दूर कुठेशी धूळ उडवतो घोडा माळावरती
टापांखाली स्वप्न उद्याचे, नाकपुड्या फुरफुरती
नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवती
नवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती
सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती
देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती
करित पाठ ऋग्वेदऋचांचा कुणी आहुती देती
मनामनातुन गुंजन करते 'ॐ शांती शांती '
आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ?
- मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती
ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती
कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती
***
***
जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती
आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती
आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती
आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती
जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती
अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती
वाद घालतो "नव्हेच तुमची, ही तर आमची माती
वेगवेगळी आता लिहावी तुमची आमची खाती"
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...
प्रतिक्रिया
21 Apr 2008 - 11:27 am | मदनबाण
सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती
देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती
हे मात्र खर..... मी माझ्या बर्याच मित्रांना सांगतो अपेयपान केल्यानंतर मॅन चा सुपरमॅन होतो.....
(आम्ही प्यायली तर ती दारु आणि देवेंद्राने प्यायली तर तो सोमरस?)
(सध्या तरी फक्त कोकम सरबत पिणारा)
मदनबाण
21 Apr 2008 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरतीजुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती
अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंतीसुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती
आणि
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरतीइतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...
या ओळी विशेष आवडल्या!!!
21 Apr 2008 - 11:41 am | विसोबा खेचर
ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती
कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती
जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती
आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...
वा नानासहेब! अतिशय सुरेख ओळी!
तुम्ही इतकं सुरेख काव्य करता हे खरंच माहीत नव्हतं! जियो....!
अजूनही येऊ द्या...
तात्या.
21 Apr 2008 - 12:26 pm | नंदन
कवितेमागचा विचार आणि मांडणी, दोन्ही आवडले. घोड्याचे रुपकही छान.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Apr 2008 - 2:41 pm | स्वाती राजेश
कविता आवडली.
जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती
याओळी आवडल्या..
22 Apr 2008 - 12:02 pm | ॐकार
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...
छान आहे. कविता आवडली :)
22 Apr 2008 - 9:26 pm | धनंजय
आणि विचार. अभिनंदन.
23 Apr 2008 - 12:55 pm | विसुनाना
कवितेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
मदनबाण, सुरा आणि सोमरस हे वेगवेगळे होते असा वाद घालू देत लोक! आपल्याला काय? सुपरमॅन झाल्याशी मतलब! ;)
तात्या, पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो.
बिरुटेसर, नेमक्या ओळी पकडल्यात. ;)
नंदन आणि धनंजय, विचार पोचले असे वाटते. आनंद झाला.
पुनः धन्यवाद!
23 Apr 2008 - 3:23 pm | लिखाळ
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...
सुंदर कविता. आवडली. रुपक मांडणी विचार आवडले.
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
23 Apr 2008 - 4:02 pm | नीलकांत
मला कवितांमधलं काही विशेष कळत नाही. ही कविता वाचतांना
जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती
आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती
येथून पूढे ही आत उतरतच गेली. खरंच खुप छान लिहीले आहे.
आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती
आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती
जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती
- नीलकांत
23 Apr 2008 - 9:07 pm | प्राजु
मस्त आहे कविता...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Apr 2008 - 3:06 pm | डॉ. श्लोक _भातखंडे
छान आहे कविता...