आमच्या गावचा पोळा

अनामिक's picture
अनामिक in जनातलं, मनातलं
20 Aug 2009 - 9:27 am


फोटो जालावरून साभार

आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्‍याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो. बैलांचे हे उपकार ह्या एका दिवसाच्या पुजेने थोडेच फिटणार आहेत? तरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रकार मला अगदी भावतो. प्रत्येक शेतकरी सच्च्या दिलाने हा सण साजरा करतो. लहानपणापासूनच मला या सणाचं विशेष आकर्षण वाटत आलं आहे. माझ्या पोळ्याबद्दलच्या आठवणीही तशाच आहेत.

आमच्या घरी आजोबांची बर्‍यापैकी शेती होती(/आहे). पण पोळ्याचा सण हा आम्ही सध्या जिथे राहतो त्याच गावी, म्हणजे उमरखेडमधेच (विदर्भात आहे) साजरा करायचो. खरंतर उमरखेड हे माझं आजोळ म्हणायला हवं. माझे बाबा इथे व्यवसायाकरता आले. मामाची उमरखेड मधेच शेती आहे, शेतात दोन बैलजोड्याही आहेत. त्यामुळे शिकण्यासाठी गावाबाहेर पडेपर्यंत पोळा अगदी उत्साहात साजरा केलाय. सगळ्या शेतकर्‍यांची जशी होते तशीच मामाकडेही पोळ्याची तयारी दोन-चार दिवस आधीपासूनच सुरु व्हायची. मागल्या वर्षी कुठेतरी घड्या करून ठेवलेले झूल संदुका, कपाटातून बाहेर यायचे आणि नीट झटकून बाहेर अंगणात उन खायला ठेवलेले असायचे. सोबतच बाशींगे, गोंडे, तुरे, इ. सामानही कपाटतून बाहेर यायचं. सगळं सामान व्यवस्थीत वापरण्याजोगं आहे की नाही याची खातरजमा व्हायची. बैलांची शिंगे रंगवायला ऑईलपेंटचा डबा, ब्रश, आणि बेगडही खरेदी करून झालेलं असायचं. मी ही सगळी तयारी स्वतः कधीच केली नाही, पण पोळ्याच्या एक दिवस आधी मामाकडे गेलं की सगळं तयार दिसायचं.

आमच्या भागात पोळ्याचा अधीच्या दिवसाला खांदमळनाचा दिवस म्हणतात. ह्या दिवशी सायंकाळी शेतातला गडी घरी बैल घेऊन यायचा. त्यांची पुजा करण्याआधी बैलांच्या खांद्यावर भिजवलेली हळद लावली जायची. मला हा प्रकार म्हणजे नवर्‍या मुला/मुलीला लग्नाच्यावेळी हळद लावण्याचा जो प्रकार आहे तसाच वाटायचा. हळद लावून झाली की बैलांची पाय धुवून पुजा आणि आरती केली जायची. त्यांच्या कानात दुसर्‍या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी घरी येऊन सण साजरा करण्याचं आमंत्रण दिलं जायचं. सगळ्यांची जेवणं झाली की गडी बैलांना घेऊन परत शेतात जायचा.

पोळ्याच्या दिवशी गावात सगळीकडेच फार गडबड असायची. घरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरणं लावली जायची. घराच्या प्रवेशदाराच्या दोन्ही बाजूला पळसाच्या फांद्या, ज्याला 'मेढी' म्हणतात, उभ्या केल्या जायच्या (ह्या मेढीचं काय महत्व ते माहीत नाही). खर्‍याखुर्‍या बैलांसोबतच घरी मातीच्या बैलांचीही पुजा होत असे. त्यासाठी एक लाकडी पाट चुना आणि गेरूने रंगवला जायचा. त्यावर बैलांची मांडनी करून मग मी आणि दादा पुजा करत असू. हा प्रकार संपवून मी मामाकडे पोचेपर्यंत बैलांची अंघोळ घालून झालेली असायची. त्यानंतर मी आणि मामेभाऊ मिळून त्यांच्या शिंगांना रंग देत असू. रंग देताना ब्रश बैलांच्या अंगाला कुठे लागू नये याची काळजी घ्यावी लागे. शिंगांवरचा रंग वाळत आला की त्यावर बेगड लावायची. दुपारी ४ च्या सुमारास बैलांना अजून सजवायला सुरवात व्हायची. बाशिंगे, तुरे बैलांच्या कपाळावर चढवली जायची. पाठीवर झूल आणि पायात घुंगरू बांधले जायचे. सुंदर सजवलेले बैल खूपच दिमाखदार दिसायचे.

