अमेरिका २- बावळट आम्ही..!!

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
6 Aug 2023 - 10:17 am

'खुदके गली मे कुत्ता भी शेर होता है ।' असा कुण्या एका हिंदी सिनेमामध्ये डायलॉग होता. पण आपल्या घरात-कामात-गावात 'शेर' नसलो तरी काहीतरी साध्य केलेल्या आमच्यासारख्या पालकांना 1-2 टक्के ते 100 % इन्फिरीएरीटी कॉम्प्लेक्स इथे आल्यावर येत असणार. याची झलक खरंतर एअरपोर्टला आल्यावरच सगळ्या भारतीय आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसायला लागते. भारतातून निघतानाच ठासून भरलेल्या बॅगा, वजनाला जास्त झालं की विमानतळावर होणारे चेक इन बॅगेतून 'वस्तूहरण' आणि केबिन बॅगेमध्ये 'वस्तूभरण' होते. नव्याने घेतलेल्या बुटांमधून अवघडत चालणार्या, मुद्दाम परदेश प्रवासासाठी घेतलेली नवी पर्स सांभाळणाऱ्या आया लगेच ओळखू येतात. बाबा लोक पेहरावात सराईत असले तरी मुंबई एअरपोर्टवर बाळगत आणलेला कोट, वजन काट्यावर जायला नको म्हणून अंगावर घालून अधिकच फुगलेले असतात. त्यांच्याकडे दोघांचे पासपोर्ट, तिकीटे सांभाळणे हे प्रमुख आणि बावचळलेल्या बायकोला योग्य क्यूमधून अपेक्षित दारापर्यंत नेणे हे दुय्यम काम नेमून दिलेले दिसते. विमान प्रवासातही हे आई-बाबा वेगळे कळतात, दिसतात, समजतात.

इथे उतरल्यावर एखाद्या जाणकार वाटणाऱ्या व्यक्तीच्या मागे चालताना अचानक रेस्ट रूम दिसते आणि वाटाड्याचा नाद सोडून आधी नैसर्गिक सादाला प्रतिसाद देण्यासाठी पावलं थांबतात. ते कर्म होताच आपल्या बॅगा इतर कोणी नेणार तर नाहीत ना? या शंकेने त्रस्त होऊन बॅगांच्या सरकत्या पट्ट्याकडे आई-बाबा चालू लागतात. खुणेसाठी बांधलेल्या लाल/गुलाबी रिबीनच्याच असंख्य बॅगा बघून आपण 'हुशार' नसून 'बावळट आणि सामान्य' आहोत याचा पहिला साक्षात्कार होतो. एक निळी आणि एक काळी बॅग आहे आपली! असं सांगणाऱ्या मातेची असंख्य निळ्या छटा आणि आवाढव्य काळया बॅगा पाहून बोलती बंद होते. एअरपोर्टवरील वायफाय झोन मध्ये आल्याने परदेशस्थ मुलं चौकशी करत असतात. आपलं बाळ भेटणार म्हणून आनंद होत असतो.. तर बॅगा हरवल्या तर कसं करायचं याच्या टेन्शनमुळे चेहरे अधिकच बावळट दिसायला लागतात.

मुलं एअरपोर्ट बाहेरून सूचनांचे डोस देत असतात/ त्रास नाही ना झाला प्रवासाचा असे विचारत असतात/ मला इथं फार वेळ कार घेऊन थांबू देत नाहीत असं सांगून भीतीची लाट निर्माण करत असतात. सर्व बॅगा अवतरल्या आणि प्राप्त झाल्या की बॅगांना हाकारत बाहेर पडलं की झालं असं वाटत असतानाच 'इमिग्रेशन' काउंटरसाठी देशानुसार वेगवेगळे क्यु असतात. आपला नंबर येईपर्यंत आधीच्या व्यक्तीचे निरीक्षण सुरू होते. काहीजण पासपोर्ट देतात आणि काही शब्दात अलगद सुटतात, तर काहीजण लांबलेल्या तोंडी परीक्षेसाठी खूप काही बोलून काचेपलीकडच्या माणसाला/बाई माणसाला जीवतोड काहीतरी समजवण्याच्या प्रयत्नात असतात. 'बाईच बाईचं मन जाणेल' अशी आशा वाटणाऱ्या आयांना कळतं की सगळे गडी 'लै पक्के' आहेत. आपला नंबर येतो - इंग्लिश मधील त्यांचा प्रश्न आणि आपण इंग्रजी शब्दांची शोधाशोध करून जुळवलेलं उत्तर, त्यांच्या चेहऱ्यावरचे अगम्य भाव आणि पुढचा प्रश्न ! या अमेरिकन आणि भारतीय इंग्लिशच्या झटापटीत आपण ब्रिटिशांवर सुड उगवतो. इंग्लिशची चिरफाड करून चेहरा बावळटपणासोबत रडवेला, भेसूर, केविलवाणा दिसायला लागतो. 'चेहरा दिल का आईना होता है।' आपला बावळटपणा ओसंडून वाहत असल्याने आणि आपण निरूपद्रवी असल्याची साक्ष पटल्याने आपण जिंकतो.. ऑफिसर स्वागतपर वाक्य फेकत पासपोर्ट पुन्हा आपल्याला परत देतो. आपल्या चेहऱ्यावर आता 'हुश्श...!' असे भाव उमटतात.. आणि परीक्षेत वरच्या श्रेणीत पास झाल्याचा आनंद पसरतो.

बाहेर ताटकळणाऱ्या बाळाला किंवा बाळीला भेटलो की परदेशवारीच सार्थक होणार असतं... फोन लावून बाहेर यायला लागलो की मूल सांगते 'तुम्ही दिसताय मला..तसेच पुढे.. तसेच बाहेर या !' आनंदाच्या भरात आपण काचेपलीकडे पाहायला लागतो...पण काचेच्या अलीकडे मात्र डोळ्यातल्या पाण्याचा पडदा आड येऊ लागतो.

मांडणीसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2023 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाही भाग खुसखुशीत. लेखन भाग योग्य ठीकाणी पॉज घेतात.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

निमी's picture

8 Aug 2023 - 3:18 pm | निमी

आपल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे

प्रचेतस's picture

6 Aug 2023 - 1:18 pm | प्रचेतस

मस्त लिहिताय.

वामन देशमुख's picture

6 Aug 2023 - 3:21 pm | वामन देशमुख

हा भाग ही संपूर्ण आवडला.
शेवटचं वाक्य ही आवडलं.

निमी's picture

8 Aug 2023 - 3:19 pm | निमी

धन्यवाद

आनन्दा's picture

6 Aug 2023 - 6:15 pm | आनन्दा

सुंदर लेखन....

चित्रगुप्त's picture

6 Aug 2023 - 10:52 pm | चित्रगुप्त

हा दुसरा भागही आवडला.
भारतात आणि अन्यत्रही विमानतळावर फुकट उपलब्ध असलेली ट्रॉली अमेरिकेत मात्र सात डॉलर खाचेत टाकून सोडवून घ्यावी लागते (अगदी आजच्या तारखेचे माहीत नाही, पण मागल्या वर्षीपर्यंत असे होते) हे लक्षात ठेऊन भारतातून निघतानाच सुट्टे सात/चौदा डॉलर खिशात तयार ठेवावे लागायचे.
आणखी एक म्हणजे आपण साठीपारचे असू तर दोघांपैकी एकासाठी तरी 'व्हीलचेयर' घेणे. यामुळे खूपच सोय होते. अनेक अडचणीतून सहजी सुटका होते, लांब रांगेत लागावे लागत नाही, इमिग्रेशन सहजतेने होते, व्हीलचेयरवाल्याच्या फोनने मुलांशी संपर्क करता येतो, पटापट लिफ्ट आणि स्पेशल दरवाज्यातून जाता येते वगैरे.
-- तुमचा हा प्रवास केंव्हा झालेला आहे, आणि कोणता शहरात पहुचण्यासाठी?

इमिग्रेशनवाला विचारेल त्या (त्याच) प्रश्नांची थोडक्यात अगदी नेमकी उत्तरे देणे आवश्यक असते. थोडा शहाणपणा दाखवण्याचा चुकूनही प्रयत्न झाला तरी पंचाईत होऊ शकते. "आमचा मुलगा इथे असतो" असे म्हटले तर "सो व्हॉट ?" असे विचारले जाते. मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडेच उतरणार, हे अमेरिकन संस्कृतीत गृहित धरले जात नाही. मुलगा कोणत्या कंपनीत काम करतो, त्याचा पत्ता वगैरे लिहीलेला कागद हातात तयार ठेवणे उपयोगी असते. तसेच भारतातून आपण आणलेले पदार्थ, उदा. भाजणी, घरचा चिवडा, दही-दुधाच्या वड्या, मेथीचे लाडू, शंकरपाळी, सत्तूचे पीठ, साबुदाण्याच्या पापड्या, बाळंतशोपा, बाळाची गुटी, वगैरेंना इंग्रजीत काय म्हणतात ते त्या त्या पुडक्यावर इंग्रजीत मार्करने लिहून ठेवणे योग्य. ऐन वेळी इंग्रजी शब्द माहित असूनही आठवत नाहीत.

कर्नलतपस्वी's picture

7 Aug 2023 - 6:28 am | कर्नलतपस्वी

काही नाही पण भाषा,नवे वातावरण, हौश्या नवश्या नीं जाण्यापूर्वीच घेतलेले बौद्धिक व सुरक्षाविषयक घेतलेली काळजी, माहितीचा अभाव याने त्रेधातिरपीट व घालमेल जरूर होते.

सामानाच्या लाल निळ्या पेट्या थोक भावात बनवल्या असल्याने स्वताचे वेगळे टॅग, यात फार काही करता येत नाही. डोक्‍यात पेट्यांचे चित्र असते त्यामुळे सुप्त मन याची काळजी घेते.

पहिल्यांदाच जाताना अप्रूप वाटते नंतर मात्र वैताग येतो.
बाकी मस्त लेख.

माझे आपले मत,स्वताच स्वताला विशेषणे लावू नयेत.

एक ही उल्लू काफी है चमन उजाडने के लिए
यहाँ तो हर शाख पे उल्लू बैठा है.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Aug 2023 - 9:58 am | राजेंद्र मेहेंदळे

दोन्ही भाग वाचले. छान लिहीले आहेत. ऐशीच्या दशकापासुन अमेरिकेत असलेल्या मुला/मुलीला भेटायला किवा सुनेच्या बाळंतपणाला जायचा ट्रेंड बहरला. त्याचे हे प्रातिनिधिक रुप म्हणावे लागेल. एकुण लेखातील भावनांशी सहमत. पुढे पुढे तिकडची स्वच्छता,टापटिप याबरोबरच पराकोटीची स्वमग्न जीवनशैली, व्यक्ती स्वातंत्र्य, एकटेपणा सारखे विषयही लेखात यावेत अशी अपेक्षा.

मिपावर स्वागत.

या लेखमालेमध्ये पुढील भागात आपल्याला यातील किमान काही विषयावर वाचायला अवश्य मिळणार आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

जुइ's picture

7 Aug 2023 - 11:35 pm | जुइ

या सगळ्या अनुभवातून काही वर्षांपूर्वी गेले असल्याने रिलेट होवू शकत आहे. लिहित राहा आणि मिपावर आपले स्वागत आहे.

निमी's picture

8 Aug 2023 - 3:22 pm | निमी

मनःपूर्वक धन्यवाद

चौकस२१२'s picture

8 Aug 2023 - 3:10 am | चौकस२१२

मला इथं फार वेळ कार घेऊन थांबू देत नाहीत असं सांगून भीतीची लाट निर्माण करत असतात. हहपुवा
पैसे वाचवण्याचे चे धंदे.. दूस र काय...
कधी नव्हे ते आई वडील आले असतील तर रीतसर पार्किंग करून आत येत येत नाही असल्या कद्रुनां

रीतसर पार्किंग करून आत येत येत नाही असल्या कद्रुनां

त्यातल्या त्यात स्वस्त पार्किंग भरपूर दूर असते, जवळचे बरेच महाग. दुसरे म्हणजे त्या पार्किंगापर्‍यंत अवजड ब्यागा वाहून न्याव्या लागतात, त्यापेक्षा बरोबर वेळ साधून अल्प काळासाठी गाडी 'निर्गमद्वारा'समोर थांबवून पटकन कार्यभाग उरकणेच सोयीचे पडते. हा अनुभव जगभरातील सर्वच विमानतळांवर येत असणार.

चौकस२१२'s picture

8 Aug 2023 - 5:52 am | चौकस२१२

माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता कि येणारा प्रवासी जर लेखात वर्णन केल्याप्रमाणे भाम्बवलेला आणि नवखा असेल तर घ्यायला येणार्याने एवढे तरी कारायाला पाहिजे ,, तेवढे परवडते .. राहता राहीला मुद्दा अंतर चालण्याचा ,, त्यावर हि उपाय आहे ( स्व अनुभवातून) जर प्रवासी असा नवखा असेल तर आधी त्याला भेटायचे मग बाहेर न्यायचे आणि स्वतः चालत जाऊन पार्क केलेली गाडी घेऊन यायची ..
प्रवासी अनुभावी असेल तर मग "आलास का / ग " असे विचारून एकदम बाहेर यायला सांगणे आणि असे पार्किंग चे पैसे वाचवायला काहीच हरकत नाही

