बुडीत खात्यांची चर्चा चालू आहे म्हणून माझा वेगळा अनुभव. शीर्षकातच डिस्क्लेमर आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी एकटाच मद्रासला गेलो होतो. एग्मोर भागात कंपनीचे गेस्टहाऊस होते. तेथे रहात होतो. नेहमी २-३ दिवसांसाठी जातो तेव्हा तडतड करून, रात्री उशीरा काम करण्याची पद्धत असते. पण यावेळी चांगला १०-१२ दिवसांचा मुक्काम होता त्यामुळे थोडा निवांतपणा होता. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर इकडे तिकडे भटकणे, मग जेवण आणि झोपणे असा कार्यक्रम होता.
एके दिवशी संध्याकाळी असेच फिरताना लोकांकडे पहात पहात चाललो होतो. कसे काय ते माहिती नाही पण जवळच असलेल्या एका इसमाशी नजरानजर झाली. नजरानजर होताच तो म्हणाला, "साब, हिंदी जानते क्या?". बहुधा मद्रासमध्ये त्याला भाषेची फारच अडचण येत असावी.
"हां, जानता हूं", मी.
"मैं महाराष्ट्रसे आया हूं".
महाराष्ट्रातून आला म्हटल्यावर मी मराठी सुरू केले.
"हं. मी पण मराठीच आहे. बोला"
"साहेब, मी अकोल्याचा. माझं नाव अमुक अमुक".
एव्हाना एक लेकुरवाळी बाई कडेवरच्या मुलासोबत पुढे आली. त्याच्याबरोबरच असावी. माणसाच्या हातात एक पिशवी होती. बाकी काहीही सामान नाही. माणसाचे एकूण स्वरूप एखाद्या कामगारासारखे किंवा प्यून वगैरे असावा तसे"
"बरं मग?" मी.
"साहेब, अकोल्याहून इकडं मदुराईला देवीच्या दर्शनाला आलो होतो".
"बरं".
"तिकडून रात्री गाडीने येताना माझे सामान चोरीला गेलं".
"अरेरे"
"त्यात पैसे आणि जायची गाडीची तिकिटं होती".
"मग?"
"आता परत घरी जायला तिकिटाला पैसे नाहीत"
आता ती बाई पण सुरू झाली.
"सकाळपासून काय खाल्लं नाही, पोर पण उपाशी आहे"
"अहो पण तुम्ही वरच्या खिशात काहीतरी थोडे पैसे वगैरे ठेवले नाही?"
"नाही ना. आज सकाळपासून इकडे कोण मदत करेल म्हणून भटकतोय. इथं कुणाला भाषा पण कळत नाही. काय करावं काय कळत नाही. आता तुम्ही भेटले म्हणून बरं झालं"
ती बाई परत बोलली, "तुम्ही मदत करा आम्हाला जेवायला आणि तिकिटाला पैसे द्या".
"तुमचा पत्ता देऊन ठेवा साहेब. परत गेल्यावर मी नक्की मनी ऑर्डर करून पैसे पाठवून देईन".
"नाही हो. असे कसे देऊ पैसे?"
"तुम्ही अगदी देवासारखे भेटलात बघा. तुमचे फार उपकार होतील आमच्यावर". च्यायला, तो पाय वगैरे धरायला लागला.
मी दुविधेत. पैसे परत मिळण्याची शक्यता नव्हतीच. अगदी त्याने त्याचा पत्ता दिला तरी मी काय अकोल्याला पैसे मागायला थोडेच जाणार होतो.
जरा वेळ विचार केला. ५० रुपये काढून त्याला दिले. (तेव्हाच्या हिशेबाने माझा एक दिवसाचा टूर अलाऊन्स होता. आणि ५० रुपयात त्या दोघांना दोन वेळा तरी जेवता आले असते).
"हे बघा मी आत्ता एवढेच देऊ शकतो. या पैशाने तुम्ही जेवण करा."
"साहेब जेवण होईल पण आम्ही परत जायचं कसं? अजून दिले असते तर बरं झालं असतं"
"माझ्याकडे देण्यासारखे एवढेच आहेत. माझ्याच सारखा अजून कोणी भेटेल. त्याच्याकडे असतील तर तो देईल"
"अहो साहेब, इथे कोण भेटणार आणखी. आख्खा दिवस घालवल्यावर तुम्ही भेटलात".
मग बराच वेळ तो विनवत राहिला. शेवटी मी म्हटले, "हे पहा, मला जे करण्यासारखे होते ते मी केले".
असे म्हणून मी तेथून कटलो.
तेथून निघून मी ही जेवण वगैरे केले आणि गेस्ट हाऊसवर आलो. मग डोक्यात विचार चालू झाले. तो माणूस खरे सांगत असेल का? की बनावट स्टोरी असेल?
पुढचे विचार आले ते म्हणजे तो खरे सांगत असेल तर त्याला मद्रासमध्ये आणखी कोण मराठी माणूस भेटेल. बरे तो भेटला तरी मदत करेलच असे नाही. काय करतील दोघं? वगैरे. मी आणखी पैसे द्यायला हवे होते का? आणखी ५० रु दिले असते तर कदाचित पॅसेंजर वगैरे गाडीने घराच्या दिशेने जाऊ शकला असता. कदाचित कर्नाटकापर्यंत पोचला तर कोणी मराठी माणसं भेटू शकतील. दुसरीकडे वाटे की "काय माहिती; खरेच सामान चोरीला गेले का?"
खूप दिवसांनी विचार आला, त्याच्याकडून त्याच्या एखाद्या नातेवाईकाचा पत्ता फोन घेऊन मद्रासहून त्याला फोन लावता आला असता आणि त्याला पैसे घेऊन इकडे ये असे सांगता आले असते. त्या काळी पब्लिक एस टी डी नुकतेच सुरू झाले होते. "छे !! करायचीच तर पुरती मदत करायला हवी होती" असे वाटू लागले.
