अजीब दासताँ है ये - तिला आठवताना

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
24 Feb 2010 - 11:23 pm

...आज अचानक संध्याकाळी का कोणास ठाऊक. पत्नी छायाचा हसरा गोरापान चेहरा, घारे डोळे, त्यावर गॉगल,बेलबॉटम पँट, बुशकोट टाईप टाँप, हाय सँडल्स, कपाळावर जरा मोठी लाल टिकली. - 'सो व्हॉट' - म्हणायची स्टाईल आठवली.छाया आली आणि गेली. आठवणींची सौगात देऊन. त्याला ३२-३३ वर्षे झाली...

... एक साडेसात नंतरची चंदीगढजवळच्या पिंजोर गार्डनजवळ रविवारची संध्याकाळ. रस्त्यावरच्या वाहनांचे दिवे डोळ्यांना दिपवत होते. तेंव्हा धक्का बसल्याचे जाणवले व मी लुडकून स्कूटर अंगावर घेऊन धडपडलो. छाया कोसळली. रस्त्याच्या मध्यावर जाऊन आडवी झाली. म्हशींचा तांडा जात होता. त्याचा गुराखी धावला त्याने मला उभे केले. मी सावरलो. छायाला शोधायला लागलो. तोवर एका कारच्या हेडलाईटमघे ती रस्त्याच्या मधोमध पडलेली दिसली. पुढे तिला एम एच मधे नेऊन उपचार चालू झाले. माझ्य़ा खांद्यावर हाताने थोपटत एक मेजर म्हणाला, 'सॉरी यंग मँन.युवर वाईफ इज नो मोअर'!....

... तो काळ होता नाटकाच्या माझ्या वेडाचा. पायलट ऑफिसर असताना माझे नुकतेच लग्न झालेले. शहर कानपुर. हवाईदलात सकाळी ६.५०ला ऑफिस सुरु होई. मधे जेवणाला तासभराची सुट्टी की परतायला सात वाजत. माझे काम जोखमीचे. पैशाच्या देवाणघेवाणीत जर दुर्लक्ष झाले तर फटका बसणार व मी जुनियर मोस्ट असल्याने सर्व कामांसाठी मला धावावे लागे. युनियनची लोक पेमेंटसाठी वारंवार घरणे देण्यासाठी हपापलेली. घरी परतलो की नाटकाचे चोपडे घेऊन आम्ही दोघे स्कूटरवरून वाटेत मधेच भाजी व किराणा घेऊन तालमीला हजर राहायला तयार. मधे मधे चहाचे राऊंड होत होत रात्री १२ पर्यंत तालमी चालत. नंतर नेहमीचा 'डाव' रंगे. 'मॉर्निंग सॉर्टी' म्हणून पुन्हा डाव रंगे. दुसऱ्या दिवशी सकासकाळी परेड स्टेट घ्यायला मी कडक युनिफॉर्ममधे कामाला. असा धामधुमीचा काळ होता....

.... छायाचा फायनल बी. ए.चा अभ्यास चालू होता. मी कधा चेष्टेने म्हणायचो,' बघू काय तुला येतय ते'. तिचे एक एक उत्तराचे तावच्या ताव मला त्याच्या तल्लख बुद्धीची चुणुक देत. छायाला नाटकाच्या पाठांतराचा काहीच प्रश्न नव्हता सर्वांचे संवाद तिला पाठ असत. मी पाठांतरला तगडा असे म्हणता म्हणता तिने मला सहज मागे टाकले. माझ्या अजोबांनी लिहिलेले अप्रकाशित नाटक होते. गावाकडून आलेल्या कलाकारांची फिल्म इंडस्टीत कशी फरफट होते त्यावर आधारित नाटकाचे नाव होते - 'हे असच चालायचं' - प्रयोग ठाकठीक झाले. आणखी एक नाटक पाडून(त्यावेळची फ्रेज) जरा विश्रांती घेई तोवर माझी कानपुरातून चंदीगडला बदली झाली. .....

..... जायच्या आधी नाटकातल्या कलाकारांच्या संमेलनाचा कार्यक्रम माझ्या घरात साजरा झाला. चहा फराळानंतर गाणी म्हणण्याची टूम निघाली. होता होता नाटकातील एका गुणी हिरॉईनची पाळी आली. सुरेल आवाजात तिचे गाणे सुरु झाले.... 'अजीब दासतां है ये.... किसी के इतने पास हो... के हमसे दूर हो गए... ये शाम जब भी आएगी.... तो तुम हमको याद आओगे......छाया व मी समोर समोरबसून तिच्या छान आवाजाला ठेका देऊन दाद देत होतो. नंतर काही काळानंतर या गाण्यासाठी आम्ही आवर्जून 'दिल अपना' सिनेमा पाहिला. गाणे संपले व आमच्या डोळ्यांसमोर तो गाणारा चेहरा आला....

