सिव्हिलियन - १

वाचक's picture
वाचक in जनातलं, मनातलं
26 Jun 2009 - 9:04 pm

प्रकरण 1

स्थळः जम्मू खोरे - राष्ट्रीय रायफल्सचा बेस कॅम्प
वेळः सकाळची

श्रेयस आपल्या राहुटीबाहेर गरम ‘कावा’ चे घुटके घेत बसला होता. इथे आल्या पासून त्याला सकाळच्या चहाऐवजी ह्मा गरमागरम कावाचीच सवय लागली होती. सकाळी कडाक्याच्या थंडीत घसा जाळत गरम कावा पोटात गेला की दिवसभराच्या दगदगीला तोंड द्यायला मन कस अगदी तयार व्हायच. कावा पीत असतानाच तो बाहेरच्या रम्य निसर्गाकडे बघत होता. एकेकाळी ‘पॄथ्वीवरचे नंदनवन’ मानले गेलेले हे काश्मीरचे रम्य खोरे आज केवळ लष्कराची एक गंभिर छावणी बनून राहिले होते. जिथे पूर्वी ‘हनिमूनर्स’ ची झुंबड उडायची तिथे आज स्थानिक नागरिकांनाही रहायची चोरी झाली होती.
‘आणि हे सर्व त्या करंट्या पाकिस्तान मुळे..’ श्रेयसनी स्वताशीच दातओठ खाल्ले.

“काय रे कोणावर एवढा चिडला आहेस ? का नविन लग्नानंतर नाईट ड्युटीची ऑर्डर हातात पडल्यासारखा का वैतागतो आहेस ?"
एक स्वच्छ मोकळा आवाज आला आणि श्रेयसनी दचकून त्या दिशेला पाहिले. त्याचा जवळचा मित्र प्रेरक आत येत होता. उंचपुर्‍या प्रेरकला वाकून आत येताना बघून श्रेयसला त्यांचा जालंधरचा ट्रेंनिग कॅम्प आठवला. तिथेच ते एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते आणि लगेचच त्यांची मैत्री ही जमली होती. तिथेच त्यांनी आर्मीतल्या शिस्तित न बसणार्‍या अनेक खोड्याही केल्या होत्या आणि अनेक धाडसी चकमकींमधे भाग घेउन वरिष्ठांचा विश्वासही संपादन केला होता. आणि त्याच विश्वासाचे फलित म्हणून आज ते दोघे ‘जम्मू काश्मिर’ आणि ‘राजस्थान’ सारख्या अत्यंत धोकादायक आणि संवेदनशील प्रदेशात दहशतवादाचा मुकाबला करत होते.

“काय रे, काय म्हणतय राजस्थान ? उंट वगैरे बरे आहेत ना ?”
श्रेयसनी गालात हसत प्रेरकला विचारले. प्रेरक नुकताच राजस्थानच्या पोस्ट वरुन इथे आला होता. त्या आधी त्याच्याकडे राजस्थानच्या बॉर्डर सिक्युरिटीला मदत करायचे काम होते. तिथेही त्याने बराच पुढाकार घेउन हद्दीच्या पलिकडून होणारी शस्त्रास्त्रांची आयात थांबवण्यात बर्‍यापैकी यश मिळवले होते. आणि आता त्याच्याकडे त्याहून कठिण कामगिरी सोपवण्यात आलेली होती.

“तिथले उंट बरे आहेत पण इथे काय सीन आहे ?” प्रेरकनी आल्या आल्या मुद्द्यालाच हात घातला.

“अरे आत्ताच आला आहेस. बस, जॉईन हो आणि मग ब्रिफींग होईलच” श्रेयसनी त्याच्या उत्साहावर लगेच पाणी ओतले.

“ते झालच रे, पण आधी काहीतरी खायला मागव बर, प्रचंड भूक लागली आहे”

श्रेयसनी सेंट्रीला नाश्ता आणायची आज्ञा दिली आणि तो परत प्रेरककडे वळला.

“अरे इथे सगळा गोंधळ आहे, सध्या तो अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री आहे ना दौर्‍यावर आणि त्याच वेळी काहीतरी गडबड करायचा ह्मांचा प्लॅन आहे. अर्थात नक्की काहीच कळलेले नाहीये पण असे काहीही होउ नये म्हणून आम्ही दक्षता घेणार आहोत कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरील इज्जतीचा प्रश्न आहे. आत्ता जर काही गडबड झाली तर आम्ही कुणालाही भीक घालत नाहि असे त्यांना दाखवून देता येईल.”

“पण काही धागेदोरे मिळाले आहेत का ?”

“अरे नाही ना, तिथेच तर गोची आहे, कारण स्थानिक लोकांशी आमचे काही तितके चांगले संबंध नाहीत आणि म्हणूनच जिवाच्या भितीने कोणीही आम्हाला काहीही माहिती द्यायला तयार होत नाहीये.”

“हे सिव्हीलिअन लोक साले सगळे असेच, डरपोक कुठले. साला आम्ही इथे प्राणांची बाजी लावून आपल्या देशकरता शत्रूशी लढतोय आणि ह्मांना साधी माहिती नाही देता येत ?”

“अरे तू एवढा तणतणू नकोस रे, इथली परिस्थिती तुला अजून माहिती नाहीये. इथे सगळ्यांवर खुलेआम अत्याचार झालेत, बायका मुली उचलून नेल्या जात आणि तरुणांचे मॄतदेह गावात वेशीवर टांगले जात दहशत घालण्यासाठी, कोणाची हिंमत होणार ? पण आता परिस्थिती बदलते आहे. लष्कराच्या उपस्थितीने बराच फरक पडतोय.”

“तू काहीही म्हण, पण बहुतेक सिव्हीलिअन हे तसे घाबरटच असतात.”

तेवढ्यात एक सेंट्री आत आला, खाडकन सलाम ठोकून त्याने एक वायरलेसचा कागद श्रेयसच्या हातात दिला.

“चल एक इंपॉर्टंट ब्रिंफिग आहे, हेडऑफिसला जायला हवे, चल आत्ताच जाउ, जाताना तुला बाजारपेठ पण दाखवतो.”
----------------------------------------------------------------------------------------------

प्रकरण 2

स्थळः पाक व्याप्त काश्मिर - ‘आझाद काश्मिर’
वेळः संध्याकाळची

गर्द झाडी सभोवती आणि मधोमध हिरवी राहुटी उभारलेली. राहुटीवर हिरवा चांद तारा झळकत होता. बाजूलाच एका मोठ्या घमेल्याखाली पेटवलेली शेकोटी. इथे बारा महिने थंडी पडते, पीर पांजालच्या अगदी लगतचा प्रदेश हा, फारच दुर्गम, वाटा अशा घनदाट जंगलातून जाणार्‍या, पट्टीच्या वाटाड्यालाही चकवतील अशा, हिंस्त्र प्राणी फारसे नसले तरी विषारी साप आणि विशिष्ट प्रकारच्या विषारी माशांनी भरलेले.

हिरवा गणवेष घातलेला राकट मसूद राहुटीच्या बाहेर अस्वस्थ येरझारा घालत होता. त्याच्या हाताच्या मुठी मधूनच एकमेकांवर अवळल्या जात होत्या. उंचपुरा, राकट, दाढी राखलेला लाल डोळ्यांचा मसूद भयानक चिडलेला होता. हे जे काही चाललेले आहे ते अत्यंत धीम्या गतीने ह्माची त्याला अत्यंत चीड येत होती. पण त्याचे ही हात बांधलेले होते आणि स्वत:च्या ह्माच असहाय्य अवस्थेचा त्याला भयंकर संताप येत होता.

“रशिद, मिटींग बोलाव” कणखर आवाजात त्याने एका दणकट तरुणाला हुकूम सोडला. हा रशिद अत्यंत थंड काळजाचा मारेकरी होता. बंदुकीच्या चापावरचा त्याचा हात कधीही थरथरत नसे आणि अशा ह्मा रशिदला मसूदने कायमचे स्वत:चे गुलाम करुन ठेवले होते. पेशावरच्या तुरुंगात बलात्काराच्या आरोपावरुन खितपत पडलेला रशद मसूदच्या एका शब्दावर सुटला होता आणि गेली 2 वर्षे मसूदच्या भारता विरुद्ध चाललेल्या कारवायांमधे त्याला मदत करत होता.

मसूदचे ध्येय एकच होते, काश्मिरवर हिरवा झेंडा फडकवणे. त्याचे बालपण ह्माच खोर्‍यात गेले होते आणि आता एकसंध अशा काश्मिर खोर्‍याचे भारत पाकीस्तानात तुकडे झालेले पाहून त्याच्या काळजाला वेदना होत होत्या. त्याला पाकीस्तानचे फारसे प्रेम होते असे नव्हे तर केवळ ते मुसलमानांचे आहे म्हणून तो त्यांच्यात सामील झाला होता. त्याची खरी महत्त्वाकांक्षा काश्मिर स्वतंत्रपणे स्थानिक मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आणायची होती. आणि जसा नेमका ह्माच गोष्टीला जसा जसा उशीर होत होता तशी त्याची बेचैनी वाढत होती.

