, "मिनिमम फेअर"वाल्या अधिकतर ट्रिपा करण्यात अष्ट्याचा अधिक फायदा आहे.

सहमत.

रिक्षाचालकांच्या संततीला अर्थशास्त्राचे धडे द्यावेत, ह्या टग्याच्या मताशी सहमत आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

10 Jun 2010 - 2:02 pm | अवलिया

छान लेख !

--अवलिया

स्वाती दिनेश's picture

10 Jun 2010 - 2:07 pm | स्वाती दिनेश

मस्त आठवणी..
हरतालिका, मंगळागौरींची रात्र रात्र केलेली जागरणे आठवली,
स्वाती

स्मिता_१३'s picture

10 Jun 2010 - 2:11 pm | स्मिता_१३

मस्त !

स्मिता

स्पंदना's picture

10 Jun 2010 - 4:08 pm | स्पंदना

कुठ कुठ घेउन गेलात तुम्ही?
वा! हे सगळे खेळ खेळताना त्या लेकी सुनांच्या हाल चाली कशा आणि किती वेगळ्या असतात!! इतर वेळी वावरताना असणार थोडस शालिन असणारी बाई हे खेळ खेळताना एक कुणी वेगळीच होउन जाते नाही?सुन्दर सुन्दर लेखन. जुन पासुनच तर वेध लागतात या खेळांचे.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jun 2010 - 4:44 pm | प्रकाश घाटपांडे

मस्त कलंदर आठवणी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

दत्ता काळे's picture

10 Jun 2010 - 4:50 pm | दत्ता काळे

लेख आवडला.

शशिधर केळकर's picture

10 Jun 2010 - 5:13 pm | शशिधर केळकर

मस्त कलंदर, छान लिहिलं आहे तुम्ही. मजा आली वाचायला. समारोपही छान.

अनामिक's picture

10 Jun 2010 - 5:36 pm | अनामिक

सुंदर ओघवतं लिखान. खूप आवडलं.

-अनामिक

धमाल मुलगा's picture

10 Jun 2010 - 6:22 pm | धमाल मुलगा

मस्त आठवणी रंगवल्यास हो पोरी. :)
एक छान चित्र उभं राहिलं वाचतावाचताच!

आताशा नागपंचमीच्या वेळेस गांवी असणं खूप वर्षांत जमलं नाही. हुंबेआजी गेल्या... त्यांची सून पायाला काहीतरी झाल्याने गेली दहा वर्षे अंथरूणाला खिळून आहे... बरीच कुटुंबे काही कामाकारणाने गांव बदलून निघून गेली.. आणि हे आमचे छान रंगीबेरंगी दिवस चॅनेलच्या सुळसुळाटात हरवले!!!!

:(
खरंय! अगदी खरंय. म्हणजे तपशीलात फरक आहेत, पण आम्हा पोरांच्याही भावना अशाच!!
बर्‍याचदा गाडीवरुन गावाकडं चाललो असलो म्हणजे रस्त्याकडेला धनगरांची पोरं खेळताना पाहतो, रस्त्याशेजारच्या शेतात कधी झाडावर सूरपारंब्या खेळणारी, तर कधी 'वॉल'मधुन उसळणार्‍या पाण्याखाली दंगा करणारी शेतकर्‍यांची पोरं हुंदडताना पाहतो...आपसुक गाडी थांबते..हेल्मेट अन जॅकेटासोबत वयाची वगैरे झूल उतरते आणि त्यांच्यातला एक होऊन दहा-पंधरा मिनिटं खेळुन झालं की कसं मस्त वाटतं! तिथून निघताना गावातल्या दोस्तांसोबत लहानपणी केलेला दंगा ह्या १०-१५ मिन्टांच्या खेळात पुन्हा आठवायला लागतो आणि गाडीचा वेग अचानकच वाढतो...जणु घराच्या ओढीनं धावणारी बैलजोडीच जुंपल्यासारखा. :)

मजा आली! तुझ्या 'नाच गं घुमा' मुळं आमच्याही गावातल्या दंग्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
ठ्यांकू मके..ठ्यांकू :)

पाषाणभेद's picture

12 Jun 2010 - 8:58 am | पाषाणभेद

व्वा एकदम मस्त धमु! व्वा!

या प्रकारचे खेळ, गुलाबाई (भोंडला) ची गाणी यांची आता केवळ आठवणच राहील! (किंवा प्राईमटायमातल्या सिरीयल मध्ये पहावे लागेल. ओव्हर नटलेल्या मुली/स्त्रीया पाहून!)

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2010 - 7:01 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख आवडला. तसेही स्मरणरंजन हा मानवी स्वभावाचा ग्यारंटीड कॉम्पोनंट आहे. शैलीही छान असल्यामुळे लेख जास्त आवडला. लिहित जा.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

11 Jun 2010 - 2:57 am | सहज

बिकांशी सहमत!

प्रभो's picture

10 Jun 2010 - 7:08 pm | प्रभो

सुंदर लेख!!!

रेवती's picture

10 Jun 2010 - 7:12 pm | रेवती

बसफुगडी मला कधीही नीट घालता आली नाही. खरं तर आपले हे सगळे खेळ म्हणजे सर्वांगसुंदर व्यायामाची उदाहरणे म्हणायला हवीत!
लेखन छान आहे. मंगळागौरीची आठवण आली. आजकाल असे खेळ खेळून दाखवणार्‍या महिलांचे गट मंगळागौरीच्या रात्री बोलावले जातात म्हणजे सगळ्यांना निदान आपले खेळ (खेळता आले नाही तरी) बघता येतात.

रेवती

चित्रा's picture

11 Jun 2010 - 5:16 am | चित्रा

आजकाल असे खेळ खेळून दाखवणार्‍या महिलांचे गट मंगळागौरीच्या रात्री बोलावले जातात म्हणजे सगळ्यांना निदान आपले खेळ (खेळता आले नाही तरी) बघता येतात.

काय हे आउटसोर्सिंग.. :)

बाकी बसफुगडी, झिम्मा, हे सगळे खेळ मैदानी खेळांमध्ये संपूनच गेले. खरेतर पावसाळ्याच्या दिवसांत घरात असला व्यायाम उत्तम होता.

टारझन's picture

10 Jun 2010 - 8:31 pm | टारझन

लै भारी गं मके :) मजेशीर लेखण !! मेण म्हणजे स्वतः शक्कल लढवुन लिहीलंयेस हे आवडुन गेले :)

भाग्यश्री's picture

11 Jun 2010 - 1:07 am | भाग्यश्री

का कोणास ठाऊक, मी अशी ऑथेंटीक मंगळागौर एकही पाहिली नाही !! :( :(
आणि माझी स्वतःची पण करता आली नाही..
पण तू लेखातून मस्त फिरवून आणलेस.. आय होप एकदातरी मिळेल पाहायला व खेळायला.

जागु's picture

11 Jun 2010 - 12:50 pm | जागु

वा अगदी बालपणीची आठवण करुन दिलिस. आमच्याघरी पिठवरी असायची तेव्हा आम्ही हे सगळ खेळायचो.

विनायक प्रभू's picture

11 Jun 2010 - 1:45 pm | विनायक प्रभू

लेखन
पारंपारिक खेळातील मजाच न्यारी.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

11 Jun 2010 - 6:28 pm | डॉ.श्रीराम दिवटे

सध्या फक्त वाचण्यातूनच या गोष्टी समजतात.
गेले ते दिन गेले..

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

पक्या's picture

11 Jun 2010 - 10:08 pm | पक्या

सुंदर लेख. आवडला.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्राजु's picture

12 Jun 2010 - 2:05 am | प्राजु

स्मरणरंजन आवडले.
मानवी स्वभावानुसार मी ही रमून गेले त्यात.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

भानस's picture

12 Jun 2010 - 3:16 am | भानस

ग आठवणींमध्ये. बसफुगडी आणि जातं घालणे मला खुपच मस्त जमायचे. अजूनही कधीकधी बेसमेंट मध्ये आम्ही मैत्रिणी फुगड्यांचा धुडगूस घालतो. :) म.क. लेख भावला. आता लवकरच नाच गं घुमाचा गजर व्हायलाच हवा.

पुष्करिणी's picture

12 Jun 2010 - 4:08 am | पुष्करिणी

मजा आली वाचताना. मला साधी फुगडी आणि कोंबडाच माहित होता. मी वर तू लिहिलेल्या इंस्ट्र्कशन प्रमाणे लोळण फुगडी आणि बसफुगडी चा प्रयत्न केला...जमली..हुश्श!

पुष्करिणी

मिसळभोक्ता's picture

12 Jun 2010 - 4:12 am | मिसळभोक्ता

मी वर तू लिहिलेल्या इंस्ट्र्कशन प्रमाणे लोळण फुगडी आणि बसफुगडी चा प्रयत्न केला...जमली..हुश्श!

फोटू कुठाय ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पुष्करिणी's picture

12 Jun 2010 - 4:33 am | पुष्करिणी

(अंगठे धरून) फुगडी ट्राय करताना फोटू कसा काढणार?
फारच मल्टिटास्किंग..:)
पुष्करिणी

पंगा's picture

12 Jun 2010 - 7:35 am | पंगा

(अंगठे धरून) फुगडी ट्राय करताना फोटू कसा काढणार?

सोप्पे आहे! अर्थात सेल्फ-टायमर वापरून.

- पंडित गागाभट्ट.

मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 10:03 am | मिसळभोक्ता

ही ही ही

सेल्फ टायमर !

अहो पंगाशेठ,

सेल्फ टायमर वापरले, तर बसक्या फुगडीत मजाच काय ?

बसकी फुगडी इज टू बी एंजॉयीड विथ सेल्फ (ऑर विथ अष्ट्या)..

ही ही ही...

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चित्रा's picture

12 Jun 2010 - 9:17 am | चित्रा

मी वर तू लिहिलेल्या इंस्ट्र्कशन प्रमाणे लोळण फुगडी आणि बसफुगडी चा प्रयत्न केला...जमली..हुश्श!

