माझी मदतनीस..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
10 Mar 2025 - 11:41 am

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात.

माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते. माझी नोकरी धावपळीची, धकाधकीची, शिफ्ट ड्यूटीवाली. अशा धकाधकीच्या आयुष्यात मदतनीस बाई ही किती आधार देणारी असते हे नोकरी करणारी स्त्रीच जाणे. मी माझ्या मदतनीस बाईला सांभाळून घ्यायची. तिला व्यवस्थित,इतर ठिकाणी तिला मिळणाऱ्या पगारापेक्षा थोडा जास्तच पगार द्यायची. दिवाळीला बोनस, मिठाई द्यायची. वर्षातून एकदा चांगली साडी घेऊन द्यायची. वेळोवेळी उसने पैसे द्यायची. त्यातल्या काहीजणी प्रामाणिकपणे ते पैसे स्वतःहून आणून परत करायच्या.

मी त्यांना महिन्यातून दोन दिवस सुट्टी देत असे. पाहुणे आले आणि त्यांना जास्त काम पडलं तर त्याचे जास्तीचे पैसे द्यायची. अधुनमधून त्यांची, त्यांच्या घरच्या मंडळींची,मुलाबाळांची चौकशी करायची. एवढं कशाला तर त्यांच्या वाढदिवशी लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा आणि लहानशी भेटवस्तू द्यायची.

अधुनमधून माझ्या घरची मागच्या पिढीतील माणसं,"तू तिला डोक्यावर बसवून ठेवलं आहेस", असं म्हणायची.

"जास्तीच्या कामाचे वेगळे पैसे कशाला देतेस? आमच्या मोलकरणी एक कप चहा आणि दोन शिळ्या पोळ्या खायला दिल्या की सगळे माळे साफ करून देतात.", असंही मला ऐकवलं जायचं. पण मला ते अन्यायकारक वाटायचं.

एकूण काय तर माझ्या मदतनीस माझ्याकडे वर्षांनुवर्षे टिकत असत.

आज आता मी ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. इतक्या वर्षांत मी अनेक मदतनीस अनुभवल्या. आणि माझ्या अनुभवावरून सांगते की या तथाकथित "कामवाल्या बायकां"मध्ये खूप बदल झालाय. आता माझ्याच मदतनीस तरुण मुलीचं एक प्रतिनिधी म्हणून मी उदाहरण देते. थोड्या फार फरकाने तशाच इतरही "कामवाल्या"आहेत असं आढळून येतं.

माझी मदतनीस अतिशय नीटनेटकी आहे. कामावर येताना ती कधीच गबाळ्यासारखी येत नाही.ती चांगल्या साड्या नेसते. पदर व्यवस्थित पिन अप करते.

गळ्यात मंगळसूत्र, त्यातल्या वाट्या तिनं पैसे साठवून सोन्याच्या करून घेतल्या आहेत. मंगळसूत्रासोबत गळ्यात एक बारीक मण्यांची ठसठशीत माळ ती घालते. कुंकू बारीक पण स्पष्ट दिसेलसं. हातांत नाजुक काचेच्या बांगड्या. त्या बांगड्यांच्या पुढे मागे सोनेरी वर्खाच्या बांगड्या. ब्लाऊज नीट,फिट बसणारा. उगीच गळा उतरलाय, उचलला गेलाय असं नाही. सडपातळ बांधा. तेजस्वी काळी कांती. दात शाबूत. शुभ्र पांढरे.

तिच्या घरात टीव्ही आहे, फ्रीज आहे.वाॅशिंग मशीन आहे. सर्व सेकंड हॅंड आणि हप्त्यावर घेतलेलं. ती हौशी आहे. गावात दर मंगळवारी बाजार भरतो. तिथं दमली भागलेली असूनही जाते. उत्साहानं बारीक सारीक खरेदी करते. मुलांसाठी स्वस्तातल्या वस्तू आणते. मीही तिला पूर्वी त्या बाजारातून नाडी बंडल, रुमाल असं काहीबाही आणायला सांगायची. आणि पैसे किती झाले विचारलं की म्हणायची "आई,राहू दे." मग मी तिला काही आणायला सांगेनाशी झाले.

ती सहसा आजारी पडत नाही. खूप ठिकाणी कामं करते. का तर तिला तिच्या मुलाला आणि मुलीलाही शिकवायचं आहे. तिचा मुलगा आणि मुलगी शाळेत जातात. तीही सातवीपर्यंत शिकलेली आहे. ती आपल्या मुलीला कुणाकडेही घरकामासाठी पाठवत नाही.

ती मला एकदा म्हणाली,"जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या वाट्याला नको. मी तिला शिकवणार. ती शिकेल तेवढं शिकवणार. ती चांगली नोकरी करु दे. पैसे मिळवू दे. म्हणजे तिच्या सासरी तिला किंमत राहील. तिच्या साठी चांगला नवरा बघेन. दारू पिणारा नवरा नको. मुलाला पण शिकवेन. त्या दोघांसाठी तर मी इतकी कामं करतेय. आई, तुमचं काम चांगलं आहे. माझं काय चुकलं तर मला समज द्या. पण मला कामावरून काढू नका. माझ्या प्रपंच्यात तुमच्या पगाराची मदत होते. मी आणखी पण दोन कामं जास्त धरेन. पण पोरांना नीट मोठं करीन."

आपल्या अपत्यांविषयी हीच भावना आज प्रत्येक "कामवाली"मध्ये दिसते. त्या आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षित आणि सुखी भविष्याचा तर्कशुद्ध विचार करतात.

आत्ताच्या कामवाल्या शिळं , उरलेलं अन्न घरी घेऊन जात नाहीत. आपले जुने, फाटके कपडे स्वीकारत नाहीत.
घरातल्या बाथरूम्स धुतात पण कमोड साफ करायला नकार देतात. कुठेतरी स्वाभिमानाची जाणीव वाढते आहे.

माझ्या मदतनीस बाईला मी शिळं अन्न कधीच दिलं नाही. घरात काही विशेष पदार्थ बनवला असेल तर तो मी तिला आवर्जून खायला देते. तिच्या डोकं दुखणं सारख्या साध्यासुध्या आजारांवर माझ्या फर्स्ट एड किट मधली औषधं देते. या माझ्या वागणुकीतून तिचं माझं एक प्रेमाचं नातं तयार झालं आहे.

हे सगळं पाहून वाटतं की हा तळागाळातील समाज बदलतोय. आपण या बदलाचं स्वागत करुया. आणि त्याला गती यावी म्हणून यथाशक्ती मदत करुया.

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

10 Mar 2025 - 3:15 pm | विजुभाऊ

बरोबर आहे.
मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे.
जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही.

बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

Bhakti's picture

10 Mar 2025 - 5:28 pm | Bhakti

खुप छान विचार आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Mar 2025 - 12:08 am | अमरेंद्र बाहुबली

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात.
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.

शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं.
आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ?
शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2025 - 2:36 pm | प्रसाद गोडबोले

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी .

दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही.

दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे.

दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे .

उगाच दारूला बदनाम करू नका.

- सुधाकर
संस्थापक अध्यक्ष
तळीराम फॅन क्लब
आर्य मदिरा मंदिर

=))))

{हलके घ्या. विनोद आहे =))))}

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Mar 2025 - 2:44 pm | अमरेंद्र बाहुबली

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात!
- दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2025 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले

संसारा उध्वस्त करी दारू l
म्हणून संसार नका करू ll

=))))

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Mar 2025 - 7:39 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

विजुभाऊ's picture

12 Mar 2025 - 9:48 am | विजुभाऊ

छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते

आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत.
कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते.
पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

https://www.aksharnama.com/client/article_detail/7443
हा सिनेमा पहायला मिळाला, तर अवश्य पाहायचा विचार आहे.

Bhakti's picture

11 Mar 2025 - 8:55 am | Bhakti

नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :)
पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे.
पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2025 - 11:25 pm | प्रसाद गोडबोले

लेख आवडाला !

आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे !

ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे !

अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत ,

अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही !

:)

समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे.

त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2025 - 2:41 pm | प्रसाद गोडबोले

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

साधी गोष्ट होती:
मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.'

हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच!

बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Mar 2025 - 7:39 pm | अमरेंद्र बाहुबली

खर आहे!

गवि's picture

11 Mar 2025 - 8:36 pm | गवि

कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा

कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी.

आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही.

इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

आले लक्षात. गोडबोल्यांना उद्देशून आहे तर. आता ते राम म्हणून थांबतील की कसे ते बघणे रोचक ठरेल. ;-)

प्रसाद गोडबोले's picture

12 Mar 2025 - 1:45 am | प्रसाद गोडबोले

राम राम गवि !

त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =))))

ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते .
अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे !
हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे !
मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत !

ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! !
हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे !

रामो विग्रहवान धर्म :
_______________________________________

पण असो.
ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे !

कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =))))

तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =))))
लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =))))

Samant

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Mar 2025 - 7:32 am | अमरेंद्र बाहुबली

लाल सलाम! जय ब्लादिमिर इल्याइच लेनिन!
जय मार्क्स!
कॉम्रेड चंसुकु कुठायत? :)

>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =))))
>> ज्याला कळतं त्याला कळतं !

शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले.
... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी
ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी
चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला
उजवली.
हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर.

अंतू बर्वा काय म्हणतो?
..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं?
धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन
गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’
ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील
अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का?
शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी
याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं?
* * *
अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच
प्रखर आहेत.

कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का?
इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर
कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा
डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का?

पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून
बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.

मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

प्रसाद गोडबोले's picture

13 Mar 2025 - 10:38 am | प्रसाद गोडबोले

त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.

मी तेच करतो हो आता .
तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll

मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात,
का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =))))

मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =))))

बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही.

असो. चालू द्या तुमचं.

बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l
ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll
अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही.
आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत .

राम

स्वधर्म's picture

15 Mar 2025 - 8:03 pm | स्वधर्म

>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली.
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू.

>> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का?
इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर
कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा
डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का?

याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

प्रसाद गोडबोले's picture

16 Mar 2025 - 4:49 pm | प्रसाद गोडबोले

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))

जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती

आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही !

बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ?
मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे.

अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =))))
तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत !
जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789"
मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही .

आता बास =))))

धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =))))

संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

स्वधर्म's picture

17 Mar 2025 - 6:21 pm | स्वधर्म

.

बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.

शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.

ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

प्रसाद गोडबोले's picture

13 Mar 2025 - 12:38 pm | प्रसाद गोडबोले

ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.

कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही .

एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ?
कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे .
असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे.

आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच !

आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर

तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा

अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !)

ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed !

असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

स्वधर्म's picture

15 Mar 2025 - 7:44 pm | स्वधर्म

तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली.

कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे.

कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

असे माझे मत आहे.
विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या
प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला.

माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे.

असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे.

सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी.

माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले.
प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात.

तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन,
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

13 Mar 2025 - 12:44 pm | प्रसाद गोडबोले

यावत्चंद्रदिवाकरौ

तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Mar 2025 - 5:11 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

कशी मिटवणार?

एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

स्वधर्म's picture

15 Mar 2025 - 7:53 pm | स्वधर्म

तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे.
सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला.

माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही.

यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो.

वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते.

ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

घरची कामं करणाऱ्या बायका चांगलं वागवलं गेलं नाही तर काम सोडतात.

त्या बायका निदान कम सोडणे हा ऑप्शन तरी असतो.
कित्येक नवरे बायकोला गुलाम समजतात. तीला बिचारीला तेवढाही हक्क नसतो.

सुबोध खरे's picture

12 Mar 2025 - 7:53 pm | सुबोध खरे

मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते.

त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे.

आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले.

उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले.

वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली.

एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो.

संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले.

अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते.

आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2025 - 12:44 pm | प्रकाश घाटपांडे

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.

समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

कर्नलतपस्वी's picture

13 Mar 2025 - 3:05 pm | कर्नलतपस्वी

काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो.

परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात.

विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते.

झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात.

आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत.

मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात.

हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कर्नलतपस्वी's picture

13 Mar 2025 - 3:11 pm | कर्नलतपस्वी

कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

प्रसाद गोडबोले's picture

13 Mar 2025 - 3:29 pm | प्रसाद गोडबोले

कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत.
पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ?

एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही.

साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही.

असो.
अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष !

आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो.

:)

धर्मराजमुटके's picture

14 Mar 2025 - 6:19 pm | धर्मराजमुटके

आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध.
आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या.
आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि
कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Mar 2025 - 6:21 pm | अमरेंद्र बाहुबली

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि
कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

खिक्क!

विअर्ड विक्स's picture

14 Mar 2025 - 7:44 pm | विअर्ड विक्स

नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे.

बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात.

या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे.

https://www.misalpav.com/node/52806

सर्वांचे आभार..