प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर
दा.= दादा ता. = ताई
उंटावरल्या प्रा.डॉ. दादा ताई
तुमच्या वणी आमास्नी मागे
प्रा न्हाई डॉ न्हाई
मात्र येक सांगुन ठ्येवते
उंट हाय तुमचा लंगडा
बुडत्या नावेतून वाचण्यास
देव प्रत्यक्षात येत नाही
हे अनुभवातन म्हाईत र्हातय
तेवड आमा बी कळतय
कळण्यास आमा प्राडाँचे
नवनास्तिक शहाणपण लागत न्हाई.
संकटात धीर काई चांगलच व्हईल
चा विश्वास आनि चांगल्या आशा
प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता
शोधण्याचा विचार
झोकुन देण्यासाठी लागणारी
प्रेरणा आणि श्रद्धा
मांगल्य अन प्रसन्नता
संयम अन सबुरी
त्योच आमचा ईश्वर हाय
हा ईश-वास
कोण नास्तिक देत न्हाई
आमचा देवाळुपणाच
आमाला बरा हाई
तर्काचा उंट तर
तुमचा बी लंगडा र्हातय
आमच्याच अंध ही असतील
श्रद्धांनी तुमच कंच
घोड मारलय ?
आमच भलं करनारा
द्येव आमा दिसत नाई
त्येच बर हाई
आमच भल करण्याच्या
नावानी जेवडी दुकानं
दांभिक आस्तिकांची
तेवडीच दुकान
दांभिक नास्तिकांची
पन र्हात्यात
आस्तिकाला देवाच्या
नावान दांभिकपणा
कामुन करत्योस
म्हनून ईचारता तरी येतय
नास्तिकाला त्येबी ईचारण्याची
सोय र्हात नाई म्हनून शान
आमास्नी देवाळूपणाच भला र्हातय
देवाळूपणाने जसे
आमी रात्रीतन शिरीमंत
व्हत नाई तसे देव
नाकारल्याने बी व्हत नाई
आमी येका रात्रीतन शिरीमंत
व्हनार नाई तवा इतर व्यस्ना
पेक्षा दादला द्येवाच्या व्यस्नात
रमतोय द्येवाच्या संस्कारानी
पोर चोरीमारी करून ज्येल
मध्ये जात नाई त्येच बरंहाय
तसबीर कंच्याबी द्येवाची र्हाउदे
बाया मानसास्नी बाप्याला
संस्कार असण्याच्या शक्यतेचा
ईश-वास देऊन जाते
फसवू तर सगळीच शकतात
पण चार संस्कार आस्लेल्याला
चार शब्दांचा मार बस्तोय
परत मार्गावर आणण
सोप जातय.
लंगड्या अरबी उंटाच्या हट्टापुड
नांगी टाकणारे प्रा.डॉ. दा. ता.
संकटातून तारुन नेणे सोडून
द्या पण आमचे द्येव सोताबी
संकटात पडतात माणसावनी
चुकाबी करत्यात पण त्या त्या
द्येवातले चांगले गुण आनि
चांगली मुल्य आमाला संस्कार नी
विश्वास द्येत्यात त्याची किंमत
तुह्या नास्तिकत्येन भरून निघायची नाय
रामायण लिवायच्या आदी
दुखातून सुटकेच्या नावाने
आमची पोरं परदेशात न्येली
आमच्या म्हातारपनातून त्यांना
दूर न्येऊन
आता बी नेत्यात दुखापासून
कंच्या सुटकेत न्हात्यात
तुमा नास्तिकास्नी
वृद्धाश्रमात चार चार महिने
घालवण्याची शिक्षाच द्यायाहवी
म्हंजी रामाला पारख्या व्हनार्या
कौसल्येचे दशरथाचे दुख समजून येईल
म्हंजी श्रावणबाळाचे पांडुरंगाचे
अठ्ठावीस युगे उभ्या ईट्टलभजनाचे
मुल्य समजून येईल.
उंटावरल्या प्रा.डॉ. दादा ताई
तुमी तुमच्या अरबी उंटाचे
लंगडणे बंद कसे करायचे
त्यो आधी बगा
त्ये जमलं न्हाई तर
प्रा.डॉ. दादा ताई
तुमास्नी ज्ञान संस्कार
करण्यात सोताचे पालक
शिक्षक कुट कमी पडले
याचा सोद घ्येन्याची
पिअएचडी काडा
मोळीच्या चार काटक्या
एकत्र ठेवल्या म्हंजी मोडत
न्हाई ह्ये आमा आडाण्यास्नी
बी समजतय आणि देशाच्या
आसेतू हिमाचल देशाच्या
एकतेचे महत्व प्राडॉच्या
डिग्र्या मिरवून आमच्या
पोरास्नी तुमा सांगता येत न्हाई
तुमास्नी एकतेची तर्कसंगतता
पोरास्नी सांगता येत नाई
देशाच्या तुकड्यांना सौदी
आमरीकी चिनी कसे वापरुन
घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे
ईतर देश फायदे घेत्यात
ह्यो सांगता येत न्हाई
देशाचे जेवढे तुकडे
तेवढी अराजकाता
जेवढी अराजकता
तेवडे स्त्री देहांचे लचके
आमच्या पैशावर जगून
प्राडाँना याचे
कायबी नाई पडले
तेवा भारतमातेवरील देवी
म्हणून वंदेमातरम म्हणून
जीव देण्यास सज्ज
आमच्या देवाळु पोरांची
श्रद्धाच कामास्नी येतीया
सूर्य चंद्र पृथ्वी निसर्ग
उर्जा अन माती
त्यात द्येव नसल
तर नसू द्यात
पण त्यांनी ज्ये
चांगल दिलं
त्यासाठी आम्हास्नी
त्यांचे देव म्हणून आभार
मानू द्यात
नदीत देवी दिसली न्हाई
तरी तिला आमी देवीच मानतो
स्वच्छही नसेल संकटे आणेल
तरीही पवित्रच मानतो
निसर्गाचे पावित्र्याच्या नावाने
गैरौपयोगाच्या विरुद्धचा लढ्याला
मोठा आवाज देता येतो
प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीत
चांगले शोधण्याचे सकारात्मक
पहाण्याचे देवाळूपणाचे
आमचे हिंदू संस्कारच चांगले.
ईंद्र-वीष्णू-ब्रह्मा-शिव
कुणीही चुकले तर त्यांनाही
प्रश्न विचारण्याचे प्रसंगी धाब्यावर
बसवण्याचे काळानुसार कात टाकण्याचे
स्वातंत्र्य आमचा धर्म देतोच
षडरिपू त्यागाचे काम्य व्रत टाळण्याचे
खर्या खुर्या माणसात निसर्गात
चांगल्या मुल्यात देव शोधण्याचे
खळांची व्यंकटी सांडण्याचे
न्हाऊचे पाणी फेकुन देताना
चांगल्या संस्कार संस्कृतीचे
बाळ जोपासण्याचे
नवे ज्ञान स्विकारण्याचे
तत्वज्ञान आमच्या धर्म संस्कारात
आहेच गेली पाच हजार वर्षे
आमचा हिंदूपणा उत्क्रांत होत आला
आहे आताही होतोय पुढेही होईल.
हा विश्वास आम्ही आडाणी देतोय
पण हे सांगण्यास आमचा ज्ञानी
प्राडॉ का कमी पडतोय ?
आमचे कराग्रे वसते लक्ष्मी असेल
वा शुभम करोती अथवा
मानवी जिवनातच अद्वैत
शोध असेल आम्ही आस्तिक
असतानाही नास्तिक असतो
नास्तिक असतानाही आस्तिक
असतो क्षणोक्षणी
आस्तिक नास्तिकतेचा मेळ
अनेक सकारात्मतांचे द्वैत
या सर्वांचा अद्वैत मेळ
घालणारी आमची
संस्कृती विज्ञानाला सुद्धा
देव मानून स्विकारण्याची
हिंदूपणाची क्षमता
नवनास्तिक प्राडाँना समजवून
देण्यास आम्ही आडाणी नेमके कुठे
कमी पडतो ते उमगत न्हाय
जगात देव असो नसो
आस्तिक असो वा नास्तिक
आमची हिंदू संस्कृती
सर्व रंगात न्हाऊन
अवघा रंग एक करत्ये
ह्ये आमास्नी समतया
आमच्या देवाळूपणातच
आमचं हिंदूपण
मन आणि जिवन
रमतया त्येच आमास्नी
पुरतया
आमच्या उपास तापासांनी
काही प्राणी जगत्यात
अर्थशास्त्राचा मूळ गाडा
शाकाहारी शेतीवरच चालतोया
लंगड्या अरबी उंटावर बसू गाई
खाण्याचे तत्वज्ञान सांगितल्याने
बैल हरवला तर
छोट्या शेतकर्याच्या शेतात
समृद्धी नांदत न्हाई म्हणून
देव नसलेली गाय बैल
खाऊन टाकणं सोप होऊन
जातया शेतकर्याची शेती
झोपली की अर्थव्यवस्थेचे
गाडे देशाचे कंबरडे मोडणे
किती अवघड हे आमच्या
प्राडाँना समजवण्यात
त्यांचे पालक गुरुजन
कुठे कमी पडले ठाव
नाय पण आमच्या गाईत
जगातले सगळे देव शोधण्याची
आमची श्रद्धाच
आमास्नी लखलाभ हाय.
हजारोवर्षात मोठ्या योगदानाने
उत्क्रांत आमची संस्कृतीच कुंकु
आमच सौभाग्य हाय
भाळी हिंदूपणाच्या
संस्कृतीच कुकु असलं म्हंजी
देशातल्या माणसाचे माणूसपण
राखल जातया
प्रा.डॉ. दा. ता.
खर्याच वाईट गोष्टी
असतील त्या काळानुसार
जरूर बदला पण
येकच सांगून ठ्येवत्ये
तुमी भरकटले म्हंजी
आमच्या पोरास्नी
आमच्या संस्क्र्तीतल्या
चांगल्या गोष्टीपास्न
भरकटवण्याच देशाचा
र्हास करण्याच
आमच्या ईट्टलाला
आमच्या रामकृष्णाला
आमच्यापासून दूर करण्याचं
लायसन कुणाबी
मिळत न्हाय
कठोर बोल्ली आसन
तर आडाण्यास्नी माफी असावी
समजून घ्याल याची आशा ठेवणारी
आपलीच अडाणी आशा देवाळु
प्रतिक्रिया
19 Mar 2020 - 3:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत.
याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते.
हाकानाका
पैजारबुवा,
19 Mar 2020 - 4:25 pm | माहितगार
सहमत :) प्रतिसादासाठी अनेक आभार
19 Mar 2020 - 5:50 pm | चांदणे संदीप
मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे!
सं - दी - प
19 Mar 2020 - 9:31 pm | माहितगार
मी पेज डाऊन ने सर्वात खाली जातो मग प्रतिसाद अथवा लेख वाचतो.
19 Mar 2020 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा....! =))
भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.
-दिलीप बिरुटे
19 Mar 2020 - 4:45 pm | माहितगार
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))
19 Mar 2020 - 7:35 pm | कंजूस
सगळी स्तुती सुमने उधळण्याची संधी म्हणजे पंचाहत्तरी समारंभ.
मग गिळायला मोकळे. म्हाताऱ्यांनाही बरे वाटते.
19 Mar 2020 - 9:13 pm | माहितगार
गल्ली चुकली ?
20 Mar 2020 - 5:23 am | कंजूस
चुकीच्या बाक्सात पडली चिठ्ठी.
20 Mar 2020 - 5:10 am | चौकस२१२
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार "
"आमच्या ईट्टलाला
आमच्या रामकृष्णाला
आमच्यापासून दूर करण्याचं
लायसन कुणाबी
मिळत न्हाय"
अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते..
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते )
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल?
विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ...
समाजात दोन टोक कशाला?
अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो!
आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो?
बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे
"देशाच्या तुकड्यांना सौदी
आमरीकी ,चिनी कसे वापरुन
घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे
ईतर देश फायदे घेत्यात"
यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे )
धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )
20 Mar 2020 - 11:59 am | माहितगार
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो.
आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्या नवनास्तिकांवर आहे.
एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये?
"विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये?
गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात.
बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे.
दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का?
माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत.
आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.
29 Apr 2021 - 1:02 pm | रंगीला रतन
ज ब र द स्त!
लैच मोठी पण आशयघन आहे
29 Apr 2021 - 6:06 pm | Bhakti
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.
29 Apr 2021 - 6:27 pm | गॉडजिला
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?
30 Apr 2021 - 8:33 am | माहितगार
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?)
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही.
भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
30 Apr 2021 - 10:38 am | गॉडजिला
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो.
बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.
30 Apr 2021 - 10:58 am | गॉडजिला
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे.
आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.
29 Apr 2021 - 7:25 pm | चित्रगुप्त
दीर्घ असूनही वाचत राहिलो. आशयघन उत्तम प्रकटन.
29 Apr 2021 - 8:01 pm | मूकवाचक
+1
29 Apr 2021 - 9:24 pm | कुमार१
आवडले
29 Apr 2021 - 9:54 pm | यश राज
मस्तय..
उंट खरंच लंगडा आहे..
30 Apr 2021 - 8:44 am | माहितगार
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज
सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार