ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी
कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु.
नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो! मला बढती मिळवुन दे. दरवर्षी मी मरुन काम करतो आणि भलत्याचे नाव होते, भलत्यालाच मान मिळतो. मी आपला आहे तिथेच.’ बघता बघता महिना आखेर आली. कचेरीतले कागद सळसळले. साहेब लोक हलु लागले. आणि ज्याची प्रतिक्षा असते ते हुकुम सुटले. कुणाला नवी कामगिरी, नवी नेमणूक तर कुणाला बढती आणि कुणाला गाडी. मात्र दिनुला हा श्रावणही कोरडाच गेला. चार दिडक्या वाढल्या पण पदोन्नती नाही.
दिनु कचेरी सुटल्यावर खिन्न मनाने बाहेर पडला. त्याला घरी जावेसे वाटेना. तो रस्त्याच्या कडेने एकटाच निघाला. चालता चालता समुद्राकाठी पोहोचला. सूर्य बुडाला. दिनु तसाच अंधारात बसून राहीला. मग कंटाळुन तो तिथुन निघाला. आपल्याच तंद्रीत रस्ता ओलांडताना अचानक मागुन प्रकाशाचा झोत आला आणि पाठोपाठ कर्र्र्र्र्र्र कच्च्च असा आवाज. दिनु दचकला आणि एकदम खजिल झाला. गाडी वेळीच थांबवुन आपले प्राण वाचवणाऱ्या गाडीवाल्याला हात जोडुन तो चार अपशब्द ऐकायच्या तयारीत निमूट उभा राहीला. गाडीचा दरवाजा उघडला आणि एक रुबाबदार पोषाख केलेला सद्गृहस्त बाहेर आला. ’दिन्या!’ तो गाडीवाला मोठ्याने ओरडला आणि त्याने जवळ येत दिनुला आलिंगन दिले. सावरलेल्या दिनुने आ वासत त्याला पाहिले आणि ओळखले, अरे विनु, तु? तो दिनुचा सहपाठी विनु होता.
विनुने दिनुला हाताला धरुन गाडीत बसवला आणि गाडी सुरू केली. रे दिनु, तुझा पत्ता काय? कुठे असतोस? काय करतोस? दिनु सुस्कारा टाकत म्हणाला, बाबारे नोकरी करतो! आणि काय करणार. आहे एका खाजगी अस्थापनेत कनिष्ठ अधिकारी झालं. पण तु तर मोठा तालेवार झालास की रे. मोठ्या आनंदात दिसतोस. ’होय’ विनु म्हणाला. होय मित्रा मी खरेच आज आनंदात आहे, अरे मजेत नोकरी चालली आहे, मी वरिष्ठ व्यवस्थापक झालो आहे. ही पाहा मला नवी गाडी देखिल मिळाली आहे. ’मित्रा, आज किती दिवसांनी भेटलास! चल आपण एखाद्या झकपक अतिथीगृहात उतम भोजन करुया. आज फारा दिवसांनी आपली गाठ पडली, आणि तीही अचानक, त्याप्रित्यर्थ आज माझ्यातर्फे मेजवानी’ विनु म्हणाला. दोघे एका एका सुबक व शितल अतिथीगृहात प्रवेशते झाले. मग दिनुला बोलते करत विनु म्हणाला, बाबा रे जपी तर बोलतोस तपी तर चलतोस. निष्ठेने काम करतोस, मग असा उदास का. दिनुने सर्व कहाणी त्याला ऐकविली. मग दिनु दीनपणे विनुला म्हणाला, मित्रा काम तर करतो मग यश का नाही मिळत बरे? माझे काय चुकले? तु कसले व्रत केलेस? कोणत्या देवतेची आराधना केलीस ज्या योगे तुला उच्च पद लाभले? कोणते व्रत केलेस? समोर आलेल्या फेसाळ पेयाचा एक पेला विनुने दिनुच्या हाती दिला, एक स्वत: घेतला. आपल्या पेल्यातुन एक मोठ्ठा घोट घेत दिनु म्हणाला, ’मित्रा तुझी कहाणी मी ऐकली. पण चिंता करु नकोस. तुला एक उपाय सांगतो. ’तो कोणता? त्या योगे काय फळ मिळेल? अधिर झालेल्या दिनुने विचारले.
