येत्या १२ ऑक्टोबरला माहितीच्या अधिकाराबाबतच्या कायद्याला चार वर्षे पुर्ण होत आहेत. भारतातील जनसामान्यांना हवी असलेली आवश्यक ती माहीती सहजपणे मिळण्याच्या अधिकार असावा व त्यायोगे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी अण्णा हजारे व अन्य काही समाजसेवक, नेते, विचारवंत, पत्रकार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून हा क्रांतिकारक कायदा २००५ साली अस्तित्वात आला. हा कायदा जालावर http://vakilno1.com/bareacts/RTI-ACT/Right-to-Information-Act-2005.htm येथे उपलब्ध आहे.
या कायद्याची उपयुक्तता/ उपद्रवक्षमता, त्याच्या वापराने लोकशाहीचे सक्षमीकरण होते की नाही, त्याची अंमलबजावणी कितपत परिणामकारकरित्या होते आहे अश्या अनेक मुद्दयांवर परस्परविरोधी मते मांडली जात आहेत परंतु हा कायदा मला स्वतःला नेहमीच नागरीकांचे सबलीकरण करणारे ठोस पाऊल वाटत आला आहे.
परंतु माहितीचा कायदा याबाबत अद्यापही बरीचशी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. याला कदाचित माध्यमांची उदासिनता, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मर्यादा अशी अनेक कारणे असु शकतील. परंतु ही माहीती जनतेपर्यंत पोहोचण्यामुळे नागरीकांचे अधिक सबलीकरण होण्यास मदतच होईल हे नक्की.
माहितीच्या अधिकाराच्या कायद्यातील सर्वात महत्वाचे असलेले तरीही ज्याबाबत जनसामान्यांना फारच थोडी माहिती आहे असे मुलग्राही कलम आहे कलम ४. सामान्यता आपला समज असतो की माहितीच्या कायद्याअंतर्गत माहिती मिळवण्यासाठी आपल्याला विवक्षित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असते आणि त्यानंतर अनेक दिवस वाट पाहुन देखील हवी ती माहीती मिळेलच याची खात्री नसते. परंतु या कायद्याच्या कलम ४ अन्वये काही विवक्षित माहिती स्वतःहुन जालावर अथवा अन्यप्रकारे प्रसिद्ध करणे शासकीय कार्यालये व सार्वजनिक संस्थांसाठी बंधनकारक केले आहे. अश्या प्रकारे प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या प्रति जर कोणाला हव्या असतील तर त्यादेखील मिळवता येतात. जालावर हे कलम http://vakilno1.com/bareacts/RTI-ACT/S4.html येथे वाचता येते.
या कायद्याच्या कलम ८ मध्ये कोणत्या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी या कायद्याचा वापर करता येणार नाही हे स्पष्ट केलेले आहे. परंतु त्याच कलमानुसार संसद अथवा विधानमंडळाला जी माहिती घेण्यापासुन रोखता येत नाही ती सर्व माहिती या कायद्यानुसार सामान्य नागरीकाला देणे बंधनकारक आहे.
या कलमानुसार कोणता शासकीय निर्णय झाला, तो कसा झाला व त्यामागची कारणे काय होती तसेच शासनाने कोणत्या सवलती आणि परवाने कुणाला दिले, त्याबाबतचे निर्णय कसे घेतले व का घेतले हे कोणत्याही नागरीकाला कळु शकते. कोणत्या अधिकार्याचे वेतन काय आहे, त्याचे हक्क काय हे देखील कळु शकते. त्यामुळे अर्थातच भ्रष्टाचाराला आळा बसु शकतो. अन त्यासाठी अर्ज करणे, उत्तराची वाट बघणे याचीही गरज पडत नाही. त्याखेरीज ही अद्ययावत माहिती शासकीय कार्यालयांच्या वेब साईटवर देता येईल. त्यामुळेच हे कलम महत्वाचे असुन त्याच्या अंमलब़जावणीमुळे शासकीय कामात पारदर्शिकता तर येईलच पण भ्रष्टाचारालाही आळा बसेल असे प्रतिपादन माहिती अधिकार चळवळीतील लोक करतात.
