गेले करायचे राहूनी...

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in जनातलं, मनातलं
30 Jun 2012 - 9:00 am

मित्रांनो आपल्याला आयुष्यात अनेक बरे वाईट अनुभव येतात, अनेक आव्हाने येतात. आपल्याला जमेल तसा त्यांचा सामना आपण करतो. कधी यश येते तर कधी अपयश. कधी नशीब साथ देते तर कधी दुर्दैव आड येते. कधी आपण आव्हानाचा धीरोदात्तपणे सामना करतो तर कधी माघारही घेतो. पण एक मात्र नक्कीच आपण नेहमी पुढे चालत असतो. अन बऱ्याच यशस्वी माणसांबद्दल बोलले जाते की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

खरंच असे काही शक्य आहे? भरपूर यश मिळालं म्हणून कुणी मागे वळून पाहतच नाही. जे आपले स्वतःचे गत आयुष्य असते त्याकडे खरंच कुणी दुर्लक्ष करू शकते? प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचे काही टप्पे असतात जेव्हा ते पार पडतात तेव्हा समाधानी असलेला तो नक्कीच मागे वळून पाहतो.

असं कुठे ना कुठे खोलवर जाणवत असतं की कुठल्या तरी आव्हानाला तोंड देताना आपण स्वतः कमी पडलोच. जिद्द, इच्छाशक्ती, स्वयं अथवा बाह्य प्रेरणा यापैकी काही वापरून त्या आव्हानाशी दोन हात केले असते तर मनाला हि बोच राहिली नसती.

मानवी इच्छा आकांक्षांना कसलीच मर्यादा नसते. मोठे घर, मोठी गाडी, जगातील एकाहून एक ठिकाणांची भ्रमंती... यापैकी बरेच काही आपण भविष्यासाठी योजून ठेवतो. काही योजना सफल होतात तर काही राहून जातात. पण हे झाले भविष्यातल्या गोष्टींबाबत. पण भूतकाळाचे काय?

अशी आव्हाने जी जिंकण्याची क्षमता आपण बाळगून होतो अन केवळ आपल्यातील अवगुणांमुळे त्यांना आपण तोंड देऊ शकलो नाही. जसे कधी आळस आडवा येतो, कधी जिद्द कमी पडते किंवा नको त्या वेळी नको त्या गोष्टींकडे लक्ष विचलित होतं अन आपण आपल्या लक्षापासून भरकटतो. भलेही नंतर दुसरी वाट चोखाळून आपण पुढे गेलेलो असतो तरी पण केवळ स्वतःपुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी चार पावले मागे जाऊन त्या आव्हानाचा पुन्हा सामना करावासा वाटतो.

असं काही की जे केल्यास इतरांकडून विशेष काही कौतुक होणार नाही उलट नकारात्मक प्रतिसादच मिळतील पण आपण स्वतः मात्र समाधानाच्या जलधारेत न्हाऊन निघू...

चला तर मग मित्रांनो माझ्यापासून सुरुवात करतो, मला जर एखादी पूर्वी न जमलेली गोष्ट यशस्वीरीत्या करायची असेल तर ती म्हणजे गणित शिकणे. आता असे का तर त्यासाठी जरा फ्लॅशबॅक मध्ये जावे लागेल.

लहानपणापासून मी एक गुणी विद्यार्थी होतो (गुणी चा अर्थ परीक्षेत चांगले गूण मिळवणारा असाच घ्या). शिक्षकांचाही लाडका होतो. ९ व्या वर्गापर्यंत पालकांना काळजी करावी लागणार नाही असेच गुण मिळवत होतो. १० वीतही चांगले गुण मिळवण्यासाठी उत्सुक होतो. पण मला ते आव्हान नाही झेपू शकले. कदाचित वाढलेल्या स्पर्धेमुळे असेल, पाठांतर वाईट अशी भ्रामक कल्पना असल्यामुळे असेन किंवा अभ्यासाचा एकंदरीत आकारमान न सोसल्यामुळे, मनासारखे किंवा स्पर्धेत पुढे जाण्यासारखे यश नाही मिळवू शकलो.

