पावसाचं वय....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
16 Aug 2023 - 8:38 pm

मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत
तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत
तड तड ताशा,मोत्याच्या माळा
सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा?

भिरभीर डोळे, संतत धार
रस्त्यातले डबके,आईचा मार
भिजलेलं डोकं,कागदी होड्या
सांग ना रे पावसा वय तुझं गड्या?

मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर
मातीला गंध,हिरवळ दूरदूर
छत्रीतलं भिजणं,भेटीची सय
सांग ना रे पावसा काय तुझं वय?

उरात उर्मी,अंगात गर्मी
सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ
रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय
सांग ना रे पावसा तुझं काय वयं?

स्टिलचे पेले,सीलबंद बाटली
पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली
आजुन कसा आला नाही (मित्र)
खड्डय़ात पडला का काय!
सांग ना रे पावसा तुझं वय काय?

डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर
हातात पुस्तक,मनात हुरहूर
"घेतां ना चहा !",बहुतेक कान वाजले
सांग ना रे पावसा अजून किती राहिले!

जीवनमनकवितामुक्तक

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

17 Aug 2023 - 3:46 am | चित्रगुप्त

मजेशीर मस्त कविता. यमकं बिमकं पण छान जुळत आहेत. अवघ्या सहा कडव्यात 'तोंडात अंगठा' पासून 'डोळ्यावर चष्मा' पर्यंतचा 'वर्षा-प्रवास' हळुवार समर्थतेने मांडणे थोरच. फक्त -

स्टिलचे पेले,सीलबंद बाटली
पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली
आजुन कसा आला नाही (मित्र)
खड्डय़ात पडला का काय!
सांग ना रे पावसा, तुझं वय काय? ---
--- या कडव्यात चाराऐवजी पाच ओळी आल्याने जरा विचित्र वाटते आहे. हे बघा कसे वाटते:

व्हिस्कीची बाटली, चकण्याची ताटली
मित्राची संगत, त्याविना नाय गंमत
खड्डय़ात पडला का काय!
सांग ना रे पावसा, तुझं वय काय?

(या शिवाय आणखी एक)
"घेतां ना चहा !" शब्द कानी आले
सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Aug 2023 - 11:49 am | राजेंद्र मेहेंदळे

शैशव ते वार्धक्य हा प्रवास उत्तम रितीने मांडला आहे.

रच्याकने---आजुन कसा आला नाही (मित्र),खड्डय़ात पडला का काय! ही एकच ओळ धरल्यास म्हणताना खटकत नाहीये.

डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर
हातात पुस्तक,मनात हुरहूर ....

अश्या 'संध्याछाये'नंतर - "सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!" असा शेवट कमालीची हुरहुर लावून जातो. कोटि कोटि प्रणाम.

कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय.

नमस्कार.

कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय.

-- हे तर फारच र्‍हदयस्पर्शी आहे. पूर्ण कविता यामुळे एका वेगळ्याच आयामात पहुचली आहे. अशा अर्थाचा 'कान वाजणे' असा खास वाक्प्रचार आहे का ?

कर्नलतपस्वी's picture

17 Aug 2023 - 8:32 am | कर्नलतपस्वी

भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.

वैवैद्यकशास्त्रात या त्रासाला इंग्रजीत 'टिनिटस' असे म्हणतात. कानात येणारा आवाज दोन प्रकारचा असतो- सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह आवाज म्हणजे जो केवळ रुग्णाला ऐकू येतो. तर एखाद्या व्यक्तीच्या कानातील दुसऱ्या व्यक्तीलाही ऐकू येणारा आवाज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह.

भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.

हे वाचून आठवले, की माझ्या एका मित्राची पत्नी निवर्तल्यावर तो एकटाच रहायचा, अणि दिवंगत पत्नीशी बोलत रहायचा. ती त्याला अमूक करावे तमूक करावे सांगायची, त्याप्रमाणे तो करायचा, असे खुद्द त्यानेच सांगितले होते.
-- मला स्वतःला एका प्रसंगी असे काही शब्द अगदी स्पष्ट खणखणीत रूपात कानावर पडलेले असल्याचे आठवते. (तो प्रसंग फार वेगळा, एकमेवाद्वितीय असा होता)
मात्र 'टिनिटस' हा प्रकार वेगळा असतो. ही व्याधि मला अनेक वर्षांपासून आहे. अगदी आत्ता हे लिहीताना सुद्धा विशिष्ट आवाज कानात गुंजत आहेत.

प्रचेतस's picture

17 Aug 2023 - 10:51 pm | प्रचेतस

सुंदर. आयुष्याचा प्रवास नियमित येणाऱ्या पावसाच्या संगतीने सुरेख मांडलाय.

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:14 am | रंगीला रतन

आवडली!

शेखरमोघे's picture

18 Aug 2023 - 8:09 am | शेखरमोघे

कविता आवडली. प्रत्येक कडव्याचा "सांग ना रे पावसा काय तुझं वय?"ने होणारा शेवट, पण कवितेचा शेवट मात्र "सांग ना रे पावसा अजून किती राहिले!" हे चटका लावणारे वास्तव छानच.

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2023 - 12:20 pm | कर्नलतपस्वी

प्रतीसादक आणी वाचकांचे आभार.

शेखर भौं नी कायप्पावर हांक(काॅल) मारून कवीता आवडल्याबद्दल सांगीतले. आनंद द्विगुणित झाला. त्यांचे विशेष आभार. क लो आ

नि३सोलपुरकर's picture

18 Aug 2023 - 1:13 pm | नि३सोलपुरकर

काकानु , कविता आवडली .

__/\__

बाजीगर's picture

18 Aug 2023 - 3:45 pm | बाजीगर

वेगळी आणि आयुष्याचे सर्व टप्पे कव्हर करणारी 'पाऊस-कविता'.

यमकं खूप सुंदर घेतली आहेत.
खूप आवडली हि कविता कर्नलजी.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2023 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा

मजा आया !

कर्नलतपस्वी's picture

20 Aug 2023 - 7:44 pm | कर्नलतपस्वी

नि३, अतृप्त आत्मा(बादवे सर्वांचाच असतो),बाजीगर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Aug 2023 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार

एका हातात किरण्याच्या पिशव्या
दुसरा हात पकडून रडणारे कारटे
तुझ्याच धुंदीत कधीतरी जूळले तिचाशी नाते
आठव रे पावसा ते साल कोणते होते?

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

20 Aug 2023 - 10:16 pm | कर्नलतपस्वी

ज्याची जशी असते सय
तसं पावसाचं असते वय......

धन्यवाद.

सौन्दर्य's picture

21 Aug 2023 - 8:21 am | सौन्दर्य

कविता आवडली, जीवनाच्या विविध टप्प्यावरचे वर्णन आवडले.

असेच लिहीत रहा.

चांदणे संदीप's picture

21 Aug 2023 - 2:46 pm | चांदणे संदीप

कर्नलसाहेब, कविता आवडल्या गेली आहे. :)

सं - दी - प

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Dec 2023 - 12:59 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त कविता.

कर्नलतपस्वी's picture

26 Dec 2023 - 2:07 pm | कर्नलतपस्वी

मनापासून आभार.