‘पंजाब मेल’

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
4 Jun 2022 - 9:20 am

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती. तत्कालीन ‘ग्रेट इंडियन पेनिनसुलार रेल्वे कंपनी’ने (जी. आय. पी. आर.) ही रेल्वेगाडी सुरू केली होती. स्वातंत्र्यानंतर ‘पंजाब मेल’ मुंबई आणि भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या पंजाबमधील फिरोजपूर कँटदरम्यान धावत आहे.

ब्रिटनहून भारतात नियुक्तीवर आलेल्या आणि पुढे दिल्ली, पंजाब आणि वायव्य भारतातील प्रांतांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी जाणाऱ्या आणि आपल्या भारतातील नियुक्तीचा काळ संपवून ब्रिटनला परतत असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे लंडन आणि मुंबईदरम्यान ये-जा करणाऱ्या ‘पी. अँड ओ स्टीमर कंपनी’च्या जहाजाच्या वेळापत्रकानुसार ‘पंजाब मेल’चे वेळापत्रक ठरवण्यात आले होते. हे जहाज दर पंधरवड्याला मुंबईला येत असे. त्यातून आलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना, युरोपियनांना आणि रॉयल मेल घेण्यासाठी ‘पंजाब मेल’ मोल स्थानकातून पेशावरकडे निघत असे. 1930 पर्यंत ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’च्या पुढे मुंबई बंदरात बॅलार्ड पिअरजवळ मोल स्थानक होते. 1930 नंतर ‘पंजाब मेल’ ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’मधूनच आपला प्रवास सुरू करू लागली.

ब्रिटनचा तत्कालीन राजा जॉर्ज (पंचम) याने 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीत भरलेल्या विशेष दिल्ली दरबारात अखंड भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित झाल्याचे घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईहून वायव्य भारतासाठी सुरू करण्यात आलेल्या या आलिशान रेल्वेगाडीमुळे मुंबई आणि भारताच्या नव्या राजधानीदरम्यान वेगवान सेवा देता येऊ शकेल, असाही विचार करण्यात आला होता. सुरुवातीची काही वर्षे ‘पंजाब मेल’ Bombay Punjab Service या नावाने ओळखली जात होती. ‘साहेबाची गाडी’ असल्याने या गाडीत अनेक सुविधा पुरवल्या गेल्या होत्या. प्रवास लांबचा असल्यामुळे यात ‘साहेबां’साठी स्नानगृह, भोजनकक्षही उपलब्ध होते. त्यावेळी ‘पंजाब मेल’ अवघी सात डब्यांची होती. त्यात ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी प्रथम श्रेणीचे तीन, त्यांच्या नोकरांसाठी तृतीय श्रेणीचा एक आणि रॉयल मेलसाठी तीन डब्यांचा समावेश होता.

देशातील अनेक स्थित्यंतराची साक्षीदार ठरलेल्या ‘पंजाब मेल’ने गेल्या 110 वर्षांच्या वाटचालीत स्वत:तही बरेच बदल पाहिले आहेत. स्वातंत्र्यानंतर ही रेल्वेगाडी सामान्य जनतेच्या सेवेत रुजू झाली; पण त्याचवेळी या रेल्वेगाडीत मिळणाऱ्या खास सोयी आणि गाडीचा विशेष दर्जाही काढून घेतला गेला. परिणामी ‘पंजाब मेल’ अन्य मेल/एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच बनली. तरीही ‘पंजाब मेल’ची गर्दी वाढतच राहिल्याने तिची सेवा दररोज उपलब्ध करून देण्यात आली. तसेच तेव्हा या गाडीला 19 डबे जोडले जाऊ लागले होते.

1929 पर्यंत ‘पंजाब मेल’ला पूर्ण प्रवासात वाफेचे इंजिन जोडले जात असे. पण कसारा आणि इगतपुरीदरम्यानच्या थळ घाटातील बोगद्यांमधून जात असताना या गाडीतील गोऱ्या प्रवाशांना इंजिनाच्या धुराचा त्रास होत असे. त्याबाबत त्यांनी ‘जी. आय. पी.’कडे सतत तक्रारीही केल्या होत्या. या सर्व बाबींची दखल घेऊन ‘जी. आय. पी.’ने मुंबईहून इगतपुरी आणि पुण्यादरम्यानच्या लोहमार्गांचे 1929-30 मध्ये विद्युतीकरण केले आणि 1930 पासून ‘पंजाब मेल’चा मुंबई ते इगतपुरीदरम्यानचा प्रवास ‘ई/ए-1’ विद्युत इंजिनाच्या मदतीने होऊ लागला. पुढे नव्वदच्या दशकाच्या अखेरीपर्यंत ‘डब्ल्यूसीएम’ श्रेणीतील विद्युत इंजिन ‘पंजाब मेल’ला जोडले जात होते. इगतपुरीला आल्यावर तिचे विद्युत इंजिन बदलून वाफेचे इंजिन जोडले जाऊ लागले. मुंबई-दिल्लीदरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले तरीही ‘पंजाब मेल’चे इंजिन 2012 पर्यंत इगतपुरीला बदलावे लागत होते. कारण तोपर्यंत मुंबई-इगतपुरी लोहमार्गावर 1500 व्होल्ट्स डी.सी. कर्षण (traction) प्रणाली वापरली जात होती. तिचे 25,000 व्होल्ट्स ए.सी. प्रणालीत रुपांतर पूर्ण झाल्यावर ‘पंजाब मेल’चे इंजिन इगतपुरीत बदलण्याची आवश्यकता राहिली नाही. आज मुंबई-भटिंडादरम्यान तिचे सारथ्य विद्युत इंजिनाकडे आणि भटिंडा-फिरोजपूर कँटदरम्यान डिझेल इंजिनाकडे असते.

स्वातंत्र्यापर्यंत ‘पंजाब मेल’ भारतातील प्रतिष्ठीत रेल्वेगाड्यांपैकी एक होती. त्यामुळे तिच्या मार्गात येणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांना बाजूला उभे करून या गाडीला प्राधान्य दिले जात असे. नव्वदच्या दशकात ‘पंजाब मेल’ला अतिजलद रेल्वेगाडीचा दर्जा दिला गेला. आज 110 वर्षांनंतरही ‘पंजाब मेल’ भारतातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/06/blog-post_4.html

इतिहासमुक्तकप्रकटनसमीक्षालेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2022 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन आहे, नवनवीन विषयावर असेच . लिहिते राहा.
पुलेशु.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

4 Jun 2022 - 10:21 am | कर्नलतपस्वी

या मेल मधून २४-९-१९७४ पहिला वहीला रेल्वे प्रवास केला होता. जास्त करून सैनिक असायचे. महाराष्ट्र, कर्नाटक मधील फौजी करता खुप सोईस्कर गाडी होती. फिरोजपुर कॅन्ट खुपच जुने आहे. हुसैनिवाला वरून पाकिस्तान कडे रेल्वेमार्ग जातो. आता सेवा खंडितआहे.
शहीद भगतसिंग, राजगुरू,सुखदेव,पंजाब माता विद्यावती(भगतसिंग यांची आई) बटुकेशवर दत्त यांची समाधी आहे तेथील पवित्रता वाखाणण्याजोगी आहे.
येथे होणारी शानदार बिटींग रिट्रीट परेड खुपच जवळून बघता येते.

मराठा रेजिमेंटचे सैनिक (गणपत ) यांचे शौर्य प्रतीक म्हणून हे स्थळ ओळखले जाते.येथे गाजवलेल्या त्यांच्या पराक्रमाचा इतीहास वाचून कुठल्याही मराठी माणसाची छाती अभिमानाने व डोळे आश्रूनी भरून येते.

आठवण झाली म्हणून लिहीले.