या कलमानुसार जी माहीती शासकीय कार्यालये व सार्वजनिक संस्थांनी स्वेच्छेने प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे त्यामधे पुढील प्रकारच्या माहितीचा अंतर्भाव होतो -
१) कार्यालय वा संस्थेबाबतची मुलभूत माहिती जसे त्याचे उद्दीष्ट व कार्यकक्षा;
२) त्या कार्यालय वा संस्थेतील कर्मचारी व अधिकार्यांच्या अधिकारकक्षा व कर्तव्ये;
३) विविध निर्णय घेताना वापरण्यात येणारी कार्यपद्धती तसेच निर्णयप्रक्रियेत सहभागी होणार्या कर्मचारी व अधिकार्यांचे त्या प्रक्रियेतील योगदान व उत्तरदायित्व;
४) अश्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठीची मागदर्शक सुत्रे व अंमलबजावणीचा आराखडा;
५) निर्णयांची अंमलबजावणी करणार्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीबाबतची नियमावली;
६) कोणत्या पद्धतीची कागदपत्रे कोणाकडे मिळु शकतील याबाबतची माहिती;
७) मुलभूत निर्णय घेणे व त्यांची अंमलबजावणी करणे यात जनतेचा नक्की काय व कसा सहभाग आहे याबाबतची माहिती;
८) संस्था अथवा कार्यालयातील संचालक, सदस्य, वेगवेगळ्या सल्लागार समित्यांचे सदस्य, अश्या समित्यांच्या बैठकाना जनतेस हजर राहता येते काय याबाबतची माहिती व अश्या समित्यांच्या बैठकांची इतिवृत्ते जनतेस उपलब्ध करुन दिली जाऊ शकतात काय याबाबतची माहिती;
९) संस्था अथवा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांची नावे व संपर्क करण्याबाबत आवश्यक ती माहिती;
१०) प्रत्येक अधिकारी व कर्मचार्याला मिळणारे वेतन व मानधन;
११) संस्था अथवा कार्यालयाचे अंदाजपत्रक त्यातील सर्व योजना व त्यासाठीच्या तरतुदी तसेच तरतुदिंच्या खर्चाबाबतच्या अहवालांसह;
१२) संबंधित संस्था अथवा कार्यालयामार्फत शासकीय अनुदानित योजनांची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यपद्धती व अश्या योजनांच्या लाभधारकांची त्यांना मिळालेल्या रकमांसह माहिती;
१३) संबंधित संस्था अथवा कार्यालयामार्फत दिल्या जाणार्या अथवा प्रधिकृत केल्या जाणार्या सवलती, परवाने याबाबतची माहिती;
१४) संबंधित संस्था अथवा कार्यालयाकडे संगणकीकृत प्रकारे दिल्या जात असलेल्या माहितीबाबत;
१५) संबंधित संस्था अथवा कार्यालयाकडुन माहिती मिळविण्यासाठी जनतेला पुरविण्यात येण्यार्या सुविधा, तेथील माहीती देण्यासाठी तयार केलेल्या वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळा तसेच तेथे उपलब्ध असलेल्या माहितीची सूची;
१६) संबंधित संस्था अथवा कार्यालयातील माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती पुरवण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकार्यांची नावे, हुद्दे व अन्य माहीतीची सूची;
१७) अन्य योग्य ती माहीती.
वस्तुतः ही माहिती कायदा अस्तित्वात आल्यानंतर १२० दिवसात प्रसिद्ध करणे व त्यानंतर वेळोवेळी अद्ययावत करणे संबंधित अधिकार्यांना बंधनकारक होते. परंतु अनेक कार्यालयात हे अद्यापीही झालेले नाही व जनमताचा रेटा आल्याशिवाय होईल असेही वाटत नाही. परंतु विविध कार्यालयातुन अश्या प्रकारे माहिती स्वेच्छेने प्रसिद्ध झाल्यास त्यांच्या कामकाजात पारदर्शकता येईल व जनतेचे अधिक सबलीकरण होईल हे नक्की!
प्रतिक्रिया
4 Oct 2009 - 4:59 pm | क्रान्ति
माहिती दिलीय.
विविध कार्यालयातुन अश्या प्रकारे माहिती स्वेच्छेने प्रसिद्ध झाल्यास त्यांच्या कामकाजात पारदर्शकता येईल व जनतेचे अधिक सबलीकरण होईल हे नक्की!
आशा करायला हरकत नाही! :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
4 Oct 2009 - 5:16 pm | बिपिन कार्यकर्ते
छान, उपयुक्त आणि समयोचित माहिती.
बिपिन कार्यकर्ते
5 Oct 2009 - 1:05 am | स्वाती२
अतिशय उपयुक्त माहिती. आता गरज आहे ती आपण हा अधिकार वापरण्याची. आणि इतरांनाही या अधिकाराबद्दल जागरूक करण्याची.
5 Oct 2009 - 9:03 am | सहज
धन्यवाद. आम्ही वाचक या कायद्याचा वापर वाढावा, (रेटा यावा) म्हणून काही करु शकतो का? जसे की मुद्दाम काही ना काही माहीती काढून प्रशासनाला ह्या कायद्याच्या वापराची सवय करवणे का हे काम वाढून आधीच कमी होत असलेली कामे तुंबण्याचा संभव?
का याकरता वेगळा विभाग आहे त्यामुळे शासकीय कामकाजावर/ कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही?
जमल्यास एकदा सोप्याभाषेत एखादे उदाहरण घेउन ह्याचा वापर कसा करायचा सांगाल का?
जसे समजा, आपण रहात असलेल्या भागात, डेंगी, सुकरज्वर इ प्रमाण काय व आरोग्य विभागाने आपल्या भागाकरता काय सोय केली आहे? हे थेट आरोग्य विभागाला विचारायचे की गेल्या दोन वर्षात काय उपाययोजना, आपात्कालीन व्यवस्थेचा आराखडा, असलेले बजेट इ इ माहीती अधिकार कायद्या मार्फत कुठे अर्ज करुन मिळवणे?