बराच काळ ही घटना माझ्या डोक्यात फिरत होती.
तो माणूस खोटे सांगत होता याची खात्री अगदी अलिकडे पटली.
आणंदला विद्यानगरमध्ये चौकात एका मनुष्याची अशीच भेट झाली. तो जळगावचा होता. तशीच कडेवर मूल असलेली बाई. तशीच एक पिशवी. सगळे तसेच. आणंद जवळ वडताल येथील स्वामी नारायण मंदिरात आले होते. बाकी सर्व स्टोरी सेम.
पण खरी गंमत तर पुढेच आहे.
मागील विचारप्रक्रियेनुसार त्याला फोन नंबर वगैरे विचारला. तेव्हा "मी काम करतो त्या शेठचा नंबर होता हो पण ती डायरीपण त्या सामानातच होती"असे उत्तर मिळाले. खोटे बोलत असल्याची जवळ जवळ खात्री असूनही मी याही माणसाला तिकिटासाठी ५०० रु दिले. फक्त यावेळी जळगावला जायला पुरतील एवढे पैसे दिले.
एरवी मिसळपाव वर किंवा इतरत्र "देवाच्या दर्शनाला आलात आणि असं कसं झालं? देवाने तुमच्या सामानाचं रक्षण केलं नाही का?" अश्या टाईपचे प्रतिसाद लिहिणारा मी त्यावेळी अडचणीत आहे असे सांगणार्याला नकार देऊ शकलो नाही.
खरेच परमुलुखात अडचणीत आला असेल तर? हा विचार बलवान ठरला.
प्रतिक्रिया
12 May 2010 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेखाचा शेवट अपेक्षित नव्हता ... आवडला.
मलातरी फार लांब जायची गरज नाही. मी सध्या पुण्यात आहे, आमच्या इथून पंधराएक मिनीट चालत जाण्याच्या अंतरावर बर्यापैकी मोठा सिग्नल आहे. तिथून चालत जाताना अर्ध्या वेळेला रस्ता ओलांडताना अशाच गोष्टी कानावर येतात... शिर्डी/शेगाव/... निघालो होतो, रस्त्यात पैसे संपले ...
हिरवा माणूस दिसला की मी पुढे जाते.
अदिती
13 May 2010 - 3:24 am | Pain
हिरवा माणूस ??
13 May 2010 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चौकातल्या सिग्नलवरचा!
अदिती
13 May 2010 - 11:06 am | पर्नल नेने मराठे
=)) अग मुम्बैत तर लाल माणुस असताना पण पुढे जातात :SS
चुचु
13 May 2010 - 11:59 am | अस्मी
मलाही पुण्यातच अस्साच अनुभव आलाय..सिग्नलजवळ पात्र सगळी सेम-एक माणूस, एक बाई आणि कडेवर एक लहान मूल...ती बाई मला थांबवून बोलायला लागली
ओ ताई, ठेकेदाराने फसवलं, पोरगं उपाशी आहे...गावी जायला पैसे नाहीत वगैरे
आणि मला ते खरं वाट्ल्याने मी त्याना ५० रु दिले :(
आणि नंतर एक मैत्रीण म्हणाली की तिलाही सेम अनुभव आला होता :(
त्यानंतर मी पण हिरवा माणूस दिसला की मी पुढे जाते.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
12 May 2010 - 10:02 pm | मुत्सद्दि
उत्तम अनुभव कथन.
शेवटचे वाक्य खरेच महत्वाचे.
अन मुख्य म्हणजे अशी मंडळी परमुलुखातच जास्त भेटतात.
अशा वेळी जर आपण मदत करू शकलो नाही तर मनाला फार रुखरुख लागून राहते.परंतु अशा लोकांना केलेली मदत ही योग्य होती का नाहि हे कळायला देखील काही मार्ग नसतो.
मुत्सद्दि.
12 May 2010 - 10:06 pm | विकास
अगदी असाच एक अनुभव दिल्लीत लाल किल्ल्यापाशी टूरीस्ट म्हणून गेलेल्या एका माझ्या मित्राला आला. मदत मागणारे दांपत्य डोंबिवलीचे होते. यांनी परत पैसे मिळणार नाहीत याच खात्रीने दिले. पण त्यांनी आग्रहकरून फोन नंबर वगैरे दिला. नंतर आपण किती खरे ठरलो हे पहाण्यासाठी त्या फोननंबरवर त्याने फोन केला. अर्थातच नंबर "राँग" होता आणि माझ्या मित्राचा अंदाज बरोबर.
----
असेच एका जवळच्या नातेवाईकाला दोन दशकाहून आधी, एक स्टेशनवर माणूस भेटला. अजून तेथे असलेल्या माझ्या एका भावाचा लहानपणचा ओळखीचा निघाल्याने, या नातेवाईकाने या कथित पोलीसाबरोबर गाडीतून प्रवास केला. नंतर दोन दिवसात हे महाशय यांच्या धंद्याच्या ठिकाणी हजर. पैसे मागितले. कधीच कुणाला न देणार्या या शहाण्या व्यक्तीने ५०० रू. काढून दिले. तो गेला आणि मग लक्षात आले की फसलो..
