दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिला
खेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकर
यांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्र
वाचन सर्वांगीण आहे.
दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेक
संतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे -
१) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे.
२) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्या बाईला म्हणतात.
३) अरे, मोबाईलवर २-२ तास बोलतोस आणि घरी भाजी मात्र २०० ग्रॅम आणतोस. छी! छी!
४) आपल्या मुलांची नावे टिनू, पिंकी, बंटी, रिटा अशी ठेऊ नका. मुले म्हातारी झाल्यावर
काय पिंकीआज्जी म्हणणार का?
५) मुलांना मम्मी पप्पा म्हणायला शिकवू नका. उद्या हिच मुले तुम्हाला पेकाटात लाथ घालून घराबाहेर घालवतील.
६) जीवनात लढाई करा. जिंकलात तर पृथ्वीचे राज्य भोगाल.
७) जगात सर्वात खोटारडा माणूस मोबाईलवर बोलणारा. घरी असला तरी ट्रेनमध्ये आहे
सांगेल.
८) मुनी सांगती परमार्थ, संत सांगती मतितार्थ, माझ्या सारखा सामान्य म्हणतो दिड वीत पोटाची खळगी हाच खरा जीवनार्थ
९) मुलांना आणि बायकोला सुखी ठेवा, देव आपोआप भेटेल.
१०) आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका. चहा घेऊनच जा,
जेवल्याशिवाय जाऊ नका असे म्हणा.
ह्या सोबत अनेक इतर ही वचने त्यांनी लिहिलेली आहेत आणि तसेच आयुष्य ते जगतात.
आजपर्यंत मी त्यांच्या घरी गेले आहे आणि न जेवता परत आले असे कधी ही झाले नाही
मग ती सकाळ असो वा संध्याकाळ.
संतांनी सत्संग वर्णन केला आहे तो काही वेगळा असतो का?
प्रतिक्रिया
16 Feb 2008 - 11:52 pm | पिवळा डांबिस
माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे.
का? आणि मग - स्केटिंग करणे, घोड्यावर बसणे, कडा चढून जाणे - का नको? छे, काहीतरीच!!
मी तर म्हणेन की आजच्या काळात माणसाला खालील तीन गोष्टी आल्याच पाहिजेतः
(कॉम्प्युटरवर) टायपिंग करणे, ड्रायव्हिंग करणे, आणि कमीतकमी स्वतःच्या पैशांचा जमाखर्च मांडता येणे!
आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका.
मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत. बाकी उर्वरीत महाराष्ट्रात चहा घेउनच जा, जेवूनच जा असेच म्हणतात....
आणि ते पाळतातही...
पिवळा डांबिस
17 Feb 2008 - 1:30 am | इनोबा म्हणे
मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत
डांबीसा,हे बाकी बरोबर बोललास.आमच्या पुण्यात अगदी लग्नाची पत्रीका द्यायला गेले तरी 'लग्नाला आल्यावर जेवणार का?' म्हणून विचारतात.मात्र ही सदाशिव पेठी संस्कृती.आमच्याकडे नाही हो!
हवे तेव्हा घरी या,जेवल्याशिवाय सोडणार नाही.
आपलाच,
-इनोबा
18 Feb 2008 - 7:11 am | चतुरंग
माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे.
मला असं वाटतं की ज्या काळात ह्या गोष्टी लिहिल्या आहेत तो काळ, आणि भारताचा संदर्भ ह्या प्रमाणे तीनही मूलभूत गोष्टी योग्य वाटतात. किंबहुना मी ही ह्याच तीनही वाचलेल्या आठवतात.
शिवाय आजच्या काळाला अनुसरून आपण म्हणता त्या तीनही वाढवायला हरकत नाही.
आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका.
आता ह्याबाबत काय बोलावे? फक्त पुणे असे नाही तर इतरही ठिकाणी असं विचारणारी तर्हेवाईक माणसे मी पाहिली आहेत.
चतुरंग
18 Feb 2008 - 7:57 am | सृष्टीलावण्या
२) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्या बाईला म्हणतात.
ह्या ओळी जास्त आवडल्या.
18 Feb 2008 - 11:13 am | धमाल मुलगा
कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्या बाईला म्हणतात.
अरे, मोबाईलवर २-२ तास बोलतोस आणि घरी भाजी मात्र २०० ग्रॅम आणतोस. छी! छी!
भारीच.
इतरही चा॑गले. हे भाऊ म्हणजे एकदम भारी व्यक्तिमत्व दिसत॑य.
-ध मा ल.
21 Feb 2008 - 6:37 am | चंबा मुतनाळ
आपल्या मुलांची नावे टिनू, पिंकी, बंटी, रिटा अशी ठेऊ नका. मुले म्हातारी झाल्यावर
काय पिंकीआज्जी म्हणणार का?
-- हे मात्र पटले. भाऊंना दंडवत.
बाकी सर्व वचने देखील उदबोधक आहेत