तयार झालेले बैल घेवून मारुतीचे मंदीर असलेल्या चौकात, म्हणजे पोळा भरायच्या ठिकाणी घेऊन जायचो. आणि मंदिराभोवती एक प्रदक्षणा घालून बैलांना घेउन एका निश्चित ठिकाणी उभे रहायचो. शेकडो-हजारो लोक आपापल्या बैलजोड्या घेऊन या चौकात जमा व्हायचे. आम्ही भावंडं कोणते बैल किती सजले आणि कोणते खूप छान दिसताहेत हे बघत फिरायचो. तासेक भर फिरून होईस्तोवर गावच्या मानलेल्या पाटलाचे बैल पोळ्याच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात, वाजत गाजत यायचे. ह्यांच्या मंदिराभोवती प्रदक्षणा मारून झाल्या की सगळी कडे 'पोळा फुटला' ही बातमी क्षणात पसरायची. सगळीकडे एकच गोंधळ उडायचा... आपापल्या बैलांना घरी घेऊन जाण्यासाठी! घरी परतताना आम्ही भरपुर फुगे आणि लाडीलप्पे (पाण्याचे फुगे) खरेदी करून नेत असू. घरी आलो की बैलाची परत एकवेळ ओवाळून पूजा आरती केली जायची. पुरणपोळीच्या जेवणाने पोळ्याचा दिवस संपायचा.

पोळ्याचा दिवस संपला तरी लोकांचा उत्साह कमी होत नसे. दुसर्‍या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघत असे. ह्या दिवसाला तान्हा पोळाही म्हणतात, कारण ह्या दिवशी लहान मुले घरी पुजा केलेल्या मातीच्या बैलांना घरोघरी मिरवून आणत असत. कुणी ह्या मुलांना खाऊसाठी पैसे देत तर कुणी खरोखरचा खाऊ. कितीतरी खेडेगावात तर या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती लागतात म्हणे. असा पोळा साजरा करून आज बरीच वर्षे उलटलीत पण सगळं तस्संच्या तसं डोळ्यासमोर आहे. शहरी भागातल्या कितीतरी लोकांना पोळा भरणे, पोळा फुटणे हे प्रकार माहीतही नसतील. म्हणूनच माझ्या आठवणीतून आमच्या गावच्या पोळ्याची ओळख करून द्यायचा का खटाटोप.

पोळ्याच्या दिवशी सजवण्यात येणार्‍या बैलांवर लहान असताना आईने एक कविता शिकवली होती. मध्यंतरी ती विसरलो होतो, पण मग प्राजु ताईने ति कविता तिच्या यजमानांकडून मिळवून दिली होती... ति कवीता इथे देत आहे. ह्या कवितेसाठी प्राजु ताई आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद!

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार

राजा परधान्या, रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे

दुल दुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे.

काहीवेळा झुलीच्या खाली असलेले वळ जरी खरे असले तरी बहुतांशी शेतकर्‍याचे त्याच्या बैलांवर खरोखर प्रेम असते. ते त्यांची खूप काळजी घेताना दिसतात. त्यामुळे ह्या कवितेचा शेवट मला तितका आवडत नाही.

-अनामिक

संस्कृतीप्रकटनलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

20 Aug 2009 - 9:42 am | पाषाणभेद

लई भारी वर्णन!

आगदी गावात नेल पहा तुम्ही. चावडीवर बैलं नमस्कार करू र्‍हायलेय आस द्रुश्य दिसले.

"हुर्र ss हुर्र ss चॅकss चॅकss रे धवळ्या पवळ्या ... ह्या... ह्या..."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

पाषाणभेद's picture

20 Aug 2009 - 9:45 am | पाषाणभेद

स्वारी स्वारी, नेट लई स्लो असल्याने दोनदा बटन दाबले गेले...

पण हा लेख पाठ्यपुस्तकात चांगला निबंध म्हणून घेतला जावू शकतो.
बालभारतीच्या निवडसमीतीवर माझी वर्णी लागली की लावतोच मी.

सहज's picture

21 Aug 2009 - 7:10 am | सहज

>हा लेख पाठ्यपुस्तकात चांगला निबंध म्हणून घेतला जावू शकतो

सहमत. :-)

शैलेन्द्र's picture

20 Aug 2009 - 9:51 am | शैलेन्द्र

अनामीकराव, शेतकर्‍यांचे बैलावर प्रेम असते हे तर खरेच, पण प्रेमाने पोट भरत नाही, स्वत:चे पोट भरण्यासाठी शेतकर्‍याला बैलाच्या पाठीवर आसुड ओढावाच लागतो.

असो, तुमचा लेख.. सुंदर

मदनबाण's picture

20 Aug 2009 - 9:52 am | मदनबाण

व्वा...सुंदर लेख. :)
एकदम डिटेलमंदी लिवलं हाय तुम्ही...
आणि कविताही छान आहे.

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2009 - 12:41 pm | प्रकाश घाटपांडे

अनामिकराव, आमच्या गतकाळातील स्मृती जाग्या केल्यात. पाटीलकीचा मान म्हणुन आमचे बैल पोळ्याला मिरवणुकीत पहिल्याछुट असायाचे. वेशीपासुन सुरवात केल्यावर मारुतीच्या देवळावरुन आमच्या वाड्यावर आले कि आई त्यांना ओवाळायची. त्यांची पुजा करायची. पुरणपोळी खाउ घालायची. बैलांच्या डोळ्यात देखील कृतज्ञतेचे भाव दिसायचे. टिंग्या चित्रपट पाहिला तेव्हा मला रडु आवरल नाही.
(नॉस्टल्जिक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अनामिक's picture

20 Aug 2009 - 4:42 pm | अनामिक

पोळा म्हंटलं की मीसुद्धा तुमच्या सारखाच नॉस्टॅल्जीक होतो.

-अनामिक

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2009 - 8:56 pm | प्रकाश घाटपांडे

मला नंदीबैलाचा नेहमी हेवा वाटायचा. कारण त्याचा नेहमीच पोळा असतो. सकाळ मधील एक जुनी बातमी मला गतस्मृतीत घेउन गेली

गुबूगुबूचा नाद करत नंदीबैलाचे आगमन

बेल्हे, ता. १९ - परिसरात सध्याच्या काळात दाणागोटा, जुना कपडा-लत्ता, दीपावलीतील गोडधोडाचे दोन घास पदरी पाडून घेण्यासाठी, नंदीबैलांची स्वारी ढोलक्‍यावर गुबूगुबूच्या नाद करत घरोघर हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर नंदीबैलवाले शेतकऱ्यांकडून हक्काने धान्य, जुने कपडे, पैसे, खाण्याचे पदार्थ मागण्यासाठी फिरताना दिसून येतात. पारंपरिक पोशाखात वर्षातून एकदाच दारासमोर येणाऱ्या या नंदीबैलाची महिला वर्गाकडून पूजा केली जाते. गुबू-गुबूच्या विशिष्ट आवाजामुळे त्यांच्या मागेपुढे बाळगोपाळांची नेहमीच गर्दी असते. सुगीच्या काळात शेतात पिकविलेल्या धान्याचा काही भाग दारी येणाऱ्या गोरगरिबांसाठी दानधर्म करण्याची परंपरा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक परवड होत असतानाच्या काळातही जपत असल्याचे दिसून येते.
याशिवाय काही प्रशिक्षित नंदीबैलमालकाच्या इशाऱ्यानुसार हालचाली करत असल्याने, या मंडळींना बक्षीसरूपानेही काही मदत मिळते. सध्या परिसरात सूर्योदयानंतर नंदीबैलवाल्या मंडळींचा "गुबू-गुबू' आवाज कुठे ना कुठे घुमत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Daily Sakal 20/11/2007 मधील नेट आवृत्तीतील ही बातमी मला भूतकाळात घेउन गेली. माझ्या लहानपणी वाड्यावर येणारा हाच तो नंदीबैलवाला . माझ्या मुलीच्या वेळीपण तोच . मुलीच्या सुट्टीत गावी गेल्यावर तो नेमका आला होता. सात आठ वर्षे झाली असतील या फोटोला. "रामभाउ पाटलाच्या नावांन ....गुबुगुबु...." मग दानशूर , प्रेमळ वगैरे विशेषणे त्या कवनात घालत असे. नंतर वाद्यांचा गजर.नंदीबैल मला खुप आवडतो. कसा रुबाबदार दिसतो बघा.नंदीबैलाला कधी शेतातल्या कामाला जुंपत नाहीत. इतर बैलांना त्याचा हेवा वाटत असणार. कारण त्याचा रोजच पोळा. इतर बैलांना हे भाग्य फक्त बैल पोळ्यालाच वाट्याला येत असे .बैलपोळ्याला वेशीपासून प्रथम येण्याचा मान आमच्या बैलांचा होता. कारण अर्थातच परंपरा. पाटलाची बैलं हे असावे. त्या दिवशी त्यांना नंदीबैलासारखे सजवले जाई. दाराशी आल्यावर आई त्यांची पुजा करुन त्यांना ओवाळीत असे व पुरणपोळी खायला घालीत असे. इतर दिवशी कडबा वा घास खाणार्‍या बैलांना त्या दिवशी पुरणपोळी खाताना बर वाटत असणारं असे मला नेहमीच वाटायचं. त्यांच्या ही डोळ्यात त्या दिवशी मला कृतज्ञतेचा भाव दिसे.
नंदीबैलवाल्याला त्यादिवशी मी आमच्या गतस्मृतीतील बैलांचा सरंजाम व इतर साहित्य देउन टाकले.
Nandibail 2
Nandibail 3
(नॉस्टल्जिक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अनामिक's picture

20 Aug 2009 - 9:16 pm | अनामिक

नंदीबैल आमच्या गावात कधी पाहिला नाही. आजोबाकडे म्हणजे लाखच्या घरी जाणे व्हायचे तेव्हाच बघायला मिळायचा. गुबू-गुबूच्या त्या आवजाचचं खूप आकर्षण होतं.
घाटपांडे साहेब... तुमच्या सुंदर प्रतिसादाकरता खूप धन्यवाद!

-अनामिक

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Aug 2009 - 10:06 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रकाशराव, माझ्या लहानपणी मुंबईतही नंदीबैल होते. आणि ते वरचेवर घरासमोर येत असत. बैल, मालक, मालकीण आणि त्यांच्याबरोबर एखाददुसरं ल्येकरू. असा गोतावळा असायचा. नंदीबैल प्रत्यक्ष दिसायच्या कितीतरी आधीपासून तो गुबूगुबू आवाज यायचा. मग आम्ही मुलं एकत्र जमून वाट बघत बसायचो. जसजसा तो आवाज जवळजवळ यायचा तस तसं चुळबूळ आणि उत्सुकता वाढत जायची. मग एकदाचा तो नंदीबैल दिसायचा. आधी नंदीबैल आणि मग त्याचा लवाजमा दिसायचा. बहुतेकवेळा त्या मालकिणीच्या गळ्यातच ते लहानसे ढोलके असायचे आणि हातातल्या चिमुकल्या धनुकलीने ती त्यावर तो गुबूगुबू आवाज काढायची. मग प्रश्नोत्तराचा खेळ व्हायचा. मजा यायची घटकाभर. लै भारी वाटायचं. आठवणी जागवल्या तुम्ही.

वा!!!

बिपिन कार्यकर्ते

मीनल's picture

20 Aug 2009 - 5:16 pm | मीनल

कधीच पाहिला नव्हता पोळा.
आता हे वर्णन वाचून प्रत्यक्ष पाहिल्यासारख वाटतय.
मीनल.

शितल's picture

20 Aug 2009 - 5:32 pm | शितल

अनामिक,
छान लिहिले आहेस रे. बैलाला सजवतात आणि घरी पुरणपोळी करतात मला एवढेच माहिती होते. :(
गावाकडचा पोळा पहायला मिळाला की आता तुझा लेख आठवेल. :)

क्रान्ति's picture

20 Aug 2009 - 9:16 pm | क्रान्ति

लेख आवडला. कविता जुन्या आठवणी जाग्या करून गेली.
इकडे विदर्भात पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी तान्हा पोळा नामक सण साजरा केला जातो. दोन-तीन दिवस आधीपासूनच लाकडी बैलांचे बाजार रस्तोरस्ती भरतात. काही हौशी लोक तर असे बैल बनवून घेतात. त्या दिवशी दिवसभर बैल सजावट सुरू रहाते. संध्याकाळी लहान मुलं-मुली लाकडी बैलांना फुलांच्या माळा, फुगे यांनी सजवून घरोघरी नेतात, त्यांची पूजा केली जाते, मुलांना खाऊ दिला जातो. सजावटीच्या स्पर्धा प्रत्येक शाळेत, काही सामाजिक संस्थांमध्ये, कॉलनीमध्ये होतात. या स्पर्धांमध्ये मुलं वेगवेगळे अवतार करून जातात. म्हणजेच बैल सजावटीबरोबर फॅन्सी ड्रेस पण! काही बैल तर ३|| ते ४ फूट उंचीचे, अतिशय सुबक, रेखीव असतात. त्यांची अगदी ढोलताशे, बँड वगैरे लावून मिरवणूक काढली जाते. सजावट स्पर्धेचा निकाल लागला, म्हणजे पोळा फुटला असं म्हणतात. मुलांना या सणाचं महत्व समजावून सांगणारा आणि स्वतः काहीतरी केल्याचं समाधान मिळवून देणारा हा सण खूपच छान असतो. खालचा तान्हा पोळावाला फटू जालावरून साभार.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

अनामिक's picture

20 Aug 2009 - 9:19 pm | अनामिक

वा क्रान्ति तै तान्ह्या पोळ्याची छान माहीती दिलिस गं! माझ्या गावात तान्हा पोळा म्हणजे घरचे मातीचे बैल सजवून घरोघरी मिरवत घेऊन जाणे एवढेच होते.

-अनामिक

क्रान्ति's picture

20 Aug 2009 - 9:33 pm | क्रान्ति

इकडे मारबत आणि बडग्या हा प्रकारही असतो पोळ्यादिवशी. या वर्षीचा बडग्या स्वाइन फ्लू होता. दुष्ट शक्तींचा नाश व्हावा, म्हणून मारबत आणि बडग्या यांच्या प्रतिमा [दसर्‍यातील रावणासारख्या] बनवतात, त्यांची भली मोठी मिरवणूक काढतात, आणि मोकळ्या मैदानात त्यांना जाळून टाकतात. "भाववाढ, महागाई, रोगराई घेऊन जा गे मारबत" असे त्या मारबतला आव्हान केले जाते. आणि ती जळाली, म्हणजे दुष्ट शक्ती तिच्यासोबत जळाल्या, असे समजले जाते.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

दवबिन्दु's picture

22 Aug 2009 - 5:48 am | दवबिन्दु

या वर्षीचा बडग्या स्वाइन फ्लू होता.

आनी राखी सावन आफजल गुरु अनि कसाबचा पन मार्बत होता ना.

______________________

देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Aug 2009 - 9:52 pm | बिपिन कार्यकर्ते

बेष्टं!!!!! छान फिरवून आणले पोळ्याच्या सणाला. मस्त. कविता तर भन्नाटच. माझ्यासारख्या कधीच खेडेगावातले सण न अनुभवलेल्याला तर हे खूपच आवडते.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

20 Aug 2009 - 10:31 pm | टारझन

अल्टी लेख रे ..... अर्रे मी देखिल लोणीकंद नावाच्या छोट्या खेड्यात १० वर्ष राहिलोय बालपणी .. सगळी चित्र डोळ्यासमोरुन गेली पहा !
मस्त अनामिक राव ... जरा रेग्युलरली लिहा :)

-

चतुरंग's picture

20 Aug 2009 - 10:41 pm | चतुरंग

शिंगे रंगवीली बाशिंगे बांधली
चढविल्या झूली, ऐनेदार!

वा वा वा!!! खूप वर्षांनी ही कविता वाचायला मिळाली.
(पाठ्यपुस्तकात होती की काय नक्की आठवत नाही, पण तोंडपाठ होती.)

नगरलाही पोळ्याचा नंदी यायचा. अगदी कवितेत वर्णन आहे तसा असे. रंगवलेली शिंगे. मजबूत वशिंड. आरशांची रंगीबेरंगी झूल, गळ्यात घुंगरांच्या माळा. त्याला ओवाळून पुरणपोळी खायला घालणे हा समारंभ असे. मला पोळी भरवायला फार आवडायची कारण हातातून ती ओढून घेताना होणारा बैलाच्या पांढरट-गुलाबी जिभेचा चरबरीत, ओला स्पर्श फार गमतीचा वाटे! वाड्यातल्या सगळ्या घरांमधून त्याला पुरणपोळी मिळे. 'पाऊस पडल का द्येवा' असं नंदीवाला विचारे, ढोलक्याच्या बुगूबुगू आवाजात नंदी मान डोलावी! नंदीवाल्याला जुने कपडे, पैसे पोळी असं देऊन त्याची बोळवण होई. आम्ही संपूर्ण गल्लीभर त्या नंदीमागे हिंडत असू. फार जुन्या आठवणी जागवल्यात. माझ्या मुलाला असे काही कधी दिसेल, दाखवता येईल ह्या विचाराने तगमग झाली. फार जवळच्या खजिन्यातले काही हरवलेले आठवून डोळ्यात पाणी उभे राहिले! असो. चालायचेच. कालाय तस्मै नमः!

चतुरंग

स्वप्निल..'s picture

21 Aug 2009 - 12:08 am | स्वप्निल..

लिहिलस रे .. मला आपल्या उमरखेडला गेल्यासारखे वाटतय.... :)
सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात .. काय झक्कास मज्जा यायची पोळ्याला ..
आता कधी मिळेल काय माहीती.. :(

स्वप्निल

दिलीप वसंत सामंत's picture

21 Aug 2009 - 12:38 am | दिलीप वसंत सामंत

लहानपणीच्या गुबु गुबु च्या आठवणी जाग्या झाल्या. अशा काही
आठवणी कोणाच्या असल्यास जरूर येथे द्याव्यात.
हा लेख मी पी सी वर घेऊन ठेवला आहे. वर्णन चांगले जमले आहे.

दिलीप वसंत सामंत's picture

21 Aug 2009 - 12:38 am | दिलीप वसंत सामंत

लहानपणीच्या गुबु गुबु च्या आठवणी जाग्या झाल्या. अशा काही
आठवणी कोणाच्या असल्यास जरूर येथे द्याव्यात.
हा लेख मी पी सी वर घेऊन ठेवला आहे. वर्णन चांगले जमले आहे.

प्राजु's picture

21 Aug 2009 - 1:28 am | प्राजु

शहरी भागातल्या कितीतरी लोकांना पोळा भरणे, पोळा फुटणे हे प्रकार माहीतही नसतील. म्हणूनच माझ्या आठवणीतून आमच्या गावच्या पोळ्याची ओळख करून द्यायचा का खटाटोप.

तुझे खूप खूप धन्यवाद. पोळा भरणे, फुटणे सारखे प्रकार मी ऐकलेही नव्हते कधी. खूप माहितीपूर्ण लेख आहे तुझा.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

काळा डॉन's picture

21 Aug 2009 - 4:24 am | काळा डॉन

च्यायला त्या टार्‍याचे प्रतिसाद वाचणे कमी केले पाहिले..मी चुकून आमच्या गावचा 'बोळा' अस वाचलं :D

बाकी लेख जंक्शन बर्का!!

प्रदीप's picture

21 Aug 2009 - 10:56 am | प्रदीप

आमच्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील जीवनाचे सुंदर दर्शन घडविणारा लेख, व त्यावरील सर्वच प्रतिसाद -- विषेशतः प्रकाश घाटपांडे व क्रांति ह्यांचे -- आवडले.

शहरातही गुब्बु गुब्बु करीत नंदीबैल फिरवले जायचे, त्याची आठवण बिपीनच्या प्रतिसादावरून झाली.

असेच लिखाण अजून येत राहो, धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

21 Aug 2009 - 11:41 am | स्वाती दिनेश

लेख तर आवडलाच आणि कविता पाहून एकदम शाळेतल्या दिवसात गेले. ही कविता चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे तोंडपाठ होती पण मेंदूच्या कोठीच्या खोलीत होती, ती एकदम बाहेर आली.
प्रकाशरावांचा प्रतिसादही आवडला,
स्वाती

अनामिक's picture

21 Aug 2009 - 4:59 pm | अनामिक

प्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांचे आभार. प्रकाश घाटपांडे साहेब, बिपीन दा,क्रान्ति ताई, आणि चतुरंग यांनी त्यांच्या आठवणी शेयर करून लेखाला रंगत आणली. त्यांचे विशेष आभार!

-अनामिक

दवबिन्दु's picture

22 Aug 2009 - 5:45 am | दवबिन्दु

कारण ह्या दिवशी लहान मुले घरी पुजा केलेल्या मातीच्या बैलांना घरोघरी मिरवून आणत असत. कुणी ह्या मुलांना खाऊसाठी पैसे देत तर कुणी खरोखरचा खाऊ.

म्हंजे हालोविन्सारखेच झाल कि.

________________________

देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