मग परत माझ्या भावाला ट्रॅक करायला सांगितले. म्हातारी मेल्याचे दु:ख नव्हते पण काळ सोकावू नये या अपेक्षेने... माझ्या भावाने एका शिवसेनेच्या नगरसेवकाला सांगितले. त्याला हा माणूस आणि त्याची कृत्ये माहीत होती. तो त्यांना घेऊन त्या माणसाच्या घरी गेला. पुढे जे झाले त्यामुळे आम्हाला जास्त धक्का बसला. त्या माणसाच्या आईवडीलांनी या नगरसेवकाला नुसते विचारले, किती पैसे घेतले होते म्हणून. ५०० रूपये सांगता क्षणी, शांतपणे आत जाउन काढून आणून दिले... मला एकदम कान चावायला लागलेल्या आईच्या प्रेमाची आठवण झाली.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
12 May 2010 - 10:08 pm | पांथस्थ
अशी कंडम मंडळी बेंगळुरमधे अनेक वेळा भेटतात. अगदि हिच कथा, सगळा पसारा तसाच. मी पहिल्यापासुनच दुर्लक्ष करत आलो आहे, पाहिल्या पाहिल्याच त्यांचा बनावटपणा जाणवतो.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
12 May 2010 - 10:09 pm | अक्षय पुर्णपात्रे
तुम्हाला दोन्ही कुटूंबांची दयनीय अवस्था न पहाव्ली गेल्याने तुम्ही दया येऊन पैसे दिले असावेत. बुडीत खाते म्हणजे एक प्रकारे राइट ऑफ. चॅरिटीला दिलेले पैसे बुडीत खाते नव्हेत.
12 May 2010 - 10:12 pm | शिल्पा ब
अहो नितीनभाऊ मलाही मुंबईत असे खूप अनुभव आले...खुद्द कुर्ल्यात, दादर, सायन आणि बांद्र्याला...एक गरीब माणूस, कडेवर लेकरू असलेली बाई अथवा एखादी म्हातारी...स्टोरी तीच...एकदा तर एक नौवारीवाई धडधाकट बाई कॉलेजात आली होती campus मध्ये...मी काही कुणाला पैसे दिले नाही...आणि पैसे मागताना सुद्धा वय बिय काही बघत नाहीत...मी तर कालेजात होते...एकदा तर सरळ एक हवालदाराला सांगितल पण त्यांनी दुर्लक्ष केलं...लोकसत्तात पण एकदा यावर लिहून आलं होतं....म्हणूनच काही मदत केली नाही....लोकांच्या चांगुलपणाचा फायदा (गैरफायदा) उठवायचे धंदे आहे...उद्या एखाद्याला खरंच गरज असेल तर त्याला मदत मिळेल का? एकदा मात्र माझ्या वडिलांनी एका वयस्कर व्यक्तीला ५० /- दिले होते...त्यांच्या diabetes आणि heart प्रोब्लेमच्या उपचाराला....ते गृहस्थ असेच दारोदार फिरत वर्गण्या गोळा करत होते...पैसे फुकट नको म्हणून त्याबद्दल शिट्टीवर गाणं म्हणून दाखवलं....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 10:21 pm | संजय अभ्यंकर
कंपनीच्या कामानिमित्त, मी गेली २४ वर्षे भारत भ्रमण करीत आहे.
भारतात, ही जोडपी सर्वत्र भेटतात.
त्यांचा पोषाख, कडेवरचे मुल, बाईच्या अंगावर दागीने हे सर्व काही सारखे असते.
हि लोकं केवळ मराठीच नव्हे तर, कानडी, तेलगू भाषाहि उत्तम बोलतात.
माझ्या कयासानुसार, ही माणसे महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील, एका विशिष्ट जमातीचे लोक आहेत. ह्या पध्दतीने पैसे कमावणे हा ह्यांचा व्यवसाय आहे.
आजतागायत ह्यांना मी एक दमडाही दिलेला नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या प्रकारची लोकं हल्ली जगभर तयार होत आहेत.
पैसे कमावण्याचा हा उत्तम मार्ग जगात सर्वत्र आढळतो.
असे लोक थोड्या वेगळ्या पोषाखात वेगळ्या पद्धतीने (परंतु तुम्हाला ऐकवलेल्या ष्टोर्याच) लोकांना सांगुन पैसे कमावतात. मला हि मंडळी फ्रेंकफुर्ट, मेलबोर्न अशा विविध ठीकाणी भेटली.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
13 May 2010 - 4:18 am | विंजिनेर
मला अशी जोडपी हैदराबाद, बंगळूरमधे नित्य दिसतात.
येस्स.. हाईट म्हणजे एक जोडपं हाँगकाँगजवळ शेन्झेन मधे सुद्धा भेटलं होतं(ते मँडॅरिन मधून पैसे मागत होतं मराठी नव्हे पण तरी एकूण एकच) =))
मी अर्थातच नकार दिला
13 May 2010 - 8:56 am | सुधीर काळे
सिंगापूरला मलाही एक 'एकटा' माणूस भेटला होता. पण जरा खोलात चौकशी केल्यावर मला त्याची लबाडी लक्षात आल्याने मी कांहीं पैसे दिले नाहींत.
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत !
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
12 May 2010 - 10:27 pm | धनंजय
येथे बॉल्टिमोरमध्ये एका "बाहेरगावच्या आडकलेल्या" माणसाने कथा अशी तयारीने सांगितली (म्हणजे "तयार" दिसणार नाही, अशी कलाकारी), प्रश्न विचारताना उत्तरे इतकी जवळजवळ पटण्यासारखी दिली... खोटेपणाची निश्चिती करायला मला दहाएक मिनिटे लागली. अर्थात त्याच्या कलाकारीबद्दल मी त्याला थोडेसे पैसे दिले.
याच्यापेक्षा कलाकारी कमी असलेले "हरवलेले" लोक बॉल्टिमोरमधल्या माझ्या जवळच्या रस्त्यावर दर एक-दोन आठवड्यांनी भेटतात. कथेचे नाविन्य कमी झाल्यामुळे मी पैसे देत नाही.
मात्र एका बाईने कडेवरच्या दोन-तीन वर्षांच्या मुलाला इतके उत्कृष्ट तयार केले होते, की "बघा याला सुद्धा भूक लागली" म्हटल्याच्या क्यूवर मुलाने भोकाड पसरले, आणि लगेच आईच्या कथाकथनात व्यत्यय येऊ नये, म्हणून गप्प बसला. माझ्याबरोबरच्या मित्राने या पथनाट्यकंपूला पैसे दिले - गंडल्याबद्दल फार वाईट न वाटता.
