।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
5 Aug 2023 - 9:00 pm

"तडका तो सब लगाते हैं... "



'उमंग' नामक महिलेची नवीन सुनबाई 'निक्की' आपली सासू आणि तिच्या मैत्रिणीसाठी पाणी घेऊन येताना एंड टेबलला अडखळल्याने तिच्या हातातील ट्रे वरच्या ग्लासेस मधलं थोडंसं पाणी तिच्या सासूच्या अंगावर सांडतं.
ह्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली 'उमंग'ची मैत्रीण स्वयंपाक करता करता आपल्या बंगाली मैत्रिणीला "उमंगने पाणी मागितले तर तिच्या नव्या सुनबाईने ग्लास मधले पाणी तिच्या तोंडावर फेकले" अशी फोडणी देऊन तो प्रसंग कथन करते.
हि बंगालन, आपल्या मैत्रिणीला फोन करून त्याच प्रसंगाला अजून फोडणी देऊन "उमंगच्या 'डेंजरस' सुनेने तिने पाणी मागितले तर पाण्याची बादली आणून तिच्या डोक्यावर ओतली " असे सांगते.
बंगालन कडून अशी माहिती मिळालेली महिला आणखीन एका महिलेला फोन करून "उमंगने पाणी मागितले तर तिच्या सुनेने तिचे तोंड 'फिश टॅंक' मध्ये बुडवले" अशी अधिकची फोडणी देऊन तिला तो प्रसंग तिला कथन करते. शेवटी,

"तडका तो सब लगाते हैं...
पर असली तडका सिर्फ कॅच हिंग से लगता हैं!
शुद्ध और जानदार खुशबुवाला...
अब इंडिया लगाएगा कॅच हिंग का तडका!
हंड्रेड पर्सेंट इंडियन वुमन का मॅच, सिर्फ कॅच."

असे म्हणत पडद्यावर अवतरणाऱ्या विद्या बालनने केलेली 'कॅच' हिंगाची सात-आठ वर्षांपूर्वीची जाहिरात आठवते का?
एखाद्या अतिशय साधारण प्रसंगाला आपल्या कल्पनाविलासाची फोडणी देत, "बात का बतंगड़" बनवून कर्णोपकर्णी प्रसारित करण्याच्या काही* महिलांच्या सार्वत्रिक स्वभाव वैशिष्ट्याचा खुबीने वापर करून गॉसिप्स आणि पाककलेची सांगड घालत 'तडका' अर्थात खमंग फोडणीत हिंगाचे असलेले अनन्यसाधारण महत्व ह्या जाहिरातीतून मोठ्या कल्पकतेने विशद केले होते!
(* इथे 'पॉलिटिकल करेक्टनेस' हा मुद्दा विचारात घेऊन काही हा शब्द वापरल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच 😀)

असो, हिंगाचा भारतातला इतिहास, आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका खंडात झालेला हिंगाचा प्रसार, वापर आणि काही चमत्कारिक उपयोगांबद्दलची थोडी माहिती आपण पहिल्या दोन अध्यायांत बघितली आता हिंगाचे रासायनिक आणि औषधी गुणधर्म, त्याचे औषधी उपयोग आणि स्वदेशी उत्पादनासाठीचे प्रयत्न ह्यांची थोडी माहिती बघूयात.

आयुर्वेद आणि युनानी वैद्यक:

आयुर्वेद:

आयुर्वेदाला हिंगाची ओळख फार पूर्वीच झाली असल्याचे 'बृहत्रयी' म्हणून ओळखले जाणाऱ्या तिन प्राचीन ग्रंथांमधील त्याच्या तब्बल १९० संदर्भांवरून स्पष्ट होते. शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतचिकित्सा, कौमारभृत्य, अगदतंत्र, रसायन आणि वाजीकरण ह्या आयुर्वेदाच्या अष्टांगांतील काढा, चूर्ण, वटी, गुटिका, वर्ती, लेप, लेह, तैल, घृत, अंजन, धुमपान आणि धुपणा अशा विविध औषधी उपचारांत 'हिंगु'चे (हिंग) चरक संहितेत ७२, सुश्रुत संहितेत ५६ आणि अष्टांग हृदयात ६२ संदर्भ सापडतात, त्यावरुन हिंगावर विपुल संशोधन / अभ्यास झाल्याचेही सहज लक्षात येते.