बाजूला हलक्या पावलांची चाहूल त्याने ऐकली आणि मिटींगसाठी सगळे जमल्याची जाणिव त्याला झाली. तो त्यांच्या खास खोलीत गेला. तिथेच सगळे जमले होते. ही खोली अत्याधुनिक अशा उपकरणांनी भरलेली होती. नकाशे, इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग सिस्टीम्स, GPS अशी सगळी लेटेस्ट उपकरणे तिथे मौजूद होती.

त्याने शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज शांत असला तरी तो आतून अत्यंत चिडलेला आहे ह्माची जाणिव सर्वांनाच झाली. पण ते सगळेच अशा प्रकारच्या कामात मुरलेले होते. प्रत्येकाचेच पुर्वायुष्य कुठल्या ना कुठल्या गुन्ह्मांशी संबंधित होते आणि प्रत्येकानेच पैशांशी निष्ठा वाहीलेल्या होत्या. पण मसूदमुळे ते सगळे एका झेंड्याखाली जमलेले होते. त्यांचे ही बालपण ह्माच खोर्‍यात गेले असल्यामुळे मसूदच्या भुलावणीच्या शब्दांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडलेला होता. शिवाय भरघोस रकमेचीही अभिलाषा त्यांना ह्मा कॄत्यात सहभागी व्हायला भाग पाडत होती. आता ते सगळे मसूदच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द झेलायला तयार झाले होते. त्याशिवाय त्यांना पाकिस्तान सरकारचीही प्रचंड मदत होत होती. ISI चे तर असेच उद्दिष्ट होते की जे कोणी भारताविरुद्ध कारवाया करत असतिल त्यांना सर्वतोपरी मदत करायची.

“4 दिवसांनी भारतात अमेरिकेचा एक मोठा परराष्ट्र अधिकारी येतोय. आपल्याला हीच संधी साधायला हवी. ह्मा वेळी त्यांचे नाक चांगलेच कापले गेले पाहिजे. आपल्या कडे तयारीला वेळ फारच थोडा आहे पण ह्मा कामात कोणतीही गडबड होता कामा नये”

पुढचा अर्धा तास तो बोलत होता. त्याने आपली सगळी योजना त्यांच्या मनावर ठसवली. त्याच्या बोलण्यातच अशी काही जादू होती की ते सगळे भारावून ऐकत होते.

“पण ह्मा सगळ्या मागे आपला हात आहे हे त्यांना लगेच कळेल. निदान ते तसे नक्कीच ओरडतील आणि मग जगात आपली उरली सुरली इज्जत ही जाईल आणि सहानुभूती सुद्धा”

ही शंका काढली मन्सूर अहमद ने. मन्सूर हा त्या टोळीत शांत स्वभावाचा पण खतरनाक समजला जाणारा इसम होता. तो फारसे बोलत नसे पण बोले तेव्हा अगदी मुद्द्याचे. शिवाय तो पूर्वी लष्करात इंजिनियर होता. त्यामुळे त्याचे वाचन आणि राजकीय डावपेचांची समजही इतरांपेक्षा बरीच जास्त होती. त्यामुळे मसूदला मन्सूर अहमदच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता आले नाही. सगळे जण त्याच्याचकडे उत्सुकतेने पहात होते. मन्सूर अहमद मात्र शांतपणे हातातल्या बुलेटशी खेळत बसला होता.

“आता मला त्यांच्या संथपणाचा आणि राजकीय डावपेचांचा कंटाळा आला आहे. आपण बरीचे वर्षे वाट पाहिली. पण ह्मा खेळातून काहीच साध्य झाले नाही उलट आपली काही चांगली माणसे मात्र हकनाक मारली गेली. आता बास. आता काय करायचे ते आपण करायचे. त्यांच्या राजकीय चेहेर्‍याशी आपला काहीही संबंध नाही. आपली मोहिम फक्त कॄती करायची आणि लवकरात लवकर आपले हे सुंदर काश्मिर खोरे त्यांच्या ताब्यातून सोडवायचे.”

