सध्या दुपारी झोपावे की जागे राहावे हा प्रश्न आम्हाला करोना पर्वात रोज पडत आहे.
या निशा सर्व भूतानां तस्याम् जागर्ति संयमी! असे भगवंत गीतेच्या कुठच्याश्या अध्यायात कुठल्या तरी श्लोकात म्हणतात. (येथे त्या अध्यायाचा आणि श्लोकाचा क्रमांक शोधून काढून तो येथे लिहून, आम्हाला भगवद्गीतेचे किती सखोल ज्ञान आहे हे वाचकांना वरवर दाखवून छाप पाडण्याचा मोह होत होता. परंतु आम्ही पडलो कमालीचे विनम्र आणि प्रामाणिक! त्यामुळे तसे केले नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी! लोभ असावा!!)
जेव्हा सामान्य भूत मात्रांची रात्र असते (आणि ते झोपलेले असतात) तेव्हा संयमी जागा असतो असा त्याचा भावार्थ आहे. परंतु जेव्हा सामान्य भूत मात्रांची दुपार असते (आणि ते जागे असतात) तेव्हा संयमी काय करतो हे भगवंतांनी कुठेही सांगितलेले नाही. परंतु तर्कशास्त्राने तो तेव्हा झोपलेला असला पाहिजे असा अर्थ आम्ही घेतला आहे; आणि दुपारी झोपायचे सत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे . यावर काही खडूस मित्रांनी, “तुम्ही तर रात्रीसुद्धा डाराडूर झोपता” असे सांगून आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला . त्यावर आम्ही त्यांना चोख सांगितले की आम्ही फक्त दिवसभर संयमी असतो. रात्री आमचा संयम ढळतो आणि आम्ही आमची गणना सामान्य भूतमात्रांत करतो!
तर ते काय असेल ते असो. सध्या विषय दुपारच्या झोपेचा आहे. त्यामुळे सध्या गीता विषयक तत्वज्ञान बाजूला ठेवू.
दुपारच्या झोपेला आपल्या शास्त्रकारांनी वामकुक्षी असे म्हटले आहे. दुपारची थोडीशी झोप ही शरीर आणि मन अत्यंत प्रसन्न करते आणि उर्वरित दिवस अतिशय स्फूर्ती मध्ये जातो असे म्हणतात. आणि त्याचा बऱ्याच जणांना अनुभव सुद्धा असेल.
सकाळी अत्यंत लवकर उठणाऱ्या मंडळींसाठी तर वामकुक्षी ही अतिशय चांगली असते. सकाळी पाच ला उठलेला देह दुपारी १२ पर्यंत बऱ्यापैकी थकून जातो आणि मग पुढे रात्री दहा-अकरा पर्यंत अनेक कामे करायची म्हणजे तसे थोडे कठीणच!
त्यामुळे दुपारी भोजनानंतर डाव्या बाजूच्या कुशीवर झोपणे हे आरोग्याला चांगले असते असे आयुर्वेदकारांनी सांगितलेले आहे.
आमच्या घराण्यामध्ये, झोपेवर आमच्या साऱ्यांचेच परंपरागत प्रचंड प्रेम. आमचे आजोबा, आमचे वडील, आमची आजी, आते, काका असे सारे खानदान दुपारी थोडा वेळ तरी झोपायचेच! हा थोडा वेळ म्हणजे पाऊण तासापासून अगदी एक तासापर्यंत असायचा! आमचे वडील तर या दुपारच्या झोपेला वामकुक्षी नव्हे तर जामकुक्षी असे म्हणायचे हे मला आठवते!
