म्हातारपण!!! नको गं बाई..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
10 Jul 2009 - 7:37 pm

अजून बस आली नव्हती.. आम्ही सगळ्याजणी आपापल्या मुलांना घेण्यासाठी त्या स्कूलबसच्या पिक-अप- ड्रॉप ऑफ स्टॉप वर उभ्या होतो. इतक्यात बस आलीच. लेकाच्या वर्गात आमच्या कॉम्प्लेक्स मधली ४ जणं आहेत. आणि शिवाय के जी च्या दुसर्‍या वर्गात असणारी आणखी ५-६ जण आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या हे सगळे केजी'कर इतका चिवचिवाट करत असतात.. आपल्या बॅगा आयांच्या ताब्यात देऊन हे सगळे मस्त बागडत कुठे झाड्याच्या वाळलेल्या काठ्या गोळा कर, कुठे फुले तोड.. कुठे पेबल्स गोळा कर.. असं करत करत , शाळेत काय झालं हे सांगण्याची अहमहमिका लावत हे सगळे उड्या मारत घरी जातात. पण आज.. सगळंच शांत होतं. थोडं आश्चर्य वाटलं. पण आज शाळेत डॉक्टर्स विजिट होती. मुलांना मेडीकल इक्विपमेंट्स , स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके मोजणे, स्वतःच्या बोटावर छोटेसे प्लास्टर करणे इ. गोष्टीं ची ओळख आणि माहिती होणार होती. त्यामुळे थोडी कंटाळली असतील मुलं असं वाटलं.

घरी आल्या आल्या लेक उदासच वाटत होता. मी छेडलं तर म्हणाला.. "आय एम टायर्ड.." मी पण सोडून दिलं.
त्यानंतर रात्री झोपण्या आधी लेक मला म्हणाला," तू किती यर्स ओल्ड आहेस?" तो नेहमीच त्याच्या आणि माझ्या वयाची तुलना करत असतो आणि शेवटी म्हणतो,"मी कधी होणार तुझ्या इतका मोठा.." हे माहिती असल्यामुळे मी लग्गेच म्हणाले,"मी ३० यर्स ओल्ड आहे.." तर एकदम आनंदाने म्हणाला..." म्हणजे तू म्हातारी नाहीयेस... येऽऽऽऽ!! तू म्हातारी नाहीयेस ना आई??" त्याच्या चेहर्‍यावर खूप आनंद दिसत होता. मी म्हणाले,"नाही.. मी अजून तरी म्हातारी नाहीये." मग एकदम म्हणाला ," तू अज्जिबात व्हायचं नाहीस म्हातारी.." मी कामात होते त्यामुळे फक्त ,"बर!!" असं म्हणून विषय सोडून दिला.
आणखी काही दिवसांनी एकदम बूट घालता घालता म्हणाला, "तू अज्जिबात म्हातारी व्हायचं नाहीस, आय डोण्ट वॉन्ट यू तू हॅव ग्रे हेअर..!" कशाचा काही संदर्भ नसताना असं बोलला मला थोडं नवल वाटलं. बूट घालताना एकदम काय आठवलं याला? पण विषय फार नाही वाढवला. मला वाटलं की, म्हातारी झाल्यावर मी कदाचित चांगली दिसणार नाही असं त्याला वाटत असावं आणि म्हणून हा असं म्हणतो आहे. एकदा वाटलं त्याला सांगावं की, हे असं काही नसतं मी काही लग्गेच वाईट नाही दिसायला लागणार. पण तो विचार मी झटकून टाकला कारण असं सांगितल्यानंतर पुढे येणार्‍या प्रश्नांची भिती वाटली मला.

असंच एकदा तो सोफ्यावर उड्या मारत होता. मी तिथेच बसले होते. मी म्हणाले, "अरे माझ्या पाठीवर वगैरे पडशील.. माझी पाठ दुखेल ना. " असं म्हंटल्याबरोबर हा थांबला आणि म्हणाला, "म्हणजे पणजी आज्जी सारखी तू खाली वाकून चालणार का मग??" (माझी आजी सधारण २ वर्षापूर्वी गेली.. ती शेवटी शेवटी वाकलेली होती.. आणि त्याला ती अजूनही आठवते.) मी म्हणाले.."पणजी आज्जी म्हातारी होती.. म्हणून वाकून चालत होती." लग्गेच निर्वाणीच्या सुरात सांगितलं मला,"तू अज्जिबात म्हातारी व्हायचंच नाहीयेस ". पुन्हा मी बुचकळ्यात. विचारलं "तुला कुणी सांगितलं हे सगळं?" तर म्हणे, "स्कूल मध्ये एकजण आहे तो म्हणाला.." मुलामुलांत काहीतरी असं बोलणं झालं असावं असा समज झाला माझा.
एकदा रात्री झोपेतही असंच काहीसं बडबडत होता. मग मात्र मी सटपटले.. मला कळेना काय याच्या डोक्यात आलंय हे एकदम. असा का म्हणतो आहे सारखं सारखं? पण त्याच्यापाशी विषय वाढवण्यात अर्थ नव्हता. प्रभू मास्तरांना मी व्य नी ने ही समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं," सध्या काहीच नका करू, पण तुमचा एकही केस पांढरा होणार नाही याची काळजी घ्या." हरकत नाही. काही दिवस ठीक होते. शाळा बंद झाली.. सुट्ट्या सुरू झाल्या. आता या विषयाबद्दल शाळेत जाऊन चर्चा तरी कुणाशी करणार?

एकदा तो जेवत होता, मी म्हणाले,"चल, संपव लवकर तू बीग बॉय आहेस ना? आता फस्ट ग्रेड ला जाणार ना तू.. मोठा झालास आता. मग लवकर जेवायला नको का?" लग्गेच प्रश्न आला,"मी फस्ट ग्रेड ला गेल्यावर तू कशी होणार?" मला प्रश्न नाही समजला. म्हणाले, "कशी होणार म्हणजे?". तर म्हणाला,"तू पण मोठी होणार का?" ... मला कळेना आता काय उत्तर द्यावं. मी म्हणाले," हो थोडीशी.." तर लग्गेच.." म्हणजे थोडीशी म्हातारी होणार का?" त्याच्या प्रश्नाचा रोख समजला. मी म्हणाले,"मनू.. म्हातारी लग्गेच कशी होईन? तू हळूहळू मोठा होशील तेव्हा मी हळूहळू म्हातारी होईन.." ... एकदम डोळ्यांत त्याच्या पाणी आलं... आणि रडत रडत म्हणाला," मी नाही जाणार फस्ट ग्रेड ला. आय डोन्ट वॉन्ट टू बीकम बीग बॉय्..मी मोठा नाही होणार..... " मला खूप वाईट वाटलं. म्हणाले.. "बर असूदे.. मी नाही होत म्हातारी.. ओके??" .. त्याला जवळ घेऊन जेवण त्याचं पूर्ण केलं. पण आता माझ्या डोक्यातून हा किडा जाईना..

एकेदिवशी मैत्रीणीकडे गेले होते. हा विषय आता पर्यंत मी काढला नव्हता कोणापाशी. पण तेव्हा मात्र काढला. तेव्हा समजलं ते असं.. तिचा मुलगा सुद्धा तिला विचारत होता,'आजि-आजोबा म्हातारे आहेत का?' तिने 'हो' असं सांगताच तो एकदम रडायला लागला. तिने विचारताच, 'नाऊ दे आर गोईंग टू डाय..." असं म्हणत तो पुन्हा रडायला लागला. मी माझ्या बाकीच्या मैत्रीणींकडे चौकशी केली तर थोड्याफार फरकाने सगळ्यांच्याकडे हाच सीन होता. त्यातल्या एकीकडे ही रडारडी खूपच झाली होती. तीने शाळा संपायच्या आधी शाळेत जाऊन चौकशी केली होती तेव्हा समजलं.. डॉक्टर्स व्हिजिट शाळेत होती तेव्हा इतर माहिती सोबत त्यांना ह्युमन लाईफ सायकलची सुद्धा थोडी माहिती सांगितली होती. बर्थ टू डेथ. ह्युमन बॉर्न, दे ग्रो... दे बिकम ओल्ड आणि फायनली दे डाय...!! ................... एकदम ट्युब पेटली. मी याला म्हातारी व्हायला नको आहे... कारण मी म्हातारी झाल्यावर मी मरणार अशी भिती त्याला वाटते आहे... काय करू मी?? कारण हे डोक्यातून काढणं अवघड होतं. तसं काही नसतं असं सांगितलं तर स्कूल मध्ये मग खोटं का सांगितलं असं विचारणार हा.. आणि हे खरं आहे असं सांगितलं तर.. पुढची रडारडी अटळ होती आणि काय माहिती किती दिवस आणखी हेच डोक्यात घेऊन बसला असता?

मनांत आलं, 'लहान मुलांना इतकं जपणारी यांची अमेरिकन संस्कृती.. पण मग ५-६ वर्षाच्या मुलांना ह्युमन लाईफ सायकल सांगायची काय गरज होती. मला खात्री आहे की, आमच्याच नव्हे तर अमेरिकन मुलांच्या घरातही थोडेफार अशी रडारडी झालीच असणार. याची कल्पना त्या डॉक्टर्स ना नसावी का? शाळेच्या पहिल्या दिवशी भेट म्हणून दिलेल्या गोष्टीच्या पुस्तकात कुठेतरी 'मॉन्स्टर किल्ड द काऊ..' असं वाक्य आलं तर शाळेने ती पुस्तकं परत मागवून घेतली होती..का? तर मुलांच्या मनावर किल्ड सारखे शब्द फार परिणाम करतात.. मग हे तर त्याहून भयानक होतं. हे समजलं नसेल का शाळेला? की शाळेने आपलं काम केलं डॉक्टर्स च्या व्हिजिटचं आणि डॉक्टर्स नी आपलं काम केलं !!! नक्की काय समजायचं??

त्याबद्दल काहीही विषय मी काढला नाही. मध्ये बरेच दिवस गेले.. मला वाटलं हा विसरला असेल. पण नाही!! पुन्हा एकदा प्रश्न आलाच.. "तू म्हातारी नाही ना होणार?" सावध पवित्रा घेऊन मी म्हणाले, " मनू.. तू भरपूर भरपूर मोठा होईपर्यंत मी अजिबात म्हातारी होणार नाही. " ... चेहरा थोडा उजळला त्याचा." प्रॉमिस???"....... माझ्याही नकळत मी..."प्रॉमिस्स!" म्हणून गेले.

(बहुधा समाधान झालं असावं... बघूया पुढे काय होतं ते!!)

- प्राजु

हे ठिकाणजीवनमानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

10 Jul 2009 - 9:00 pm | रेवती

हो हे असेच प्रश्न विचारत असतात मुलं!
माझ्या माहितीतल्या सगळ्या आया असच बोलत असतात.
त्यांची मुलंही असे प्रश्न विचारतात.

रेवती

दशानन's picture

10 Jul 2009 - 9:09 pm | दशानन

आई वरील मुलाचे प्रेम हे खरंच सेम असतं... अगदी अगदी सेम ! कधी काळी मला ही वाटायचे आई म्हातारी झाली तर... मी पण दंगा केला होता... पण मागच्या वेळी घरी गेलो होतो तेव्हा आईच म्हणाली.. म्हाता-या बघ माझा एक ही केस पांढरा नाही आहे व तुझा एक ही काळा नाही =)) खरंच एवढा आनंद झाला मला तो मी येथे शब्दात व्यक्त करुच शकत नाही.... !

तै.. खरचं आनंदाचे क्षण आहेत हे.. तुझा मुला तुझ्यावर किती प्रेम करतो हे त्याच्या एका चिंतेवरून दिसत आहे... यु आर लकी !

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

प्राजु's picture

11 Jul 2009 - 8:04 pm | प्राजु

:)
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2009 - 9:34 pm | प्रकाश घाटपांडे

म्हातारा व्हायला कुणालाच आवडत नाही. बेवड्या लोकांच एक बर असत ते म्हातारे होतच नाहीत.( त्याच्या आतच गचकतात)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

शैलेन्द्र's picture

12 Jul 2009 - 1:30 pm | शैलेन्द्र

असं कुणि सांगितलं?

विष्णु पदु म्हात्रे... एके काळचा हातभट्टी चालक-मालक, प्रत्येक धारेची टेस्ट करुन बघता बघता त्याच्या शरिरात रक्त कमी अल्कोहोल जास्त. गेले २५ वर्ष मि त्याला आजारी पडलेला पाहिला नाही.

आज काही करोड्चा धनी असलेला विष्णु पदु.. इस्त्री केलेला बनियन आणि इस्त्रीचा टॉवेल घालतो. टॉवेल्च्या कोच्याला दीव्याच्या ताज्या फुग्याची बाट्ली असते. शक्य असत तर त्याने सरळ सलाइनच लावल असतं.

वय वर्ष ७५ चा विष्णु पदु, दीव्याच्या हातभट्टीवाल्यांचा ब्रँड अँबॅसीडर आहे.

टारझन's picture

10 Jul 2009 - 10:23 pm | टारझन

अवघड आहे ... जबरा लेखण !! पण ह्या असल्या णकारात्मक विचारांवर नका बॉ लिऊ... लई भ्या वाट्ट !!

लहान मुलांना इतकं जपणारी यांची अमेरिकन संस्कृती.. पण मग ५-६ वर्षाच्या मुलांना ह्युमन लाईफ सायकल सांगायची काय गरज होती.

येग्जाक्ट्ली !!! नाही नाही ते नको त्या वयात सांगतात .. अमेरिकन पाय पाहुन बर्‍यापैकी कल्पना येते अमेरिकन संस्कृतीची !

देवा मला म्हतारा होण्या आधीच उचल रे ( उचललो गेलो नाही तर क्रेन आण ... पण उचल रे )

(उचलायला अंमळ जड) टारझन पोते

स्वाती२'s picture

10 Jul 2009 - 10:31 pm | स्वाती२

प्राजू हे असच चालतं. आमच्याकडे केस पांढरे कधीच झालेत. आता डोळा आई-बाबांच्या वजनावर असतो. त्या हेल्थच्या तासाला ओबेसिटी आणि इतर आजार वगैरे शिकून आल्यापासून लेक food cop झालाय. आमच्या लायब्ररीयनचा मुलगा तर तिला exercise कर म्हणून छळतो. ती शाळेवर जाम चिडली होती.

चतुरंग's picture

10 Jul 2009 - 10:42 pm | चतुरंग

घरोघरी मुलांच्या शाळा! :D
माझ्या मते आपण मोठे लोक बर्‍याचदा म्हातारपण, मरणे वगैरे गोष्टी जितक्या निराशेने आणि सीरिअसली घेतो तितकी ही लहान मुलं घेत नाहीत. त्यांना ती एक प्रोसेस आहे इतकाच अर्थ गवसतो आणि ती प्रश्न विचारत रहातात. नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता इतकाच त्यामागे अर्थ असतो. पण उत्तरं काय द्यायची हे मात्र कर्मकठिण असतं बर्‍याचदा.

चतुरंग

एकलव्य's picture

19 Jul 2009 - 5:32 pm | एकलव्य

प्राजुताईंचा सुंदर लेख!

माझ्या मते आपण मोठे लोक बर्‍याचदा म्हातारपण, मरणे वगैरे गोष्टी जितक्या निराशेने आणि सीरिअसली घेतो तितकी ही लहान मुलं घेत नाहीत. त्यांना ती एक प्रोसेस आहे इतकाच अर्थ गवसतो आणि ती प्रश्न विचारत रहातात. नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता इतकाच त्यामागे अर्थ असतो.

करेक्ट! मलाही असेच वाटते. (खरे खोटे कोणास ठाउक!)

आमच्या मुलीची या विषयावरील मुक्ताफळे देण्याचा मोह टाळतो आणि कटतो....

- एकलव्य

अवलिया's picture

10 Jul 2009 - 11:20 pm | अवलिया

नेहमीप्रमाणेच मस्त लेखन :)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

मदनबाण's picture

11 Jul 2009 - 6:40 pm | मदनबाण

हेच म्हणत्यो म्या. :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2009 - 11:41 pm | बिपिन कार्यकर्ते

क्याबात है, प्राजु. क्या बात है. सुंदर लेखन, नेहमीप्रमाणेच. पोरांची पण कमाल असते. काय काय विचारतात आणि डोक्यात घेऊन बसतात. आमच्या शेजारच्या आजी गेल्यावर त्यांच्याकडच्या एका लहान मुलीने समाचाराला आलेल्या दुसर्‍या एका आजीबाईंना 'आता तुम्ही पण जाणार देवबाप्पाकडे?' असे विचारून पळापळ केली होती.

लहान मुलांना कशी उत्तरं द्यावी हे एक कर्मकठिण काम आहे बॉ!!!

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

11 Jul 2009 - 12:20 am | चतुरंग

एक घटना - गाढ झोपलेले आपले बाबा हाका मारुनही उठत नाहीत म्हटल्यावर ५ वर्षाची बहीण आणि ३ वर्षांचा भाऊ ह्यांच्यातला संवाद -
"ए बाबा बघ कसा झोपला?"
"अजिबात ओच देत नाहीये."
"मरला वाटतं."
"चल तू हात पकड, मी पाय पकडते खिडकीतून टाकून देऊ!"

चतुरंग

विकास's picture

11 Jul 2009 - 12:05 am | विकास

लेख चांगला आहे आणि चतुरंगने म्हणल्याप्रमाणे "घरोघरी मुलांच्या शाळा" अशीच अवस्था आहे.

एकंदरीत अमेरिकन पद्धतीत नको ते शिक्षण नको तेंव्हा देण्याची जरा जास्तच पद्धत आहे. ५-६ वर्षांच्या मुलांना ए बी सी डी आणि आकडे आले नाहीतरी काय घाई आहे असे म्हणतील आणि दुसरीकडे "एज अ‍ॅप्रॉपिरिएट" म्हणत असली शिक्षणे देतील.

मात्र चतुरंगशी अशंतः सहमत की लहान मुले आपल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट तितकी गांभिर्याने घेत नाहीत. तरी देखील डोक्यात कुठेना कुठे तरी हे विचार राहतातच.
-----
तरी नशिब समजा तुमच्या मुलाला इतकेच शिकवले आणि बिचारा आईच्या काळजीने हे प्रश्न विचारतोय. आम्हाला असे काही "नशिबवान" पालक माहीत आहेत की जे पोराला नीट वागण्यावरून भारतीय स्टाईल मधे ओरडले आणि काही कळायच्या आत बाहेर - पोलीस, फायर, अँब्युलन्स हजर :O चाइल्ड अ‍ॅब्युज झाल्यास ९-१-१ ला फोन करा म्हणून शाळेत शिकवलेले. चाईल्ड अ‍ॅब्युज म्हणजे काय? त्यांच्या लेखी ओरडणे देखील असू शकते...त्याच्या पुढची स्टेप जर पोलीसांना समजले नसते तर सोशल सर्व्हीस डीपार्टमेंटची लोकं येऊन, पोराला सरळ घेऊन जाऊ शकली असती.

प्राजु's picture

11 Jul 2009 - 8:03 pm | प्राजु

एकंदरीत अमेरिकन पद्धतीत नको ते शिक्षण नको तेंव्हा देण्याची जरा जास्तच पद्धत आहे. ५-६ वर्षांच्या मुलांना ए बी सी डी आणि आकडे आले नाहीतरी काय घाई आहे असे म्हणतील आणि दुसरीकडे "एज अ‍ॅप्रॉपिरिएट" म्हणत असली शिक्षणे देतील.

अगदी खरं!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

11 Jul 2009 - 10:51 am | लवंगी

किती निरागस असतं हे वय! आमच पिलूपण असच हळवं आहे.

सहज's picture

11 Jul 2009 - 10:55 am | सहज

चला आता यापुढे बघ हा तु असे वागलास तर मी म्हातारी होईन हा असे बोलून कार्यभाग साधा.

जोक्स अपार्ट विसरेल लगेच सगळे. काळजी नको. :-)

शक्तिमान's picture

12 Jul 2009 - 3:15 pm | शक्तिमान

असेच उत्तर द्या!

ईस्टर आयलॅण्ड बेटावरच्या माती मध्ये संशोधकाना एक जीवाणु सापडला आहे. त्याच्या साह्याने त्यानी म्हातारपण न येणार्‍या गोळ्या तयार केल्या आहेत म्हणे.
सदर माहिती काल इंडीया टीव्हीवर पाहिली आहे. :D

वेताळ

विकास's picture

11 Jul 2009 - 8:38 pm | विकास

ईस्टर आयलॅण्ड बेटावरच्या माती मध्ये संशोधकाना एक जीवाणु सापडला आहे. त्याच्या साह्याने त्यानी म्हातारपण न येणार्‍या गोळ्या तयार केल्या आहेत म्हणे.

म्हणजे सगळे राजकारणी आता तरूण नेतॄत्व देण्यासाठी परत सज्ज होणार? :)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2009 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार

प्राजु तै नेहमीप्रमाणेच वेगळ्या विषयावारचे सुंदर लिखाण.

@ वेताळ

नका हो असली चॅनेल्स बघत जाउ.

परवा चुकुन ते चॅनेल लावले तर त्यावर " क्या रिश्ता था मायकल (जॅक्सन) का हिममानव के साथ ? क्या मायकल सचपुच पिछले जनम मे हिममानव थे ? मायकल ने सायंटीस्ट को किये थे करोडो रुपये ऑफर, वो बनना चाहते थे हिममानव" अशी बातमी बघुन मी मतिमंदमानव झालो हो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

मिसळभोक्ता's picture

11 Jul 2009 - 12:34 pm | मिसळभोक्ता

अतिशय भयानक प्रॉमिस केलेत.

कधीच म्हातारी/रा होणार नाही, ह्याचा अर्थ कळेल तेव्हा मुलाला केवढा धक्का बसेल ?

-- मिसळभोक्ता

:(
त्याला समज येईल तेव्हा कदाचित त्याला माझ्या प्रॉमिस मागची भावना समजेल आणि तो मला समजून घेईल. असं वाटतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुबक ठेंगणी's picture

11 Jul 2009 - 2:19 pm | सुबक ठेंगणी

अगं तू त्याला के-सिरियल मधल्या अंबाआज्जी दाखव...त्या जवळजवळ पाचेक पिढ्या चांगल्या हिंडत्या फिरत्या होत्या! :D
जोक्स अपार्ट...विसरेल थोड्या दिवसांनी ! आणि मोठा झाल्यावर हा तुझा लेख वाचून हसेल!

राधा१'s picture

11 Jul 2009 - 3:18 pm | राधा१

मी माझ्या काकुशी ,आई शी , आजीशी जाम अ‍ॅटॅच आहे...त्यामुळे त्यांच्या हातावर जर सुरुकुत्या दिसल्यातरी सुद्धा मी जाम अस्व्स्थ होते. तुमचं बाळ तर लहान आहे...त्याला भिती वाटणारच...माझ्या वरुन सांगते...माझ्या लहानपणी आजोबा वारल्यावर मी पण मला आजोबांकडे ताबडतोब सोड म्हणुन धिंगाणा घालायचे.
मुल फार पसेसिव असतात आपल्या लोकांसाठी.
ज्याच्याशी त्यांच जमत त्या लोकांनाच फक्त त्रास देतात तसेच त्यांच्यावर खरखुर प्रेम करतात.

सुनील's picture

11 Jul 2009 - 6:50 pm | सुनील

उत्तम लेख. कालांतराने मुलाच्या डोक्यातील हा किडा जाईलच आपोपाप. फार काळजी करून घेऊ नये, असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

11 Jul 2009 - 8:00 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार.
सहज, सुनिल, सुबक..
तो विसरेल लवकर अशीच आशा करते. (सध्या दुसरं काय करू शकते तसंही)..
पुन्हा एकदा आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

12 Jul 2009 - 9:16 am | विसोबा खेचर

छ्या! हल्ली साला ऐकावं ते नवलंच...

प्राजू, उत्तम लेख..

तात्या.

पिवळा डांबिस's picture

12 Jul 2009 - 6:25 pm | पिवळा डांबिस

प्रभू मास्तरांना मी व्य नी ने ही समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं," सध्या काहीच नका करू, पण तुमचा एकही केस पांढरा होणार नाही याची काळजी घ्या." हरकत नाही.
मास्तरांना काय जातंय सांगायला? असा काही उपाय असता तर तो मास्तरांनीच (आणि आम्हीही) वापरला नसता का?:)

प्राजु, बाकी तू अंमळ चक्रम होत चाललीयेस बरं का! वयाचा परिणाम?:)
मी आता काय करणार आहे माहितिये का? तुझे असे लेख सेव्ह करून साठवून ठेवणार आहे आणि मग जेंव्हा तुझ्या मुलाचं लग्न होईल ना त्याप्रसंगी तुझ्या सुनेला (गरज पडल्यास इंग्रजीत भाषांतरित करून!!) ते प्रेझेंट देणार आहे!! कळू दे तिलाही आपली सासू तरूणपणी कशी अंमळ आटा सटकलेली होती ते!!!!!!
:)

प्राजु's picture

12 Jul 2009 - 7:58 pm | प्राजु

प्राजु, बाकी तू अंमळ चक्रम होत चाललीयेस बरं का! वयाचा परिणाम?

खरंय!! माझे किती राहिलेत आता!!...
दात पांढरे झाले .. केस हलायला लागले.. संपलं आता. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित's picture

12 Jul 2009 - 10:02 pm | आपला अभिजित

आमची `हळवी' मनस्वी याबाबत फार प्रॅक्टिकल आहे. तिला जीवनोन्नतीचे सहा सोपान शिकवण्याची जबाबदारी बाप म्हणून माझ्याच खांद्यावर आहे, असे मी मानतो... (|:
त्यामुळे हे लाइफ सायकल मीच तिला समजावून सांगितले. ती मला विचारते, ``बाबा, माझी मज्जा आहे ना? मला चार चार आजी-आजोबा.' तुम्हाला नाही ना?`` :T

परवा म्हणाली, ``बाबा, मी म्हातारी होउन देवाघरी गेले, तर मग तुम्हाला कुशीत झोपायला कोण??`` :S

आणखी एक दिव्य विधान :

`बाबा, मी मोठी होईन तेव्हा शाहरुख खान, गलगले, मकरंद अनासपुरे हे म्हातारे होतील ना?``
तिला आम्ही म्हातारे होण्याची काळजी नाहीये. ही तिची दैवतं म्हातारी होण्याची काळजी जास्त आहे!! :S

त्या तुलनेत तू किती भाग्यवान आहेस प्राजु!!!

दशानन's picture

12 Jul 2009 - 10:29 pm | दशानन

=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

अश्या छकुलीला एकदा नक्कीच भेटावे लागेल... :)
आमच्या कुंद्याची पण छकुली असेच काही तरी बोलुन त्याला छळत असेल ;) तो लेकाचा आम्हाला ऑनलाईन छळतो..

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

आमच्या बायकोची एक मैत्रीण आहे सायरा. तिची मुलगी झैनब तिला एकदा विचारते,
"ममा, ममा, शारुख्खान हमारें डॅडी क्यों नहीं बन सकते??" :T :O :?
आजूबाबूच्या सगळ्यांची बोलती बंद!!!

चतुरंग(खान)

आपला अभिजित's picture

13 Jul 2009 - 7:05 am | आपला अभिजित

"ममा, ममा, शारुख्खान हमारें डॅडी क्यों नहीं बन सकते??"

छान!
बापाने बडव बडव बडवली असेल मग!!!

विजुभाऊ's picture

13 Jul 2009 - 12:23 pm | विजुभाऊ

हल्लीची मुले बर्‍याच बाबतीत झोरबा आहेत. बुद्धाला जोपर्यन्त म्हातारपण आजारपण वेदना मरण या अवस्था माहीत नव्हत्या तोपर्यन्त झोरबा ही त्याची अवस्था होती. त्याने जेंव्हा ह्या अवस्था पाहिल्या तेंव्हा त्याला बसलेल्या मानसीक धक्यामुळे त्याला घर सोडून जाऊन विचार करायला प्रवृत्त व्हावे लागले.
रजनीश म्हणतात की तुम्हाला मृत्यूची भिती काढून टाकायची असेल तर स्मशाने ही गावात मध्यभागी बांधा.
जामनगर मध्ये एक प्रयोग केला गेला आहे. तेथील स्मशानभूमी हे एखाद्या बगिच्या सारखी बांधली आहे. त्या भागातल्या बराचशा शाळा शाळेची ट्रीप स्मशानभूमीत नेतात
प्राक्तनास अर्थ असतो म्हणून ते जगणे व्यर्थ जात नाही

शाल्मली's picture

13 Jul 2009 - 7:00 pm | शाल्मली

एका वेगळ्याच विषयावरचा पण नेहमीप्रमाणेच छान लेख!
तुझा लेक लवकरच विसरेल.. काळजी करु नकोस.

--शाल्मली.

प्रअका१२३'s picture

14 Jul 2009 - 5:29 am | प्रअका१२३

माझ्या लहानपणीचा एक किस्सा आई सांगायची, तो आठवला. :)

<):) छान लिहिलंय

पक्या's picture

14 Jul 2009 - 5:41 am | पक्या

म्हातारे झाल्या झाल्या लगेच काही कोणी डाय होत नाही . प्रकॄती (हेल्थ हो) चांगली असेल तर माणूस पार नव्वदी शंभरी गाठतो. असे त्याला सांगा. आणी मुलांच्या दृष्टीने 'हंड्रेड इअर्स' म्हणजे खूप मोठा आ़कडा असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2009 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग म्हणतात तसे घरोघरी मुलांच्या शाळा हे अगदी पटतं ! :)

-दिलीप बिरुटे

प्रशांत उदय मनोहर's picture

27 Jul 2009 - 8:15 pm | प्रशांत उदय मनोहर

आज पुन्हा वाचल्यावर सहज आठवलं.
इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर टीव्हीवर त्यांचं प्रेत आणि अगणित फोटो रंगीबेरंगी फुलांच्या हारांनी सजवले होते. तेव्हा असं मेल्यावरच करतात हे माहितच नव्हतं. आम्हाला (मला आणि माझा भाऊ, चिन्मय याला) आपलं वाटलं, की राजीव गांधीचं त्याच्या आईवर लै प्रेम असल्यामुळे असं त्याने केलं असणार.
ताबडतोब आमचा आईला प्रश्न, "आई, तुझे फोटो काढून त्यांच्यासाठी असे हार का नाही घालत आपण?"...
आईचे हात कपाळाला. मग तिने नीट समजावलं की ते हार का पडलेत.

तसे लहानपणी आम्ही खूपच त्रासदायक होतो.

लहानपणी बाबा पंजाबला होते. आम्ही मात्र शिक्षणासाठी आईसोबत नागपुरला. उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुटी आली, की पंजाबला जायचो. तेव्हा, एकदा बोगदा, वळणदार ट्रॅकवर दिसणारे आपल्या गाडीचे डबे, डोंगर, दर्‍या आईनी हौसेनी आम्हाला दाखवलं. पुढच्या क्षणी आमचा प्रश्न - "आई गं, या दरीत आपण पडलो तर काय होईल?" आईचं उत्तर - "आपण खाली जाऊन वर जाऊ".
दिल्लीला बाबा आम्हाला घ्यायला यायचे. एकदा आम्ही विचारलं, "बाबा नाही आले दिल्लीला तर काय करायचं?" आईचं उत्तर - "तिकिट काढून नागपूरला परतायचं." आम्ही - "तेवढे पैसे आहेत?"
आपला,
(प्रश्नांनी इरिटेट करणारा "निरागस") प्रशांत

शितल's picture

27 Jul 2009 - 8:36 pm | शितल

माझ्या लेकाला आई कायम छान दिसली पाहिजे, साडी, पंजाबी सुट ही नको घालु, जीनच घाल, केसच सोड. हे तर आहेच पण त्या पाठोपाठ त्याची टिचरही दिसायला सुंदर हवी नाही तर घरी येऊन आई टिचरला चष्मा का आहे, जाड का आहे तीचे केस असे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. :(

कलंत्री's picture

31 Jul 2009 - 9:02 pm | कलंत्री

खरेतर कोणीही आपल्याला असे म्हटले की क्या बुढा हो गया है तर नकळतच आपणकाहीतरी गमावत आहे असे जाणवतेच, पण तेच कोणी "कितना बडा हो गया है" असे म्हटले तर नकळतच अंगावर मांस चढल्यासारखे वाटतेच वाटते.

दोन्ही बाजूला काळ हा जात असतोच, बडा होण्यामध्ये सुख आहे तर बुढा होण्यामध्ये काळाबद्दलची शर्यत हरण्याची खंत आहे.