गरिबाने येनकेनप्रकारेण उपजीविका साधणे म्हणजे काही अथपासून इतिपर्यंत घृणास्पद नव्हे. मात्र भीक-दया बाजारातही काही पारदर्शकता हवी. माणुसकीची मर्यादा हवी. वर सांगितलेल्या अनुभवात त्या बाळाला फक्त नाटकातल्या योग्य प्रसंगी रडायला शिकवले होते. भारतात एखाद्या बाळाला अधिक कार्यक्षम भिकारी करण्यासाठी त्याला पांगळे करतात, तेव्हा मर्यादा ओलांडली, असे मला निश्चित वाटते.
(यंदाच्या फेब्रुवारीत मी, आई, व बाबा वैष्णोदेवीच्या यात्रेला गेलो - तेव्हा तिथे एका "पाकीट चोरी झालेल्या" मराठी माणसाने माझ्या वडलांकडून पैसे मिळवले. नंतर दर्शनाच्या रांगेत उभे असताना आणखी मराठी लोक भेटले, त्यांनासुद्धा हे महाभाग भेटले होते.)
12 May 2010 - 10:37 pm | शिल्पा ब
अहो धनंजय राव....भिक कशाला मागायला लागतेय...आणि कार्यक्षम भिकारी काय? काहीही बोलायचं का? अश्या लोकांपेक्षा काय वाटेल ते काम करणारे लोक जास्ती प्रगल्भ नाही का? अंगात रग असताना भिक काय मागायची? करायला गेल तर काम मिळू शकता...पण यांना कामच करायचं नसतं...आरामात हात पसरले कि काहीतरी मिळत मग कश्याला काम करतील...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 May 2010 - 1:20 am | चिन्मना
अहो शिल्पा तै, तुमची प्रतिक्रिया (मूळ लेखातल्या किंवा बाकीच्या प्रतिक्रियांमधल्या) भीक मागून फसवणार्या लोकांबद्दल असेल तर बरोबर आहे. पण कार्यक्षम भिकारी म्हणजे भिकेचा धंदा अधिक कार्यक्षमतेने चालणे असे धनंजयना म्हणायचे आहे. लोकांना (विशेषतः लहान मुलांना) भिकेला लावणे हाच काही लोकांचा धंदा असतो. भिकेचा धंदा दात्यांना जास्तीत जास्त कणव आणण्यावर अवलंबून आहे. म्हणून मग तो धंदा नीट चालावा यासाठी काही लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात (मुलांना आंधळे करणे, पांगळे करणे, इ.).
मधुर भांडारकरचा ट्रॅफिक सिग्नल चित्रपट पाहिलात तर याची कल्पना येईल.
चिन्मना
12 May 2010 - 10:33 pm | मुक्तसुनीत
रॉय किणिकर नावाच्या दिवंगत कवीबद्दलचा किस्सा आहे. किणीकरांचे आयुष्य एकंदर पैशाच्या चणचणीमधे गेले. आयुष्यभर धड नोकरी नव्हती. साहित्यिक वर्तुळात छोटी मोठी कामे करून उपजीविका करणार्या या माणसाने पैसे उसने घेऊन परत न करणे , कसल्याशा योजना आणून गंडा घालणे आदि गोष्टींबद्दल कुख्याती मिळवलेली होती.
एकदा ते जयवंत दळवींकडे आले आणि अतिशय गांभीर्याने त्यानी सत्काराची संकल्पना मांडली. यामधे पैशाची थैली जमवण्याची संकल्पना अंतर्भूत होती.
दळवी : अहो पण सत्कार कुणाचा ?
किणीकर : माझाच !
किणीकरानी मग अतिशय मुद्देसूद भाषेत , सुवाच्य अक्षरात जे कुणी मान्यवर येतील त्यांची नावे आणि त्यानी द्यायच्या रकमा याची एक मोठीशी लिस्ट बनवली. दळवींचे नाव त्यात होते हेवेसांनल.
आणि मग त्याना काय वाटले कुणास ठाऊक, त्यानी अजून एक छोटी लिस्ट बनवून दळवीना दिली. त्यातही काही नावे होती.
दळवी : आता ही वेगळी यादी कसली ?
किणीकर : हे लोक कसले देणारेत पैसे. हे आपण त्यांना द्यायचे.
दळवी शांतपणे चालत निघून गेलेल्या किणीकरांकडे पाहात राहिले.
12 May 2010 - 11:24 pm | अक्षय पुर्णपात्रे
हा किस्सा आधीही ऐकलेला आहे. पुन्हा वाचतांना पण रोचक वाटला. कॉलेजात असतांन काही मित्र पैसे मागत असत. तेव्हा पुण्यात लॉटरीचे खूप स्तोम होते. रोज आलेल्या नंबरचा हिस्टोरिक डेटा असलेली एक चोपडीही लॉटरीच्या दुकानात मिळत असे. त्यावर नंबरांवर बॉलपेनाने कुठले कुठले पॅटर्न जमवून काही मुले इतरांना पैसे द्यायला भाग पाडत. हा एक आकडी लॉटरी काय प्रकार आहे ते पाहू या असा विचार करून पन्नास रुपये एकाला दिले. दुसर्या एकानी १०० रुपये दिले. ज्याने मागितले त्यानी स्वत:चे दोनेकशे घातले असावेत. सर्व पैसे बुडाले. बुडणारच होते.
13 May 2010 - 11:32 am | रामदास
१९९५ च्या दिवाळी अंकात हा किस्सा वाचल्याचे आठवते.फक्त काही फरक आहेत ते नमूद करतो.
दळवी : अहो पण सत्कार कुणाचा ?
