अधुनिक तीर्थक्षेत्रे....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
12 Aug 2022 - 11:37 pm

राजगुरुनगर ते हुसैनीवाला......

"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..."
- हुतात्मा भगतसिंग

२३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते.

"हा भगतसिंग, हाय हा                                  
जाशि आजि, फांशी आम्हांस्तवचि वीरा, हाय हा!    
राजगुरू तूं, हाय हा!                                    
राष्ट्र समरी,वीर कुमरा पडसि झुंजत, हाय हा!      
हाय हा, जयजय अहा!                
हाय हायचि आजची, उदयीकच्या जिंकी जया II
 
राजमुकुटा तो धरी                
मृत्युच्या मुकुटासि आधी बांधी जो जन निजशिरीं !    
शस्त्र धरुचि अम्हि स्वतः
धरुनि जें तूं समरिं शत्रुशि मरसि मारीत मारतां ! अधम तरि तो कोणता ?                
हेतुच्या तव वीरतेची जो न वंदिल शुद्धता II            
 
जा हुतात्म्यांनो, अहा !               साक्ष ठेवुनि शपथ घेतों आम्हि उरलों तें पहा !        
शस्त्रसंगर चंड हा झुंजावुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्य विजयासी पहा !          
हा भगतसिंग, हाय हा "

- स्वातंत्र्यवीर सावरकर..

राजगुरुनगर माझे गाव,माझे प्रेरणा स्थान हु.शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान.मी इथेच वाढलो,घडलो. पुणे-नाशिकफाटा-भोसरी-चाकण या मार्गावर चाकण पासून दहा बारा किलोमीटर वर वसलेल्या खेड गावाचे नामांतरण'राजगुरुनगर'आसे १९६० मधे झाले.गावाला शिवपुर्वकालीन इतिहास आहे.पुज्य शंकराचार्य यांच्या पदस्पर्शाने व चंडिराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं,भीमा नदीच्या काठावरचे हे गाव. हु.शिवराम हरी राजगुरू यांच्या हौतात्म्याने भारत भर प्रसिद्ध आहे.

चाकण

चाकण हे उद्योग धंद्यातील एक मोठे गाव म्हणून सध्या ओळखतात. येथील भुईकोट किल्ला,किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी शाहिस्ते खानाशी स्वराज्य रक्षणार्थ दिलेली झुंज इतिहासात वाचलीच आसेल. याच गावात राजगुरु घराण्यातील मुळपुरूष कचेश्वर स्वामी रहात होते. हे छ.शाहू महाराज यांचे गुरू. यांचे मुळ आडनाव ब्रम्हे पण राजाचे गुरू म्हणून आडनाव राजगुरू पडले. (संदर्भ गावातील वयोवृद्ध आणी लेखक सच्चिदानंद शेवडे).

राजगुरुनगर

छ.शाहू महाराजांनी गुरूंना विनंती केली व त्यांच्यासाठी राजगुरुनगर(खेड) येथे भीमेच्या काठावर त्यांना वाडा बांधून दिला. वाडा कसला जणू मजबूत भुईकोट किल्ला, चहूबाजूंनी तटबंदी,मोठाले बुरूज,नदीकाठा वरचा छोटा चोर दरवाजा.आजही नदीच्या पुलावरून या वाड्याची तटबंदी दिसते.ह्याच वाड्यात शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म २४-८-१९०८,श्रावण वद्य १३ शके १८३० या दिवशी झाला.त्यांचे बापू हे टोपणनाव होते.

राजगुरूंचे प्रारंभिक जीवन, देशकार्य या बद्दल आंतरजालावर, पुस्तकातून माहीती उपलब्ध आहे. राजगुरूनगर येथील त्यांच्या जन्मस्थानी त्यांचे सुदंर, प्रेक्षणीय स्मारक बनवले आहे व छान ठेवले सुद्धा आहे. राजगुरुनगर, शिवनेरी, लेण्याद्री व ओझर एक दिवसाची मस्त सहल होऊ शकते.

लहानपणी या वाड्यात नेहमी खेळायला जायचो.राजगुरूंचा निग्रही स्वभाव, इंग्रजी भाषा आणी परकीय सत्ते बद्दल चीड आणी त्यांची अचुक निशाणेबाजी व जीवन कार्य वाचुन नेहमीच अभिमान वाटत आसे.

भगतसिंग,राजगुरु आणी सुखदेव यानां २३-३-१९३१ ला लाहोर जेल मधे फाशी दिली.त्यांचे अंतीम संस्कार करतांना जनउद्रेक निश्चितच होणार म्हणुन इंग्रजांनी त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना न देता मध्यरात्रीनंतर गुपचूप लाहोर जेलच्या मागच्या दरवाजाने २५ किलोमीटर दुर हुसैनीवाला,सतलज नदीच्या काठावर नेऊन दाहसंस्कार केला व खुणा मीटवल्या. ही बातमी कळल्यावर जनसागर उमडला, अंत्यसंस्काराच्या जागी जमा झाला. बंदोबस्ताला आसलेले पोलीस पळून गेले. खुणा जरी मीटवल्या आसल्या तरी भुमीचा दाह थांबलेला नव्हता.लोकांनी त्या गरम जागेवरची माती आपल्या कपाळावर लावली.तीथले दगड आपल्या पुजागृहात ठेवण्यासाठी नेले.हे सर्व वाचल्यानंतर नेहमी वाटत असे आपल्याला कधी या पवित्र जागेचे दर्शन होईल काय?

पुढे पंजाबात बदली झाली. ऑपरेशन ब्लू स्टारच्या काळात या भागात बराच फिरलो पण परीस्थीती मुळे इच्छा असुनही भेट देता आली नाही. सेवानिवृत्ती आगोदर पंजाब राजस्थान सीमेवर,श्रीगंगानगर येथे कार्यरत असताना योग आला.

श्रीगंगानगर,फाजील्का,हुसैनीवाला, अमृतसर,आटारी (बाघा बाॅर्डर) आसा सहकुटुंब दौरा बाय रोड केला.हुतात्मा स्मारक बघण्याची इच्छा शेवटी पुर्ण झाली."बाघा" सीमेवर दोन्ही देशांतील सुरक्षा कर्मीद्वारा संयुक्त दैनिक बीटिंग रिट्रीट समारोह आयोजित केला जातो तसाच हुसैनीवाला इथे पण करतात.ही जागा छोटी व कमी प्रसिद्ध त्यामुळे गर्दी कमी व हा समारोह खुपच जवळून बघता येतो.पहिल्या रांगेत बसुन रोमांचकारी परेडचा आनंद घेण्याचा योग आला.

हुसैनीवाला

भारत पाकिस्तान सीमेवरचे एक छोटेसेच सतलज नदी काठचे खेडेगाव.फिरोजपुर पासून वीसेक किलोमीटरवर तर लाहोर ४५ किलोमीटरवर आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात लाहोरला जोडणारे उत्तर पुर्व रेल्वेच्या अंतर्गत महत्वाचे स्थानक.

हुसैनीवाला गावाचे नाव सुफी संत ग़ुलाम हुसैनीवाला यांच्या नावावर पडलेआहे.
'सतलज दरीया' (स्थानीक भाषा) दोन्ही देशांतील नैसर्गिक सीमारेषा, एका बाजुला भारतातील हुसैनीवाला तर दुसऱ्या काठावर पाकिस्तानचे 'गंडा सिंह वाला' नावाचे गाव आहे. सरदार बहादुर रिसालदार मेजर गंडा सिंह दत्त,आई ओ एम (इंडियन ऑर्डर ऑफ मेरीट),1830 -1903, 19 बंगाल लांसर्स, रेजिमेंट, ब्रिटिश भारतीय सेनेमधे कार्यरत होते.

इंग्रजानी दळणवळणा करता डबल डेकर पुल बांधला होता. रेल्वे आणी इतर वाहातुक एकाच वेळेस सुरळीत चालू आसे.आता हा पुल सुरक्षा कारणास्तव खंडितआहे.उत्तर रेल्वेचे हे शेवटचे स्थानक.

क्रांतिकारकांचे साथीदार बटुकेशवर दत्त यांना याच केस मधे दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांचे निधन दिल्ली मधे १९-७-१९६५ ला झाले त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कार याच जागी केला. त्यांचे स्मारक सुद्धा इथेच आहे. पंजाब सरकारने हुतात्मा भगतसिंग यांची माता विद्यावती यांना "पंजाब माता" म्हणून पुरस्कृत केले आहे.त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा इथेच केला व साजेसे स्मारक बनवले आहे.

४२ फुट लांब,९१ फुट रुंद आणी ५६ फुट उंच "शान-ऐ-हिंद",भव्य दरवाजा (गेट) पाकीस्तानच्या ३०फुटी "फख्रै -ऐ-पाक", दरवाजा समोर छाती फुलवून उभा आहे.

हुतात्मा स्मारकाची गरीमा व पवित्र्य मंदिरा सारखेच जोपासले आहे. स्मारकांच्या आवारात चप्पल,बूट घालून जाण्यास सक्त मनाई आहे. दररोज फुल,हार उदबत्ती,धूप स्मारकावर वाहून पुजा केली जाते. अखंड ज्योत तेवत ठेवली आहे.सफाई कर्मचारी सतत कार्यरत आसतात. येथील परीसर स्वच्छ ठेवतात. त्यांची सेवा वाखाणण्या जोगी आहे. येथील वातावरणात देशप्रेमाने उर भरून येतोच पण हुतात्म्यांबद्दल डोळ्यात पाणी सुद्धा तरळल्या शिवाय रहात नाही.

२ मराठी लाईट इन्फैंट्री (काळी पाचवी) च्या जवानांनी,मर्द मराठ्यांनी १९६५ च्या लढाईत मोठ्ठा पराक्रम गाजवला,शत्रूला धुळीत मिळवले.पलटन करता "हुसैनीवाला" युद्ध सन्मान मीळवला होता म्हणूनही ही जागा मराठी माणसा साठी विषेश आहे.

ही अधुनिक तीर्थक्षेत्रे, स्फूर्तीस्थळे येणाऱ्या पिढ्यांसाठी जोपासली पाहिजेत.

ज्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मान उंचावून राहातो त्या सर्व प्रसिद्ध, अप्रसिद्ध महान विभूतींना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त मानाचा मुजरा.

इतिहासमुक्तकविचारसद्भावनासमीक्षा

प्रतिक्रिया

Bhakti's picture

13 Aug 2022 - 7:50 am | Bhakti

जय हिंद!
लेख आवडला.

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 9:24 am | कर्नलतपस्वी

धन्यवाद भक्ती, छायाचित्रे पुढील भागात टाकत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2022 - 11:43 am | प्रसाद गोडबोले

सावरकरांची ही कविता मला ज्ञात नव्हती . ही कविता खरेच सावरकरांनी लिहिली असेल तर , कट्टर हिंदुत्ववादी असुनही , मला सावरकरांची कीव करावीशी वाटते.

भगतसिंगाच्या बाबतीत सावरकारांचा अभ्यास किती होता देव जाणे . पण भगतसिंग सोशॅलिस्ट कम्युनिस्ट विचारसरणीचा माणुस होता. आज तो जर जिवंत असता तर अन्य सोशॅलिस्ट कम्युनिस्ट विचारसरणीचे लोकं जसे सावरकरांना व्हिलन मानतात , माफीवीर म्हणातात , आणि काहीकाही तर स्वातंत्र्यवीर ह्या शब्दाची विटंबना करुन संडासवीर असे म्हणतात तसेच भगतसिंगानेही म्हणले असते ह्यात शंका नाही.

एकवेळ ते इंग्रज परवडले पण कम्युनिस्ट नको . अगदी खिलजी, औरंगजेब अन अब्दाली ही परवडतील पण कम्युनिस्ट नको .

बाकी राजगुरुंविषयी जास्त माहीत नाही , फोटो पाहिले घर साधेसे पण छान दिसत आहे , नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते !

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 1:15 pm | कर्नलतपस्वी

अपरिपक्व व पूर्वग्रहदूषित प्रतीसाद वाचून घोर निराशा झाली.
दुश्मनी मृत्यूनंतर संपते असे सेनेत शिकवले जाते.
संपूर्ण कुटुंब पारतंत्र्यात होरपळून निघाले,इंग्रजासारख्या बलाढ्य सत्तेला भिती वाटली म्हणून फाशीची शिक्षा दिली. गपचुप अंत्यसंस्कार केले.

भले विचार पटत नसतील पण प्रत्येक स्वतंत्रता सेनानी आदरणीय वाटतो.

मराठी माणसाला क्रांतिवीर राजगुरू बद्दल माहीत नसावे वाचून वाईट वाटले. पंजाबात देवासमान यांना मानतात.

घर छोटे वाटते, एकदा येवून बघा समजेल .

राजकिय मत व देशभक्ती यातला फरक समजत नसेल तर स्वतःचे मत स्वतः जवळ ठेवले तर बरे होईल.
जर तर च्या भाषेला काहीच किंमत नसते.

ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान, त्याग केला त्याच्याबद्दल राजकीय मते बाजुला ठेवून कृतज्ञता बाळगायलाच हवी कारण यज्ञात प्रत्येक समिधा महत्वाची असते.
प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याचा प्रयत्न करू नका.
श. भगत सिह करोडो लोकांच्या हृदय सिंहासनावर मृत्युंजय बनून बसले आहेत.
आपल्याला पुजणारे जाऊ द्या ओळखणारे किती याची यादी तपासुन पहा.

शहरातील पाच पुतळे...

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
- कुसुमाग्रज

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2022 - 2:39 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही गडबड करत आहात .

रिअ‍ॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम मधील फरक लक्षात घ्या.
भगतसिंग कम्युनिस्ट / सोशॅलिस्ट होता आणि आजच्या काळात एकही कम्युनिस्ट सोशॅलिस्ट सावरकारांच्या विषयी गौरवोद्गार काढत नाही ही वस्तुस्थिती आहे. एकदम रिअ‍ॅलिझम . भगतसिंग जिवंत असते तर त्यान्नीही सावरकरांना शिव्याच घातल्या असत्या ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्यात काही जरतर नाहीये , एकदम रिअ‍ॅलिझम .

राजकिय मत व देशभक्ती यातला फरक समजत नसेल तर स्वतःचे मत स्वतः जवळ ठेवले तर बरे होईल.

सोशलमीडीयावर सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथे पुरोगामी महाराष्ट्रात सावरकरांना संडासवीर म्हणतात , टिळकांना भटमान्य टिळक म्हणातात , त्यामानाने मी काहीच बोललेलो नाहीये. मी माझे मत व्यक्त करत राहीन , तुम्हाला हरकत असेल तर तुम्ही दुर्लक्षित करु शकता . पण दुसर्‍याचा आवाज दाबणे , त्याचे मत मांडूच न देणे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रतीक झाले , आपण असे करत इछित असाल तर मात्र त्याला जमेल तिथे जमेल तसा विरोध करत राहाने हे माणुस म्हणुन मी माझे कर्तव्य समजतो.

आपल्याला पुजणारे जाऊ द्या ओळखणारे किती याची यादी तपासुन पहा

.
त्याने काय फरक पडतो ? खुनी कम्युनिस्ट चे गव्हेरा ला जगभर लोकं पुजतात , त्याचे फोटो टी शर्ट वर लाऊन मिरवतात , तो ही मृत्युंजय की फ्रित्युंजय बनुन बसला आहे म्हणुन तो ग्रेट ठरतो काय ?
उगाचच काहीही .

७५ वर्षं झाली स्वातंत्र्याला . आता तरी आपण रोमँटिसिझन ची झुल उतरवुन वास्तववादी चष्म्यातुन सर्व बाजुंनी वेगवेगळ्या अँगल्स ने इतिहासातील लोकांचा विचार करायला हवा .
ट्वायलाईट ऑफ आयडॉल्स मध्ये फ्रेडरिक नीचा म्हणतो तसे आपण सुध्दा फिलॉसॉफाईझ विथ हॅमर करायला शिकले पाहिजे . जे तुम्हाला आदर्श वाटत आहेत त्यांन्ना हातोडीने ठोका , जर ते टिकले तर ते खर्‍या अर्थाने आदर्श आहेत अन्यथा नाही. मी आधी लहानपणी सावरकारांचा खुप मोठ्ठा फॅन होतो पण सावरकर ह्या हातोडीच्या टेस्ट मध्ये फेल झाले आहेत . आणि भगतसिंग सुध्दा !

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 3:57 pm | कर्नलतपस्वी

रिअ‍ॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम मधील फरक लक्षात घ्या.

भगतसिंग देशभक्त होते.स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा दिला. फासावर गेले.बलिदान दिले. त्यांनी त्यांच्या विचार,बुद्धी आणी सदसद्विवेक प्रमाणे देशसेवा केली.त्याकरता त्यांना अभिवादन. ही रियालीटी आहे रोमॅन्टिसिझम नाही.

त्यांची विचारसरणी वेगळी म्हणून देशप्रेम ,देशसेवा डोळ्याआड करता येत नाही.

मतस्वातंत्र्य आहे असायलाच हवे.

जे गेले त्यांनी देशाकरता काय केले तेवढे लक्षात घ्या.त्यांची विचारधारा पटत नाही म्हणून असभ्य भाषाप्रयोग करणे उचित नाही असे मला वाटते. बाकी माझ्या लेखा मुळे किवा तु म्ही दिलेल्या प्रतिसादाने कुणाचे मत बदलेलं असे काही नाही .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणी पूर्णविराम.

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2022 - 5:05 pm | प्रसाद गोडबोले

आता तुम्ही विषय बदलत आहात .

असभ्य भाषाप्रयोग

माझ्या प्रतिसादात भगतसिंग बद्दल एक जरी असभ्य भाषा प्रयोग दिसल्याचे दाखवा , मी तात्काळ माफी मागेन . अन तसेही आमचे प्रतिसाद उडवायला अनेक लोकं उत्सुक असतात मिपावर . काही गैर लिहिले असेल तर तो प्रतिसाद क्षणार्धात उडवला जाईल.

बाकी हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं सावरकरांना संडासवीर अन टिळकांना भटमान्य टिळक म्हणतात ही फॅक्ट आहे . हा मी केलेला असभ्य भाषाप्रयोग नसुन , मी केवळ वस्तुस्थिती दाखवुन तुमचे डोळे उघडायचा प्रयत्न केला आहे .

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 4:07 pm | क्लिंटन

कर्नलतपस्वींच्या एका उत्तम प्रवासवर्णनपर लेखात फाटे फुटायला नकोत पण तरीही विषय निघालाच आहे म्हणून हा एकच प्रतिसाद लिहितो. यावर आणखी काहीही लिहिणार नाही.

