कॉलेजमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने "आऊटस्टँडिंग" विद्यार्थी होतो. आरटीओ, सुदर्शन केमिकल्स, पुणे स्टेशनची मागली बाजू आणि कैलास स्मशानभूमी असा शेजार असल्यावर (आणि कुठल्याही टिपिकल अभियांत्रिकी कॉलेजचा 'रखरखाट' असताना) पोरांकडून अजून काय अपेक्षा असणार? तरीपण आमच्या कंपूमध्ये संगीताचे (म्हणजे गाणं किंवा ज्याला आपण "मुझिक" म्हणतो) जबरदस्त चाहते. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून भाग घेताना अन्य कॉलेजेसचे समान शील आणि व्यसनं असलेले दोस्त मिळाले आणि आमची संगीताशी (टिप पुन्हा लागू) दोस्ती जमली. म्हणता म्हणता कॉलेजचे ते मंतरलेले दिवस संपले आणि बेकारीचे "तंतरलेले" दिवस सुरू झाली. कामंधंदा नसलेली पोरं एरवीच आपला भरपूर वेळ सत्कारणी लावू लागली. त्यातच हणम्या (ह्याला कधी कोणी अनमोल हाक मारलीच नाही) च्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघाली. आम्ही २५-३० रेहमानी किडा असलेले (ए आर रेहमान चे भक्त) एकत्र येऊन "रेहमानिया" हा केवळ रेहमानच्या गाण्यांचा कार्यक्रम करायचा घाट घालायला लागलो. अस्मादिक कार्यक्रमाचं निवेदन करणार होते.
२ महीने कसून सराव झाल्यानंतर तो दिवस उजाडला (की मावळला?). बुधवार दिनांक १८ जुलै २००३. वेळ रात्रौ ९ वा ३० मि टिळक स्मारक मंदीर प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं. तब्बल २० जणं स्टेज वर. निवेदन करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्यामुळे टेन्शन नव्हतं... पोटात फुलपाखरं उडल्याचा भास होतो तेवढाच. पण प्रेक्षकांपेक्षा जास्त उत्सुकता आम्हाला होती. कारण रेहमानची गाणी अशी स्वरमंचावर पहिल्यांदाच सादर होणार होती. निवेदकाला साजेसा आगाऊपणा करत मी माईक घेऊन सगळ्यांच्या पुढे जाऊन उभा राहीलो. राहुल नि काउंट दिला... 'लेजंड ऑफ भगतसिंग' मधल्या 'देस मेरे देस मेरे' च्या कॉर्डस सुरू झाल्या. बाहेरचा कोलाहल एकदम बंद झाला.... आणि हळू हळू पडदा बाजूला होत असतानाच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला..... पद्या चा अफलातून सेट, तीन सिंथेसाइजर्स, बासरी, ३ गिटार्स, ऱ्हिदम मशीन, ड्रम्स, २ तबले, डफ, ढोल, ढोलक आणि नानाप्रकारच्या तालवाद्यांनी सज्ज ऱ्हिदम सेक्शन, ६ मुख्य गायक गायिका आणि शिवाय ४ जणांचा कोरस.... सगळ्यांनी पहिल्या नजरेत प्रेक्षकांवर जादू केली होती.
आजपर्यंत प्रेक्षकांनी भरलेलं प्रेक्षागृह, टाळ्या, 'वन्स मोअर' च्या आरोळ्या.... सगळं अनुभवलं होतं. पण आजचं हे प्रकरण काही औरच होतं. अक्षरशः १०-१५ सेकंद टाळ्यांचा तो पाऊस झेलत असताना प्रेक्षकांच्या आमच्याकडून किती अपेक्षा आहेत ते लक्षात आलं होतं. रेहमान बद्दलचं प्रेम, त्याची गाणी थेट ऐकायला मिळणार ह्याची उत्सुकता आणि आमची जय्यत तयारी बघून आमच्याकडून असलेल्या अपेक्षा... सगळं त्या टाळ्यांच्या दणदणाटातून व्यक्त होत होतं.
मी प्रेक्षकांना अभिवादन करून त्यांचं स्वागत केलं. मग 'देस मेरे' झालं आणि मी पुन्हा निवेदनासाठी पुढे आलो. बोलायला सुरुवात केली.. "आर डी बर्मन के अंतराल के बाद हिंदी फिल्म संगीत में एक ठहराव सा आ गया था. तभी १९९२ में मणिरत्नम की तमिल फिल्म 'रोजा' र्रिलीज हुई". आणि 'रोजा' ही नाव घेतल्यावर पुन्हा टाळ्या.... किती आवडतो रेहमान लोकांना.... "रोजा कहनेको तो थी एक प्रादेशिक भाषा फिल्म, मगर उसके अनोखे.. अनूठे और प्यारे संगीत ने पूरे हिंदुस्तान पर मानो एक जादू सा चला दिया".... प्रेक्षक माझ्याबरोबर १९९२ मघ्ये गेलेत... पुढच्या चेहेऱ्यांवर अतिशय आनंद की आता 'रोजा' ऐकायला मिळणार... त्याच बरोबर अल्ला रखा रेहमान नावाच्या त्यांच्या लाडक्या तरूण संगीतकाराबद्दलचं कौतुकही.... "ऐसा संगीत इसके पहले न किसीने सुना था न महसूस किया था. हिंदी फिल्म जगत को एक मीठा सपना दिख राहा था..."
..... आणि काय सांगू... जवळपास हजार पेक्षा जास्त लोकांनी भरलेलं ते प्रेक्षागृह पाण्यानी ओतप्रोत भरलेल्या मेघासारखं भारून माझासमोर उभं होतं..... टाचणी पडली तर आवाज यावा अशी शांतता.... प्रत्येकाच्या मनात आपल्या लाडक्या संगीतकाराबद्दल अलोट प्रेम दाटून आलेलं... मी एक टाचणी मारण्याचा अवकाश की ढगफुटी होणार होती... भावनांचा पूर येणार होता.
...... "हिंदी फिल्म संगीत के आकाश में एक नया सितारा उभर राहा था जिसका नाम था..........." आणि इतकं बोलून मी एक क्षणाचाच पॉझ घेतला. आणि त्या पॉझनीच टाचणीचं काम केलं. जणू काही लोकं मी थांबायचीच वाट बघत होते. "....... जिसका नाम था अल्ला रखा रेहमान".... असं मी म्हणायच्या आधीच तब्बल १००० मुखांतून एकच गजर झाला... "ए आर रेहमान"...... !!!!!!!!!!!
आणि पुन्हा टाळ्यांचा पाऊस सुरू झाला. खरंच एखाद्या कलाकारावर, खेळाडूवर लोकं इतकं अपार प्रेम करू शकतात ? असा प्रकार मी फक्त सचिन तेंडूलकरच्या बाबतीत अनुभवला आहे. लोकांच्या आयुष्यात एखाद्याचं इतकं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं स्थान असू शकतं? आणि इथे तर फक्त हजारभर लोकं होती... ह्यांचं गारूड तर लाखो करोडो लोकांवर आहे. आणि लोकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या ह्या जादूगाराला आजवर मी फक्त एक टॅलेंटेड संगीतकार समजत होतो. त्या एका क्षणात लता मंगेशकरांपासून ते छत्रपतींपर्यंत अनेक चेहरे डोळ्यांसमोर आले. कोट्यवधी लोकांच्या ओठांवर हसू आणणाऱ्या ह्या लोकांच्या उत्तुंग महानतेपुढे विशेषणं देखील किती थिटी पडतात. आणि इथे तर आपल्या एका लाडक्या कलाकाराचं कौतुक होताना बघतानादेखील छाती दडपून गेली होती.
'रेहमानिया' चा पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. 'ये हँसी वादियाँ' पासून ते 'हम्मा हम्मा' पर्यंतच्या गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 'ओ हमदम सुनियो रे' वर दंगा करणारे लोक सत्यजीत केळकर ने वाजवलेली 'बाँबे थीम' ऐकताना डोळ्यातले अश्रू पुसत होते. मी सांगत असलेल्या रेहमानच्या किश्श्यांना खळखळून दाद देत होते आणि 'मेरा रंदे बसंती चोला' सारख्या गाण्याच्या निवेदनानंतर 'वंदे मातरम' 'भारत माता की जय' च्या आरोळ्याही देत होते.
...... आणि मी मात्र त्या एका क्षणात मला घडलेल्या महान लोकांच्या महानतेच्या साक्षात्काराच्या तेजाने दिपून गेलो होतो .... अजून ही आहे.
अश्या ह्या दोन क्षणांनी मला कधी न भरून येणाऱ्या दोन गोड जखमा दिल्या आहेत. ह्या वेदनेवरचा उपाय एकच.... अजून असे क्षण अनुभवणे. अश्वत्थाम्यासारखा मी ह्या जखमा वागवत हिंडतोय...... असे क्षण पुन्हा अनुभवायला !
प्रतिक्रिया
29 Jul 2009 - 7:14 pm | चकली
अनुभव कथन चांगले जमले आहे. लोकांचे प्रेम ही खरच झिंग आणणारी गोष्ट आहे.
चकली
http://chakali.blogspot.com
30 Jul 2009 - 12:49 am | योगी९००
सुरेख अनुभव कथन..!!!
खादाडमाऊ
30 Jul 2009 - 1:53 am | बहुगुणी
'आणखी येऊ द्या' असं म्हणावंसं वाटलं, पण तुम्ही 'दोन(च) क्षणां'विषयी लिहून ही मालिका थांबवणार असं दिसतंय! लिखाण आवडलं, तुमच्याबरोबर वाचकांनाही घटनास्थळी घेऊन गेलात. धन्यवाद!
30 Jul 2009 - 5:52 am | एक
लेख छानच!
पण "आरटीओ, सुदर्शन केमिकल्स, पुणे स्टेशनची मागली बाजू आणि कैलास स्मशानभूमी असा शेजार असल्यावर" हे खूप खूप ओळ्खीचं वाटतं आहे.
ए आय एस एस पी एम एस #:S चे विद्यार्थी का?
30 Jul 2009 - 6:45 am | सहज
दोन्ही भाग उत्तम.
असेच उत्कट क्षण लवकर तुमच्या आयुष्यात येवोत. शुभेच्छा!!
30 Jul 2009 - 7:29 am | पाषाणभेद
आणखी अनुभव कळवा. आणि हो,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
30 Jul 2009 - 4:52 pm | ज्ञानेश...
अप्रतिम लिखाण आहे मॉर्गनसाहेब. =D>
दोन्ही क्षण वाचले आणि फार फार आवडले.
"Great Power Comes With Great Responsibilities"
30 Jul 2009 - 5:45 pm | सन्दीप
पहिल्या धाग्याचा दुवा दिलेला नाही
25 Aug 2009 - 6:09 pm | वेदश्री
पहिला भाग खेळावरचा असल्याने दुसराही तसाच असेल असा पुर्वग्रह असल्याने सुरूवातीला निराशा झाली पण एआर म्हणताच परत कळी खुलली.
हा भाग चांगला लिहिला आहे... पण अजून छान लिहायला भरपूर वाव होता असे वाटते. पुलेशु.
26 Aug 2009 - 1:06 am | आंबोळी
मॉर्गन साहेब,
तुमचा भाग १ वाचला आणि अक्षरशः आमच्या कॉलेजच्या ग्राऊंड वर आहे असे वाटायला लागले. खुपच सुंदर झालाय भाग १.
त्याच धुंदीत भाग २ वाचायला घेतला.... पण.....
घाबरु नका ... हा पण छान झालाय.... पण का कोण जाणे मला हा भाग विनायक पाचलग नामक इसमाने लिहिल्याचा संशय येतोय...... असे जर असेल तर टार्या नामक काळी शक्ती त्याची दखल घ्यायला समर्थ आहे. असो.
दोन्ही भाग खुप छान झालेत. आवडले.
पु.ले.शु.
(धारी)आंबोळी