’हे मित्रा तुज एक वसा देतो. नेमाने पाळ. उतु नकोस मातु नकोस. हे व्रत केल्याने तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. तुही मोठा साहेब होशील.’ आपल्या पेल्यातला एक घोट घेत दिनु भक्ति भावाने परिसु लागला. ’मित्रा तु मिटिंग देवीचे व्रत घे, हे व्रत मोठे प्रभावी आहे’. दिनु आतुरतेने विचारता झाला, ’हे व्रत काय असते, हे व्रत कसे करावे?’ उत्तरादाखल विनु व्रता विषयी सांगता झाला:
कचेरीत एक दिवस आपल्या खात्यात डांगोरा पिटावा; ’मिटींग’ होणार असे जाहिर करावे.
खूप गाजा वाजा करावा.
सर्वाना कामाला लावावे.
आपल्या शिष्यांना भाराभर कागद भरायला सांगावेत.
कचेरीतली सर्वात सुसज्ज बैठकीची खोली आरक्षित करावी.
खोलीबरोबरच कागदाची बाडे, लेखण्या, रंगी बेरंगी बोरु आणि मोठा शुभ्रफलकही मागवावा.
झालेच तर एका भिंतीवर शुभ्रपटलाचे आयोजन करण्यास सांगावे
एक द्रायुस्फटिक प्रेक्षेपक मागवावा.
ध्वनिवर्धकही मागवावा.
अशा प्रकारे सर्व साहित्याची सिद्धता करावी.
मग प्रत्यक्ष मिटींग व्रताच्या आधी दोन दिवस व्रतस्थ व्हावे.
म्हणजे नक्की काय करावे?
मौन व्रत धारण करावे.
मुद्रा गंभिर ठेवावी.
कार्यासनावर भाराभर कागद झुलत्या मनोऱ्यागत रचुन ठेवावेत.
संगणकाच्या पडद्यावर एक्सेलच्या चादरी अंथराव्यात.
त्यावर भरमसाठ आकडे मोड करावी.
भाराभर रकाने बनवावेत.
मग त्या रकान्यांमध्ये रांगोळी सारखे रक्त, पीत, नील, हरीत रंग भरावेत.
मग जालावर जावे.
इकडची तिकडची माहिती गोळा करावी.
थोडे आलेख बनवावेत.
मग काही चित्रे जमवावीत.
मग शक्तिबिंदु ला आवाहन करावे.
गोळा केलेली सामग्री आकर्षक सरक्यांवर चिकटवावी.
पहिल्या सरकीवर मोठ्यात मोठ्या साहेबाचा उपदेश चिकटवावा.
मग अस्थापनेच्या स्तुतिपर स्तोत्रे आणि साहेबाचे स्तवन लिहावे.
पुढच्या सरक्यांवर कुठे चित्रे चिकटवावीत, तर कुठे आलेख डकवावेत.
अधुन मधुन आकडेही पसरावेत.
हे सर्व करीत असता अधुन मधुन सर्व सहकाऱ्यांना हाकाटावे.
शिष्यगणाला वारंवार सिद्धतेची विचारणा करावी.
या व्रतस्थ काळात उशीरापर्यंत कचेरीत बसावे.
खान, पान, भाष, जाल, शीत आदि सर्व मोफत सुविधा उपभोगाव्यात.
मात्र मुद्रा सैल पडु देउ नये.
व्रताचा दिवस उजाडला की काय करावे?
प्रथम सर्वांचे स्वागतकरावे.
उष्ण खाद्य व शीत पेयांची सरबराई करावी
मग साहेबास उपदेशामृत पाजण्यास विनवावे.
ते झाल्यावर आपली पोथी उघडावी.
आपल्या गोळा केलेल्या साहित्याचे वाचन करावे.
रटाळ माहिती रसभरीत वर्णन करुन ओतत रहावी.
आपल्या सहकाऱ्यांची संमती घ्यावी.
मग कुणी काही शंका उपस्थित करेल तर त्यावर गहन व असंबद्ध उत्तर द्यावे.