पुढे १२ विज्ञान शाखेत अभ्यासाचे आकारमान कमी करण्यासाठी जीवशास्त्र सोडूनही गणित विषय काही झेपला नाही. त्यामुळे अभियांत्रिकी मध्ये एखाद्या नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेशाचा प्रश्नच मिटला व मी बी. एस. सी. (संगणकशास्र) मध्ये गणित विषय न घेता प्रवेशकर्ता झालो. आता विषय रुचीचे असल्याने अन ते नोकरी मिळवण्यास कामाचे असल्याने अभ्यासात बरीच बरी स्थिती होती. ते संपल्यानंतर पुढे एम सी ए ला ही प्रवेशकर्ता झालो. इथे माझ्यातल्या विद्यार्थ्याचा (खरं तर परीक्षार्थ्याचा) पूर्ण कस लागला. संगणकशास्राशी जरी संबंधीत अभ्यासक्रम असला तरी त्याबरोबरच, संख्याशास्त्र, व्यवस्थापन व एका सत्रामध्ये तर अकौंटिंग सुद्धा अश्या एकाहून एक विषयांचा सामना करावा लागला. अन येथील परीक्षापद्धतीही खरंच अवघड होती. एखाद्या विषयात अनुत्तीर्ण होणे मी प्रथमच अनुभवले. अन नावडत्या विषयांच्या ओझ्यामुळे आवडत्या विषयांकडेही लक्ष देऊ शकत नव्हतो.

एका बाबतीत मात्र चांगली सोय होती, पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी मागील वर्षाचे काही किमान विषयांत उत्तीर्ण व्हायला हवं असा काही नियम नव्हता. त्यामुळे गाडी तर थांबणार नव्हती पण इंजिनावरचे ओझे दर सत्राला वाढत होते. दर वेळी एखादं दुसरा विषय राहत असल्यामुळे इतर विषयांत मिळवलेल्या चांगल्या गुणांना काहीच किंमत नसायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल ५ व्या सत्रामध्ये गेल्यावर माझ्या काही सहाध्यायींना ६ (५ व्या सेम चे) + १२ (१ ते ४ सेम चे) पेपर १२ दिवसांमध्ये द्यावे लागले. म्हणजे बरेचदा रोज २ पेपर. गंमत अशी असायची की जे लोक दोन्ही विषयांत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करायचे ते दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण व्हायचे. हे दुष्टचक्र काही थांबायचे नाही.

गणित नसले तरी, संख्याशास्त्राने त्याची उणीव माझ्याबाबतीत भरून काढली. Probabilities & combinatories नावाचा दुसऱ्या सेम मधील पेपर उत्तीर्ण व्हायला मला पाचवे सेम लागले. व इतरही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे फळ भोगावे लागले. पण जेव्हा पाणी नाकतोंडापर्यंत पोचले तेव्हा मी फार गंभीरपणे व प्रयत्नपूर्वक अभ्यास करून त्या सर्व विषयात उत्तीर्ण होऊ शकलो व वर्ष वाया ना घालवता शिक्षण संपवले. नशिबाने साथ दिल्याने पहिल्या मुलाखतीतच नोकरीही लागली अन त्यानंतरचा प्रवास बऱ्यापैकी सुखाने झाला किंवा होतोय.

आजही कुठलीही अडचण आली की मी ते दिवस आठवतो, स्वतःच्या प्रगतीत आड येणाऱ्या अवगुणांवर मात करून मी अनेकदा अनुत्तीर्ण झालेले विषय उत्तीर्ण झालो होतो. तर आज केवळ स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःचा स्वतःबद्दल आदर बळावण्यासाठी मला पुन्हा तेच गणिताचे विषय शिकावेसे वाटतात ज्यापासून मी एकेकाळी पळवाटा शोधत होतो. मला माहीत आहे हा विचार बहुतेकांना बाळबोध वाटेल पण मित्रांनो स्वतःच्या नजरेत स्वतःची चांगली प्रतिमा असणे हे फार महत्त्वाचे असते. लढाईत हरल्याचे दुःख नाहीये पण त्या लढाईतून पळ काढल्याचे शल्य जरूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्या आव्हानाचा सामना करावासा वाटतोय...

तर मित्रांनो तुमच्याही आयुष्यात अशी न झेपलेली आव्हानं असतील जी आजही तुम्हाला खुणावत असतील. जर असे काही असेल अन इतरांनाही सांगावेसे वाटत असेल तर होऊन जाऊद्या या धाग्यावर त्याबाबतचा उल्लेख. बघूया तर आपल्यासारखे इतर किती लोक आहेत.

या ठिकाणी एका शीतपेयाच्या जाहिरातीत वापरलेले एक वाक्य आठवते...

डर से मत भागों, डर का सामना करो, क्यों की डर के आगे जीत है.

धोरणजीवनमानशिक्षणविचारअनुभव

प्रतिक्रिया

अक्षया's picture

30 Jun 2012 - 10:24 am | अक्षया

छान लिहिले आहे.. :)
सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय चर्चे साठी अतिशय प्रभावी पणे मांडला आहे.
हे वाचून अनेक राहून गेलेल्या गोष्टी आठवल्या.. त्या पूर्ण करण्याचा आता प्रयत्न करते आहे..

चौकटराजा's picture

30 Jun 2012 - 9:37 am | चौकटराजा

रंगा , माझी कथा " शेम टू शेम " तुझ्या सारखीच .जाने दो यार ! वो चालीस साल पहलेकी बात है !

चित्रगुप्त's picture

30 Jun 2012 - 5:53 pm | चित्रगुप्त

मी तर बुवा जे जे कठीण वाटले, ते सोडूनच देत गेलो. पळ काढला म्हणा हवे तर. उदा. इंजिनियरिंग्चा अभ्यास झेपेनासा झाला, तर ते कॉलेज सोडून सरळ चित्रकलेच्या मागे लागलो.
पण गंमत म्हणजे अश्या धरसोडीतून मला खरोखर हवे ते सर्व मिळत गेले...

..........आव्हानाशी दोन हात केले असते तर मनाला हि बोच राहिली नसती.....
माझ्या बाबतीत उलटे घडले. मी जर खूप अभ्यास वगैरे करून जर इंजिनीयर झालो असतो, तर मला आयुष्यभर बोच राहिली असती, की आपण वेळीच निर्णय घेऊन चित्रकार का नाही बनलो.

माझातरी आता नशीब, नियती, यावर पूर्ण विश्वास बसला आहे. म्हणजे जे घडायचे तुमच्या नियतीत लिहिलेले असेल, (बघा: जीएंच्या 'गुलाम' मधील 'मख्तूब - मख्तूब') तर त्याप्रमाणेच बुद्धी होत जाते, आणि आपण त्याप्रमाणे वागत जातो, असे मला पुष्कळ अनुभव आलेले आहेत.

चौकटराजा's picture

30 Jun 2012 - 11:28 am | चौकटराजा

मी तर बुवा जे जे कठीण वाटले, ते सोडूनच देत गेलो. पळ काढला म्हणा हवे तर.
ही पण माझीच ष्टोरी .
पण गंमत म्हणजे अश्या धरसोडीतून मला खरोखर हवे ते सर्व मिळत गेले...
माझातरी आता नशीब, नियती, यावर पूर्ण विश्वास बसला आहे.

अरे बापरे आता रंगा, चित्रगुप्तजी आपपली "जन्म पत्रिका" मला पाठवा बरे.

मन१'s picture

30 Jun 2012 - 12:47 pm | मन१

साधे सोपे सरळ कथन.

अमितसांगली's picture

30 Jun 2012 - 1:19 pm | अमितसांगली

याची यादी बरीच मोठी आहे....

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2012 - 5:07 am | श्रीरंग_जोशी

चला माझ्यासारखा अनुभव असणारी माणसे तर भेटत आहेत. चित्रगुप्त यांचे चित्रकलेतील कार्य पाहिले की असे उमेदीच्या काळात असे काही घडणे हे किती उपयोगी असू शकते हे पटते.

माझ्या बाबतीत तर माझे स्वतःविषयी असे मत आहे की गणितात प्रावीण्य मिळवू व नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकी शिकूनही मी शेवटी पोटापाण्यासाठी तेच केले असते जे आज करतोय ; -). त्यामुळे वैयक्तिकरीत्या नुकसान झालेले नाहीच उलट कमी गुण मिळत असतानाही कुठलाही न्यूनगंड न बाळगता जमेल तेवढी प्रगती करत राहिलो याचे समाधान आहे.

खंत केवळ एवढीच की आव्हानाच्या डोळ्यात डोळे घालून चार हात केले नाही. दर वेळी कुस्तीच्या रिंगणातून प्रतिकात्मक लढा देऊन सुमडीत सटकलो.

अवांतर - चौरा तुम्ही पत्रिका वगैरे वर विश्वास ठेवता? माझ्या बाबतीत तशी गरज मला वाटली नाही म्हणून मी विश्वास ठेवला नाही कधी बाकी तांत्रिक बाबी अलाहिदा. लहानपणी वर्तमानपत्रातील भविष्यात माझ्या राशीत जेव्हा 'हरवलेली वस्तू मिळेल' असे लिहिलेले असायचे तेव्हा बहुतेकदा हरवलेली वस्तू खरोखरच मिळायची :-).

चौकटराजा's picture

1 Jul 2012 - 9:41 am | चौकटराजा

मला जन्मपत्रिका बनविता येते. माझ्या कुंडलीत " कालसर्पयोग "आहे. माझ्या जिंदगीत संकटे आली. पण त्यापेक्षा मौजमजा खूप मिळाली. जोतिष शास्त्र एक "टाईमपास" म्हणून मस्त आहे. पण आपले प्लॅन्स त्यावर आधारीत करू नयेत असे १८ वर्षे अभ्यास केलेल्या ओपी नय्यर ( ह्म्म् तेच जुने संगीतकार ) यांचेही म्हणणे होते.

