नाते प्राजक्ताचे

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
10 Aug 2022 - 12:21 pm

सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.

अरे देवा! आता पुन्हा पाचा वर जावून शून्यावर यायचे.जाऊ द्या थोडं भिजल्याने काय होणार आहे ? प्राजक्ताच्या झाडाकडे निघालो.झाडा जवळ पोहोचलो,फुलांचा सडा पडला होता.पाय ठेवायला जागा नव्हती.त्या पारिजातकाच्या सड्याचे कवी अनिल यांनी केलेले वर्णन किती खरे आहे हे लक्षात आले.

बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !

फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण

बाई या पावसानं !

कानात पु. ल. देशपांड्यांचा आवाज रुंजी घालू लागला.

पावसाच्या रिपरिपी बरोबर फूलं सुद्धा अंगावर पडत होती. भानावर आलो आणी पटापटा फूले वेचू लागलो.

'बहु चंचल चपळ।
जाता-येता नलगे वेळ।।'

अचानकच एकदम लहान झाल्या सारखे वाटू लागले. मन साठ वर्ष मागे गेले.

एकवर्षी चातुर्मासात महादेवाला प्राजक्ताची लाखोली वाहीन म्हणून आईने संकल्प सोडला.त्यावेळेस फारच थोड्या लोकांच्या परसात प्राजक्ताचे झाड असायचे.संकल्प सोडण्या आगोदर त्यांना सांगावे लागायचे म्हणजे जास्तीत जास्त फुले त्या घराला मिळायची.

रोज सकाळी पाच वाजता उठून फूले गोळा करणे,मोजणी करून त्याची नोंद वहीत ठेवणे हे माझे काम."जेवढी मिळतील तेवढाच आकडा लिही,जास्त लिहू नकोस",आई अधून मधून सुचना देत असे.

एक दिवस अशीच पावसाची रिपरिप चालू होती.आई म्हणाली डोक्यावर काहीतरी घेऊन जा. त्यावेळेस छत्री,रेनकोट श्रीमंतीचे चोचले होते. सुतळीचे बारदानच आमचा रेनकोट असे. "होय आई ",म्हणत डोक्यावर पातेले ठेऊन पावसात धूम ठोकली.दोन पातेली भरून फूले गोळा करताना ओला चिंब,नखशिखांत भिजलो होतो." मी म्हटंले होते की डोक्यावर काहीतरी घेऊन जा", म्हणत आईने पदराने डोकं पुसायला सुरवात केली. आईचं काम केलं म्हणून माझी छाती फुगली तर मुलाचे कर्तृत्व बघून आईचा ऊर कौतुकाने भरून आला.

आठवणीने डोळ्याच्या कडा पाणावल्या, पाऊस पडत होता म्हणून इतरांना दिसल्या नाहीत.

घरी आलो,आईच्या फोटोकडे नजर टाकली,उगाचच ती गालातल्या गालात हसते आहे असा भास झाला.

मुक्तकविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

सुंदर प्राजक्त सडा!

सुजित जाधव's picture

10 Aug 2022 - 2:20 pm | सुजित जाधव
सुजित जाधव's picture

10 Aug 2022 - 2:21 pm | सुजित जाधव

म्हणत आईने पदराने डोकं पुसायला सुरवात केली. आईचं काम केलं म्हणून माझी छाती फुगली तर मुलाचे कर्तृत्व बघून आईचा ऊर कौतुकाने भरून आला.

छान...आवडेश...

कुमार१'s picture

10 Aug 2022 - 2:48 pm | कुमार१

सुंदर ...

श्रीगणेशा's picture

10 Aug 2022 - 3:19 pm | श्रीगणेशा

नाते प्राजक्ताचे

खूप छान जपून ठेवली आहे आठवण!

कर्नलतपस्वी's picture

10 Aug 2022 - 3:19 pm | कर्नलतपस्वी

@भक्ती,सुजीत,कुमारेक सर धन्यवाद.
आजही चिंब भिजलोय पण डोक्यावरचा पदर मात्र हरवलाय.

कर्नलतपस्वी's picture

10 Aug 2022 - 3:22 pm | कर्नलतपस्वी

भक्ती,सुजीत,गणेशा,कुमारेक सर.

आज सुद्धा चिंब भिजलोय पण डोक्यावरचा पदर मात्र हरवलाय.

मुक्त विहारि's picture

10 Aug 2022 - 5:33 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद वाचतांना, अक्षरे धूसर झाली...

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Aug 2022 - 8:37 am | ज्ञानोबाचे पैजार

अगदी अशीच अवस्था झाली, लेख वाचल्यावर लगेच हा प्रतिसाद वाचताना,

लिहित रहा

पैजारबुवा,

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 9:48 am | रंगीला रतन

+१

विजुभाऊ's picture

10 Aug 2022 - 6:24 pm | विजुभाऊ

खरंय मुवि.
डोळे एकदम ओले झाले वाचताना.
खुप छान आणि तरल लिहीता हो कर्नलसाहेब

पुलंनी गायलेले हे गाणे माझ्या वडिलांना खूप आवडाय्चे.

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2022 - 10:59 pm | कर्नलतपस्वी

मुवी,माऊली रंगीला रतन ,विजूभौ प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
क लो आ

चौथा कोनाडा's picture

10 Aug 2022 - 10:15 pm | चौथा कोनाडा

व्वा ! सुंदर ! वाचताना जणू प्राजक्ताच्या सुंगधाचा शिडकावा झाला !
❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
लगे रहो कर्नल भाय !
❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️

सुखी's picture

11 Aug 2022 - 9:41 am | सुखी

छान लिहिलंय __/\__

अनन्त्_यात्री's picture

11 Aug 2022 - 10:21 am | अनन्त्_यात्री

निरागस आठवण!

सौंदाळा's picture

11 Aug 2022 - 11:22 am | सौंदाळा

वरील सर्वांशी सहमत.
खूपच तरल भावस्पर्शी लेख.

अथांग आकाश's picture

11 Aug 2022 - 11:49 am | अथांग आकाश

खुप छान लिहिलंय!!!
x

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2022 - 11:04 pm | कर्नलतपस्वी

अंनंतयात्री,आकाश भौ,सौंदाळा प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

श्वेता व्यास's picture

12 Aug 2022 - 11:27 am | श्वेता व्यास

खूप छान लिहिलंय, तुमच्या आठवणीने आमच्या पण डोळ्याच्या कडा पाणावल्या.

सिरुसेरि's picture

12 Aug 2022 - 4:48 pm | सिरुसेरि

सुरेख आणी सुरेल लेखन .

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2022 - 11:02 pm | कर्नलतपस्वी

सिरूसेरी,सुखी,श्वेता प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 6:06 pm | रंगीला रतन

पेढे आवडले हो काका.

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 6:09 pm | रंगीला रतन

चुकीच्या जागी पोस्ट झाला प्रतिसाद :=)

वाह कर्नल साहेब. आईचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेली मदत आणि,

आईचं काम केलं म्हणून माझी छाती फुगली तर मुलाचे कर्तृत्व बघून आईचा ऊर कौतुकाने भरून आला.

हे वाचल्याचार मला बाहुबली (१) मधला शिवलिंग उचलून आणतानाचा प्रसंग आठवला एकदम!

हृदयस्पर्शी लेखन 👍

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2022 - 11:05 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

प्रमोद देर्देकर's picture

14 Aug 2022 - 8:00 am | प्रमोद देर्देकर

खूप छान.
तुम्ही खरं तर संरक्षण दलातले सैनिक मग एवढं मराठी साहित्य कधी हो आत्मसात केलेत?
सहसा निवृत्त सैनिक लढाईच्या कथा सांगतात.

प्रत्येक ठिकाणी अतिशय समयोचित साहित्य दाखले देता. अभिमान आहे. तुम्हांला दीर्घ आयुष्य लाभो.

Pl यांच्या आवाजात ते गाणं तर अधिक उदास वाटतं.
विनंती कधी लढाईच्या कथा पण येऊ द्या.

प्रमोद, साली जीदंगी बडी सतरंगी हैl
अगर अंतरंगी बन के जीयो तो ठिक वरना बेरंग सी लगती हैl
आई माय मराठी,बाळकडू तीनेच पाजले. हिन्दी आमची मावशी,पोटापाण्यासाठी मावशीकडे रहावे लागले. हिन्दी साहित्य थोडेफार वाचले.
सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा आईच्या कुशीत, भरपुर वाचन करतो,आता फक्त मराठीच. पहिल्यांदा गद्य पण बोरकर,शातांबाई, मोघे, भट,पाडगावकर इ. वेड लावले.

पहिल्यांदा हिन्दीत लिहायचो,अजुनही लिहीतो,मिपा मराठीशी प्रतिबद्ध म्हणून मराठीत लिहीतो.

मिपावरच आमची जीवनी आम्हीच लिहीली आहे.वाचून कळेल.
https://www.misalpav.com/node/48266/backlinks

पिलास फुटूनी पंख तयांचे
घरटी झाली कुठे कुठे
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.
-कवी बोरकर
त्यामुळे वेळच वेळ,स्वानंदा करता व्यासंग म्हणून खेद ना खंत.

आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी
- कवी बोरकर
बरेच काही लिहीता येईल.

वाचकांच्या प्रतिसादाने मुठभर मांस चढते.
पुन्हा एकदा धन्यवाद .

पहिल्यांदा गद्य पण बोरकर,शातांबाई, मोघे, भट,पाडगावकर इ. वेड लावले.

अगदी मराठी पद्य रसाळ आणि प्रेमात पाडणारे आहे.गद्यही दर्जेदार! मराठी साहित्य वाचत राहा,असेच सुंदर लिहित राहा.

सरिता बांदेकर's picture

15 Aug 2022 - 7:55 am | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे.
वाचताना मला पण आईच्या पदराचा स्पर्ष झाला आणि आईच्या पदराचा तो गंध आठवला.
निशब्द.

चित्रगुप्त's picture

15 Aug 2022 - 6:11 pm | चित्रगुप्त

सुंदर, भावस्पर्शी लिखाण.
बाई या पावसानं .... हे गीत प्रथमच वाचनात आले. मग तूनळीवर शोधून ऐकले:
https://www.youtube.com/watch?v=ZB790ugPdSQ
मात्र हे पुलंनी गायले आहे की संगीतबद्ध केलेले आहे, हे समजले नाही.
आईने 'प्राजक्ताची लाखोली' वाहण्याचा केलेला संकल्प आणि तुम्ही लहानपणी त्यात घेतलेला सहभाग सारेच काही आता अद्भुत वाटते.

आजही चिंब भिजलोय पण डोक्यावरचा पदर मात्र हरवलाय.

आजकाल एकूणातच 'पदर' ही संस्थाच (नागरी संस्कृतीतून तरी) नामशेष झालेली आहे, याचे वैषम्य आमच्या पिढीला वाटतेच.

Bhakti's picture

15 Aug 2022 - 6:41 pm | Bhakti

+१
बाहेर फिरायला गेलो होतो.
मुलगी म्हणाली आई थंडी वाजतेय,
मी जिन्स top पेहराव केला होता.मग माझ्या आईनेच (तिच्या आजीने)तिला पदराखाली घेतले आणि माझी चांगलीच खरडपट्टी काढली.लहान लेकराला पदराची भारी ऊब मिळते हे खरं!

Vichar Manus's picture

15 Aug 2022 - 8:16 pm | Vichar Manus

खूप सुंदर लिहिलंय

कर्नलतपस्वी's picture

17 Aug 2022 - 1:57 pm | कर्नलतपस्वी

भक्ती सरीताजी,चित्रगुप्त आणी विचार माणूस प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

पदर खुपच उपयोगी असायचा.
खणा नारळानी ओटी भरता यायची.
बाळाला पांघरूण म्हणून पदर.
अंगठा चोखताना पदराशी खेळणे बाळाचा आवडता खेळ. इत्यादी.. जे आजची पिढी मीस करते किंबहुना माहीतच नाही.