नवल.
जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे..
फारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते हाती आलं होतं... पुस्तकाची बांधणी, मुखपृष्ठ, ब्लर्ब, फॉंट आणि बुकमार्कसाठीची स्ट्रीप हे सगळं एवढं सुंदर आहे की पुस्तक हातात घेतल्यावर लगेच जाणवलं की काहीतरी कुलवंत असा प्रकार असणार आहे हा..!
कादंबरीची थीम म्हणाल तर, सोनकुळे आडनावाचा, एक अत्यंत चांगली ॲकॅडमिक गुणवत्ता असलेला तरूण खानदेशातून पुण्यात ग्रॅज्युएशनसाठी येतो, त्याच्या जगण्याचा तुकडा आहे हा..
ह्या सोनकुळेचा सगळा भावनाप्रदेश/विचारप्रदेश त्याच्या वर्तमानातून,आठवणींतून, स्वप्नांतून तसेच स्वतःशी मनसोक्त आणि इतरांशी माफक संवादांतून मांडलेला आहे...
कादंबरीत फारशी पात्रं किंवा घटना नाहीत.
कादंबरी त्याच्या ग्रॅज्युएशनच्या दिवसांत घडत असली तरीही अधूनमधून त्याच्या शाळेतल्या दिवसांच्या आठवणीही येत राहतात, ज्या राखेखाली दबलेल्या जालीम निखाऱ्यांसारख्या आहेत, पण त्या निखाऱ्यांची धग स्वतःच्याच आतल्या दिशेने वळणारी आहे.
हा माणूस स्वतःचे विचार, शारीर हालचाली, कृती एवढ्या अलिप्त सजगपणे टिपून त्यांची कलाकुसर आपल्यापुढे ठेवतो की मराठीत तरी ह्या तोडीचं, एवढं वैयक्तिक असं, इतर कुणी लिहिलंय असं वाटत नाही.. कदाचित लेखकाला तत्वज्ञान आणि मानसशास्त्रामधलं अतिशय स्ट्रॉंग ॲकॅडमिक बॅकग्राऊंड असल्यामुळेही ही सगळी भट्टी जमून आलेली असावी.
हा सोनकुळे माणूस फार फार अंतर्मुख आणि स्वतःच्या 'असण्याच्या' कोशात गुप्त राहण्यात बरं वाटणारा आहे... त्याच्या कोशात जसजसे आत शिराल तसतसा तुमचा मूड होत्याचा नव्हता होण्याचे चान्सेस आहेत.. पण म्हणून लगेच कुतुहलाचा किंवा मानवतावादी सहानुभूतीचा बुरखा पांघरून त्याला त्याच्यातून बाहेर काढायची तुम्हाला इच्छा झालीच तर टोटल फेल्यूअरची तयारी ठेवावी लागेल..!
एक-दोन बैठकीत संपण्यासारखा हा प्रकार नाही, हे पहिल्या दोन-तीन पानांतच कळलं... कारण पॅराग्राफच्या पॅराग्राफ, वाक्यामागून वाक्यं एवढी अर्थगर्भ, अर्थानं ओतप्रोत भरलेली, छोटी छोटी मग्न वाक्यं आहेत की आपण कधी त्यांचं बोट धरून त्यांच्यासोबत चालायला लागतो ते कळत नाही..
शिवाय लेखकाची मराठी भाषेची समज एवढी जातिवंत आहे की कुठंही शब्दांचा किंचितही वायफळ वापर दिसत नाही.. हां, पण एकेका शब्दाशी लडिवाळपणे खेळणं जरूर आहे..!!
तसं बघायचं झालं तर ही कादंबरी नाहीच आहे..!
निवांत पसरलेल्या अजगरासारखी विस्तीर्ण अशी तीनशे पानांची लांबलचक कविताच आहे ही..!!
अजगर विळखा घालतो, इथपर्यंत ठीक आहे.
पण कहर म्हणजे ह्या अजगराला मोठमोठे पंखही आहेत... सुरुवातीला आपण गुंगावतो, आपल्याही नकळत शैलीच्या त्या जादूवर स्वार होतो..
आणि ''आईशप्पथ..! कसलं सही लिहिलंय यार हे..!'' असं म्हणत म्हणत उंच उंच वरती निळ्याशार पोकळीत जात राहतो त्याच्याबरोबर...
आणि मग मध्येच एखादी अशी ओळ किंवा पॅराग्राफ येतो की सपकन् आपले सगळे आधारच काढून घेतले जातात... घावच डायरेक्ट..! काही दयामाया नाही..! तुमचं नंतर काय होईल तो तुमचा प्रश्न..! जगा मरा किंवा काय करता ते करा..!
असा सगळा प्रकार..
म्हणजे, आपण त्या भावना आणि विचारप्रवाहातून शांतपणे एकटेच आपली नौका वल्हवत चाललेलो असतो आणि कधीतरी मध्येच एखाद्या पानावर मुक्या वेदनेची लखलखीत धार दाखवणारे शब्द येतात, ज्या शब्दांत बारूद ठासून ठासून भरलेला असतो..!
ह्या कादंबरीतलं बरंचसं चित्रण पुणे आणि 'महालगाव' इथल्या परिसरांचं आहे.. तिथं निरूद्देश चालणाऱ्या सोनकुळेच्या पार्श्वभूमीवर एका परिपक्व घाटदार शांततेचं अस्तित्व जाणवत राहतं... भोवतालाशी कसं एकतान व्हायचं, याबद्दलची वर्णनं अत्यंत तरल अशी आहेत की ते सगळंच्या सगळं पहिल्याच वाचनात टिपायचं म्हटलं तर ओंजळीत जागा राहत नाही आणि आपण जास्तच हावरेपणा करायला गेलो तर महत्वाचं काहीतरी निसटून जाण्याची रिस्क आहे..
पूर्वी एकदा ज्ञानेश्वरांची एक ओवी वाचली होती, (जी मला आत्ता आठवत नाहीये, पण) जिचा अर्थ साधारण असा आहे की आपण कधी एकटेच असताना समजा बराच वेळ आरशात पाहून झाल्यावर आपण जेव्हा आरशापासून दूर होतो, तेव्हा सेकंदभर वाटत राहतं की कुणीतरी पाहतंय आपल्याला.. आणि ते नेमकं काय फीलींग असतं ते आपल्याला कुणापर्यंत पोचवता येत नाही, कारण ते शब्दांमध्ये डिफाईनच करता येत नाही.. मग आपण नाद सोडून देतो आणि म्हणतो की जाऊ द्या, आपलं आपल्याला कळलं एवढं पुरेसं आहे... असा प्रकार.
एरव्ही मला खोड आहे की एखादं पुस्तक निम्मं अर्धं वाचून झाल्यावर पुढे पुढे मी अधलामधला पॅराग्राफ स्कीप करायला लागतो.. कारण कितीही चांगली पुस्तकं असली तरी मध्ये मध्ये थोडीफार सपाट होतात.. पण 'नवल'ची ओळ ना ओळ, अगदी विरामचिन्हांसकट सगळा मजकूर, पूरवून पूरवून शोषून घ्यावासा वाटलेला आहे आणि जेव्हा सगळं वाचून संपवलं तेव्हा, बरं वाटायच्या ऐवजी, आपल्यातून काहीतरी काढून घेतलं गेल्याचं फिलींग यायला लागलं आणि ही एक भलतीच भानगड झाली म्हणावं लागेल..!
तळटीप: ह्याला पुस्तक परिचय म्हणता येईल की नाही माहित नाही.. बहुदा नाहीच.. कारण त्यासाठी जी एक किमान दर्जाची तटस्थता लागते, तिचा अभाव स्पष्टच दिसतो आहे.. त्यामुळे हे खूपच भारावून जाऊन लिहिलं गेलंय, असंही असू शकतं...!
त्यामुळे भविष्यात ह्या पुस्तकाबद्दलचा अभिप्राय किंवा चहुअंगांनी परीक्षणाचा धागा कुणी जाणकारांनी लिहिला तर तो वाचायला नक्की आवडेल..
प्रतिक्रिया
25 Jul 2021 - 11:27 am | आनन्दा
मला क्षणभर वाटलं की निसो परत आलेत की काय..
बाकी छान लिहिलंय. बघायला हवं पुस्तक!
25 Jul 2021 - 11:43 am | चौथा कोनाडा
पुस्तकाची समर्पक ओळख !
रसग्रहणाची शैली आवडली !
पूर्वी एकदा ज्ञानेश्वरांची एक ओवी वाचली होती, (जी मला आत्ता आठवत नाहीये, पण) जिचा अर्थ साधारण असा आहे की आपण कधी एकटेच असताना समजा बराच वेळ आरशात पाहून झाल्यावर आपण जेव्हा आरशापासून दूर होतो, तेव्हा सेकंदभर वाटत राहतं की कुणीतरी पाहतंय आपल्याला.. आणि ते नेमकं काय फीलींग असतं ते आपल्याला कुणापर्यंत पोचवता येत नाही, कारण ते शब्दांमध्ये डिफाईनच करता येत नाही.. मग आपण नाद सोडून देतो आणि म्हणतो की जाऊ द्या, आपलं आपल्याला कळलं एवढं पुरेसं आहे... असा प्रकार.
व्वा, छानच !
25 Jul 2021 - 3:18 pm | गॉडजिला
नक्कीच बघावे लागेल पण तूर्त मला पुस्तकं नेमकं काय आहे याचा हवातसा अंदाज आलेला नाही, कदाचित तुमचा भारावलेपणा ओळख किंचीत पुसट करत आहे पण ते एका अर्थाने पुस्तकाचेच यश आहे :)
25 Jul 2021 - 10:13 pm | पाटिल
आनन्दा, चौथा कोनाडा प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!
गॉडजिला,
नेटवर 'नवल' बद्दल आणखी एक लिंक सापडली, त्यावरून कदाचित तुम्हाला आणखी थोडी आयडीया येईल... जरूर वाचून पहा..
https://kolaj.in/published_article.php?v=naval-novel-by-prashant-bagad-r...
26 Jul 2021 - 9:23 am | Bhakti
आईशप्पथ..! कसलं सही लिहिलंय यार हे..!
तुमच्या या पुस्तक परिचयाबद्दल असेच म्हणते.26 Jul 2021 - 10:33 am | सौंदाळा
लेख छान आहे
पुस्तक ओळख वाचुन ' कोसला' ची आठवण झाली. त्या प्रकारचेच पुस्तक आहे का?
26 Jul 2021 - 11:22 am | पाटिल
धन्यवाद भक्ती, सौंदाळा.. :-)
कोसला च्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय.. 'शंभरातील नव्व्याण्णवांस..'
नवल च्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय... 'एखाद्यास..'
काही बाबतीत कोसला आणि नवल तोडीस तोड आहेत... नवल ची शैली, भाषेची जादू थोडी सरसच आहे..
पण अर्थात सोनकुळेची आणि सांगवीकरची जातकुळी/पिंड वेगवेगळा आहे...
सांगवीकर ज्याप्रमाणे 'सगळ्या'लाच नकार देत असतो, चिमटे/विसंगती काढत असतो...
तसं ह्या सोनकुळेचं नाही.. तो 'माझं मला स्वतःपुरतं राहू द्या.. तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका' ह्या प्रकारातला आहे...
26 Jul 2021 - 1:15 pm | Bhakti
काही बाबतीत कोसला आणि नवल तोडीस तोड आहेत... नवल ची शैली, भाषेची जादू थोडी सरसच आहे.. सरस असेल तर चांगलं ,कारण मला कोसला फार आवडली नाही.
26 Jul 2021 - 3:23 pm | सौंदाळा
+१
कोसला मला तर अजिबातच आवडली नाही, कशीबशी वाचून संपवली
26 Nov 2022 - 1:36 pm | अनुस्वार
ओळख अशी करून द्यावी की समोरच्याला भेटीची उत्कंठा लागावी.
लवकर वाचेन आता.
धन्यवाद.
26 Nov 2022 - 8:03 pm | कंजूस
बहुतेक मायबोलीकर प्रतिसाद दिला असल्याने इकडे दिला नाही.
अशा कादंबऱ्या आपल्याला आवडो वा न आवडो तो एक समाजाच्या वर्तणुकीचा त्या काळच्या इतिहास असतो. कथा नायक ज्या परिस्थितीतून गेलेला असतो त्यातून न गेल्यामुळे थोडी अडचण येते समजण्यात. तरीही वाचलेच पाहिजे असे लेखन.
मी कोसला वाचली. समजून घेतली.
समीक्षा उत्सुकता वाढवणारी आहेच.