बौद्धधर्मप्रसारक... भाग-६ शेवटचा.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 7:10 pm

‘‘ फो ’’

बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बौद्धधर्मप्रसारक... भाग-१
बौद्धधर्मप्रसारक... भाग-२
बौद्धधर्मप्रसारक... भाग-३
बौद्धधर्मप्रसारक... भाग-४
बौद्धधर्मप्रसारक... भाग-५

चीनी बुद्धाची प्रतिमा..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बौद्धधर्मप्रसारक... भाग-६

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

" मी मागे वळून बघतो तेव्हा मी ज्या प्रसंगातून गेलो ते आठवून मलाच घाम फुटतो. कल्पना करता येणार नाही अशा संकटाना तोंड देत मी अनेक खडतर मार्गाने धोकादायक जागी प्रवास केला. हे करताना मी कधीच स्वत:च्या प्राणाची पर्वा केली नाही कारण माझ्यासमोर एक निश्चित ध्येय होते. व ते साध्य करण्यासाठी मी सरळमार्गांचाच वापर केला.... जे मला मिळवायचे आहे त्याच्या दहा हजाराव्वा हिस्सातरी मिळेलच अशा आशेने मी ज्याठिकाणी मृत्यु अटळ आहे अशा ठिकाणीही त्याला मोठ्या धैर्याने सामोरा गेलो......
....फा-शिएन.

फा-शिएनचे हे वाक्य भारतीय पंडितांनाही लागू पडते.

५५७ साली भारतातून चार पंडीत चीनला पोहोचले. म्हणजे निघाले होते दहा पण त्यातील चार जण जिवंतपणे चीनला पोहोचले. त्यांची नावे होती –
१ ज्ञानभद्र २ जिनायास्स ३ यशोगुप्त आइ ४ जिनगुप्त. पहिले दोन शेवटच्या दोघांचे आचार्य होते. वर म्हटल्याप्रमाणे या चौघांनी दहाजणांचा एक चमू तयार केला व चीनसाठी प्रस्थान ठेवले. ज्ञानभद्राने चीनमधे आल्यावर विशेष कार्य केलेले आढळत नाही. त्याने फक्त एकाच ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले ते म्हणजे पंचविद्याशास्त्र. यात त्याने त्याच्या शिष्यांची मदत घेतली अशी नोंद चीनी इतिहासात आढळते.

जिनयास्स : आचार्य जिनयास्सांनी त्यांच्या शिष्यांच्या मदतीने सहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील फक्त दोन ग्रंथांची नावे सध्या ज्ञात आहेत. १ महामेघसूत्र २ महायानाभिस्मय सूत्र. यशोगुप्ताने आपल्या आचार्यांच्या हाताखाली दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ अवलोकितेश्र्वरासमुखाधारिणी हा भारताच्या कुठल्या भागातून गेला होता ते कळत नाही. तो जेथून आला त्याचे नाव चीनी इतिहासात लिहिले आहे, पण हे ‘यिऊ-पो’ कोठे आहे हे समजत नाही.

शेवटचा पण महत्वाचा पंडीत आहे – जिनगुप्त किंवा ज्ञानगुप्त.

जिनगुप्त
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या पंडितांबद्दल माहिती मिळते ती ताओ-सिआन नावाच्या लेखकाने ६५० साली प्रकाशित केलेल्या एका ग्रंथात. या ग्रंथाचे नाव आहे सियु-काओ-सेंग-चाऊआन. इतर ग्रंथांतून माहिती गोळा करुन त्याचे चरित्र लिहिले असा उल्लेख त्याने त्या ग्रंथात केला आहे. म्हणजे हा पंडीत महत्वाचा असला पाहिजे. जिनगुप्तांनी एकूण ३६ ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील सगळ्यात महत्वाचे आहेत बुद्धचरित व सद्धर्मपुंडरिकासूत्र. बुद्धचरित लिहून त्याने कुमारजीव आणि इतरांबरोबर स्थान मिळविले असे म्हणायला हरकत नाही. हा अफगाणिस्तानमधील (सध्याचे पाकिस्तान) पेशावरचा एक श्रमण होता. त्याच्या घराण्याचे नाव होते कंभू. जातीने हा क्षत्रिय असून त्याच्या वडिलांचे नाव होते वज्रसार. घरातील सगळ्यात लहान असलेल्या या मुलात पहिल्यापासूनच विरक्तीचा भाव दिसू लागला होता. असे म्हणतात वयाच्या सातव्या वर्षीच त्याने वडिलांकडे श्रमण होण्यासाठी परवानगी मागितली आणि त्याच्या वडिलांनी ती दिली. त्यांची परवानगी घेऊन त्याने महावन मठात प्रवेश घेतला. तेथेच त्याला आचार्य ज्ञानभद्र आणि जिनयास्स यांची शिकवण लाभली. किंबहुना त्यांच्यामुळेच त्याचे भवितव्य घडले. तो २७ वर्षांचा असतानाच त्याच्या आचार्यांनी चीनला धम्म प्रसारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या शिष्यांनाही बरोबर घेतले. त्यांचा मार्ग बिकट व खडतर होता. त्यांनी रस्त्यात कपिचा नावाच्या शहरात एक वर्ष मुक्काम केला. या खडतर प्रवासात जिनगुप्ताने आपल्या आचार्यांची चांगली काळजी घेतली. खोतान पार करुन ते अखेरीस ५५७ साली चीनला पोहोचले. दुर्दैवाने दहापैकी हे चारचजण तग धरु शकले. ५५९-५६० याच काळात केव्हातरी जिनगुप्त चँगॲनला आला व चाओतांग मठात राहिला. राजधानीत स्थानिकांत मिळून मिसळून राहिल्यामुळे तो लवकरच चीनी शिकला. त्या काळात चँगॲनला मिंग घराण्याचे राज्य होते. त्यांनी या चौघांसाठी एक नवीन मठ बांधला. त्याच मठात हे चौघे भाषांतराचे काम करु लागले. त्यांनी भाषांतर केलेल्या अवघड ग्रंथाची नावे आहेत – कनकवर्णऋषी परिप्रच्छसूत्र आणि अवलोकितेश्र्वर सूत्र.

जिनगुप्ताच्या न्यायी स्वभावामुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला आणि प्रथमच एका भारतीय माणसाला एका सुभ्याचा अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या जबाबदारीतून वेळ काढून त्याने अजून दोन ग्रंथांचे भाषांतर केले.
दुर्दैवाने याच सुमारास चाऊ घराण्याचा उदय झाला आणि त्यांनी बौद्धधर्माचा राजाश्रय काढून घेतला. नुसता काढून घेतला नाही तर बौद्धांना चीनमधून हद्दपार करण्याचा हुकूम काढला. या राजकीय धुमाळीत अनेक पंडितांना, मठवासियांना चीनमधून हुसकावून लावण्यात आले. जिनगुप्तही या वादळाला पाठ देत मध्य एशियात पोहोचले. (सध्याचा उगुर प्रांत). त्याचवेळी भारतातून काही चीनी भिक्खू चीनला परतत होते. चीनी राज्यसत्ता बौद्धांच्या विरुद्ध असल्यामुळे तेथे कुठे जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. त्यांची आणि जिनगुप्ताची त्याच प्रांतात गाठ पडली. त्यांनी भारतातून जवळजवळ २०० ग्रंथ आणले होते. त्यांनी जिनगुप्तास त्यांचे भाषांतर करण्याची विनंती केली. त्यांना प्रथम जिनगुप्त हा साधासुधा श्रमण आहे असे वाटले पण लवकरच त्यांना त्याचे ज्ञान किती सखोल आहे हे कळले. त्यांनी त्याला धम्माचा प्रसार करु असे वचन दिले. ५८१ साली धम्मावर दाटलेले काळे ढग हटले आणि राज्यसत्ता सुई घराण्याच्या हातात गेली. हे घराणे बौद्धधर्माचे मोठे पाठिराखे होते. तात्कालिन राजाने ताबडतोब एक समिती नेमली व भाषांतराचे काम सुरु करण्याची अनुमती दिली. या समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद नरेंद्रयास्स यांना देण्यात आले होते असा उल्लेख सापडतो. या समितीचे काम समाधानकारक न वाटल्यामुळे इतर भिक्खूंनी सम्राटाची गाठ घेतली व त्याला जिनगुप्तास उगुरमधून बोलाविण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करुन सम्राटाने ताबडतोब तसे आज्ञापत्र रवाना केले. इकडे जिनगुप्तासही चीनला परतायचे वेध लागले होते. ते आज्ञापत्र मिळताच तो लगबगीने चीनला परतला. तो आल्यावर त्याच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. त्याला सहाय्य करण्यासाठी धर्मगुप्त व दोन चीनी श्रमणांची नेमणूक करण्यात आली. याचबरोबर दहा चीनी श्रमणांची हे भाषांतर तपासण्यासाठी नेमणूक करण्यात आली. यांचे काम त्या भाषांतरात मूळचा भाव जपला जात आहे की नाही हे तपासण्याचे होते. ते यासाठी जिनगुप्तांशी चर्चा करीत व आवश्यक त्या सुधारणा करीत. यामुळे भाषांतरे बरीच अचुक होऊ लागली. एवढेच नाही तर भाषांतराची शैली मूळ चीनी वाटावी यासाठी अजून दोन साहित्यिक श्रमणांचीही नेमणूक करण्यात आली. हा असा शास्त्रशुद्ध भाषांतराचा प्रकार चीनमधे प्रथमच होत होता. लवकरच जिनगुप्ताची नेमणूक तेंग घराण्याच्या राजगुरुपदी करण्यात आली आणि बौद्धधर्माची पताका परत एकदा फडकू लागली. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथांची संख्या एकंदरीत ३७ भरते व त्यात एकूण १६६ प्रकरणे अंतर्भूत होती. त्यातील काहींची नावे अशी-
१ बुद्धचरित्र २ फा-किऊ ३ वी-तो ४ राष्ट्रपालपरिपृच्छसूत्र ५ भद्रपालश्रेष्ठीपरिपृच्छ सूत्र आणि इतर. ( सगळी नावे उपलब्ध आहेत पण विस्तारभयापोटी येथे देत नाही.)

सम्राट चाऊने जिनगुप्तास काही भारतीय खगोलशास्त्रांवरील ग्रंथांचे भाषांतर करण्यास सांगितले. त्यात एकूण २०० प्रकरणांचे भाषांतर करण्यात आले. साल होते ५९२ ! भारतातून चीनमधे या मार्गाने आणि प्रकाराने कुठले कुठले ज्ञान-विज्ञान गेले हा एक संशोधनाचा विषय ठरावा. जिनगुप्ताचा सहाशे साली ७८व्या वर्षी मृत्यु झाला. जिनगुप्ताने धम्मासाठी खूपच हालआपेष्टा काढल्या पण धम्मापासून तो कधीही ढळला नाही आणि ना त्याच्या मनात भारतात परत जायचा कधी विचार आला.