त्याच्या आवाजातला ठामपणा बघून सगळेच चकित झाले. हा मसूद त्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता. कधी नव्हे ते मन्सूर अहमदने पण मान वर करुन त्याच्याकडे पाहिले. आणि मग मनाशी काही विचार करुन तो स्वताशीच हसला.

क्रमशः

वाङ्मयकथाप्रतिभा

प्रतिक्रिया

रेवती's picture

26 Jun 2009 - 9:13 pm | रेवती

पुढे काय?
सुरुवात चांगली झालीये.
रेवती

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 9:35 pm | छोटा डॉन

रेवतीताईशी सहमत.
वाचतो आहे, पहिला भाग आवडला, पुढचे लवकर येऊद्यात ...

पुलेशु.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

श्रावण मोडक's picture

26 Jun 2009 - 10:09 pm | श्रावण मोडक

उत्सुकता वाढते आहे.
श्रेयसनी ऐवजी श्रेयसने असे करत चला. वाचताना रसभंग होतो.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jun 2009 - 9:52 am | प्रकाश घाटपांडे

श्रेयसनी ऐवजी श्रेयसने असे करत चला. वाचताना रसभंग होतो.

अहो श्रेयसनी म्हन्ने हे बोली भाषेतील आस्तयं. श्रेयसने म्हन्ल कि झाली प्रमान भाषा. हा तृतीया विभक्तीतला नी आहे.. तसेच हा नी एकवचनी आहे. बहुवचनी नाही. तसेच हा नी उभयान्वयी अव्ययही नाही. उदा. तो आणि मी चे तो नी मी. आमी गावाकडून पुन्यात येताना सोबत नी घेउन आलो. तो नी बर्याच लोकान्ला खटकायला लागला.लोक आमाला घाटी म्हनायाला लाग्ले. आता आमच्या नावात च घाट घातलाय त्याला आमी काय कर्नार?आनी नी त काय वाईट आहे हो? अहो तो अवधुत दादाला बी लिटिल चॅम्प्स च गान लईच भारी झाल की नी द्यायला लागायचा. नाही त पोर बी पल्लवी च्या मुखातुन वर्डायची अवधुत दादा नी दे नी ! पन खात्यात नोकरी करताना मेंदु नीट चालण्या साठी तो 'नी' त(विंग्रजी knee) जाउ नये याची लईच काळजी घ्यायला लागायची. जास्त परेड करुन मेंदु नी त जातो बर्का असे शिणीयर मंडळी ट्रेनींग मदी सांगायची. तव्हा आमी हॅहॅहॅ करुन हसायचो.
असो! सबब हा नी आमाला खटकला नाही. उलट जवळचा वाटला. लोकान्ला का खटकतो काय कळानी ब्वॉ! श्रावण दादा आमाला नी ट समजावुन घ्या . तुमचा रसभंग व्हनार नाई.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

स्वाती२'s picture

26 Jun 2009 - 10:18 pm | स्वाती२

पुढील भागाची वाट पाहातेय.

भाग्यश्री's picture

27 Jun 2009 - 8:11 am | भाग्यश्री

मस्तच!
अतिशय वेगळा विषय व उत्कंठावर्धक सुरवात!

http://www.bhagyashree.co.cc/

क्रान्ति's picture

27 Jun 2009 - 6:11 pm | क्रान्ति

१००% सहमत. पुढच्या भागाची उत्कंठा वाढलीय.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

27 Jun 2009 - 9:01 am | विसोबा खेचर

'वाचक' आता 'लेखक' झालेले पाहून संतोष जाहला! :)

छान लिहिता, येऊ द्या अजून...

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jun 2009 - 12:47 pm | बिपिन कार्यकर्ते

कथा आवडते आहे. काहीतरी वेगळेच वाचायला मिळणार आहे... उत्कंठा वाढली आहे. लवकरात लवकर कथा पूर्ण करा.

बिपिन कार्यकर्ते

परंतु मिपावरील गंभीर व संसर्गजन्य अश्या क्रमशः रोगाने बाधित अशी सुंदर कथा.

वेताळ

सुनील's picture

27 Jun 2009 - 6:00 pm | सुनील

वेगळ्या विषयावरील कथा. हा भाग ठीक झालाय पण जरा तपशिलाकडे अधिक लक्ष द्या - स्थळः जम्मू खोरे - राष्ट्रीय रायफल्सचा बेस कॅम्प आणि नंतर पुढील वर्णन काश्मिर खोर्‍याचे, असे नको!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.