मराठमोळा's picture

1 Jul 2012 - 5:54 am | मराठमोळा

>> बघूया तर आपल्यासारखे इतर किती लोक आहेत.

बहुतांश आहेत. :) लेख छान.. थोडासा मिड-लाईफ क्रायसीस च्या अंगाने जाणारा. :)
जे झालं ते चांगल्यासाठीच झालं हे मनापासून वाटतं, शाळा/कॉलेजचे दिवस आयुष्यातील सर्वात सोनेरी सोनेरी दिवस होते. त्यामुळे त्यात जे काही केलं त्याबद्दल जराही रिग्रेट नाही. काही राहुन गेलं असंही वाटत नाही. अगदी गाण्यापासून चित्रकलेपर्यंत सगळे छंद जोपासले स्वतःच्या कुवतीनुसार. आता म्हणावं तसं पॅशन नाही एखाद्या छंदाच, पण एखाद्या गोष्टीत रस वाटला तर ते नक्कीच करुन पहातो. सध्या कुकींग आणि फोटुग्राफीत मन रमत आहे.

अवांतर: पास्ट ईज ऑलवेज सिली. :)

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2012 - 6:53 am | श्रीरंग_जोशी

>> थोडासा मिड-लाईफ क्रायसीस च्या अंगाने जाणारा.
बापरे, म्हणजे लोकांचे क्वार्टर लाईफ क्रायसीस संपलेले नसते तेव्हा माझे मिड लाईफ क्रायसीस सुरू झाले की काय?
फारच वेगवान आयुष्य म्हणायचे; -).

बाकी शाळा / महाविद्यालयीन आयुष्यातले सोनेरी क्षणांबद्दल तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 7:21 pm | मुक्त विहारि

चिंतन आणि मनन सूरू आहे..

सध्या तरी इंजीनियर नसतो झालो, तर जास्त बरे झाले असते, असेच वाटत आहे..

मला मराठीचा प्राध्यापक व्हायचे होते !
त्यामुळे conference room मध्ये शिरल्याबरोबर मार्कर आणि बोर्ड माझ्याच ताब्यात असतो ..
कितीही चान्गले प्रेसेन्तेशन असले तरी मला फळ्यावर लिहिल्याशिवाय चैनच पडत नाही !!!
मला गंमतीने प्रोफेसर च म्हंणतात !
अजूनही चान्स मिळाला तर सोडणार नाही.. त्यामुळे विंजिनीयर असून सुद्धा मराठवाडा विद्यापीठातून बी. ए. केलय.
टि.म. वि. मधून एम ए करतोय... पी एच डी पण करीन म्हणतोय. पुढे काय होणार राम जाने.
खरा प्रश्न आहे मिळणार्या पैशाचा .. मागे आलेला चान्स पैसे कमी मिळतात म्हणून सोडून द्यावा लागला होता..
अस्तु !

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 10:56 am | श्रीरंग_जोशी

>> मला मराठीचा प्राध्यापक व्हायचे होते !

कर्म धर्म संयोगाने असे झालेच तर मला एक दिवस तुमच्या वर्गामध्ये बसू द्या हि विनंती.

कितीही चान्गले प्रेसेन्तेशन असले तरी मला फळ्यावर लिहिल्याशिवाय चैनच पडत नाही !!!

अगदी अगदी, विटुकाका, मला पण! मलाही मराठी शिकवण्याची इच्छा आहे, पण शाळेत.

बाकी "करायचे राहिले" ची लिष्ट मोठी आहे. हळूहळू सुरू करतोय काय काय...

मी_आहे_ना's picture

2 Jul 2012 - 5:01 pm | मी_आहे_ना

लेख छान जमून आलाय आणि सगळे म्हणतायेत (आणि जे नाही म्हणत ते मनात म्हणत असतील) ;) तसं प्रत्येकालाच काही ना काही राहून गेल्याचं जाणवतंच. माझंही असंच ढाक-बहिरी ट्रेकमध्ये त्या भैरोबाच्या गुहेत जाणे (अर्थात थरकाप उडवणार्या दरीकडे पाहून) राहून गेलंय. आधी (आणि नंतरही) ट्रेक केलेले, ढाकच्या बालेकिल्ल्यावरही जाऊन आलेलो, भैरोबाच्या दर्शनासाठी त्या कपारीपर्यंत पोहोचलो, १-२ कपार्या दोराच्या सहाय्याने चढलो, पण पुढे वर काही जाववेना. पुन्हा कधी संधी मिळतीये बघु, तेव्हा 'भटकंती' मधे त्यावर एक लेख नक्की :)

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 10:58 am | श्रीरंग_जोशी

आपण तर एकदम कसलेले गिर्यारोहक दिसता.

