एका (शैक्षणिक) सहलीची सांगता

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
16 Jan 2022 - 12:41 am

महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आ‌ईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी.

तर सांगायची गोष्ट अशी की सहलीची खुमखुमी सर्वांना आली. नुकतीच सहल हो‌ऊन गेल्यामुळे पुन्हा सहलीला घरचे पाठवणं शक्य नव्हतं. मग काय करणार? ना‌ईलाजानं शैक्षणिक सहल आयोजित करावी लागली. कार्य सिद्धीस नेण्यास सदस्य उत्सुक होतेच. मग ठरला बेत आणि गेलो माथेरानला. धमाल केली हे सांगायलाच नको. अंहं...धमाल म्हणजे फक्त पिणं नाही, ते आपलं जोडीला. सुदैवानं आमच्यापैकी कुणाला खेचीचा नाद नव्हता. सहलीला म्हणून जायचं आणि तिथे पी पी प्यायची, खेची खेळत बसायचं मग इतक्या दूर कशाला जावं? एखाद्याचं घर रिकामं असेल तर तिथेच पडा ना!

तर नेहेमीप्रमाणे मस्ती झाली. एकमेकाच्या उखाळ्यापाखाळ्या झाल्या. प्रकरणं - असलेली आणि नसलेली प्रकरणं उगाळुन झाली. खास मुलींविषयी उच्च कोटीतला परिसंवाद झाला. एकानं एखादी मुलगी कशी चालु आहे, तिला तिच्या करू बरोबर बारा बंगल्यात संध्याकाळी पाहिली असं म्हणताच दुसऱ्यानं त्याला हिणवावं कारे, तुला ला‌ईन देत नाही तर लगेच ती चालु काय? आणि लेका तुझ्या लायकीनुसार तुला काय सीता सावित्री थोडीच मिळणार आहे?’ मग जोरदार कल्ला. मधेच एखादा गंभीर होत म्हणायचा की आपण हे करतो ते बरोबर आहे का? तिकडे बाप कष्ट करुन कमावतोय, आ‌ई जेवायला घालतेय अणि आपण त्यांना फसवुन इथे हे असे उद्योग करतोय.. मग कुणीतरी सणसणीत टपलीत हाणत वातावरण बदलुन टाकायचा ******, आता आलास ना ? मग कसला पाप पुण्याचा हिशेब करत बसलास? अरे सोड ना. आपल्याला जाणीव आहे ना? बास तर मग. उद्या सगळे कमवायला लागतील तेव्हा असे जमणार आहोत का? भले पैसा कमवु आजुबाजुच्यांबरोबर पार्ट्या करु पण आज जी मस्ती करतोय ती आयुष्यात पुन्हा करायला मिळणार आहे का? सहकारी वेगळे, शेजारी वेगळे आणि आपल्यासारखे मित्र वेगळे. उद्या भले स्कॉच परवडेल पण आज मित्राचं लक्ष नसताना हळूच त्याच्या ग्लासातला घोट मारतो, ला‌ईट मागतो अणि देणाऱ्याला समजायच्या आत त्याच्याच सिगरेटचा झुरका मारतो ती मजा तेव्हा असणारे का? मग गप्पा रंगत जातात, घड्याळ बघायचं पाप कुणी करत नाही. मग कधीतरी अपरात्री एकेक विकेट पडत जातात.

सहल अर्थातच धमाल झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॊलेजवर फ़ुल कोरम असतो. आम्ही कुठेतरी मजा मारायला गेलो हे इतरांच्या लक्षात अलेलं असतं; विषेशत: ज्यांना समजू न देता कटवलेलं असतं त्यांच्या. प्रत्येक ग्रुपमध्ये पका‌ऊ, रसभंग करणारे रंगाचा बेरंग करणारे असतातच आणि लोक त्यांना कटवत असतात. मग कॆंटिनमध्ये बैठक जमली. सहलीच्या गप्पा रंगल्या. घडल्या गोष्टींवर मनसोक्त हसून झालं. दिवस कसा गेला समजलं नाही. सगळे आपापल्या घरी पांगले.

दुसरा दिवस गेला. तिसरा गेला. आशूचा पत्ता नाही. कुठे जाणार वगैरे काही बोललो नव्हता. मग हा प्राणी गेला कुठे? सगळे टेन्शनमध्ये. काहीतरी लोचा होता हे खरं, पण काय ते समजायला काही मार्ग नव्हता. सगळे नाही म्हटलं तरी थोडे बेचैन झाले. मग जरा वेळानंतर थोडं पूर्ववत झालं पब्लिक आपापल्या मार्गी लागलं. चौथा दिवस उजाडला. आशुचा पत्ता नाही. तसं म्हटलं तर राणी रूपमती त्याच्या जवळच राहायचीं पण बिचारीला रूपमती हे नांव असल्यामुळे आम्ही राणी रुपमती करुन टाकली होती आणि ते नाव सगळांच्या जिभेवर बसलं होतं. मग ती कशाला आम्हाला काही सांगेल, मुळात तिला विचारणार कोण?

आणि हे सगळं गूढ वाढत असतानाच लांबून आशू येताना दिसला. तो दिसताच सगळ्यांमध्ये उत्साह संचारला. सस्पेन्स जरा जास्तच ताणला जात होता. आशूला हळूहळू चालत येताना पाहून सटकलेल्या पोरांनी मराठी वाड्गमयातले शेलके शब्द उच्चारत त्याचा उद्धार केला आणि पटपट ये की साल्या, नववा लागल्यागत काय चालतोस? असा खडा सवाल केला. आशू आला तो पडेल चेहेऱ्यानं. एकानं हळूच मागून जात त्याच्या पाठीवर जोरदार थाप मारली आणि तो गायब असल्याबद्दल एक कचकचीत शिवी घातली. आणि त्या धपाट्याबरोबर आशू कळवळून ओरडला. सगळे दचकले, याला झालय काय? आशू आपल्याच हाताने पाठ चोळत खालच्या आवाजात म्हणाला साला सगळं अंग ठणकतंय रे! मामला गंभीर असल्याचे सगळ्यांच्या एव्हाना लक्षात आलं होतं?

बदक सरसावत उठला, म्हणाला काय रे , राडा झाला का? कुठली पोरं होती? चला रे आत्ताच जा‌ऊया. आता नेहेमीप्रमाणे बदक्या कुणाचीतरी सायकल घे‌ऊन मामाकडे जाणार हे सर्वांना समजलं. त्याच्या मामाचं जवळंच पान बीडीचं दुकान होतं. ते मामी सांभाळायची, मामा मृत्तिकापत्रसंलग्न अंकव्यवसायात मग्न असायचा. साहजिकच त्याचा जनसंपर्क दांडगा होता. त्याचा मुलगा सुनिल, मस्त बॊडी बिल्डर, त्याच्या दोन रिक्षा होत्या. हे सगळं ध्यानात ये‌ऊन आशू बोलला. गपारे. कुठे निघाले राडा करायला? आयला मार पडला, पण बापानंच मारला म्हणताना गप खावा लागला.

ऐकणारे गार! मग आशू सुरू झाला. काय सांगू सालं नशीबच फुटकं. आयला कुठे झक मारायला बापाबरोबर जाताना सर दिसले आणि मी थांबून बापाची ओळख करुन दिली होती. साला दिड दोन वर्ष झाली असतील त्याला. सर म्हणजे आमचे प्रिंसिपल. तर सर याच्या घरापासून थोडे पुढे मेन रोडवर राहायचे आणि हा थोडा अलीकडे डाव्या हाताच्या गल्लीत राहायचा. एकदा ओळख झाली म्हणताना जाता येताना जर कधी सर दिसले तर आशूचे बाबा आवर्जुन गुड मॊर्निंग गुड इविनिंग वगैरे करायचे आणि सरही तसाच प्रतिसाद द्यायचे. एकतर सगळे आपापल्या व्यवधानात शिवाय सर स्वभावाने मितभाषी त्यामुळे कधी काही बोलायचा प्रसंग आला नव्हता.
अरे यार आपण आलो परत आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे आपण इथे भटलो व कॊलेज संपल्यावर घरी गेलो त्या दिवशी संध्याकाळी बाप घरी आला तोच भडकलेला. आल्यावर चहासुद्धा न घेता बापानी दरडावलं, वर ये. आशू ज्या वाडीत राहत होता तिथे तळमजल्यावर त्यांची एक डबलरूम होती आणि वर पहिल्या मजल्यावर एक सिंगलरूम होती. वर ये हे शब्द ऐकताच मला समजलं की आपले दिवस भरले!

वर जाताच बापानी दार लावून घतलं आणि एक फाडकन कानाखाली वाजवली. एकदम काजवेच चमकले. कुठे इंड्स्ट्रियल व्हिजिटला गेला होतास ना दोन दिवस? - बापाचे ते शब्द ऐकताच मी समजलो की खेल खतम! त्या दिवशी माझ नशिब वा‌ईट होतं हेच खरं. संध्याकाळी येताना बापाला कोपऱ्यावर सर दिसले. बापाने आदबीने नमस्कार केला आणि जे गेल्या दिड दोन वर्षात घाडलं नव्हतं ते घडलं. सर थांबले आणि विचारलं की काय म्हणतात चिरंजीव? अभ्यासाला लागले की नाही? बाप म्हणाला हां, आता लागेल , कालच काय ते तुमचं इंडस्ट्रियल व्हिजीट ते करून आला. सर म्हणाले कसली व्हिजिट? काय बोलताय? अहो स्पोट्‌र्स, स्नेहसम्मेलन, स्पर्धा, सहली, एक्स्कर्षन्स सगळं काय ते नाताळच्या सुट्टी‌आधी संपवतो आम्ही. जानेवारीत नव्याने कॊलेज उघडलं की मग सगळं बाजूला ठेवून अभ्यासाला लागायचं, मग पऱीक्षा. बाप काय ते समजुन चुकला.

ही हकिगत मला ऐकवताना बापाने तोंडाचा पट्टा सुरू केला. साला इकडे आम्ही फिया भरतो, आम्हाला वाटतं पोर शिकतय मोठ हो‌ईल, चांगली नोकरी मिळवेल. पण कसलं काय? तुझे हे असले धंदे?? पुन्हा एक कानफटात.

"बापरे! मग ? " आम्ही एका सुरात ओरडलो.

मग काय? मग बाप अमिताभ आणि मी व्हिलन. दे दनादन!
मी बऱ्याच विनवण्या केल्या, आणाभाका घेतल्या, आठवतील त्या सगळ्या देवांच्या शपथा घे‌ऊन सांगितलं की पुन्हा असं करणार नाही. पण बाप ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं बदडायला सुरूवात केली.
हात
पाय
स्लिपर
कॆनव्हासचा बूट
कमरेचा बेल्ट
केरसुणी
बापानी जे मिळेल त्यानी हाणलं. साला बेकार मार खाल्ला. मार मार मारल्यावर बाप तणतणत खाली निघुन गेला. मी निपचित कॊटवर पडून राहिलो. बापासमोर जायची हिम्मत होत नव्हती. अंग भरून आल होतं, साली हाडं खिळखिळी झाली होती, गालफडं सुजली होती. म्हणून दोन दिवस गप घरात पडुन होतो. आज बाहेर पडलो आणि आलो.
आम्ही एकदम चूप. मग आशू म्हणाला, झालं ते बेकारच पण एक कॊन्फिडन्स आला, कधी राडा झालाच तर दोघा तिघांना अंगावर घ्यायची ताकद आहे आपली

वावरजीवनमानkathaaप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

16 Jan 2022 - 1:46 am | विजुभाऊ

वेल्कम साक्षी . बॅक इन अ‍ॅक्षन
गुड टू सी यू अगैन ऑन द ग्राउंड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2022 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच लिहिते राहा. सहलीचे फ़ोटो प्लीज. :)

आमच्याही महाविद्यालयाच्या सहली करोना उन्मादामुळे थांबल्या आहेत.
मस्त मजा असते सहलीची.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

16 Jan 2022 - 11:23 am | कंजूस

तुम्हाला नेतात?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2022 - 2:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला नेतात?

मी विद्यार्थ्यांना नेतो. ;)

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

16 Jan 2022 - 12:18 pm | Bhakti

:)
हो!
सगळे गुपित फुटतात हळूहळू!
माझी शेवटची ट्रिप माझ्या​ पोरीपोरांबरोबर कोकण होती.
मिसिंग ...

कंजूस's picture

16 Jan 2022 - 5:44 am | कंजूस

मारतात पोरांना?

सर्वसाक्षी's picture

16 Jan 2022 - 7:43 am | सर्वसाक्षी

गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची आहे
आजची असती तर पोरांनी आशूला मोबाईल वर कॉल केला असता.
मी काळाचा उल्लेख केला नाही त्यामुळे आपल्याला ही आजची घटना वाटली असावी.
आता आम्ही आणि माथेरान म्हणजे आमच्या कॉलेज जीवनातील किस्से चाळीस वर्षांपूर्वीचे

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

16 Jan 2022 - 8:24 am | तुषार काळभोर

आता पोरं सकाळी फटफट्या (त्यांच्याच बापाने घेऊन दिलेल्या केटीएम, पल्सर अन् अपाचे) काढून माथेरान ला जाऊन मध्यरात्री येतात पण. शिवाय प्यायला आता बाहेर जायची गरज नाही. कुणाच्यातरी रूमवर नाईट स्टडी करता येतोच.
महत्त्वाचं म्हणजे आता बाप मारत नाहीत (त्यांनी तीस चाळीस वर्षांपूर्वी तेच केलेलं असतं), अन् पोरं मार खाऊन घेत नाहीत (आपण एकुलते एक आहोत, याची त्यांना जाणीव असते).

कंजूस's picture

16 Jan 2022 - 11:21 am | कंजूस

आता सर्व कुलदीपक.आणि गेली पिढी पूर्वी बापाला घाबरायची तरुणपणी आणि आता पोरांना घाबरते म्हातारपणी. अगदी चैन्नई एक्सप्रेसमधला शारुख.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 12:20 pm | मुक्त विहारि

आवडला

श्रीगणेशा's picture

16 Jan 2022 - 4:19 pm | श्रीगणेशा

"शैक्षणिक" सहल आवडली!
सुरुवातीला थोडा वेळ खरंच शैक्षणिक सहल होती असं वाटलं :-)