किणीकर : माझाच !
दळवी : पण कशासाठी .
किणीकर : एकसष्ठी म्हणून.
दळवी : पण नुकतीच ती तर थैली मिळाली ना .
किणीकर : मग सत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून.मी सर्टीफिकेट आणतो.
असो .विषय निघाला . आठवले ते लिहीले
13 May 2010 - 1:45 pm | प्रदीप
आणी थोडे अवांतरः
रॉय किणीकर व उमाकांत ठोंबरे (वीणेचे) ह्या दोघांबद्दल खूप वाचून आहे. त्यातील ठोंबर्यांचे मराठी साहित्यास योगदान बरेच आहे, हे खरे. किणीकरांविषयी नक्की काही सांगता येत नाही. सज्जादप्रमाणे त्यांच्या विक्षीप्तपणाच्या कथाच जास्त. आणि गेली काही वर्षे त्यांचे सुपुत्र अनिल किणीकर अनेक दिवाळी अंकांतून आपल्या दिवंगत वडीलांविषयी अगदी सातत्याने लिहीत आले आहेत. ह्यापलिकडे अनिल किणीकरांचे इतर काही लिखाण असलेच तर ते माझ्या नजरेत आलेले नाही.
12 May 2010 - 10:45 pm | टारझन
आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अणोळखी व्यक्तिला चाराण्याची पण मदत करत नाय :) हा कोणी समोर अॅक्सिडंट झालेला विव्हळत पडला असेल तर त्याला हॉस्पिटल पर्यंत नेण्याचं काम फुकट करू :) पण "अनोळखींना" पैका नाय बा !!
मी अफ्रिकेत होतो तेंव्हा ची गोष्ट . तेंव्हा मी साईट वर एकटा आधीपासुन होतो. काही महिण्यांनी दुसर्या प्रोजेक्ट साठी अजुन एक जण आला. तो ही नविनंच देशाबाहेर आलेला असल्याने त्याची परिस्थिती समजुन मी त्याला मोबाईल सिमकार्ड घेऊन दिलं ( २०,००० शिलींग्स) , नंतर काही कॅश असु दे म्हणुन ८०,००० शिलींग्ज दिल्या. म्हंटलं , तु डॉलर्स कनव्हर्ट केले की देउन टाक. आता माझ्या क्लायंट तर्फे मला माझ्या हॉटेलात जेवण फ्री होतं , ह्याला ही गोष्ट कळली तशी नेमका दुपारी आणि रात्री जेवायच्या टायमाला माझ्याकडे यायचा.त्याचे पैतरे पाहुन त्याला मी स्पष्ट सांगुन देखील हा चिटकलाच.
पैसे द्यायचं नावं ही नाही , उलट सॅटर्डे नाईट क्लबची एंट्री फी पण मीच भरली. क्लबात पोरीला बीयर मी पाजायचो , आणि हा साला तिला घेउन फिरायचा , आपला डोकाच आउट झाला ! असा तासला त्याला तेंव्हा , पैसे ठेव म्हंटलं भाड्या .. आणि सुट इथुन .. !! तेंव्हा कुठे उपकार केल्यासारखे पैसे काढले भाऊने !!
आर्थिक व्यवहारांत कच्चे असलेल्या लोकांचा मला मनस्वी तिटकारा आहे.
- (व्येव्वारी) टारेश पैशेबुडवी
13 May 2010 - 3:29 am | Pain
क्लबात पोरीला बीयर मी पाजायचो , आणि हा साला तिला घेउन फिरायचा , आपला डोकाच आउट झाला
=)) =)) =)) =)) =))
12 May 2010 - 10:53 pm | योगी९००
नितिन थत्ते..
मला हाच अनुभव सुमारे १० वर्षापुर्वी मद्रासलाच आला...कदाचित तोच माणूस असावा...मी आणि माझा मित्र मराठीत बोलत होतो..एक माणूस, त्याचे कुटूंब आम्हाला रु. १०० ला चुना लावून गेले.
असाच मी एकाला शिकवलेला धडा..तो पण मद्रासलाच .. http://www.misalpav.com/node/5171
खादाडमाऊ
12 May 2010 - 10:54 pm | शिल्पा ब
पैसे देऊ नये घेऊ नये...आणि करायचे झाले तर कागदपत्र वगैरे करावे....फुकाचा विश्वास काय कामाचा...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 11:00 pm | नितिन थत्ते
कागदपत्रं ?
तुम्ही बहुतेक दुसर्या धाग्यावरचा प्रतिसाद इथे टंकला का?
(संभ्रमित) नितिन थत्ते
12 May 2010 - 11:08 pm | शिल्पा ब
नाही...मी in general व्यवहारासाठी विधान केलं....लेखी स्वरुपात व्यवहाराचा पुरावा ठेवावा....बाकी रस्त्यावरच्या लोकांना मदत न करणेच चांगले...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 11:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>तुम्ही बहुतेक दुसर्या धाग्यावरचा प्रतिसाद इथे टंकला का?
हा हा हा :)
बाकी, बस स्टॅंडवर असे नमुने भेटतात. कधी कधी सहज मदत करतोही आणि कधी नाही. तो असे का करतो असा मनातल्या मनात किंचित मागोवा घेतो आणि सोडून देतो. 'ट्राफीक सिग्नल' की अशाच कोणत्या तरी चित्रपटात एका सुशिक्षित युवकाचा किस्सा तर भारीच दाखवला आहे.
-दिलीप बिरुटे
12 May 2010 - 11:52 pm | शिल्पा ब
आता तसं वाटतंय खरं... :))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 11:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होता है होता है ! :)
13 May 2010 - 12:09 am | विकास
तुम्ही बहुतेक दुसर्या धाग्यावरचा प्रतिसाद इथे टंकला का?