तुमच्याइतकाच मी पण कम्युनिझमचा विरोधक आहे हे आतापर्यंत वेगवेगळ्या चर्चेत लिहिलेच आहे. त्याविषयी शंका नसावी. तरीही भगतसिंगांविषयी दोन गोष्टी लिहिता येतील. ते फासावर गेले तेव्हा ते २३ वर्षांचे होते. असे म्हणतात की तुम्ही वयाच्या २० व्या वर्षी कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या ४० व्या वर्षी कम्युनिस्ट राहिला असाल तर तुम्हाला डोकं नाही. भगतसिंग त्याच स्वप्नाळू वयातील होते. याचा अर्थ ते आयुष्यभर कम्युनिस्टच राहिले असते असे नाही. दुसरे म्हणजे भगतसिंग फाशी गेले १९३१ मध्ये. त्यावेळेस रशियात कम्युनिस्ट क्रांती झाली त्याला १३ वर्षे झाली होती. तसेच त्यावेळेस दळणवळणाची साधने आताच्या मानाने बरीच मर्यादित होती. त्यामुळे कम्युनिझमचे काय वाईट परिणाम होऊ शकतील याची माहिती भारतात कळली असेलच असे नाही. भगतसिंगांनी कम्युनिझमवर बरेच वाचन केले होते हे माहित आहे. पण नुसते पुस्तकात दिलेले वाचून कम्युनिझम बर्‍याच जणांना अपील होऊ शकेल कारण वरकरणी कोणतीही वाईट किंवा चुकीची मागणी त्यात केलेली नसते पण प्रत्यक्षात अंमलात आणायला गेल्यावर कम्युनिझम सगळीकडेच अपयशी ठरलेले दिसेल. फक्त भगतसिंग असताना त्याची उदाहरणे जगभरात दिसलेली नव्हती. त्यामुळे या बाबतीत भगतसिंगांना कम्युनिझममुळे कशी वाट लागते हे समोर दिसत असूनही त्यानंतरच्या काळातही कम्युनिस्ट राहिलेल्यांबरोबर एकाच तागडीत तोलू नये असे वाटते.

भगतसिंग जिवंत असते तर त्यान्नीही सावरकरांना शिव्याच घातल्या असत्या ह्यात तिळमात्र शंका नाही.

ही जरतरची गोष्ट झाली. नक्की काय झाले असते हे सांगायला आपल्याकडे कसलाच आधार नाही. भगतसिंग स्वातंत्र्योत्तर काळात असते आणि त्यांनी कम्युनिस्ट राज्य आणायचा प्रयत्न केला असता तर त्यांनाही विरोधच केला असता. त्यांनी सावरकरांना शिव्या घातल्या असत्या तरी ते आपल्याला मान्य झाले नसते हे नक्कीच. पण आपण ज्याला मानतो त्याला शिव्या घालणे हे एकच एखादा नेता न आवडण्याचे कारण असू नये. लालबहादूर शास्त्री सुध्दा जनसंघावर भरपूर टीका करायचे (त्या काळात टीका असली तरी ती संयत भाषेत केली जायची त्यामुळे शिव्या घालायचे असे म्हणत नाही) पण त्यामुळे १९६५ च्या युध्दात त्यांनी देशाचे केलेल्या नेतृत्वाचे महत्व कसे कमी होईल? तेव्हा समजा भगतसिंगांनी सावरकरांना शिव्या घातल्या असत्या किंवा अगदी कम्युनिस्ट राज्य आणायचा प्रयत्न केला असता तर त्याकारणासाठी भगतसिंगांनाही विरोधच केला असता. तरीही त्या परिस्थितही १९२९-३० मधील भगतसिंगांचे स्वातंत्र्यलढ्यासाठी जे काही योगदान होते त्याचे महत्व कमी होणार नाही. तेव्हा नंतरच्या काळातील ठोकताळे २२-२३ वर्षांच्या १९३०-३१ मधील भगतसिंगांना वापरू नयेत इतकेच.

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2022 - 5:21 pm | प्रसाद गोडबोले

भगतसिंगांचे स्वातंत्र्यलढ्यासाठी जे काही योगदान

मी माझे सर्व प्रतिसाद परत नीट वाचले. मी कोणत्याही प्रतिसादात भगतसिंग ह्यांच्या स्वातंत्र्यातील योगदानाविषयी अवाक्षर देखील काढलेले नाही. मी कोठेही भगतसिंग ह्यांच्या विषयी असभ्य भाषेत बोललो आहे असे मलातरी वाटत नाही. तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटल्यास माझ्या निदर्शनास आणुन द्या , मला माझी चुक मान्य करायला आणि सुधारायला लाज वाटणार नाही. पण सावरकरांना माफीवीर आणि टिळकांना भटमान्य म्हणतात ही फॅक्ट आहे, राजगुरु अजुन सुपात आहेत , तेही कधीना कधी जात्यात येणार आहेतच !

(बाकी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये भारतीयांचे योगदान किती हाच बेसीक प्रश्न आहे . पण तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. )

तेव्हा नंतरच्या काळातील ठोकताळे २२-२३ वर्षांच्या १९३०-३१ मधील भगतसिंगांना वापरू नयेत इतकेच.

ओके . हा मुद्दा पटला. भगतसिंग ह्यांचे कम्युनिझम म्हणजे स्वप्नाळू वयातील, पोरसवदा वयात सगळ्यांनाच असतो तसला जोश होता, पुढे वयात आल्यावर कम्युनिझममुळे कशी वाट लागते हे पाहिले असते तर त्यांचे विचार वेगळे असते असे जर कोणी म्हणत असेल तर त्याला बेनीफीट ऑफ डाऊट देता येईल !

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 6:15 pm | कर्नलतपस्वी

असभ्य भाषाप्रयोग

तुम्ही असभ्य भाषाप्रयोग केला असे मी ही म्हटले नाही. प्रतिसादात सावरकर टिळक यांच्या बद्दल ज्या कुणी केला त्याच्याबद्दल मी बोलत आहे. एक मानसिकता समाजात रूजताना दिसते आणी त्याचेच वाईट वाटते.

बाकी क्लिंटनजी बरोबर सहमत आहे.

आपले स्पष्ट प्रतिपादन नेहमीच वाचतो कधी पटते कधी नाही.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
क लो आ.

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 1:18 pm | कर्नलतपस्वी

नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते !
राजगुरुनगर, तालुका खेड पुणे....
माहीत नाही पश्चिम की पुर्व पण महाराष्ट्रात जरूर आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2022 - 5:13 pm | प्रकाश घाटपांडे

नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते !

हे पुणे जिल्ह्यातील खेड आहे. राजगुरुंचे गाव असल्याने आता राजगुरुनगर म्हणतात. हा पश्चिम महाराष्ट्रच आहे

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2022 - 11:47 am | प्रकाश घाटपांडे

राजगुरु माझ्या आजोबांचे कुठलेतरी भाउ लागतात असे नाते आहे. मी बेल्हे, ता. जुन्नर इथे शिकलो, वाढलो. शाळेत आमचे देव गुरुजी सांगायचे की राजगुरुंच्या मागे इंग्रज लागले होते तेव्हा गुंगारा देण्यासाठी ते आमच्या घरातील बळदात लपले होते. माझा चुलत भाउ आर्मी मधून रिटायर झाला. माझे चुलते त्याच्याकडे पंजाब मधे गेले होते तेव्हा ची ही बातमी मी जपून ठेवली आहे.
शान से मनेगी भगत सिंह की जन्मशती : सीएम
भास्कर न्यूज
23 March 2006
चंडीगढ़/फिरोजपुर

पंजाब सरकार अगले साल शहीद भगत सिंह केक्00वें जन्म दिवस पर राज्य स्तरीय समारोह आयोजित करेगी, भगत सिंह की जन्मशती को सरकार धूमधाम से मनाएगी।

हुसैनीवाला में शहीद भगत सिंह, राजगुरु और सुखदेव को शहीदी दिवस पर श्रृद्धाजलिं देने के बाद मुख्यमंत्री ने कहा कि पंजाब के प्रसिद्ध और गुमनामी में खो गए आजादी के शहीदों को याद करने के लिए पंजाब सरकार विशेष प्रयास कर रही है। जनसभा को संबोधित करते हुए मुख्यमंत्री ने कहा कि आजादी के लिए अपनी जान की कुर्बानी देने वालों से युवाओं को प्रेरणा लेनी चाहिए।

उन्होंने बताया कि आजादी के संघर्ष और उसके बाद विभिन्न लड़ाइयों में हिस्सा लेने वाले पंजाब के शहीदों का एक डाटा तैयार किया जा रहा है। मुख्यमंत्री ने शहीद राजगुरु के निकट संबंधी वामन रामचंद्र घाटपांडे और लक्ष्मी वामन घाटपांडे का सम्मान भी किया। शहीद भगत सिंह के भतीजों बब्बर सिंह और मेजर जनरल श्योरण सिंह को भी सम्मानित किया गया।

कैप्टन सिंह ने फिरोजपुर डिवीजन के कमिश्नर कुलबीर सिंह सिद्धृू की लिखी किताब ‘कॉमरेड इन ऑर्म्स’ का विमोचन भी किया। फिरोजपुर प्रशासन ने फिरोजपुर से हुसैनीवाला के लिए लोकल बस सर्विस भी शुरू की है ताकि लोग शहीदी स्मारक पर अपनी श्रृद्धा के फूल अर्पित कर सके। मुख्यमंत्री ने क्भ्वीं पंजाब बटालियन द्वारा बनाया गया एक स्मारक भी राष्ट्र को समर्पित किया। यह स्मारक हुसैनीवाला में शहीद हुए फौजियों की याद में बनाया गया है। उपमुख्यमंत्री राजिंद्र कौर भट्ठल ने भी शहीदों को श्रृद्धांजलि दी।

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 1:20 pm | कर्नलतपस्वी

नवीन माहीती बद्दल मनापासून धन्यवाद.

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 12:04 pm | क्लिंटन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपल्या आजूबाजूला दिसत असलेल्या एकूण वातावरणाला अनुसरून असलेला समयोचित लेख आवडला.

क्लिंटन's picture

14 Aug 2022 - 11:57 am | क्लिंटन

हुसेनीवाला हे ठिकाण स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात होते आणि क्रांतीकारकांचे समाधीस्थळ सध्या आहे ती जागाही पाकिस्तानात होती. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्यावर अंत्यसंस्कार केले ती जागा भारतात यावी अशी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसह अनेकांची इच्छा होती. त्याप्रमाणे १९६१ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान 'लँड स्वॅप अ‍ॅग्रीमेंट' झाले आणि या जागेच्या आणि आजूबाजूच्या जमिनीच्या बदल्यात भारताची काही जमिन पाकिस्तानला दिली.

https://www.tribuneindia.com/news/archive/editorials/a-bridge-in-hussain...

नंतर त्या जागेवर आता आहे ते स्मारक बांधण्यात आले. १९८० च्या दशकात- मला वाटते १९८६ मध्ये राजीव गांधींनी त्या स्मारकाचे उद्घाटन केले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Aug 2022 - 3:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

समयोचित लेख आवडला,
पैजारबुवा,

Marathi_Mulgi's picture

21 Aug 2022 - 12:02 am | Marathi_Mulgi

कर्नल तपस्वींनी हुस्सैनीवालाची माहिती दिलीच आहे. तरीही माझा लेख देण्याचा मोह आवरत नाही. ही भारताची प्रेरणास्थळे आहेत जी फारशी प्रसिद्ध नाहीत. त्यांना जरूर नकाशावर आणले पाहिजे.

https://manaschitre.blogspot.com/?m=1

कर्नलतपस्वी's picture

25 Aug 2022 - 11:04 am | कर्नलतपस्वी

@मराठी_मुलगी,आपला लेख वाचला. छान लिहिलय.
आपण अजुन काही लिहीता का? वाचायला आवडेल.
आपला ब्लॉग हिन्दीत आहे.