इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे.
मला मानवाच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य वाचून सध्यातरी समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बदलून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची भीती आहे.
डॉ. संजय बोरुडे लिखित 'लोकधन' हे पुस्तक मौखिक लोकपरंपरा आणि इतिहास यांचा अनमोल वारसा जपणारे आहे.

मौखिक लोकपरंपरा:यात ओवी, आख्यान, लोककथा, उखाणे, आन्हे (कोडं), कूट,सवाल जवाब ,कलगी-तुरा यांसारख्या मौखिक लोककलांचे सोप्या व संक्षिप्त रूपात वर्णन पुस्तकात आहे.
ओवी: हा छंद ६व्या शतकातील ग्रंथांमध्येही आढळतो. 'विवेकसिंधू' (११८८) हा ग्रंथ याच छंदात रचलेला आहे. यात जात्यावरची ओवी, सावित्रीबाई फुलेंच्या ओव्या, वैधव्य ओव्या, धनगरी ओव्या, डाकची/मतिकाची ओवी (उत्तरक्रियेत गायली जाणारी),मोहिनीराजाच्या ओव्या अशा अनेक रंजक प्रकारांच्या ओव्यांचा समावेश आहे.
स्त्री गीते: गौरी-गणपती सणातील गौरी गीते, काथवट कणा, आणि मंगळागौरीची गीते यांचाही समावेश आहे.
उखाणे ,आन्हे(कोड ) सवाल-जवाब, कलगी-तुरा सारख्या सवाल-जवाब प्रकारांची गमतीशीर उदाहरणे आहेत.
सण आणि लोकपरंपरा:
कोजागिरी, दिवाळी, नवरात्र यांसारख्या सणांच्या लोकपरंपरांचा आढावा घेतला आहे.ज्यात अनेक लोककथा या सणाभोवती कशा आल्या हे सांगितले
दिवाळी: वसुबारस (गाय-गौ-धेनू), धनत्रयोदशी (धन्वंतरी), लक्ष्मीपूजन (अलक्ष्मी-करमूणी) यांमधील देवतांची समुद्रमंथनातून आलेली रत्ने या क्रमाने माहिती दिली आहे,समुद्रमंथन रत्ने दिवाळी सण असा विचार माझ्यासाठी नवाचं होता.
बलिप्रतिपदा: दसऱ्याला पाताळात धाडलेल्या बळीराजा बलिप्रतिपदेला पुन्हा प्रगटणार अशी वदंता होती.तेव्हा हा सण बळी राजाच्या स्वागतासाठी साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, तसेच हा कृषीपरंपरेतील दुःखाचा सण असल्याचेही मत काही प्रवाहात नमूद केले आहे.
इतिहास आणि शेतीचा शोध:शेतीचा शोध आदिमानवाच्या काळात स्त्रीने कसा लावला, याचा एक रंजक संदर्भ आहे. पुरुष शिकारीला बाहेर असताना गुहेत असलेल्या स्त्रियांनी(काहि ,बाळंत ,लेकुरवाळ्या असत) फेकलेल्या फळांच्या बियांपासून झाड तयार होते, हे निरीक्षणाने जाणले आणि शेतीकडे वाटचाल सुरू झाली.
इतर लेख:हलगी, वाघबारस, चिन्हसंकेत, मापनाची साधने, कुलचिन्हे यांसारख्या विविध विषयांवरील लेखांचा समावेश आहे.
लोकपरंपरेतील शब्दांचे अर्थ:
गजी = गजनृत्य
आन्हा = कोडं/आयना
सुंबरान = स्मरण
आख्यान = ओवीतला गद्य भाग
खेडणे = शेती करणे
जित्राब = जनावरे
हलकारे=सांगावा पुढे जाणे
हलगीच्या चाली =कावडीची चाल,कुस्तीसाठी मर्दानी चाल,हलगी आंदोलन
हलगी=कडे,कडेकरी
'The Folk आख्यान'

"लोकधन पुस्तक वाचून लोककला, लोकपरंपरा याविषयी भारावलीच होते.तोच दुपारी ह्यांचा फोन आला, "तिकीटे काढली आहेत, आपल्याला 'The folk -आख्यान' कार्यक्रम पाहायला जायचे आहे. या कार्यक्रमाविषयी मी ऐकलं होत, रील्स पाहिल्या होत्या. म्हटलं चला अजून जाणून घेऊया. तर यूट्युब यातील प्रमुख सूत्रधारांच्या-कलाकारांच्या मुलाखती ऐकल्या.
ऐकूनच थक्क झाले. कारण पुस्तकात वाचलेल्या जवळपास सर्व लोककला, लोकवाद्य वापरुन हा भन्नाट कार्यक्रम या २५ वी तल्या कलाकारांनी भव्य-दिव्य असा तयार केला आहे. विशेष करुन ईश्वर अंधारे' ज्यांनी सर्व कार्यक्रमाचे लेखन केले आहे, त्यांचेही (MSC. Electronic) मी शिकले त्याच New Arts, commerce & science महाविद्यालयात शिक्षण झाले आहे. याच महाविदयालयाच्या आणखीन एका विद्यार्थ्याने आधीच महाराष्ट्र- मराठी सिनेमाला एक नवी दृष्टी-वाट दिली - ते नागराज मंजुळे.आणि या कार्यक्रमाची संगीतकार जोडी हर्ष-विजय यातील हर्ष हे सासरच्या मूळगावाच्या शेजारच्याच गावचे म्हणजे 'उम्मापूस्चे' (बीड) आहेत. त्यामुळे अजून जवळीक वाटली :)
तर या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यात लोकपरंपरेतील प्रसिद्ध, लोकप्रिय गीते वापरुन कार्यक्रम केला जात नाहीतर ईश्वर अंधारे यांनी स्वतः नव्याने रचलेले आणि लोककलेचे विविध प्रकार असलेले गीतप्रकार सादर केले आहेत..
सादर केलेले गीतप्रकार:
आवतन, पालखी पलंग, आराधना गीत, अभंग, ओवी, सुंबरान, गवळण, घाटोळी,पोवाडा, कोड-कूट, भारुड, वाघ्या मुरळी गीत, नमन गण,गोंधळ यांसारखे विविध गीतप्रकार सादर केले आहेत
लोकवाद्यांची जुगलबंदी (तालकचेरी):यात महाराष्ट्रातील लोकपरंपरेतील अनेक लोकवाद्यायची जुगलबंदी -तालकचेरी ऐकतांना अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय शहत नाही, संबळ, पखवाज, ढोलकी, हलगी, तुणतुणे, घुंगूर, टाळ-चिपळ्या, पायपेटी ,बासरी, झांज, मृदंग, डफली, मादळ, तारपा, ताशा, मंजीरा यांसारख्या अनेक लोकवाद्यांची तालकचेरी (जुगलबंदी) रोमांचक अनुभव देते.
ओवी सादर करताना गायिकांचा आवाज 'काळजाला हात घालतो.'
सद्यस्थितीवरील भाष्य:
कार्यक्रम कीर्तनकार , शाहीर, पोतराज, वासुदेव, बहुरुपी, गोंधळी, लावणी कलाकार यांसारख्या लोककलावंतांच्या सद्यस्थितीवर भाष्य करतो.महाराष्ट्राची अस्सल 'लोक' कला संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, याबद्दल प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालतो, ज्यामुळे कार्यक्रम भावूक आणि विचार करायला लावणारा ठरतो.
एकूणच, 'लोकधन' पुस्तक आणि 'The Folk आख्यान' कार्यक्रम, दोन्ही महाराष्ट्राच्या मौखिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करतात
-भक्ती
आता पुस्तकातील काही आन्हे विचारते ,काही शब्द अपशब्द वाटतात पण ती बोलीभाषा आहे ,पण उत्तर अश्लाघ्य नाही.
१. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही.
२. माड्यावर माड्या छत्तीस माड्या, हात नाही परत तर बोंबल भाड्या..
३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट
४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी
५. केशेरावाचा घोडा बोटेरावने नेला, तळी मुक्काम केला, नखरड्याने जीव घेतला.
६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली.
७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी
८. चुलीत गेली अन् गर्भार झाली..
९. एवढीशी सकू, तिला काजळ कुंकू
१०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई
११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई
१२. सुपात लाह्या त्यात रुपाया
१३. तीन लाकडं आणि अकरा माकडं
प्रतिक्रिया
17 Nov 2025 - 1:17 pm | सुक्या
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही.
17 Nov 2025 - 3:56 pm | Bhakti
हो 'Folk लोक' हा वेगळा कार्यक्रम तर 'folk प्रबोधन' हा एक तिसराच कार्यक्रम आहे.आता त्यांच्यापण रील्स पाहिल्या फॉरमॅट तिन्ही कार्यक्रमांचा सारखाच वाटत आहे.
पण The folk आख्यान व या दोन कार्यक्रमांचे निर्माते वेगवेगळे आहेत
17 Nov 2025 - 1:18 pm | सुक्या
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही.
३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट --> नारळ
४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी --> मका
17 Nov 2025 - 4:20 pm | स्वधर्म
नक्की बघणार आहे.
भारतातली सगळीकडची तरून मुले मुली टेलर स्विप्ट, के पॉप, योयो हनिसिंग किंवा संजय राठोड यांच्या रॅप आणि पॉपच्या धुनीत असताना असा कार्यक्रम बसवणे आणि तो इतका यशस्वी होणे हेच एक आश्चर्य आहे.
19 Nov 2025 - 1:38 pm | अनामिक सदस्य
या आश्चर्य वाटण्यातून हुश्शार प्रगल्भ लोक काही समजून घेत आहेत का? का नेहमीप्रमाणे तरूण पिढीला बोलून मोकळे?
एखादी गोश्ट जबरदस्ती, समजत नसताना, (कित्येकदा सान्गणार्यलाही समजत नसताना) कुठलाही सन्दर्भ नसताना मारून मुट्कून का करावी?
पण तीच गोश्ट, जर समजाऊन सान्गून, सन्दर्भ देऊन, आम्ही कसे भारी तुम्ही कसे नालायक असा आव न आणता सान्गितली तर "हल्लीची तरूण पिढी" सुद्धा ऐकते याचे उदाहरण म्हणून याकडे बघताय का?
तरी बर कार्यक्रम करणारे २५ तील तरूण आहेत.
घ॑रातल्या लहान मुलाला, ज्याला इतर वेळेला रात्री जागरण केले तर ओरडले जाते, अश्या मुलाला देवाचे आहे म्हणून किन्वा करायचे असते म्हणून जागरण गोन्धळाला बसवले तर ते कन्टाळणारच ना?
मला स्वतहाला ताल वाद्यान्चे प्रचन्ड आकर्शण आहे. पण घरात देवीच्या नावाने गोन्धळ घातला जात असाताना तो सगळा धूर नाका डोळ्यात जात असताना तिथे जबर्दस्ती का बसून रहायचे हेच कळत नव्हते. अशा वेळेला तिथे ताल वाद्य कुठले वाजतेय याकडे लक्श जाईल का?
ते एक वाद्य आहे आणि त्याचा आनन्द घेता येऊ शकतो हे कधी जाणवलेच नाही.
तरूण पिढीला बोलताना, तुम्ही स्वतहा किति जुन्या गोश्ती करत आहात, साम्भळून ठेवत आहात? का नवीन गोश्ती टाळत आहात?
तरूण पिढीशी नाव न ठेवता, अक्कल शिकवण्याचा आव न आणता सम्वाद साधताय का?
उस्ताद जाकीर हुसेन यान्चा एक विडीओ बघितला होता. त्यान्ची मुलाखत घेनारी बाई अशीच हल्लीच्या तरूण पिढीबद्दल बोलत होती. पण त्या माणसाने ठामपणे तिचे म्हणणे खोडून काढ्ले. त्यान्नी सान्गितले की मला स्वतहाला अशी अनेक तरूण मुले माहीत आहेत ज्यानी भारतीय शास्त्रीय सन्गीताला वाहून घेतले आहे. मी स्वतहा तुम्हाला त्यान्च्याकडे घेऊन जातो. पण याला तिची तयारी नव्हती.
19 Nov 2025 - 4:51 pm | स्वधर्म
आपला संपूर्ण प्रतिसाद हा
माझा प्रतिसाद तरूण मुलांवर टिका करणारा होता या समजातून लिहिलेला आहे. पण तसे म्हणायचे नव्हते.
केवळ सध्याचा मला जाणवणारा तरुण मुलांचा ट्रेंड हा बराचसा पॉप रॅप इ. कडे असताना हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा आनंद सांगितला होता.
त्यामुळे 'अक्कल शिकवणे' वगैरे कांगावा विनाकारण आहे.
19 Nov 2025 - 7:06 pm | अनामिक सदस्य
माझा गैरसमज झाला असेल, तुमचा उद्देश तसा नसेल, नसेल तर चान्गलेच आहे.
पण यात कांगावा काय होता?
17 Nov 2025 - 5:03 pm | कर्नलतपस्वी
पुण्यात जर कार्यक्रम झाला तर नक्कीच बघणार.
माझ्या लहानपणी आमच्या घरी चुल,बंब, उखळ,जाते,खलबत्ता,पाटा वरवंटा आडकित्ता अशा अनेक वस्तू वापरात होत्या. आमच्या आजीने अरूंद तोडाच्या (मध्यमा आत जाईल एव्हढे लहान तोंड) चौकोनी बाटलीत लाकडी पायाचा पलंग त्याच्यावर गादी ,गादीवर बाहुली आणी त्याच्यावर हांड्यांझुबंर लटकलेले छत विणले होते. ती बाटली आजही आमच्या आजोळी आहे. मामाच्या मुलांना किती सांगीतले की संग्रहालयात द्या ऐकत नाही. एव्हढी अप्रतिम कलाकृती प्रसिद्धीवीना नष्ट होत चाललीय याचे वाईट वाटते.
माझी आई, मावशी ओव्या,उखाणे,वाळवणाची गाणी म्हणताना ऐकले आहे. काही कोडी आजही लक्षात आहेत.
१. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही.
सुर्य
६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली.
पणती
७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी
चुल
८. चुलीत गेली अन् गर्भार झाली..
भाकरी
१०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई
मोटरगाडी
११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई
सुई
अफलातून होते आपले पूर्वज. अनेक अद्भुत गोष्टी पारतंत्र्यामुळे नष्ट झाल्या.
मुठभर मियाँ त्याला हातभर दाढी.....???
आजच्या शहरातील पिढीला नाही सांगता येणार.
आणखीन काही आठवले तर परत येईन.
लेख आवडला,धन्यवाद.
17 Nov 2025 - 5:37 pm | Bhakti
अय्यो भारीच!
अजून काही पर्यायी उत्तरं ;)
१. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही.
नारळ
६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली.
शेंबूड (यक् ;))
७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी
सहाण
१०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई
घंटा
17 Nov 2025 - 5:07 pm | कर्नलतपस्वी
आढ्यावर मढं मढ्याला पाय......
17 Nov 2025 - 5:41 pm | Bhakti
The folk आख्यानाने त्यांची गाणी प्रसिद्ध नाही केली.लोक मोबाईल शूट करतात ही बाब वेगळी!पण हा अभंग त्यांच्या युट्यूब चॅनलवर आहे.कमाल..कमाल गीत आहे.
https://youtu.be/OCmUqw8CDMk?si=1xMY7V9Fd8qo708_