एकदम मस्त =))
माझ्या डोळ्यासमोर नितीनराव अथवा धनंजय आले. एकजण मद्रासला आणि दुसरा बाल्टीमोरला कागदपत्रांवर सह्या करून घेत पैसे देत आहेत... ;)
बाकी या धाग्यावरून हा धागा आठवला आणि त्यातील माझा आणि क्लिंटनचा प्रतिसाद आठवला.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
13 May 2010 - 12:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>माझ्या डोळ्यासमोर नितीनराव अथवा धनंजय आले. एकजण मद्रासला आणि दुसरा बाल्टीमोरला कागदपत्रांवर सह्या करून घेत पैसे देत आहेत.
=)) मेलो.
13 May 2010 - 12:51 am | टारझन
>> मेलो
ह्म्म चला रे धम्या , पुप्या , डाण्या धरा तिकडून .. ह्म्म्म नीट बांधा ,... प्रभ्या मडकं घेउन येरे .. नीट तपासुन आण चिर वगैरे पडलेलं नको ... पर्या ते घाटावरच्या विधींचं पुस्तक कुठेय ? घ्या चला लागा रे तयारीला =))
(पळा लै बोललो .. मलाच लेटावं लागेल आता =)) )
13 May 2010 - 7:46 am | विकास
=)) =))
लोकांच्या जिभेला हाड नसते हे माहीत होते, (किबोर्ड टंकणार्या) बोटांना नसलेले पहील्यांदाच पाहीले ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
13 May 2010 - 12:47 am | शिल्पा ब
बाकी तुमच्या वरच्या धाग्याविषयी ....अलोवेराच्या विविध वस्तू विकणारी अमेरिकन कंपनी सुद्धा मुंबईत बघितली आहे...बहुतेक फोरेव्हर लिव्हिन्ग... त्यांची toothpaste च म्हणे ३००रु ला...MLM चीच काहीतरी स्कीम..पैसे मिळवायला कुठल्या ठरला जातात लोक..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 May 2010 - 10:02 am | प्रदीप
अगदी भीक घालतांनाही ड्यू डिलीजन्स !!
12 May 2010 - 11:02 pm | ऋषिकेश
काय सांगता काय?
हा तुमचा अनुभव जस्साच्या तस्सा मला ह्या डिसेंबरला चेन्नईलाच आला.. फक्त अकोल्याचे कर्हाड झाले होते.
मात्र मी थेट पैसे न देता "चला आधी हॉटेलात जेऊ घालतो आणि मग स्टेशनवर जाऊ तिथे तिकीट काढून देतो" म्हटल्यावर तो म्हणाला की "ठिक आहे त्या सर्वाणा भवनपाशी थांबा म्हातार्या आईला घेऊन १० मिनीटात येतो."
मी व बायको तिथे तासभर थांबलो तो आला नाहि..
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
12 May 2010 - 11:16 pm | टारझन
आरंतिच्यामारी ... =)) समद्यास्नी योकंच भिकारी घावतो काय ? पोचलेला दिसतोय ... आणि डेंजर बी .. अजुन कोणला धंदा .. आय मीन ... भिक मागु देत नाही म्हणजे .. :)
12 May 2010 - 11:19 pm | चिरोटा
बेंगळुरुत पण अशा २/३ मराठी कुटुंबांची गँग आहे.कधी औरंगाबादचे असतात तर कधी नागपूरचे.तिसर्यांदा मला भेटल्यावर मी त्यांना 'तुमचे गाव कुठचे ते नक्की करा' म्हंटले.गर्दीतून मराठी माणूस ते नेमका कसा शोधतात हे न उलगड्लेले कोडे आहे.
P = NP
12 May 2010 - 11:39 pm | आनंदयात्री
आपल्याला आलेल्या अनुभवातुन बहुदा हरएक माणुस गेला असावाच. आपल्या तत्वांना मुरड घालुन केलेले माणुसकी खात्यातले आपले वर्तन कौतुकास्पद वाटले.
12 May 2010 - 11:45 pm | Nile
स्थळ तेच, मद्रास.
विमानतळावरुन बाहेर पडतो होतो तेव्हढ्यात असेच एकाने "साहब हिंदी आती हे क्या" ने सुरु केले. मी म्हणालो आती है. मग त्याने सांगितलेली कहाणी तशीच. तिरुपतीला आले होते, सामान चोरी गेलं वगैरे. मी खात्री म्हणुन नाव गाव विचारुन घेतलं. पुण्याजवळचं कुठलं तरी गाव होतं. मी म्हणालो, चला रेल्वेची तिकीटं काढुन देतो, म्हणजे मुख्य प्रश्न सुटेल. मग त्याची बायको, लहानसं मुल, उपाशी वगैरे सुरु झालंच. मी काय करावं असा विचार करत असतानाच त्या लोकांच्या सुदैवाने एक श्रीलंकंन बाईने आमचा संवाद पाहिला होता. तिने मला विचारलं की काय अचडण आहे. मी तिला इंग्रजीत सविस्तर सांगितलं. ती ५००० रु द्यायला तयार झाली. तेव्हढ्यात विमानतळावरच्या पोलिसांनी ह्या लोकांना पाहिलं आणि हाकलुन लावलं. आम्हा दोघांना वाईट वाटलं. ते लोक कुठे गेले हे मी पाहिलं होतं (लोकल रेल्वे मार्गावर, मलाही तिकडेच जायचं होतं). मी त्या बाईला म्हणालो, तुम्हाला खरंच मदत करायची असेल तर मी त्यांना पैसे नेउन देतो. हमी म्हणुन माझा मोबाईल मी त्या बाईंना दिला आणि पैसे घेउन तिकडे निघालो. तिथे २०-२५ जणांची चांगलीच टोळी होती. एव्हढी मोठी टोळी पाहिल्यावर मला शंका आली म्हणुन मी जवळ जाउन त्यांचा संवाद ऐकला. हे सगळे फसवायचे धंदे आहेत याची खात्री पटल्यावर मी त्या बाईंना पैसे परत केले (आणी माझा मोबाईल घेतला).