मी लोहगडावर जाऊन सुद्धा केवळ थकलो होतो म्हणून विंचूकाटा सर केला नाही म्हणून खंत वाटते.

क्लिंटन's picture

2 Jul 2012 - 10:29 pm | क्लिंटन

आपल्या समाजात अनेकदा जरा डोके बरे असेल तर मुलाने इंजिनिअर किंवा डॉक्टरच व्हावे असा संकेत आहे (किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत होता).त्यातूनच गाड्याबरोबर नळ्याची यात्रा असे होत आमची रवानगी झाली इंजिनिअरींगला!! मनापासून इंजिनिअरींग मला कधीच आवडले नाही.माझी आवड अर्थशास्त्र/राजकारण/राज्यशास्त्र यासारख्या विषयातली.आणि सायन्स/इंजिनिअरींगला मनाविरूध्द जावे लागल्यामुळे सगळाच बट्ट्याबोळ झालेला आणि सारासार विचार करायची क्षमताच हरवलेली अशी परिस्थिती. शाळेत असताना भविष्यात आपल्याला नक्की काय करायचे आहे, आपल्यात काय कमी आहे, ती कशी भरून काढता येईल, मला करियरमध्ये जे हवे आहे ते कसे मिळवता येईल असे सतत विचार करणारा मी ११ वी पासून बी.ई होईपर्यंत मात्र पूर्ण सैरभैर होऊन गेलो होतो आणि असे विचारही करणे मी बंद केले होते. २००१ मध्ये इन्फोसिसमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरी मिळाली होती. पण तत्कालीन "डॉट-कॉम क्रॅश" मुळे joining date अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली. माझ्या तत्कालीन आकलनाप्रमाणे आय.टी. उद्योग २-३ वर्षे तरी सावरणाऱ्यातला नव्हता आणि ज्या विषयाची आवड आहे त्या विषयात करियर करता येणार नव्हती.मग काय करा?परत एकदा मन मारत इंजिनिअरींगमध्येच पुढे जा!! सैरभैर झालेल्या त्या अवस्थेत मी अमेरिकेत एम.एस साठीच्या जी.आर.ई/टोफेल परीक्षा द्यायचे ठरविले आणि तिथेच मोठी चूक झाली. एम.एस केले.तेव्हा डॉट-कॉम क्रॅशमधून नुकत्याच सावरलेल्या अमेरिकेत माझ्यासारख्यासाठी नोकरी नव्हती.मग काय करा? तर पी.एच.डी चालू करा!! आणि पी.एच.डी करण्यासाठी त्या विषयातले passion तर सोडूनच द्या थोडाही इंटरेस्ट मला नव्हता.थोडक्यात माझ्याच करियरवरचे आणि आयुष्यावरचे नियंत्रण मी पूर्णपणे हरवून बसलो होतो.

सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला डोके जरा बरे मिळाल्यामुळे पुस्तकात दिलेले विषय परिक्षेपुरते समजावून मार्क मिळविण्यात मला कधीच अडचण आली नाही.अगदी एम.एस आणि पी.एच.डी मधील qualifier परीक्षेपर्यंत मी कायमच चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. एकही के.टी कधी लागली नाही.माझ्या मार्कांमुळे मला अमेरिकतल्या विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती अगदी सहज मिळाली. पण विषयाचे आकलन किंवा त्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपण त्यात पुढे काही करू शकतो असा confidence या दोन्ही गोष्टींचा माझ्याशी दुरून दुरून पर्यंत संबंध नव्हता.म्हणजे नुसत्या degrees ची भर पडत होती पण ते डिग्री सर्टिफिकेटचे कागद पूर्णपणे वाळवीने पोखरलेले होते.

पुढे पी.एच.डी करताना रिसर्चची वेळ आली तेव्हा मात्र मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला.पी.एच.डी लेव्हलचा आपला विद्यार्थी अगदी लहानसहान गोष्टी समजावून घेतानाही का अडखळत आहे असा प्रश्न माझ्या गाईडला नक्कीच पडला असेल.त्यावर एकदा रागाच्या भरात--"I don't know where I found you. Sometimes I am really worried about you-- what will happen to you and where will you go" अशा स्वरूपाचे उद्गार माझ्याच गाईडकडून ऐकावे लागले.तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले. गुलाम अलींची "चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला मेरी आवारगी ने मुझको आवारा बना डाला" ही माझी त्याप्रसंगापूर्वीपासूनची आवडती गझल जणू मला सामोरे ठेऊनच लिहिली आहे असे मला वाटायला लागले.आजही ती गझल ऐकली की हे सगळे आठवून माझे डोळे नकळत भरून येतात.

आता दिलेल्या प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर नाही हे माझ्या लक्षात आले.जे काही होईल ते होईल असे म्हणत परिस्थितीशी झुंजायचे मी ठरवले.मी यशस्वी होण्यासाठीच झुंजणार पण मला यश मिळाले नाही तरी माझा कट्टरातला कट्टर अहितचिंतक देखील "क्लिंटन पळून गेला" असे म्हणू शकला नाही पाहिजे या निर्धाराने मी अमेरिकेला, पी.एच.डी ला आणि इंजिनिअरींगला टाटा-बाय बाय केले. पुढे पुण्यात जी मिळेल ती नोकरी केली आणि दरम्यान कॅट आणि इतर परिक्षा दिल्या. २००९ मध्ये आय.आय.एम अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाला आणि माझ्या आवडीच्या क्षेत्राच्या जवळच्या पेशात जायचा मार्ग खुला झाला. मागच्या वर्षी तिथून यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडल्यावर त्या सगळ्याचे चीज झाले असे वाटले.

या सगळ्या उद्योगात माझी १९९५ ते २००९ ही १४ वर्षे फुकट गेली.आज जर ती १४ वर्षे माझ्या हातात असती तर मी कुठच्या कुठे गेलो असतो हाच विचार माझ्या मनात येतो आणि रूखरूख वाटते.अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात पण कदाचित ती १४ वर्षे त्या गोष्टी यशस्वीपणे करण्यात आणि न करण्यातला फरक ठरतील असेही वाटते. तेव्हा माझ्यासाठी "गेले करायचे राहूनी" ची लिस्ट खूप मोठी आहे आणि या सगळ्या गोष्टी "१४ वर्षे कमी" पडल्यामुळे!!!

हे सगळे इथे लिहायचे कारण म्हणजे "गेले करायचे राहूनी" माझ्यासाठी काय आहे हे लिहिणे याबरोबरच माझ्या अनुभवांमधून मीच घेतलेला धडा (जो सध्या विद्यार्थी असलेल्यांना उपयोगी पडेल) लिहिणे हे पण आहे. एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो earliest possible क्षणी घ्यावा. जर तो निर्णय घेण्यात चालढकल केलीत (जशी मी इंजिनिअरींग/एम.एस/पी.एच.डी वगैरे करत बसून महत्वाचा निर्णय घ्यायला घाबरत होतो) तर मुळातली समस्या सुटणार नाहीच तर भविष्यकाळात तीच समस्या अधिक उग्र स्वरूप धारण करेल. त्यापेक्षा विचारपूर्वक पण वेळेत निर्णय घेऊन "एक घाव दोन तुकडे" केलेल कधीही चांगले.

कुंदन's picture

2 Jul 2012 - 11:11 pm | कुंदन

लढ बाप्पु...
अजुन पण वेळ गेलेली नाही , आता तुझ्या आवडीच्या क्षेत्रात काम मिळालेय तर त्या संधीचे तु सोने करशीलच.

नितिन थत्ते's picture

2 Jul 2012 - 11:30 pm | नितिन थत्ते

प्रत्यक्ष भेटीत हे ठाऊक झालेच होते.

तुस्सी ग्रेट हो.

सुमीत भातखंडे's picture

11 Jul 2012 - 11:31 am | सुमीत भातखंडे

बी.ई. - एम. एस. - पी.एच.डी - एम.बी.ए

चायला...खरच तुस्सी ग्रेट हो

काही अंशी माझेच आत्मवृत्त वाचतो आहे की काय असे वाटले. वाचून खू ऽ ऽप बरे आणि भारी वाटले.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 11:08 am | श्रीरंग_जोशी

बरेचदा माझ्यासारख्यांचा असा गैरसमज असतो की एवढ्या ख्यातनाम ठिकाणाहून शिकणारे लोक प्रथमपासूनच एकदम हव्या त्या लाईनीवर असतात अन पाहिजे त्या वेळी पाहिजे ते करून दाखवण्याची क्षमता बाळगतात. पण कधी कधी अशी कहाणी ऐकली की वास्तवाचे भान येते. आज पैलू पडलेल्या हिऱ्याला एके काळी काय यत्नांतून जावे लागले असेल याची कल्पना आली.

आज कुंपणावर बसलेल्यांनी यापासून बोध घेऊन योग्य मार्गाला लागावे अशी ईश्वराकडे प्रार्थना...

शिल्पा ब's picture

3 Jul 2012 - 11:09 am | शिल्पा ब

तुमचा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास नेहमीच प्रतिसादातुन दिसुन येतो.

असो. प्रयत्न करणं हातात असतं ते करत रहायचं.
बेस्ट ऑफ लक.

मी_आहे_ना's picture

3 Jul 2012 - 11:38 am | मी_आहे_ना

कालच "राजनीती" चित्रपट (पुन्हा) बघताना नाना पाटेकरांचे एक वाक्य मनात ठसलं "राजनीतीमें फैसला सही या गलत होने से फरक नहीं पडता, फैसले मकसद पूरा होनेके लिये लिये जाते हैं" असंच काहीतरी..
खरंच "भिजत घोंगडं" पेक्षा (फसला तर फसला) निर्णय महत्वाचा.

मिहिर's picture

3 Jul 2012 - 10:15 pm | मिहिर

मनापासून लिहिलेला प्रतिसाद खूप आवडला. तुमच्या आधीच्या प्रतिसादांवरून याची थोडीफार कल्पना होतीच!
पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

सुधीर's picture

10 Jul 2012 - 2:07 pm | सुधीर

प्रतिसाद खूप आवडला, बर्‍याच जणांना यातून प्रेरणा-निदान काही तरी शिकण्यासारखं- मिळू शकेल.

आजानुकर्ण's picture

16 Jan 2015 - 10:27 pm | आजानुकर्ण

हा प्रतिसाद वाचला नव्हता. क्लिंटनसाहेबांविषयी फारच आदर वाटतोय. अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 10:50 pm | प्रसाद गोडबोले

हा साष्टांग दम्डवत स्विकारा _____/\______

ॐ क्लिंटनाय नम: !!

अभिजीत अवलिया's picture

15 May 2021 - 8:32 am | अभिजीत अवलिया

एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो earliest possible क्षणी घ्यावा. जर तो निर्णय घेण्यात चालढकल केलीत (जशी मी इंजिनिअरींग/एम.एस/पी.एच.डी वगैरे करत बसून महत्वाचा निर्णय घ्यायला घाबरत होतो) तर मुळातली समस्या सुटणार नाहीच तर भविष्यकाळात तीच समस्या अधिक उग्र स्वरूप धारण करेल. त्यापेक्षा विचारपूर्वक पण वेळेत निर्णय घेऊन "एक घाव दोन तुकडे" केलेल कधीही चांगले.

प्रचंड सहमत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Jul 2012 - 2:02 am | निनाद मुक्काम प...

माझी आवड अर्थशास्त्र/राजकारण/राज्यशास्त्र यासारख्या विषयातली.आणि सायन्स/इंजिनिअरींगला मनाविरूध्द जावे लागल्यामुळे सगळाच बट्ट्याबोळ झालेला

श्रीरंग राव कधी काय विषय काढतील ह्याचा नेम नाही.
एकदम जखमेवरची खपली काढल्यासारखे वाटले-
हॉटेल व्यवस्थापन हा अभियांत्रिकी घरच्यांची इच्छा
तर अर्थ शास्त्र ,राजकारण ह्यात काहीतरी करायची इच्छा ह्यांच्यात मेळ न बसल्याने
शोधल्या गेलेला सुवर्णमध्य होता.
ह्या शेत्रात पहिले १० वर्ष चमचमती पंचतारांकित दुनिया मानल भूरळ पाडणारी होती.
मात्र मग आंतरिक समाधान मात्र ह्या शेत्रातून मिळाले नाही.
आता सुद्धा ह्या शेत्रात मी आवडीने काम करतो. मात्र कामात झोकून द्यावे आणि आयुष्याचे ध्येयांमध्ये करीयर ला खूप महत्व द्यावे असे काही वाटत नाही.
म्हणूनच काम झाले की पार्ट्या , आणि बरेचकाही गोष्टींच्या फंदात आजकाल मी पडत नाही.
घरी येऊन आभसी जगत्तात विरंगुळा शोधतो.
म्हणूनच कि काय कॉकटेल व मधुशाळा आमचे राखीव कुरण किंवा एकेकाळी रोजी रोटी होती तरी त्यावर मनापासून लेखन करावेसे वाटत नाही.
मिपाकडे सोत्री असतांना निमुपज ची कमी कुणालाही जाणवत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 11:28 am | श्रीरंग_जोशी

निनादराव - वरील लेख केवळ स्वतःच्या भावनांना शब्दरूप देण्याच्या उद्देशाने लिहिला. येथे प्रकाशित करावा की नाही याबाबत जरा संभ्रमात होतो.
पण ज्या प्रामाणिकपणे आपण व इतरांनीही मन मोकळे केले त्यामुळे आपल्या सर्वांविषयी, मिपाविषयी आदर दुणावला. अन हा लेख प्रकाशित करण्याचे सार्थक झाले.

अवांतर - अभ्यासात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या माझ्या धाकट्या भावाने सॉफ्टवेअर इंजिनीअरींगच्या नोकरीत मन न रमल्याने वर्षभरापूर्वी लाइन बदलली. व आज तो एका आघाडीच्या खाजगी इन्स्टिट्यूट मध्ये आय टी शिक्षकाचे काम करतो आहे व स्वतःचे इतर छंद ही जपतो आहे. त्यापैकी काही बऱ्यापैकी व्यावहारिक पण आहेत जसे परदेशी भाषा शिकणे. तसा निम्न मध्यमवर्गियांना न शोभणारा निर्णय त्याने घेतला पण आज तो जे काही काम करतोय ते त्याला मनापासून आवडते व तो त्यात खूश आहे. एक मोठा भाऊ म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो.

कपिलमुनी's picture

3 Jul 2012 - 12:12 pm | कपिलमुनी

अशी तब्येत करायचे फार स्वप्न होते / आहे बघा !!
पण अवघड आहे

श्रिरंगाच्या लिखाणाची ढब, प्रतिसाद देण्याची पद्धत अणि एकंदरीत मिपावरील वाटचाल ह्या सर्वांवरुन आज एक 'मिपारत्न' चेसुगु यांची प्रकर्षाने आठवण झाली. :-)

-(चेसुगुपंखा) सोकाजी

सुबोध खरे's picture

16 Jan 2015 - 11:03 pm | सुबोध खरे

एकंदर लोकांचे पाहून असे वाटते कि लोकांनी आयुष्यात फार कष्ट काढले. क्लिंटन साहेबांनी तर १४ वर्षे वनवास भोगला असेच म्हणावे लागेल.__/\__ त्यामानाने लौकिकार्थाने मी १८ वर्षे लष्करात वनवास भोगला पण काम माझ्याच आवडीचे होते. माझ्या सुदैवाने मला तुझा कल वैद्यकात आहे असे सांगणारे आमच्या शाळेचे उप मुख्याध्यापक १० वीतच भेटले. (त्यांना आमच्या शाळेने मुद्दाम व्यवसाय मार्गदर्शनाच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाला पाठविलेले होते.)वैद्यकशास्त्राला आमच्या आईच्या मनाविरुद्ध जाताना कोणताही किंतु नव्हता. त्यामुळे वैद्यकाच्या पदव्या मिळवताना कोणतेही श्रम जाणवले नाहीत. उलट आजही अध्ययन आणी अध्यापन यात आनंद वाटतो. पुढच्या जन्मी परत डॉक्टरच व्हायला आवडेल. त्यामुळे मला नेहमी असे वाटत असे कि लोक अभियांत्रिकी वैद्यक इ गोष्टी स्वतःच्या आवडी निवडी नुसारच करतात. (माझा भाऊ स्वतःच्या आवडीने अभियांत्रिकीत गेला आणी तेथेही मूळ विषयातच व्यवसाय करतो आहे). पण असे कष्ट लोकांनी काढलेले पाहून वाईट वाटते. निदान पुढच्या पिढीला असे कष्ट काढायला लागू नयेत हे आपण पाहावे.
एकच गोष्ट आयुष्यात करायची राहिली ती म्हणजे प्रेम विवाह. ते आता पुढच्या जन्मी (पुनर्जन्म असेल तर.)

हस्तर's picture

14 May 2021 - 10:08 pm | हस्तर

श्रीरंग_जोशी
मी बी. एस. सी. (संगणकशास्र) मध्ये गणित विषय न घेता प्रवेशकर्ता झालो.

......................

कसे शक्य आहे ?

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2021 - 3:01 am | श्रीरंग_जोशी

अमरावती विद्यापीठात बी एस सी साठी हॉनर्स असं काही नाहीये (मी शिकलो त्या काळात नव्हतं). बीएससीमध्ये तीन विषय १५० मार्कांचे असायचे. मी फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व संगणकशास्त्र घेतले होते. संगणकशास्त्राला त्या काळात ग्लॅमर असल्याने इतरांना सांगायला बी. एस. सी. (संगणकशास्र) असे सांगायचो. माझ्या कॉलेजमधे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, संख्याशास्त्र, गणित व संगणकशास्र यापैकी ३ विषय निवडावे लागायचे (बारावीत जीवशास्त्र नसणार्‍यांसाठी).

गॉडजिला's picture

14 May 2021 - 10:47 pm | गॉडजिला

मला न काही बदलवायचे आहे न टाळायचे... सबब आपला पाआआअस्स्स्स्स