अर्धा प्रहर उलटताच उष्णपेय व मिष्ट्चकत्यांची तबके फिरविण्याची योजना करावी.
मग आपल्या सहकाऱ्यांना आळी पाळीने त्यांच्या सरक्या सादर करू द्याव्यात.
मग बौद्धिक श्रमाने शिणलेल्या जीवांना घटकाभर विश्राम द्यावा.
सुग्रास भोजन वाढावे.
भोजनोत्तर शीतमिष्टान्न खाऊ घालावे.
पुन्हा दालनात प्रवेश करावा.
सर्व प्रकाशयोजना कुंठित करून प्रक्षेपक प्रज्वलित करावा.
आपल्या रंगीत सरक्या पटलावर सादर कराव्या.
मग आपल्या सर्वात मोठ्या साहेबास पाचारण करावे.
तो त्याचे मंत्रिगणांनी सिद्ध केलेले बाड घेउन दाखल होताच सर्वांनी अभिवादन करावे.
त्याला सर्व पामरांना मार्गदर्शन करण्याची प्रार्थना करावी.
साहेब सरक्या दाखवित असता अधुन मधुन प्रसन्न मुद्रेने मस्तक डोलवावे.
कुणी समधिस्त झालेला दिसल्यास त्याचा तपोभंग करु नये.
साहेबाच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा गजर होताच सर्व भानावर येतीलच.
मग अंधार दूर करावा, प्रकाशमान व्हावे.
अंमळ उष्णपेयपान करवावे.
मग पुन्हा चर्चा रवंथ सुरू करावा.
मग जनसमुदायाची झालेल्या कार्यक्रमावर मते मागवावीत.
मग पुढच्या मिटींगची कालनिश्चिती करावी.
मग तोंड भरून आभार मानावेत आणि व्रत पूर्णत्वास जाते.
या व्रताचे उद्यापन कसे करावे?
सायंकाळी कार्यकालानंतर सर्व सहकारी, श्रेष्ठ, ज्येष्ठ, मनुष्यबळाधिकारी, लेखाधिकारी, वित्ताधिकारी अशा सर्वांना उत्तम आतिथ्यगृहात निमंत्रीत करावे.
सर्वांना पेयपान घडवावे.
आपल्या कार्याची महती सांगावी.
सर्वांनी उपस्थित राहुन उपकृत केल्याप्रित्यर्थ आभार प्रदर्शन करावे.
साहेब लोकांचे उत्तम आतिथ्याबद्दल आशिर्वाद घ्यावेत.
अशाने व्रताची सांगता करावी.
हे मित्रा दिनु, तु हे ’मिटींग देवीचे’ व्रत अंगिकार, तुला मान सन्मान लाभेल, तुझ्या मनोकामना सिद्धीस जातील आणि तुला मानाचे स्थान लाभेल. दिनुने कृतकृत्य होत विनुला व्रताचरणाचे वचन दिले आणि ते दोघे मार्गस्थ झाले. दिनुने हे व्रत मनोभावे आचरले आणि त्याची भरभराट झाली.
मिपाकरांनो, जशी विनुची झाली, दिनुची झाली तशी तुम्हा-आम्हा सर्वांची भरभराट होवो.
ही मिटींग देवीची साथा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
प्रतिक्रिया
5 Apr 2009 - 4:53 pm | श्रावण मोडक
मस्त, सर्वसाक्षी. अगदी नेमके टिपले आहे. मिटिंगदेवींचा विजय असो.
5 Apr 2009 - 4:55 pm | रेवती
कहाणी आवडली. भाषा अगदी कहाणीतल्या पुस्तकातल्यासारखी जमली आहे.
'द्रायुस्फटीत प्रेक्षेपक' वगैरे शब्द जरा जड वाटतात पण कहाणी असल्याने आवश्यक आहेत.
काही शब्दांचे साहेबाच्या भाषेत (किंवा बोली भाषेत) असलेले शब्द पहिल्यांदाच समजले.
रेवती
5 Apr 2009 - 4:55 pm | विनायक प्रभू
भारी मिटींगदेवी
5 Apr 2009 - 5:00 pm | स्वाती दिनेश
मिटिंगदेवीची कहाणी आवडली.:)
स्वाती
5 Apr 2009 - 5:13 pm | नरेश_
गाजावाजा करणाराचे भंगार साहित्य पण सोन्याच्या भावात जाते, आणि
न बोलणाराचे बाराच्या भावात. असो. जाहिरातयुग ना हे.
-------------------------------------------------------------
5 Apr 2009 - 5:18 pm | क्रान्ति
संपूर्ण चातुर्मासात देण्याइतकी मस्त जमलीय कहाणी! खूपच खास, भन्नाट, धमाल, सही!
=D> =D> =D> =D> =D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
5 Apr 2009 - 5:21 pm | विसोबा खेचर
वा वा!
साक्षिदेवा, कहाणी जबरा रे! :)
आपला,
(चातुर्मासप्रेमी) तात्या.
5 Apr 2009 - 6:47 pm | सुनील
मस्त जमलीय कथा. सध्या वार्षिक आढाव्याचे दिवस सुरू आहेत, सदर माहितीचा काही उपयोग करता येईल का याचा विचार करतोय!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Apr 2009 - 7:40 pm | पिवळा डांबिस
साक्षीराव,
मिटींग देवीची कहाणी सुरस आहे...
खूप आवडली...
त्यातही एक्सेलच्या चादरी, शक्तिबिंदू वगैरे खासच!!!
:)
5 Apr 2009 - 8:04 pm | मराठमोळा
खाजगी नोकर्यांमधे मराठी माणसाला ज्या गोष्टीची खरच गरज आहे ती नेमकी मांडलीत तुम्ही.
कष्टाळू मराठी माणुस याच गोष्टींमुळे थोडा मागे पडतो हे निदर्शनास येत असते बर्याच ठिकाणी.
>>मिपाकरांनो, जशी विनुची झाली, दिनुची झाली तशी तुम्हा-आम्हा सर्वांची भरभराट होवो.
अगदी. सर्वाना या व्रताचे ईच्छित फळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 Apr 2009 - 6:12 am | अनिल हटेला
सहमत आहे !!
मिटींगदेवीची कहाणी आवडली !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
6 Apr 2009 - 2:22 pm | चिरोटा
बरोबर.१००% प्रामाणिकपणा केला तर अडचणीच जास्त येतात् असा माझा अनुभव आहे.थोडिफार चालुगिरी करावीच लागते.खोटे हसणे,इतरान्चे गरजेपेक्षा जास्त कौतुक करणे अश्या गोष्टी कराव्या लागतात्.खरे म्हणजे Leadership साठी ह्या गोश्टी गरजेच्या असतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
6 Apr 2009 - 7:40 am | राजा
कुणी समधिस्त झालेला दिसल्यास त्याचा तपोभंग करु नये.
हे तर लै भारि राव !
पण ऐवढ्या मिटींगा होऊनहि प्रत्यक्ष्यात मात्र घन्टा
6 Apr 2009 - 1:17 pm | पाषाणभेद
मी पण हे व्रत घेउ इच्छीत आहे. :-)
'मिटींग देवी' चा प्रसाद हादडणारा- पाषाणभेद
6 Apr 2009 - 6:58 pm | चतुरंग
मीटिंगदेवीचे वर्णन जबरा, व्रत एकदम फर्मास सांगितले आहेत.
द्रायुस्फटिक प्रेक्षेपक, एक्सेल चादरी आणि शक्तिबिंदू आवडले! सरक्याही मस्तच! ;)
(प्रवाही आलेखकर्ता) चतुरंग
6 Apr 2009 - 7:05 pm | शितल
जय मिटींगदेवी !
:)
6 Apr 2009 - 10:22 pm | प्राजु
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Apr 2009 - 4:53 am | मिसळपाव
साक्षीराव, मस्त कथा आहे! लहानपणी 'संपूर्ण चातुर्मास' मधली कथा वाचायचं काम माझं होतं त्याची आठवण झाली. बरोब्बर भाषा जमली आहे!!
10 Apr 2009 - 11:55 pm | मितालि
छान कथा आहे..
23 Nov 2010 - 2:55 pm | इंटरनेटस्नेही
भन्नाट!