.... ये शाम जब भी आएगी, तुम हमको याद आओगे.... गाण्यातील आशय आणि सिचुएशनवरून आमच्या जीवनात तो सीन खराच उरतला होता?...

......नुकताच एका संध्याकाळी फोन आला. कातरलेल्या आवाजात मुलगी नेहा बोलली, 'आई, मला अपघात झालाय. पण मी ठीक आहे'. कुठे, कधी, कसा आदी प्रश्नांच्या फैरी झडल्या. आधी तु परत आमच्याकडे ये. परागला- तिच्या नवऱ्याला- कळवणे वगैरे बोलणे झाल्यावर सौ. अलकाने मला सविस्तर सांगितले की कोरेगाव पार्क मधील नॉर्थ मेनरोडवरील गल्लीत म्हशी परतत होत्या त्यातील एक अचानक धावत समोर आली ती नेमकी नेहाच्या स्कूटीच्या समोर. धक्क्याने नेहा खाली पडली. ओरडाआरडा झाला तोवर तिच्या डाव्याहाताला विळखा बसला. त्याने तिला उचलून उभे केले. तिची स्थिती सामान्य झाल्यावर तिने वर पाहिले तर ती होती लक्ष्मी हत्तिण. तिची मैत्रिण. रस्त्यात कोठेही हत्ती दिसला की नेहा थांबणार त्याच्या जवळ जाऊन काही खायला देणार. काही नाही तर नाणे सोंडेत देऊन मग डोक्यावर सोंडेचा हलकासा टप्पु प्रसाद म्हणून घेतल्यावर स्वारी पुढे जाई. आज तिला वाचवायला, सोंडेने दंडाला धरून सावरायला. लक्ष्मी आली .... उधळलेल्या म्हशींच्या मुळे आठवणी ताज्या झाल्या....
... अजीब दासताँ है ये....

नाट्यमुक्तकसद्भावनाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Feb 2010 - 11:30 pm | बिपिन कार्यकर्ते

ओकसाहेब... काय लिहिलंय हो... !!!

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

24 Feb 2010 - 11:56 pm | धनंजय

हळव्या आठवणी

पक्या's picture

25 Feb 2010 - 12:43 am | पक्या

खरच..अजिब दास्ता है ये.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

रेवती's picture

25 Feb 2010 - 5:05 am | रेवती

बापरे!
अंगावर काटा आला.
तुमचं लेखन वेगळच असतं.

रेवती

अश्विनीका's picture

25 Feb 2010 - 7:49 am | अश्विनीका

खरच वेगळीच कहाणी आहे. ह्या लेखाला छान लिहीलं असं कसं म्हणणार..पण लेखन खरोखर आवडले.
हत्तिणीने आपल्या मुलीला मदत केली . प्राण्यांनाही किती समज असते.
- अश्विनी

हर्षद आनंदी's picture

25 Feb 2010 - 8:36 am | हर्षद आनंदी

तुमची प्रसंग मांडण्याची पध्दत निव्वळ लाजवाब.. वाचताना अनुभवल्याचा भास झाला

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

प्रकाश घाटपांडे's picture

25 Feb 2010 - 8:59 am | प्रकाश घाटपांडे

ओकसाहेब आपल्या कडे अनुभवांचा खजाना आहे. टाकत रहा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मदनबाण's picture

25 Feb 2010 - 9:42 am | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

प्रमोद देव's picture

25 Feb 2010 - 10:19 am | प्रमोद देव

:(

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

चतुरंग's picture

25 Feb 2010 - 10:34 am | चतुरंग

सत्य कल्पिताहून अद्भुत असतं असं म्हणतात ते उगीच नाही!
कमालीची हळवी आठवण!

चतुरंग

विशाल कुलकर्णी's picture

25 Feb 2010 - 1:24 pm | विशाल कुलकर्णी

खरेच डोळे पाणावले .

सस्नेह
विशाल

स्वाती दिनेश's picture

25 Feb 2010 - 9:00 pm | स्वाती दिनेश

सत्य कल्पिताहून अद्भुत असतं असं म्हणतात ते उगीच नाही!
कमालीची हळवी आठवण!

चतुरंग यांच्यासारखेच म्हणते.
स्वाती

भानस's picture

25 Feb 2010 - 9:19 pm | भानस

आले. स्वातीसारखेच म्हणते. चटका लावून गेले.

प्राजु's picture

26 Feb 2010 - 3:07 am | प्राजु

खरच अजीब दास्ताँ है ये...
:)
सु रे ख!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/