आयुर्वेदानुसार हिंग हे 'कटुस्कन्ध' (तीव्र / तिखट चवीचे), वात आणि कफाचे संतुलन करणारे, पित्तवर्धक, 'दीपनेय' (भूक वाढवणारे आणि पाचक), 'श्वासहर' (दमा आणि श्वसनरोग निवारक), संजनास्थापक (चेतना सुस्थापित करणारे, मज्जा /चेतासंस्थेचे कार्य सुधारणारे), रक्त आणि मूत्रदोष निवारक, वीर्यवर्धक, स्नायुंवरील ताण शिथिल करणारे आहे.

अर्भकावस्थेपासून वार्धक्यापर्यंच्या मानवी जीवनातील सर्वच टप्प्यांवर उद्भवणाऱ्या अनेक व्याधींना अटकाव करण्याची क्षमता आणि पचन, श्वसन, मज्जासंस्था, प्रसूति, मासिक पाळी संबंधित समस्या / आजारांवर अत्यंत प्रभावी औषध असणाऱ्या हिंगाला आयुर्वेदात 'रक्षोघ्न द्रव्य' असेही संबोधिले आहे.
साध्या सर्दी-खोकल्यापासून अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तयार करण्यात येणाऱ्या असंख्य औषधांमध्ये वापर होणाऱ्या, आणि महिलांसाठी वरदान असल्याचे सांगतानाच आयुर्वेदात बहुगुणी हिंगाचे काही दुष्परिणाम / धोकेही वर्णिले आहेत.

  • गर्भपात होण्याची शक्यता असल्याने गर्भवती महिलांनी (आणि स्तनपान देणाऱ्या मातांनी) हिंगयुक्त औषधांचे सेवन टाळावे.
  • हिंगाच्या अतिरिक्त सेवनाने ओठांना सूज येणे, मळमळणे, वांती किंवा पित्तदोष होऊ शकतो.
  • हिंगाची ऍलर्जी असलेल्या व्यक्तीने (अशा व्यक्तींचे प्रमाण खूपच कमी आहे) हिंगयुक्त मलम किंवा तेलाच्या स्वरूपात त्वचेवर लावल्यास पुरळ / लाल चट्टे उठण्याची शक्यता असते.

युनानी वैद्यक:

अरबांनी अनुभवसिद्धता व गूढवादावर विसंबून असलेले प्राचीन ग्रीक वैद्यक आत्मसात करून त्यात गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, भूगोल आणि वनस्पति विज्ञानाचा अंतर्भाव केला आणि मुळच्या ग्रीक वैद्यकातील विखुरलेल्या ज्ञानाचे वर्गीकरण करून त्यातलया विकृति विज्ञानात नवीन रोगवर्णनांचा आणि उपरुग्ण वैद्यकाचा समावेश करून ते अद्ययावत केले. अशा रीतीने उत्तरोत्तर प्रगत झालेलया ग्रीको-अरब वैद्यकाला त्यांनी 'युनानी वैद्यक' असे नाव दिले.

आठव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत, बगदादचा खलिफा हारुन-अल्-रशीद ह्याच्या शासनकाळात (इ. स. ७८६ - ८०९) भारतातील काही आयुर्वेद तज्ज्ञांनी बगदादला भेट दिली होती तेव्हापासून आयुर्वेद आणि युनानी वैद्यकात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय ज्ञानाची परस्पर देवाण-घेवाण झाली. आपल्याकडील वैद्यांनी आयुर्वेदिक औषध निर्मितीत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला, तर युनानी हकीमांनी चरक, सुश्रुत, वाग्भट वगैरे आयुर्वेदिक ग्रंथांतील माहितीचा उपयोग केला व पुढे त्या ग्रंथांची अरबी आणि फारसी मध्ये भाषांतरेही झाली ज्याच्या परिणामी नव्याने तयार होणाऱ्या युनानी औषधांमध्ये हिंगाला अधिक मानाचे स्थान मिळाले.

पुढच्या काळात अरबांनी आशिया, आफ्रिका आणि युरोपात इस्लाम बरोबरच युनानी वैद्यक आणि युनानी औषधांचाही प्रचार आणि प्रसार केला. ते जिथे जात तिथे त्यांच्याबरोबर युनानी हकिमही असत. ऑटोमन साम्राज्यात ह्या प्रसाराची व्याप्ती युरोपात अजून विस्तारली. सध्याच्या काळात रसायनांपेक्षा नैसर्गिक औषधांच्या वापराकडे लोकांचा वाढता कल असल्यामुळे इजिप्त, इराक, इराण, सीरिया, अफगाणिस्तान, चीन, भारत, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, फिनलंड, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, कोरिया, जपान, सौदी अरेबिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, टर्की, इंग्लंड आणि अमेरिका आदी देशांमध्ये ऍलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेद आणि युनानी वैद्यकाची लोकप्रियता वाढत असून त्यावर एतद्देशीय संशोधन आणि औषध निर्मितीही होत असल्याने खाण्याव्यतिरिक्त आयुर्वेदिक आणि युनानी औषधे तयार करण्यासाठी होणारा हिंगाचा वापरही वाढत आहे.