५०० ते ६०० या काळात भारतातून नाव घेण्याजोगे अजून तीन धर्मगुरु चीनला गेले. १ गौतम धर्मज्ञान. हा पूर्वी चीनला गेलेल्या गौतमाऋषींचा सगळ्यात थोरला मुलगा. अर्थातच तो बनारसचा होता. चीनमधे गेल्यावर त्यावेळच्या सम्राटाने त्याच्यावर काही प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकल्या ज्या त्याने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. एकदा तर तो एका प्रांताचा सुभेदारही झाला. त्याने एक ग्रंथ चीनी भाषेत लिहिला ज्याचा विषय होता – विविध प्रकारच्या कर्माचे होणारे विविध परिणाम.
दुसरा धर्मगुरु होता विनितऋषी. हा उद्यानदेशीचा श्रमण ५८२ साली चीनला पोहोचला व त्याने दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ गयशीर्षसूत्र आणि २ महायानवैपुल्यधारिणीसूत्र.

या शतकातील चीनला जाणारा शेवटचा श्रमण होता धर्मगुप्त. हाही जिनगुप्त ज्या मार्गाने चीनला आला त्याच मार्गाने चीनमधे आला. त्याने एकूण दहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील काहींची नावे – १ वज्रछेदिकाप्रज्ञपरिमितासूत्र २ निदानसूत्र ३ निदानशास्त्र...

ह्युएनत्संग व इ-शिंगचा काळ ( ६००-७००)

या शतकात पहिला श्रमण चीनला पोहोचला त्याचे नाव होते प्रभाकरमित्र. मध्यभारतातील एका क्षत्रिय कुटुंबातील या श्रमणाने चीनमधे पाऊल ठेवले त्यावेळेस थान घराण्याचे राज्य चालू होते. त्याने तीन ग्रंथाचे भाषांतर केले व चीनमधे वयाच्या ६९व्या वर्षी देह ठेवला. त्याने लिहिलेल्या ग्रंथाची नावे – रत्नताराधारिणीसूत्र २ प्रज्ञाप्रदीपशास्त्रटिका ३ सुत्रालंकारटिका. हा चीनला गेला त्यानंतर दोनच वर्षांनी ह्युएनत्संगने त्याच्या भारतयात्रेस सुरुवात केली. अंदाजे ६५२ साली एका नवीन पंडीताने चीनला भेट दिली. त्याचे नाव होते अतिगुप्त. याला दोन वर्षात एकाच ग्रंथाचे भाषांतर करता आले. – धारिणीसंग्रहसूत्र. यानंतर चीनला गेला ‘नाडी’ नावाचा पंडीत. याने भारत, श्रीलंका येथे फिरुन १५०० हिनयान व महायान पंथाचे बौद्ध ग्रंथ जमा केले होते. याच पंडीताला चीनी सम्राटाने कुठलेतरी औषध शोधण्यासाठी परदेशी पाठविले होते. चीनमधे परतल्यावर त्याने तीन ग्रंथ लिहिले. १ सिंहव्युहराजाबोधिसत्वपरिपृच्छसूत्र २ विमलज्ञानबोधिसत्व ३ माहीत नाही...

यानंतर अजून एका दिवाकर नावाच्या पंडिताने मध्यभारतातून चीनमधे पाऊल ठेवले. त्याने बारा वर्षे चीनमधे काढली ज्या काळात त्याने १८ ग्रंथांचे भाषांतर केले. यानंतर गेला रत्नचित. हा काश्मिरचा रहिवासी होता. ६९३-७०६ या काळात त्याने सात ग्रंथांचे भाषांतर केले. तो वयाच्या १००व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला. . दुसऱ्याचे नाव होते धर्मऋषी किंवा धर्मरुची. हा काश्यप गोत्र असलेला पंडीत दक्षिण भारतातून आला होता. चालुक्यांच्या दरबारात असलेल्या चीनी राजदूताने विनंती केल्यावर सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी अजून एका थोर पंडिताने चीनमधे प्रवेश केला. चीनी सम्राटाने याचे नाव बदलून बोधीरुची असे ठेवले.याने जवळजवळ ५३ ग्रंथांवर टिका लिहिली. आज दुर्दैवाने यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. अजून एक गंमत म्हणजे असे म्हटले जाते की मृत्युसमयी त्याचे वय १५६ होते.

आठव्या शतकात प्रमिती नावाचा एक श्रमण मध्यभारतातून चीनला गेला. हाही एक उत्तम भाषांतरकार होता. ( याने परवानगी नसताना काही ग्रंथ नालंदामधून चीनला नेले असे मी कुठेतरी वाचलेले स्मरते. पण खात्री नाही) त्याने एकाच ग्रंथाचे भाषांतर केले पण ते उत्तम होते. त्याचे नाव लांबलचक होते. – महा-बुद्धोश्निश-तथागत-गुह्य-हेतू-साक्षातक्रिता-प्रसन्नार्थ-सर्व-बोधीसत्वकार्या-सुरंगमसूत्र.

याच्यानंतर वज्रबोधी नावाचा पंडीत चीनमधे गेला.
वज्रबोधी...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

केरळचा हा ब्राह्मण ७१९ साली चीनला पोहोचला आणि त्याने चार पुस्तकांचे भाषांतर केले. असे म्हणतात शाओलिन मठात यानेच चीनी मार्शल आर्टचा पाया घातला. निश्चित नाही. ( हा योगसामर्थ्याने त्याचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असे असा प्रवाद आहे.) हा ७१व्या वर्षी हा चीनमधे मरण पावला.

नंतर एक पंडीत नालंदामधून पाठवला गेला. त्याचे नाव होते शुभाकरसिंह. याने बरोबर चार ग्रंथ आणले होते ज्याचे त्याने भाषांतर केले. हाही त्याच्या वयाच्या ९९व्या वर्षी चीनमधे मृत्यु पावला.

यानंतर अमोघवज्र नावाचा अत्यंत प्रसिद्ध व महत्वाचा पंडीत चीनमधे गेला.
अमोघवज्र
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

याचे गुरु होते वर उल्लेख झालेले वज्रबोधी. याने भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे जो काही तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. याने अनेक तांत्रिकसूत्रांचे व धारिणींचे चीनी भाषेत भाषांतर केले. याने नुसते हेच केले नाही तर भारतीय संस्कृतीची चीनी जनतेला ओळख करुन दिली.

वज्रबोधी होते दक्षिण भारतातील, अमोघवज्र होता उत्तर भारतातील. म्हणजे त्या काळात उत्तरेपासून, अफगाणिस्तान, मध्य आशिया, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, ब्रह्मदेश इत्यादि. देशांमधे हे सर्व श्रमण व त्यांचे संघ ये जा करीत असत. व धम्माच्या प्रसाराच्या कामाची आखणी करीत असत. याचे मुख्य केंद्र अर्थातच नालंदा हे असावे व पलिकडे जावा/सुमात्रा बेटे असावीत. अमोघवज्र त्याच्या गुरुबरोबर चीनला गेला व त्याने त्याच्या गुरुंना त्यांच्या कामात बरीच मदत केली. जेव्हा वज्रबोधी मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या शिष्याकडून एक वचन घेतले. ते म्हणजे त्याने भारतात परत जाऊन नवनवीन बौद्ध ग्रंथ आणावेत व त्याचे भाषांतर करावे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या महाभागाने ९ वर्षांनी परत भारताची भूमि गाठली. भारतात व श्रीलंकेत त्याने जवळजवळ पाच वर्षे पायपीट केली व अनेक हस्तलिखिते घेऊन परत चीन गाठले. या कामामुळे त्याची किर्ती सम्राटापर्यंत पोहोचली नसेल तरच नवल. सम्राट त्याच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने अमोघवज्रांना एक बहुमान बहाल केला – ज्याचा अर्थ होतो प्रज्ञा-मोक्ष. काही वर्षांनंतर (७४९) अमोघवज्रांना परत भारतात जाण्याची इच्छा झाली. तशी परवानगी मिळाल्यावर ते बंदरावर पोहोचले. तेवढ्यात सम्राटाला ‘आपण काय केले हे ! असे वाटून त्यांना परत येण्याची विनंतीवजा आज्ञा केली. त्यामुळे अमोघवज्र परत एकदा चीनमधे अडकून पडले पण झाले ते चीनच्या भल्यासाठीच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. परत फिरल्यावर त्यांनी हिनशान नावाच्या मठात मुक्काम केला व आपले भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले. दोनच वर्षात त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला- त्रिपिटकभदंत.

७७१ साली ताई-शून सम्राटाच्या वाढदिवसाला त्यांनी एक भाषांतरित ग्रंथ सम्राटाला भेट दिला. त्यात सुरुवातीला ते म्हणतात, ‘‘मी लहानपणापासून माझ्या गुरुचरणी स्वत:ला वाहून घेतले. त्यांची सेवा मी जवळजवळ १४ वर्षे केली. त्यांची सेवा करतानाच मी त्यांच्याकडून योगशास्त्र शिकलो. त्यानंतर मी भारतात पाच प्रदेशात फिरलो व ५०० ग्रंथ जमा केले. हे असे ग्रंथ होते की आजपर्यंत चीनमधे आणले गेले नव्हते. मी ७४६ साली परत राजधानीत आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी ७७ ग्रंथांचे भाषांतर केले आहे.’’ आठव्या शतकात मला वटते हा एकमेव पंडीत होता ज्याने एवढे भव्यदिव्य काम केले. तो स्वत: तांत्रिक असल्यामुळे त्याने तांत्रिक मार्गावर बरीच पुस्तके लिहिली असावीत. त्यांच्या काही ग्रंथांची नावे खाली देत आहे. त्यावरुन त्यांच्या कामाची आपल्याला कल्पना येऊ शकेल.

१ महामयुरीविद्या रागिणी २ कुंडीधारिणी ३ मारिचीधर्म ४ मारिचीदेवीपुष्पमाला सूत्र ५ गाताअनंतामुख धारिणी. ६ सर्वतथागताधिष्टान ह्र्दयगुह्य धातू करंडमुद्र धारिणी ७ महर्षी सूत्र ८ महाश्री-देवी-द्वादासबंधनशास्त्र नाम-विमलामहायान सूत्र. ९ गांगुलीविद्या १० रत्नमेघ धारिणी ११ सालिसंभवसूत्र १२ राष्ट्रपालाप्रज्ञापरिमिता १३ महामेघसूत्र १४ घनव्युहसूत्र १५ पर्णसवारी धारिणी. १६ वैश्रमणदिव्यराजा सूत्र १७ मंजुश्रीपरिपृच्छसूत्राक्षरमंत्रिकाद्याया १८ पंचतंत्रिसदबुद्धनामपुजास्वीकारलेख १९ अवलोकितेश्र्वर-बोधिसत्व-निर्देशमंत-भद्र धारिणी २० अष्ट मंडलसूत्र २१ चक्षूरविशोधन विद्या धारिणी २२ सर्व रोगप्रसन्न धारिणी २३ गवलप्रसनन धारिणी २४ योगा संग्रह महार्थ आनंद परित्राण धारिणी २५ एकाकुधार्या धारिणी २६ अमोघ पासवैरोचनबुद्धमहाआभिषेक प्रभासमंत्र सूत्र २७ नीतिशास्त्र सूत्र २८ तेजप्रभा-महाबल-गुणापादविनयश्री धारिणी २९ ओ-लो-तो-लो धारिणी ३० अश्निशचक्रवर्ती तंत्र ३१ बोधीमंदनिर्देशैकाकशरोस्निश चक्रवर्ती राजा सूत्र ३२ बोधीमंदव्युह धारिणी ३३ प्रज्ञापारमिताअर्धसटीका ३४ वज्रशेखरयोगा सूत्र ३५ महाप्रतिसार धारिणी ३६ गरुडगर्भराजा तंत्र ३७ वज्र-कुमार-तंत्र ३८ सामंतनिदानसूत्र ३९ महायान-निदानसूत्र ४० हारितीमात्रिमंत्रकल्प ४१ सर्व धारिणींची एक सुत्री....

एका धारिणीचे नाव आपण पाहिले असेल सर्व रोग... यात कुठल्याही रोगापासून कशी सुटका करुन घ्यावी याबद्दल विवेचन आहे आणि गंमत म्हणजे या ग्रंथात म्हणे पुष्कळ आकडेमोड आहे. एवढे प्रचंड काम करुन अखेरीस ७०व्या वर्षी अमोघवज्रांनी आपला देह ठेवला. सम्राटावर त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांना मरणोत्तरही काही पुरस्कार व पदव्या देण्यात आल्या.

नवव्या शतकात म्हणजे ८०० ते ९०० या काळात भारतातून चीनला जाणाऱ्या पंडितांची संख्या अचानक कमी का झाली ते कळत नाही. मी जो दशकुमारचरितमचा अनुवाद केला, त्यात मला बौद्धधर्माबद्दल फार चांगले लिहिलेले आढळत नाही. अर्थात ते हिंदू पंडिताने लिहिले असल्यामुळे मी समजू शकतो. पण कदाचित सामान्य माणसाच्या नजरेतून धम्म उतरत चालला होता हे निश्चित. या शतकात एकही पंडीत भारतातून चीनमधे गेला नाही. कदाचित असेही कारण असेल की त्यांना चीनमधून कोणी बोलावले नसेल ....

हळूहळू भारतातून चीनला जाणाऱ्या बौद्ध श्रमणांची व पंडीतांच्या संख्येला ओहोटी लागत होती. पुढच्या शतकात चीनी इतिहासात भारतातून ९७२ साली फक्त तीन पंडीत आल्याची नोंद सापडते. त्यांची भारतीय नावेही माहीत नाहीत. १ कोचे २ फुकीं ३ चेने-ली.

९७३ साली धर्मदेव नावाचा अजून एक महान पंडीत चीनमधे आला. त्याची कीर्ति त्यावेळच्या सम्राटापर्यंत (सुंग घराणे) पोहोचल्यावर त्याला दरबारात बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला. याच काळात लाकडावर ग्रंथ कोरुन त्यापासून पुस्तके छापण्याची प्रक्रिया चालू झाली. एकूण १३०,००० फळ्या तयार करण्यात आल्या ज्यापासून मग त्रिपिटकाची पुस्तके छापण्यात आली. धर्मदेवाने ९७३ साली भाषांतराचे काम सुरु केले आणि ९८१ पर्यंत त्याने ४६ ग्रंथांचे भाषांतर केले. या भाषांतरातही धारिणींचा भरणा आहे कारण त्याकाळात त्रांत्रिकमार्गाचा पगडा चीनी जनमानसावर बसला होता. धर्मदेवाने अजून एका लोकप्रिय ग्रंथाचे भाषांतर केले – सुखावती-व्युह. या महायानी ग्रंथात स्वर्गाचे वर्णन आहे. धर्मदेवाचा मृत्यु १००१ साली झाला. या महान पंडीतालाही मरणोत्तर अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले.

९७५ साली पश्र्चिम भारतातून एक मंजुश्री नावाचा राजपूत्र चीनमधे श्रमण बनून गेला व त्याने नुकत्याच निवर्तलेल्या चीनी सम्राटाला श्रद्धांजली वाहिली असा एक उल्लेखही सापडतो. हा चीनमधे आल्यावर सिअँग-कोनो मठात राहिला होता. तेथे त्याच्या स्वभावामुळे तो खूपच लोकप्रिय झाला. इतर भिक्खूंना मत्सर वाटल्यामुळे त्यांनी सम्राटाला जाऊन सांगितले की त्याला भारतात परत जायचे आहे. या राजपुत्राला अजून चीनी समजत नसल्यामुळे त्याच्यात चीनी सम्राटात संवाद होऊ शकला नाही. सम्राटाने भारतात जाण्याचा आदेश काढल्यावर मंजुश्रीची चडफड झाली पण दुसरा मार्ग नसल्यामुळे त्याने भारताचा रस्ता पकडला असे म्हणतात पण तो भारतात आला नाही. तो कुठे नाहीसा झाला याबद्दल इतिहासात उल्लेख नाही.

९८० साली अजून दोन पंडीत काश्मिरमधून चीनला गेले. एकाचे नाव होते दानपाल आणि दुसऱ्याचे चीनी नाव होते – तिनशीत्साई. पण दुसऱ्या एका ग्रंथात तो जालंदर येथील एका मठाचा श्रमण होता असाही उल्लेख होता. त्याने जवळजवळ वीस वर्षे चीनमधे काम केले. त्याने भाषांतर केलेल्या ग्रथात एक महत्वाचा ग्रंथ होता ज्याचे नाव होते धर्मपद. याचे भाषांतर मंगोलि भाषेतही झाले आहे. याचा मृत्यु १००० साली झाला.

दानपाल उद्यान देशातून चीनला गेला होता. त्यानेही तेथे बरेच काम केले. हा दरबारात असताना सुंग सम्राटाला पश्चिम भारतातील एका राजाचे पत्र आले. एका श्रमणाने ते आणले होते. ते त्याने याला वाचण्यास सांगितले अशी नोंद आहे. त्या पत्रात तो राजा म्हणतो, ‘‘ मी असे ऐकले आहे की चीनमधे परमेश्र्वराचा अंश असलेला एक राजा राज्य करतो. मी स्वत: आपल्याला भेटण्यास येऊ शकत नाही याचा मला खेद वाटतो. कोअँगयिन (ज्या श्रमणाने ते पत्र आणले होते त्याचे नाव ) याने आपल्या कृपेने तथागताच्या रत्नजडीत सिंहासनावर कास्याची दक्षिणा चढविली आहे. त्याच्या बरोबर मी आपल्यासाठी तथागताचा अवशेष पाठवीत आहे... पत्रातील चीनमधील इतर पंडितांचे पत्तेही वाचण्यात आले अशी नोंद आहे. या पंडिताने १११ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले असे मानले जाते. धारिणी चीनमधे लोकप्रिय होण्यामागे याच्या भाषांतराचा मोठा सहभाग होता.

सुंग घराण्याच्या इतिहासात अजून एका श्रमणाची नोंद आहे ज्यात हा श्रमण स्वत:बद्दल सांगतो, ‘‘ मी तॉ-लो-मेनचा श्रमण आहे. माझे नाव यँक-चो आहे. भारतातील लि-टे नावाच्या देशातून मी आलो. या देशाचा राजा या-लो-ऑन-टे असे आहे. माझे गाव अ-जों-इ-टो ( अजंठा?) आहे आणि माझ्या पत्नीचे नाव मो-हि-नी आहे.’’ श्रमण असून विवाहीत कसा हे समजत नाही.

यानंतर ९९० साली नालंदामधून अजून एक श्रमण चीनमधे आला. त्याचे नाव होते पाऊकिटो. त्याने बुद्धाचे काही अवशेष सम्राटासाठी आणले होते अशी नोंद सापडते. ९९५ साली मध्य भारतातून एक श्रमण चीनमधे आला त्याचे नाव होते कालकांती. त्याने भूर्जपत्रावर लिहिलेले काही ग्रंथ चीनमधे आणले. नंतर ९९७ साली राहुल नावाचा एक श्रमण पश्चिम भारतातून चीनला गेला. त्यानेही काही पवित्र ग्रंथ चीनच्या सम्राटाला अर्पण केले. त्या शतकातील शेवटचा श्रमण होता नि-वी-नी. यानेही काही ग्रंथ बरोबर नेले पण त्याचे पुढे काय झाले याची इतिहासात नोंद नाही.

१०००-११०० या शतकात या सगळ्या प्रकाराला ओहोटी लागली. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे इस्लाम धर्माचे भारतावर झालेले आक्रमण. त्यामुळे भारतात बुद्धाचा अहिंसेचा संदेश मला वाटते लोकांच्या पचनी पडेनासा झाला. तसेच इस्लाम धर्माच्या वादळी आक्रमक हिंसाचाराने मध्य आशिया व्यापून टाकला. चीनला जाण्याच्या मार्गावर अनेक श्रमणांची कत्तल झाली व त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याच्या ध्यासाचा यात बळी गेला. १००४ साली मगधाहून धर्मरक्षाने चीनला भेट दिली. त्याने काही ग्रंथ बरोबर नेले होते. त्यांचे भाषांतर करुन त्याने वयाच्या ९६व्या वर्षी चीनमधेच देह ठेवला. अधूनमधून एखादा श्रमण चीनला जात होता, नाही असे नाही पण ती परंपरा खंडीत होण्याच्या मार्गावर होती हे नाकारण्यात अर्थ नाही.

शेवटचा श्रमण, ज्ञानश्री चीनमधे गेला १०५३ साली. त्यानंतर त्या ज्ञानाच्या मार्गावर अंध:कार पसरला तो पसरलाच...
या सर्व श्रमणांनी चीनला काय दिले? मुख्य म्हणजे त्यांनी चीनला धर्म दिला. चित्रकला, मुर्तिकला, दिली. चीनमधील कित्येक गुहांमधे असलेली चित्रे भारतातील अजंठाच्या चित्रकलेशी साम्य दाखवतात. हळूहळू ज्ञानी पंडीत नामशेष झाले. इतके नामशेष झाले की मंगोल बादशहा (चीनच्या प्रांताचा) कुबलाईखानला काही ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी बौद्ध धर्मगुरु/पंडीत पाहिजे होता. त्याला शोधून एकही तसा माणूस भारतात सापडला नाही....

(चेंगिजखान स्वत: बौद्ध नव्हता पण त्याला बौद्ध धर्माची पूर्ण कल्पना होती. त्याचा लडाखमधील लामांशी सतत संपर्क असे. तो त्यांना त्याच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगे. चेंगिजखानचे कित्येक सरदार, मंत्री हे बौद्ध होते व असे म्हणतात त्यांनी त्याच्या काळातच एक पाच मजली बौद्ध मठ बांधण्यास घेतला होता. कुबलाईखान हा त्याचा नातू. ज्याने आपले लहानपण त्याच्या आजोबांबरोबर घालविले, तो नंतर चीनचा सम्राट झाला त्याने त्यामुळे बौद्धधर्माला उदार आश्रय दिला होता. असो. चेंगिजखानाबद्दल परत केव्हातरी....)

चीनी बुद्ध साल ५८१-६१७.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ज्याने धम्म सांगितला, धर्मातील हिंसेला रजा दिली त्या तथागताला, अनेक वर्षे सर्व हालआपेष्टा सहन करुन त्याची शिकवण सामन्याजनांना, सम्राटांना, चक्रवर्तींना सांगणाऱ्या सर्व पंडितांना, श्रमणांना वंदन करुन ही लेखमालिका संपली असे जाहीर करतो.
प्राचीन दिपांकर बुद्धाला वंदन असो.
वैदुर्यप्रभास बुद्धाला वंदन असो.
शाक्यमूनी बुद्धाला वंदन असो.
भूत वर्तमान व भविष्यकाळांच्या बुद्धाला वंदन असो.
आनंदी बुद्धाला वंदन असो.
विरोचन बुद्धाला वंदन असो.
रामध्वजराजा बुद्धाला वंदन असो
मैत्रेय बुद्धाला वंदन असो.
अमिताभ बुद्धाला वंदन असो
सत्याचा मार्ग दाखवणार्‍या बुद्धाला वंदन असो.
अमर वज्र बुद्धाला वंदन असो
रत्नप्रभास बुद्धाला वंदन असो.
नागराज बुद्धाला वंदन असो.
वरूण बुद्धाला वंदन असो.
नारायण बुद्धाला वंदन असो.
पुण्यपूष्प बुद्धाला वंदन असो
मणिध्वज बुद्धाला वंदन असो.
मैत्रीबाला बुद्धाला वंदन असो.
व्युहराजा बुद्धाला वंदन असो.

जयंत कुलकर्णी

समाप्त.

धर्मइतिहासलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Sep 2016 - 7:18 pm | यशोधरा

हा भाग म्हणजे ह्या सुरेख मालिकेचा कळस झाला आहे! मनापासून आभार काका. वाखू साठवली आहे.

चेंगिजखानाबद्दल परत केव्हातरी....

अजून एक मालिका येणार तर! वाट बघते.

प्रचेतस's picture

1 Oct 2016 - 9:53 am | प्रचेतस

खरंच, ह्या मालिकेतला सर्वोत्कृष्ट भाग आहे हा.
असे काही लेखच वामा मोडमधून बाहेर यायला भाग पाडतात.

जयंत कुलकर्णी's picture

30 Sep 2016 - 7:27 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद ! प्रथमच माझ्या लिखाणाचा शेवट चांगला झाला आहे असे कोणीतरी म्हटले तर ! :-)
नाहीतर ‘गुंडाळले आहे’’ असेच म्हणतात मला सर्वजण.... :-)

लेखमाला आवडली. नेहेमीप्रमाणेच खूप नवीन माहीती मिळाली. धन्यवाद. पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत.

लेखमालिका अप्रतिम! वाचनखूण साठवली आहे. तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत.

बुद्धम् शरणम् गच्छामि!

कपिलमुनी's picture

1 Oct 2016 - 5:18 am | कपिलमुनी

धन्यवाद ! इतकी चांगली माहिती मिळाली

श्रीरंग_जोशी's picture

1 Oct 2016 - 9:28 am | श्रीरंग_जोशी

एका अभ्यासपूर्ण लेखमालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

त्या काळात अल्प प्रगत दळणवळणाची साधने अन आव्हानात्मक व कायम अस्थिर राजकीय परिस्थिती असूनही भाषा व संस्कृती या बाबतीत खूपच वेगळा असणार्‍या चीनमध्ये आपल्या बौद्ध धम्मप्रसारकांनी केलेल्या कामगिरीला वंदन.

मी नुकताच मार्को पोलो या नेटफ्लिक्सवरिल मालिकेचा यंदाचा सीझन पाहून संपवला. मंगोल सम्राट कुबलाई खानाचा कार्यकाळ त्यात दाखवला जात आहे. त्यात "१०० आइज" नावाचे एक चिनी वंशाचे पात्र दाखवले आहे. त्याला मालिकेत मॉन्क असे संबोधले जाते असे.

कुबलाई खानाकडून प्राचीन धार्मिक ग्रंथसंपदेला अभय मिळावे या उद्देशाने चिनी राजांविरुद्धच्या युद्धात मंगोल आक्रमकांना साथ देताना हा योद्धा दाखवलेला आहे. तसेच तत्कालिन पोपला जणू समकालीन आक्रमक सम्राटांना लाजवेल असे सैन्य बाळगताना दाखवले आहे. कुबलाई खानाच्या राज्यात जनतेला हव्या त्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य असल्याने तत्कालिन पोपला त्याचे राज्य उलथवून टाकायचे असते असेही दाखवले आहे.

या मालिकेत मनोरंजन मुल्य वाढवण्यासाठी ऐतिहासिक संदर्भांची मोडतोड केली असली तरी त्या काळच्या ऐतिहासिक घडामोडींचा अंदाज येण्यासाठी ही मालिका नक्कीच उपयुक आहे. तुमची ही लेखमालिका अन ती मालिका एकाच वेळी पाहिल्याने त्या काळची परिस्थिती अधिक नेमकेपणाने नजरेपुढे आणता आली.

एका अभ्यासपूर्ण लेखमालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

काका एक शंका होती, या सर्व काळात चीन मध्ये गेलेले ऋषी आणि ग्रंथ हे बहुतांश हिंदू होते, तेव्हा बौद्ध धर्माला हिंदू धर्माचीच एक शाखा मानायचे कि वेगळा धर्म म्हणून वागणूक दिली जायची.

जयंत कुलकर्णी's picture

1 Oct 2016 - 2:47 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
नाही. येथून गेलेले सगळे बौद्धच होते पण जे ब्राह्मण होते त्यांच्यावरील हिंदू धर्माचा पगडा अजून गेला नव्हता म्हणून्च हिंदू धर्माच्या कित्येक गोस्टीए आपल्याला बौद्ध धर्मात दिसतात. उत्तम उदा. म्हणजे योगाचार...

महासंग्राम's picture

1 Oct 2016 - 2:51 pm | महासंग्राम

ओक्के, तुमच्या या लेखमालिकेमुळे भरपूर नवीन गोष्टी कळल्या, त्यामुळे पुन्हा एकदा शतशः धन्यवाद काका !!!

अनुप ढेरे's picture

1 Oct 2016 - 11:03 pm | अनुप ढेरे

वैदिक आणि बौद्धांमध्ये खूप भांडणं झालेली असं वाचलं आहे. सो बौद्ध लोक स्वतःला हिंदू-शाखा म्हणवून घेत नसावेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2016 - 7:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम आणि माहितीपूर्ण मालिका ! इतकी माहिती जमा करण्यामागचे तुमचे श्रम आणि चिकाटी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.

तुमच्या पुढच्या मालिकेची प्रतिक्षा आहे.

एक छोटीशी सुचना : कुब्लाई हा चेंगिजचा मुलगा नाही तर नातू होता. चेंगिज --> तोलुई --> कुब्लाई.

जयंत कुलकर्णी's picture

1 Oct 2016 - 7:51 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

विवेकपटाईत's picture

1 Oct 2016 - 7:14 pm | विवेकपटाईत

लेखमाला आवडली. बरीच माहिती प्रथमच कळली.

अमोल मेंढे's picture

1 Oct 2016 - 10:39 pm | अमोल मेंढे

वा खु साठवल्या गेली आहे

मारवा's picture

2 Oct 2016 - 8:12 pm | मारवा

अद्वितिय लेखमाला
प्रचंड आवडली.
यामागचे कठोर परीश्रम सखोल व्यासंग याविषयी सरांचा फार आदर वाटतो.
श्री जयंत कुलकर्णी सर इतक्या दिर्घ काळापासुन सातत्याने एक अभिजात दर्जा राखुन जे अभ्यासपुर्ण लिखाण करतात व प्रतिसादांमध्येही जो कमालीचा संयम व एकंदरीत जो सुसंस्कृतपणा जपतात बाळगतात तो अनुकरणीय असा आहे.
तो अपवादात्मक असा आहे.
पुन्हा अनेक धन्यवाद या विलक्षण लेखमालेसाठी.

जयंत कुलकर्णी's picture

3 Oct 2016 - 4:39 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

पैसा's picture

4 Oct 2016 - 10:07 pm | पैसा

आधीच्या भागांवर कळस चढवणारा शेवटचा भाग. तुम्ही लिखाणाचा शेवट गुंडाळला असं लोक नेहमी का म्हणतात माहित आहे? त्यांना अजून वाचायचं असतं. मग मालिका संपली म्हणून वाईट वाटतं. :)

जयंत कुलकर्णी जी अपले मनापसुन अभार, इतकी अप्रतिम मालिका लिहिल्या बद्द्ल. मी तुमचे इतर लेख वाचत आहे.
मुळात तुमची हि मालिका वाचुनच मी 'मिपा' चा सदस्य झालो, नक्किच इथे ('मिपा वर') काही तरी ज्ञान वढवणारे
मिळनार या आशेने. या विषयावर मला काही प्रश्न विचारायचे आहेत अर्थत तुमची हरकत नसेल तर.

पुन्हा एकदा धन्यवाद मनापसुन अभार

गामा पैलवान's picture

1 Nov 2016 - 8:01 pm | गामा पैलवान

जयंतराव,

काय जबरी लेखमाला लिहिलीये तुम्ही. हा निरोपाचा लेखही कलशाध्यायच आहे. गेल्या जन्मी तुम्हीसुद्धा कोणी बौद्ध विद्वान होते जणू.

भारत आणि चीनमधला बुद्धदुवा परत एकदा बळकट झालेला बघायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

जयंत कुलकर्णी's picture

1 Nov 2016 - 10:41 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

Bhakti's picture

11 Oct 2023 - 8:26 pm | Bhakti

सुंदर लेखमाला

ज्याने धम्म सांगितला, धर्मातील हिंसेला रजा दिली त्या तथागताला, अनेक वर्षे सर्व हालआपेष्टा सहन करुन त्याची शिकवण सामन्याजनांना, सम्राटांना, चक्रवर्तींना सांगणाऱ्या सर्व पंडितांना, श्रमणांना वंदन

_/\_