हा, हा! शाब्बास. :)

लोळणफुगडीला खरेतर "गाठोडे" म्हणतात का?. मजा येत असे, गाठोडे घालायला. असे गाठोडे घातल्याने पोट बारीक राहते असे ऐकले होते.

लवंगी's picture

12 Jun 2010 - 7:58 am | लवंगी

एक्दम १स्ट क्लास

आनंदयात्री's picture

12 Jun 2010 - 10:37 am | आनंदयात्री

हरवलेले सुख हो हरवलेले सुख !!
बाकी पोरांच्या खेळातल्या कोलांट्या उड्या वैगेरे कधी जमल्या नाय बा आपल्याला !!

-
आंद्या बदाफळ

राधा१'s picture

12 Jun 2010 - 1:43 pm | राधा१

लेख अप्रतिमच..जागवलेल्या मंगळागौरींची आठवण झाली..सुंदर असतो हा प्रकार..

आधी जोड्या ठरत. मग एकमेकींसमोर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशी लांबलचक मांडी घालून बसायचं... दोन्ही हातानी दोन्ही अंगठे पकडायचे... डाव्या बाजूने कलंडायचं, तसंच सरळ होत पूर्ण पाठ जमिनीला लावायची... नि मग धरलेले अंगठे न सोडता, कुठल्याही आधाराशिवाय उजव्या बाजूने पूर्वस्थितीत यायचं. हे खेळताना "काठवट खणा.. सातारखाना" असले काहीतरी गाणं सुरू असायचं. हे असे हात सुटेपर्यंत चालायचं.. शेवटपर्यंत जी कुणी तग धरेल ती अर्थातच जिंकायची.. (कार्यक्रम संपवून घरी आल्या आल्या मी बेडवर हे करायचा प्रयत्न केला.. कलंडले खरी, पण उठायलाच येईना. Sad मग लगेच दुसर्‍या दिवशी उठल्या उठल्या हॉलमधलं सगळं फर्निचर एका बाजूला सारलं, थोडी लोळायला ऐसपैस जागा केली.. नि पुन्हा प्रयत्न केला.. हुश्श!!! जमलं हो!!! खूपच जड नि जाड झाले नाहीए काही अशी मनाची समजूतपण लगेच घालून घेतली!!!!)

ह्याला गाठोड घालण म्हणतात..माझी आजी ६० पर्यंत उत्तम घालायची गाठोड लठ्ठ असुन सुद्धा..ह्यासाठी लवचिक असण जास्त जरुरीच आहे.

मला वाटते पावसाळ्यात / श्रावण महिन्यात गावातील महिला असे खेळ खेळायच्या .
(कधी गावी वाईला असलो की) आम्हालाही अगदी आवर्जून आमंत्रण असायचे . एरवी shy वाटणार्या काही घरच्या सुना या खेळात खुप रमायच्या अन हिरीरीने भाग घ्यायच्या . फुगडी, कोंबडा , फिरकी अन त्यात पण किती प्रकार ..हुश्श्य ! मस्त गाणी गायच्या अगदी सुर-ताल धरून ...

पण हे सर्व गावीच.. मुंबईत असे काही पहायला मिळालेच नाही
~ वाहीदा

साक्षी's picture

14 Jun 2010 - 12:17 pm | साक्षी

छान आठवणींना उजाळा दिलात. मला पण खूप आवडतात हे खेळ! माझ्या वहिनीच्या आणि माझ्या दोघींच्या मंगळागौरीच्या वेळेस पूर्ण रात्री जागून खेळलो होतो, त्याची आठवण झाली.

~साक्षी.

मृगनयनी's picture

14 Jun 2010 - 12:39 pm | मृगनयनी

पूर्वी च्या बायकांना "जिम्स", "क्लब्ज" वगैरे अव्हेलेबल नव्हते.... तरीपण फुगड्या, पिन्गा, नाच गं घुमा, आणि वर मेन्शन केलेले सगळे प्रकार करून त्या स्वतःला मेन्टेन करायच्या... हे पाहून खूप बरे वाटले...
_______________________

माझ्या लहानपणी माझ्या आत्याच्या मंगळागौरीला, आमच्या वाड्यातल्या तायांच्या सणा-समारम्भाच्या वेळी असेच काही प्रकार खेळले गेल्याचे अन्धुकसे आठवते!

त्या रम्य आठवणींना उजाळा दिल्याबद्दल 'मस्त कलंदर' आपले आभार!

_______________________
अवांतर : आज ती मिसळपावची "अर्चना पूरणसिन्ग" कुठे दिसत नाही ती ! ;) ;) ;) ...
असो... "बैसाखी"च्या आठवणीत रमली असेल बहुधा! :)

तिचे कम्पूबाज "पूरण्स" आम्ब्लेल्या इडल्या झोडत आहेत... हे पाहून डोळे पाणावले~ ;)

_______________________

म.क. जी..... कीप इट अप...... :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

क्रान्ति's picture

14 Jun 2010 - 9:58 pm | क्रान्ति

खूप खूप जुन्या आठवणी गोळा झाल्या तुझा लेख वाचून. हरितालिका पण अशीच जागवत होतो आम्ही. :)

क्रान्ति
अग्निसखा