सामान्य माणसाने शक्यतो याचा नक्की कसा वापर करुन भ्रष्टाचाराला आळा घालणे अपेक्षीत आहे हे कळल्यास नक्कीच आवडेल. म्हणजे अण्णा हजारे व अन्य काही समाजसेवक, नेते, विचारवंत, पत्रकार यांनी सातत्याने पाठपुरावा नक्की कशा करता केला होता, सामान्य माणूसाची दैनंदीन किंवा कुठल्या नागरी सुविधांची सोय अपेक्षीत होती?
5 Oct 2009 - 12:55 pm | प्रसन्न केसकर
त्याच्या सुयोग्य वापरातच असते. अर्थातच कोणत्याही कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता नेहमीच असते परंतु जर त्याचा सुयोग्य वापर मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या कायद्याचे अस्तित्व समाजाहितासाठी टिकवता येते अन्यथा असे कायदे एकतर बदनाम होतात किंवा अंमलबजावणीअभावी त्यांची परिणामकारकता नष्ट होते. या दृष्टीने नागरीकांची भुमिका महत्वाची असते.
या कायद्याचा वापर वाढावा, (रेटा यावा) म्हणून मुद्दाम काही ना काही माहीती काढून प्रशासनाला ह्या कायद्याच्या वापराची सवय करवणे कदाचित गरजेचे नसेल. मुळात हा कायदा जनतेला सार्वभौम सत्ता बनवण्याच्या व संपुर्ण यंत्रणेला जबाबदार बनवण्यासाठी महत्वाचा आहे. या कायद्याने जशी कारभारात पारदर्शकता येणे अपेक्षित आहे तसेच कारभार्यांना (राजकारणी व नोकरशहा) जनतेप्रति उत्तरदायी करण्यासाठीदेखील तो उपयोगी आहे. अर्थातच या कायद्याला काहीजणांचा विरोध असणे अपेक्षित आहे (विषेशतः ज्यांच्या निरंकुश अधिकारांवर या कायद्याने गदा येते त्यांचा.)
या कायद्याचा मूळ उद्देशव शासनाची कार्यतत्परता वाढवणे आहे त्यामुळे त्याचा सुयोग्य वापर करण्याने शासकीय कामकाजावर/ कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होण्याचे कारण वाटत नाही. शिवाय ही माहिती देण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आलेलीच आहे.
श्री सहज यांनी विचारल्याप्रमाणे आपण रहात असलेल्या भागात डेंगी, सुकरज्वर इत्यादी रोगांचे प्रमाण काय आहे, आरोग्य विभागाने त्याबाबत काय पाऊले उचलली आहेत अशी माहिती या कायद्याद्वारे नक्कीच मिळवता येते. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांच्या माहिती अधिकार्याकडे अर्ज करता येईल. अश्याच प्रकारे अन्य प्रश्नांबाबतही माहिती मिळवता येते जसे रस्त्यांच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी विवक्षित कालावधीत किती रक्कम खर्च झाली, ही कामे कोणामार्फत कोणत्या मुदतीत केली, त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी काय व्यवस्था केली होती इत्यादी.
या माहितीचा वापर करुन सरकारी यंत्रणेतल्या अकार्यक्षमतेची कारणे, विशिष्ठ व्यक्तींचा भ्रष्टाचार इत्यादी गोष्टीना वाचा फोडता येऊ शकते. ही माहिती न्यायालयातही पुरावा म्हणुन वापरता येऊ शकते. (अनेकदा वृत्तपत्रे स्वतः या कायद्याचा वापर सहजी उपलब्ध न होणारी माहिती मिळवण्याकरता करतात. त्याशिवाय जर वाचकांपैकी कोणी अशी माहिती मिळवुन पुरवली तर त्या आधारे ही बातम्या छापतात. मी ज्या वृत्तपत्रात काम करतो तेथे यासाठी पत्रकारांचा स्वतंत्र विभाग तयार केलेला आहे.)
5 Oct 2009 - 1:25 pm | सहज
या कायद्याचा वापरामुळे भ्रष्टाचार कमी होउन, सरकारी कार्यक्षमता वाढेल अशी आशा करुया.
धन्यवाद पुनेरीसाहेब.
5 Oct 2009 - 10:03 am | पंकज
कालच http://www.rtination.com/ बद्दल माहिती मिळाली.
या साइट द्वारे ऑनलाइन अर्ज भरता येतो. त्याबद्दल रु. १२५ इतके शुल्क आकारण्यात येते.
6 Oct 2009 - 1:25 pm | प्रसन्न केसकर
अनेक ठिकाणी माहिती उपलब्ध आहे. माहितीच्या अधिकाराबाबत काम करणार्या लोकांचे वेबग्रुप पण आहेत. तेथे चळवळीतले कार्यकर्ते मिळुन लोकांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे अनुभव लिहितात.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr