सिव्हिलियन - २/३

वाचक's picture
वाचक in जनातलं, मनातलं
29 Jun 2009 - 7:02 am

पहिला भाग इथे पहा - सिव्हिलियन - १

प्रकरण 3

स्थळ: बाजारपेठ
वेळ: सकाळची

"आईये आईये, कप्तान साहब" असे म्हणत अर्जुनसिंगने त्याच्या दुकानाच्या पायर्‍या चढणार्‍या त्या 2 सैनिकांचे स्वागत केले. ह्या अर्जुनसिंग चे एक वैशिष्ट्‌य होते. तो कुठलीही गोष्ट करत असताना मनापासून करत असे. आत्ता सुद्धा त्याचे हास्य हे केवळ शब्दांत न राहता त्याच्या आवाजात आणि डोळ्‌यापर्यंत पोचले होते.

"और कहो, कैसे हो अर्जुनसिंग? हालचाल ठीक ?" श्रेयसनी दुकानात शिरता शिरता आपल्या कमावलेल्या आवाजात विचारले. अर्जुनने तेवढ्‌यात 4 पुस्तके हलवून त्यांच्या साठी बसायला जागा केली आणि हाताखालच्या पोर्‍याला टप्पल मारुन चहा आणायला पिटाळले.

"हां, इनसे मिलिये अर्जुनसिंग, ये है कॅप्टन प्रेरक, मेरे बंबई के दोस्त, आजही इन्होने ड्‌युटी जॉईन की है यहांपे, राजस्थानमे थे पहले"

"अरे फिर तो आपको राजस्थानके रेतके मैदानोंसे ये काश्मिर की वादी बहोत खूबसूरत लगेगी सर" अर्जुनसिंग हसत म्हणाला.

एवढा वेळ प्रेरक अर्जुनसिंगचे नुसतेच निरिक्षण करत होता. धडधाकट बांध्याचा अर्जुनसिंग फारसा उंच नसला तरी त्याचे शरीर चांगलेच कमावलेले वाटत होते आणि त्याच्या हालचालीत एक प्रकारची नैसर्गिक सहजता होती. जंगलात राहणार्‍या जनावरात किंवा रानावनात राहणार्‍या भिल्लांमधे असते तशी. त्याच्या सगळ्‌याच हालचाली चपळपणे होत होत्या. त्याचे आपल्याकडे बारकाईने लक्ष आहे हे बघून अर्जुन गालात हसत म्हणाला
"अभी कप्तान साहब, इनका परिचय तो दे दिया, अब जरा हमारी तारीफ भी तो सुनाईये इन्हे"

"हां हां मै तो भूल ही गया. प्रेरक, हे अर्जुनसिंग, इथे न्यूजपेपरचा स्टॉल चालवतात आणि जम्मू मधे पुस्तकांचे एक दुकानही आहे ह्यांचे. पूर्वी काही काळ मुंबई मधे राहीलेले आहेत. माझ्यासाठी कधी कधी मराठी पेपर मिळवतात हे. कसा ते त्यांनाच माहिती"

प्रेरकने अर्जुनच्या पुढे केलेल्या हातात हात दिला. स्वत: सैन्यात असून सुद्धा अर्जुनच्या हाताचा कडकपणा प्रेरकला चांगलाच जाणवला.

"भाई आपका हात तो बडा मजबूत है, क्या काम करते है आप ?" प्रेरकने हसत हसत विचारले.

"भाई कुछ खास मेहेनतवाला काम नही है आप लोंगोंजैसा, बस ये एक स्टॉल है और एक छोटी दुकान है जम्मू में उसीकी देखभाल में दिन निकल जाता है." अर्जुनसिंग शांत आवाजात म्हणाला. मनातून त्याला प्रेरकचा टोन आवडला नव्हता पण त्याने तसे वर काहीच दाखवले नाही.

"भाई अच्छा है आप सिव्हिलिअन लोगोंका, अच्छी खासी दुकानमे बैठके किताबे पढते रहो, हम है ना यहां आपकी देखभाल के लिये" प्रेरकच्या बोलण्यातून उपहासाची सूक्ष्म छटा डोकावून गेली.

अजूनही अर्जुन शांतच होता. पण प्रेरक थांबलाच नाही.
"ऐश करो यार मस्त यहां बैठके, कोई वहां जिये या मरे, तुम्हे उससे क्या? तुम्हे तो अपनी किताबे बेचनेसे मतलब" प्रेरक मगाच्या गोष्टीवर अजूनही धुमसत होता हे श्रेयसच्या लक्षात आले. तो त्याला थांबवायला म्हणून काही बोलणार तेवढ्‌यात अर्जुनसिंग म्हणाला
"जी हां, हम यह किताबे जरुर बेचते है लेकिन इसका मतलब ये नही के हम बुझदिल है. देखिये जैसे हर आदमी अगर आर्मी में जाने लगे तो कैसे चलेगा? आर्मी के बाहर रहकर भी देश सेवा की जा सकती है. मै ये बात बिलकुल मानता हूं के आपका धैर्य, साहस और त्याग सराहना के काबिल है लेकिन ऐसे सब सिव्हिलिअन्स को शक की नजर से मत देखियेगा, एक दिन आपको आपकी गलतीका जरुर अहसास होगा."

वाद निष्कारण वाढायला नको म्हणून चहा येण्याची वाट न बघता श्रेयस एकदम उठला. कॅप घालत तो म्हणाला
"चलो जी हम चलते है. यहांका राऊंड लेके फिर हेड ऑफिस भी जाना है. फिर मिलेंगे"

"हां हां बिलकुल मिलेंगे, नही तो कप्तान साहब को लगेगा के यहांके सभी लोग डरपोक है. मिलिट्रीवालोंसे मिलते तक नही. " मोठ्‌याने हसत अर्जुनसिंग म्हणाला.

प्रकरण 4

स्थळ: मिलिटरी हेडऑफिस
वेळ: लगेचच

निघतानाही प्रेरक घुश्यातच दिसत होता. श्रेयसनी विचारले "काय रे? उगाच त्या अर्जुनसिंग वर का चिडलास? "

"अरे सॉरी यार, मी मघाच्याच विचारात होतो की इथले स्थानिक लोक मदत करत नाहीत लष्कराला म्हणून आणि पहिलाच स्थानिक माणूस भेटला ना तो अर्जुनसिंग म्हणून पटकन निघून गेले तोंडातून."

एवढे बोलत असेपर्यंत त्यांची जीप हेडऑफिसच्या दारात येउन पोचली. गेटवरच्या सेंट्रीने कडक सलाम ठोकला. ते कुठेही न थांबता सरळ ब्रिफिंग रुमच्या दिशेने गेले. मेजर यशपाल चोप्रा आत शिरत होते. मेजर चोप्रा म्हणजे एकदम कडक काम. त्यांना आत्तापर्यंत 2 वीरचक्रे मिळाली होती आणि कारगिल ऑपरेशनमधेही मेजर चोप्रांचाच महत्त्वाचा सहभाग होता. चोप्रा कडक लष्करी शिस्तीचे. त्यांच्या घरी गेलात तर स्वत:च्या हातानी बनवून तुम्हाला तंदूर मुर्गी खायला घालतील पण ऑफिसमधे म्हणजे एखाद्या स्मिताला महाग. त्यांचे सगळे लक्ष देशाचे रक्षण कसे करता येईल ह्याचकडे असायचे. चोप्रांनी सगळे कागद टेबलावर ठेवून बोलायला सुरुवात केली. तिथे फक्त चारच माणसे हजर होती. श्रेयस आणि प्रेरक ह्यांच्या शिवाय RAW च्या काश्मिर ऑपरेशन्स विंगचे कमांडर भानू प्रसाद हे देखिल हजर होते. प्रसाद ह्यांच्या कडे काश्मिर मधे घुसखोरांच्या काय कारवाया चालू आहेत ह्याचा तपास आणि विश्लेषण करण्याची जबाबदारी होती. चोप्रांनी आपले ब्रिफिंग सुरु केले.

"अशी खबर मिळाली आहे की नेहेमीप्रमाणेच पाकिस्तानी अतिरेकी अमेरिकी परराष्ट्र मंत्र्‌यांच्या भेटीचे निमित्त साधून काहीतरी गडबड करायचा प्रयत्न करत आहेत. पण ह्यावेळी नेहेमी सारखा प्रकार नाही. ह्यावेळी त्यांचा प्लॅन मोठा असावा असे आपल्या सॅटेलाइटने पकडलेल्या काही गुप्त संदेशांवरुन वाटते. पण आपल्या हातात काहीच निश्चित माहिती आलेली नाहीये."
चोप्रांनी थोडा पॉज घेतला आणि कमांडर प्रसादांकडे सहेतूक नजरेने बघितले.
"हे ऑपरेशन मोठे असेल, त्यांना ह्यात स्थानिक लोकांची मदत घ्यावीच लागणार."
प्रसादनी आता सुरुवात केली. त्यांचा आवाज शांत आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची साक्ष देणारा होता.
प्रसाद पुढे बोलू लागले.
"आणि म्हणूनच तुम्हाला आज इथे बोलावले आहे. पाकड्‌यांचे हे ऑपरेशन अत्यंत गुप्त असेल. पण इतक्या मोठ्‌या प्रमाणावर कट पार पाडायचा म्हणजे त्यांना स्थानिकांची मदत असणारच. अजून हातात काही पक्की खबर आलेली नाहीये पण परराष्ट्र मंत्र्‌यांची भेट हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या ह्या दौर्‍यात जर काही गडबड झाली तर आपल्याला पाश्चिमात्य जगात तोंड वर काढणे मुष्किल होइल."

"आपला प्लॅन काय आहे सर?"

"सांगतो, तुम्हाला इथल्या भागाची माहिती आहेच म्हणजे कॅप्टन श्रेयस तुला आणि सुभेदार मुल्ला तर इथलाच बच्चा आहे. तुम्ही सध्या काहीही अॅक्शन न घेता नुसती माहिती काढायचे काम करायचे स्थानिक लोकांत मिसळून कान आणि डोळे उघडे ठेवून जेवढे काही कळेल ते रिपोर्ट करायचे. आपण आत्ताच कोणतीच हालचाल करायची नाही, त्याने पाकडे सावध होण्याची शक्यता आहे पण गुपचूप माहिती मात्र काढत राहयचे. तुम्ही कोणी तरी विश्वासू स्थानिक माणूस हाताशी धरा आणि ह्या नकाशाचा अभ्यास करा. झोपेत उठवून विचारले तरी सांगता आले पाहीजे."

"कसला नकाशा आहे हा सर ? " प्रेरकने पहिल्यांदाच तोंड उघडले.

"परराष्ट्र मंत्र्यांच्या दौर्‍याचा नकाशा आहे हा. ते जम्मूला येउन नंतर खोर्‍यात येणार आहेत. राज्यपालांशी भेट आहे त्यांची. ह्या दौर्‍याच्यावेळी काहीही गडबड होता कामा नये. "

आणि मग ते पुढे त्यांना डिटेल माहिती देत होते. दोघांच्याही मनातल्या शंका फिटेपर्यंत संध्याकाळ उलटून गेली होती. आता कॅम्पवर जाउन जेवावे आणि मग थोडा आराम कराव असा विचार दोघांनी केला.

प्रकरण 5

मसूदच्या प्लॅन नुसार त्याच्या टोळीतले निवडक लोक ह्या ऑपरेशन साठी निवडले गेले. त्यांच्या हालचाली सूत्रबद्ध होत्या आणि उद्दिष्टे सुस्पष्ट. त्यांची प्रत्यक्ष काम अंमलबजावणी करणारी टीम अत्यंत छोटी होती. फक्त 4 च जण ह्या ऑपरेशनमधे सहभागी होणार होते. त्यांनी सगळी तयारी केली. नकाशे, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्रात्रे घेतली.

त्यांचा प्लॅन असा होता - काश्मिर खोर्‍यातीलच एका गावात आसरा घ्यायचा. गावात प्रामुख्याने मुसलमानांचीच वस्ती आहे ना हे पहायचे. मग अशाच प्रकारे प्रवास करत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या मार्गाच्या जवळ पोहोचायचे. जिथे परराष्ट्र मंत्र्यांची एक अधिकृत भेट होती त्या भेटीच्या वेळी काही निदर्शने घडवून आणायची आणि त्या गोंधळाचा फायदा घेउन त्या कचेरीवर एक शक्तिशाली बॉम्ब टाकायचा. अशी अगदी सोपी योजना होती. पण वरकरणी सोप्या दिसणार्‍या ह्या योजनेत अनेक गोष्टी होत्या. अवैध मार्गानी काश्मिर खोर्‍यातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानापर्यंत पोहोचणे, त्यानंतर तिथल्या काही पाकिस्तान धार्जिण्या स्थानिक लोकांना निदर्शनांसाठी तयार करणे आणि मग त्या गोंधळाचा फायदा घेउन बॉम्ब स्फोट घडवून आणणे. शिवाय तिथून निसटायचीही योजना होतीच. कारण जरी त्यातले कोणीच मरणाला घाबरणारे नसले तरी त्यांन अजून अशी अनेक कामे करायची होती. त्यांचे हेतू काही उदात्त वगैरे नव्हते त्यामुळे शक्य तितक्या जलदीने तिथून पळून जाउन आपल्या नव्या उद्दिष्टांसाठी मोर्चे बांधणी करणे हेच त्यांचे ध्येय होते. योजना कागदावर कितीही सोपी दिसत असली तरी त्यात प्रत्यक्ष अडचणी अनंत आणि ऐन वेळी उद्भवणारी परिस्थिती कल्पनातीत होती. पण आता ते कशानेही थांबणार नव्हते. त्यांच्या प्रमुखाचा त्यांना हुकूम झाला होता आणि ते कामगिरीवर निघाले होते.

चोरट्‌या वाटांनी प्रवास करत ते 36 तासात काश्मिर खोर्‍यात येउन पोहोचले. हा प्रदेश "आझाद काश्मिर" आणि भारतव्याप्त काश्मिरच्या सीमेवर होता. भारतव्याप्त काश्मिरची राजधानी श्रीनगर फक्त 230 मैलांवर होती. तिथे एक गाव होते छोटेसे "अथमुकाम" नावाचे. हे गाव नीलम व्हॅली च्या जिल्ह्यात येत होते. इथल्या लोकांवर पहिल्यापासून कुणाचेच धड अधिपत्य नसल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याचीच सवय होती आणि नेमका ह्याचाच फायदा पाकिस्तानी गुप्तचर संघटनेने आणि मसूद सारख्या टोळ्‌यांनि घेतला होता. हा प्रदेश भौगोलिक दृष्ट्‌या खूपच महत्त्वाचा होता. इथे राहून आझाद काश्मिरची राजधानी मुझफ्फराबाद इथे संपर्क साधणे अतिशय सोपे होते त्याचप्रमाणे भारतात शिरण्याचा मार्ग ही सोपा, विनारक्षित होता. हा अतिशय दुर्गम प्रदेश शिवाय समुद्र सपाटी पासून 1400 मीटर उंचीवर म्हणून सैन्याचे इथे नाकाबंदी, जागता पहारा करणे अशक्यच होते. अथमुकाम गाव जवळपास सम्पूर्ण मुस्लिम वस्तीचे. त्यात त्यांचे काही साथीदार पूर्वी तिथे राहून गेले असल्यामुळे त्यांना त्या ठिकणी आपल्याला सहानुभूती आहे हे माहिती होते. त्यांनी त्याच गावात आश्रय घ्यायचे ठरवले. सध्या त्यांचा म्होरक्या मन्सूर अहमद होता आणि त्याला ह्या प्रदेशातील लोकांची चांगली ओळख होती.

ते एका मदरशापाशी येउन पोहोचले. ह्या मदरशात जरी वरकरणी 'अलिफ बे' चे पाठ घुमत असले तरी तो अन्य कोणकोणत्या कारणांसाठी वापरला जातो ह्याची त्यांना नीट कल्पना होती. त्या मदरशाला एक तळघर होते आणि तिथे एक अत्याधुनिक असा ट्रान्समिटर होता. वेळप्रसंगी त्याच तळघरात 3-4 लोकांची दोन ते तीन आठवडे लपून रहायचीही सोय होउ शकत होती.
अस्खलित गजरी भाषेत मन्सूरने हाक मारली
"खान चाचा"

त्याचा आवाज ऐकून बर्‍याच वेळानी झोपडीचे दार उघडले गेले. एका दाढी संपूर्ण पांढरी झालेल्या म्हातार्‍याने दार उघडले. कंदिलाच्या उजेडात तो मन्सूर अहमद कडे निरखून पाहू लागला.

"सलाम आलेकुम चाचा, मै मन्सूर अहमद" चाचाला ओळख लागेना तशी मन्सूरने त्याला आठवण करुन दिली.
"अरे बेटा आओ, आओ, कैसे हो ?" असे म्हणत चाचाने त्यांना आतमधे नेले. मुख्य घराकडे न जाता चाचा सरळ तळघराकडेच वळलेला पाहून मन्सूरला आश्चर्य वाटले.

"बेटा, आजकल यहां बहोत खतरा है, इसिलिये" चाचाने जणू त्याच्या मनातली शंका ओळखून त्याला उत्तर दिले.

"चाचा हमे आपकी मदत की जरुरत है..." वेळ अतिशय थोडा असल्यामुळे मन्सूरने सरळ मुद्द्‌यालाच हात घातला. आणि त्याने चाचाला त्याची पूर्ण योजना हलक्या आवाजात समजावून सांगितली. बाकीचे तोपर्यंत चाचाच्या पोराने आणलेल्या खाद्य पदार्थांचा समाचार घेत होते.