झोप आणि अंधार यांचेही अतिशय जवळचे नाते आहे . झोप अंधाऱ्या खोलीत घेतली तर त्याचा शरिरावर जास्त चांगला परिणाम होतो याच्यावरही आमच्या पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आहे. आता ही गोष्ट वैज्ञानिक कसोट्यांवर सुद्धा सिद्ध झालेली आहे! आमचे वडील तर प्रकाशाची एखादी तिरीप सुद्धा चालवून घ्यायचे नाहीत! ते देवघराच्या समोर जेथे झोपायचे तेथे एका खिडकीला एक भोक पडले होते. तेथून येणारा प्रकाश त्यांच्या झोपेची पूर्ण वाट लावायचा. वास्तविक तो प्रकाश त्यांच्या डोळ्यावर पडायचा नाही. कुठेतरी पोटावर किंवा पाठीवर पडत असेल कदाचित. परंतु तरीपण प्रकाशाचे जे विचरण किंवा अभिसरण होऊन जो थोडा काही अप्रत्यक्ष प्रकाश त्यांच्या मिटलेल्या पापण्या मधून डोळ्यात शिरायचा तो ही त्यांना बहुदा तापदायक ठरायचा. त्यामुळे वडील त्या भोकामध्ये चक्क कापूस भरून ठेवायचे! इतका आमचा उजेडावर राग, तर झोपेवर प्रेम ! माझ्या आईला सुद्धा दुपारची झोप नसेल तर पुढचा दिवस भयंकर जातो . दुपारी झोपायची ही खोड अशाप्रकारे आमच्याकडे वंशपरंपरागत आलेली आहे.
आमच्या घराण्यात वंशपरंपरागत आमच्या वडिलांपर्यंत कोणीही नोकरी केली नाही. आम्हीच प्रथम नोकरी करून आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला!
आमच्या वडिलांना आमच्या एका चुलत आजोबांनी मुंबईला नोकरी लावली होती . त्यांनी काही महिने काम केले आणि नंतर त्यांच्यामधला ‘गावचा खोत’ जागा झाला. ‘आम्ही गावचे जमीनदार ! गावात आम्ही सांगतो ते लोक ऐकतात तर इथे मुंबईत, कंपनीमध्ये आम्हाला दुसऱ्याचे ऐकून घ्यावे लागते’ असा तात्विक स्वाभिमान एक दिवस त्यांच्यामध्ये जागृत होऊन त्यांनी नोकरी सोडली आणि त्याबरोबर मुंबई सुद्धा!
या आमच्या घराण्याच्या निद्राभक्तीचा त्रास पुढे आम्हाला जेव्हा नोकरी लागली तेव्हा झाला.
आम्हाला दुपारी जेवले की झोपेची जी काही एक नशा चढते त्याला तोड नाही!कोकणी माणूस जेवला की संपला अशी एक कोकणात म्हण आहे!
असो. तर सांगायचा मुद्दा तो असा की, अजूनही कार्यालयामध्ये असताना आम्हाला प्रतिदिन, दुपारी जेवल्यानंतर सडकून झोप येते! परंतु करायचे काय? आम्ही एकदा आमच्या एच आर डिपार्टमेंट वाल्यांना सांगून पाहिले की, तिकडे कोरियात का कुठे- त्यांनी दुपारची झोप ही कायदेशीररित्या बंधनकारक केली आहे; तर त्या धर्तीवर आपल्या इथे असे काही करता येईल का म्हणून? त्यावर एका विद्वान एच आर अधिकाऱ्याने मला कोरियाच्या धरतीवर जे होते ते भारतीय धरतीवर करायलाच हवे असे नाही असे सांगून वाटेस लावले. त्याला तेथल्या तेथे धरतीमध्ये गाडण्याची राक्षसी इच्छा मी मोठ्या कष्टाने गाडून टाकली! कोरियामध्ये दुपारची झोप घेण्यासाठी वामकुक्षी कक्ष (सिएस्ता रूम) असतात असे ही सांगून पाहिले. त्यावर, त्यासाठी मिटिंग रूम आहेत की- तेथे दुसरे काय करतात? अशी अर्वाच्च भाषा त्याने वापरताच मी तिथून काढता पाय घेतला. म्हटलं आणखी शोभा नको.
मी एकदा वरिष्ठांना सुद्धा भीत-भीत सांगितले की, एका पाहणीत असे आढळून आले आहे की ज्या कंपनीमध्ये कर्मचारी दुपारी दहा ते पंधरा मिनिटं झोपतात, त्या कंपनीमध्ये एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या कामाचा दर्जा आणि कामाचा आवाका वाढतो. त्याप्रमाणे आपल्याही कंपनीतील कामाचा दर्जा आणि आवाका वाढवण्यासाठी तो प्रकार आपल्याकडे करता येईल का असे विचारून पाहिले. त्याचा परिणाम एवढाच झाला की त्यावर्षी माझे होणारे प्रमोशन आणि इन्क्रिमेंट रहित झाले ते आजतागायत!!
अशाप्रकारे दुपारी येणारी झोप मोडू नये म्हणून भरपूर प्रयत्न केले. परंतु त्यात माझी चांगलीच खोड मोडली आणि इतक्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इतकी वर्षे इन्क्रिमेंट नसल्यामुळे आयुष्यात पुरता झोपलो तरी किंवा आयुष्यातून उठलो तरी!
अशा प्रकारे सारे प्रयत्न विफल झाल्यानंतर आम्ही एका वैशिष्ट्यपूर्ण कलेची साधना प्रारंभ केली. ती म्हणजे जागच्याजागी कुठल्याही ठिकाणी समोरच्याला कळू न देता झोपण्याची कला! काही महिन्यांच्या सरावानंतर आम्ही या कलेवर इतके प्रभुत्व मिळवले की कार्यालयामध्ये कुणाचीही तमा न बाळगता दर दुपारी किंवा भर दुपारी आम्ही खुर्चीतल्या खुर्चीत झोपू लागलो! दुपारी दोन ते तीन ही वेळ म्हणजे अत्यंत नाजूक! कम्प्युटरच्या पडद्यावर सगळं डबल किंवा ट्रिपल असं दिसू लागतं. कुणी हाक मारली तर ऐकू येत नाही. फोन आला तर ते ही बऱ्याच वेळा कळत नाही. फक्त दुःखात सुखाची गोष्ट एवढीच की एवढ्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर एक गोष्ट आम्ही प्रयत्नपूर्वक, खुबीने शिकलो आहोत. ती ही की, आम्हाला कितीही पेंग आली किंवा झोप आली तरी आमचे डोके जराही हलत नाही.
आपण बस मध्ये किंवा रेल्वे मध्ये पेंगत असणाऱ्या माणसांची मजा पाहिली असेल. त्यांचे डोके कसे एका विशिष्ट तालामधे हलते. दोनदा तीनदा थोडेसे हलते आणि मध्येच एकदम झटका बसल्यासारखे जोरात हलते. कधी डावीकडच्या प्रवाशाच्या खांद्यावर, तर कधी उजवीकडच्या प्रवाशाच्या खांद्यावर, तर कधी समोरच्या सीटवर जोरात आपटते !
आणि मग हा दुर्दैवी जीव जर सीटवर एकदम कडेला म्हणजे मार्गिकेला लागून बसला असेल तर बिचाऱ्याचे आणखी हाल. असे झोपसम्राट झोपेच्या दणक्याने सीट वरून खाली पडून मार्गिकेमध्ये जोराने आपटलेले मी पाहिले आहेत. सीट समोरासमोर असेल आणि या पेंगेश्वराचे डोके उजवीकडे किंवा डावीकडे न जाता जर समोर तोल जाऊन जात असेल आणि त्याचवेळी जर बस चालकाने जोरात ब्रेक लावला तर हे महाराज डोक्याबरोबर आपले संपूर्ण शरीरच समोरच्या सीटवरील दुर्दैवी प्रवाशाच्या स्वाधीन केलेले मी पाहिले आहेत. परंतु आमची मात्र या क्षेत्रात अशी मास्टरी आहे की, आम्हाला झोप येत आहे किंवा पेंग येत आहे हे लांबून सहसा कुणाला कळत नाही. कारण कितीही पेंग आली तरी आमचे शिर एकदम स्थिर असते! इतके- की लांबून एखाद्याला वाटावे की हा मनुष्य एकदम एकाग्रचित्ताने कम्प्युटर कडे पाहत काम करीत आहे!!
बऱ्याच वेळा या मधुर समयी कुणाचा तरी फोन येतो. आम्ही फोन उचलतो. परंतु त्याचा एकही शब्द डोक्यात शिरत नाही. आणि स्वतःला काय बोलायचे हे ही सुचत नाही इतका झोपेचा भयंकर अंमल सुरू असतो! तिथेही आम्ही आमच्या अक्कलहुशारीने एक विशिष्ट प्रकारचे प्राविण्य मिळवले आहे.
समोरचा मनुष्य काय बोलतो हे जरी कळत नसेल तरी आम्ही योग्य ठिकाणी, “येस, करेक्ट, ओके, बरोबर आहे, आय सी, ॲब्सल्यूटली , काय म्हणता काय?, अच्छा, ओह ओके, याच्या थोडे खोलात जाऊन चर्चा केली पाहिजे,” अशी विशिष्ट वाक्ये झोपेत सुद्धा नेमकी मध्येमध्ये टाकत राहतो. त्यामुळे समोरच्याला आम्ही झोपेत आहोत याचा जराही थांगपत्ता लागत नाही. मग झोपेतून जागे झाल्यानंतर आम्ही त्याला परत फोन करतो आणि सांगतो की मघाशी आपण जे बोललो त्यातली फक्त अमुक एक गोष्ट आम्हाला कळली नाही त्यामुळे जरा एकदा परत सांगा की! मग तो समोरचा उत्साही मनुष्य, टिपिकल मराठी माणसाच्या सवयीप्रमाणे एक-दोन गोष्टीच काय- संपूर्ण स्टोरीच परत सांगतो!
अशाप्रकारे आमच्या झोपेचे हे बिंग आम्ही पहिल्यांदा तुमच्यासमोर उघड केले आहे. तर विनंती केवळ अशी की, कृपया मेहरबानी करून हे आमच्या कंपनीत जाऊन सांगू नये. अन्यथा एका गरीब माणसाची नोकरी जाऊन त्याला भुके मारण्याचे पातक आपल्या डोक्यावर बसेल!
आता करोना कालाने मात्र आमचा तो प्रश्न अतिशय चांगल्या रीतीने सोडवला आहे. सध्या कार्यालयात जाऊन काम करण्याची सक्ती नसल्यामुळे, ‘हवे तेव्हा काम, हवे तेवढेच काम, पण हवी तेव्हा, हवी तेवढी झोप!’ हे तत्व आम्ही अंगिकारले आहे.
यामध्ये काही नतद्रष्ट लोक आम्हाला असे म्हणाले की झोपा काढून कंपनीचा पगार घेत आहात. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की दुपारी आम्ही जेवढे जास्त झोपू तेवढ्या कंपनीच्या कामात कमी चुका होतील! कारण कंपनीचे कामच मुळात आमच्या हातून कमी होईल आणि आमच्या हातून चुका ही कमी होतील आणि त्यामुळे कंपनीचा प्रचंड फायदा होईल हे तुमच्या लक्षात कसे येत नाही?
तर मंडळी कुणाचीही भीडभाड न ठेवता भरपूर झोपा, सकाळी उशीरा उठा, पुन्हा दुपारी झोपा, रात्री लवकर झोपा! झोपेने तुमचे आणि कंपनीचे आरोग्य अतिशय छान राहील यात आम्हाला आमच्या अनुभवावरून कोणतीही शंका नाही!
तर मंडळी, वाचन बास करा, ओढा चादर, बदला कुशी, अलार्म करा snooooz आणि करा पुनःश्च सुरू घोराख्यान!
नाय करायची पर्वा कुणाची!! कारण-
झोप आहे ध्येय माझ्या जीवनाचे।
झोप आहे गीत या अंतर्मनाचे।
झोप ही संजीवनी- हे समजुनी!
बदला कुशी, द्या ताणुनी
दादासाहेब दापोलीकर
९९६७८४०००५
प्रतिक्रिया
27 May 2021 - 9:41 pm | उगा काहितरीच
मस्त !
27 May 2021 - 10:27 pm | nanaba
Awadalay
28 May 2021 - 5:01 am | कंजूस
तुम्ही खरेच संयमसम्राट आहात. बाकी दुपारच्या झोपेचे गुणगान गाणाऱ्या प्रसिद्ध लोकांत चर्चिल होते. झोप घेतल्याने मनुष्य ताजातवाना होतो, चांगले उत्साहाने काम करतो हे त्यांनी सिद्ध केलेच आहे. त्यांच्या लेखातील प्रत्येक शब्दाला ते प्रत्येकी एक पौंड वाजवून घेत. ( पौंड वाजतो का मला माहिती नाही.)
तुमचे लेखनही वाजवून घेण्याइतके झाले आहे. यासच 'monetisation' असा भारदस्त शब्द वापरण्यात येतो.
लेखातील विचारांशी सहमत.
28 May 2021 - 6:20 am | सोत्रि
पेंगत पेंगत लेख वाचला आणि लेखाच्या गाभ्याला ‘जागून’ चक्क डाराडूर झोपी गेलो!
उठल्यावर कंपनीचा भरपूर फायदा करून दिला ह्याची जाणिव होऊन ताजातवाना झलो!
जियो, मस्त लेखन.
- (झोपाळू) सोकाजी
28 May 2021 - 8:01 am | आनन्दा
या निशा सर्व भूतानाम तस्याम जागरती संयमी
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:
तेव्हा खुशाल दुपारी झोपा. बाकी लेख मी पण झोप झाली की वाचतो.
28 May 2021 - 9:29 am | आनन्दा
बाकी यावरून आठवले
माझा एक मित्र, interview मध्येच सांगायचा, मी दुपारी जेवण झाले की 15 मिनिटे झोपतो.
जमणार असेल तरच येतो.
28 May 2021 - 12:26 pm | वामन देशमुख
एकदम मस्त जमलंय झोपपुराण!
मीही निद्राराणीचा प्रियकर आहे. रोज दुपारी झोपल्याशिवाय मला रात्री झोपच येत नाही असेच म्हणा की! आत्ताही नुकताच बगारा खाना व दालचा असा मस्त हेवी ब्रन्च करून झालाय, आता हा प्रतिसाद लिहून एक मस्त फ्रायडे नून ची झोप काढतो!
बाकी, एकेकाळी मिपावर व्यायाम करण्याचं फ्याड आलं होतं त्याहीवेळीही मी झोपेचाच पुरस्कार केला होता याची या प्रसंगी, या निमित्ताने व या माध्यमातून झैरात करून घेतो.
28 May 2021 - 12:33 pm | गॉडजिला
...
28 May 2021 - 3:35 pm | अनिंद्य
बेश्ट !
28 May 2021 - 5:10 pm | चौथा कोनाडा
👌
आमच्या घराण्यामध्ये, झोपेवर आमच्या साऱ्यांचेच परंपरागत प्रचंड प्रेम.
आम्ही पण तुमच्याच घराण्याचे समजा !
28 May 2021 - 6:32 pm | सिरुसेरि
सुरेख झोप माहात्म्य . हा लेख वाचुन "जगा आणी जगु द्या" या चालीवर "झोपा आणी झोपु द्या " तसेच "मस्त मंडळी सुस्त होउ या " असे म्हणावे लागेल . वर्गामधे सदैव स्रुषुग्नावस्थेत असलेला आणी भुगोलाच्या तासाला गुरुजींनी "मसाल्याची बेटे कुठली ? " असे विचारल्यावर "बेडेकर आणी कुबल " असे उत्तर देउन मान टाकणारा शामु तळेकर आठवला . सध्या सोशल डिस्टंनसींगच्या आणी ऑनलाईन वर्गाच्या काळात या उत्तरावर मास्तरांनी कुबल कुबल कुबलण्याचीही भीती नाही .
28 May 2021 - 9:32 pm | वामन देशमुख
*थोडी घेतली की बर वाटतं*
ताण तणावात अस्वस्थ वाटल्यावर
कामाच्या धाकधुकीत थकवा आल्यावर
निवांत क्षणी एकटेपणा जाणवल्यावर
आणि जेव्हा जुन्या आठवणीत मन गुंतत
*तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं*
कधी बायकोशी खटके उडाल्यावर
कधी बायकोच्याच प्रेमात पडल्यावर
तर कधी बायकोला येडं बनवल्यावर
पण जेव्हा तिला यातलं सगळं खरं कळतं
*तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं*
कधी जुनी मैत्रीण अचानक दिसल्यावर
तिने पाहूनही मुद्दाम काना डोळा केल्यावर
त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यावर
जेव्हा तिच्या आठवणींत उगाच मन झुरतं
*तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं*
कधी मैफिलीत मित्रांच्या मैत्रिखातर
कधी सग्या- सोयऱ्यांच्या आग्रहाखातर
कधी उगाच सेलिब्रेशनच्या नावाखातर
जेव्हा चार चौघांचं सहज मन धरलं जातं
*तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं*
कधी जीवनात थोडं नैराश्य आल्यावर
कधी जीवनात थोडं यश मिळाल्यावर
कधी रोजपेक्षा वेगळं जगावं वाटल्यावर
जेव्हा कुठं निवांत जाऊन बसावं वाटतं
*तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं*
घेणाऱ्याने घेत जावी वेळी अवेळी घेत जावी
घेणाऱ्याने मात्र रोज आवश्यक तेवढीच घ्यावी
अन घ्यावी अशी की बायकोलाही न कळावी
जेव्हा जेव्हा घेतली की तिचं टाळकं फिरतं
*तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं...!*
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी *"डुलकी"* बद्दल लिहिलय...!
गैरसमज नसावा हा हा हा
28 May 2021 - 11:29 pm | जयन्त बा शिम्पि
१०० टक्के सहमत, म्हणजे दुपारी वामकुक्षी घेतल्याशिवाय डोळे उघडतच नाहीत. छान प्रस्तुती.पुलेशु.
1 Jun 2021 - 1:49 pm | प्रमोद देर्देकर
मस्त खुशखुशीत लेख!
1 Jun 2021 - 2:14 pm | शाम भागवत
😴
1 Jun 2021 - 2:16 pm | सौंदाळा
मस्त लिहिले आहे
करोना काळात घरुन काम असल्यामुळे बरेच लोक दुपारी थोडे काम आहे, लाईट गेले, इन्टरनेट गेले असे सांगुन ४५ मिनिटे ते १ तास गायब असतात. ते वामकुक्षीसाठीच.
आम्ही पण कधी कधी हा मार्ग वापरतो.
शनिवार रविवार मात्र दुपारची झोप हक्काची असते ती अजिबात सोडत नाही.
तुम्हाला खोटे वाटेल पण दिवाळीत नरकचतुर्द्शीला अभ्यंगस्नान सकाळी ५.३०/६.०० ला झाले की सर्वांना फोन करायचे, फराळ हादडायचा, मिपा दिवाळी अंक वाचायचा. हे सगळे झाले की १०, १०.३० ला हमखास झोप यायला लागते. पाउण-एक तास झोपुन जेवायलाच उठायचे आणि जेवण करुन परत अर्धा पाऊण तास झोप वाह, संध्याकाळ एकदम प्रसन्न जाते. कित्येक वर्षे हा क्रम मी पाळत आहे. :)
1 Jun 2021 - 4:11 pm | वामन देशमुख
काय म्हणता? मी तर लॉक डाउन सुरु झाल्यापासून सोमवार ते शुक्रवार जवळजवळ रोजच असा क्रम पाळत आहे!
😴
प्लीज, माझ्या क्लायंट ना सांगू नका हं !
😉
1 Jun 2021 - 8:49 pm | पाषाणभेद
छान लेख लिहीलाय.
1 Jun 2021 - 10:04 pm | मदनबाण
झोपेच्या बाबतीत नशिबवान आहात... मला तर असं वाटतं माझा खानदानी पंगा आहे झोपेशी ! लेखन फार आवडले.
माझाही एक अनुभव...
जेव्हा रानटी शिफ्ट करायचो तेव्हाचा एक अनुभव... कॅब मधुन उतरलो, माझ्या फ्लोअरवर आलो. रात्रीचे ३:१५ झाले होते,माझ्या आधी असलेल्या भिडुला अपडेट विचारला आणि त्याला मोकळे केले. आता संपूर्ण फ्लोअवर माझ्या शिवाय कोणीही नव्हत आणि प्रकाश फक्त माझ्याच डेस्कच्या आजुबाजुला राहील याची व्यवस्था होण्यासाठी फोन करुन ही व्यवस्था बघणार्याला फोन केला. तो फ्लोअरवर काही वेळाने आला आणि बोर्डातील सेटिंग मला हवी तशी करुन गेला. माझी जागा सोडता संपूर्ण फ्लोअरवर अंधार होता. कामास आधीच सुरुवात केलेलीच होती मागच्या शिफ्ट मधले कुठले महत्वाचे मेल्स आहेत का ते चेक करुन झाले होते,ग्लोबल लोकेशनचे राउटर,स्वीच आणि अॅक्सेस पॉइंटस,युपीएस चेक करु झाले होते...८०० पैकी कोणत्याही सर्व्हरचे मेजर अलर्ट्स आलेले नव्हते.सगळ कसं शांत आणि निवांत होत, फक्त माझ्या किबोर्ड च्या टकटकाटा शिवाय आणि माझ्याच मागे असलेल्या कंपनीच्या सर्व्हर रुमचा सौम्य आवाज... जो पर्यंत सर्व्हर अलर्ट येत नाही किंवा डेस्कचा फोन वाजत नाही तो पर्यंत मला त्या दिवशी काहीच काम नव्हते म्हणुन खुर्चीच्या पाठीला माझी पाठ टेकवली आणि लक्ष मॉनिटरवर स्थिर केले.
खट्टकन मला कधी झोप लागली ते समजलंच नाही... त्यानंतर ल्युसीच्या बाबतीत ब्रेन युसेज १००% झाल्यावर काय होत... त्यासारखाच जणु अनुभव मी घेतला. वेगात शरीर समोर ढकलुन लक्ष हातातल्या घडाळ्याकडे गेले...४:१५. मी घाबरलो होतो आणि त्या कालावधीत मी कोणता मेजर सर्व्हर अलर्ट मिस तर केला नसेल ना ? याची भिती वाटली !
मॉनिटवर परत फोकस करुन सगळं कसं बरोबर चाललयं याची खात्री करुन घेतली, नशिबाने या संपूर्ण कालावधीत काही झाले नव्हते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobs
1 Jun 2021 - 10:16 pm | शाम भागवत
बापरे!
2 Jun 2021 - 10:37 pm | चौथा कोनाडा
खतरनाक !
2 Jun 2021 - 6:05 am | मुक्त विहारि
दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत, ही माझी 100% विश्रांतीची वेळ ...
3 Jun 2021 - 3:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
आपण बस मध्ये किंवा रेल्वे मध्ये पेंगत असणाऱ्या माणसांची मजा पाहिली असेल.
यावर मी माझ्या पुरता उपय शोधुन काढला आहे, बायको कडून तिची एक जुनी ओढणी मागुन घेतली आहे, कंपनीच्या बस मधे बसलो की त्या ओढणीने स्वतःला सीट बरोबर बांधुन घेतो, आणि मग ताणून देतो, ४५ मिनिटे ते एक तास मस्त विश्रांती होते. रस्त्यात ट्रॅफिक जाम लागल्यावर, बाकीचे बोटं मोडायला लागतात पण मी मात्र जाम खुश असतो.
सध्या करोना मुळे ह्या सुखाला पारखा झालो आहे.
पैजारबुवा,
10 Jun 2021 - 10:47 am | पाषाणभेद
तुम्ही ते कसे करतात याचे चित्र किंवा छायाचित्र टाकलेत तर इतरांना आपल्या युक्तीचा लाभ घेता येईल.