हिंगाचे देशी-विदेशी घरगुती औषधी उपयोग:

भारतात प्राचीन काळापासून (ऐच्छिक) गर्भपात घडवून आणण्यासाठी पांढऱ्या मोहरीची भुकटी आणि हिंग शिरकामध्ये (व्हिनेगर) मिसळून खाऊ घालणे, पोटदुखी आणि पोट फुगणे अशा समस्यांवर पाण्यात हिंग मिसळून लहान बाळांच्या बेंबीला चोळणे तसेच हिंग विरघळवलेल्या गरम पाण्यात भिजवलेली कापडाची पट्टी मोठ्या माणसांच्या पोटावर ठेवणे, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वात दोष कमी करण्यासाठी खडीसाखर आणि हिंग एकत्र करून खाणे किंवा हिंग घालून ताक प्राशन करणे असे अनेक घरच्याघरी करण्यासारखे पारंपारिक देशी किंवा गावठी उपाय केले जातात. अशा घरगुती उपचारांना आपण 'आजीबाईचा बटवा' म्हणूनही ओळखतो, पण परदेशातील आजीबाईंच्या बटव्यातही हिंगाला स्थान असल्याचे खाली दिलेली यादी वाचून लक्षात येईल.

  • अफगाणिस्तानमध्ये फेफरे येणे, भावनिक उन्माद, डांग्या खोकला आणि अल्सरवर उपचार म्हणून हिंगाचा काढा प्राशन केला जातो आणि अफूची नशा उतरवण्यासाठी उतारा म्हणून एखाद्या व्यक्तीने जेवढ्या प्रमाणात अफूचे सेवन केले असेल तेवढ्याच प्रमाणात हिंग खायला देतात.
  • चीन आणि नेपाळमध्ये हिंगाचा काढा कृमिनाशक / जंतनाशक औषध म्हणून प्राशन केला जातो.
  • इजिप्तमध्ये ह्या वनस्पतीच्या वाळलेल्या मुळांचा काढा पोटरी किंवा मांडीत आलेला गोळा आणि पाठीत भरलेली उसण घालवण्यासाठी, लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि जंतनाशक, वेदनाशामक औषध म्हणून प्राशन केला जातो.
  • मलेशियामध्ये स्त्रियांची मासिक पाळी अनियमित झाल्यास त्यावर उपाय म्हणून हिंग चावून खायला देतात.
  • मोरोक्कोमध्ये अपस्मारावरील औषध म्हणून हिंगाचा वापर होतो.
  • सौदी अरेबियामध्ये हिंग डांग्या खोकला, दमा आणि ब्राँकायटिस साठीचे औषध म्हणून वापरला जातो.
  • ब्राझीलमध्ये ह्या वनस्पतीच्या वाळलेल्या पानांचा आणि देठाचा काढा पुरुष कामोत्तेजक पेय म्हणून प्राशन करतात आणि हिंगाची भुकटी अन्नपदार्थांत मसाला म्हणून वापरतात.
  • केनिया, टांझानिया आणि मोझांबिक अशा पूर्व आफ्रिकेतील देशांत हिंगाचा काढा मासिक पाळी नियमित होण्यासाठी, कफ नाशक, कृमिनाशक, कामोत्तेजक पेय आणि मेंदू व मज्जातंतूंसाठी उत्तेजक म्हणून प्राशन केला जातो.

हिंगाचे रासायनिक गुणधर्म आणि शास्त्रीय संशोधन:

हिंगात असलेल्या गंधकाच्या संयुगांमुळे त्याला उग्र वास आणि कडवट-तिखट चव असते. हिंगामध्ये सुमारे ४० ते ६० टक्के असेरेसिनोटेनॉल आणि फेरुलिक ऍसिडयुक्त राळ, २५ टक्के डिंक, १० टक्के बाष्पशील अर्कयुक्त तेल आणि राख अशी संयुगे असतात.

हिंगाच्या विश्लेषणानुसार त्यात (प्रति १०० ग्रॅम) ६७.८ टक्के कर्बोदके, १६ टक्के आर्द्रता, ४ टक्के प्रथिने, १.१ टक्के चरबी, ७ टक्के खनिजे आणि ४.१ टक्के फायबर असते आणि त्यातील खनिज आणि जीवनसत्वांमध्ये फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, रिबोफ्लेविन आणि नियासिन बरोबरच कॅल्शियमही असते.

वैज्ञानिक पातळीवर शुद्ध स्वरूपातल्या हिंगाचा अभ्यास तसा मर्यादित असला तरी प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांवर आणि परीक्षानलिकेमध्ये (टेस्ट-ट्युब) झालेल्या शास्त्रीय संशोधनात्मक प्रयोगांमधून त्याचे आरोग्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे फायदे होऊ शकतात असे अनुमान काढले गेले आहे.

  • हिंग हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून त्यातील पाचक गुणधर्मामुळे त्याचे मानवी आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.
  • हिंगात बुरशीनाशक आणि प्रतिजैविक गुणधर्म असून त्वचा, उती आणि श्वसनमार्गाशी संबंधित रोगांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या स्ट्रेप्टोकोकस (Streptococcus) बॅक्टेरियाच्या निर्मूलनासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
  • हिंग रक्तवाहिन्या शिथिल करून रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते.
  • हिंग स्तन आणि यकृताच्या कर्करोगासह अन्य काही प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार थांबविण्यात मदत करू शकते.
  • अनेक प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांतून असे आढळून आले की हिंग मेंदूतील मज्जातंतूंचे नुकसान आणि स्मरणशक्ती कमी होण्यापासून संरक्षण करण्यास सहाय्य्यभुत ठरू शकते.
  • हिंगाचा श्वसन संस्थेतील स्नायूंवर आरामदायक प्रभाव पडत असल्याने ते अस्थमाच्या उपचारांसाठी आणि दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी सहाय्य्यभुत ठरू शकते.
  • उंदरांवरील एका अभ्यासात असे आढळून आले की हिंगामुळे रक्तातील साखरेची पातळी (Fasting blood sugar level) कमी होऊ शकते.

स्वदेशी हिंगोत्पादनाचा प्रयत्न :

▲ हिमाचल प्रदेशातील 'शीत वाळवंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाहौल-स्पिती येथिल पडीक जमिनीवर करण्यात आलेली प्रायोगिक हिंग लागवड.

'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council of Scientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथमच हिंगाची व्यावसायिक लागवड करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले.

अडथळे आणि आव्हाने :

मध्य आशियातील हिंगोत्पादक देशांमध्ये फेरुला असाफोइटिडाच्या बियाण्याची खरेदी विक्री आणि हस्तांतरणावर कठोर निर्बंध व निर्यातीवर बंदी असल्यामुळे आणि त्याची तस्करी रोखण्याकडेही बारकाईने लक्ष पुरवले जात असल्याने मुळात हे बियाणे मिळवणेच फार कठीण काम होते, पण उच्चस्तरीय राजनैतिक पातळीवरून केल्या गेलेल्या प्रयत्नातून भारताला इराणकडून ते मिळवण्यात यश आले.

अर्थात बियाणे मिळाले हि फक्त ह्या प्रयोगाची पहिली पायरी होती, त्या बियांपासून रोपनिर्मिती करणे खूपच आव्हानात्मक कार्य होते. भिन्न हवामानात किंवा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत एखाद्या वनस्पतीच्या बिया सुप्तावस्थेत जाणे ही सर्वसामान्य बाब असली तरी फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये अशा सुप्तावस्थेचे प्रमाण खूपच जास्त असल्याने हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीति जिल्ह्यातील रिब्लिंग (Ribling) येथील 'सेंटर फॉर हाय अल्टीट्युड बायोलॉजी' (Centre for High Altitude Biology - CeHAB) ह्या प्रयोगशाळेत जेव्हा ह्या बियांपासून रोपनिर्मितीच्या प्रयोगाला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला शंभरातल्या केवळ दोनच बीजांचे अंकुरण होत होते.

पुढची सुमारे दोन वर्षे 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' ह्या संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक कुमार ह्या दोघांच्या अथक परिश्रमांचे फलस्वरूप म्हणून बीजांकुरणाचे प्रमाण शंभरपैकी दोन वरून साठ पर्यंत वाढवण्यात यश मिळाले* आणि १८ ऑक्टोबर २०२० रोजी हिमाचल प्रदेशातील 'शीत वाळवंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाहौल-स्पीति जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे अकरा हजार फूट उंचीवर असलेल्या 'क्वारिंग' (Kwaring) ह्या खेडेगावात डॉ. संजय कुमार ह्यांच्या शुभहस्ते पहिले रोपटे लावून हिंगाच्या प्रत्यक्ष जमिनीवरील प्रायोगिक लागवडीच्या प्रयोगाला सुरुवात झाली.


▲ फेरुला असाफोटीडाचे बियाणे, रिब्लिंग येथील प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात यशस्वीरीत्या केले गेलेले बिजांकूरण / रोप निर्मिती आणि हिंगाचे पहिले रोपटे लावताना 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' ह्या संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार.

क्वारिंग येथे पहिल्या टप्प्यात आठशे रोपांची लागवड केल्यावर IHBT द्वारे ह्या प्रयोगाची व्याप्ती वाढवताना हिमाचल प्रदेशातील 'लाहौल आणि स्पीती, मंडी, कुलू, किन्नौर आणि चंबा', उत्तराखंड मधील 'चमोली', लडाख मधल्या 'रणबीरपूर आणि लेह', व जम्मू आणि काश्मीर मधल्या 'किश्तवाड, दोडा आणि राजौरी' ह्या जिल्ह्यांमध्ये हिंगाची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आली आहे.

IHBT ने प्रशिक्षण देऊन हिंग लागवडीसाठी प्रोत्साहित केलेल्या लाहौल आणि स्पीती मधील शेतकऱ्यांचे अनुभव संमिश्र आहेत. त्यातल्या अनेकांनी लावलेल्या एकूण रोपांपैकी बहुतांश रोपे करपण्याचे, मरण्याचे, वाढ खुंटण्याचे प्रमाण चिंताजनक असले तरी ते पुन्हा जिद्दीने नवीन रोपे लावत आहेत हि गोष्ट नक्कीच आशादायक आहे. एकंदरीत भारताचे स्वदेशी हिंगोत्पादनाचे प्रयोग अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन प्रामाणिकपणे आणि चिकाटीने सुरु असले तरी त्यात यश मिळेल कि अपयश ह्याचे भाकीत करणे तूर्तास अवघड आहे. पूर्ण वाढ झालेल्या फेरुला असाफोटीडा ह्या वनस्पतीपासून हिंग मिळण्यास चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो, सद्यस्थितीत ऑक्टोबर २०२० मध्ये लावलेल्या पहिल्या बॅचला अजून तीन वर्षेही पूर्ण झाली नसल्याने निकाल हाती येण्यास अजून दोन वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे.

हिंग लागवडीचे हे प्रयोग यशस्वी झाल्यावरही देशाची गरज भागवण्याएवढी हिंगनिर्मिती होण्यास काही दशकांचा कालावधी लागणार असला तरी स्वदेशी हिंग लागवड यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्यांना तेवढ्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या शेतकरी बांधवांची मेहनत लवकरच फळाला येऊन ह्या प्रयोगाला घवघवीत यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून हिंग पुराणाच्या ह्या तिसऱ्या आणि शेवटच्या अध्यायाची सांगता करतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

।। इति श्री 'हिंग' पुराण तृतीयोऽध्याय संपूर्ण ।।

।। इति श्री 'हिंग' पुराण समाप्त ।।

आधीचे भाग :

* फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये खूपच जास्त असलेले सुप्तावस्थेचे प्रमाण कमी करून त्यांच्या अंकुरणाची सरासरी शंभरपैकी २ वरून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या 'वनस्पती उती संवर्धन' (Plant Tissue Culture) विषयी मिपाकर 'भक्ती' ह्यांनी जोडलेली शास्त्रीय माहितीची पुरवणी :

मांडणीऔषधोपचारप्रकटनलेखमाहिती

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

5 Aug 2023 - 10:08 pm | कर्नलतपस्वी

आणी सातत्त्याला प्रणाम.

संग्राह्य लेख.

चांदणे संदीप's picture

7 Aug 2023 - 4:48 pm | चांदणे संदीप

आणी सातत्त्याला प्रणाम.

संग्राह्य लेख.

+३०००
वाखूसा.

सं - दी - प

सर्व माहिती एकत्र आणून त्याला फोडणीसह सादर झाली आहे.
दर दोन महिन्यांनी असे नवे प्रकरण देत जावे.

आंद्रे वडापाव's picture

6 Aug 2023 - 8:13 am | आंद्रे वडापाव

छान लेखमाला !

अथांग आकाश's picture

6 Aug 2023 - 1:22 pm | अथांग आकाश

खूप सुरेख झालंय हिंग पुराण!
सर्व भागांची सुरवात जाहिरात किंवा सिनेमातील दृश्याने करण्याची कल्पना आवडली!!
तीनही माहितीपूर्ण भाग वाचताना कुठे कंटाळा नाही आला आणि हिंग इतके गुणी असेल याची कल्पनापण कधी केली नव्हती!!!

अथक प्रयत्न करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्यांना तेवढ्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या शेतकरी बांधवांची मेहनत लवकरच फळाला येऊन ह्या प्रयोगाला घवघवीत यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना

+१ त्यांची मेहनत लवकरच फळाला येवो!
-

टर्मीनेटर's picture

7 Aug 2023 - 4:26 pm | टर्मीनेटर

कर्नलतपस्वी | कंजूस | आंद्रे वडापाव | अथांग आकाश
प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

@ अथांग आकाश
विषयाशी निगडीत GIF इमेजेस शोधुन काढण्याचे तुमचे कसब कौतुकास्पद आहे!

धर्मराजमुटके's picture

6 Aug 2023 - 4:16 pm | धर्मराजमुटके

पुर्ण लेखमाला वाचली. लेखमाला अतिशय सुरेख झाली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आम्हाला विनासायास अनमोल माहिती मिळते आहे त्याबद्द्ल आपले आभार !

सौंदाळा's picture

6 Aug 2023 - 10:55 pm | सौंदाळा

दंडवत स्वीकारा.
ही लेखमाला लिहिणे म्हणजे सेमिनार साठी एखादा विषय घेऊन पेपर लिहायचो त्याची आठवण झाली. प्रत्येक ठिकाणी तुम्ही घेतलेले परिश्रम जाणवले. हिंगाबद्दल एवढी माहिती असेल आणि ती इतक्या रंजकपणे लिहिता येईल असे वाटले नव्हते.
पुरातन काळ, संदर्भ, वेगवेगळे देश, उत्पादन प्रक्रिया, जाहिराती, संशोधन, स्वदेशी लागवड इतके वेगवेगळे टप्पे!! जबरदस्त
'मेकिंग ऑफ हिंगपुराण - बाय टर्मिनेटर' असा पण एक लेख किंवा सविस्तर प्रतिसाद आलाच पाहिजे.

टर्मीनेटर's picture

7 Aug 2023 - 4:35 pm | टर्मीनेटर

@ धर्मराजमुटके | सौंदाळा
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ सौंदाळा,

सेमिनार साठी एखादा विषय घेऊन पेपर लिहायचो त्याची आठवण झाली.

हा देखील तसाच काहिसा प्रकार आहे 😀
'मेकिंग ऑफ हिंगपुराण' मध्ये लिहिण्यासारखं फार काही नाही, पण मागच्या भागावर दिलेल्या एका प्रतिसादात ह्या पुराणाच्या जन्माचे बिज कशातुन पेरले गेले ते लिहिलंय!

सुबोध खरे's picture

7 Aug 2023 - 12:09 pm | सुबोध खरे

The scientist said that around 6,000 plants are now also being grown in other high-altitude areas of the state besides Lahaul, including parts of Kinnaur, Chamba and the Janjehli valley in Mandi.

IHBT’s director Dr Sanjay Kumar said that India currently imports Hing worth nearly Rs 1,000 crore from Iran, Afghanistan and Uzbekistan.

https://indianexpress.com/article/cities/shimla/taking-roots-in-high-hil...

टर्मीनेटर's picture

7 Aug 2023 - 4:46 pm | टर्मीनेटर

हा पुढचा अपडेट
“By now, we have planted F assafoetida over 3.5 ha in Himachal Pradesh (Lahaul and Spiti, Mandi, Kullu, Kinnaur and Chamba districts), Uttarakhand (Chamoli), Ladakh (Ranbirpur, Leh) and Jammu and Kashmir (Kistwar, Doda and Rajouri districts),” says Ashok Kumar, senior scientist at the agro-technology division of IHBT.
https://www.downtoearth.org.in/news/agriculture/tantalising-wait-will-in...

आता ह्या प्रयोगांची व्याप्ती अजुन वाढवताना 'अरुणाचल प्रदेश' मध्येहि प्रयोगिक लागवड केल्याचे ऐकुन आहे पण त्याला दुजोरा देणारी बातमी वाचायला मिळाली नसल्याने त्याचा उल्लेख नाही केला!

प्रचेतस's picture

7 Aug 2023 - 12:28 pm | प्रचेतस

जबरदस्त लेखमाला झाली ही.
हिंगाच्या अथपासून इतिपर्यंत सर्व माहिती तपशीलवार समजली. चिमूटभर हिंगाचे विविध देशांमधील उपयोग एकदम भारी. आपल्या देशामध्ये हिंग लागवडीला यश मिळेलच असे वाटते.

टर्मीनेटर's picture

7 Aug 2023 - 6:14 pm | टर्मीनेटर

आपल्या देशामध्ये हिंग लागवडीला यश मिळेलच असे वाटते.

🙏
येस्स! यश मिळायलाच हवे अशी फार फार इच्छा आहे, पण स्वदेशी हिंग निर्मितीच्या प्रयोगाला सुरुवात झाल्यावर 'द डॉलर बिझनेस' ह्या मासिकने अनेक पिढ्यांपासुन हिंगाच्या आयात, प्रक्रिया आणि विक्रिचा अनुभव असलेल्या काही आघाडिच्या हिंग व्यावसयिकांच्या मुलखती घेतल्या होत्या त्यात त्यांनी व्यक्त केलेली मतेही विचारप्रवर्तक आहेत!

त्यांच्या म्हणण्याचा एकत्रीत सारांश असा (स्वैर भाषांतर),

"स्वदेशी हिंग निर्मितीचे प्रयोग नक्कीच प्रशंसनीय आहेत पण त्यांची सुरुवात मात्र खुप विलंबाने झाली. भारतात बहुतांश हिंगाची आयात अफगाणिस्तानातुन होते आणि हा देश भुवेष्टीत (Land Locked) असल्याने तिथुन एकतर थेट हवाईमार्गे किंवा इराणच्या बंदरांपर्यंत भुमार्गे आणि तिथुन समुद्रमार्गे त्याची आयात करावी लागत असल्याने वाहतुक खर्च जास्त होतो पर्यायाने हिंगाची किंमतही वाढते. त्यात तिथे राजकिय उलथापालथ, युध्दजन्य, अंतर्गत यादवी सारखी परिस्थिती उद्भवली की पर्यायी मार्गांची निवड करावी लागते त्याचा पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो, किमती वाढतात.
अशा अनेक कारणांसाठी आम्ही गेल्या काही दशकांपासुन सरकार दरबारी ही मागणी लाउन धरली होती. त्यासाठी काही किरकोळ प्रयत्नही झाले नाही असे नाही, पण ह्या गोष्टीकडे फारसे गांभिर्याने पाहिले गेले नव्हते. २००७ ते २०१६ ह्या दहा आर्थिक वर्षांत भारतात हिंगाची आयात तब्बल ३८४.२६ टक्क्यांनी वाढल्यावर मात्र परिस्थिती बदलली.

सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो आणि ते प्रयत्न यशस्वी होण्याची सदिच्छाही बाळगतो पण 'फेरुला असाफोटीडा' ही रानटी वनस्पती आपल्या इथल्या वातावरणात कितपत टिकाव धरु शकेल आणि प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष हिंगोत्पादनाला सुरुवात झाल्यावर तयार होणारा हिंग आपल्याकडे सर्वाधीक मागणी असलेल्या 'काबुली सुफैद' ह्या अफगाणी हिंगाच्या दर्जाची बरोबरी करु शकेल कि नाही ह्याविषयी साशंकही आहोत".

बघुयात दोन वर्षांनी काय निकाल येतो ते, तो पर्यंत आशावादी रहाणे तेवढे आपल्या हातात आहे!

त्या त्या ठिकाणच्या वातावरणात फरक असतोच तरीही भारतात सर्वच प्रकारचे वातावरण असल्याने हा प्रयोगही यशस्वी होईल असे वाटतेय.

"भारतात सर्वच प्रकारचे वातावरण असल्याने हा प्रयोगही यशस्वी होईल असे वाटतेय."

हो, भारताला सर्व प्रकारच्या हवामानाची निसर्गदत्त देणगी लाभली आहे! पण सध्या निसर्ग फारच लहरी स्वभावाचा झाला आहे 😀
ह्या बहुवर्षीय वनस्पतीसाठी पोषक असलेल्या इराणच्या प्रदेशातील हवामानाशी मिळते जुळते हवामान असल्याने प्रथम प्राधान्य देण्यात आलेल्या लाहौल-स्पितीचे उदाहरण बघता निसर्ग आता ह्या प्रयोगात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची आणि शास्त्रज्ञांची परीक्षा बघतोय कि काय असे वाटते. लागवडीस सुरुवात झाल्यावर एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी हिमवर्षाव, जुलै महिन्यात झालेली विक्रमी पावसाची नोंद अशा असामान्य गोष्टी ह्या वनस्पतीला मानवणाऱ्या नाहीत.
अर्थात निसर्गाच्या कोपामुळे अनेक रोपे मेली असली तरी त्यामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने नवीन रोपांची लागवड करून त्यातल्या सरासरी साठ टक्के रोपांची समाधानकारक वाढ करण्यात यशस्वी झालेल्या शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे त्यासाठीच कौतुक वाटते!

पुढची सुमारे दोन वर्षे 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' ह्या संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक कुमार ह्या दोघांच्या अथक परिश्रमांचे फलस्वरूप म्हणून बीजांकुरणाचे प्रमाण शंभरपैकी दोन वरून साठ पर्यंत वाढवण्यात यश मिळाले

प्रचंड बौद्धिक मेहनत _/\_

सदर संशोधन कमालीची गोपनीयता पाळून केले जात असल्याने त्याचे तपशील उपलब्ध नाहीत, केवळ चिलिंग आणि हॉर्मोनल ट्रीटमेंट बद्दलचे त्रोटक उल्लेख तेवढे वाचायला मिळाले आहेत त्यामुळे बॉटनी विषयक शून्य शास्त्रीय ज्ञान असलेल्या माझ्यासारख्या वाचकांना 'वनस्पती उती संवर्धनाबद्दल' आणखीन माहिती वाचायला आवडेल. प्रतिसादात ती माहिती देणे शक्य नसल्यास कृपया त्यावर स्वतंत्र लेख लिहावा अशी विनंती 🙏

टर्मीनेटर's picture

9 Aug 2023 - 11:47 am | टर्मीनेटर

जेब्बात!
पुरवणीत सोप्या भाषेत ग्राफ सहित उलगडून सांगितलेल्या शास्त्रीय माहितीसाठी आभार 🙏
पुरवणीची लिंक धाग्यात अपडेटवली आहे 👍

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Aug 2023 - 11:40 am | राजेंद्र मेहेंदळे

प्रथम तुमच्य चिकाटी आणि अभ्यासु वृत्तीला दंडवत _/\_ चिमुटभर हिंगामागे ईतके मोठे पुराण असेल असे कधीच वाटले नव्हते. जरी जालावर सगळी माहिती उपलब्ध असली तरी ती सर्व एकत्रित करणे आणि क्रमवार लावुन रंजकतेने वाचकांसमोर सादर करणे हे एक मोठेच वेळखाउपणाचे काम आहे. ते तुम्ही जिद्दीने पार पाडलेत आणि आम्हाला ही मेजवानी दिलीत त्या बद्दल घन्यवाद!!

अत्यंत माहितीपूर्ण लेखन ! ३ ही भाग वाखू म्हणुन साठवले आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jain - Makeba (Official Video)

रंगीला रतन's picture

13 Aug 2023 - 8:48 pm | रंगीला रतन

झक्कास झाली लेखमाला.
पुलेशू.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Aug 2023 - 3:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला आवडली (पुरवणी सकट)
लिहिते रहा,
पैजारबुवा,

श्वेता व्यास's picture

16 Aug 2023 - 5:15 pm | श्वेता व्यास

हिंग पुराण खूपच आवडले.
फोडणीतल्या चिमूटभर पदार्थामागे इतका इतिहास असेल असं कधी मनातसुद्धा आलं नाही.
हिंग सैंधव मिठाचाच भाऊ असेल असं वाटलं होतं.
इतकं अभ्यासपूर्ण लेखनसुद्धा ओघवतं लिहिणं कसं जमतं तुम्हाला, एका बैठकीत तिन्ही अध्याय वाचले.

टर्मीनेटर's picture

20 Aug 2023 - 11:48 am | टर्मीनेटर

राजेंद्र मेहेंदळे | मदनबाण | रंगीला रतन | ज्ञानोबाचे पैजार | श्वेता व्यास
उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

स्नेहा.K.'s picture

27 Aug 2023 - 11:16 pm | स्नेहा.K.

सगळे अध्याय वाचले,छान माहिती मिळाली!