परिवर्तन!!!

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जे न देखे रवी...
13 Oct 2009 - 12:13 am

दोस्ता, कुठे बेपत्ता झालास?
बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही!
भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू,
व्होड्का मिळेलच तिथे; नाही तर ओल्ड मंक सांगू,
अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ,
आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र,
प्रश्नांचा नाही तुटवडा, हवे तर बेळगाव मांडू,
मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ,
डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

सेझ, खासगीकरण, उदारीकरणाचा समतेत पाय,
राज्याच्या घसरलेल्या नंबरावर नाही कोणताच उपाय,
वाटल्यास सिंचन, कृष्णा-गोदेचा समाचार घेऊ,
दिवस कसे बदलताहेत, पावलोपावली, ते पाहू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

विकासाच्या धोरणासाठी हवी त्यांना सारी पॉवर,
अनुशेषाचे रडगाणे, पॅकेजला कसा घालावा आवर?
ग्लोबल, लोकल करीत आपण नव्या मांडणीचेही बोलू,
सध्याच्या धोरणांपायी राज्याचं घडलंय-बिघडलंय पाहू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

जातीअंताचा कुठे नारा, कुठे वर्गांताचा पुकारा;
जातीसाठी आरक्षणावर, क्रिमी लेयरचा उतारा,
छत्रपतींच्या स्मारकाचा या साऱ्यावर इशारा,
फुले, आंबेडकर तर कायम आहेतच साथीला,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

धरणात बुडाले ते आपलेच, धरणाने घडवले तेही आपलेच,
शेतमजूर, कष्टकरी, दलित, आदिवासी हेही आपलेच,
समाजातील ही 'विविधता'च जाती-वर्गांताची आवश्यकता,
त्यासाठी काय करता येईल, त्याचेही विश्लेषण करू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

प्रचारसाहित्यावरून होणाऱ्या अटका आणि सुटका,
कॉंक्रिट सिच्युएशन आणि नक्षलवादाचा विळखा,
मरणाऱ्या पोलिसांचे आकडे तपासत नवी भरती मागवू,
देशभरात काय आहे, याचेही एकदा ठरवून घेऊ,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

नवे साहित्य, जुने वाङ्मय, विदेशातील संमेलन,
कवितांचे तेच तेच, कथांमध्ये तर नाहीच दम,
कादंबरीत ना कस, असंतोष यांच्यात नाही दिसत,
नव्या सांस्कृतिक धोरणाचा यासंबंधी निकाल करू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये, नाटकं केवळ पेपरांत,
पथनाट्ये सुरवातीलाच बरी, संगीत उरले समुहात,
फैज आणि गालीबची फेरउजळणी एकदा करू,
शहरीकरणात सांस्कृतिकतेची, नवी जाणीव जमवून पाहू
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

चौथा पेग होईल तेव्हा चिकन चिली संपली असेल,
जेवणाची गरज नसेल म्हणून आणखी एक निप मागवू,
उठताना क्रेडिट कार्डाऐवजी, बिल दोघंही शेअर करू,
आपल्याच 'सच्चेपणा'ला आपणच सलाम ठोकू,
अन्
दोस्ता, भेट पुन्हा एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!!!

हास्यसंस्कृतीसमाजजीवनमानराजकारण

प्रतिक्रिया

प्रभो's picture

13 Oct 2009 - 12:22 am | प्रभो

जहबहरा!!!
सद्यस्थितीचे सुरेख वर्णन केले आहे..कडू चवीने.....

आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू,
हे वाक्य मात्र काळजाला आणी पोटाला भिडले

(चिकन चिली आवडणारा ब्राह्मण)प्रभो
=====================
<दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!>
कुठे येऊ ????

मिसळभोक्ता's picture

13 Oct 2009 - 12:23 am | मिसळभोक्ता

वा मोडकसाहेब,

आता आपल्याशी चर्चा करायला तरी एकदा भेटणे आवश्यक आहे !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

13 Oct 2009 - 1:33 am | विकास

कविता एकदम वास्तववादी आहे!

नंदन's picture

13 Oct 2009 - 1:53 am | नंदन

विकासराव म्हणतात, तशी वास्तववादी कविता. क्रिकेट पाहणे हा जसा आपला राष्ट्रीय खेळ आहे, तसाच 'मिल बेठेंगे चार यार' करून तोंडीलावणी समस्यांचा फड रंगवणे ही कृतीची कल्पना असावी. (याला अर्थात भौगोलिकतेचे बंधन नाही.)

अवांतर - या कवितेबद्दल आपल्याशी भेटून एकदा चर्चा करायची आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

13 Oct 2009 - 2:00 am | बेसनलाडू

वरील प्रतिसादातील शब्दशब्दाशी सहमत आहे. कविता फार टोचली.
(वाचक)बेसनलाडू

सहज's picture

13 Oct 2009 - 6:42 am | सहज

भावना पोचल्या.

आता फक्त स्वःतालाच बदलू. :-)

अवलिया's picture

13 Oct 2009 - 7:08 am | अवलिया

मोडक मोडक मोडक :T

अहो काय झालं हे तुमचं?? ऑ ! :O

अहो अचानक नोंदी सोडुन कवितांकडे आणि तेही इतक्या वै वै वै वैचारिक पातळीच्या... ! :?

अहो आम्हाला समजेल असं लिहा जरा... :S

जावु द्या ... आपण बसुच एकदा.. चर्चा करायची आहे निवांत नोंदींच्या संदर्भात. ;)

बाकी उत्कृष्ठ !! =D>

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2009 - 8:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वास्तववादी कविता आवडली.

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

13 Oct 2009 - 9:40 am | विसोबा खेचर

मोडका, साल्या आजपासून मी तुझा फ्यॅन..

जबराच करतोस कविता...!

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2009 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता टोचली. आणखी काय लिहू?

स्वाती२'s picture

13 Oct 2009 - 8:09 pm | स्वाती२

+१

निखिल देशपांडे's picture

13 Oct 2009 - 10:09 am | निखिल देशपांडे

मोडक मोडक...
अहो काय कविता केलीत तुम्ही... अदिती म्हणाल्या प्रमाणे टोचलीच...
बाकी एकदा तुमच्याशी कविते बद्दल चर्चा करायची आहेच??
आणी पुढच्या नोंदी केव्हा????

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

दशानन's picture

13 Oct 2009 - 11:41 am | दशानन

:(

काय राव... !

जबराच !

भोचक's picture

13 Oct 2009 - 1:20 pm | भोचक

ही कविता 'अशी तशी' नाही. ती तुमच्यातल्या कवीची 'नोंद' घ्यायला लावणारी आहे. बाकी काय 'टोचणारी कविता' याच्याशी सहमत.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव

प्रसन्न केसकर's picture

13 Oct 2009 - 1:39 pm | प्रसन्न केसकर

अन ते कवितेत जळजळीतपणे मांडलंय. पण आजचा दिवस तरी मी परिवर्तनात सहभागी झालोय याचं (वांझोटं का होईना) समाधान मिळु देत ना मित्रा!

प्रकाश घाटपांडे's picture

13 Oct 2009 - 1:51 pm | प्रकाश घाटपांडे

जातीअंताचा कुठे नारा, कुठे वर्गांताचा पुकारा;
जातीसाठी आरक्षणावर, क्रिमी लेयरचा उतारा,
छत्रपतींच्या स्मारकाचा या साऱ्यावर इशारा,
फुले, आंबेडकर तर कायम आहेतच साथीला,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

ओळी खिन्न करताना असहाय्य हासु देतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Oct 2009 - 1:54 pm | प्रकाश घाटपांडे

प्रकटाआ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सूहास's picture

13 Oct 2009 - 2:29 pm | सूहास (not verified)

छळ.....

सोस......

नागवे सत्य.......

सू हा स...

सूहास's picture

13 Oct 2009 - 2:30 pm | सूहास (not verified)

छळ.....

सोस......

नागवे सत्य.......

खंत........

सू हा स...

श्रावण मोडक's picture

13 Oct 2009 - 4:17 pm | श्रावण मोडक

सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

शैलेन्द्र's picture

13 Oct 2009 - 7:37 pm | शैलेन्द्र

एक एक शब्द पारखुन लिहीलेली कविता... सुंदर

चतुरंग's picture

13 Oct 2009 - 8:03 pm | चतुरंग

कवितेतल्या शब्दांच्या ग्रिलवर त्यातल्याच चिकनचिलीसारखा रोस्ट झालो!

(श्रामो, तुमच्या अनुभवांची तीव्रता आता नोंदींमधून व्यक्त होण्याच्या क्षमतेपेक्षा पुढे गेली आहे आणि म्हणून आपसूकच ते असे कवितेतून येताहेत!)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

13 Oct 2009 - 8:10 pm | संदीप चित्रे

कविता खूप आवडली ...
प्रत्येक शब्द मस्त जमलाय.
जपून ठेवतो कविता.

मदनबाण's picture

14 Oct 2009 - 9:02 am | मदनबाण

कविता फार आवडली...

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2009 - 9:30 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म्म्म...

या मोडकसाहेब एकदा बसून दहीभात खाऊ.
पुण्याचे पेशवे

एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

इंटरनेटस्नेही's picture

15 Oct 2010 - 1:22 am | इंटरनेटस्नेही

चांगली कविता..

(चिकन चीली आणि दारु प्रिय असणारा ब्राम्हण) इंट्या.

शहराजाद's picture

15 Oct 2010 - 2:10 am | शहराजाद

आपल्याच 'सच्चेपणा'ला आपणच सलाम ठोकू,

आवडले

आळश्यांचा राजा's picture

16 Oct 2010 - 4:22 pm | आळश्यांचा राजा

कविता वर काढणार्‍या स्नेह्याचे आभार!

बाय द वे, संपादकांची पसंत (एडिटर्स चॉइस की काय म्हणतात ते) नावाचा एखादा कोना काढून त्यात जुने काही चांगले लिखाण देत गेल्यास बरंच चांगलं वाचायला मिळेल.