गंमत म्हणजे मी तिथुन निघाल्यावर त्या मनुष्याने मला लोकल स्थानकावर पाहिले आणि माझ्याकडे येउन पैसे मागु लागला. मी पैसे परत दिले हे ऐकुन तो मनुष्य माझ्याशी हमरीतुमरीवरच आला, जसे काही त्याचेच पैसे मी घेतले होते. त्यानंतर अशी माणसं मद्रासमध्ये दोन तीन वेळा दिसली होती, मी हिंदी येतं का या प्रश्नाला नंतर कधीही उत्तर दिलं नाही.
-Nile
13 May 2010 - 1:26 am | चिन्मना
मला तर न्युयॉर्कच्या ट्रेनमध्ये अशी मंडळी जवळपास दर महिन्यातून एक-दोनदा दिसतात. वॉलेट हरवले, पैसे संपले असे म्हणून एखाद्या विविक्षित स्टेशन पर्यंत जायला पैसे मागत असतात. एक मात्र खरं की मला प्रत्येक वेळेला वेगळा माणूस दिसला आहे. त्याच ट्रेनमध्ये पुन्हा पुन्हा जाऊ नये हे धंद्याचे गणित त्यांना व्यवस्थित माहित असते ;)
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
13 May 2010 - 7:58 am | स्पंदना
सान्गु? नको सान्गु?
कॉलेज मधे असताना एकदा बस स्टन्ड वर तिकिटा साठी पैसे कमी पडले. खुप वेळ विचार करुन शेवटी माझ्या वयाच्याच एकाला कस बस विचारल. त्यान एकाच गावाला जायच म्हणुन माझ तिकिट काढल. पैसे परत करायला म्हणुन कित्ती दिवस मी शोधत होते पण परत कधीच दिसला नाही . त्या महान आत्म्याला या लेखाच्या निमित्ताने सादर प्रणाम!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
13 May 2010 - 8:10 am | प्रकाश घाटपांडे
या धाग्यातुन आपली गुन्हाकार्यप्रणाली कशी बदलावी असा बोध एखाद्याने घेतला तर? ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
13 May 2010 - 9:43 am | संजय अभ्यंकर
घाटपांडे साहेब, आपले पोलीसी अनुभव लिहून, एक लेखमाला काढा!
बोधप्रद व मनोरंजक होईल!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
13 May 2010 - 10:19 am | jaypal
व्हॅली आफ फ्लावर्स=उत्तराखंड राज्य येथे तरुण नवरा बायको आणि एक तान्हे मुल कडेवर घेऊन कुटुंब भेटले होते. आम्ही नांदेडचे आहोत आणि परत जाण्यासाठी पैसे मागत होते .(हे सगळ मराठीतुन बोलले होते.)
नेहमी प्रमाणे मी पैसे दिले नाहीत पण जेवणार का? असे विचारल्यावर दोघांनी प्रत्येकी २/२ आलु पराठे खाले आणि बाळा साठी १ ग्लास दुध घेतल.
मी नेहमी / शक्यतो खाद्यपदार्थच देतो.(न फोडलेला पुडा परत दुकानत विकुन पैसे घेताना पाहिल्या पासुन) स्टेशन वरील मुलांना बिस्किट पुडा देतान तो फोडुनच देतो.
अन्यथा केळी ,वडापाव आहेतच.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
13 May 2010 - 10:26 am | पर्नल नेने मराठे
मी असल्या कोणालाच नाही मदत करत. पण माझा नवरा असल्या लोकांना हॉटेलात घेवुन जातो न त्यांच खायच बिल भरतो . :D
चुचु
13 May 2010 - 12:17 pm | आंबोळी
चुचु,
जरा तुझ्या नवर्याचा पत्ता , फोटो देउन ठेव ग...
आंबोळी
13 May 2010 - 2:10 pm | नाना बेरके
मागे एकदा एका बाईने माझे आठ रुपये बुडवले आणि निघून गेली. मी आणि तो हवालदार बघतच राह्यलो. .
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
(रिक्षावाला ) नाना बेरके
13 May 2010 - 2:42 pm | राजा
=))
13 May 2010 - 4:46 pm | योगी९००
हहपुवा..
खादाडमाऊ
13 May 2010 - 11:08 pm | शिल्पा ब
इथूनपुढे नीट भाडं घेत चला...नाहीतर दंड म्हणून अजून २ रु. जास्त घेईन पुढच्यावेळेस ....
जागरूक (ग्राहक (आणि नाहक) पंचायतिवाली ) नागरिक
शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 May 2010 - 2:56 pm | कानडाऊ योगेशु
कॉलेजात शिकत असताना घरी दोघेजण आले.
तेव्हा घरात मी व लहान भाऊ असे दोघेच होतो.
आल्यावर त्यातील एकाने ओळख दिली कि अमुक तमु़क ठिकाणी राहणार्या तुमच्या आत्यांच्या अपार्टमेंटमध्येच माझे नातेवाईक राहतात.
मी भोळेपणाने त्यांना या या म्हणालो व उपचाराप्रमाणे पाणी घेणार का म्हणुन विचारले.त्यांनी हो म्हटले.पाणी घेऊन हॉलमध्ये आलो तर एकजण खुर्चीवर आणि एकजण जमिनीवर बसला होता.
जमीनीवर बसलेला मला म्हणाला कपडे दाखवायचे होते.आणि त्याने तेथेच कपड्यांचा बाजार मांडला.
त्यांना धडपणे जा ही म्हणता येईना.(भोळसटपणाने मी त्यांना काका काका संबोधायल सुरवात केली होती. काका आता तुम्ही जा असे म्हणणे मला प्रशस्त वाटेना).
मला म्हणाला कि एखादे कापड घ्या पैसे नंतर दिले तरी चालतील.
त्यांच्यातील दुसरा तसा आडदांडच होता.मला उगाच भीती कि काही उलटेसुलटे झाले तर हा मारायलाही कमी करायचा नाही.
शेवटी चारशे रुपयाला बहीणीसाठी ड्रेस मटेरियल घेतले.
मग त्यांची चौकशी चालु झाली.बहीण कुठे राहते.गावात अजुन कोण कोण नातेवाईक आहेत का.? पण ह्या प्रश्नांना धडपणे उत्तर न देता तुटकच उत्तरे दिली व त्यांची बोळवण केली.(कधीतरी वडिलांनी असे किस्से सांगितले होते.एकाकडुन पत्ता घ्यायचा.त्याच्याकडे जायचे.आपला संदर्भ द्यायचा आणि गंडवायचे.)
बहीणीला ते ड्रेस मटेरियल बरे वाटले.भले ह्या व्यवहारात तसे नुकसान काही झालेही नसेल पण इच्छा नसताना नको असलेली गोष्ट माझ्या मूर्खपणामुळे कुणी माझ्या गळ्यात मारुन गेला आणि शक्य असतानाही मी ते टाळु शकलो नाही हा विचार अजुनही माझे डोके खातो.
साले ते दोघे आता कधी कधी तर माझ्या डोक्यात शिरतात.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
13 May 2010 - 4:56 pm | भारद्वाज
मला इथे सी.बी.डी.मधे सुद्धा आला होता असा अनुभव. पहिल्यांदा झाली फसगत.
अशावेळी आपण अनुभवातून शहाणे होतो पण आपल्यासोबत असणारे स्वानुभवातूनच शहाणे होणे पसंद का करतात ते कळत नाही.
मागच्या वर्षी आम्ही मित्र गोव्याला गेलो होतो. क्रूझवरून धमाल करून पणजी बस स्टँडला रात्री ८-८.३० च्या सुमारास पोहोचलो. आझाद भवनला जाण्यासाठी बस पकडायची होती. तर वाटेत नाटकी कुटुंबकबीला येउन धडकला. तेच रडगाणे. मित्रलोक विरघळले. मित्रांना परोपरीने समजावूनसुद्धा शेवटी त्यांनी १०० रु. दिलेच त्यांना.
13 May 2010 - 11:12 pm | शिल्पा ब
अय्या सी.बी.डी. त कुठे तुम्ही ?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 10:37 am | भारद्वाज
या धाग्यात अवांतर चर्चा नको म्हणून तुमच्या खरडवहीत लिहिले आहे.
-जय महाराष्ट्र
13 May 2010 - 5:00 pm | योगी९००
लहानपणी कोल्हापुरला असताना असेच दोन सरदारजी आले होते..घराच्या बाहेर special nameplates करून देतो म्हणून आगाऊ रु.१०० घेतले आणि गेले ते गेले..त्यांनी सांगितले होते की चंदिगड का लुधियाना वरून nameplates येतील. फक्त आम्हालाच नाही तर पुर्ण बिल्डिंगला (सर्व मिळून साधारण ८ घरे)चुना लावून गेले. सगळेजण नंतर त्याची आठवण काढून फार हसायचे.. गंमत म्हणजे एकाच वेळी सगळे hypnotize झाल्यासारखे फसले.
बाकी hypnotisam ने फसलेले दोन मोठे अनुभव (ते पण नात्यातले) मला माहीत आहेत. ते परत कधीतरी सांगतो..!!!
खादाडमाऊ
13 May 2010 - 10:59 pm | विकास
असे काही प्रसंग आठवले अथवा इतरांकडून वाचले की मनातल्या मनात मी खालील ओळी म्हणू लागतो:
काली घटा छाय मोरा जिया तरसाय
ऐसेमे कोई कही मिल जाय
बोलो किसा का क्या जाय, रे क्या जाय, रे काय जाय...
:-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
13 May 2010 - 11:46 pm | टिउ
कॉलेजात शिकत असतांना (किंवा नसतांना)ची गोष्ट आहे. एकदा मी आणि माझा एक मित्र कट्टयावर गप्पा मारत बसलो होतो. तर एक माणूस तिथे येउन उभा राहीला. २५-२६ वय असेल. फाटलेले कपडे, दाढी वाढलेली, हातापायाला खरचटलेलं होतं.
येउन बराच वेळ नुसता उभा होता. मग आम्हीच विचारलं काय झालं. तर म्हणाला साहेब मी ट्रक वर क्लिनर म्हणुन काम करतो. परवा ड्रायव्हरशी भांडण झालं आणि त्यानी ट्रक मधुन ढकलुन दिलं. खिशात पैसे पण नाही, दोन दिवसापासुन काही खाल्लं नाही, अंग दुखतंय वगैरे वगैरे...
मी विचारलं की दोन दिवसापसुन कसली वाट बघत होता तर म्हणाला कुणाकडुन पैसे मागायची लाज वाटत होती, पण आता सहन होत नाहीये...बसभाड्यापुरते पैसे द्या!
आता कॉलेजला असतांना कुठ्नं खिशात पैसे असणार. तरी दोघांकडे मिळुन ६५ की काय रुपये मिळाले ते त्याला दिले. पत्ता मागत होता, घरी गेल्यावर पैसे पाठवतो म्हणाला. पण आम्ही काही पत्ता दिला नाही...
खरं बोलत होता की खोटं माहीत नाही, आणि आता कळणारही नाही. पण गरजु व्यक्तीला मदत केल्याचं समाधान मिळालं होतं. आताही बरं वाटलं आठवुन...
14 May 2010 - 3:53 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम अनुभव कथन. आणि मुख्य म्हणजे अगदी प्रामाणिक कथन. त्याबद्दल कौतुक वाटते.
बिपिन कार्यकर्ते