कंजूस's picture

4 Jun 2022 - 10:39 am | कंजूस

पराग आणि कर्नल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2022 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहेब मस्त आठवण.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jun 2022 - 4:50 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त.०

पराग१२२६३'s picture

4 Jun 2022 - 5:03 pm | पराग१२२६३

धन्यवाद

सस्नेह's picture

4 Jun 2022 - 5:58 pm | सस्नेह

माहितीपूर्ण लेख.
पंजाब मेल ही पूर्वी फास्ट आणि नॉनस्टॉप रेल्वे म्हणून प्रसिद्ध होती अशी लहानपणीची आठवण आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jun 2022 - 10:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान माहिती. फ्रंटियर मेलही अशीच प्रसिद्ध होती. नंतर दादर-अम्रुतसर व नंतर स्वर्णमंदिर एक्सप्रेस असे नामकरण झाले होते.

कंजूस's picture

5 Jun 2022 - 6:12 am | कंजूस

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या वेगळ्या.

पराग१२२६३'s picture

5 Jun 2022 - 8:18 am | पराग१२२६३

फ्रंटियर मेलचं नामकरण १९९६-९७ च्या आसपास सुवर्ण मंदिर मेल झालं. पण दादर-अमृतमर आणि सुवर्ण मंदिर मेल या स्वतंत्र गाड्या आहेत. दादर-अमृतमर मरेची, तर सुवर्ण मंदिर परेची आहे.

सुबोध खरे's picture

6 Jun 2022 - 9:56 am | सुबोध खरे

‘ई/ए-1’ किंवा WCP -१ ही इंजिनें १९८० च्या सुमारास सेवेतून निवृत्त केली गेली.

माझा पहिला लांबचा प्रवास १९७७ साली पंजाब मेलनेच मुंबई भोपाळ आणि परत असा आला आहे.

तेंव्हा तिला WCM १ हे इंजिन मुंबई ते इगतपुरी आणि पुढे भोपाळ पर्यंत WDM २ या डिझेल इंजिनावर चालवले जात असे.

ती ५ डाऊन/ ६ अप म्हणून मुंबई दिल्ली आणि परत अशी चालवत आणि दिल्ली ते फिरोझपूर आणि परत ३७ डाऊन/३८ अप म्हणून चालवत.

त्यावेळेस पंजाब मेलचा एक भाग फिरोझपूरला आणि दुसरा भाग लखनौ ला जात असे. हा मागचा भाग झाशीहुन झाशी लखनौ मेल ला जोडला जात असे. तेंव्हा पुष्पक एक्सप्रेस हि लखनौला जाणारी थेट गाडी नव्हती हि गाडी ०१ एप्रिल १९८७ साली सुरु झाली.

पराग१२२६३'s picture

6 Jun 2022 - 10:39 pm | पराग१२२६३

WCM रेल्वेमध्ये २००२-०३ पर्यंत वापरात होती. ती WCM-5 होती.

फारएन्ड's picture

6 Jun 2022 - 11:37 pm | फारएन्ड

मला ९६-९७ पर्यंत पाहिल्याचे लक्षात आहे. नंतर ती दोन्ही ट्रॅक्शन वर चालणारी डब्य्लूसीएएम वाली दिसू लागली. सिंहगड, डेक्कन, इंद्रायणी या गाड्यांना मी नंतर तीच पाहिली आहेत. त्यापुढे कोठे चालवत होते? कल्याण स्टेशनवर तरी मी सहसा पाहिली नाहीत.

पराग१२२६३'s picture

7 Jun 2022 - 10:16 am | पराग१२२६३

साधारण 2000 साली काढलेला WCM-5 चा फोटो माझ्याकडे आहे. सह्याद्री एक्सप्रेस घेऊन हे इंजिन मुंबईला निघाले होते. त्याच दिवशी काढलेला रेल्वेच्या सेवेत नवीन नवीन आलेल्या WCAM-2 चाही फोटो आहे. म्हणजे दोन्ही इंजिनं त्यावेळी वापरात होती. घाटात पुढची १२ वर्ष WCG-2 वापरली जात राहिली.

फारएन्ड's picture

7 Jun 2022 - 9:01 pm | फारएन्ड

मग असेल. मला लक्षात नव्हते.

असलेला लेख हवा.

फारएन्ड's picture

7 Jun 2022 - 9:00 pm | फारएन्ड

नॉस्टॅल्जिया आहे बराच या इंजिनांबद्दल. बाय द वे - या गाण्यात खूप आहेत ही इंजिने. तेथे ही एकच गाडी असल्यासारखे दाखवले आहे पण नीट पाहिले तर जाणवेल की ३-४ वेगवेगळी इंजिने आहेत :) WCM-1 ते WCM-5 पर्यंत मधली. मात्र कसारा घाटातील सुंदर चित्रीकरण आहे. तेथे काही वेळ वेगवेगळ्या गाड्यांचे चित्रीकरण करून सुचित्रा कृष्णमूर्ती एका गाडीतून येते असे भासवले आहे. प्रत्यक्षात बहुधा ती त्यातील एकाही गाडीत नसावी.
https://www.youtube.com/watch?v=4bIQNbHofs0

गामा पैलवान's picture

7 Jun 2022 - 7:03 pm | गामा पैलवान

पराग१२२६३,

माहितीपूर्ण लेख आहे. पंजाब मेल नक्की बॅलर्ड पियर वरनं निघायची का? माझ्या माहितीप्रमाणे १९२८ साली तरी जी गाडी निघायची ती फ्रंटियर मेल होती व ती आजच्या मध्य रेल्वेच्या मार्गाने दिल्लीपर्यंत जायची नंतर पंजाब पार करून पेशावरपर्यंत जायची. नंतर केव्हातरी ही आज जिला पश्चिम रेल्वे म्हणतो तिच्यावरून धावायला लागली. फाळणीच्या काळांत पेशावरपर्यंत दौड शक्य नव्हती. त्यामुळे हिला दिल्लीतच थांबवण्यात येई. नंतर पंजाब शांत झाल्यावर बहुतेक ही अमृतसरापावेतो धावू लागली. १९९६ साली हिचं सुवर्णमंदिर एक्स्प्रेस ( की मेल ) असं नामकरण केलं.

पंजाब मेल नेहमी बोरीबंदरावरनंच सुटून मध्य रेलवेमार्गेच धावंत आलेली आहे.

माझी माहिती या दोन इंग्रजी लेखांवर आधारित आहे :
१. फ्रंटियर मेल : https://en.wikipedia.org/wiki/Golden_Temple_Mail
२. पंजाब मेल : https://en.wikipedia.org/wiki/Punjab_Mail

आ.न.,
-गा.पै.

पराग१२२६३'s picture

8 Jun 2022 - 1:39 pm | पराग१२२६३

पंजाब मेल काही दिवस बॅलार्ड पिअरहून सुटते होती. त्याचा उल्लेख Indian Railways: The weaving of National Tapestry या पुस्तकातही आहे.
दुसरीकडे, फ्रंटियर मेल BB&CI ची रेल्वेगाडी असल्यामुळे ती बडोदामार्गे दिल्ली आणि पुढे पेशावरला जात होती.

पराग१२२६३'s picture

8 Jun 2022 - 1:39 pm | पराग१२२६३

पंजाब मेल काही दिवस बॅलार्ड पिअरहून सुटत होती. त्याचा उल्लेख Indian Railways: The weaving of National Tapestry या पुस्तकातही आहे.
दुसरीकडे, फ्रंटियर मेल BB&CI ची रेल्वेगाडी असल्यामुळे ती बडोदामार्गे दिल्ली आणि पुढे पेशावरला जात होती.

गामा पैलवान's picture

8 Jun 2022 - 6:13 pm | गामा पैलवान

पराग१२२६३,

तुम्ही म्हणता ते पुस्तक इथून मिळेल : https://www.pdfdrive.com/indian-railways-the-weaving-of-a-national-tapes...

त्यातल्या पीडीएफ पान क्रमांक १५० वर खालील मजकूर आहे :

The first such train was clearly the Punjab Mail, introduced
between Ballard Pier (later from Victoria Terminus) and Peshawar (later to
Firozpur) by GIPR in 1912. On some days, this had mail connections with P&O
steamships. Indeed, that’s how the Punjab Mail originally started. On those days,
it operated as Punjab Limited and operated from Ballard Pier (Mole Station) to
Peshawar, covering a distance of almost 2500 km in forty-seven hours at a very
respectable speed of fifty-three km per hour.

या मजकुरानुसार बॅलर्ड पियरवरनं निघणारी गाडी पंजाब लिमिटेड ( Punjab Limited ) या नावाखाली सुटंत असे. याचा अर्थ मी असा लावला की, इतर वेळेस सुटणारी बोरीबंदराहून सुटंत असून तिचं अधिकृत नाव पंजाब मेल असावं.

त्याच्या पुढच्या पानावर एक वेळापत्रक व भाडेसारणी दिली आहे. त्यानुसार गाडीचं नाव द पंजाब रॉयल मेल एक्स्प्रेस ( The Punjab Royal Mail Express ) असं आहे.

एकंदरीत या गाड्यांचा मोघम उल्लेख पंजाब मेल असा होत असे, पण ते अधिकृत नाव नसावं.

याउलट १९२८ साली फ्रंटियर मेल सुरू झाली ती बॅलर्ड पियरवरनं निघंत असे. गाडी पश्चिम रेल्वेची असली तरी तिचा मार्ग मध्य रेल्वेचा होता ( असं दिसतंय ). ही गाडी मुंबई --> बडोदा --> दिल्ली या मार्गाने केव्हा सुरू झाली ते तपासून बघायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

यांचे महत्त्व त्या भागांत रेल्वे सुरू होणे हेच होते. नंतर त्याच मार्गावरून जलद जाणाऱ्या ( अर्थात स्टेशने वगळून) गाड्या धावू लागणे हे नव्हतेच. ब्रिटिशांना पोस्टल सर्विस महत्त्वाची वाटत होती. शिवाय सैनिक नेणे. अजूनही अमृतसर गाडी किंवा इतर गाड्यांना मिलिट्री बोगी राखीव असते. खडकी,देवळाली वगैरे गाडी थांबणे गरजेचे असते.

पराग१२२६३'s picture

9 Jun 2022 - 11:24 pm | पराग१२२६३

बरोबर

सिरुसेरि's picture

12 Jun 2022 - 5:19 pm | सिरुसेरि

छान माहिती . देव आनंद यांच्या "रोमान्सींग विथ लाईफ" या आत्मकथनातही बहुतेक करुन याच ट्रेनचा उल्लेख आहे . गुरुदासपुर( लाहोरमधील ) ते मुंबई असा प्रवास त्यांनी त्यावेळी केला आहे .

जेम्स वांड's picture

13 Jun 2022 - 8:38 am | जेम्स वांड

तुमचा रेल्वेजचा व्यासंग उत्तम आहे, एक विनंती आहे की लेखासोबत लेखनाची विषयवस्तू असणाऱ्या रेल्वेचे काही आकर्षक फोटोज रेल फॅनिंग वेबसाईट्स, इन्स्टाग्राम इत्यादींवरून घेऊन (प्रकाशचित्रकाराला योग्य ते उल्लेख, नामनिर्देशन देऊन) वापरले तर अजून मजा येईल असे वाटते.

प्रसाद_१९८२'s picture

13 Jun 2022 - 10:17 am | प्रसाद_१९८२

या दुसर्‍या फोटोत इंजिनच्या बॉयलरमधून निघणारा धूर स्टेशनमधे न पसरता, तो थेट बाहेर निघून जावा यासाठी इजिंनच्या वर एक चिमणी देखील बनविली आहे.