"काम तो मुष्किल है बेटा, पर कुछ ना कुछ तो करना ही पडेगा." चाचा सगळे ऐकून घेतल्यावर म्हणाला.
"मै तुम्हे एक दो लडकोंके नाम बता देता हुं. श्रीनगरके नजदिक के गाव के ही है, वह तुम्हारी मदत कर सकते है, उन्हे संदेसा भिजवानेका काम भी अभी किये देता हूं." असे म्हणून चाचाने त्याला स्थानिक लोकांची नावे सांगितली. ती नावे मिळाल्यावर मन्सूरने चाचाला मसूदशी संपर्क साधून आपला पुढला कार्यक्रम त्याला कळवायला सांगितले आणि ते तडक बाहेर पडले.

क्रमशः

वाङ्मयकथाप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

सहज's picture

29 Jun 2009 - 7:37 am | सहज

साधारण किती भाग असतील याची कल्पना दिलीत तर बरे होईल.

क्रान्ति's picture

29 Jun 2009 - 7:56 am | क्रान्ति

खूपच उत्कंठावर्धक झालाय. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jun 2009 - 8:23 am | प्रकाश घाटपांडे

वाचतो आहे. उत्कंठावर्धक!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

29 Jun 2009 - 12:13 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे...
काही तपशील गडबडीचे वाटतात. उदाहरणार्थ -
१. रॉची काश्मीर विंग? शंका आहे. रॉ निखळपण परराष्ट्रांशी संबंधित आहे. काश्मीर विंग असेल, पण ती अंतर्गत मामल्यांत इतकी सक्रिय सहभागी असणार नाही.
२. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची काश्मीर खोऱ्यात भेट असेल तर त्याचा अर्थ काश्मीर प्रश्न सुटलेला आहे असाही निघतो. भारत दौऱ्यात काश्मीर खोऱ्यात भेट म्हणजे भारताचा दावा मान्य व पाकिस्तानचा अमान्य असा त्याचा अर्थ होतो.
३. अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री काश्मीरच्या राज्यपालांना भेटतो हे राजशिष्टाचारात न बसणारे आहे.

सुनील's picture

29 Jun 2009 - 2:40 pm | सुनील

सहमत. ललित साहित्य असले तरी तपशिलातील चुका टाळाव्यात (थोडे होमवर्क करावे!). बाकी कथा बरी वाटते आहे.

अवांतर - २/३ हे शीर्षक काही समजले नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वाचक's picture

29 Jun 2009 - 4:25 pm | वाचक

वर कोणीतरी विचारले होते की किती भाग आहेत ते सांगा म्हणून तसे लिहिले

वाचक's picture

29 Jun 2009 - 4:29 pm | वाचक

वर कोणीतरी विचारले होते की किती भाग आहेत ते सांगा म्हणून तसे लिहिले

वाचक's picture

29 Jun 2009 - 4:16 pm | वाचक

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

पोटापुरता 'रिसर्च' केला आहे (ललित साहित्यासाठी जरुरिचा वाटला तितकाच)
ही लिंक बघा - RAW आणि काश्मिर

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट त्यानंतर पाकिस्तानातही असू शकते, तसे म्हंटलेले नाही कथेत एवढेच

राज्यपालांशी भेट होउ शकते की - मला शिष्टाचाराबद्दल फारशी कल्पना नसली तरी थोडा शोध घेतला होता - ही लिंक बघा

श्रावण मोडक's picture

29 Jun 2009 - 4:56 pm | श्रावण मोडक

वाचले.
तपशिलात इतकी गडबड नाही, जितकी मला आधी जाणवली होती. थोडी आहे, ती ठीक आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्याने तामिळनाडूच्या राज्यपालाला भेटणे वेगळे आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरच्या राज्यपालाला भेटणे वेगळे. रॉच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर लष्कराशी समन्वय ठेवणे हे अजूनही मला गडबडीचे वाटते. अगदी युनिफाईड कमांडमध्येदेखील रॉ इतक्या उघडपणे (म्हणजे कथेतील कल्पनेत देखील) सक्रिय होईलसे वाटत नाही. अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री नंतर पाकमध्ये जाईल हे ठीक आहे. पण तो दोन्हीकडे वादग्रस्त प्रदेशात जाईल असे वाटत नाही. अर्थात, कथेच्या कल्पनेचा आवाका वेगळा आहे असे मानूया.

रेवती's picture

29 Jun 2009 - 4:24 pm | रेवती

वाचतीये. अजून म्हणावा तसा रंग भरत नाहीये.

रेवती