चित्रगुप्त's picture

8 Aug 2023 - 7:27 am | चित्रगुप्त

प्रवासी असा नवखा असेल तर आधी त्याला भेटायचे मग बाहेर न्यायचे आणि स्वतः चालत जाऊन पार्क केलेली गाडी घेऊन यायची

बरोबर आहे तुमचे म्हणणे.
मी सर्वात आधी १९८४ साली अमेरिकेला ऑफिसकडून गेलो होतो, तेंव्हा तिकडला अमेरिकन घ्यायला आला होता. त्याकाळी मोबाईल वगैरेचा प्रश्नच नव्हता. मात्र आम्ही एकमेकांना कसे ओळखले वगैरे आता काहीच लक्षात नाही. तेंव्हा भारतीय उपहारगृहात सगळ्यात स्वस्त पदार्थ म्हणजे दहीभात १५० रुपयांना पडत होता, ते बघून आल्यापावली मी परत येऊन केळी वगैरे घेऊन खाल्ल्याचे आठवते. (तेंव्हा माझा मासिक पगार सुमारे एक हजार रुपये असावा) पुष्कळ वर्षांनंतर मुले परदेशी राहू लागल्यावर जेंव्हा त्यांच्याकडे जाऊ लागलो, तत्पूर्वी माझे एकट्याने बरेच प्रवास झालेले असल्याने सवय झालेली होती. असो.
-- सदर धागाकर्तीने दोन्ही लेख प्रकाशित केल्यानंतर धाग्यावर एकदाही हजेरी लावलेली नसल्याचे बघून आश्चर्य वाटत आहे. अगदी प्रत्येक प्रतिसादाला 'धन्यवाद' वगैरेची गरज नसली तरी निदान एकादा तरी प्रतिसाद देणे, कुणी काही पृच्छा केली असेल तर त्याला उत्तर देणे हे अपेक्षित असते.

हुशार जाणकार वाचकांची माफक अपेक्षा सुयोग्य आहे..धागाकर्ती तांत्रिक धाग्यात अडकली होती. तंत्रज्ञ घरच्यांच्या मदतीने लेख पाठवण्याचे काम करत आहे.. तरी कृपया समजून घ्यावे. प्रतिसाद लेखन आज तरी जमले आहे.
जमेल तसे अवश्य करेन.

कंजूस's picture

8 Aug 2023 - 11:23 am | कंजूस

यातून जायचे आहे अजून. पण बहुतेक नाहीच. त्यामुळे बाजूला होतो.

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2023 - 6:15 pm | चौथा कोनाडा

झकास ... खुसखुषीत ... लै भारी

काहीजण लांबलेल्या तोंडी परीक्षेसाठी खूप काही बोलून काचेपलीकडच्या माणसाला/बाई माणसाला जीवतोड काहीतरी समजवण्याच्या प्रयत्नात असतात. 'बाईच बाईचं मन जाणेल' अशी आशा वाटणाऱ्या आयांना कळतं की सगळे गडी 'लै पक्के' आहेत. आपला नंबर येतो - इंग्लिश मधील त्यांचा प्रश्न आणि आपण इंग्रजी शब्दांची शोधाशोध करून जुळवलेलं उत्तर, त्यांच्या चेहऱ्यावरचे अगम्य भाव आणि पुढचा प्रश्न ! या अमेरिकन आणि भारतीय इंग्लिशच्या झटापटीत आपण ब्रिटिशांवर सुड उगवतो. इंग्लिशची चिरफाड करून चेहरा बावळटपणासोबत रडवेला, भेसूर, केविलवाणा दिसायला लागतो. 'चेहरा दिल का आईना होता है।' आपला बावळटपणा ओसंडून वाहत असल्याने आणि आपण निरूपद्रवी असल्याची साक्ष पटल्याने आपण जिंकतो.. ऑफिसर स्वागतपर वाक्य फेकत पासपोर्ट पुन्हा आपल्याला परत देतो. आपल्या चेहऱ्यावर आता 'हुश्श...!' असे भाव उमटतात.. आणि परीक्षेत वरच्या श्रेणीत पास झाल्याचा आनंद पसरतो.

अशा मार्मिक आणि हलक्या फुलक्या तुलनांनी मजा आली !

पु भा वा प्र

धन्यवाद..तुमच्या शुभेच्छा माझ्यासारख्या मिपावरील नवीन सदस्याला इतर कामातून मुद्दाम सवड काढून लिखाणाला प्राधान्य द्यायला उद्युक्त करतात.. मनःपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा.