बिग बुल

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
17 Aug 2022 - 2:31 pm

वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी बिझनेस कसा असू शकतो आणि बदलू शकतो हे बघण्याची कल्पकता, धोका पत्करण्याची, वेळ पडल्यास थंड डोक्याने माघार घ्यायची तयारी, पेशन्स आणि मुख्य म्हणजे जर सर्व गोष्टी जुळून येत असल्या तर तुफान मोठी गुंतवणूक करण्याचे आणि स्थिर बुद्धीने शांत बसण्याचे गट्स लागतात. झुनझुनवालांकडे या सर्व गोष्टी होत्या.

" दारु पिता मै हूं. चढी तुमको को है!" -
इन्व्हेस्टर/ शेअर होल्डर अ‍ॅक्टीविझम प्रकार भारतात फार फॅशनेबल नाहीये. कंपनीच्या मॅनेजमेंटला गोंजारुन किंवा मग थेट धोपटून कंपनी आणि पर्यायाने शेअर होल्डरच्या हिताच्या गोष्टी करायला लावणे म्हणजे इन्व्हेस्टरअ‍ॅक्टीविझम. झुनझुनवालानं केलेलं थोडं फार काम पाहू.
दोन हजार तीन किंवा चार सालची गोष्ट. टायटन या टाटा ग्रुप कंपनीचे काही मोठे सेलर ब्लॉक डील्स मध्ये बायर शोधत होते. (खूप मोठ्या प्रमाणात शेअर विक्री करायची असल्यास ब्रोकरकडून, विकत घेण्याची ताकद असलेला आणि इच्छूक असलेला गुंतवणुकदार शोधला जातो. अन्यथा अशा वेळेला ओपन मार्केट मध्ये विक्री केली आणि खरेदीकर्ता नसेल तर किंम्मत मोठ्या प्रमाणात पाडून विक्री करावी लागते). टायटन कंपनीवर मजबुत कर्ज होतं. युरोपात आणि जपानी घड्याळ कंपन्यांच्या दिशेने जात असलेलं कंपनीचं बिझनेस मॉडेल फारसं बरोबर काम करत नव्हतं. सेलर त्यामुळेच गाशा गुंडाळण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून राकेश झुनझुनवालांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली होती. इतका मोठा ब्लॉक कोणाला कधी कसा विकणार? कंपनी तर कर्जामध्ये, नफा मामुली. मिडीया मध्ये आणि बाजाराच्या चर्चांमध्ये अतिआत्मविश्वासात कसा फसला वगैरे चर्चा सुरु झालेल्या.
मध्यरात्रीची वेळ. उत्पल शेठ (झुनझुनवालांचे सीईओ) काही स्लाईड रिव्ह्यु करत बसले होते. टायटनच्या मॅनेजमेंट बोर्ड बरोबर झुनझुनवालांच्या टीमची मिटींग होणार होती. जास्त प्रॉफीट मार्जिनच्या घड्याळाच्या बिझनेस मधून फोकस कमी करुन, कमी मार्जिन आणि जास्त स्केलेबल असलेल्या तनिष्क म्हणजे ज्वेलरी बिझनेसकडे कंपनी नेल्यास कंपनीची बॅलन्सशीट आणि एकंदर परिस्थिती दिसू शकेल या बाजूने काही आकडेवारी उत्पल शेठ यांनी बनवली होती. बेन ब्रिज, बोर्शिम्स वगैरे ज्वेलरी कंपन्या वॉरन बफेटकडे आहेत. त्या बद्दल बफेटने भरभरून लिहीलेलं पण आहे. कदाचित विचाराची दिशा त्या अनुषंगाने असावी. किंवा टिफनी वगैरे मॉडेल त्यांच्या डोळ्यासमोर असावेत. आता ते सर्व कळणे अशक्य आहे. उत्पल शेठ यांनी बनवलेले बिझनेस प्रोजेक्शन फारच आक्रमक होते.
राकेश झुनझुनवाला समोर असलेली बिझनेस प्रोजेक्शनची आकडेवारी पाहून म्हणाले " दारु पिता मै हूं. चढी तुमको को है!" वास्तविक पहाता आठ-दहा टक्के कंपनी या आधीच घेतलेली होती. टायटनच्या मॅनेजमेंटचा देखील त्या प्रोजेक्शन वर फार विश्वास बसला नसावा. पण धन्द्याची दिशा कशी असावी या बाबतीत कंपनीच्या लोकांना पटवण्यात पुरेसं यश आलं. थेट पाच वर्ष फास्टफॉरवर्ड पाहीलं तर त्या प्रोजेक्शन मधली टॉप लाईन म्हणजेच संपूर्ण विक्रीचं टारगेट कंपनीला मिळवता आलेलं, आणि बॉटम लाईन म्हणजे नफा एका वर्षाच्या अंतराने मिळवता आला.
मोठा इन्व्हेस्टर त्याच्या मोठ्या बेट्स/सुपर इन्व्हेस्टमेंट्सनी ओळखला जातो. राकेश झुनझुनवालांची सुपर इन्व्हेस्टमेंट यशस्वी झालीली होती. पुढचे वीस-पंचवीस वर्ष ते कंपनी बरोबर राहीले. मागच्या वर्षी कोणीतरी विचारले असता हा स्टॉक कदाचित मी कबरीपर्यंत घेउन जाईन असं ते म्हणालेले आणि झालंही तसंच.
झुनझुनवालांच्या टीमचं अ‍ॅक्टीविझमचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर बिग बझार (पॅन्टालून रिटेल) च्या कॅश बर्न आणि एकंदर इन्व्हेन्टरी बघता, काही दिवसाचीच कॅश शिल्लक आहे, एक तर बाजारातून पैसा उभा करा/ अथवा मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देउन तोटा घ्या पण थोडा वेळ उसना घ्या. हा दिलेला सल्ला. किशोर बियाणींच्या टीम ने दुकानांचे नेटवर्क उभे करतांना काही गोष्टी थेट दुर्लक्शित केल्या होत्या. जर या वेळेत केल्या गेल्या नसत्या तर कंपनी कवडीमोल भावाने अ‍ॅक्वायर झाली असती.
शून्य ते एक, एक ते दहा, दहा ते शंभर.. कंपनी कोणत्या टप्प्यात आहे त्या प्रमाणे सीईओ आणि मॅनेजमेंटचे काम बदलते (रेड हॉफमन?). बहुतांश इन्व्हेस्टर्सना याची कल्पना असते. त्या नुसार आपण कोणत्या टप्प्याचे इन्वेस्टर आहोत आणि त्यातच रहावे हे बहुतांश इन्व्हेस्टर स्वीकारतात. राकेश झुनझुनवालांनी कधी हे नियम मानले नाहीत. ट्रेडींग करा नाहीतर इन्व्हेस्ट. (बफेटबुवा पुर्णपणे इन्व्हेस्टर, सोरोसकाका मॅक्रो ट्रेडर ). दोन्ही एकत्र कराल तर अकाउंट आणि डोकं दोन्ही बरबाद होईल हा पारंपारिक सल्ला देखील त्यांनी कधी स्वीकारला नाही. फ्युचर ऑप्शन डेरिवेटीव्ज त्यांनी खुशाल वापरले. आक्रमकता आणि त्याच वेळेस डोकं ठिकाणावर ठेउन वेळच्या वेळी तोटा मर्यादित ठेवायच्या हातोटीमुळे त्यांनी ट्रेडींग सुद्धा तुफान यशस्वी पद्धतीने केले. मार्केटमधले धोके संपूर्णपणे कधीही टाळता येणार नाहीत. ते स्वीकारुन त्यांचे व्यवस्थापन करणे याला झुनझुनवालांनी कायम महत्व दिले.
यु टर्न्स-
जगात कित्येक हेज फंड्सनी/इन्व्हेस्टर्सनी कंपन्यांचे संपूर्ण मॅनेजमेंट कंट्रोल्स हातात घेउन कडक मोठ्या कंपनी बनवल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारतात असा प्रयत्न झुनझुनवालांनी केला. अ‍ॅप्टेकचे पुर्ण मॅनेजमेंट कंट्रोल हातात घेतलेला होता पण इथे त्यांना फारसे यश आले नाही. जॉमेट्रीक्स, रॅलीस वगैरे काही मार्केट मधल्या काही गुंतवणूकीही,अयशस्वी ठरल्या. पण मार्केटमध्ये काही गोष्टी बरोबर येतात तर काही चुकतात. बरोबर असतांना आलेलं यश किती आहे आणि झालेल्या चुका ते खपवून नेउ शकतं का इतकीच गोष्ट महत्वाची ठरते.
झुनझुनवालांचे भारतप्रेम आणि भारतीयांचे काम करण्याची ताकद आणि प्रतिभा यांचे प्रेम सर्वज्ञात होते. पोस्ट कोविड मार्केट पार्टीमध्ये, जेव्हा केथी वुड प्रंचंड फॉर्मात होत्या तेव्हा जवळपास प्रत्येकजण नॅस्डॅकवर काही तरी घेऊ म्हणत होता. कित्येकांनी अकाउंट्स उघडले होते. पण घरातले खाणे उत्तम असतांना बाहेर तोंड का मारू हा जुना आवडता डायलॉग त्यांनी परत मारलेला.
धुराड्याप्रमाणे धुम्रपान, मासा पाणी पिल त्या प्रमाणे मद्य आणि प्रमांणाबाहेर ताळतंत्र नसलेलं खाणं. काही महीन्यांपुर्वी झुनझुनवालांना चाकाच्या खुर्चीत बसून पाहीलेलं फार विचित्र वाटलेलं. उभ रहाणं सुद्धा त्यांना अवघड झालेलं. सहा आठ महिन्यात प्रचंड धडपड करुन आकाशा या स्वतःच्या कंपनीचं पहीलं विमान उडालं तेव्हा त्यांची तब्येत अजून खराब वाटलेली. मान सुद्धा धरली जात नव्हती. इन्टर्व्यु आटपता घेतलेला कळत होतं आणि रविवारी सकाळी झुनझुनवाला गेल्याची बातमी आली.
त्यांच्याच शब्दात समारोपाचं बोलायचं झालं तर. "माझी सर्वात मोठी थीम भारत, आणि भारतीय! पुढच्या पंचवीस वर्षात भारत चीनच्या पुढे जाईल. बघायला मी असेन किंवा नसेन." कदाचित पुढच्या दहा पंधरा वर्षात हे खरं होईल आणि सी थिस वॉझ माय टेबल थंपिंग बेट म्हणत बिग बुल नेहमीच्या दणदणीत आवाजात हसेल.

तंत्रगुंतवणूकप्रकटनविचारमत

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Aug 2022 - 5:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदम समयोचित लेख! राकेश झुनझुनवाला हे नाव मी कधीतरी ऑफिसमधील गप्पात ऐकले आणि मग त्यांचा पोर्टफोलिओ गुगलुन बघितला. मग ऑफिसच्या गॉसिपमध्ये "आज राकेश ने ये स्टॉक उठाया" वगैरे ऐकत राहिलो. त्यांचे काही किस्से ऐकण्यात येउ लागले, ट्रेडर विरुद्ध इन्व्हेस्टर वगैरे कल्पना डोक्यात मूळ धरु लागली. थोडक्यात मार्केटकडे जरा लक्षपुर्वक पहायला लागलो. त्याचवेळेला १९९१ वेब सीरीज बघण्यात आली आणि माझ्या नजरेत राकेश झुनझुनवाला एक आयडॉल बनत गेले.

राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Aug 2022 - 5:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

वेब सीरीज स्कॅम १९९२ असे वाचावे

आणि हो!! लेखात राकेश झुनझुनवालांच्या अनुषंगाने शेअर मार्केट्बद्दल सगळे मुद्दे चांगले मांडले आहेत. लेख त्य द्रुष्टीनेही आवडला.

आनन्दा's picture

17 Aug 2022 - 6:21 pm | आनन्दा

सुंदर लेख..

मदनबाण's picture

17 Aug 2022 - 6:41 pm | मदनबाण

उत्तम लिखाण !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar

सुबोध खरे's picture

17 Aug 2022 - 7:13 pm | सुबोध खरे

काही गोष्टी येथे लिहाव्याशा वाटतात.

एक म्हणजे माणूस मनस्वी होता. जे आहे ते खुलेपणाने बोलण्याची हिम्मत ठेवणारा होता.

मी भरपूर दारू आणि सिगरेट पितो हे खुलेपणाने जसे बोलत तसेच मी भाजपचा सपोर्टर आहे हेही मोकळेपणाने बोलत असत.

तिसरी गोष्ट म्हंजे मी बाजारात पैसे लावला पण बाजारात कधी ढवळा ढवळ केली नाही( manipulate) हेही ते स्वच्छपणे सांगतात.

याचबरोबर माझ्या बापाकडे पैसा होता भावाकडे बाजारात पत होती त्यामुळे लोकांनाही मला गुंतवायला पैसा दिला हि नशिबाची गोष्ट होती हेही प्रामाणिकपणे सांगत असत.

मला वेळेत शिक्षण मिळाले आणि भाग्याने साथ दिली हेही ते स्वच्छपणे बोलत असत.

आंबट द्राक्ष असणारे अनेक लोक- एवढा पैसा मिळाला पण ६२ व्या वर्षी शेवटी इथेच सोडून जावे लागले हे परत परत चघळताना दिसतात. अर्थात बाजारात बऱ्याच लोकांना त्यांच्या इतके यश मिळाले नाही म्हणून असणारा मत्सर सुद्धा याला कारणीभूत आहे.

कारण केवळ आयुष्यभर सचोटीने सरकारी कारकुनी करणारे दारू सिगरेट सारखी कोणतीही व्यसने न करणारे आमचे स्नेही आणि नातेवाईक सुद्धा साठीच्या आत बाहेर कैलासवासी झालेले मी पाहतो आहे.

तसेच लोकांच्या शिव्याशाप घेणारे, भयंकर व्यसने आणि अनके लफडी कुलंगडी करणारे पाताळयंत्री राजकारणी सुद्धा ऐशी पार करून पुढे वाटचाल करताना दिसतात.

याला प्राक्तन/ भाग्यच म्हणावे लागेल.

जाता जाता - केवळ सवंग गुजराती लोकांच्या द्वेषापायी राकेश झुनझुनवाला याना ( ते गुजराती आहेत समजून) शिव्याशाप देणारे लोकही जालावर आढळतात. पण झुनझुनवाला हे मारवाडी होते गुजराती नव्हे.

श्री राकेश झुनझुनवाला याना भावपूर्ण श्रद्धांजली

मूकवाचक's picture

17 Aug 2022 - 7:19 pm | मूकवाचक

राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली!

अथांग आकाश's picture

17 Aug 2022 - 8:47 pm | अथांग आकाश

मस्त लेख!
राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली!!
x

मित्रहो's picture

17 Aug 2022 - 9:13 pm | मित्रहो

लेख आवडला
खूप जोखीम घेऊन गुंतवणुक करणारा माणूस होता. बहुतेक गुंतवणुक कर्जात डुबलेल्या कंपन्यांमधे होती आणि हळूहळू कंपन्या त्यातून बाहेर यायच्या. काही कंपन्यां तितक्या चांगल्या करु शकल्या नाही. पब्लीक सेक्टर बँक, टाटा कंपन्यांमधे गुंतवणूक होती.
डॉ. खरे यांच्या प्रतिसादाशी सहमत जे आहे ते बिनधास्त बोलणारा माणूस होता. लेखात म्हटल्याप्रमाणे भारत आणि भारताचे उज्वल भविष्य यावर विश्वास ठेवणारा माणूस होता. मला आवडलेले काही वाक्ये
For country to grow it need two things Skills and Democracy.
Growth comes from chaos not from order.

श्रद्धांजली बिग बुल

उगा काहितरीच's picture

18 Aug 2022 - 7:37 am | उगा काहितरीच

श्रद्धांजली!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Aug 2022 - 8:55 am | ज्ञानोबाचे पैजार

समयोचित लेख आवडला,
पैजारबुवा,

निनाद's picture

18 Aug 2022 - 9:10 am | निनाद

लॉरी टांगटूंगकर यांनी फार सुंदर लेख लिहिला आहे. इन्व्हेस्टर/ शेअर होल्डर अ‍ॅक्टीविझम ची माहिती फार आवडली.
समायोचित लेख.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

18 Aug 2022 - 12:58 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2022 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख माहितीपूर्ण आवडला. लिहिते राहा.
शेअरमार्केटच्या दादा माणसाला _/\_

-दिलीप बिरुटे

(फेसबुकवरुन साभार)

46 हजार कोटींचा मालक होते... शेअर मार्केट कोळून प्यालेला माणूस...
1 :-
मी माशासारखी दारू पितो म्हणायचा. सिगारेटला तर मोजदाद नव्हती. मधुमेह होऊन पाय सुजला आणि खुर्चीवरच आयुष्य जाऊ लागलं तेंव्हा म्हणाला, आयुष्याला शिस्त हवी. व्यायाम करायला हवा होता.
2 :-
1985 ला 5 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली होती.2022 ला एकूण मालमत्ता 46 हजार कोटीवर गेली. याबद्दल कसं वाटतंय म्हणून विचारल्यावर म्हणाला, "कोण मोजत बसलंय संपत्ती? कुणाला दाखवायची आहे बॅलन्स शीट? माझी एक पार्टनर आहे पण तिलाही त्यात इंटरेस्ट नाही. आणि सध्याच्या तुलनेत 15-20 % संपत्ती असती तरी तीच गाडी, तेच घर असतं, तीच व्हिस्की पीत राहिलो असतो!"
3 :-
राकेश झुणझूनवाला रिस्क घ्यायला कचरत नव्हता. रिटर्न मिळण्याची एकदा खात्री वाटली की बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करेन म्हणायचा.
4 :-
46 हजार कोटींचा मालक होता, पण पंतप्रधान मोदींना भेटायला गेला तेंव्हा शर्ट चुरगाळलेला होता. विचारल्यावर म्हणाला,600 रुपये देऊन इस्त्री केली, तरी तो चुरगाळला, मी काय करू?
निर्मला सीतारामणला भेटला तेंव्हा पायात फ्लोटर होती.
5 :-
झुणझूनवाला बोलायला बेधडक होता. मला मार्केट आणि स्त्रियांमध्ये जास्त रस आहे म्हणायचा.
माझी पोरं 25 वर्षांची झालेली बघायची आहेत म्हणायचा, पण 2009 ला जन्मलेली जुळी पोरं अजून 14 च वर्षांची आहेत. मुलगी मात्र 18 वर्षांची आहे. पत्नी रेखा सोबत लग्न 1987 ला झाले, पण मुलं 17 वर्षांनी झाली.
ययातिसारखे सारे भोगून झाल्यावर झुणझूनवाला "आयुष्याला शिस्त हवी होती" म्हणत राहिला.
आपल्यासाठी हा एक मेसेजच.!!!

चौकस२१२'s picture

19 Aug 2022 - 6:32 am | चौकस२१२

झुनझुनवाला हे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोन्ही होते हे माहित नवहते ...
त्यांनी कधी पब्लिक फंड उभा केलं होता कि फक्त स्वतःचेच पैसे गुंतव्ययचे / खेळायायचे ?

शाम भागवत's picture

23 Aug 2022 - 5:33 pm | शाम भागवत

ते होल्डिंगच्या १० टक्के पर्यंत ट्रेडिंग करायचे.

वामन देशमुख's picture

19 Aug 2022 - 9:49 am | वामन देशमुख

झुनझुनवालांना श्रद्धांजली.

टर्मीनेटर's picture

20 Aug 2022 - 1:55 pm | टर्मीनेटर

छान माहितीपूर्ण लेख 👍
राकेश झुनझुनवाला ही व्यक्ती माहिती होती पण त्यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हती.
राकेश झुनझुनवालांना श्रद्धांजली 🙏

विवेकपटाईत's picture

23 Aug 2022 - 4:20 pm | विवेकपटाईत

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी पैसा कमविता येतो पण तो उपभोग करण्यासाठी शरीर ही दुरुस्त पाहिजे. त्यांना जे उशिरा कळले ते आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवले पाहिजे.

शाम भागवत's picture

23 Aug 2022 - 5:33 pm | शाम भागवत

सुंदर व समयोचित लेख

शाम भागवत's picture

23 Aug 2022 - 5:37 pm | शाम भागवत

@लॉरी टांगटूंगकर
तुमच्या एखाद्या आवडत्या शेअरसाठी in जनातलं, मनातलं मधे मनीकंट्रोलसारखा धागा काढा की हो.

उत्तम लेख. माहितीपूर्ण आणि परिचयवजा.
झुनझुनवाला हे एक स्पेशल रसायन होतं. श्रद्धांजली.

मुक्त विहारि's picture

23 Aug 2022 - 9:51 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

स्वराजित's picture

16 Sep 2022 - 10:19 am | स्वराजित

खुप छान लेख .नवीन माहिती कळाली.